राजाराम सीताराम .........................भाग ७..........ड्रिलस्क्वेअर

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
3 Oct 2011 - 1:41 pm

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १.....प्रवेश
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट

…….. ब्रिजेशला काही ते पटले नाही व पुढच्या दोन दिवसातच तो अचानक कोर्स सोडून निघून गेला. त्याचे वडील आले होते, आमच्या डिएस ने त्यांना भरपूर समजावले पण त्याने त्याचा निर्णय घेतला होता. चार महिन्याचे पैसे भरून तो निघून गेला. आमचा बिपी आम्हाला मध्येच सोडून घरी निघून गेला. कायमचा………….

राजाराम सीताराम...... भाग ७.....ड्रिलस्क्वेअर

आमचे पोहण्याचे तास सुरू झाले होते. त्या थंडीत पोहणे येत असताना सुद्धा विसरल्या सारखे वाटायचे मग न येणाऱ्यांची कथा काही आगळीच. पोहण्याचा तास जर सकाळचा असला तर अजूनच थंडी कुडकुडायची. आमच्यातले जेवढे केरळातले त्यांना आम्ही ‘मल्लू’ म्हणायचो. मल्लू व बंगालचे ‘बॉन्ग्स’ त्यांना पोहणे हमखास यायचे. महाराष्ट्रातले ‘तांत’ किंवा ‘कढी’ जिसी, व उत्तर भारतीय, यांतील काहींना पोहणे जमायचे व काहींना नाही. जर का एनडीएतले ‘नंगे’ सोडले तर आंध्रप्रदेशातल्या ‘गुलटी’ जिसीजना, पोहणे मुळीच जमायचे नाही. पंजाबातले ‘सर्डी’ किंवा ‘पापे’ ह्यांना बहुतेक करून पोहणे यायचे. मल्लू, बॉन्ग, कढी, तांत, गुलटी, सर्डी, पापे, तंबी, अण्णा, बबूवा हे प्रांतवार खिताब आयएमएत मोठ्या दिमाखात राबतात. कोणाला फारसे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही व कोणाला त्यात वावगे वाटत नाही. आयएमएतल्या रॅगिंगने व एकत्र राहून होणाऱ्या सलगीने म्हणा, असल्या गोष्टींचे मनाला लावून घेणे कधीच संपलेले होते.

पोहण्यामध्ये आमच्या दोन टोळ्या बनवल्या गेल्या – एक टोळी पोहणे येणाऱ्यांची व दुसरी न येणाऱ्यांची. ज्यांना पोहोणे येत होते त्यांना लागलीच पोहायच्या तासाला पोहायला मिळायचे व ज्यांना येत नव्हते त्यांना पोहणे शिकवले जायचे. पोहायला न येणाऱ्यात काही पाण्याला घाबरणारे जिसी असायचे. त्यांचे हाल काय व्हायचे ते कल्पनेतूनच कोणाला कळेल. स्विमींगट्रंक घालून कोणाला जरका जमिनीवर पोहायला सांगितले व हातपाय मारत पोहत पोहत जमिनीवरच पुढे जायला सांगितले व असे पोहण्याचा तासभर करायला लावले तर पाण्याचे भय विसरून तो जिसी पुढच्या तासाला आपणहून पाण्यात उतरून हातपाय मारायला शिकायला लागेल, आणि व्हायचेही तसेच. पाण्याला घाबरण्याचा नखरा पोहोण्याच्या पहिल्या तसाच्या पहिली पाच मिनटेच चालायचा. पोहणे न येणारे व पाण्याला घाबरणारे काहीच दिवसात मजेत पोहताना दिसायचे. पहिल्या सत्रात १०० मीटर पोहणे व दहा मीटरवरून पाण्यात उडी मारणे हा अभ्यास होता. ज्याला हे जमायचे नाही त्याचे रेलिगेशन ठरलेले. जमिनीवर पोहायला शिकल्यावर क्वचितच कोणी जिसी पोहण्यासाठी रेलीगेट झालेला आढळायचा.

