मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
17 Apr 2024 - 11:33 am

मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची

"बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय.
आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय. इथे समोर राहतात ना ते मोठे सत्पुरुष आहेत. आपण संतांच्या भूमीत जन्माला आलोय. आपले कल्याणच होणार आहे.
एक दिवस विचारले आईला कि नाव काय ग यांचे". आई म्हणाली, काय की बाई! घरचे लोक त्यांना गणूबुवा म्हणतात. पण इतर लोक त्यांना पु. गोंदवलेकर महाराज म्हणतात. फार कनवाळू आहेत बरं का! इथे खूप अन्नदान चालते. इथे आलेल्या कोणाही व्यक्तीला ते जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नाही. मग ते दरोडेखोर असोत की त्यांचे शत्रू. माहितेय का, त्यांना विष घालायला आलेल्या पुरुषांना ही त्यांनी आग्रहाने जेवायला बसवले होते."

मग आम्ही दिवसभर जाता येता रामाला हात जोडायचो. दिवसभर राममंदिरात हुंदडायचो. हे सत्पुरुष रोज आम्हाला शेंगा, पेरू, फळे, साखरफुटाणे, खडीसाखर असे काहीबाही द्यायचे. रामाचा प्रसाद सगळ्या जीवमात्रांना मिळाला तर ते उद्धरून जातील अशी त्यांची धारणा आहे. त्या साखरफुटाण्यासाठी तर आम्ही जीव टाकायचो.
कधी मंदिरात कोणी नाही ते पाहून गुपचूप शिरायचो आणि रामाच्या पाठीमागून जाऊन तिथे रामाला वाहिलेले साखरफुटाणे, शेंगदाणे खायचो. कधी तो रामाच्या डावीकडे कोच ठेवला आहे ना, तिथे महाराज बसायचे ... त्या कोचाच्या मागून तर इकडे शेजघरापर्यंत ... तिथून मारुतीरायांपर्यंत पळापळी खेळायचो . कधी कधी रामाच्या मागे तुळशीवृंदावन आहे ना, तिकडे मोठाल्या चुली मांडलेल्या असायच्या.. बाजूलाच माजघर होते, कोठीचे घर होते तिकडेही जायचो.

पण ते महाराजांचे ते लाडके निष्ठावंत शिष्य नाही का, महाराज लाडूबुवा म्हणायचे त्यांना ते! बाई ग! फार कडक काम होतं ते.. मला चांगलाच अनुभव आलाय त्यांचा. कोणाशी जास्त बोलायचे नाही ते. फक्त मुखाने नाम. आणि महाराजांनी सांगितलेल्या कामात इतके तत्पर की, एकदा तर महाराजांनी "बुवा कुठे गेले म्हणून हाक मारली", तर हे छतावर दिंडीदरवाजा शाकारत होते.. तिथून त्यांनी सरळ महाराजांच्या पुढ्यात उडी घेतली.. हे आम्ही समोरच्या झाडावरून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
तर असो, एकदा असेच मी कोचावर पाठीशी ठेवलेल्या तक्क्यावरून पळत होते, आणि अचानक ते कडाडले, " हा हा, या कोचाला कोणी स्पर्श कराल तर खबरदार! भाऊसाहेब, आग आहे ती आग!
हे शब्द कानावर पडताच मी जे जीव खाऊन धूम ठोकली आणि मारुतीरायच्या मागे जाऊन लपले की ज्याचे नाव ते ! नंतर कळले की तिथे असणारे एक गृहस्थ वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे नाव, ते सहज कोणाशी तरी बोलता बोलता त्या कोचाला टेकले होते.
असो तर आई म्हणत होती त्या उत्सवाचे नाव कळाले, चैत्र रामनवमी उत्सव, आमच्या आराध्याचा जन्म!
एवढं ऐकल्यावर मला आता आत काय चालू आहे, याची फार उत्सुकता लागली. मी कोणी बघेल ना बघेल असे करत गुपचूप आत शिरले आणि रामाच्या मागे जाऊन तुळशीची सजावट केली होती त्यात जाऊन लपले. अश्या ठिकाणी लपले होते की मला, तिथून तो कोच ही दिसत होता आणि समोर असलेला जनसमुदाय पण दिसत होता.

