पहिले ९ भाग येथे वाचायला मिळतील
ह्या आधीचे..........
……………. उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही………….
राजाराम सीताराम............... भाग १०........... एक गोली एक दुश्मन.... भाग २
हा तमाशा आटोपल्यावर पुन्हा आमची फायरिंगची कवायत सुरू झाली व दिवसभर चालली. फायरिंग केलीच नाही. कवायतीतल्या चुका काढून आमच्या कडून कष्टदे मिश्राने खूप रोलिंग क्रॉलिंग करवून घेतले. दुसऱ्या दिवशीही तेच. दोन दिवस खूप दमवले. मनसोक्त रॅगिंग घेतले. एकही राउंड फायर न करता आम्ही दोन दिवस नुसता रगडा खात होतो. आता फायरिंगची कवायत अगदी अंगवळणी पडली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी कॅप्टन गिल म्हणाला -
गुड यू हॅव फॉलोड द ड्रिल. नाऊ नेक्स्ट टू डेज वी वील फायर. पण दुसऱ्या दिवशीही फायरिंग आम्हाला खूप दमवल्यावरच सुरू झाली. अंगातली रग निघून गेली होती व उरली होती फक्त आदेश पाळता येतील तेवढीच ताकद. फालतू गोष्टी सुचतच नव्हत्या.
कष्टदे मिश्राचे कमांडस् देणे चालूच होते व आम्ही एका यंत्रासारखे त्याच्या कमांडस् वर फायरिंग करत होतो.
डिटेल खडे हो।
त्या बरोबर मांडी घालून बसलेले पाहिले तिनंही डिटेल उभे राहिले.
नंबर एक डिटेल, आगेSSSS बढ। तेज चल।
जसे फायरिंग पॉईंट जवळ पाहिला डिटेल आला तसे,
थम। लेटके पोझिशन।
जिसीनी लेटके पोझिशन घेतली. त्या बरोबर नंबर दोन डिटेलने कदमताल करत नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसी जवळ पाच राऊडस् नी भरलेली मॅगझिन ठेवली.
नंबर एक डिटेल... भर।
मॅगझिन रायफल मध्ये भरली गेली.
नंबर एक डिटेल ३०० मीटर सामने टार्गेट।
त्या बरोबर 'खालीखोके' गोळा करण्यासाठी नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसीच्या डाव्या बाजूला रायफल जवळ जॅपकॅपची ओंजळ करून नंबर दो डिटेल चा एकेक जिसी तयार उभा राहिला. नंबर एक डिटेलने रायफल कॉक केली. सेफ्टी लॅच फायर पोझिशन वर आणले व अर्जुनाचा आव आणत टार्गेटवर नेम साधला.
पाच राऊंडस् सिंगल शॉट फायर।
नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसी ने नेम साधत पाच राऊंडस फायर केले. ज्याचे फायर करून झाले त्याने लागलीच सेफ्टी लॅच सेफ वर आणले व आपला डावा हात वरती केला. नंबर दो डिटेलच्या जिसीने आपआपल्या जॅपकॅप मध्ये जमवलेल्या राऊंडस् मोजल्या.
नंबर एक डिटेल खाली कर।
त्या बरोबर प्रत्येकाने मॅगझिन काढून, परत एकदा कॉक करून, टार्गेटच्या दिशेला बॅरल करून चाप दाबून रायफलचे चेंबर रिकामे झाल्याची खात्रीकरत नंबर एक डिटेलचा प्रत्येक जिसी - नंबर एक ठीक, दो ठीक, तीन ठीक..... असे म्हणत फायर पूर्णं झाल्याची कष्ट दे मिश्राला ग्वाही देत होता. त्या पाठोपाठ नंबर दो डिटेलचा प्रत्येक जिसी – नंबर एक ठीक, दो ठीक, तीन ठीक..... असे म्हणत 'खालीखोके' ठीक गोळा झाल्याची ग्वाही देत होता.
नंबर एक डिटेल खडे हो। दाए मूढ तेज चल।
त्या बरोबर नंबर दो डिटेल सुद्धा जमवलेले 'खालीखोके' घेऊन डावीकडे वळून 'खालीखोके' जमा करायला गेला व नंबर तीन डिटेलने यंत्रासारखे टार्गेटपाशी पळत जाऊन किती गोळ्या कोठे लागल्या हे तपासायला सुरवात केली.
ही कवायत बाकीच्या डिटेल्स चे फायरिंग होई पर्यंत आता सुरळीत पार पडत होती. सकाळच्या रगाड्याने जिसीज दमले होते व त्यामुळे बाकी खोड्या काढायचे भान राहिले नव्हते. प्रत्येकाला नेमबाजी करायला पंधरा पंधरा राऊंडस मिळाले होते. केवढा हर्ष होत होता. आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या रायफली, खऱ्या गोळ्या मारायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या दिवशीचीही आमची फायरिंग सुरळीत पार पडली. मार्क्स मॅन कोणीच झाले नाही ह्याचे दुःख होत होते. कॅप्टन गिल तरी सुद्धा आमच्यावर संतुष्ट होता.
जंटलमन डोंट वरी अबाउट युअर एमींग स्कील्स. हिअर इन एकॅडमी द एम इज टू पॉलिश युअर फायरिंग ड्रिल. युअर एमींग स्किल्स विल बी ईंपृव्ढ वन्स यू गो टू युअर युनीटस.
जर फायरिंग रेंज वर एवढी शिस्त नाही ठेवली तर अगदी सहजच अपघात घडतात. एक वर्षापूर्वी घडलेल्या एका अपघाता बद्दल, कष्ट दे मिश्रा सांगत होता. कार्बाईनचे फायरिंग चालले होते. फायर करता करता दुसऱ्या डिटेल मधल्या आठव्या नंबरच्या जिसीची गोळ्या भरलेली कार्बाईन चालेना. त्याने सहजच शेजारी उभ्या असलेल्या उस्तादाला त्याबद्दल विचारणा केली. 'उस्ताद, ये देखो यह कार्बाईन रुक गई'। जेव्हा शेजारी उभ्या असलेल्या उस्तादाकडे जिसीने बघितले तेव्हा त्याच्या नकळत कार्बाईनचे बॅरेलपण उस्तादाच्या दिशेला झाले व सेफ्टी लॅच सेफवर न ठेवल्याने चुकून चाप दाबला जाऊन नकळत गोळ्या सुटल्या. पंचवीस गोळ्या क्षणार्धात बॅरल मधून सुटल्या व थेट त्या उस्तादाच्या व त्याच्या जवळ उभ्या असलेल्या त्या डिटेल मधल्या नवव्या व दहाव्या जिसीच्या आरपार गेल्या. तेथल्या तेथे ते तिघेही मरण पावले. ज्याच्या हातून झाले तो जिसी तर वेडापिसा झाला. त्या जिसीला काढून टाकले गेले पण गेलेले परत का येतात............. वाईट वाटून सुद्धा काही उपयोग होत नाही. क्षणार्धात सगळे संपते.
जसे फायरिंग करताना सावधगिरी बाळगायला शिकवली जाते तसेच युद्धाचे अजून एक तंत्र जिसीच्या मनात बिंबवले जाते.
ते म्हणजे 'शुट टू किल'. 'एक गोली एक दुश्मन'। कॅप्टन गिल आम्हाला प्रत्येक फायरिंगच्या वेळेला सांगायचा...
आवर प्रोफेशन इज टू किल. किल द एनीमी. टू सिक्युअर आवर बॉर्डर्स, आवर फायर मस्ट बी इफेक्टीव्ह. वि मस्ट नॉट वेस्ट बुलेटस. एव्हरी बुलेट शूड हॅव द पॉवर टू किल. किल द एनीमी. आर्मी इज नॉट पोलीस.....
.... हवेत गोळ्या झाडणे हे पोलिसांचे काम असते. आर्मी गोळ्या झाडते ते शत्रूला मारण्या साठीच. आर्मीचे सगळे शिक्षण व सराव ह्याच दृष्टिकोनातून केला जातो. सैनिकाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मारण्यासाठीच सुटली पाहिजे असेच बिंबवले जाते. ह्याच्याचसाठी सैन्य दलाचा उपयोग फक्त आपल्या देशाच्या शत्रूंविरुद्धच केला गेला पाहिजे. सैन्यदलाची दहशत आहे ती टिकवली पाहिजे. भारतीयसैन्य म्हणजे शत्रूला मारण्यासाठीच आहे हे समजले पाहिजे. भारताच्या अंतर्गत सुरक्षतेसाठी पोलीस व अर्धसैनीकदल आहेत व अशांचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेता आला पाहिजे सरकारला. पण भारताच्या अंतरर्गत सुरक्षतेसाठी व 'एड टु सिव्हिल ऑथॉरीटिज' साठी भारतीय सैन्य बोलावले जाते तेव्हा आपल्या सैन्यदलाला प्रचंड द्विधा मनस्थितीला तोंड द्यावे लागते. ज्या सेनेला 'शुट टु किल' हे शिकवले असते त्या सेनेवर हवेत गोळ्या झाडण्याची पाळी येऊ नाही कधी. असे जर झाले तर भारतीय सेनेला त्याची सवय लागेल व वेळ आल्यावर धनुष्य टाकावा तसे ते हत्यार टाकतील. व असे जर झाले तर कोणी आर्मीला घाबरणार नाही व भारतीय सेना एक बोथट फोर्स होऊन राहील. पोलीस व सेनेत काही फरक राहणार नाही.
भारतीय सेनेने अंतर्गत सुरक्षा साधण्यासाठी 'शुट टु किल' या नीतीने समोर दिसणाऱ्या दगड फेकणाऱ्याला किंवा अतिरेक्याला मारले तर, मरणारे शेवटी कोणी तरी उकसावलेले भारतीय नागरिकच असतात. शत्रू नसतात. त्या वेळेला एका सैनिकाच्या भावना किती खेळवल्या व दुखावल्या जात असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी. 'एड टू सिव्हिल ऑथॉरीटिज' मध्ये जर आर्मी बोलवायची वेळ आली असे सरकारला वाटत असेल तर तो भाग आधी ‘अशांत’ म्हणून जाहीर करावा लागतो. मग राज्य सरकारच्या शिफारशीवरून केंद्र सरकार 'आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट आणते'. ते जर आणले नाही तर आर्मी पोलीस दलासारखी बोथट होईल व कार्यक्षम राहणार नाही. हा अधिनियम नसेल तर भारतीय सैन्य अशा 'अशांत' भागात आपले काम करू शकणार नाही व परिस्थिती चिघळू शकते. एवढे लक्षात घेतले पाहिजे की आर्मीला पाचारण नेहमी सरकार करते. स्वतःहून आर्मी कधीच अंतर्गत सुरक्षेमध्ये पडत नाही. आर्मीचे ध्येय देशाच्या शत्रूविरुद्ध लढण्याचे असते व ती त्याच्याचसाठी वापरली गेली पाहिजे..........
आमच्या रायफल फायरिंगच्या शेवटच्या दिवशी कॅप्टन गिलने केलेल्या संबोधनाचा अर्थ काही लक्षात आला नव्हता पण हल्ली तो प्रकर्षाने जाणवतो.
'आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट' सप्टेंबर १९५८ मध्ये भारतीय संसदेत पारीत झाला. ह्या संविधाना मुळे सशस्त्रसेनेला 'अशांत' भागात काही अधिकार दिले गेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मन्युष्यावर किंवा जमावावर गोळीबार करण्याचा अधिकार, परवान्या शिवाय पकडून तुरुंगात घालण्याचा अधिकार, परवान्या शिवाय संशयित व्यक्तीच्या घराचा तपास करण्याचा अधिकार, ह्या अधिकारांबरोबरच अजून एक महत्त्वाचा अधिकार 'अशांत' भागातल्या जनतेकडून काढून घेतला जातो तो म्हणजे, अशा केलेल्या कृत्यावर कोणीही सेने विरुद्ध कोर्टात केस करू शकणार नाही किंवा एकदा 'अशांत' भाग म्हणून घोषित केल्यावर असा घोषित केलेला भाग 'अशांत' होता का नाही ह्याचे न्यायीक पुनरवलोकन सुद्धा होऊ शकत नाही. असा नियम केल्यामुळे सशस्त्र सैन्याला कार्यक्षम पणे आपले काम करता येते. युद्धात देशाच्या शत्रूंविरुद्ध हे अधिकार सैन्याला आपोआपच असतात. हे अधिकार जर काढून घेऊन काम करायला लावले तर ते सैन्य अकार्यक्षम होईल. पुढे पुढे भारतीय सेनेला अशा अकार्यक्षमतेची सवय लागेल. शत्रूविरुद्ध गोळी झाडताना आधी परवानगी घ्यायची सवय लागेल. अशा बिघडलेल्या मानसीकते मुळे आपली सेना कोठचेही युद्ध जिंकू शकणार नाही व म्हणूनच 'आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट' काढून टाकावा असे जर राज्य सरकार किंवा केंद्रसरकारला वाटत असेल तर सरकारने सैन्याला न बोलावता पोलिसांकडूनच काम करवून घ्यायला सुरवात केली पाहिजे.
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/ आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/ (मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
11 Dec 2011 - 9:32 pm | प्रास
हा भागही चांगला झालाय. आवडला.
दोन भागांमधलं अंतर जरा कमी करता आलं तर बघा की....
:-)
11 Dec 2011 - 10:03 pm | सोत्रि
अनुमोदन!
- (NCC त न जाऊ शकलेला) सोकाजी
12 Dec 2011 - 1:22 am | इष्टुर फाकडा
अगदी असेच म्हणतो...
अवांतर...कार्बाईन हि short range वेपन आहे असे ऐकले होते...सैन्यात अजूनही तिचा वापर होतो काय? 'लक्ष्य' या सिनेमात लाँग रेंज साठी कार्बाईन सैनिक वापरत आहेत असे दाखवले होते...हे शक्य आहे काय?
12 Dec 2011 - 9:15 am | रणजित चितळे
सागर साहेब बरोबर आहे. कार्बाइन शॉर्ट रेन्ज विपन आहे.
11 Dec 2011 - 9:43 pm | पैसा
चितळेसाहेब वाचायला फार मजा येतेय. धन्यवाद!
12 Dec 2011 - 1:29 am | कौशी
आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
12 Dec 2011 - 5:40 am | रेवती
वाचतिये.
लेखन आवडले.
12 Dec 2011 - 10:43 am | ५० फक्त
सलाम तुम्हाला अन आम्हाला इथं आत खोलवर सुरक्षित ठेवणा-या सैनिकांना.
12 Dec 2011 - 10:59 am | पिंगू
हाही भाग छान झाला आहे. बाकी सैनिकी जडणघडणीबद्दल जे लिहिले आहे, ते योग्य आहे.
- पिंगू
12 Dec 2011 - 11:05 am | उदय के'सागर
खुपच छान. माहितीपुर्ण लेख, नेहमीप्रमाणेच :)
12 Dec 2011 - 1:00 pm | प्रीत-मोहर
मस्तच लेख !!
12 Dec 2011 - 7:30 pm | आत्मशून्य
अत्यंत... सहमत.... आवश्यकच.