प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन..
नमस्कार मंडळी,
सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत)
असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता. प्राजक्ता-शिक्षिका आणि बाकी सगळे विद्यार्थी!!! मग मी सगळ्यांना धडे शिकवायचे. पहिला धडा.. दुसरा धडा. आजूबाजूच्या बाया-बापड्या आईला म्हणायच्या ''प्राजक्ता नक्की शिक्षिका किंवा वकिल होणार.." (त्यांना काय माहिती मी रेडीओवर तोंडसुख घेणार आहे मोठेपणी ते!!!!). तसंही आमच्या घरी केवळ वकिलच जन्माला आले होते आज पर्यंत. म्हणजे माझे पणजोबा भालचंद्र गोखले.. उत्तम वकील, माझे आजोबा रामचंद्र गोखले ते ही वकिल ... पणजोबांचे वडिलही त्या काळात दरबरात वकिल होते म्हणे. माझ्या बाबांनी मात्र यामध्ये मोडता घातला आणि गोखल्यांच्या घराण्याला कलंक लावला असं आजोबा म्हणत. म्हणजे बाबांनी बीएस्सी नंतर लॉ लाच प्रवेश घेतला होता.. पण अचानक मुंबईला फिरायला म्हणून काय गेले आणि परत आले ते वीजेटीआयला टेक्टाईल इंजिनियरिंगला ऍडमिशन घेऊनच. त्यामुळे बाबांनी ही वकिलांची प्रथा खंडीत केली. मी त्यांच्यापुढे एक पाऊल.. असो..!!!! तर मूळ विषय असा की, सगळे म्हणत की मी वकिल किंवा शिक्षिका होणार. कारण मी खेळताना जे काही बोलायचे ते इतकं स्पष्ट आणि नीटनेटकं ... की बस्स!! म्हणजे माझ्या आणि माझ्या आईच्या तोंडावर तरी असंच म्हणायचे सगळे.
तिसरीत असताना.. शाळेत एकदा सहज नोटिस फिरली वक्तृत्व स्पर्धेची. आमच्या केतकर बाईंनी ती नोटी फळ्यावर लिहिली आणि वहीत लिहून घ्या ..अशी आज्ञा केली. ती लिहून घेतलेली नोटीस घरी पालकांना दाखवा असेही बजावून सांगितले. मी ती नोटीस लिहून घेतली. घरी आल्यावर माझी सगळी महत्वाची कामं उरकून.. म्हणजे बाहेर खेळणे, बरोबरीच्या मुलांना तंबी देणे, त्यांच्याशी भांडणे.. ही सगळी कामं आटोपून मी घरचा अभ्यास सारख्या फालतू कामासाठी बसले. पूर्ण पणे विसरून गेले की नोटीस आईला दाखवायची आहे. सकाळी उठून शाळेत पुन्हा दाखल. शाळेत बाईंनी सगळ्यांना विचारलं "घरी नोटीस दाखवली का? कोण घेणार आहे वक्तृत्व स्पर्धेत भाग??". लक्षात आलं अरे!! आपण दाखवलंच नाही आईला. बाकी आजूबाजूच्या मुलींमध्ये १-२ जणींनी नावे दिली. मी त्यांना विचारले "भाषण तयार आहे का? आणि कोणत्या विषयावर बोलणार आहात?? " कारण ३ विषय होते १. माझा आवडता सण २. माझा आवडता नेता ३. माझा भारत देश.. मी ठरवले आपणही नाव द्यायचे. मी नाव दिलं. माझी मैत्रिण नंदा म्हणाली ," भाषण आहे का तयार तुझं?? बाईंना द्यायचं आहे वाचायला मधल्या सुट्टीनंतर." झालं!!! आता भाषण कुठून आणणार?? वास्तविक मी त्यादिवशी घरी जाऊन ती नोटीस दाखवून.. भाषण लिहून आणलं असतं तरी चालणार होतं. २ दिवस होते नावं देण्यासाठी. पण मला तितका पेशन्स नको का? मी नाव दिलं... म्हंटलं जेवणाच्या सुट्टीनंतर खेळायला जायचं नाही भाषण लिहून काढू. ठरवल्याप्रमाणे (हो!! ठरव्ल्याप्रमाणेच्....!!गुणी बाळ होते मी :)) मी लिहायला बसले. माझा आवडता सण- रंगपंचमी. काय भाषण लिहिलं आठवत नाही.. पण चांगलं वहिची २ पानं भरून खरडलं होतं. मधल्यासुट्टीनंतर बाईंनी सांगितले ,"कोणी कोणी भाषणं लिहून आणली आहेत.. आणा इकडं.." माझ्या त्या मैत्रीणींच्या नाकावर टिच्चून मी माझी वही घेऊन गेले दाखवायला. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर कौतुक मिश्रीत कुतुहलाचे भाव पहायला मी अजिबात विसरले नाही. (सवयच पहिल्यापासून..!!) ;) बाईंनी विचारलं.. "आईने सांगितलं की तू आपापलं लिहिलं?" काही चुकलं की काय या विचारानं मला थोडं ओशाळल्यासारखं झालं. (हसू नका.. !! मीही कधी कधी ओशाळते.) बाई म्हणाल्या ,"चांगलं आहे... घरी आईकडून आणखी थोडं व्यवस्थित करून घे." आपलं चुकलं नहीये या विचारानं .. मस्त वाटलं एकदम.
