नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
9 Mar 2025 - 12:28 am

साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला

विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच.

सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची. तर हळूहळू सगळ्यांना लग्न चढायला लागलं.

नव्या जोडप्यांची खोली सजवणं ( म्हटलं तर हा दहशतवादी प्रकार असायचा) हा तर मित्रमंडळींचा जन्मसिद्ध अधिकार. यात लग्न असलेल्या मुलांच्या आई वडिलांची नुसती परवानगी नाही तर प्रोत्साहन असायचं. मुलांची मोठी भावंडं उत्साहाने सहभागी व्हायची. नवनवीन क्लुप्त्या निघायच्या. असो, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल उगाच इथे विषयांतर नको

विजा टिपीकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला. तसा फार हुशार नाही पण आपण काय आहोत याचं भान ठेवून वागणारा. आईवडील आणि दोन मोठे भाऊ. अर्थातच दोन्ही मोठ्या भावांची लग्न झालेली. चाळीतील तीन खोल्यांची जागा. आगगाडीच्या डब्यांसारखी रचना. सरळ रेषेत तीन खोल्या. पुढची खोली मधली खोली आणि स्वयंपाकघर. सगळ्यात मोठ्या भावाला नशिबाने निमसरकारी नोकरीत राहायला जागा मिळाली होती. मधल्या भावाने लग्न झाल्यावर थोडी जमवाजमव करून कर्ज काढून लवकरच जागा घेतली. विजा अतिशय समजूतदार. त्यानं आईवडीलांना सांगितल्याप्रमाणे धडपड करुन जागा घेतली आणि मगच लग्न या विषयाला हात घातला.

लग्न जवळ आलं. विजाच्या पहिल्या रात्री साठी काय ' सजावट ' करायची, त्याला कसं सतावायचं यांचे बेत आखले जाऊ लागले. विजाला माहीत होतं पण हा हवाहवासा वाटणारा उपद्रव होता. आतापर्यंत अधूनमधून आपल्या जागेवर जाणारा पण एरवी आईवडीलांच्या बरोबर रासणारा विजा लग्नानंतर नव्या जागेतच संसार सुरू करणार होता. मग ठरलं. विजा कडून त्याच्या ब्लॉकची चावी लग्नाच्या दोन दिवस आधी घेऊन ठेवायची. लग्नाचा स्वागत समारंभ सुरू असताना तिकडे ' सजावट ' सुरू करायची. स्वागत समारंभ संपल्यावर आईवडीलांच्या घरातच गृहप्रवेश करायचा आणि मग नव्या जागेत जायचं.

ठरल्याप्रमाणे दोन दिवस आधी आम्ही घराजवळ पण बाहेर भेटलो. विजा आला खरा पण चेहऱ्याचे बारा वाजलेले. काही तरी लोचा होता. विचारून सुद्धा पठ्ठ्या बोलायला तयार नव्हता. दे चावी लवकर असं म्हणताच त्याने आवंढा गिळत रडवेल्या चेहऱ्यानं सांगितलं की नको रे सजावट वगैरे काही जमणार नाही, आम्ही इथेच झोपणार आहोत. आम्हाला धक्काच बसला. काय बोलतोयस लेका? त्या लहान जागेत घरचे , पाहुणे, यांच्या गर्दीत तुम्ही पहिली रात्र घालवणार?
आता मात्र विजाचा बांध फुटला. अरे काय सांगू बाबांनो, काल मोहिनी वहिनीने अक्षरशः राडा केला. आम्हाला काही असं कुणी केलं नाही, आम्ही लग्नानंतर इथेच राहिलो ना? मग याची का थेरं? घरचे सगळे अवाक. आईवडील समजूत घालायचा प्रयत्न करत होते तर तिने सरळ एक घाव दोन तुकडे केले. म्हणाली आम्हाला प्रायव्हसी मिळेल का याचा विचार केला होतात का? मग आता हे दोघं पण पहिल्या रात्री इथेच राहतील. आणि जर हे पटत नसेल तर मी लग्नाला येणार नाही. मी दोन दिवस माहेरी निघून जाईन. सर्वत्र सन्नाटा. मग आम्ही धीर दिला. इथे तर इथे, निदान फुलांची सजावट तर करू. तेवढंच प्रसन्न वाटेल. सुदैवाने विजाने सरीताला म्हणजे होणाऱ्या पत्नीला सगळा प्रकार सांगितला व तिनं समंजसपणा दाखवला.

लग्न पार पडलं. आम्ही धावतपळत त्याच्या घरी आलो. मधल्या खोलीत फुलं, माळा आणि पाकळ्यांची सजावट केली. गृहप्रवेश वगैरे झाल्यावर आम्ही आपापल्या घरी पांगलो. निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला. एव्हाना तो सावरला होता.

असो. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनलेख

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

9 Mar 2025 - 12:37 am | सर्वसाक्षी

निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला

कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची.
आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो
लेख छान झालाय.
पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

विजुभाऊ's picture

10 Mar 2025 - 3:12 pm | विजुभाऊ

साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे.
साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने .
आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे