ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८...... शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९...... एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०.. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११.... पिटी परेड.
राजाराम सीताराम....... भाग १२.... कॅम्पलाइफ.
" title="ह्या आधीचे भाग येथे वाचायला मिळेल.... ">
.......हनुमानाला लागलेल्या शापा मुळे त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे म्हणून. जाणीव नसल्यामुळे तो त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकत नव्हता. जांबुवंताने ही जाणीव करून देण्याचे काम केले. भदराजच्या कॅंप आम्हाला आमच्यातील आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. देवाने दिलेल्या व आपल्या अंगात दडलेल्या मानसिक व शारीरिक शक्तीचा अनुभव ह्या कॅंप द्वारा मिळतो व त्याची परिणती प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढण्यात होते.....
(काश्मिरी हिंदूंची घरे - आता कोणीतरी दुसरेच रहातात त्या मध्ये)
राजाराम सीताराम एक....... भाग १३... विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर (काहींनी काश्मिरी हिंदूंवर लिहिलेली कथा वाचली असेल, हे लिहिता लिहिता आयएमएवर कथा लिहावी असे माझ्या स्नेह्याने सुचवले. कथा पुरतीसाठी परत येथे देत आहे)
जिसी सुनील खेर काश्मिरी होता. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत राहायचा. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली होती.
तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स अशा प्रकारच्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकांतून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आयएमएच्या मुलाखतीसाठी केलेली तयारी, ती पण अशीतशीच होती. थोडक्यात, काश्मीर प्रश्ना विषयी एकदम थोडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर बद्दलचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की "सन १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानला सतत सतावत असतो. पाकिस्तानला कळून चुकले आहे की, भारताबरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्यहानी फार होते. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स जे आयएसआय ह्या नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेने एक अभिनव योजना आखली आहे. त्या योजनेनुसार सरळ युद्धापेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाकव्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. मग काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमा ओलांडून (लाइन ऑफ कंट्रोल) अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे षडयंत्र राबवायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. हे झाले की मग त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहादसाठी उत्तेजित करायचे".
ह्या पार्श्वभूमीवर मला जेव्हा जिसी सुनील खेरच्या रूपाने एक काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. मी वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचाच राहणारा जिसी हिरालाल गाडरू ह्या दोघांकडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. कमिशन मिळाल्यावर आम्हाला त्या भागात जावेच लागणार होते, त्यामुळे सगळ्यांचं जिसीना, हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट ही खरेच होतेका?, हे जाणून घ्यायची इच्छा प्रबळ असायची. काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते त्या दोघांकडून आम्हाला कळले. आम्ही सुनीलला नेहमी पटवून द्यायचा प्रयत्न करायचो की त्याने त्याच्या आईला घेऊन दुसरीकडे राहायला गेले पाहिजे म्हणून. त्यालाही तसे राहायचे होते, पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे त्याच्या जवळ नव्हते व त्याची आई काश्मीर सोडायला तयार नव्हती. काश्मीरसोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. ही कल्पना त्याच्या आईला करवत नव्हती. परत दुसरीकडे, म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे? हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यंत खोरे सोडून कोठेही खेर कुटुंब राहिले नव्हते, त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात, राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली होती, तरी तो तिच्याशी भांडून आयएमए मध्ये दाखल झाला होता. आयएमएचे शिक्षण पूर्ण करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.
काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्या वेळेला मला पहिल्यांदा समजले. जिसी हिरालाल गाडरू (हा जिसी, वर्षभर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला "गदरू" असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जिसी हिरालाल गाडरू ऐवजी - जिसी हिरालाल "गदरू नहीं गाडरू" असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची पुन्हा भेट झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरूच्या वडलांची लाकडाची वखार अतिरेक्यांनी जाळली होती.
अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने, टेलिव्हिजनवर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण त्यांना तेवढेच कायते दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथपर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. शाळेत उर्दू मध्ये शिक्षण चालायचे. काश्मीरचे खोरे व जम्मू ह्या भागांना जोडणारा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन असा एकच रस्ता होता. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद पडायचा त्यामुळे पूर्ण एन एच वन बंद ठेवायला लागायचा. त्यातून होणारी आवकजावक बंद पडायची. अजून सुद्धा जम्मूहून श्रीनगर पर्यंत रेल्वेचा प्रवास होऊ शकत नाही. ह्याच्या उलट पाकव्याप्त काश्मीरकडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. ह्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे काश्मीर खोऱ्यातल्या लोकांची नातीगोती व त्यातून उत्पन्न झालेले लग्नसंबंध फार पूर्वी पासून पाकव्याप्त काश्मिरात आहेत.
