राम राम मंडळी,
आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत!
मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही. त्यांच्या ब्लॉगातील त्यांनी मांडलेले विचार कुणाला पटतील, कुणाला पटणार नाहीत, हेही ओघानेच आले.
परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या ब्लॉगविषयी अगदी आवर्जून लिहाविशी वाटते ती अशी की त्यांनी त्यांच्या ब्लॉगची केलेली सजावट अत्यंत सुरेख, अत्यंत देखणी आणि अत्यंत लोभसवाणी केली आहे!!
ब्लॉगची रंगसंगती (थीम), उजव्या बाजूच्या समासात असलेली एकापेक्षा एक सुरेख चित्रे आणि त्या चित्रांसंदर्भात त्यांनी केलेले दोन दोन ओळींचे निवेदन या गोष्टी लक्ष वेधून घेतात, मन प्रसन्न करतात!!
समर्थ, शिवछत्रपती, सावरकर, टिळक यांचे उल्लेख, तर कुठे गीतेतली संस्कृत वचने, कुठे परशुरामाच्या फोटोने साधलेला चित्तपावनपणा, तर कुठे विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकारामांच्या नामसंकीर्तनात जागवलेला भागवत धर्म! कुठे व्याडेश्वर तर कुठे बल्लाळेश्वराच्या साक्षीने पाळलेले कुळाचार, कुळधर्म!
आणि इतर सर्व छायाचित्रे म्हणजे भरभरून केलेले कोकणदर्शन! कुठे भातशेती, तर कुठे आंबा-फणस-पोफळी, कुठे चिपळूणला वळसा घालून दाभोळकडे निघालेली वशिष्ठी (ही शिरुभाऊंच्या तुंबाडातील जगबुडी बरं का!), तर कुठे गुहागर, चिपळूण, कुठे आचरा मालवण, तर कुठे आमच्या देवबागचा हळूहळू देवबाग गिळू पाहणारा समुद्र, कुठे गोधन, तर कुठे नुकतीच कात टाकलेला एखादा राखणदार!
वा वा मंडळी! अतिशय सुरेख आणि प्रेक्षणीय ब्लॉग!!
जळ्ळं मेलं लक्षण ते! आम्हाला अशी सुरेख सजावट करता आली असती तर किती बरं झालं असतं!
धोंड्या, लेका तुझा हेवा वाटतो रे!
सध्या आमचा नीलकांत रजेवर गेला आहे, परंतु तो आल्यावर लवकरच काही दिवसात मिसळपावचे बाह्यरूप पालटायचे आहे तेव्हा शिंच्या तुझी मदत आम्ही नक्कीच घेऊ!
करशील ना आम्हालाही मिपाच्या सजावटीकरता मदत?
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
16 Jan 2008 - 11:58 am | माझी दुनिया
जळ्ळं मेलं लक्षण ते! आम्हाला अशी सुरेख सजावट करता आली असती तर किती बरं झालं असतं!
खरे आहे, काही वादच नाही
17 Jan 2008 - 12:17 am | प्राजु
पाहिला आहे त्यांचा ल्बॉग... खूप सुंदर केला आहे.
- प्राजु.
16 Feb 2009 - 1:08 am | अघळ पघळ
प्राजुशी सहमत आहे. खूप सुंदर ब्लॉग.
17 Jan 2008 - 6:20 am | सहज
विविध छायाचित्रे असलेला तो उजवा रकाना पाहून खरच खूप छान वाटते!!
पण काय पंत तुम्ही ते आमचं आवडतं भोजन असलेलं ताट का बरे उचललं?? तात्याने संपवलेल दिसतयं :-)
17 Jan 2008 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धोंडोपंत उवाच,
आमचा आवडता ब्लॉग. त्यांच्या ब्लॉगवर गेल्यावर कोकणात गेल्यासारखं वाटतं ...!!!
त्यांची श्रद्धास्थाने, श्लोक, अष्टके, कविता, भरभरुन सौंदर्य असलेला उत्तम चित्रांचा उत्तम ब्लॉग आहे.
