उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासूनच आता यावर्षी ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनला जायचेच जायचे असे ठरवले होते. ह्या दिवशी जायचं का त्या दिवशी.. आत्ता ती शेतं ट्युलिपनी बहरली असतील का? का अजून अवकाश आहे.. असं करता करता इथल्या ट्रॅवल एजन्सीनी २-३ तारखा काढून दिल्या. आमच्या गावापासून ऍमस्टरडॅमला एका दिवसात जाऊन येता येतं. सकाळी पहाटे निघून रात्री उशीरापर्यंत परत. या टूर मध्ये काऊकेनहोफमधलं भलंमोठ्ठ ट्युलिप गार्डन आणि शिवाय ऍमस्टरडॅम शहर असं दोन्ही होतं. पण यातली एकही टूर वीकांताला नव्हती. :( मग रजा टाकता येईल का? जमेल का? असं हो-नाही करता करता अखेरीस आम्ही गुरुवार ७ मे ला म्हणजे आज जायचं ठरवलं.
आता कधी एकदा गुरूवार येतोय असं झालं होतं. त्यात इथे स्वातीताईचा ट्युलिप्सच्या गावा वाचला आणि आता आपल्याला पण हे प्रत्यक्ष पहायला मिळणार याचा आनंद झाला. लगेचच दोन दिवसांनी शारंगरव यांनी ट्युलिप्सचे मनमोहक फोटो टाकले. आणि आता मात्र कधी एकदा गुरूवार उजाडतोय आणि आपण तिथे जातोय असं झालं.
गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशनच्या बाजूला साडेसहाची बस पकडायची म्हणजे घरातून साडे पाचला निघायलाच हवं होतं. त्यामुळे बुधवारी रात्री जय्यत तयारी करून ठेवायला लागणार होती. सकाळी बसमध्ये खायला सँडवीच, दुपारसाठी बटाट्याची भाजी लावलेले सँडवीच, फळं, बसमध्ये बसल्या-बसल्या चरायला वेफर्स, कुरकुरे,चॉकलेट्स, पाण्याच्या बाटल्या असं घेत घेत खायच्या सामानानेच एक सॅक भरली. दुसर्या सॅकमध्ये कॅमेरा, पाऊस आला तर पंचाईत नको म्हणून छत्री, मफलर,जुजबी औषधं अशी सगळी तयारी करेपर्यंत रात्री साडेअकरा वाजले. 'बापरे, उद्या साडेतीनला उठायला लागणार, झोपूया आता' असं म्हणून उद्या कसं फिरायचं, काय काय बघायचं, स्वातीताईनी सांगितलेली तिथली बोट ट्रिपही करुया.. असं कल्पनारंजन करत करत झोपलो.
बरोब्बर साडेतीनला गजर झाल्यानंतर नेहमीसारखं अजून ५ मिनिटे, अजून पाच मिनिटे असं न करता उठलो. अंगात अगदी लहान मुलांसारखा उत्साह संचारला होता. भराभर आवरून साडेपाचच्या बसनी आम्ही बरोब्बर पावणेसहाला रेल्वे स्टेशन वर पोचलो सुद्धा..! बापरे.. अजून निघायला पाऊण तास होता. बाहेर चांगलीच थंडी होती. पाऊण तास या थंडीत थांबणं अगदी नको झालं होतं. कधी एकदा आता बस येत्ये आणि बसमधल्या गरम हवेत जातोय असं झालं होतं. सहा वाजले.. आसपास कोणी आमच्यासारखे वाट बघणारे प्रवासी दिसेनात.. 'काय इथली लोकं तरी.. साडेसहाची बस म्हणजे अगदी आयत्या वेळेला सहा-वीस पर्यंत येतील सगळे' असं वाटलं. सव्वा सहा झाले तरी इतर कोणी लोकं दिसेनात.. आज गुरुवार-मधला वार म्हणजे फारच कमी लोकं असतील असं झालं तरी आमच्या शिवाय इतर कोणीच दिसेना. अजून ५ मिनिटे गेल्यावर मात्र चलबिचल व्हायला लागली. एकदा तिकिट बघून ते आजचच आहे ना.. आपण बरोबर जागी थांबलोय ना आणि मुख्य म्हणजे वेळ बरोबर आहे ना.. अशी सगळी खात्री करून घेतली. सगळं बरोबर आहे, हातात तिकिट आहे, कोणी प्रवासी पण दिसत नाहीयेत.. थंडी तर काय त्रास देतच होती. आता मात्र अगदी हद्द झाली होती. ज्या ट्रॅव्हल