ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८...... शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९...... एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०.. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११.... पिटी परेड.
राजाराम सीताराम....... भाग १२.... कॅंपलाइफ.
राजाराम सीताराम....... भाग १३... विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर
(काहींनी काश्मिरी हिंदूंवर लिहिलेली कथा वाचली असेल, हे लिहिता लिहिता आयएमएवर कथा लिहावी असे माझ्या स्नेह्याने सुचवले. कथा पुरतीसाठी परत येथे देत आहे)
राजाराम सीताराम एक ....... भाग १४... मुठी शिबिर.
१९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाददुसरे कुटुंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळूहळू वाढ होऊ लागली. अतिरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम पाकिस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे कशी घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. अतिरेक्यांचा डाव एकदम चपखल बसला होता. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे, कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा हिंदू तरुणाला किंवा काश्मिरी पंडिताला मारायचे. ह्या कृत्याचे परिणाम, त्याच गल्लीत राहणंऱ्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळित अवस्थेत त्या गल्लीत राहणारे सगळे हिंदू खोरे सोडून निघून जायची. शिवाय सतत मशीदींतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायची. अशा भाषणांमधून हिंदूंना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जेहाद पुकारण्याची मुस्लिम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम असायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा, कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. त्यात भर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू घाबरून आपले सामान घेऊन पसार व्हायचे. मानव हत्या किती झाली ह्यावरच जर क्रूरता ठरत असेल तर काश्मिरी हिंदूंची हत्या फार झाल्या नाहीत. साधारण २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. महिलांवर सततचे अत्याचार करून, हिंदूंना पळवून नेऊन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतर करायला अनावृत केले जात होते. ही क्रूरता नाही का? वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान, हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लिम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावाखाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लिम पण जेहादाच्या नावाखाली भुरळून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू असल्या कारणाने, एकीकडे काश्मिरात कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरीकडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोरे सोडून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत रोजच्या रोज घट पडत चालली होती.
संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रूमवर आला. तो म्हणाला "बटालियन कमांडरला अजून सुद्धा वाटतेकी जिसी रोजच्या आयएमएच्या रगाड्यातून काही दिवस सुटण्यासाठी हा कांगावा करत आहे". १९८९च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी, काश्मिरी हिंदू कुटुंबीयांना झेलावे लागणारे प्रश्न ह्या बिकट परिस्थितीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्यांच्या कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रूप घेत आहे हे समजत नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणाबद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्यामुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.
तो मला म्हणाला "बटालियन कमांडरने मला संध्याकाळी परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जिसी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे". कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला "सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी मी तुला देतो". माझ्या जिवात जीव आला. हुरूप आला. आता माझ्या समोर एक नवा प्रश्न उभा राहिला. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. मोठेच दिव्य. भदराजचा कॅम्प मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला होता.
मला सुट्टी तर मिळाली. चार दिवसात परत येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पाहिल्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते श्रीनगर ह्या एकदिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टीमुळे "बनीहाल घाटात" असणारा "जवाहर बोगदा" बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबनमध्येच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत बर्फवृष्टी मुळे नेहमीच असा अधुनमधुन बंद राहतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला थोडा आनंद व मोठे आश्चर्य वाटले. मला सुट्टी मिळेल असे तिला वाटले नव्हते. आम्हाला एकमेकांशी आयएमएतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडिलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल इतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.