त्यांच्या ब्लॉगवर रपेट केल्यावर ज्योतिष विषयक सतत मार्गदर्शनही असते, आणि तिथे भरपूर वाचन झाल्यावर आपली कुंडली बनवून घ्यावी सखोल मार्गदर्शन घ्यावे असाही विचार मनात येतो.
तिथे कुंडली बनवायचे किती फीस लागेल त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे आम्ही अजून काही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Jan 2008 - 4:55 pm | झकासराव
खरच सुंदर आहे ब्लॉग.
बाजुची चित्रं तर अप्रतिमच :)
17 Jan 2008 - 7:49 pm | किशोरी
बाजुची चित्रे पाहुन तर कोकण फिरल्याचा आनंद मिळतो
17 Jan 2008 - 7:57 pm | प्रकाश घाटपांडे
http://misalpav.com/node/515#comment-6862 या ठिकाणी आम्ही कवाच सांगितलय ब्लॉगचे सौंदर्य.
प्रकाश घाटपांडे
18 Jan 2008 - 11:20 pm | नीलकांत
धोंडोपंतांचा ब्लॉग सुंदर आहे शंकाच नाही. लेख सुध्दा छान असतात.
नीलकांत
27 Jan 2008 - 8:09 am | सुधीर कांदळकर
आहे. छायाचित्रे अप्रतिम. परंतु ज्योतिषाविषयी माझी मते फार जहाल असल्यामुळे ती मी व्यक्त करीत नाही. येथे विषय ब्लॉगच्या मांडणी व सौंदर्याचा आहे. ब्लॉग उत्कृष्टच आहे. कृपया एकाच विषयाला वाहू नये. इतरही विषय येऊ द्यात की. आपल्या ज्ञानाला व प्रतिभेला एकाच विषयात बांधून ठेवू नये.
27 Jan 2008 - 12:41 pm | धोंडोपंत
सर्वांना धन्यवाद. आमचा ब्लॉग आवडल्याचे कळविलेत. आम्ही भरुन पावलो.
आम्हाला संगणकीय क्षेत्रातले काही ज्ञान नाही. त्यामुळे ह्या ब्लॉगाची निर्मिती ही आमच्यासाठी मळलेली पाऊलवाट नव्हती.
पण असंख्य कल्पनांनी आमच्या मनात केलेला गुंजारव, कोकणाबद्दल असलेली प्रचंड आपुलकी, आमच्या श्रद्धास्थानांबद्दल असलेला आदर आणि ज्योतिषशास्त्रावरील गाढ निष्ठा यातून लेखन होत गेले आणि वाचकांना ते आवडत गेले.
या ब्लॉगाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे. १७ जून रोजी आम्ही गणक लावला आणि सहा महिन्यात वाचकसंख्या १०,००० चा टप्पा ओलांडून पुढे गेली. आजमितीस ती १३,००० च्या आसपास आहे.
नकाशाचा प्रयोग नुकताच केला आणि वाचकवर्ग जगभरात विविध ठिकाणी कुठे कुठे पसरलेला आहे हे समजले.
आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे -- या ब्लॉगाचे श्रेय आम्ही घेत नाही. ते वाचकांकडे सोपवून आम्ही मोकळे आहोत.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
27 Jan 2008 - 12:51 pm | विसोबा खेचर
धोंड्या,
तुझ्या या सुंदर ब्लॉगचे श्रेय खरंतर मला हवं! :)
आठवतं का रे तुला, एकदा निराश होऊन म्हणा, रागाच्या भरात म्हणा, हा संपूर्ण ब्लॉग तू डिलीट करायला निघाला होतास?
तेव्हा मी तुझ्या हातापाया पडून, विनंत्या करून, 'काहीही झालं तरी धोंड्या, इतका सुंदर ब्लॉग तू डिलीट करू नकोस' असं तुला दहादा विनवलं होतं? आठवतंय का रे तुला?
असो, तुझ्या ब्लॉगचे श्रेय माझे नाही, तुझेच आहे. परंतु तुझा हा ब्लॉग असाच टिकावा, नांवारुपाला यावा, वृद्धींगत व्हावा हीच व्याडेश्वराचरणी प्रार्थना...