एजन्सीतून तिकिट काढले होते तिथे आम्ही फोन करतोय तर ते ऑफिस उघडणार होतं आठ वाजता.. आता काय करायचं असा प्रश्न पडला. आता जवळ जवळ सात वाजत आले होते. परत एकदा तिकिट बघताना आम्हाला ज्या मुख्य कंपनीची बस होती त्या कंपनीचा नंबर दिसला. त्यांचं ऑफिसही जरी आठला उघडणार असलं तरी इमर्जन्सीसाठी त्यांनी दुसरा नंबर दिला होता. आता त्या नंबरवर फोन करायला सुरुवात केली. २-३ प्रयत्नानंतर लागला एकदाचा फोन. त्याला सगळा गोंधळ समजावून सांगितल्यावर तो पठ्ठा अतिशय शांतपणे म्हणाला,'अहो, आजची टूर रद्द झाली आहे... :( ' आपण बहुतेक चुकीचं ऐकलं असं वाटून त्याला परत एकदा विचारलं तर परत तेच उत्तर.. 'वीक डे असल्याने बस पुरेशी भरली नाही आणि त्यामुळे बस रद्द करण्यात आली आहे.' आणि वरती आम्हालाच म्हणाला, 'त्या एजन्सीने तुम्हाला कसं काय सांगितलं नाही? आता तुम्ही शांतपणे घरी जा आणि आठ वाजता मुख्य ऑफिसमध्ये फोन करा. तेव्हा तिथे तुम्हाला पुढे काय करायचं ते कळेल.' आता मात्र आमचे चेहेरे पहाण्यासारखे झाले होते. पार जमिनीवर खाली पडले होते. आमचा नुसता हिरवा पोपट नाही तर चांगला सप्तरंगी पोपट झाला होता. उत्साहाचा भलामोठ्ठा फुगा फुटला. नुसती चिडचिड आणि संताप! आता थंडीचाही फारच त्रास वाटू लागला. आता काय.. बॅक टू पॅव्हिलियन असं म्हणत आणि यापुढे कुठेही असलो, तरी सहलीला जायच्या आदल्या दिवशी फोन करून खात्री करून घ्यायची असा धडा गिरवत शांतपणे घरी आलो. :(
'आता त्या कंपनीशी असं भांडू, तसं भांडू..' असं ठरवून चिडूनच फोन केला.. तर त्या बाईने सुरूवातीलाच अतिशय गोड आवाजात आपली चूक कबूल केली आणि तितक्याच गोड आवाजात आमचे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली. आणि तसं नको असेल तर दुसर्या टूरची ऑफर देऊन, आपण होऊनच त्या टूरमध्ये २० युरोची सवलत देण्याचेही कबूल करून टाकले आहे...
आता आम्ही निर्णय घेऊ..
--शाल्मली.
प्रतिक्रिया
7 May 2009 - 8:20 pm | स्वाती दिनेश
अरेरे.. दुसरी टूअर कधी आहे? लगेच असेल तर जाऊन या नक्की..बेस्ट लक!
स्वाती
7 May 2009 - 8:23 pm | यशोधरा
ह्म्म... :)
शाल्मली, तिला तू तिच्यासारखाच गोड आवाज काढून विचारायचं ना, की पैशांबरोबर गेलेला वेळ आणि उत्साहही परत देशील ना, असं! ;)
जा गं पुढच्या टूरला मस्त सवलत घेऊन!
7 May 2009 - 9:28 pm | प्रकाश घाटपांडे
आदुगर च बाईला कहांडवल्या( अपराध मिश्रित ओशाळणे) वानी झाल व्हत.
बाई लई हुषार आसन म्हनुन तर ईस युरो चे कन्सिशन सोताहुन दिल. पुन्यात असता तर तुमी निगायच्या आदुगर खात्री केली नाही म्हनुन तुमालाच झापल असत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 May 2009 - 8:25 pm | प्राजु
भलतंच काहीतरी!
जाते थे ट्युलिप गार्डन पहुंच गये घर.. समझ गये ना..! असंच काहीसं झालं तर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 May 2009 - 8:36 pm | परिकथेतील राजकुमार
अरे रे रे !
स्वतःची फजीतीपण अगदी मनमोकळी रंगवली आहे.
ह्यावरुन एक जोक आठवला.
संटा एकादा बंटाला घरी पार्टीला बोलावतो. बंटा तीथे पोचतो तर दाराला कुलुप आणी दारावर लिहिलेले असते "कसे फसवले.' बंटा पेन घेउन खाली लिहितो 'मी आलोच न्हवतो.'