आता मात्र घरी आल्या आल्या आठवणीने आईला दाखवलं.. आधी ती नोटीस.. आणि मग माझं भाषण. आईने वाचलं.. आणि म्हणाली ,"छान लिहिलं आहेस.एक-दोन सुधारणा करूया. " आईने पुन्हा नीट लिहून दिलं भाषण. ते पाठ केलं. आरशापुढे उभं राहून हात-वारे करत बोलण्याचा सराव केला. हे चालू असताना.. कंटाळा आला की, आई पुस्तक वाचायला बसवायची. पं. नेहरूंच्या गोष्टींचं एक पुस्तक तेव्हा मी वाचायची. .. की पुन्हा भाषण.. मग कुठेतरी बाहेर खेळायला जाणे. मग घरी कोणी आलं की, त्यांना माझं भाषण म्हणून दाखवणे ... या गोष्टी चालू होत्या. अखेर स्पर्धेचा दिवस आला. एकून २०-२२ मुलांनी भाग घेतला होता. माझा ९ वा नंबर होता. शाळेच्याच एका रिकाम्या वर्गात स्पर्धा चालू होती. सगळे स्पर्धकच श्रोते होते.. :( माझ्या आधीच्या ८ स्पर्धकांपैकी ६ जणांनी माझा आवडता सण आणि उरलेल्या दोघांनी माझा भारत देश यावरच भाषण केलं होतं. माझं नाव पुकारलं ..मी पुढे जाऊन उभी राहिले . परिक्षक असलेल्या बाईंनी विचारलं ,"कोणत्या विषयावर बोलणार आहेस?" काय डोक्यात आलं कोणास ठाऊक पण मी बोलून गेले, " माझा आवडता नेता." भाषण पाठ केलं होतं "माझा आवडता सण"... सरावही केला होता त्या आरशापुढे उभं राहून. आणि आता एकदम नेता.....!!! पण.. मी हाडाची शिक्षिका..(खेळातली का होईना..) होते ना मी. आईने वाचायला लावलेल्या पं. नेहरूंच्या कथांमधल्या दोन कथा.. उभ्या उभ्या सांगून टाकल्या.. आणि त्याला पुस्ती जोडली.. "असे हे पं. जवाहरलाल नेहरू.. त्यांना लहान मुले खूप आवडत म्हणून सगळे त्यांना चाचा नेहरू म्हणत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.. जय हिंद!!!".. जागेवर येऊन बसले.. आणि इकडे तिकडे पाहिलं. सगळी मुलं आणि इतर शिक्षक माझ्याकडेच बघत होते. ते मला हसताहेत असंच वाटू लागलं. उगाच रडू येऊ लागलं.... सरळ उठून पाणी पिऊन येते असं सांगून बाहेर आले आणि वर्गात गेले. निकाल ऐकण्याची इच्छाही नव्हती. मधल्या सुट्टीपर्यंत गप्प गप्पच होते. कोणाशी विशेष बोलले नाही. मधल्या सुट्टीत जेवणानंतर दगड माती खेळत असताना.. स्पर्धेबद्दल पार विसरून गेले होते. शाळा सुटल्यावर.. रिक्षापर्यंत जाताना ड तुकडीतली एक मुलगी मला म्हणाली ," ए, तूच प्राजक्ता गोखले ना?" मी म्हणाले ,"हो". ती म्हणाली "तुझा दुसरा नंबर आला आहे स्पर्धेत". अतिशय कुसक्या म्हणजे तुसड्या स्वरात "हल्ल्ल" असं म्हणत मी आमच्या रिक्षात जाऊन बसले. तिथे रिक्षात तिसरीतच मात्र ब तुकडीत असलेली स्नेहा मला म्हणाली.."तुझा दुसरा नंबर आला ना? आमच्या बाई होत्या ना परिक्षक म्हणून त्यांनी सांगितलं वर्गात आमच्या." मला नक्की काय बोलावं समज्त नव्हतं..." हो का?? हो... आला दुसरा नंबर.. " असं काहिसं बरळंत.. ट्रान्स मध्ये गेल्यासारख्या आवस्थेतच मी घरी आले. आईला घट्ट मिठी मारून माझा नंबर आल्याचं सांगितलं. आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वगैरे काही नाही आले.. पण आनंद नक्कीच झाला होता. त्यातही तयारी एका विषयाची आणि भाषण दुसर्याच विषयावर केलं हे जेव्हा सगळ्या शाळेत समजलं तेव्हा तर कौतुकच कौतुक..!