(सच्चा मित्र!) तात्या.
28 Jan 2008 - 12:53 pm | केशवराव
विसोबा,
आपण एका नितांत सुंदर ब्लॉगची सफर घडवलीत. धन्यवाद!
28 Jan 2008 - 7:44 pm | धोंडोपंत
<<<<धोंड्या,
तुझ्या या सुंदर ब्लॉगचे श्रेय खरंतर मला हवं! :)
आठवतं का रे तुला, एकदा निराश होऊन म्हणा, रागाच्या भरात म्हणा, हा संपूर्ण ब्लॉग तू डिलीट करायला निघाला होतास?
तेव्हा मी तुझ्या हातापाया पडून, विनंत्या करून, 'काहीही झालं तरी धोंड्या, इतका सुंदर ब्लॉग तू डिलीट करू नकोस' असं तुला दहादा विनवलं होतं? आठवतंय का रे तुला?>>>>
तात्या,
तुमचं म्हणणं खरं आहे . आम्हाला ते आठवते आहे. जेव्हा तुम्हाला तो विचार सांगितला तेव्हा तुम्ही तो सर्वशक्तिनिशी हाणून पाडलात. म्हणूनच हा ब्लॉग आज दिसतोय.
तुमच्या आपुलकीमुळे आज अनेक वाचक त्याचा आस्वाद घेऊ शकत आहेत.
आपला,
(आपला) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
28 Jan 2008 - 11:59 pm | रामोशी
नमस्कार मंडळी,
आमचे हे पहिलेच लिखाण. मिसळपाव हे चमचमीत संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे अभिनंदन.
धोंडोपंतांच्या ब्लॉगविषयी आमचेही दोन शब्द. आम्ही हा ब्लॉग गेल्या बरेच दिवसांपासून आस्वाद घेत पहात आहोत. मुद्दामहून पहात आहोत असे म्हणालो, कारण ज्योतिषशास्त्र काही केल्या आम्हाला झेपत नाही. परंतु, अस्सल नयनरम्य कोकणदर्शन, वेड लावणारा पाऊस आणि समुद्रकिनारा, माडा-पोफळीच्या एअरकंडीशण्ड बागा, कोकणचा मेवा, देवदर्शन, थोरामोठ्यांची उत्तम छायाचित्रे आणि तेव्हढयाच सुंदर चित्रांचे निरुपण करणार्या समर्पक ओळी पाहून दिल खूष झाला! विशेषकरुन, शेवटची दोन छायाचित्रे बघुन तर आमचा आत्मा तृप्त व्हायचा. ती दोन छायाचित्रे म्हणजे, ताज्या तळलेल्या सुरमई, सागुती-वडे आणि सोलकढीचे जेवण. इथे दूरवर उसगावच्या खेड्यात, जिथे हे प्रकार नावालासुधा बघायला मिळत नाहीत, तेथे आम्ही धोंडोपंतांच्या ब्लॉगवर जाउन आमची क्षुधाशांती करायचो. गेल्या काही दिवसांपासून मात्र ही दोन्ही चित्रे तेथे नाहीत. मला सांगा, देवदर्शन, कोकणदर्शनानंतर आमच्या थकल्या-भागल्या जीवाने थोडी पोटपूजेची अपेक्षा केली, तर काही चुकले का? तेव्हा आम्ही धोंडोपंतांना जाहीर विनंति करीत आहोत की त्यांनी आपल्या ब्लॉगवरील दोन्ही चित्रांची पुन्हा प्रतिष्ठापना करावी. जमल्यास तळलेले बोंबिल मिळाले तर उत्तमच :)
आपला,
(ताजे फडफडीत मासे या प्रजातीवर मनापासून प्रेम करणारा) मामलेदार
29 Jan 2008 - 12:03 am | विसोबा खेचर
गेल्या काही दिवसांपासून मात्र ही दोन्ही चित्रे तेथे नाहीत. मला सांगा, देवदर्शन, कोकणदर्शनानंतर आमच्या थकल्या-भागल्या जीवाने थोडी पोटपूजेची अपेक्षा केली, तर काही चुकले का? तेव्हा आम्ही धोंडोपंतांना जाहीर विनंति करीत आहोत की त्यांनी आपल्या ब्लॉगवर वरील दोन्ही चित्रांची पुन्हा प्रतिष्ठापना करावी. जमल्यास तळलेले बोंबिल मिळाले तर उत्तमच :)
हेच म्हणतो!