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 9:30 pm | क्रान्ति
जे होतं ते चांगल्यासाठी असं समजा! पुढच्या टूरसाठी शुभेच्छा.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
7 May 2009 - 9:34 pm | रेवती
अगं पण बाकीच्या लोकांना कसं समजलं टूर रद्द झाल्याचं?
शी!! सगळ्या उत्साहावर पाणी फिरवलं त्या लोकांनी!!
रेवती
7 May 2009 - 9:38 pm | देवदत्त
ओह,
तरीच गुरूवारचा उल्लेख वाचता वाचता वाटले आज इतक्या लवकर परत कसे आले ? :(
असो,
पुढल्या सहलीकरीता शुभेच्छा.
7 May 2009 - 9:41 pm | चतुरंग
पुढची ट्रिप घ्या आणि आम्हाला वर्णनासह फोटू दाखवा! शुभेच्छा! :)
(खुद के साथ बातां : रंगा, 'ट्यूलिप सर्विस' देण्याऐवजी त्या बसकंपनीने फक्त 'लिपसर्विस' दिली की ! ;) )
चतुरंग
8 May 2009 - 12:05 am | बेसनलाडू
रंगाशेठशी वर्णन व फोटोंच्या बाबतीत सहमत.
(सहमत)बेसनलाडू
अवांतर - रंगाशेठ, अगदी लिप् सर्विस् वगैरे सुचतेय् ? सांभाळा हो! ;)
(खट्याळ)बेसनलाडू
8 May 2009 - 12:16 am | चतुरंग
मी उल्लेखलेली 'लिप सर्विस' बोलबच्चनगिरी ह्या अर्थी आहे.
तुझ्या मनात कदाचित वेगळीच लिप सर्विस आली असावी! ;)
हॅ हॅ हॅ कल्जी घेने! :D
चतुरंग
8 May 2009 - 12:21 am | बेसनलाडू
तुझ्या मनात कदाचित वेगळीच लिप सर्विस आली असावी!
हॅ हॅ हॅ कल्जी घेने!
:D =))
(काळजीपूर्वक)बेसनलाडू
7 May 2009 - 10:34 pm | संदीप चित्रे
ही ट्रीप जुळून येवो या शुभेच्छा :)
पुढच्या वेळी जाल तेव्हा दोन्ही वेळच्या फोटोंच्या कोटा पूर्ण करा.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
7 May 2009 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्या सहलीचे वर्णन आहे आणि फोटो कसे आहेत हे पाहण्यासाठी डोकावलो तर इथे वेगळीच गडबड झाली.
असो, प्रामाणिक अनुभवकथन आवडले, पुढील सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
8 May 2009 - 1:54 am | केशवसुमार
असं झाल तर..
जे काही होते ते भल्यासाठी होते.. पुढच्या सहली साठी शुभेच्छा..
(शुभेच्छुक)केशवसुमार
(स्वगतः आम्हा फ्रँकफुर्टच्या लोकांना सोडून सहलीला जाता काय...)
8 May 2009 - 3:15 pm | शाल्मली
तसं नाही हो..
तुम्ही या बरं फ्राफुची लोकं इकडे.. मस्त सहल ठरवूया.. :)
--शाल्मली.
8 May 2009 - 6:56 am | सहज
पुढची ट्रीप लवकर होउ दे व झकास वर्णन येउ दे.
शुभेच्छा!
8 May 2009 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते
पुसशु .... (पुढील सहलीसाठी शुभेच्छा म्हणतोय मी, चुकीचे अर्थ काढू नका. ;) )
बाकी आजपर्यंत जर्मनमिपाकरांच्या कृपेने सहलवर्णनं तर खूप वाचली, आज पोपटवर्णन पण वाचायला मिळालं. ;)
बिपिन कार्यकर्ते
9 May 2009 - 8:34 am | विसोबा खेचर
आता काय.. बॅक टू पॅव्हिलियन असं म्हणत आणि यापुढे कुठेही असलो, तरी सहलीला जायच्या आदल्या दिवशी फोन करून खात्री करून घ्यायची असा धडा गिरवत शांतपणे घरी आलो.
गुड! :)
11 May 2009 - 5:57 pm | शाल्मली
तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांमुळे काल अखेरीस ट्युलिप गार्डनमध्ये जाण्याचा योग आला!!
आमची सहल खूपच छान झाली.
आता लवकरच फोटो टाकते..
तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार!
--शाल्मली.