दुसरं भाषण केलं ते प्राथमिक शाळेच्या निरोप समारंभावेळी. म्हणजे चौथीत असताना. तेव्हाही असंच. मैत्रीणींच्या वह्यांमध्ये बघून .. इकडच्या २ ओळी... तिकडच्या २ ओळी असं करत निरोप समारंभाचं माझं भाषण तयार केलं. आईने व्यवस्थित ते कचर्यात टाकलं. म्हणाली,"असं इकडचं तिकडचं बघून नाही लिहायचं काही.. आपापलं भाषण लिही.. नाहीतर मि लिहून देते." आइने निरोप समारंभासाठी भाषण लिहून दिलं.. गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू.. या श्लोकाने सुरूवात होते इतकंच आता आठवतं आहे. भाषण झाल्यावर मात्र तेव्हा खरंच कौतुक करत होते सगळे जण. आमच्या बाईंनी आईला घरी फोन करून माझं कौतुक केलं होतं.
तर अशी ही माझ्या वक्तृत्वाची झूल अंगावर बाळगतच मी हाय्स्कूल ला प्रवेश घेतला. माझ्या १-४ थी पर्यंतच्या अनेक मैत्रीणी माझ्यासोबत होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत माझ्या वक्तृत्वाचं कौतुकही आलं होतं माध्यमिक शाळेत. अशीच एकदा नोटिस फिरली.. वक्तृत्व स्पर्धेची. खुला गट होता.. म्हणजे ५ वी ते १० वी. आणि अनेक गंभिर विषयांपैकी मी एक निवडला. आईने भाषण लिहून दिलं. १० मिनिटाचं होतं भाषण. एका मोठ्या आखिव तावाची पाठपोट पाने भरून आणि दुसर्या मोठ्या आखिव तावाचे एक पान पाठपोट... इतकं जम्बो भाषण मी पाठ केलं.... स्पर्धेच्या ठिकाणी गेले तेव्हा खुल्या गटात मी एकटीच १० वर्षाची होते. बाकी सगळे ८ वीच्या पुढचे स्पर्धक. तिथे अर्धं अवसान गळून पडलं.. इतक्या मोठ्यांसमोर माझा काय टिकाव लागणार?? माझं नाव पुकारल्यावर जाऊन भाषण केलं.. एकदाच अडखळले.. पण पूर्ण केलं भाषण. माझं भाषण झाल्या झाल्या.. आमच्या शाळेतून माझ्यासोबत आलेल्या शिक्षकांकडे भुणभुण सुरू केली.."चला जाऊया".. बराच वेळ मला थोपवून धरत शेवटी त्यांनी हार पत्करली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. सर म्हणाले ,"तुला सोडून मी परत येतो इकडे.." त्यांनी मला सोडलं आणि ते परत गेले स्पर्धेच्या ठिकाणी. संध्याकाळ पर्यंत मी माझे कसले कसले क्लास करून त्या स्पर्धेबद्दल विसरूनही गेले होते. संध्याकाळी ७च्या सुमारास सरांचा फोन आला. मीच घेतला... सर म्हणाले,"तुझा पहिला नंबर आला आहे..".................... तो क्षण मला आभाळ ठेंगणं झालं होतं. दहावीच्या स्पर्धकांमध्ये माझ्यासारखीचा पहिला नंबर!!!!!!!!!!!!!!! खूप खूप आनंद झाला होता. आईला तर माझ्यापेक्षा जास्ती आनंद झाला होता.. कारण
माझं वय होतं १० आणि माझ्या भाषणाचा विषय मात्र एकदम गंभिर होता... एकदम ज्वलंत..! ज्या विषयावर मी भाषण केलं होतं...त्या विषयाचा मला अजून नीटसा अर्थही माहिती नव्हता.... विषय होता.. "हुंडाबळी एक सामाजिक समस्या..!!"