पोहणे किंवा पिटी परेड संपली की आमचा ड्रिलचा तास असायचा. ड्रिलस्क्वेअर मध्ये जाऊन ड्रिल करणे आता अंगचाच भाग झाल्या सारखे झाले होते. चेटवोड हॉलच्या पुढ्यातले ते ऐसपैस ड्रिलस्क्वेअर, जवळ जवळ पाचशे मीटर लांबी रुंदीचे चौकोनी डांबरीकरण केलेले कवायतीचे मैदान आम्हाला जणू ड्रिलसाठी साद घालायला लागले होते. लांबूनच ड्रिलचे कमांडस् ऐकायला यायचे..... स्क्वॉड आगे चलेगा.......... आगेसेssssss तेज चल. एक दो एक....... एक दो एक....... उंच आवाजातल्या कवायतीच्या ह्या आदेशांबरोबरच मोठ्या ढोलावर वाजवलेले ढम ढम दूरदूर पर्यंत एकसारखे ऐकायला यायचे. एकाच लयीत एक ड्रिलउस्ताद ढोल वाजवत राहिलेला आढळायचा. ड्रिलबुटांखाली लावलेल्या तेरा खिळ्यांनी सज्ज असे बूट घालून जेव्हा ड्रिलस्क्वेअर मध्ये जिसी यायचा तेव्हा त्या खाडखाड वाजणाऱ्या बुटांच्या आवाजानेच ड्रिलचे वातावरण निर्माण व्हायचे. सकाळच्या तिरप्या उन्हात ड्रिलकरताना वेगळाच उत्साह यायचा. थंडीच्या दिवसात, ड्रिलस्क्वेअरच्या चहुबाजूला बहरलेल्या चाफ्याच्या झाडांच्या फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळलेला असायचा. ड्रिलकरताना त्या सतत येणाऱ्या सुगंधाने इतके बरे वाटायचे. प्रत्येक जिसी पासिंग आऊट परेडची स्वप्ने रंगवत अजूनच जोरात पाय आपटायचा.

ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर आमची कवायतीची तालीम चालायची…………… एक दो एक.... एक दो एक.... एक दो एक थम एक दो...... ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणताना ‘एक’ वर जोरात हिल डीग करायची व त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणून ‘दो’ वर हिल डिग करायची. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे पण गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचे मात्र. त्याने ड्रिलमध्ये डौल येतो....

‘ये जिसी सुब्रमण्यम हिल डिग हिल डिग’. असा आमचा ड्रिल उस्ताद हवालदार किसनलाल नेहमी म्हणायचा. हिल डिग म्हणजे कवायत करताना आपला पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व रुतवायची जमिनीवर. उस्ताद किसनलाल आम्हाला म्हणायचा, टाचेला लागलेल्या घोड्याच्या नालेचे चित्र उमटले पाहिजे जमिनीवर. बऱ्याच जिसीजना सुरवातीला हे जमत नाही. मग सुब्रमण्यम असणारच असल्या न येणाऱ्यांच्या यादीत.

ड्रिल शिकवणाऱ्या उस्तादांबरोबर उमद्या घोड्यावर बसलेला आमच्या अॅकॅडमीचा अॅडज्यूटंटचे दर्शन घडायचे. तो घोड्यावर बसून लांबूनच ड्रिलच्या तासाला आमच्या तुकडीच्या ड्रिल प्रॅक्टिसचे निरीक्षण करायचा. अॅकॅडमीचा अॅडज्यूटंट म्हणजे दंडपाल. अॅकॅडमीत शिस्त राखण्याचे त्याचे खास काम. त्यामुळे आम्ही त्याला घाबरून असायचो. लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा आमचा अॅडज्युटंट होता. भयंकर कडक शिस्तीचा. पुढे काही वर्षाने हाच लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा निवृत्त झाल्यावर पॉलिटीकल अॅनालिस्ट म्हणून वेगवेगळ्या टीव्ही वाहिनीवर दिसणार होता आम्हाला. कोणी जिसी नीट कदमताल किंवा सांगितलेली कवायत करत नसेल तर लांबूनच तो घोड्याच्या चाबकाने इशारा करायचा. त्या बरोबर उस्ताद जोरात ओरडायचा

