दयेच्या छावण्या

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Oct 2015 - 11:19 am

पाणी पितो ती नदी आमची नाही
अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत
आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या
ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत!

युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा
WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स
RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त
युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या
यातलं काहीच आमचं नाही!

नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत!
ती रासवट आहेत, मारतात, मरतात
तलवारीने गळे चिरतात,
रक्ताच्या कुर्बान्या देतात
महाहिंसक माणसं!
त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो.......

पण तुमच्यात आलो म्हणजे
तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही!

एक काम करा कि साहेब!
ते जे No Man's Land म्हणता ना
ते द्या आम्हाला!
आमची घरं आम्ही थाटू
आमच्या नद्या आम्ही खणू
आमची शेती आम्ही करू!

ह्या ह्या, माहितीय साहेब! तुम्ही नाहीच म्हणणार...
आम्ही बेघर परागंदा नाही राहिलो, तर
तुमच्या दयेच्य छावण्या,
तुम्ही तरी कुठं उभारणार म्हणा!
असो..... चालू द्या.

अनर्थशास्त्रइशाराफ्री स्टाइलमुक्त कवितासांत्वनाभयानकबिभत्सकरुणरौद्ररसधोरणमांडणीवावरकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीभूगोलदेशांतरराहती जागाअर्थकारणअर्थव्यवहार

प्रतिक्रिया

एस's picture

9 Oct 2015 - 11:26 am | एस

चांगली आहे कविता.

तुडतुडी's picture

9 Oct 2015 - 12:42 pm | तुडतुडी

चांगली कविता . No Man's Land अशी नसते हो . आणि ती तुम्हाला दिली तरी त्याचे परिणाम आम्हालाच भोगायला लागतील

शिव कन्या's picture

9 Oct 2015 - 1:43 pm | शिव कन्या

No Man's Land अशी नसते हो
म्हणूनच ती इथे उपहासाने वापरली आहे.

माहितगार's picture

9 Oct 2015 - 4:05 pm | माहितगार

एक वास्तव मांडणारी कविता बरीचशी पोचली, का कुणास ठाऊक कुठेतरी जराशी शिल्लक वाटली तरीही वाचण्यास आवडली. धन्यवाद

मांत्रिक's picture

9 Oct 2015 - 7:04 pm | मांत्रिक

+१११