यानंतर मात्र वक्तृत्व , कथाकथन, नाटक, नाट्यवाचन स्पर्धा खूप खूप गाजविल्या हा भाग वेगळा. पण या तीन स्पर्धा मात्र नेहमी लक्षात राहिल्या आणि राहतील.
- प्राजु
प्रतिक्रिया
25 Mar 2009 - 11:55 pm | संदीप चित्रे
आठवले प्राजु...
वक्तृत्व, नाट्य, नाट्यवाचन, क्रिकेट आणि टेबल टेनिस सगळ्यांमुळे शाळेचे दिवस सुखी झाले होते :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
26 Mar 2009 - 12:05 am | रेवती
ए, छान लिहिलयस.:)
सभाधीटपणा आधीपासूनच आहे तुझ्यात.
ऐनवेळी भाषणाचा विषय बदलला तर मोठे लोकही गडबडून जात असतील.
इथे तर तुझा तूच विषय बदललास व भाषणही छान केलेस त्याचे कौतुक वाटले.
मला नाही बुवा असं काही जमलं.
रेवती
26 Mar 2009 - 12:15 am | शितल
प्राजु अजुन एक फार मोठा किस्सा विसरली आहेस, तो ही सांग.
मिपाकर हसुन हसुन फुटतील. ;)
लेख मस्तच. :)
26 Mar 2009 - 12:33 am | प्राजु
चूप!! अळीमिळी गुपचिळी... :$
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 3:50 pm | घाशीराम कोतवाल १.२
काय आहे ती अळीमिळी गुपचिळी
सांगा ना आम्हाला पण हा ;) :?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
26 Mar 2009 - 12:20 am | शितल
आमच्या वर्गात एका मुलाने छ. शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केले होते, आणी बोलता बोलता तो छ.शिवाजी महारांजाच्या आईचे नाव "जिजाबाई" आहे हे बोलायचा सोडुन "जनाबाई" म्हणाला होता.
26 Mar 2009 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते
ओ प्राजुतै... मस्त लिहिलंय हो.
अवांतर: परत शाळेत जावंसं वाटायला लागलंय. आता आपण सगळे मिळून एक शाळा सुरू करू. खर्या शाळेत काही कोणी घेणार नाही आपल्याला. ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 12:35 am | चतुरंग
सगळे मिळून शाळा सुरु करुयात!
'मिसळपाव माध्यमिक आणि हुच्चमाध्यमिक विद्यालय' :D
माझा एक मामा त्याच्या दोन मुलांपैकी एका व्रात्य मुलाला शाळेतून आल्यावर रोज विचारायचा 'काय रे झाली का शाळा!' (ह्यातला श्लेष जाणत्यांच्या लक्षात यावा! ;) )
चतुरंग
26 Mar 2009 - 9:17 am | विनायक पाचलग
आधुनिक शाळेची लेटेस्ट अपडेट माझ्याकडुन मोफत
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
26 Mar 2009 - 1:55 pm | llपुण्याचे पेशवेll
+१ हेच म्हणतो. शाळा काढा.
(आणि आमच्यासारख्यांसाठी हुच्चप्राथमिक शाळा काढा, सामान्य लोकांच्या प्राथमिक शाळेत आम्ही जात नाही)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
26 Mar 2009 - 12:58 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! :-)
26 Mar 2009 - 8:48 am | शिप्रा
एकदम सहमत..:)
26 Mar 2009 - 3:54 pm | घाशीराम कोतवाल १.२
पण काय ओ बिपिन दा आपल्या शाळेचा
युनिफार्म कोणत्या रंगाचा कसा असेल
अवांतर घाश्या या शाळेत सर्व विद्यार्थी हुशार असणार बरं सर्व लेखक मंडळी आहेत
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
26 Mar 2009 - 12:30 am | चतुरंग
लहानपणातल्या आठवणींचा खजिना आवडला! आयत्या वेळी भाषणाचा विषय बदलण्याची वकिली चलाखी सुद्धा आवडली! :)
(किंचित अवांतर - वक्तृत्वात तुझा नंबर पहिला असणार ह्याबद्दल माझी खात्री कट्ट्याच्यावेळीच पटली होती, मला खरी काळजी वाटते ती जगदीशची!! (ह.घे. बयो.);))
चतुरंग
26 Mar 2009 - 7:15 pm | संदीप चित्रे
वक्तृत्व 'ऐकायला' हक्काचा श्रोता मिळाला म्हणून प्राजु खूष आणि......
देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत, एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून द्यायला, म्हणून जगदीश खूष ;)
26 Mar 2009 - 9:44 pm | चतुरंग
कायम सुखी असण्याचं रहस्य समजलं रे संदीप!! ;)
चतुरंग
26 Mar 2009 - 12:31 am | चकली
मस्त लिहिलाय किस्सा .. शाळेच्या दिवसांची आठवण झाली.
चकली
http://chakali.blogspot.com
26 Mar 2009 - 12:34 am | शाल्मली
प्राजु,
किस्से मस्तच!
भाषणाचा विषय तूच बदलल्यामुळे तुझ्यासाठी तर ती उत्स्फूर्त पाठांतर स्पर्धाच झाली असेल ना!
मी पण शाळेत असताना अशा स्पर्धांमधे असायचे.. पण मला भाषण स्पर्धेपेक्षा संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा जास्त आवडायच्या.
--शाल्मली.
26 Mar 2009 - 12:41 am | धनंजय
दहाव्या वर्षी "हुंडाबळी समस्ये"वर भाषण - भीषण प्रकार...
मस्तच.
26 Mar 2009 - 2:19 am | चित्रा
एकदम हुंडाबळी? !
छान लिहीले आहे. आठवणी आवडल्या.
26 Mar 2009 - 12:13 pm | स्वाती दिनेश
एकदम हुंडाबळी? !
छान लिहीले आहे. आठवणी आवडल्या.
चित्रासारखेच म्हणते,
प्राजु.. शाळेतल्या आठवणींनी खूप मागे नेलस ग बायो सकाळी सकाळी...
स्वाती
26 Mar 2009 - 1:02 am | योगी९००
प्राजू,
आता कोल्हापुरला परत जा...छ. संभाजी रा़जांना निवडणूक प्रसारासाठी कोणीतरी हवेच आहे. एकदा सुरुवात कर..पुर्ण महाराष्ट्रात तुला आमंत्रणे येतील.
आमच्या शाळेत असेच दोन किस्से झाले होते.
१) वक्तृत्व स्पर्धेत छ. शिवरायाचे गुरू म्हणून एकाने दादोजी कोंडदेव ऐवजी दादा कोंडके सांगितले होते.
२) एकाने वर्गात पहिल्या महायुद्धाची कारणे यामध्ये ऑस्ट्रीयाचा युवराज आर्च् ड्युक फर्डिनांड याऐवजी फर्नांडिस असे सांगितले होते. (त्याच्या दुर्दैवाने इतिहासाच्या शिक्षिकेचे आडनाव पण फर्नांडिस होते. बाई त्याला खुप बोलल्या होत्या. त्यांना वाटले की त्याने मुद्दाम सांगितले.)
खादाडमाऊ
26 Mar 2009 - 1:15 am | चतुरंग
आर्च ड्यूक फर्नांडिस!! जबरा!!! =)) =)) =))
लई बोलणी पडली असणार!!!
चतुरंग
26 Mar 2009 - 1:17 am | बिपिन कार्यकर्ते
त्याला नंतर कधी ड्यूकचा सोडा बघितला असेल तरी धडकी भरत असेल!!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 1:25 am | श्रावण मोडक
फर्डिनांडचा फर्नांडिस होण्याची एक 'स्थिती' ध्यानी घेतली तर ड्यूकच्या सोड्याची भीती वाटण्याची शक्यता कमी... तो हवासा वाटत असावा. :)
26 Mar 2009 - 2:06 am | योगी९००
फर्डिनांडचा फर्नांडिस होण्याची एक 'स्थिती' ध्यानी घेतली तर ड्यूकच्या सोड्याची भीती वाटण्याची शक्यता कमी... तो हवासा वाटत असावा.
झकास...
खादाडमाऊ
26 Mar 2009 - 1:58 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या दादाने, चिंचवडला कोणाची समाधी आहे? याचे उत्तर 'मोरया गोसावी' ऐवजी 'राजा गोसावी' असे दिले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
26 Mar 2009 - 2:47 pm | आनंदयात्री
फु ट लो !!!