‘ये जिसी फॉल आऊट. रायफल उपर और दौडकेssssचल। दौडके अॅडज्यूटंट के पास जाओ।‘

बहुतेक वेळेला कवायती मध्ये आमच्या सुब्बूचीच वेळ यायची असे अॅडज्यूटंट पर्यंत जाण्याची. मग सुब्बू हात वर करून स्वतःची रायफल डोक्यावर आडवी धरून पळत जायचा अॅडज्यूटंटच्या पुढ्यात. त्याच्या त्या ढिल्या ऑन डबल्स कडे कुत्सित नजरेने बघत करड्या आवाजात एडज्युटंट ओरडायचा –

‘डोंट वॉक लाइक ए प्रेगनंट डक. यू मोरॉन, रन फास्ट. ’

एक दो एक..... एक दो एक स्क्वॉड थम एक दो। जिसी सामने सॅल्यूट करेगाssssssssss सॅल्यूट - राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो. ड्रिल मध्ये जर बरोबर ठिकाणी पॉज दिला नाही तर कवायतीत उमदेपणा येत नाही. सॅल्यूट म्हटले की राजाराम सीताराम मनात म्हणेपर्यंत सावधान मध्ये एका जागी थिजल्या सारखे उभे राहायचे. एक म्हणताक्षणिक उजवा हात आवळलेली मूठ सोडवत, वर घेऊन भरकन कोपऱ्यात वाकवून हाताची बोटं नीट जुळवून तळवा सपाट करून तर्जनी उजव्या भुवईवर दोन बोटांच्या अंतराने जिथे बॅरेची पट्टी कपाळावर बसते तेथे लावला पाहिजे. खांदा जमिनीला समांतर व कोपर आपल्या शरीराच्या रेषेत. त्या सॅल्यूट मारलेल्या स्थितीत मनातल्या मनात परत ‘राजाराम सीताराम’ म्हणेपर्यंत विराम घ्यायचा व ‘दो’ म्हणताच भरकन सॅल्यूट मारलेला हात खाली घेऊन परत सावधान व्हायचे. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. ‘राजाराम सीताराम’ ह्या शब्दांच्या साहाय्याने मिळालेल्या विरामा मुळे कवायत उठावदार बनते. परत, ‘राजाराम सीताराम’ हे शब्द प्रत्येक जिसी मनात म्हणत असल्या मुळे सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. सगळ्यांचे डावे हात एका रेषेत खाली वर एकदम होतात. त्याच वेळेला उजवे पाय पुढे येऊन मग एकदम सगळे हिल डिग करतात. असे संचलन उठावदार व उमदे दिसते. उस्तादाचे सुरूच होते...... अभी दाए सॅल्यूट, बाए सॅल्यूट....................... आम्ही मशीनासारखे त्याच्या हुकुमांचे पालन करत होतो. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, आपली हालचाल एकसारखी होते व आपल्या शरीराला चांगला ढब येतो.

ड्रिल करून करून, टाचा आपटून आपटून हळू हळू प्रत्येक जिसीची चालण्याची ढब बदलायला लागली होती. एकतर शाळा कॉलेज मध्ये असतो तसा अभ्यास नाही आणि तशातच अशा कवायतीने व टाचा आपटून आपटून मेंदू कधी कधी बधिर व्हायचा. आमचा उस्ताद मजेने आम्हाला म्हणायचा देखील, ‘जबतक हिलडीग व कदमताल करके जिसीका भेजा घूटनेमे नही आता तब तक आपको ड्रिल नही आएगी।’ जेव्हा मेंदू घुडग्यात जातो, तेव्हा डोकं वापरायची गरज वाटणारच नाही व कोणतीही गोष्ट एखाद्या मशिना सारखी घड्याळाबर हुकूम व ड्रिल सारखी शिस्तीत होऊ लागेल.

ड्रिल करून करून पायांना इतकी सवय पडली होती की, दोन जिसी कोठेही जाताना ‘कदम मे कदम मिलाकर’ चालू लागले होते. एकाचा डावा पाय पुढे तर दुसऱ्याचा सुद्धा डावाच पाय त्याच वेळेला पुढे असल्याची खात्री करून घेतली जायची. तसे नसेल तर मनात विचित्र वाटायला लागून जिसी सहजच आपली चाल बदलून घ्यायला लागले. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुळेच जिसी सिव्हिलियन आयुष्या पासून हळूहळू वेगळे व्हायला लागतात व काही दिवसाने सैनिकी रीतिरिवाज, सैनिकी शिस्त व सैनिकी जीवनमान तयार होते. पुढे ते जीवनमान कायमचे मनात व शरीरात असे भिनते की चालण्यावरून, कपडे घालण्यावरून, बोलण्यावरून व सवयींवरून दूरूनच सैनिकाला ओळखता येते.

ये जिसी फॉल आऊट। रायफल उपर और कदमताल शुरू कर। कितने बार आपको कहा हैं की जिसी सॅल्यूट सिर्फ दाये हाथसे ही करते हैं।

सुब्बूच असणार. आम्हाला गालातल्या गालात हसू आवरत नव्हते. त्याचे ड्रिल महाभयंकर होते. संचलन करायचा तर जो पाय पुढे टाकायचा त्याच बाजूचा हात त्याच्या नकळत पुढे यायचा. हे खरे म्हणजे किती अवघड आहे. चालताना जर डावा पाय पुढे टाकला तर उजवा हात पुढे येतो हा माणसाचा नैसर्गिक कल, पण सुब्बूचे उलटेच. साहजिकच ड्रिल परेडला सगळ्यात जास्त शिक्षा त्याला व्हायची. संचलन करताना दाए सॅल्यूट मध्ये मान उजवीकडे वळवून उजव्या हाताने सॅल्यूट करायचे असते अगदी जसे गणतंत्र दिवसाच्या समारंभात राष्ट्रपतींसमोर संचलन करत येणारी सेनेची तुकडी मान वळवून दाए सॅल्यूट करते तसेच. तशाच प्रकारे बाए सॅल्यूट मध्ये मान डावीकडे वळवून उजव्याच हाताने सॅल्यूट करायचा असतो तर आमचा पठ्ठ्या बाये सॅल्यूट मध्ये खुशाल डाव्या हाताने सलाम ठोकून मोकळा झाला होता. रोज दुपारी सुब्बू साठी विशेष ड्रिलचा तास लागायचा.

