गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले. पुढे प्रसंगांची व पात्रांची निवड करताना या गाण्यांची संख्या वाढवून ५६ करण्यात आली.
गीतारामायाणासारखी कलाकृती निर्माण करताना पात्र निवड, प्रसंग निवड या गोष्टींचा फार काळजीपूर्वक विचार केलेला आपल्याला सहज दिसून येतो. एखाद्या महाकाव्य आणी इतिहास म्हणून गणल्या गेलेल्या कलाकृतीवर नवनिर्मिती करताना गदिमा किंवा बाबुजी यांच्या डोक्यात काय प्रश्न असतील? मूळ कलाकृतीला धक्का न लावता, कुणाच्याही भावना न दुखावता त्यावर नवनिर्मिती करायची आहे. त्यातून कुठलाही गैरसमज, चुकीचा संदेश जनमानसात जाता कामा नये (ज्याची काही ठिकाणी शक्यता होती) या सर्व गोष्टी यथोचित मांडताना ते काव्यबंबाळ होऊ नये याकडे लक्ष दिले गेले पाहिजे...
बरं, हे सगळं उभं करण्यासाठी हातात वेळ किती आहे? वरवर मोजुया, गदिमांना गाणं लिहायला १ दिवस, ते बाबुजींकडे पोहोचून त्यांना ते स्वरबद्ध करायला १-२ दिवस, त्यानंतर वाद्यांची निवड, गायक - वादक यांची निवड. त्यांची उपलब्धता यासाठी १-२ दिवस. त्यावेळेस रेकोर्डिगसाठी गायाक-वादक हे एकत्र हजर रहावे लागायचे. आपापलं काम आपल्या वेळेला करून जाण्याची सुविधा त्यावेळेस उपलब्ध नव्हती. बरं, हे सगळं एका आठवड्यात करायचं आहे, या सगळ्याचा विचार करता प्रत्यक्ष गाण्याच्या रेकोर्डिगसाठी बाबुजींकडे एखादाच दिवस उरत असणार हे तर उघडच आहे....
झालं, रेकोर्डिगसाठीचा पहीला दिवस आला. बाबुजी, गदिमा, सीताकांत लाड, सगळे वादक जमले.
बाबुजी म्हणाले, "गाण्याचे शब्द बघू..." सगळ्यांच्या नजरा गदीमांकडे....
"दिलं की परवाच...!!"
"कधी?"
काय चाललाय, कुणालाच कळेना...
गदिमांकडुन गाणं मिळालं नाही असं बाबुजींचं म्हणणं, तर मी गाणं दिलंय यावर गदिमा ठाम....
सीताकांत लाड म्हणले, "आण्णा, हरकत नसेल तर आत्ता एखादं गाणं लिहाल का?"
जरा रागातच, पण गदिमा तयार झाले आणी काही वेळातच, गीतरामायणातलं पाहिलं गाणं सर्वांसमोर आलं,
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती,
कुश लव रामायण गाती...
प्रतिक्रिया
25 Aug 2013 - 5:32 pm | तिरकीट
पहील्या भगाचा दूवा...
http://www.misalpav.com/node/25397
25 Aug 2013 - 10:47 pm | पैसा
असं आयत्यावेळी लिहून स्वये श्रीरामप्रभू तयार झालं यावर पटकन विश्वास बसणार नाही पण गदिमांच्या बाबत ते शक्य आहे. मस्त आठवण!
26 Aug 2013 - 2:51 pm | चाणक्य
या चित्रपटाचीही सगळी गाणी गदिमांनी एका बैठकीत लिहून काढली होती अशी पुलंनी त्यांची आठवण सांगितली आहे.
26 Aug 2013 - 2:34 am | प्रभाकर पेठकर
सुंदर मालिका. मजा येते आहे वाचायला.
पण गदीमा आणि बाबुजींमध्ये असा गोंधळ का आणि कसा झाला?
26 Aug 2013 - 12:16 pm | तिरकीट
@पैसा: असं आहे खरं..१-२ ठिकाणी तर असं वाचनात आलंय की, रागावलेल्या गदीमांना चक्क खोलीत बंदीस्त करून ते गाणं त्यांच्याकडुन लिहुन घेतलं गेलं...
