राम राम मंडळी,
काही दिवसांपूर्वी मिपावर आम्ही आमचे मधुभाई हा लेख लिहिला होता. त्यात काही मंडळींनी मधुभाईंनी गायलेले काही ध्वनिमुद्रण असल्यास ते जालावर चढवावे असे आम्हाला सुचवले होते म्हणून मुद्दाम हा लेखनप्रपंच.
परवा खूप दिवसांनी सवड मिळाली म्हणून आम्ही मधुबुवांच्या घरी गाण्याची तालीम घ्यायला गेलो होतो.
"अरे ये ये!" असं नेहमीप्रमाणे मधुभाई हसतमुखाने म्हणाले. तिथे त्यांच्या अजून दोन शिष्या बसल्या होत्या. त्यांच्या गाण्याची तालीम सुरूच होणार होती तेवढ्यात आम्ही तिथे हजेरी लावली!
"काय मग? आज वेळ मिळाला वाटतं? आज कसे काय उगवलात?" अशी मधुभाईंनी पुन्हा आमची थट्टा केली! :)
"हम्म! लाव पाहू तंबोरा!" असा हुकूम केला. आम्ही चुपचाप तंबोरा जुळवला आणि बुवांना हळूच म्हटलं,
"बुवा, आज जरा बिलावल दाखवा ना!"
"बिलावल? बरं बरं!" :)
त्या मुलींचा कुठला राग सुरू होता हे मला माहीत नव्हतं तरीही मधुभाईंनी माझा हट्ट पुरवला आणि हसतमुखाने होकार भरत डायरेक्ट बिलवल सुरूच केला. तो मी मुद्दामून माझ्या आयपॉडवर ध्वनिमुद्रीत केला! :)
त्यातलाच थोडासा भाग आज आपल्याकरता इथे उपलब्ध करत आहोत! पाहा तरी ऐकून आणि कसं वाटलं ते अवश्य सांगा! :)
खरंच सांगतो मंडळी, आमच्या मधुभाईंकडे जाऊन गाण्याची तालीम घेणं, रागाचं -लयतालाचं, बंदिशींचं सौंदर्य समजावून घेणं ही मम सुखाची ठेव! माझ्या निखळ आनंदाचा तो एक भाग आहे. आपण जर हे ध्वनिमुदण ऐकलंत तर आपल्या लक्षात येईल की सुरवातीला फक्त सरगमच्या साहाय्याने किती सुंदर रितीने मधुबुवांनी बिलावल हा राग उलगडून दाखवला आहे!
मंडळी, आज इतक्या सुंदर रितीने फार कमी ठिकाणी गाणं शिकवलं जातं. आज मधुबुवांसारख्या दिग्गजाच्या पायाशी बसून चार स्वर शिकायला मिळताहेत ही मी भाग्याची गोष्ट मानतो. आजच्या धकाधकीच्या आणि हजार व्यवधानांच्या जमान्यात मला गाणं किती येईल, किती नाही, हा भाग वेगळा परंतु ते शिकत राहण्याचा आनंदच खूप मोठा आहे आणि त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही! हमीर, छायानट, भूप, बिलावल, बसंतबहार, ललितागौरी यासारखे सुंदर राग बुवांच्या पायाशी बसून आयुष्यभर शिकत रहाणे हीच आमची इच्छा आणि त्यातच आमचं स्वर्गसुख सामावलेलं आहे! :)
आज माझ्या आयपॉडमध्ये जी मिठाई भरलेली आहे ती कुणीही कितीही पैसे दिले तरी बाजारात अन्यत्र मिळणार नाही! या जगात काही काही गोष्टींचं मोलच करता येत नाही, त्या केवळ अनमोल असतात!
अजून काय लिहू?
- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
27 Jan 2009 - 4:28 pm | विसोबा खेचर
खास करून रागाचं जाणं-येणं, त्याचं चलन, स्वरांची वजनं, त्यातल्या महत्वाच्या फ्रेजेस किती सुरेख समजावून संगितल्या आहेत पाहा! नुसता सरगम ऐकूनच माणूस बिलावलच्या प्रेमात पडतो! :)
तात्या.
28 Jan 2009 - 12:03 am | घाटावरचे भट
सहमत. अफलातून समजावून दिलाय राग. शिवाय नुसते सूर नाहीत तर प्रत्येक सुराचा पुढच्या मागच्या सुरांशी संबंध, त्यांचं उच्चारण हे सुद्धा किती छान दाखवलंय सरगम मधून. खूपच मस्त. तात्या, लकी यू!!
27 Jan 2009 - 5:44 pm | मैत्र
तात्या हे कसं करायचं? माझ्याकडे आयपॉड क्लासिक आहे.
खरडीतून विचारता आलं असतं. पण इथे लिहिलं तर सगळ्यांना माहिती मिळेल म्हणून खरड / व्य नि केला नाही...
27 Jan 2009 - 5:57 pm | दशानन
तात्यांच्या कडे हा आयपॉड असावा !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
27 Jan 2009 - 9:55 pm | प्राजु
बिलावल एखाद्या मुरलेल्या लोणच्याप्रमाणे वाटतो राग.. खूप आवडतो..
तिरथको सब करे, देव पूजा करे...
ही चीज मला खूप आवडते. (बिलावल मधलीच आहे ना? ) :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Jan 2009 - 12:18 am | विसोबा खेचर
तिरथको सब करे, देव पूजा करे...
ही चीज मला खूप आवडते. (बिलावल मधलीच आहे ना? )
नाही, ती तिलककामोद रागातली झपतालातली चीज आहे.
एकदा केव्हातरी तिलककमोद, कामोद या रागांबद्दल लिहीन. मधुबुवांनी मला कामोद खूप छान शिकवला आहे, समजावून सांगितला आहे! :)
आपला,
(श्रीमंत आणि समृद्ध) तात्या.
मला स्वत:ला तिलककामोदपेक्षा कामोद अधिक आवडतो. आमचा शामकल्याणही कामोदला खूप जवळचा आणि शुद्धगंधाराचा महत्वाचा फरक सोडला तर आमचा शुद्धसारंग हा शामकल्याणच्या तसा जवळचाच! :)
आपला,
(कामोदप्रेमी) तात्या.
एक झलक म्हणून इथे कुमारांचा कमोद ऐकता येईल..
आपला,
(कुमारप्रेमी) तात्या.
28 Jan 2009 - 8:04 am | रामदास
रविशंकर यांनी संगीतबध्द केलेलं जाने कैसे सपनोमे खो गयी रतीया हे गाणं मला फार आवडतं.
त्याचा मन उजीयारा हा अंतरा तर फारच छान.
27 Jan 2009 - 10:40 pm | लिखाळ
ध्वनिमुद्रण ऐकले..छान वाटले.
त्यामध्ये संगीतशिक्षक विद्यार्थ्यांशी जो संवाद साधत आहेत तो ऐकून प्रत्येक जण आपल्या विचाराने राग कसा मांडत असेल याचा अंधूकसा अंदाज आला. राग कसे आळवतात, प्रत्येक गायकाचा विचार वेगळा असतो म्हणजे काय? याबद्दल मी फारच अनभिज्ञ आहे.
-- लिखाळ.
27 Jan 2009 - 10:52 pm | चतुरंग
रागांमधले काही कळत नाही ह्याचे वाईट वाटते पण ऐकायला छान वाटते ह्याचा तरी सध्या आनंद घेतोय.
तात्या, बिलावल आणि अल्हैय्या बिलावल हे दोन्ही एकच की वेगळे?
http://www.itcsra.org/sra_raga/sra_raga_that/sra_raga_that_links/raga.as...
