लाख चुका असतील केल्या...
निसटले वर्ष मला
पाठमोरेसे दिसले
त्याची बघून हताशा
माझे काळीज द्रवले
म्लान वदनाने त्याने
हलकेच विचारले
जगशील का रे पुन्हा
दिस चार माझ्यातले
विचारात मी पडलो
चार कोणते निवडू
आनंदात गेले ते, की
चुकांनी जे केले कडू
निवडले मग चार
चुका मोठ्या केल्या ज्यात
सुधारेन म्हणताना
गेलो आणखी गर्तेत
नवे वर्ष नव्या चुका
करण्याची आहे संधी
असे असता कशाला
भूतकाळा द्यावी संधी?