आम्ही घर सोडताना माझ्या वडिलांचे, श्री माटू नावाचे एक जवळचे मित्र भेटायला आले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. म्हणाले "मी आज माझ्या मित्रासाठी काही करू शकत नाही". आम्हीच ठरवले होते की माटू अंकलकडे राहायचे नाही. आमच्या शेजारच्या वाखलू कुटुंबाला जेव्हा काश्मीर सोडून जायला सांगितले होते तेव्हा ते काश्मीर सोडून जाण्याऐवजी त्यांचे राहते घर सोडून त्यांच्या आप्तेष्टांकडे राहायला लागले होते. पण काहीच दिवसात त्यांच्या आप्तेष्टांसकट त्या संपूर्ण कुटुंबांसच प्राणास मुकावे लागले होते. हे असे नको व्हायला म्हणून आम्ही माटू अंकल कडे राहायला जाणार नव्हतो. माटू अंकलने आम्हाला जम्मू मधल्या "मुठी" नावाच्या विस्थापितांच्या शिबिरात जायचा सल्ला दिला. माटू अंकल म्हणाले, "काय माहिती, काही दिवसाने मला पण तेथेच जावे लागेल". आमच्याकडे खोऱ्यातले घर सोडून दुसरे कोठचेच राहण्याचे ठिकाण नव्हते. निघायच्या आधी घरात वडलांकरता एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझी आई जवळजवळ बत्तीस वर्ष त्याघरात राहिली होती व मी वीस वर्ष. त्याघराची भिंतीदारे आमच्याशी हितगुज करायची. आज आम्ही तेच घर सोडून चाललो होतो. आमच्या त्या घरात परत जाऊ शकू का घराला कायमचे मुकू हे माहीत नव्हते. आम्हाला आमचे घर परत कधी बघायला मिळेल की नाही? मिळालेच तर किती वर्षाने? आणि कोठच्या स्तिथीत? काहीच कल्पना नव्हती. आईसाठी मी गरम गरम कहावा केला. आमचा तो तेथला शेवटचा कहावा. रोज सकाळी आईला बाहेरच्या खोलीत बसून कहावा प्यायची सवय होती. आईने व मी घराला न्याहाळले. आईला रडू आवरत नव्हते व माझ्या घशात हुंदक्याचा गोळा जमून घसा दुखायला लागला होता. आम्ही एकमेकांच्या हातावर चमचाभर विरजलेले दही दिले. घराला कुलूप ठोकले व बाहेर पडलो. मला आईसाठी खूप वाईट वाटत होते. ती शिबिरात गेल्यावर स्वतःला कशी सावरेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. एक टॅक्सी करून थेट जम्मूला पोहोचलो.
(मुठी शिबिर)
आम्ही मुठी शिबिराच्या दाराशी येऊन धडकलो. एका जुन्या सरकारी गोदामाचे तात्पुरते शिबिर केले होते. आम्हाला एक खोली देण्यात आली. माझी आई एकटी होती म्हणून एक खोली तरी मिळाली. नाहीतर सगळी कुटुंब ताडपत्रीच्या टेंट मध्ये राहताना मी बघितले तिथे. मला तशा परिस्थितीत सुद्धा आयएमएतल्या टेंट बांधायला शिकवायच्या पहला कदम ह्या कॅम्पची आठवण आली. आम्ही आयएमएत होतो, व सैन्यातली नोकरी करण्यासाठी आलो होतो. आम्हाला टेंट मध्ये राहायला शिकवतात ते युद्धजन्य परिस्थितीशी तोंड देण्यासाठी. वाईट ह्याचे वाटते की, येथे आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांचा प्रदेश सोडून कडाक्याच्या थंडीत टेंट मध्ये राहायला लागत होते. राज्यकर्त्यांना जर असे राहावे लागले असते तर ह्या प्रश्नाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात निश्चित फरक पडला असता. आपल्याच देशात आपणच पोरके. देव करो आणि येथे पदोपदी तुडवला जात होता तसा कोणाचा स्वाभिमान पायतळी तुडवला जाऊ नये. कधीपण. शिबिरातल्या खानावळीत आम्ही कहावा घेतला व मी परत जायला निघालो. आजचा चवथा दिवस होता. पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. माझ्या डोळ्यांपुढे आयएमएतली पुढची लढाई दिसत होती. आईला एवढेच सांगितले होते की मला जायला पाहिजे नाहीतर कोर्स बुडेल. काय सांगू अजून. आईचे दुःख काय कमी होते. त्या कॅम्प मध्ये एकटे राहायचे. इतक्या वर्षाचे स्वतःचे घर एका दिवसात सोडून, आपल्या सगळ्या जवळच्यांना सोडून येथे परक्या जागेत एकटीने नवीन घर तयार करायचे. एक प्रकारचा महाभयंकर वनवासच हा. बरेच काश्मिरी विस्थापित, मनोरुग्ण झाले ते ह्याच परिस्थिती मुळे. माझी आई खोऱ्यात शिक्षिका होती त्यामुळे ती मुठी शिबिरातल्या शाळेत शिकवायला लागली. तिने स्वतःला सावरून घेतले. आई येणाऱ्या डिप्रेशनशी कामात मग्न होऊन लढू शकली. एका अर्थाने ते बरेच झाले नाहीतर मी एवढ्या लांबवर राहून काहीच करू शकलो नसतो. बाकीच्यांचे काय हाल झाले असतील ईश्वरच जाणे.