ह्या घडामोडींचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर जर नसेल तर सगळ्या बाबतीत केवढी पंचाईत होते ही जाणून घ्यायची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला साधे घराबाहेर सुद्धा पडता यायचे नाही अशी परिस्थिती असायची. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोनदोन महिने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती कारण त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न मिळणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार सन १९८९ मध्ये हळूहळू वाढायला लागले होते. त्यामुळे तेथील काश्मिरी हिंदू, बाकीच्या हिंदूंपेक्षा दुरावलेले होते. त्या वेळेला जणूकाही मानव हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) मूग गिळून बसली होती.
आम्ही आठ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग असतो त्याला माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग असे म्हणतात. संपूर्ण कोर्स चार बटालियन्स मध्ये विभागलेला असायचा. ह्या चारही बटालियन्सचे नेतृत्व आलटून पालटून कोण्या जिसी वर सोपवले जायचे. भदराज कँपसाठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळेपुरतं नेमून दिलेला जिसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आयएमए मध्ये, जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराजवर धावा बोलायचा असा तो एक्सरसाईजचा भाग होता.
डेहराडूनहून मसुरीचे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतले भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. शिखरावरती एक शंकराचे मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फूट उंचीचा. त्या पर्वतराशीला "लोअर हिमालयन रेंजेस" म्हणतात. ते शिखर सर करून परत आयएमए मध्ये यायचे. चारही बटालियन्स मध्ये चुरस असते. ह्यालाच रनबॅक असे म्हणतात. जी बटालियन भदराज सर करून पहिल्यांदा आयएमएत पोहोचेल ती जिंकते. त्या बटालियनला भदराज चषक मिळतो. भदराजचा डोंगर चढायला, रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांकोने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास दिशा समजण्यासाठी. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्ट्याला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी. माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई असते युद्धात. ह्याला कारण असेकी शत्रूच्या इलाक्यात आपण असताना, शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये, तलावांमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी गमवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच. शिवाय हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडेपाच किलो वजनाची आतापर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल असायची. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आयएमएकडे परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत, निघायचे. असा तो भदराजचा कॅंप. रात्रभर चढून अर्धमेले झालेलो आम्ही, डोंगर माथ्याला जेव्हा सकाळी पोहोचतो तेव्हा पुढचा रनबॅक डोळ्यासमोर उभा राहतो, व आपल्या बटालियनच्या सगळ्यांना जमवण्याच्या नादात, त्या मंदिरातल्या शंकराचे दर्शन चुकते. दर वर्षी प्रत्येक कोर्स बरोबर हे असेच होते म्हणे. साधारण पन्नास किलोमीटरचा रनबॅक हा चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्यावर अवलंबून असायचा. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जिसी अमित वर्मावर सोपवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आयएमएत परतलो. पन्नास किलोमीटर चालून आल्याने सगळे जिसी दमले होते. पण साथीदाराबरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर, ह्या लयी मुळे पायात गती येते व आजूबाजूच्या वारकऱ्यांचा मेळ्यामुळे अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंदही मिळतो.
पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरमागरम चहा व बिस्किटांनी झाले. चहापान प्रत्येक कॅम्पचा आमचा सगळ्यात लाडका भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. कॅप्टन गिल ह्यांनी त्यादिवशीचे आयएमएचे बाकीचे कार्यक्रम आमच्यासाठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जिसींकडून उत्फुर्तपणे "माणेकशॉ बटालियन की जय" निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. प्रत्येकजण त्यांना आलेली पत्र वाचण्यात गुंग होता. मोबाईल फोन प्रकरण काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आयएमएच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची. एसटीडी बूथवर जाणे सोपे काम नव्हते. त्यामुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्यामध्ये, पत्र हा एकच दुवा होता.
मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्याकडे जिसी सुनील खेर व जिसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी "काय झाले" म्हणून विचारले. सुनील मला म्हणाला, "आकाशी, आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे". त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. चेहरा सुकून गेला होता. घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे हा नवाच प्रश्न त्याला पडला. खोऱ्याबाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत व असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती, आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. परत कॅप्टन गिल असा कर्दन काळ होताकी त्याच्याकडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. त्यामुळे आम्ही शक्यतोवर त्याच्याकडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालियन पहिली आली होती. बाकीच्या बटालियन्स आल्याआल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या.
धीर करून आम्ही कॅप्टन गिलकडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – "मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टीचा अर्ज लिही, मी शिफारीश करतो. बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालियन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन". सुनीलने वेळ जायला नको म्हणून डिएसकडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडरकडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला, की त्याला बटालियन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा कॅप्टन गिल ह्याच्याशी रोजच्यारोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावतकडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महिन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडरचा धाक तर मग विचारूच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जिसीजना रहदारीसाठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाताही यायचे नाही. आम्ही बटालियन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपसच्या वेळेला पाहिले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जिसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जिसी बटालियन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलिगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो, एकदा भेटायचा. "तू रेलिगेट झालास", हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जिसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्यामुळे जिसी सुनील खूप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालियन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खूप वाईट वाटले. जिसी सुनील खेर तर वेडापिसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते.
त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनीला म्हणाला की त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल. ह्याला कारण असे की कॅप्टन गिलने सुनीलच्या सुट्टीसाठी कंपनी कमांडरला स्वतः भेटून सुनीलवर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.
कॅप्टन गिलला संध्याकाळी भेटल्या पासून सुनील मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.
जिसी सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता. तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आयएमएच्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जिसी, एकमेकांचे जीवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनीचा व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहिली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार – त्याची आई घर सोडून कोठे जाईल, कोठे राहील व तिचे कसे होईल?
कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटुंबाला? कोठे राहतील, कसे होईल त्यांचे? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहिल्या की पूर्व संचित म्हणून काही असतेका असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गातली ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचित मानित नाहीत ते सूचीत करतात. संचिताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर उद्या अशा परिस्थितीला स्वतः तोंड द्यावे लागले तरी ते तो निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील? का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टिकोनात फरक झालेला असेल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का? अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का? आपण रोजच्या अडचणींना दुःखाचे नाव देऊन आपल्या नशिबाला लागलीच कोसायला सुरवात करतो. सुनीलचे दुःख पाहून आपल्या आयुष्यातल्या अडचणी साध्या सोप्या वाटायला लागतात.
सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आयएमएत परतला तर काय होणार.
आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहिती समजल्यास त्वरित कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जिसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पिटी परेडला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जिसी सुनीलला आठ वाजता कंपनीकमांडरने त्याच्या ऑफिस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पिटी परेडला गेलो. त्याचे रेलिगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जिसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खूप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यांमुळे बटालियन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दुसरे त्याच्या आईचे काय झाले?, सुखरूप आहे का? कशी आहे? ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............
भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खूप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एकएक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून, राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहिले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थिती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळूहळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशीदींतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटुंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते तेव्हा आम्हाला माहिती नव्हते. ह्याच्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतर झाले होते. पाहिले स्थलांतर तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरांची तोडफोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतर, सुलतान अली शहाच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहिल्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर जिझिया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पुढे मिरं शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतर १६ व्या शतकातले. औरंगजेबाच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गुरुंना गुरू तेग बहादुरांना प्राणांना मुकावे लागले होते. हा औरंगजेबाच्या काळातील इतिहास पाहता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचित इतिहास काही वेगळा झाला असता पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशीब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे स्थलांतर, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल्ला ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतर, अफघाण सुलतानांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतर पाकिस्तानच्या "ऑपरेशन टोपूक" मुळे होत होते. ते त्या वेळेला आम्हाला अवगत नव्हते. १९८८ मध्ये त्यावेळचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हक ह्यांनी ऑपरेशन टोपूक कार्यान्वित केला. अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन, घुसखोरी करून काश्मिरात अराजक माजवायचे व भारताला अस्थिर करायच्या चार पदरी कार्यक्रमाचा तो भाग होता. हे कोणालाच माहीत नव्हते. व्होटबँकांच्या राजकारणात काश्मिरी हिंदूंचे पारडे मुसलमानांपेक्षा हलके होते, व नेमके ह्याच कारणासाठी, सरकारला कठोर पावले उचलायची नव्हती. काही न करणे हे सरकारच्या सोयीचे होते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टिकोन बदलायला वेळ लागतो. खूपदा लोकांना समजे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतराने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहिले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहिली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त खरे आहे. ह्या कलियुगांत सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ "ती" लाठी का नसते कधी? सभ्यतेपोटी आपण "लाठी" सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहिले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहिजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पूर्वी क्रूर सुलतानशाही होती आता एक क्रूर शेजारी राष्ट्र आहे.