इथे समय राग विचार सांगणारी अल्हैय्या बिलावलची एक धून सापडली शुभ्रा गुहा ह्यांनी गायली आहे.
(आपले राष्ट्रगीत 'जनगणमन' हे बिलावल रागात आहे असे समजते, हे खरे का?)
चतुरंग
27 Jan 2009 - 11:41 pm | रामदास
संगणकावर ऐकण्याची सोय नाही.
बिलावलची ले तेरी लकडी ले तेरी कावडी ही चिज शिकलो होतो.
ओ राही गया आंधीयारा हे गीत बिलावलमध्येच आहे ना?
28 Jan 2009 - 12:29 am | विसोबा खेचर
ओ राही गया आंधीयारा हे गीत बिलावलमध्येच आहे ना?
बावर्ची चित्रपटातलं 'भोर आयी गया आंधियारा'चा मुखडा बिलावलमध्येच आहे. अर्थात, चित्रपटसंगीतामध्ये रगाचे सर्व नियम कसोशीने पाळले जातातच असं नव्हे..
हा खरं तर अल्हैय्या बिलावलच परंतु बोलीभाषेत त्याला बिलावल असंही म्हणतात! :)
'कवन बटरिया गईलो, माई दे हो बताई' ही अल्हैया बिलावलातली पारंपारिक बंदिश किशोरीताईंनी येथे गायली आहे..
आपला,
(किशोरीताईंचा चाहता) तात्या.
28 Jan 2009 - 12:39 am | घाटावरचे भट
आणि त्याच गाण्यातलं 'आयी पनिया भरन की बेला' हे हंसध्वनीत आहे असं वाटतं. बरोबर ना तात्या?
29 Jan 2009 - 7:49 am | विसोबा खेचर
हो जवळपास आहे, पुन्हा ऐकून सांगतो..
तात्या.
28 Jan 2009 - 12:38 am | बिपिन कार्यकर्ते
तात्या, रागातलं वगैरे काही कळत नाही ह्याचं वाईट वाटतं. पण काही तरी छान ऐकतोय असं वाटत होतं. खूपच छान. आणि खरं तर नुसता तो सुंदर लागलेला तानपुराच पुरे आहे हरवून टाकायला. २-३ वेळा नुसता तानपुराच ऐकला.
बिपिन कार्यकर्ते
28 Jan 2009 - 12:44 am | विसोबा खेचर
आणि खरं तर नुसता तो सुंदर लागलेला तानपुराच पुरे आहे हरवून टाकायला. २-३ वेळा नुसता तानपुराच ऐकला.
तो मी लावलाय बर्र का! :)
कधी मधुबुवांकडे गेलो तर बुवा तानपुरा लावायला मलाच सांगतात! :)
पं अच्युतराव अभ्यंकर, पं फिरोज दस्तूर आणि अण्णांची कृपा! दुसरं काय?!
आपला,
(किराण्याची थोडीफार तालीम घेऊन नंतर ग्वाल्हेर-आग्र्याकडे वळलेला!) तात्या. :)
28 Jan 2009 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते
मी असं ऐकलंय की तानपुरा बरोबर लावणं अतिशय अवघड असतं आणि ते जमलं तर सूर नीट पक्के झाले आहेत असं समजतात. बरोबर ना?
बिपिन कार्यकर्ते
29 Jan 2009 - 7:50 am | विसोबा खेचर
मी असं ऐकलंय की तानपुरा बरोबर लावणं अतिशय अवघड असतं आणि ते जमलं तर सूर नीट पक्के झाले आहेत असं समजतात. बरोबर ना?
येस्स सर. आम्हाला आताशा थोडा थोडा सा दिसू लागला आहे एवढंच म्हणायचं धाडस करेन..
तात्या.
28 Jan 2009 - 8:39 am | छोटा डॉन
एकदम स्सह्ही ..!
मजा आली ..!