मी परत आयएमएत परतलो. माझ्या दिलेल्या सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा. सकाळच्या पिटी परेडला हजर झालो. मला पिटीपरेड मधून बाहेर काढून डिएसने त्याच्या ऑफिस मध्ये बोलावले. म्हणाला तू माझा दिलेला शब्द पाळला नाहीस. तुझे सैन्याच्या नियमांनुसार "ओव्हर स्टेइंग ऑफ लिव्ह" झाले आहे. उशिरा येणाऱ्याला आर्मी मध्ये कडक शिक्षा असते. तुझी केस आता माझ्या हातात राहिली नाही. तुला बटालियन कमांडरकडे जावे लागणार आहे. मी, डिएस गिलला मुठी कॅंप मध्ये आईला दाखल केले त्याची कागदपत्रे दाखवली. तारीख दाखवली. ती त्याने बघितली पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. आयएमए मधल्या नियमांनुसार उशीरा येणे हा गुन्हा हातून घडलाच होता व त्यासाठी काही अपील नव्हते. त्याच्यासाठी होणारी शिक्षा भोगावीच लागणार होती. नियमांविरुद्ध अर्ज करणे, व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे, आपण भारतीयांमध्ये भिनले आहे. नियम फक्त दुसऱ्यांसाठी असतात असे आपल्या प्रत्येकाला वाटत राहते. आपल्यावर नियमाप्रमाणे वागण्याची वेळ येते तेव्हा कारणे सुचतात व सुचलेली कारणे किती उचित आहेत ह्याचे महत्त्व दुसऱ्याला पटवले जाते. मग नियमाचे उल्लंघन करायला आपण मोकळे होतो. गमतीची गोष्ट अशीकी आपले काम झाल्याझाल्या आपण त्याच नियमाचे समर्थन करायला सुरवात करतो व दुसऱ्याने नियमाने कसे वागले पाहिजे ह्याचे धडे देण्यास लागतो. ही सवय चुकीची आहे ह्याची कल्पना आयएमए करून देते. नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो. जर नियमांचे उल्लंघन झाले तर उचीतअशी शिक्षा भोगावीच लागते. नियमाविरुद्ध अर्ज करण्याचा काही परिणाम होत नाही व अर्ज करण्याची सवय पण तितकीच वाईट आहे हे ही आयएमएत उदाहरणाने शिकवले जाते.
कंपनी कमांडरकडे गेल्यावर त्याने मला सांगितले की माझ्या कडून चार दिवसाच्या सुट्टीचे उल्लंघन झाले आहे व आयएमएच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. आता निर्णय बटालियन कमांडर व डेप्युटी कमांडंट ह्यांच्यावर अवलंबून आहे. जेव्हा कंपनी कमांडर मेजर शेखावतने उपकमांडंटचे नाव घेतले तेव्हाच मी समजून चुकलो की माझ्या रेलिगेशनचा किंवा मला काढून टाकण्याचा विचार चालला आहे. कारण रेलिगेशनचा निर्णय व आयएमएतून काढून टाकायचा निर्णय बटालियन कमांडर व उपकमांडंट दोघे मिळून घेतात. बटालियन कमांडर माझ्यावर नाराज आहेत ह्याची कल्पना होतीच. उपकमांडंटचा निर्णय बराचसा बटालियन कमांडरच्या शिफारशींवर अवलंबून असतो.
