ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक...... प्रवेश
राजाराम सीताराम........ पुढचे चार दिवस
सुरवातीचे दिवस – भाग १
सुरवातीचे दिवस – भाग २
आयएमएतले दिवस भाग १
………….. मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा.
मी डोंबिवलीचा असे सांगितले तर कोणाला कळायचे नाही व मुंबई म्हटले तर मुंबईचा मुलगा मी नाही हे मला माहीत होते. त्यामुळे मी मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यात राहणारा असे सांगायचो. ठाणे हा एक जिल्हा आहे हे सुद्धा बऱ्याच मुलांना ठाऊक नव्हते.
माझ्या बद्दल काय सांगावे ह्याची घालमेल मनात होत होती. मला काय येते, असे कोणी विचारले तर काय सांगावे ह्याचा मलाच प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. अभ्यासात बऱ्यापैकी चमकणारा आहे असे म्हणावे तर आयएमएतल्या अभ्यासक्रमात त्या ‘चमकणाऱ्या’ अकलेचा काडीचा उपयोग नव्हता. कारण शाळा व कॉलेजातले नेहमीचे आपण जे शिकतो त्या अभ्यासक्रमाचा लवलेशही नव्हता. इथले विषय म्हणजे अजब प्रकारचे होते. नेहमीचे आपले गणित, सायन्स, भाषा, इतिहास, भूगोल येथे नव्हते. येथे होते युद्ध शास्त्र त्यात शत्रुसेनेवर चढाई कशी करायची, बचाव कसा करायचा, जमिनीत सुरंगांच्या माळा कशा रचायच्या त्याचे शिक्षण होते. खंदक कसा असला पाहिजे व तो कसा खणायचा ह्याचे ज्ञान होते. शस्त्रास्त्र शास्त्रा मध्ये रायफल, मशिनगन, कारबाईन, पिसातलं, रॉकेट लॉन्चर, ग्रेनेड कसे हाताळायचे त्याचे प्रशिक्षण होते. टेंट कसा उभारायचा, घातपात कसे घडवून आणायचे, युद्धात रेडिओवर कसे एकदुसऱ्याशी बोलायचे त्याचे शिक्षण होते. इतिहास होता पण सैन्यातल्या पूर्वीच्या झालेल्या युद्धांमधले धडे होते. दुसऱ्या महायुद्धातली ब्रह्मदेशावरची स्वारी किंवा चिंडीटस स्वारी बद्दलचा युद्ध इतिहास होता. शिवाय फील्ड मार्शल स्लीम, डेझर्ट फॉक्स रोमेल अशा महारथींची चरित्रे होती. गनिमी काव्याचे प्रशिक्षण देताना शिवाजीचा पुसटसा संदर्भ होता पण चरित्र नव्हते. मुळात मराठी मनात शिवाजी बद्दल जेवढे प्रचंड प्रेम असते, आदर असतो व अभिमान असतो त्या मानाने बाकीच्या राज्यातून आलेल्या मुलांची शिवाजी बद्दल न वाटणारी जाज्वल्यता आपल्याला निराश करते. मिलिटरी हिस्ट्री हा विषय नवीन होता. शालेय इतिहास व भूगोलाचा येथे मागमूस नव्हता..
मी कथा कथन करतो असे म्हटले तर ते मी मराठीतून करायचो. येथे बोंबलायला मराठी कोणाला येत होती. मराठी बोलणारे शोधून सापडत नव्हते. साडे चारशे मुलांच्या कोर्स मध्ये इन मीन सगळी मिळून आठ दहा मराठी ‘पोरं’ होती. आमच्या प्लटून मध्ये मला सोडले तर दुसरे कोणी मराठी नव्हते. मग कोण ऐकणार त्या मराठी कथा. येथे फक्त हिंदी व इंग्रजीतून संभाषण करावे लागायचे. त्यात आमची हिंदी ही बंबया हिंदी. पण दक्षिणेकडील मुलांपेक्षा बरी. त्यामुळे त्यात बोलणे पण दुरापास्त. इंग्रजीचे लहानपणापासूनच रेशन कार्ड हरवलेले त्यामुळे फाड फाड इंग्रजी महाराष्ट्रात फक्त कोकाट्यांनाच माहिती. ह्या सगळ्या उण्यांमुळे माझी हालत एकदम खस्ता झाली होती.