अय्या आणि हे काय" थोरले राममंदिर आज किती विलक्षण सजले आहे! मातीच्या भिंती पांढर्या रंगाने पोतारलेल्या आहेत. जमीन स्वच्छ शेणाने सारवलेली आहे. त्यावर मायबाईने रांगोळी काढलेली आहे. मंदिराच्या मधोमध, थोरल्या रामाच्या अगदी समोरच उंच पाळणा बांधलेला आहे. त्याला झेंडूच्या माळा लावून सुशोभित केले आहे. पाळण्याच्या मधोमध कापडी चिमण्या, घोडे असलेले खेळणे बांधले आहे.
नुकताच पहाटेचा रामाचा काकडा करून श्रीमहाराज "श्रीराम श्रीराम" म्हणत कोचावर विसावलेले दिसत आहेत. महाराजांच्या मुखात सदा सर्वकाळ रामनाम असते. एकदा काय गंमत झाली! मला ऐकायचे होते, ते तिन्ही त्रिकाळ काय पुटपुटत असतील बाई ? मग मी किनई एक दिवस जाणून बुजून त्यांच्या कोचाच्या मागे लपले. ते असेच दुपारचे भोजनप्रसाद घेऊन सुपारी चघळत असेच येऊन बसले कोचावर. मी मागे त्यांच्या डोक्याच्या जवळच पण भिंतीशी टेकून होते. आणि मला अचानक, धीर गंभीर आवाजात 'श्रीराम जय राम जय जय राम' असे ऐकू आले. मग मीही त्यांच्यासारखेच पुटपुटायचा प्रयत्न केला. पण छे! काही केल्या जमले नाही.

तर आज उन्हाळ्यामुळे श्रींनी आज पांढरे शुभ्र करवतकाठी धोतर, आणि त्यावर उपरणे, डोक्याला फेटा, गळ्यात तुळशीमाळा, भाळी त्रिपुंड, डोळ्याच्या कडेला थोडे अंतर सोडून चंदनाचे ठिपके, दंडावर भस्म, अश्या वेशात श्रींची मूर्ती दिसत आहे. श्रींना गेल्या काही दिवसापासून दम्याने उचल खाल्ल्याने थोडा त्रास होतोय. अगंबाई, पायावरती जरा सूज पण दिसते आहे! आज सकाळपासून महाराज रामाच्याच चिंतनात गढून गेल्याने त्यांना राहून राहून भरून येतंय, वारंवार ते खांद्यावरील उपरण्याने डोळे पुसत आहेत.
महाराजांची सगळी शिष्यमंडळी उपस्थित आहेत. यात कोण कोण आहेत बरं ? भाऊसाहेब केतकर तर त्यांच्या मंडळीसहीत मागच्या वर्षीपासूनच इथे येऊन राहिलेत. धाकटे राममंदिराजवळ त्यांची खोल आहे. नुकताच तात्यासाहेबांचा विवाह झाल्याने त्यांचीही मंडळी सोबत आहेत. रामानंद महाराज, आनंदसागर महाराज, साखरखेरड्याहून प्रल्हाद महाराज जिजीमाय सहीत आले आहेत. डॉ. कुर्तकोटी, अप्पासाहेब भडगावकर दिसत आहेत, इंदोरहून आलेले भय्यासाहेब मोडक दिसत आहेत, अण्णासाहेब मनोहर, गणपतराव दामले, ब्रम्हानंद बुवांचे पुतणे, भीमराव गाडगुळी.. महाराजांची नेहमी इथे दिसणारी सगळी शिष्य मंडळी!