संध्याकाळी मला हॅकल ऑर्डर मध्ये बटालियन कमांडर कडे नेण्यात आले. शिक्षा होणाऱ्या जिसीला हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागते. हॅकल ऑर्डर मध्ये आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरेवर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असतो. जेव्हा केव्हा शिक्षेसाठी जावे लागायचे तेव्हा हॅकल ऑर्डरचा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की जिसीच्या हातून काहीतरी चूक झालेली आहे व तो रेस्ट्रिकशनसाठीतरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठीतरी जात आहे असे समजावे.
एकदाका रेस्ट्रिकशनस् मिळाली की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर शिक्षेत हळूहळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठावीस रेस्ट्रिकशनस् पेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचे आपोआप रेलिगेशन व्हायचे. ह्यासगळ्या मुळेच सगळ्यात कठोर अशीती शिक्षा समजली जायची व जिसीला साधारण एका वेळेला "टेन रेस्ट्रिकशनस्" पेक्षा जास्त, ही शिक्षा मिळायची नाही. ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व शिक्षा कमीत कमी होईल असे आपले वर्तन ठेवायचा.
रेलिगेशन होणार की आपल्याला आयएमएतूनच काढून टाकले जाणार ह्यापैकी काय कानावर पडणार ह्या विचारात मी हॅकल ऑर्डर मध्ये बटालियन कमांडरच्या ऑफिसच्या पोर्च मध्ये उभा होतो. माझा पोषाख ठीक आहे का, हे कॅप्टन गिल स्वतः जातीने बघत होता. छान खोचलेला शर्ट, बेल्टच्या वर फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत म्हणजे छान दिसतो पोषाख. तसा आहे ह्याची खात्री करत, कॅप्टन गिल मला धीर देत होता. नाळ लावलेले पॉलीशने लख्ख चमकावलेले ड्रिलजोड्याचे पुढचे काळे टोक, मी माझ्या स्वच्छ पांढऱ्या रुमालाने हलकेच साफ केले. हॅकल लावलेली बॅरे डोक्यावर चापून बसवली. बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर आहे हे सुनिश्चीत केरून मी तयारीत उभा राहिलो. तेवढ्यात सुभेदारमेजरचा खडा आवाज माझ्या कानावर आदळला.
"साsssव धान। जिसी सुनील खेर आगे चलेगाssssss तेज चल". जसा मी बटालियन कमांडरच्या ऑफिसात टेबला पुढे संचलन करत पोहोचलो तसा मागून पुन्हा आवाज आला.
"जिसी सुनील खेरsssss......... थम १ २". मी सावधान मध्ये उभा राहिलो. सुभेदारमेजरचा पुन्हा आवाज "जिसी सुनील खेर सॅल्यूट १ २". माझ्या बरोबर शेजारी उभ्या असलेला कॅप्टन गिलने पण बटालियन कमांडरला त्याच तालावर सॅल्यूट केला.
सुभेदारमेजरने खड्या आवाजात माझा गुन्हा म्हणून दाखवला. "नं ३८९७ जिसी सुनील खेर चार दिनकी छुट्टीपर गया था। छुट्टीके बाद एक दिन देरीसे उसने रिपोर्ट किया है। आर्मी अॅक्ट ३९ (ब) के मुताबिक जिसी सुनील खेर एक दिन बिना छुट्टी लिये छावनीसे बाहर था। सजा के लिये हाजिर है श्रीमान"।
हे ऐकून बटालियन कमांडर करड्या आवाजात म्हणतो "जिसी सुनील खेर, यू हॅव्ह ओव्हर स्टेड युअर लिव्ह बाय वन डे. अॅज पर आर्मी अॅक्ट ३९ (ब) यू आर गिल्टी. डू यू प्लिड गिल्टी"?.