चित्र खूप छान काढतो असे सांगितले तर आयएमएत चित्रांचे काय लोणचे घालायचे असे विचारले गेले. आयएमएत पाहिजे हॉकी, फुटबॉल खेळणारे गडी. क्रॉसकंट्री, टेनिस किंवा स्क्वॉश खेळता येणारे खेळाडू. मी ह्या सगळ्याचा जेव्हा विचार केला तेव्हा मला समजून चुकले की ह्यातले मला काहीच येत नाही. आयएमएतल्या अपेक्षा वेगळ्याच होत्या. एकदम मला ‘कुठून आलो आयएमएत’असे वाटायला लागले. मजा, ही होती की जवळपास सगळ्यांना असेच वाटत होते. फक्त काहीच जिसी मैदानी खेळात पारंगत होते. ते सोडले तर कोणत्याही जिसीकडे असली पात्रता नव्हती.
परितोष शहा – इलेक्ट्रिक गिटार सुंदर वाजवायचा, स्विमिंग तर असे यायचे की मासोळीच वाटायचा. तेव्हा समजले की पाण्यात तरंगता येणे म्हणजे पोहणे नव्हे……
संध्याकाळी जेवणासाठी सोडल्या सोडल्या आम्ही मुफ्ती ड्रेस चढवला व कॅडेटस मेस मध्ये गेलो. आम्हाला ऑफिसर मेस मध्ये जायची अद्याप परवानगी नव्हती. आता हळूहळू काट्या चमच्याने जेवण जेवायचा सराव होऊ लागला होता. आईने वाढलेल्या आणि जमिनीवर बसून हाताने खाल्लेल्या घरच्या जेवणाची मजा काय असते ते काटे चमचे हातात धरल्यावर आणि आयएमएत गेल्यावर कळते. जेवण झाले व आम्ही मुफ्ती ड्रेस मध्येच फॉलइन झालो त्याच अंगणात. आम्हाला आठवड्यातल्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या. जिसी अमित वर्मा फॉलइन घेऊन रिपोर्ट देणार, मी व जिसी ब्रजेशप्रतापसिंह फॉलइनची घोषणा करणार होतो, काही जिसीजवर सीनियर्सने त्यांचा सकाळचा चहा व बिस्किटे आणून द्यायची जबाबदारी सोपोवली. जिसी अशोक पांडे व जिसी परितोष शहावर कोणतीही जबाबदारी सोपोवली नव्हती, त्यांना त्यांच्या खेळाचा सराव करायला सांगितला होता.
ज्यांना पूर्ण २५ पुशअपस्, सिटअपस् नीट घालता येत नव्हते त्यांना त्या कशा घालायच्या त्या शिकवायचा प्रयत्न झाला व त्यांच्याकडून त्या करवून घेतल्या. मी पूर्वी शाखेत जायचो. संध्याकाळच्या त्या शाखेत जोर, बैठका व सूर्यनमस्कार खूप घातले होते. शंभर सूर्यनमस्कारांची तर शाखेत कावड लागायची, त्यामुळे असेल कदाचित पण मला सहजच पुशअपस् व सिटअपस् घालता येत होत्या व म्हणून मी सुटलो. त्याच फॉलइनमध्ये पोहता न येणाऱ्यांची नावे लिहिली गेली कारण ज्यांना पोहता येत नाही अशा जिसींना सरावासाठी जास्तीचा पोहण्याचा तास मिळणार होता. पाहिल्या सत्रामध्ये शंभर मीटर पोहणे व दहा मीटर उंचीवरून पाण्यात उडी मारणे असा अभ्यास होता. आयएमेत पोहण्याच्या परीक्षेत नापास म्हणजे हमखास रेलीगेशन. मला माझ्या वडलांची आठवण आली त्यांना मनातल्या मनात हजार दंडवत ठोकले. डोंबिवलीला तरणतलाव नव्हता, मी संध्याकाळी लोकलने ठाण्याला जायचो. रंगायतनच्या बाजूला लागूनच तरणतलाव होता. माझे वडील त्यांची नोकरी करून डोंबिवलीला ओसंडून वाहणाऱ्या लोकलने परत येताना मध्येच ठाण्याला उतरायचे, मला पोहणे शिकवायचे व मग आम्ही दोघे एकत्र डोंबिवलीला यायचो. परत यायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजायचे. त्याचा मला आता फायदा होत होता. बंगाली, केरळीय व बिहारी चांगले पोहणारे.
एका प्लटून मध्येच चाळीस जिसी. मॅकटीला कंपनी मध्ये साधारण दीडशे जिसी होते. रोज कोणीनाकोणी काहीतरी चूक करायचेच. आमची मॅकटीला कंपनी टॉन्स नदीच्या किनाऱ्या जवळ होती. तेथून रोज सायकली घेऊन माणेकशॉ बटालियनच्या क्लासेसना जायचे म्हणजे वाटेत साधारण शंभर मीटरचा उभा चढ लागत असे, सायकलवरून तो चढ चढून जाताना चांगलीच दमछाक व्हायची, ह्याउलट येताना उतार असायचा व त्यामुळे त्या शंभर मीटरच्या उतारावर सायकली सुसाट वेगाने आम्ही हाकायचो. मजा यायची. शिवाय दुपारच्या त्यावेळेला क्लासेस सुटलेले असायचे व पोटात खूप भूक लागलेली असायची, उतारावरून भरधाव सायकल हाकायला हे अजून एक कारण होते आमच्याकडे. येताना सायकलवरून उतरून, सायकलचे हॅन्डल हातात धरून, स्क्वॉड करून, पळत यायचे अशी सक्त ताकीद सीनियर्सने आम्हाला दिली होती. ह्याला कारण असे होते की पूर्वी खूपदा ह्याच उतारावरून सायकलवरून जिसी पडले होते, हात पाय मोडल्या मुळे त्यांचे रेलीगेशन झाले होते.
दुसऱ्या दिवशीची तयारी करे पर्यंत रोज रात्रीचे बारा वाजायचे झोपायला. परत भल्या पहाटेचे ते प्री-मस्टर संपले नव्हते अजून. कसलाही विचार करायची उसंत मिळत नव्हती. रात्री झोपताना झोप लागे पर्यंत कधी कधी मनात विचार चालायचे. पण फार क्वचित. इतका मी दमलेला असायचो की आडवे झाल्या झाल्या झोप लागून जायची. हळूहळू थंडीला सुरवात झाली होती. मुंबईची थंडी व इथल्या थंडीत बराच फरक होता. गादीवर अंग टाकून झोप येई पर्यंत माझ्या डोळ्या समोर गेल्या महिना दीड महिन्याची रूपरेषा सरकली. असे काही गुंतून गेलो होतो मी की, माझे विश्वच बदलून गेले होते. मला आमचा आयएमएतला पहिला दिवस आठवला. डेहराडून स्टेशनवर सिव्हिल कपड्यातून आलेलो आम्ही मुले. अशोक पांडेची वाढलेली दाढी, सुब्रमण्यमचे कपाळावर आडवे लावलेले भस्म व गबाळ्या सारखी घातलेली पॅन्ट शर्ट, कोणी जोडे घातलेले, कोणी चपलेत तर कोणी सॅन्डल्स मध्ये होते. कोणाचा न खोचलेला शर्ट, तर ब्रिजेशप्रताप सिंहाचे मानेवर रुळणारे न कापलेले केस.
दीड दोन महिन्यांच्या रोजच्या संध्याकाळच्या फॉलइननी व त्याबरोबर मिळणाऱ्या शिक्षेतून आम्ही सगळी मुले आता खरोखरीच ‘जिसी’ वाटायला लागलो होतो. आमचे एक सारखे केस कापले जायचे. सगळे दाढी करायला लागले होते. नियमाने करावीच लागायची. गणवेशावर न केलेली दाढी म्हणजे गणवेश पूर्णच झाला नाही. हा नियम फक्त शीख जिसींना लागू नसायचा. कपाळावर गंध नाही, गळ्यात कोठचेही गंडे दोरे नाहीत. एकसारखा गणवेश व एकसारखे सगळ्यांचे जोडे. प्रत्येक पाच जिसी मागे एक सेवादार होता दिलेला. त्याला आम्ही महिन्याला दीडशे रुपये द्यायचो. तो रोज आमचे जोडे पॉलिश करायचा, बेल्ट पॉलिश करून बेल्टच्या ब्रासचे बक्कल, कॉलरवर टर्म दाखवणारे ब्रासचे कॉलर डॉक्स्, खांद्यावर लावायचे ऍप्लेट, बॅरेवरचा आयएमएचा इन्सिग्नीया हे सगळे ब्रासोने चमकवायचा. धोबी दर रोज गणवेश धुऊन इस्त्रीकरून आणायचा. ह्या सगळ्या मुळे आता सगळे जिसी एकदम फाकडे दिसायला लागले होते.
रोजच्या ड्रिल – कवायतीमुळे चालण्यात सुद्धा एक चांगला ढब येऊ लागला होता. दोन जिसी चालताना – चुकलो पळताना दोघांचा आपोआप डावा तर डावाच पाय एकदम पुढे यायला लागला होता आणि आमच्या नकळत ‘कदम - कदम मिलाए जा’ चा अर्थ आम्हाला समजायला लागला होता. आधीच फाकडे दिसणारे जिसीज आता ऐटबाज दिसायला लागले होते.
खोली बाहेर पडताना कोणी अर्ध्या चड्डीत, कोणी बर्म्युडा मध्ये, कोणी अनवाणी हे न दिसता आता तो, ‘पिक्चर मध्ये नायिकेचा बाप घालतो तसा’ गाऊन घालून व बाथरुम स्लीपर्स शिवाय कोणी दिसायचे नाही. गाऊन घालून खोली बाहेर येणे पण फक्त अती पहाटे अंघोळीसाठी, कोपऱ्यातल्या सार्वजनिक स्नानगृहात जातानाच फक्त एरव्ही असे घरातले कपडे घालून बाहेर पडायचे काही कारणच नसायचे. रोज शिक्षा खाऊन खाऊन ही शिकवण इतकी मना मध्ये रुजली की इतक्या वर्षाने सुद्धा रोज गुळगुळीत दाढी केल्या शिवाय व नसल्यात जमा झालेले डोक्यावरचे पीक, नियमित कापल्या शिवाय कसेतरीच वाटते. एवढेच काय पण कंमरे खाली कुल्ले दिसे पर्यंत व जमिनीवर लोळणारी लो-राइझ जीन्स घातलेली आणि एका कानात बाळी घातलेली हल्लीची तरुण मुले बघताना डोक्यात एक तिडीक निघून जाते. अशा स्वतःला ‘कुssल’ समजणाऱ्या मुलांना ओरडून सांगावेसे वाटते की अशी कुल्ले दिसे पर्यंत लो-राइझ जीन्स घालणे हे कुssलपणाचे लक्षण नाही तर अमेरिकेतील तुरुंगातले कैदी घालतात असे कपडे. तेथील जनतेने ती ‘फॅशन’ म्हणून बाजारात आणली. तुम्ही ती काही विचार न करता उचलली. तुमच्या ‘कुssल’ व आमच्या ‘स्मार्ट’मध्ये फरक आहे.
सामूहिक जीवनाचे काही नियम मनात आपोआप रुजू होऊ लागले. आपल्या सीनियर बरोबर चालताना आपण त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. दुसऱ्याला भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करायची लाज वाटत नव्हती आता. उलट तसे केल्याने एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो हे कळले.
काही दिवसांपूर्वी, रात्रीचे फॉलइन संपल्यावर जेव्हा आम्हाला आमच्या खोलीवर जायला परवानगी मिळाली तेव्हा सुब्बूने जेयुओ भुल्लरला गुडनाईट म्हटले होते.
यू क्लाऊन, टू विश द टाइम ऑफ द डे, डझंन मीन डॅट यू ज्युनियर्स विल विष ए सीनियर, गुड नाइट. ओनल्ही अ सीनियर कॅन विश हिज ज्युनियर गुड नाइट. दॅट इज हिज प्रेरॉगेटिव्ह. यू विल ऑलवेज से गुड डे. दॅट इज युअर प्रिव्हिलेज. इज इट क्लिअर टू यू ऑल?
क्लिअर सर. .....आमचा कोरस. पुढे अर्धा तास आम्हाला त्यावर एवढे मोठे लेक्चर मिळाले होते ते सांगायला नकोच.
गुड नाइट गाईज सियू टूमारो.
गुड डे सर. परत एकदा आमचा कोरस. (एकदाचे सुटलो म्हणून).
मी सुब्रमण्यमच्या रूमवर गेलो त्याला भेटायला. त्याला शर्ट घालता येत नव्हता. तो नुकताच मेडिकल इन्सपेक्शन रूम मध्ये जाऊन डॉक्टरांना भेटून आला होता. डॉक्टरने एक दिवसासाठी त्याच्या सगळ्या परेड्स माफ केल्या होत्या. ‘सिक इन क्वार्टस’ म्हणतात त्याला. त्या दिवशीचे क्रॉलिंग त्याने भलतेच मनावर घेऊन केले होते त्यामुळे दोन्ही खांद्यांवरचे सालडे सुटले होते व जखम झोंबत होती. मला सुब्रमण्यम म्हणतो.....
(क्रमशः)
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com
प्रतिक्रिया
25 Jul 2011 - 7:24 pm | पैसा
म्हणजे मस्त वर्णन! प्रत्यक्ष इतकं शिस्तीचं आयुष्य जगणं बर्याच लोकांना फार कठीण काम आहे.
25 Jul 2011 - 10:32 pm | स्वानन्द
असेच म्हणतो.
माझा एक एनसीसी वाला मित्र त्याच्या एनसीसी त असतानाच्या गोष्टी दंग होऊन सांगत असतो. त्याची आठवण झाली.
3 Oct 2011 - 5:36 pm | प्रभाकर पेठकर
कुठलीही शिस्त मनापासून स्विकारली, त्याचं आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणून घेतले तर तितकासा त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पण हिच शिस्त एक शिक्षा आहे असे मनाने घेतले तर त्रास अटळ आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन जी काही चिमुटभर शिस्त लागली त्याचा फायदा अ़जूनही होतो आहे, होत राहील. कारण ती मनाने स्विकारलेली शिस्त आहे.
9 Oct 2011 - 2:52 pm | रणजित चितळे
आपल्या मताशी पुर्ण सहमत. लहानपणी मी पण शाखेत गेल्या मुळेच मला आर्मीत जावेसे वाटले.
25 Jul 2011 - 7:34 pm | गणेशा
जबरदस्त
25 Jul 2011 - 7:48 pm | प्रास
लई भारी!
वाचतोय.
आवडतेय.
आणखी वाचायला नक्की आवडेल.