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/ (मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
8 Apr 2012 - 8:22 pm | ५० फक्त
एका प्रखर आणि कटु वास्तवाकडे घेउन जात आहात तुम्ही.
इथं दर तीन वर्षानी भाड्याचं घर बदलताना डोळ्यात पाणी येतं तिथं पिढीजात आयुष्यं काढलेली घरं सोडुन वा-यावर उघडं पडताना काय होत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.
8 Apr 2012 - 8:29 pm | पैसा
अगदी असेच म्हणते!
8 Apr 2012 - 8:46 pm | यकु
सुनिलचे काय झाले? ते थोडेसे बाजूला पडून
मध्येच इतिहास आल्यासारखे वाटले, की हा नेमका इथे भाग पाडल्याने विस्कळीतपणा?
बाकी नेहमीप्रमाणेच उत्तम.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Apr 2012 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
काश्मिरी विस्थापितांच्या काहाण्या त्यांच्याच कडुन एकदा ऐकलेल्या आहेत... (एका सामाजिक संघटनेच्या मेळाव्यात) ... आज लेख हा वाचत होतो पण अठवत सगळं ते होतं :-(
9 Apr 2012 - 12:01 am | ५० फक्त
अआ.,नम्र विनंती,
किमान अशा खरोखरच सिरियस विषयावर प्रतिसाद देताना तरी ती हास्यचिन्हं टाकु नका, तुमच्या मुळ, प्रामाणिक भावनांचा अन प्रतिसादांचा अगदी विचका होउन जातो.
9 Apr 2012 - 2:23 pm | प्रकाश घाटपांडे
अहो ते भावचिन्ह आहे 'सॅड'. त्यांनी उचित भावचिन्ह दिल आहे.
9 Apr 2012 - 12:50 am | आत्मशून्य
रणजीत साहेब आपण लिहीत रहा.
9 Apr 2012 - 6:17 am | रेवती
तुमच्या मित्राचे, त्याच्या आईचे काय झाले शेवटी?
बाकी काश्मिर हे राज्य नेहमी दुखर्या आठवणींसाठीच लक्षात राहते.
लेखन नेहमीप्रमाणेच छान.
9 Apr 2012 - 9:26 am | प्रचेतस
लिखाण नेहमीप्रमाणेच उत्तम.
9 Apr 2012 - 9:33 am | कपिल काळे
हा भागसुद्धा छान जमला आहे. पण शेवटी इतिहास आल्यामुळे जर विस्कळित वाटतो.
सुनिल आणि त्याच्या आइचे काय झाले? त्यांच्या घराचे काय झाले ?
9 Apr 2012 - 11:18 am | अँग्री बर्ड
मला लेख आवडला, लेखातल्या चुका शोधण्यापेक्षा त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मी काही बोलणार नाही, मात्र हेच भयाण सत्य आहे की तिथे हिंदूंचा अनन्वित छळ केला जातो आणि आपले सरकार काहीच करत नाही कारण ते मुस्लीमधार्जिणे आहे.
9 Apr 2012 - 12:39 pm | मृत्युन्जय
एवढी भयाण परिस्थिती असूनही जीसीला सुट्टी न देणारा कटोच मलातरी **रचो* वाटतो. माफ करा, सैन्याला नावे ठेवतो आहे पण शिस्त आपल्या जागी. माणसाला माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार जर सैन्याची शिस्त नाकारत असेल तर **ड्या* गेली ती शिस्त. कटोचचे वागणे अमानूष वाटले.
असो. लेख नेहमीप्रमाणे आवडला. एक भयाण वास्तव नजरेसमोर आले.
10 Apr 2012 - 3:22 pm | इष्टुर फाकडा
पुन्हा एकदा सावरकर वाचणार. ते वाचलं कि आपल्यापुरतं उत्तर सापडल्यासारखं होतं.
11 Apr 2012 - 12:21 pm | रणजित चितळे
मी पण तेच करतो.