मी म्हणालो – "येस सर".
बटालियन कमांडर गरजला "फॉर युअर एक्ट ऑफ धिस, यू आर गिव्हन अं पनिशमेंट ऑफ २८ रेस्ट्रिकशन्स. सुभेदारमेजर मार्च हिम ऑफ".
मला मागून सुभेदारमेजरचा आवाज आला "जिसी सुनील खेर सॅल्यूट १ २. पिच्छेssss मूड......... जिसी सुनील खेर आगेसेssssss तेज चल". बाकीची कवायत एका यंत्रा सारखी मी करत होतो. लांबवर कोठे तरी अजून बटालियन कमांडरचा आवाज कानात घुमत होता. २८ रेस्ट्रिकशनस. २८ दिवसांची कठोर शिक्षा. सगळ्यात कठोर वाटणारी ती शिक्षा ऐकून कोणा जिसी वर आभाळच कोसळले असते पण माझ्या मनावरचे बोजे एकदम गेले. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझे रेलिगेशन सुद्धा झाले नव्हते मग आयएमएतून काढून टाकणे राहिले बाजूला. बटालियन कमांडरनेच माझी तशी शिफारिश केली असणार उपकमांडंट कडे. मनातल्या मनात मी बटालियन कमांडरला धन्यवाद दिला. माझ्या मित्रांना ही बातमी कधी सांगतो असे झाले. आईला ह्यातले काहीच माहीत नव्हते त्या मुळे सांगायचे असे काहीच नव्हते. आज रात्री शिक्षेवरून आल्यावर आईला पत्र लिहिणार होतो आमच्या नव्या पत्त्यावर – श्रीमती इंदूकुमारी खेर, नं २६७५, मुठी विस्थापित शिबिर, फेज २, जम्मू १८११२४.
जिसी सुनील खेर आता कर्नल सुनील खेर झाला आहे. पुण्यात एक छोटा दोन खोल्यांचा ब्लॉक आहे. जेव्हा त्याची पोस्टिंग फील्ड मध्ये असते तेव्हा त्याची आई तिथे राहते. वडील परत कधी भेटलेच नाहीत. इतर वेळेला आई त्याच्या बरोबरच राहते. गेल्या वीस वर्षात काश्मीर मधल्या घरात ते कधीही गेले नाहीत. कमिशन मिळाल्यावर काश्मीर मध्ये त्याची पोस्टिंग दोनदा झाली. तरी सुद्धा. एकदा पोस्टिंगवर असताना हेलीकॉप्टर मधून त्याने त्याचे घर बघितले होते. दुसरेच कोणी तरी राहते त्यात आता. त्याचे काश्मीर सुटले. पण त्या आठवणी व तो कडवटपणा गेला नाही. असेच काहीसे बाकीच्यांबरोबर झाले आहे. आता काश्मीर मध्ये काश्मिरी हिंदू नगण्य राहिले आहेत. त्यांची घरे, त्यांची स्थावर मिळकत, सारे फस्त झाले आहे. मागे राहिलेत फक्त कटू आठवणी, मानसिक क्लेश व मनोरुग्ण. जम्मू मध्ये आता आठ शिबिरे आहेत व दिल्ली मध्ये साधारण पंधरा जागी शिबिरांसारखे साधारण पस्तीस हजार काश्मिरी कुटुंब राहतात.
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/
(मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 2:35 pm | अँग्री बर्ड
तुमची लेखमालिका वाचून काढली आहे, खूपच छान लिहिले आहे तुम्ही. तुमच्यासारखी लोकं तिकडे सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत म्हणून मी इथे निवांतपणे मिपावर पडीक राहू शकतो. खूप छान . दोन भागातले अंतर कमी असले तर उत्तम !