बाकी रागदारीतले जास्त कळत नसले तरी ऐकायला छान वाटले बॉ.
बुवांचा आवाज आणि शिकवण्याची पद्धत अगदीच प्रेमळ आहे असे मत तयार झाले ...!
बाकी जाता जाता :
ह्या तात्यांच्या "आयडी" वरुन ही क्लिप चढवली होती तिथे फक्त हे एकच गाणे सापडले, आम्ही अजुन काहितरी मिळेल ह्या अपेक्षने पाहिले तर काहीच नव्हते.
अजुन काही असेच "खास" असेल तर ते कॄपया अपलोड करावे अशी तात्यांना विनंती ..!
------
छोटा डॉन
28 Jan 2009 - 6:38 am | चित्रा
बिलावलशी ओळख आवडली.
गोड आणि प्रेमळ आवाज आहे, तुमच्या मधुभाईंचा.
असे कोणी गाणे शिकवले तर शिकायला आवडेल.
28 Jan 2009 - 7:05 am | सुनील
बिलावल हा थाट आहे असे ऐकून आहे. राग आणि थाट ह्यात नक्की भेद काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jan 2009 - 9:23 am | घाटावरचे भट
थाट म्हणजे एका विशिष्ट ७ स्वरांचा समूह असे साधारणपणे म्हणता येईल. त्या साधारण स्वरसमूहाचा सबसेट असलेले राग त्या थाटात येतात. थाट १० आहेत - अधोरेखीत स्वर कोमल (मध्यम तीव्र)
आसावरी - सा रे ग म प ध नी
बिलावल - सा रे ग म प ध नी
भैरव - सा रे ग म प ध नी
भैरवी - सा रे ग म प ध नी
कल्याण - सा रे ग म प ध नी
पूर्वी - सा रे ग म प ध नी
मारवा - सा रे ग म प ध नी
तोडी - सा रे ग म प ध नी
काफी - सा रे ग म प ध नी
खमाज - सा रे ग म प ध नी
यातल्या बिलावल थाटाचा अल्हैय्या बिलावल हा राग आहे. केवळ 'बिलावल' असा वेगळा कुठला राग आता प्रचारात नाही. त्यामुळे फॉर ऑल बिझनेस पर्पझेज बिलावल = अल्हैय्या बिलावल. :)
बाकी थाट हा हिंदुस्थानी रागपद्धतीला एका विशिष्ट वर्गीकृत पद्धतीत बसवण्याचा हा खटाटोप आहे. साहाजिकच तो परफेक्ट नाही. त्यात अनेक विसंगती आहेत. थाट अथवा वर्गीकृत राग ही संकल्पना कर्नाटकी संगीतावर आधारित आहे. कर्नाटकी संगीतात ही संकल्पना अधिक विकसित आहे आणि राग अत्यंत व्यवस्थित वर्गीकरण केलेले आहेत. हिंदुस्थानी संगीतात दुर्दैवाने सर्व राग असे बसत नाहीत. उदा. भूप आणि देसकार ह्या रागांचे स्वरसमूह सारखे आहेत. पण भूप कल्याण थाटात वर्गीकृत आहे तर देसकार बिलावल थाटात. हिंदुस्थानी संगीत साधारण समजून घेण्यासाठी थाट पद्धत ठीक आहे, पण खोलात जाऊन अभ्यास करताना त्याचा फारसा उपयोग नाही.
28 Jan 2009 - 11:15 am | सुनील
धन्यवाद भटोबा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jan 2009 - 10:35 am | संदीप चित्रे
गुरूजींचा आवाज किती शांत आहे ...
त्यांना नमस्कार सांग तात्या.
29 Jan 2009 - 7:52 am | विसोबा खेचर
सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार. मधुबुवांचं बरंच गाणं माझ्याकडे आहे. सवडीने त्यातल्या काही ठेवणीतल्या चिजा जालावर चढवीन..
आपला,
(आभारी) तात्या.