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
प्रचंड बेशिस्त ;)
25 Jul 2011 - 8:29 pm | यकु
मस्त!
मागचे काही भाग वाचले आहेत...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
25 Jul 2011 - 9:35 pm | प्रीत-मोहर
और भी आने दो कर्नलसाब!!! आणि यावेळी जास्ती वाट पाहायला लावु नका :)
हा भागही अॅज युजुअल मस्तच होता हेवेसांनल :)
25 Jul 2011 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
भारी!
25 Jul 2011 - 10:19 pm | नावातकायआहे
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
26 Jul 2011 - 1:35 am | बहुगुणी
येऊ द्यात आणखी आठवणी.
(शिस्तबद्द वातावरणाच्या खुलासेवार वर्णनावरून एन सी सी च्या कँप्स मध्ये घालवलेले काही दिवस आठवले, रायफल मधून क्लिनिंग साठी पुल थ्रू वापरून बॅरलशी केलेली झटापट आठवली. तुमच्या सारखे लोक खडतर आयुष्य जगण्याचं मनावर घेतात म्हणून मी आणि माझे देशवासी बांधव अभिमानाने आणि सुरक्षिततेतने जगू शकतो!)
26 Jul 2011 - 8:55 am | रणजित चितळे
(शिस्तबद्द वातावरणाच्या खुलासेवार वर्णनावरून एन सी सी च्या कँप्स मध्ये घालवलेले काही दिवस आठवले, रायफल मधून क्लिनिंग साठी पुल थ्रू वापरून बॅरलशी केलेली झटापट आठवली.
मला येथे हेच दाखवायचे आहे सामान्य व साध्या मुलांना अश्या चांगल्या संस्थेने शिस्त लावली (व त्यामध्ये उगाच कोणी जिसीच्या मुलांच्या पालकानी ढवळाढवळ केली नाही जे कोणी करत नाहीत व खपवून सुद्धा घेतली जात नाही अशी ढवळाढवळ ) तर चांगले नागरीक तयार व्हावयास मदत होते.
26 Jul 2011 - 3:07 am | स्मिता.
आधीच्या भागांप्रमाणेच हा पण मस्तच! पुढचे भाग येवू द्यात लवकर...
26 Jul 2011 - 7:25 am | ५० फक्त
मस्त हा ही भाग आवडला, अजुन येउ द्या.
26 Jul 2011 - 7:37 am | सहज
वाचतोय.
26 Jul 2011 - 8:39 am | नगरीनिरंजन
प्रत्येकाला किमान दोन वर्ष तरी असं आयुष्य जगायला लावलं पाहिजे.
पु.भा.प्र.
26 Jul 2011 - 2:41 pm | Dhananjay Borgaonkar
सर्..खुप मस्त वर्णन केल आहेत तुम्ही आयएमए आणि तुमच्या अनुभवांच सुद्धा. मजा येत आहे वाचताना.
पुढील भाग लवकर टाका.
अवांतर - तुम्ही कारगिल युद्धात सहभागी होतात क? असल्यास ते अनुभव सुद्धा वाचायला आवडतील.
27 Jul 2011 - 8:33 am | रणजित चितळे
पैसा, स्वानंद, गणेशा, प्रास, यशवंत एकनाथ, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते, नावातकायआहे, बहुगुणी, स्मिता, ५० फक्त, सहज, नगरीनिरंजन आणि धनंजय बोरगावकर आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.
बोरगावकर साहेब होतो मी ऑपरेशन विजय मध्ये.
27 Jul 2011 - 8:54 am | सोत्रि
मस्त!
-('जवान') सोकाजी
27 Jul 2011 - 11:55 am | मनराव
आवडलं, एकदम क्लास,
पुढच्या भागाची वाट पहातो आहे..........
18 Aug 2011 - 4:41 pm | वपाडाव
चितळे, पुढचा भाग येउ द्या....