=)) =)) =)) =))
राजा गोसावी !! !!
(मला एकदम लाखाची गोष्ट मधला खांद्यावर टाईपराईटर घेउन चालणारा राजा गोसावी समोर आला )
बाकी प्राजुताईने एक नंबर किस्सा सांगितला आहे :)
26 Mar 2009 - 6:55 pm | लिखाळ
हा हा .. राजा गोसावी लै भारी :)
प्राजु,
लेख आणि डर्विनचा किस्सा मस्त :) मजा आली.
-- लिखाळ.
26 Mar 2009 - 1:07 am | अजय भागवत
लेख आवडला.
26 Mar 2009 - 1:16 am | चंद्रशेखर महामुनी
शाळेतले दिवस आठवले... प्राजु....
26 Mar 2009 - 1:23 am | प्राजु
माझाच किस्सा हा.. शितलने वरती ज्या किस्स्याचा उल्लेख केला तोच हा.
पाचवीत असतानाचाच हा किस्सा. स्पर्धेला विषय होता "माझा आवडता शास्त्रज्ञ.."
आईने भाषण लिहून दिलं. मी झोक्कात पाठ केलं. माझा आवडता शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन....
डार्विनच्या उत्क्रांतीवादावर भाषण लिहिलं. माकडापासून माणूस बनला....
खूप छान भाषण ठोकलं मी. पहिला नंबर आला. खूप खुश होते. दोन दिवसांनी बक्षिस समारंभ होता. तिथे जाऊन बक्षिस घेऊन आले.
नंतर घरी आल्यावर.. विचार करत बसले होते. बाबा म्हणाले ,"काय गं?? कसला विचार करती आहेस??"
मी म्हणाले... "बाबा.... डार्विननं जेव्हा हा शोध लावला ना.. माकडापासून माणूस बनला..असा... त्यावेळी तो माणूस होता का माकड होता?"
...................................................
बाबा मटकन खाली बसले. मग एकदम फुटल्यासारखे हसायला लागले. म्हणाले, "काल बक्षिस समारंभाच्या ठिकाणी हे नाही विचारलंस ते बरं केलंस.. नाही तर बक्षिस दिलं नसतं तुला..."
मी मात्र पुन्हा तोच विचार करत बसले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 1:27 am | चतुरंग
आपल्या सिद्धांताचं असलं विडंबन पाहून खुद्द डार्विनने सुद्धा हाय खाल्ली असती शेवटपर्यंत !! =)) =)) =)) =))
चतुरंग
27 Mar 2009 - 7:30 pm | टारझन
आग्गाय्यायाअ ... लेख वाचताना डार्विण शोधत होतो .. आणि सापडला .. बेकार यार .. हा असला विचार तर आमच्या डोकेरुपी खुराड्यात पण आला नव्हता =)) =))
प्राजू _/\_
26 Mar 2009 - 1:28 am | बिपिन कार्यकर्ते
हे वाचून माझं माकड झालंय!!!
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 1:33 am | शितल
मला तिने हा किस्सा सांगितल्यावर मी ही १० मि. खुप हसत होते.
परत एकदा हा किस्सा वाचुन खुप हसु आले. =))
26 Mar 2009 - 1:35 am | मुक्तसुनीत
हा किस्सा मिपावर लिहिताना ... प्राजुताई मनाने माणसांमधेच होत्या ना ? ...का आपल्या पूर्वजांसमवेत ? ;-)
जगदीश्वरा, आता तुलाच रे बाबा काळजी ! का तुझीच काळजी करायची वेळ आली आहे ! ;-)
26 Mar 2009 - 1:42 am | बिपिन कार्यकर्ते
=))
जगदीश्वराची काळजी करू नका... ते ऑलरेडी शॉक मधे असतील... काही जाणवण्याच्या पलिकडे असतील ते... ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्राजु, तू एक लंबर महान आहेस याबद्दल आता मला काहीही शंका नाही. आणि वरचे प्रतिसादकर्तेतर ... जाऊ देत ... =)) =)) = ))
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
26 Mar 2009 - 6:59 pm | प्राजु
चतुरंग, बिपिनदा, शितल, आदिती... आणि श्रावणमोडक साहेब..
जे जे मला इथे जोरात हसले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या स्वप्नांत डार्विन येणार आहे हा प्राजक्ता देवींचा शाप आहे.... ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते
हरकत नाही. पण तो डार्विन माणूस झाल्यानंतरचा असेल की माकडावस्थेतलाच असेल? ;)
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2009 - 10:33 pm | श्रावण मोडक
मी कुठं जोरात हसलोय? उलट मला हसता येत नव्हतं त्यावेळी.