तात्या.
29 Jan 2008 - 8:05 pm | धोंडोपंत
केशवराव,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपला,
(आभारी) धोंडोपंत
मामलेदार व तात्या,
कोकणी पाककृतींची छायाचित्रे ब्लॉगावर पुन्हा लावली आहे. जाऊन आस्वाद घ्यावा ही विनंती.
सूचनेबद्दल आभार.
आपला,
(आज्ञाधारक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
30 Jan 2008 - 7:56 pm | रामोशी
धोंडोपंत,
आत्ताच आपल्या ब्लॉगवर जाउन आम्ही खास लज्जतदार कोकणी भेटीचा आस्वाद घेतला.
आमच्या बुधवारच्या जेवणाची राजेशाही थाटाची सोय केल्याबद्दल आपले शतशः आभार !!
(संतुष्ट !) मामलेदार
30 Jan 2008 - 11:28 pm | विसोबा खेचर
म्हणतो!
तात्या.
16 Feb 2009 - 1:07 am | अघळ पघळ
धोंडोपंतांचा ब्लॉग अतीशय आवडला. कोकण दर्शन तर अफलातून!!
16 Feb 2009 - 11:50 am | नितिन थत्ते
धोंडोपंतांचा ब्लॉग पाहिला. सजावट, लेआउट वगैरे छानच आहे. मिसळपावला असेच सजवण्याची कल्पना उत्तम.
एकच सूचना: त्यांचा ब्लॉग फार सात्विक आहे. तसा करू नका. मिसळपाव या झणझणित 'तामसी' पदार्थाला शोभणार नाही.
अवांतरः मिसळपाव जसा सेक्युलर (पारलौकिक बाबींना महत्त्व न देणारा) आहे तसाच राहू द्या.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
16 Feb 2009 - 12:09 pm | विसोबा खेचर
मिपा आहे तसेच राहील! :)
आम्ही फक्त सजावटीबद्दल बोलत होतो...
तात्या.
16 Feb 2009 - 12:37 pm | घाटावरचे भट
व्हय व्हय...मिपाचं रुपडं बदला की आता....
16 Feb 2009 - 12:42 pm | नितिन थत्ते
मग ओके
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
16 Feb 2009 - 1:15 pm | अमोल केळकर
पंतांचा ब्लॉग सुरेख आहे यात शंका नाही .
पंत तुमचा इंग्रजी ब्लॉग ही असाच सजवा ही विनंती.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
16 Feb 2009 - 2:29 pm | मधु मलुष्टे ज्य...
ब्लॉग सुरेख आहे. उजवीकडील छायचित्रे अप्रतिम. एस.टी. स्टॅंडचे छायचित्र म्हणजे कळसच. समुद्रकिनार्याचे फोटो पाहताना भान हरपले होते. :)
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
18 Feb 2009 - 6:10 am | केदार_जपान
तुमची ही पोस्ट बघितली आणि म्हणालो, च्यामारी एवढे काय आहे या ब्लोग मधे ....???...एकदा याच्यावर टिचकी मारायला काय हरकत आहे??
आणि बघतो तो काय हो??...भन्नाट्च आहे कि हो हा ब्लोग्!!...कोलापुरी भाषेत सांगयचे तर...एकदम नाद्खुळा..! ;)
आणि आम्ह्लाला सुद्धा थोडेफार समजते ज्योतिषामधले....त्यामुळे दुधात साखरच पडली...
धोंडोपंताचे अतिशय आभार कि एवढा सुंदर ब्लोग केल्याबद्दल्....आणि तुमचे त्याहुन जास्त आभार कि एवढी छान माहिती इकडे पोस्ट केल्या बद्द्ल...
-------------
केदार जोशी