इकडे इतर सेवेकरी रामनवमी उत्सवाची जोरदार तयारी करत आहेत. राममंदिरापुढे मांडव तर गेल्या १० दिवसांपासूनच पडला आहे. १० दिवस भवानरावांच्या हाताला उसंत नाही, सारखे लाकडे फोडताना दिसत आहेत. माजघरातील स्त्रिया परसदारी तुळशीवृंदावनाच्या मागे बसून धान्य निवडत आहेत, सुप्यात घेऊन पाखडत आहेत. , रामानंदबुवांची मंडळी दुर्गाबाई आणि पांडुरंगबुवांची मंडळी कृष्णाबाई भल्या पहाटे उठून जात्यावर दळायला बसतात. मुक्ताबाई खिरीसाठी भिजवलेले खपली गहू उखळात घालून कांडत आहे, बनुताई घागरीमध्ये रवी घेऊन ताक घुसळत आहेत, जीजीमाय रामाला विडा करत आहेत. गोदुताईने सुंठवडा करण्याची जबाबदारी आहे. बनुताई खिरीसाठी विलायची कुटून ठेवत आहे. पटाईत मावशी रामासाठी नैवेद्य करून आणत आहेत. पुरुष मंडळी कोणी पाण्याची व्यवस्था करतय , कोणी फुले माळा बांधतंय, कोणी निरनिराळ्या सुगंधी फुलाहारांनी पालखी सजवत आहेत. किशोरवयीन मुली अंगण भरून रांगोळ्या काढत आहेत.

श्रीमहाराज १५ दिवस आधीच मद्रासी अम्माला सूचना देत होते तेव्हा मी ऐकले होते. 'अम्मा, यावर्षी रामाला जरीचे , नाजूक कलाकुसर केलेले छान भगवे वस्त्र शिवायला घ्या हो '' त्याप्रमाणे मद्रासी अम्मांनी रामरायाला सुंदर वस्त्रे शिवलेली आहेत. गुढीपाडवा ते रामनवमी रोज रामाला नवीन वस्त्र अलंकार चढवले जात आहेत.

"अगंबाई, गर्दी वाढायला लागली बरे का! आता,पळावेच इथून.. उगा कोणच्या नजरेस पडायला नको. काय करावं? पण समोर तर मोठा सागरच उसळला दिसतो आहे! मुंगी आत शिरायला जागा नाही तर! जाऊ दे, इथं गप्प बसून बघूया गंमत! "

जिकडे पाहावे तिकडे लोक. मुलाबाळांना घेऊन गर्दीचे लोंढेच्या लोंढे महाराजांच्या लाडक्या रामाच्या दर्शनाला येत आहेत. पण सगळे आधी महाराजांकडे येतात अन मग त्यांचे दर्शन घेऊन रामाकडे जातात. हे पाहून श्रीमहाराज गहिवरून म्हणत आहेत, "अरे माझ्या रामाला आधी डोळे भरून पहा रे, तो राम म्हणजे केवळ मूर्ती नसून, प्रत्यक्ष परमात्मा आपल्या गोंदवल्यात उभा आहे. तो इतका दयाळू आहे कि तुमचे अवगुण तुम्हाला समजतील, आपल्या दोषांची जाणीव झाली तरच आपण त्यातून सुटण्याचा प्रयत्न करू ना. आणि असे करून माझ्या रामाची प्रार्थना करून जो त्याला शरण जाईल ना, तर अश्या शरणागताला माझा राम सोडवेनच. शरणागतावर कृपा करणे हे रामरायाचे ब्रीदच आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने एकवार तरी माझ्या रामाकडे पाहावे असे मला वाटते. "

काय ग बाई, मला पुष्कळसे शब्दांचा अर्थच लागला नाही! दोष म्हणजे काय, अवगुण म्हणजे काय हे एकदा आईला विचारायला हवं!

इतक्यात श्रींना काहीतरी आठवते आणि ते चटकन रामानंद महाराजांना म्हणतात, " रामानंदा, तुम्ही रचलेले ते संक्षिप्त रामायण म्हणा पाहू.
रामानंद महाराज डोळे मिटून गायला सुरुवात करतात.

सुरवराच्या काजासाठी अजन्मा तू जन्म घेसी
चैत्र शुद्ध नवमीसी । जन्मीयले sssss
श्रीराम जय राम जय जय राम

बुवांनी मनापासून गायला सुरुवात केली. आता श्रीमहाराज अगदी डोळे मिटून तन्मयतेने ऐकत आहेत. मधेच त्या 'श्रीराम जय राम जय जय राम ' तालावर ठेका धरत आहेत. श्रीमहाराज हळूहळू त्यावर ताल धरतात आणि चक्क नाचायला सुरुवात करत आहेत त्यांना नाचताना पाहून सर्वांच्या अंगात उत्साह संचारलाय. अगदी भक्तिमय झाले आहे वातावरण. श्रीमहाराजांचे पोट मोठे होते. अगदी त्या पलीकडल्या मंदिरातल्या गणपती बाप्पासारखे. त्यामुळे महाराज नाचताना त्यांचे पोट मजेशीर हालायचे आणि फार गमतीदार दिसायचे ते. पण मला प्रश्न पडायचा कि महाराजांचे जेवण ते एवढेसे.. त्यातही आपल्या पानातले ते सर्व लहानथोरांना घास घास द्यायचे. तरी श्रींचे पोट एवढे मोठे कसे? आणि बरं का, रोज चार पाचशे मंडळी तरी पानाला सोबत असायचीच. असा एकही दिवस गेला नाही, कि महाराज एकटेच भोजनाला बसलेत.

आता महाराज थकून कोचावर बसत आहेत. बाजूला भाऊसाहेब महाराज आणि कुर्तकोटी हात जोडून उभे आहेत. महाराज आपल्या पोटाकडे तर्जनी करून बाजूला उभ्या असलेल्या भाऊसाहेबांना म्हणतात, " शिंचे, हे पोट फार मोठे झाले आहे नाही?
भाऊसाहेब नम्रतेने विचारतात, "महाराज, आपले भोजन तर इतके कमी आहे, तरी पोट इतके का मोठे दिसते?"
महाराज आपल्याकडे बघून म्हणत आहेत,' काय करणार भाऊसाहेब, लोकांचे दोष पोटात घेतो ना मी, त्यामुळे हे शिंचं एवढं मोठं झालं आहे. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसर्याचा मात्र चांगला करता येतो. पण माझ्यावर कोणी सोपवतच नाही. "
श्रीमहाराजांनी माझ्या मनातले कसे ओळखले कुणास ठाऊक! बरोब्बर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण मला फार वाईट वाट्ले बाई, किती करावं लोकांसाठी महाराजांनी! लोकांचे प्रश्न सोडवतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा प्रपंच ठीकठाक करून त्यांना नामाला लावतात आणि वर त्यांचे दोष ही पोटात घालतात. काय म्हणावं, या, करुणेला!