पण तुझे शब्द खरे ठरोत. काल-परवाच 'ओरिजिन ऑफ स्पेशीज' वाचायला घेतलंय. अशात डार्विनबाबा (स्वप्नात का होईना) भेटला तर मस्तच. त्याच्याशी चर्चा करता येईल.
पण डार्विनचा माकड करणाऱ्या त्या प्राजुचा इनोसन्स मस्त. आवडला. डोळ्यापुढं एक चिमुरडी आपल्या वडिलांसमोर उभी राहून विचारतेय आणि नंतर तिचे वडील हस-हस हसतात असे चित्र आले डोळ्यासमोर.
साहेब? या शिवीबद्दल हिला काय शिक्षा द्यावी बरं? :?
26 Mar 2009 - 1:49 am | श्रावण मोडक
वेळ अशी आहे की, हसता येत नाहीये. कुणाला हा किस्सा सांगताही येत नाहीये. उद्या मात्र पहिलं काम हे करणार. आत्ता तोंडातल्यातोंडात खुसखसून बोलती बंद झालेली आहे.
_/\_!!!
26 Mar 2009 - 1:52 am | विसोबा खेचर
लहानपणातल्या आठवणींचा खजिना आवडला! आयत्या वेळी भाषणाचा विषय बदलण्याची वकिली चलाखी सुद्धा आवडली!
रंगाशी सहमत!
आमचा जग्गूभैय्या मात्र बिचारा भला माणूस हो! :)
असो..
प्राजू, जियो! मस्त लिवलं आहेस... और भी आनेदो..
तात्या.
26 Mar 2009 - 6:27 am | मीनल
तू छान बोलते, लिहितेस. पण एवढच नाही.
दुस-यांनाही उत्तेजन देतेस. छान नसतानाही त्यांच्या लेखनाच कौतुक करतेस. माझा तसा अनुभव आहे.
आणि दुस-यांन कडून तुझ्या लेखनावर टिका झाल्यावर ते निटपणे ऐकून घेतेस. कधी कधी मान्य ही करतेस. सुधारणा करतेस.
सतत नविन शिकून स्वत:ची प्रगती करण्याच्या तयारीत असतेस.प्रयत्नात असतेस.
आजवर झालेल्या कौतुकाचा कैफ अजून तरी कधी जाणवला नाही. अशीच रहा विद्यार्थी दशेत.खूप खूप मोठी होशील.
शुभेच्छा.
मीनल.
26 Mar 2009 - 7:18 am | सहज
एकदम सहमत
बाय द वे अशीच रहा विद्यार्थी दशेत.खूप खूप मोठी होशील याचा अर्थ अजुनही असे हुच्च किस्से /हशा होतील का? ;-)
26 Mar 2009 - 7:36 am | प्राजु
मीनल हा तुझा मोठेपणा आहे.
खूप खूप धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिनलच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2009 - 9:16 am | प्रमोद देव
मस्त किस्से आहेत तुझे. तू जात्याच फर्डी वक्ती(फर्डा वक्ताचे स्त्रीलिंगी रूप... ;) ) आहेस हे तुला एकदाच भेटलो होतो तेव्हाच लक्षात आले होते. :)
डार्विनचा किस्सा तर जबरी आहे. =))
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
26 Mar 2009 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच लिहिलयस ग प्राजुतै ! एकदम भन्नाट.
आमची प्रगती शाळेत भाषण म्हणणार्या मुलांना पहिल्या रांगेतुन वेडेवाकडे चेहरे करुन दाखवणे ह्यापुढे झालीच नाही ;)
बाकी ते "हल्ल्ल" भारी बर का.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
26 Mar 2009 - 10:54 pm | निखिल देशपांडे
अरे परा आपण एकाच माळेतले दिसतो........
आमची प्रगती शाळेत भाषण म्हणणार्या मुलांना पहिल्या रांगेतुन वेडेवाकडे चेहरे करुन दाखवणे ह्यापुढे झालीच नाही
आमची पण नाही झाली.... बाकी प्राजु तै शाळेतल्या आठवणी उभ्या राहील्या डोळ्यासमोर.......
डार्विन चा किस्सा ऐकुन खुस हसलो
26 Mar 2009 - 10:56 pm | प्राजु
तुमच्याहि स्वप्नांत डार्विन येणार आहे.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी
कल्ला लिवलय, आवाडलं आमास्नी !