@पेठकर काका: नक्की कारण समजणं अवघड आहे, पण कदाचीत कामाच्या व्यापामधे म्हणा, वेळेच्या गडबडीमधे म्ह्णा हे झाल्याची शक्यता आहे miscommunication...(मराठी शब्द??)
26 Aug 2013 - 12:22 pm | अद्द्या
आयत्या वेळी असं सुंदर गाणं लिहिणारे गदिमा आणि त्याला तेवढ्याच कमी वेळात स्वरबद्ध करणारे बाबूजी आणि इतर कलाकार . सगळेच ग्रेट .
पुढील भागाची वाट बघतोय
26 Aug 2013 - 1:18 pm | नित्य नुतन
खूपच छान आठवण.. आज संगीततंत्रज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरीही त्या काळातली हि गाणी आज हि हृदयात घर करून आहेत...
वाचते आहे.. येऊ द्यात ... :-)
26 Aug 2013 - 2:14 pm | दत्ता काळे
गीत रामायणाच्या 'सुरवातीची' आठवण.. मस्तं.
श्री. लाडांच्या नावातही सिता, राम आहेत.
26 Aug 2013 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
गीतरामायणाबद्दलची ही घटना वाचायला आवडली... अजून लिहा !
26 Aug 2013 - 10:24 pm | अर्धवटराव
मागे तात्यांनी बाबुजींच्या आठवणीचा एक धागा टाकला होता मिपावर. तात्या बाबुजींकरता झुणका भाकरी घेऊन गेले होते व तिथे गप्पांचा फड रंगला असा काहिसा धाग्याचा विषय होता. गदिमा आणि बाबुजींमधे कितीतरी वर्षे कटुता होती पण तात्यांशी गप्पा मारताना बाबुजी गदिमांबद्दल अत्यंत गहिवरुन बोलले होते अशी तात्यांची आठवण आहे.
हा गीतरामायण प्रसंगाचा आणि या कटुतेचा काहि संबंध असावा काय? तर्काला वाव आहे. असो. थोरामोठ्यांच्या गोष्टी तेच जाणोत. आपण गीतरामायणाचा आनंद घ्यावा.
गदिमांना एकदा रामायणावर पद्यरचना करायची अत्यंत उत्स्फूर्त ऊर्मी आलि व त्यांनी त्या भारावलेल्या अवस्थेत गीतरामायण लिहीलं असं कुठेसं ऐकलं होतं... ति दंतकथाच म्हणायची तर.
अर्धवटराव
26 Aug 2013 - 11:31 pm | आशु जोग
तात्या म्हणजे विसोबा खेचर का ? ही आठवण मी पूर्वी कधीतरी त्यांच्याकडूनच ऐकली आहे.
आम्ही फार पूर्वी असाच एक निरुपद्रवी धागा एका गाण्याबद्दल टाकला होता त्यातून लोकांच्या मनात ठिणगी पडली आणि युद्ध सुरु झाले. काही सभासदांची हद्दपारी झाली.
जुन्या गोष्टी: मिसळ नव्हतीच पण ऑर्कुट जीमेलदेखील तेव्हा जन्मले नव्हते.
27 Aug 2013 - 12:22 am | अर्धवटराव
तात्या म्हणजे आपले विसोबा खेचरच.
27 Aug 2013 - 9:45 am | सुबोध खरे
ग दि मा ना खोलीत बंद करून ठेवले होते आणि त्यानंतर त्यांनी एका तासाच्या आत संपूर्ण गाणे लिहिले हि आठवण श्री सुधीर फडके यांनी स्वतः सांगितलेले मी दादर माटुंगा कल्चरल केंद्रात ऐकले आहे. (पण ते गाणे स्वये श्री रामप्रभू ऐकती हेच आहे का ते मला आठवत नाही) त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गदिमांना असे वाटले कि त्यांनी गाणे दिले परंतु बाबूजींना ते मिळाले नव्हते म्हणून असे घडले असावे असे बाबूजी म्हणाले.
27 Aug 2013 - 11:17 pm | आदूबाळ
और आनेदो!
पुभाप्र!