ती उत्तर मागत नाही...
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा
मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा!
मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी
ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
ती जाता सहजच म्हणते,'स्वप्नात आज मी येते'
हलकेच झोपही माझ्या,डोळ्यावर येते तेंव्हा!
सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी
निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा!
हे आता उमगत आहे,माझीच गझल आहे 'ती'
ती उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा!
—सत्यजित