आमच्या न्हानपनी आमची आय म्हनायची हे पोरगं मोटं जालं की लोकलमदी चिवडा इकणार.
आमी आजकाल तेच काम करतोय, इकायचं. पदार्थ फकस्त बदललाय.... आजकाल DGPS इकतो.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
26 Mar 2009 - 1:54 pm | जागु
गुण्णाची ग माझी बाय ! :)
26 Mar 2009 - 2:37 pm | जयवी
कशी गुणाची पोर गं.... :)
प्राजु......मस्त लिहिलं आहेस. इतक्या सगळ्यातला तुझा वावर..... अशीच खूप खूप मोठी हो :)
तुला सांगू....... तुझं लहानपण ऐकून........मला माझंच लहानपण वाचतेय असं वाटलं ;) वक्तॄत्व, नाटक, गाणं, निवेदन, रेडीयो..... अगदी सेम टू सेम :)
26 Mar 2009 - 4:38 pm | सुधीर कांदळकर
पूर्वजांचा मोर्चा घेऊन काळे झेंडे घेऊन येतोय. तेव्हा सावध.
झकास. लेख आणि प्रतिसादहि. मजा आली.
सुधीर कांदळकर.
26 Mar 2009 - 6:54 pm | प्राजु
आणि माझ्या वक्तृत्वाच। कथन.. ज्यांना आवडलं आणि ज्यांना नाही आवडलं.. अशा सर्वांचीच मनापासून आभारी आहे.
धन्यवाद.
आवांतर : माझ्या त्या डार्विन च्या किस्स्यानंतर कधी कधी बाबा मला मजेत किंवा प्रेमाने म्हणू आपण.. आजही "अहो.. डार्विन!!!!" अशी हाक मारतात. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 8:12 pm | क्रान्ति
नाक उडवून हल्ल बोलणारी प्राजू डोळ्यांपुढे आली [तिला न पहाताच!]
आज किती हसायच आहे? बाकी लेख खूपच सुन्दर! अगदी माझ्या वक्तृत्वस्पर्धा आठवल्या.
माझी पण कधी कधी विच्छा होते अस काही लिहायची, पण तेवढा पेशंस कुठे आहे? आणि किती वेळ टंकाव लागेल!
त्यापेक्षा सगळ्यांचे लेख वाचावेत सुन्दर सुन्दर आणि प्रतिसाद तर त्याहून सुन्दर!
डार्विन तर भन्नाटच! बिच्चारा!
अवांतर :-बिपिनदाच्या शाळेत मी पण येणार!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
27 Mar 2009 - 2:33 am | टिउ
लिहिलं पण भारी आहे! :)
मी दुसरीत की तिसरीत असतांना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय आधीच दिले होते, त्यामुळे काय लिहायचं आहे ते ठाउक होतं. सगळा निबंध लिहुन संपवला आणी मग लक्षात आलं की २ वाक्य लिहायची विसरलोय. खरं तर ते २ वाक्य लिहिले नसते तरी काही फरक पडला नसता. पण नाही. आम्ही खुपच हुषार असल्यामुळे आयडिया चालवली.
निबंधाच्या शेवटी लिहिलं:
2nd line: ---------------
24th line: --------------
त्याच स्पर्धेतला अजुन एक किस्सा. माझा एक वर्गमित्र निबंध लिहित असतांना त्याच्या पेन्सिलीचं टोक तुटलं. आता हा मुलखाचा लाजाळु असल्यामुळे कुणाकडे शार्पनर पण मागितलं नाही. तसंच तुटलेलं टोक घेउन निबंध पुर्ण केला. त्यामुळे अर्धा निबंध चांगल्या सुवाच्य अक्षरात आणि बाकी दुसराच कुणीतरी लिहिल्यासारखा.
आमच्या दोघांचे निबंध नोटिस बोर्ड वर लावले होते नंतर काही दिवस...
27 Mar 2009 - 2:35 am | प्रमेय
माझ्यापण हे सगळे वाचून शाळेतल्या आठवणी जागा झाल्या...
शाळेत मी फक्त निबंध स्पर्धेत भाग घ्यायचो आणि एकदा सरांनी मुद्दाम वक्तृत्वाला नाव दिले होते.
फाटली होती पण मज्जा पण आली होती.
नंतर मी स्वतः नाव द्यायला लागलो.
वर्गात बोलतांना ऍनवेळी विषय बदलल्याची आठवण झाली.