आमची ड्रिलची परीक्षा साक्षात अॅडज्यूटंट घ्यायचा. घोड्यावर आरूढ होऊन एकेक जिसीला त्याच्या समोर तेज चल, दाये सॅल्यूट, बाए सॅल्यूट, सलामी शस्त्र, धिरेचल, कदमताल असे सगळे कवायतीचे प्रकार करून दाखवावे लागायचे. तो ठरवायचा पास का फेल ते. कवायत करून झाल्यावर, परीक्षेसाठी आलेल्या जिसीने अभिवादन म्हणून केलेल्या सॅल्यूटला अॅडज्यूटंटने परत सॅल्यूट करून जर त्या जिसीचे अभिवादन स्वीकारले तर समजायचे आपण ड्रिल टेस्ट पास. त्या दिवशी पासून डिएस ना सॅल्यूट करायची परवानगी मिळायची व लिबर्टीपण मिळायला लागायची. आमच्यातले काही जिसी ड्रिल टेस्ट अजून पास झाले नव्हते त्या मुळे त्यांना लिबर्टी मिळाली नव्हती. जिसी सुब्बू त्यातला एक होता. आम्हाला मात्र आता लिबर्टी मिळायला लागली होती. लिबर्टी म्हणजे रविवारी आयएमएच्या बाहेर जायची परवानगी. लिबर्टीचा कागदी पास असतो. आठवड्यात जर काही चुका झाल्या नाहीत तर कॅप्टन गिल शनवारी लिबर्टीच्या पास वर सही करायचा व त्या योगाने रविवारी बाहेर जायला आम्हाला परवानगी मिळायची. सकाळी ८ वाजता आम्ही मुफ्ती ड्रेस घालून सायकल वरून डेहराडून गावात जायचो. आयएमएतून बाहेर पडून राजपूर रस्त्याने घंटाघरला जमायचो. त्या वेळचे डेहराडून म्हणजे छोटेखानी गाव होते. साधी माणसे. साधी दुकाने. खूप धूर सोडत जाणाऱ्या विक्रम रिक्शा. रिक्शा कसल्या टेम्पोला किर्लोस्कर कमिन्सचे इंजन लावले तर काय होईल तसे असायचे. विक्रम सहा माणसांसाठी असायची पण त्यात साधारण १२-१३ माणसे भरली जायची. हे गाव शिवालीक ह्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. मसुरीसाठी इथूनच जाता येते. शिवालीक पर्वत समूहांना लोअर हिमालीयन रेंजेस पण म्हटले जाते. डेहराडूनला काही जुन्या इमारती आहेत, ‘सर्व्हे ऑफ इंडिया’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम’, ‘फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ अशा सारख्या संस्था येथे आहेत. फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पूर्विची इमारत देखणी व विलोभनीय आहे. लिबर्टी मिळाल्या लागल्या पासून आम्ही दर रविवारी डेहराडूनला जायचो. डेहराडूनला एकच हमरस्ता होता राजपूर रोड. घंटाघरच्या चौकात ‘कुमार स्विटस’ म्हणून प्रसिद्ध मिठाईचे दुकान होते. चांगलेसे एकही पिक्चरचे थिएटर नव्हते तरीसुद्धा आम्ही कधी कधी त्यात पिक्चर बघायचो. आठवड्याभराचा रगडा मित्रांबरोबर पिक्चर बघताना कधीच निघून जायचा. आयएमएतल्या जिसीज साठी थेटर मालकाने जागा राखीव ठेवलेल्या असायच्या त्यामुळे तिकीट मिळाले नाही असे कधी झालेच नाही. आम्हाला ह्या स्पेशल ट्रीटमेंटचे फार अप्रूप वाटायचे. सकाळी सायकल वरून राजपूर रस्त्याने दहा किलोमीटरचा रस्ता सायकल ने तुडवून डेहराडून गावात यायचो. आमचा कार्यक्रम येथेही तसा ठरलेला असायचा. सकाळच्या वेळेस रस्त्यावरून मुली बघत फिरणे. दुपारी एखादा पिक्चर टाकणे, संध्याकाळी सहाच्या सुमारास कुमार मिठाईवाल्या कडे समोसा, कचोरी, पलंगतोड, कालाजाम नाहीतर मसाला दूध प्यायचे ठरलेले. घंटाघरचे टोले सतत आम्हाला आमची जायची वेळ सांगत राहायचे. साधारण साडेसहाच्या सुमारास जड मनाने त्या बाहेरच्या जगाला टाटा करून सायकलने परतीचा रस्ता आम्ही धरायचो. गावात सामान्य वेषात आयएमएचे रेजिमेंटल पोलीस त्यांना ‘आरपी’ असे म्हटले जायचे ते अशा लिबर्टीच्या दिवशी फिरायचे. त्यांचे काम होते लिर्बटीवर आलेल्या जिसीज वर डोळा ठेवण्याचे. काही काही जिसीजना बाहेर जाऊन सिव्हिल ड्रेस घालायची हुक्की यायची, किंवा आऊट ऑफ बाऊंड एरीयाज मध्ये जाण्याचे धारिष्ट्य करावेसे वाटायचे त्यावेळेला मुफ्ती ड्रेस मध्ये आयएमए बाहेर पडून नंतर सिव्हिल कपडे बदलायचे प्रयत्न व्हायचे. ह्यात अमित वर्माचा पहिला नंबर. पण ड्रिल करून करून बदललेल्या चालण्याच्या ढबीवरून, केस कापण्याच्या ठेवणीवरून जिसी लपायचा नाही व आरपिंची तयार झालेली नजर अशांना लागलीच हुडकून काढायची. लागलीच आरपी अशांना एक टोकन द्यायचा. त्या टोकनावर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी डिएस कॅप्टन गिलकडे मार्चअपची वेळ लिहिलेली असायची. दुसऱ्या दिवशी अशा टोकन मिळालेल्या जिसीची ‘पेशी’ व्हायची. डिएसकडे शिक्षेसाठी जाताना हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागत असे. हॅकल ऑर्डर म्हणजे, आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असायचा. शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्यानाकोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या आधिकारिक शिक्षा सुद्धा अजब असायच्या. त्यात प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, केबिन कबोर्ड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.

(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का

त्या संबंधी येथे अजून वाचा

http://rashtravrat.blogspot.com/ आणि येथे

http://bolghevda.blogspot.com/ (मराठी ब्लॉग)

समाजजीवनमानमौजमजाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

हंस's picture

3 Oct 2011 - 2:02 pm | हंस

मस्त!!!!!!!!!!!!

छान आहे लेखमाला

हा भाग वाचून NCC चे तास आठवले

मी-सौरभ's picture

3 Oct 2011 - 2:49 pm | मी-सौरभ

>>बजरी ऑर्डर, २८ डेज, केबिन कबोर्ड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर
अशा विचित्र नावांच्या शिक्षांविषयी अजून माहिती लवकरात लवकर टाका प्लीज...

प्रास's picture

3 Oct 2011 - 3:04 pm | प्रास

सौरभरावांशी सहमत.

रणजीतराव,

यंदा मोठा गॅप घेतलायत बुवा! पुढचा भाग लवकर येऊ द्या....

:-)

मृत्युन्जय's picture

3 Oct 2011 - 3:17 pm | मृत्युन्जय

नेहेमीप्रमाणेच सुंदर. पुढील भागांची आतुरतेने वाट बघतो आहे.

आदिजोशी's picture

3 Oct 2011 - 4:07 pm | आदिजोशी

अप्रतिमच आहे लेखमाला. सैनिकांच्या जगातील सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. असेच लिहा आणि आम्हाला वाचनाची मेजवानी देत रहा.

जे.पी.मॉर्गन's picture

3 Oct 2011 - 4:37 pm | जे.पी.मॉर्गन

केवळ अप्रतीम लिखाण. सगळे भाग एकदमच वाचले. भारावणार्‍या वातावरणाची सफर घडवत आहात.

"राजाराम सिताराम" चा कन्सेप्ट माहिती नव्हता ! खूपच रोचक माहिती मिळतीये ह्या मालिकेतून. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

जे.पी.

अगोचर's picture

3 Oct 2011 - 11:03 pm | अगोचर

+१ "राजाराम सिताराम" चा कन्सेप्ट आज कळला !" साठी.
कधी काळी सैन्यात जावे असे मनापासुन वाटायचे. त्यामुळे मनापासून वाचतोय.

मोहनराव's picture

3 Oct 2011 - 6:09 pm | मोहनराव

अतीशय उत्तम लेखनशैली आहे तुमची!!
सर्व भाग एकदम वाचुन काढले. आजचा दिवस उत्तम गेला!!
राजाराम सीताराम या लेखमालिकेला दिलेल्या नावाचे रहस्य या भागात कळाले.
पुढचा भाग लवकर येउद्यात... अगदी वेड लावलय तुम्ही!!!

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2011 - 6:15 pm | प्रभाकर पेठकर

सर्व भाग एका बैठकीत वाचून काढले. अतिशय प्रभावी लेखन आहे. खडतर जीवनातून येणारी शिस्त पुढील आयुष्याची जमापुंजी ठरून एका सात्विक आनंदाची पखरण आजन्म ठरावी ह्या सारखे सुख नाही.

लेख वाचत आहे. असेच प्रेरणादायी लेखन आपल्याकडून अविरत येत राहावे हिच इच्छा.

मस्त लेखन!
एकदम वेगळ्याच जगाविषयी सांगणारं.

पैसा's picture

3 Oct 2011 - 8:37 pm | पैसा

इतक्या शिस्तीच्या वातावरणातून तावून सुलाखून बाहेर पडतात, म्हणूनच हे सैनिक देशातले सर्वोत्तम नागरिक असतात! त्यांच्या जगाची सुंदर ओळख करून देताय. धन्यवाद चितळेसाहेब!

गणेशा's picture

3 Oct 2011 - 8:42 pm | गणेशा

अप्रतिम .............

आत्मशून्य's picture

4 Oct 2011 - 8:59 pm | आत्मशून्य

.

चितळे साहेब मस्त खिळवून ठेवणारं लिखाण होतंय.
फक्त जरा वेळ काढून सलगपणे टाका ना राव...
फार मजा येईल वाचायला.