दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र यावर नुसते चरफडण्यापेक्षा या महान हुतात्म्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करुन द्यावा, व विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग लाभावा, त्यांना क्रांतिकारकांविषयी आदर निर्माण व्हावा, त्यांची माहिती करुन घ्यावीशी वाटावी यासाठी ’अर्थ’ ने एक अत्यंत कल्पक असा प्रकल्प राबविला.
पुणे येथील इतिहास संशोधक व क्रांतिप्रेमी श्री. प्रमोद मांडे यांचे सहकार्याने ’अर्थ’ ने ४८ क्रांतिकारकांची चित्रे असलेली एक पुस्तिका मुद्रीत केली व ठाण्यातील बहुतेक शाळांमधुन सुमारे १४,००० विद्यार्थ्यांना वाटली. प्रत्येक चित्राखाली एक रिकामी चौकट देण्यात आली होती आणि या चौकटीत त्या क्रांतिकारकाचे नाव लिहायची स्पर्धा ठेवली होती. आठ दिवसात ठाण्यातील सर्व शाळा अक्षरश: क्रांतिमय झाल्या. विद्यार्थी, शिक्षक व पालक या वेडाने झपाटले आणि संदर्भ ग्रंथ व आंतरजालावर कब्जा करीत अथक परिश्रम करून विद्यार्थी स्पर्धेत उतरले. एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रिय कार्यात सामिल करुन घेते व साडे नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
ठाणे येथील श्रीरंग विद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात अनेक क्रांतिकारकांची चित्रे/ तैलचित्रे तसेच अल्प परिचय प्रदर्शित करण्यात आले होते.या निमित्त्याने श्री. प्रमोद मांडे यांची व्याख्याने - दि. २ फ़ेब्रुवारी रोजी ’परिचित नसलेले शिवरायंचे रुप’ व ३ फेब्रुवारी रोजी ’क्रांतिकारकांच्या कथा आणि व्यथा’ आयोजित केली होती. दि. ३ रोजी व्याख्यना नंतर परितोषिक वितरण सोहळा झाला. या प्रसंगी प्रारंभी क्रांतिगीतांवर आधारित विद्यार्थ्यांच्या नृत्यनाटिका सादर केल्या गेल्या, ज्या प्रेक्षाकांची उस्फुर्त दाद मिळवुन गेल्या. आपल्या भाषणांत श्री. मांडे यांनी अनेक क्रांतिकारक व त्यांचे कार्य आणि त्यांची सातत्याने झालेली उपेक्षा याचा परामर्श घेतला व या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला क्रांतिकारकांची ओळख करुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मा. कावेरीताई पाटील मा. हिरवे सर उपस्थित होते. त्याचप्रमाणे ठाणे शहर उपमहापौर, आमदार विनोद तावडे व आमदार संजय केळकर व अनेक मान्यवर उपस्थित होते. झोंबर्या गार वार्यात उघड्या मैदानात असुन देखिल सुमारे ५०० हून अधिक ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोन्ही आमदारांनी या प्रसंगी अत्यंत नेटकी व औचित्यपूर्ण भाषणे केली ही देखिल एक उल्लेखनिय बाब म्हणावी लागेल.
या निमित्ताने श्री. मांडे यांचा परिचय झाला व त्यांच्याशी चार शब्द बोलण्याची संधी लाभली. माझे स्नेही संजय व माधवी नाईक यांचे या यशस्वीरित्या आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन व विशेष कौतुक. ’अर्थ’ प्रतिष्ठानतर्फे उत्तरोत्तर असेच दर्जेदार व उपयुक्त कार्यक्रम आयोजित होत राहोत या सदिच्छा.
प्रतिक्रिया
4 Feb 2008 - 4:42 am | llपुण्याचे पेशवेll
या क्रांतीकारकांच्या पदरी आलेली उपेक्षा तर व्यथित करून सोडते. सतत परदेशी राहून क्रांतीकार्य करणारे खानकोजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणून भारतात परत आले तेव्हा बोटीतून उतरल्यावर प्रथम त्याना पोलीसानी अटक केली. कारण ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बजावलेले अटक वॉरंट भारत स्वतंत्र झाल्यावरही जारी होते. काय म्हणावे या उपेक्षेला?
उपरोल्लेखीत उपक्रम वाचून धन्य वाटले.
क्रांतीकारी
डॅनी.
पुण्याचे पेशवे
4 Feb 2008 - 6:54 am | सहज
अर्थ फाउंडेशन चे आभार व ही सुंदर बातमी इथे दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद!!
4 Feb 2008 - 6:58 am | विसोबा खेचर
एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रिय कार्यात सामिल करुन घेते व साडे नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
नक्कीच! एक ठाणेकर म्हणून मलाही ही गोष्ट अभिमानास्पद वाटते!
वा साक्षिदेवा, सुंदर माहिती पुरवलीस..!
आपला,
(भगतसिंगप्रेमी) तात्या.
4 Feb 2008 - 1:04 pm | मनिष
हीच माहिती जर एखाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली तर फारच चांगले.
4 Feb 2008 - 7:03 pm | स्वाती दिनेश
स्तुत्त्य उपक्रम ! सहजरावांशी सहमत.
स्वाती
4 Feb 2008 - 11:33 pm | ऋषिकेश
नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
निश्चितच!! ही घटना इथे शब्दबद्ध केल्याबद्दल आभार. आणि ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल "अर्थ"चे हार्दिक अभिनंदन!
-ऋषिकेश
5 Feb 2008 - 12:17 am | प्राजु
चांगला आहे उपक्रम.
अर्थ फाऊंडेशनचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
धन्यवाद या बातमी बद्दल.
- प्राजु