17 Apr 2012 - 2:36 pm | मृत्युन्जय
वांझोट्या प्रतिक्रिया तरी काय नोंदवणार. एका सैनिकाची ही अवस्था तर सामान्य काश्मिरी हिंदुंना कोण विचारतय.
17 Apr 2012 - 3:31 pm | Madhavi_Bhave
जे राष्ट्र आपल्या इतिहासातून काही शिकत नाही ते राष्ट्र तरी कसे म्हणायचे. आपल्याच देशात राष्ट्रगीत म्हणू शकत नाहीत किंवा झेंडा उभारू शकत नाहीत. जगाच्या पाठीवर असे दुसर्या कोणत्या देशात होत नसेल आणि ह्याला कारणीभूत म्हणजे आपले नादान राज्यकर्ते. आपले आणि आपल्या नातेवाईकांचे भले करण्यात मग्न असणाऱ्या राज्यकर्त्यांकडे कसले आले आहे परिस्थितीचे भान.
जिंकलेला प्रदेश परत करून स्वताची प्रतिमा उजळ करण्याचं नादात आणि फक्त आपणच किती शांततेचे पुरस्कर्ते आहोत ह्याची टिमकी वाजविण्याचा नादात नेहरूंनी काश्मीर प्रश्न UNO मध्ये नेला आणि भारतासाठी कायमची दोखेदुखी होऊन बसला ते नेहरू आणि कारगिल युद्ध झाल्यावर पाकिस्तानचे खूप नुकसान केलेत म्हणून पाकिस्तानला १००० करोड रुपये द्या म्हणून गळा काढणारे मुलायम सिंघ यादव एकाच माळेचे मनी. अर्थात ह्या माळेमध्ये अजूनही बरीच रत्न आहेत म्हणा त्यांची नावे सुध्धा उच्चारायची इच्छा होत नाही.
आज काश्मीर भारताचा भाग आहे ते निव्वळ मिलिटरी मुळे. जेथे जावू तेथे मिलिटरी आहे तरी देखील जिवंत राहणे हे पूर्ण पने नशिबाचा भाग. पण आपल्या उबग आणणाऱ्या सुमार अक्कल असणाऱ्या नेत्यांना काय त्याचे. शेतकर्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणून बिचारे आत्महत्या करतात आणि इकडे आपले शासनकर्ते कसाबवर करोडो रुपये उधळतात. सर्वच तमाशा करून ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी पापर मध्ये वाचले होते कि काही मिलिटरीच्या तुकड्या दिल्ली कडे कूच करत होत्या. खरे काय कोणास ठावूक पण मिलिटरीचा पण धीर सुटू लागला आहे काय असाच प्रश्न उभा राहतो.
पण कारगिल युद्धात मरण पावलेल्या सैनिकाच्या शवपेट खरेदीत हि भ्रष्टाचार करणारे किंवा "आदर्श" द्वारे वेगळाच आदर्श ठेवणारे आपले राज्यकर्ते आणि नोकरशहा ह्यांना कसले सोयरसुतक.
आणि आम्ही फक्त म्हणायचे "मेरा भारत महान"
17 Apr 2012 - 3:48 pm | रणजित चितळे
आदर्श व तत्सम घोटाळ्याने मलाही फार वाईट वाटले. ....
17 Apr 2012 - 6:58 pm | रेवती
हा भाग वाचला.
फारच करूणा वाटली.
खरंच, राज्यकर्त्यांवरही टेंटमध्ये रहायची वेळ आली तरच समजतील त्या वेदना.
17 Apr 2012 - 7:22 pm | कवितानागेश
ह्म्म....
नावालाच लोकशाही आहे देशात....
नक्की कोण देश चालवतंय कळतच नाही.
17 Apr 2012 - 8:15 pm | पैसा
सैन्यातल्या ऑफिसर्सची ही अवस्था, तर बाकी सामान्य नागरिक कसे जगत आणि मरत असतील? त्यांना रोजचं जगणं मरणापेक्षा भयंकर होत असेल...
22 Dec 2012 - 11:29 am | अनिल मोरे
.