थोड्याच वेळात आता महाराजांचे कीर्तन सुरु होणार आहे, म्हणे . कीर्तनाची तयारी होते. पेटी तबलावाले येऊन बसलेत समोर. बघूया तरी काय होणार आहे!
एवढ्यात पूज्य आईसाहेबांना कोणीतरी हात धरून खुर्चीमध्ये आणून बसवतात. दिसत नसले तरी आईसाहेबांचे डोळे हा संपूर्ण सोहळा मन:चक्षूंनी अनुभवत आहेत असे स्पष्ट जाणवते आहे. आईसाहेबांच्या बाजूला क्रमाने यमुनाबाई, दुर्गाबाई, कृष्णाबाई, जिजीमाय, त्यांच्या बाजूला श्रींच्या स्वयंपाकघरातील पलटण सौ. तुळजाकाकू, बनुताई, गोदूताई, सुंदराबाई, मथुताई, पटाईत मावशी... सगळ्या सगळ्या झाडून हजर आहेत.
आता श्रीमहाराज कीर्तनाला उभे राहिले आहेत. अंगात भरजरी कफनी, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर त्रिपुंड, तेजस्वी चेहरा.. आज श्रींचे रूप सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. श्रींनी निरूपणाला नाथांचा रामजन्माचा अभंग घेतला आहे. आज श्रींच्या वाणीला विलक्षण बहर आलेला आहे, जणू सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचते आहे.
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ।
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥
असे शब्द माझ्या कानावर पडत आहेत. सूर्य माध्यान्ही आलेला आहे आणि बरोबर साडे बारा वाजता एकच शंखनाद आणि तुताऱ्यांचा घोष सुरु झालाय. श्रीरामाचा जन्म झालेला आहे.
सगळीकडे आनंदी आनंद... जमलेली समस्त मंडळी रामावर फुले उधळत आहेत . श्रींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. उपस्थित सर्वच जण भावविवश झाले आहेत. थोरल्या श्रीरामाच्या मुखावर सुमधुर हास्य विलसते आहे.
"जानकी जीवन स्मरण जय जय राम", "जय जय रघुवीर समर्थ "असे म्हणून महाराज कीर्तन संपवतात आणि हात जोडतात तो त्यांच्या मुखातून सद्गदित स्वरात शब्द बाहेर पडतात, "श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजस योग मुद्रा |"
हे म्हणत असतांनाच गाभारातल्या रामाच्या गळ्यातील दोन गुलाबाची फुले श्रीमहाराजांच्या हाताच्या ओंजळीत येऊन पडतात. आणि महाराज रामापुढे साष्टांग नमस्कार घालतात.
इकडे बाळरामाला कुंची, काजळ, चंदनाचा टिळा , गळ्यात सोन्याचा हार, दृष्ट लागून नये म्हणून तीट लावून पाळण्यात झोपवण्यात आले. इतकं गोड ध्यान दिसतंय ते म्हणून सांगू! मग कृष्णाबाई आणि मुक्ताबाईं पाळण्याच्या दोन्हीं बाजुंनी बसल्या.
आता बाळ रामाला घेऊन," कुणी रामचंद्र घ्या, कुणी राजीवलोचन घ्या, कुणी कौसल्यानंदन घ्या, कुणी पुरुषोत्तम घ्या... "असे म्हणत एकदा पाळण्याच्या खालून तर एकदा वरून असे एकमेकींच्या हातात देत आहेत.
मज्जाच वाटली मला बाई, या माणसांची! एकीकडे हे रामकर्ता आहे असं मानतात अगदी आपला जन्मसुद्धा रामप्रभूचे देणे आहे असे समजतात आणि इकडे त्याचाच जन्मोत्सव करतात.

नंतर हळुवारपणे बाळ रामाला पाळण्यात झोपण्यात येते. आणि एक सुवासिनी येऊन त्याच्या कानात ' श्रीराम' असे बोलून कुर्र्रर्र्रर्र्र करतेय.
श्रीमहाराज कोचावर बसून कौतुकाने हा सोहळा न्याहाळत आहेत.
इतका वेळ स्वयंपाक घरात काय हवे नको बघणारे ब्रम्हानंद बुवांनी तत्परतेने सुंठवडा भरलेले ताट आणले आहे. सर्वांना प्रसाद दिला जातोय.
इकडे एका सवाष्णीने बसून आपले पाय लांब करून बाळरामाला पायावर झोपवलेलं आहे. आणि ती आता त्याला कोमट पाण्याने स्नान घालत आहे.
स्त्रिया पद म्हणत आहेत, "न्हाणे घालती प्रभूशी शुद्ध जळी हो, तया निर्मळा न्हाणीती शुभ वेळी हो .... "
गम्मत म्हणजे स्नान संपताच, आपल्याच पायाच्या अंगठ्याची माती त्या सवाष्णीने बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या कपाळी लावली. आणि आता एका शुभ्र धूत उबदार वस्त्रात गुंडाळले जात आहे. आणि काजळ लावून त्याला पुन्हा पाळण्यात झोपवुन त्याचा झोपाळा हळूच दोरीने ओढते. आणि आता एकेक करून सगळ्या स्त्रियांची रघुराईला झोका देण्यासाठी झुंबड उडाली आहे.
अश्या रीतीने अतिशय भावपूर्ण वातावरणात श्रींच्या लाडक्या रामाचा जन्मोत्सव पार पडलेला आहे.

आज श्रींचा उपास आहे. लहान मुले सोडली तर सर्वांनी उपास केलेला आहे.
प्रत्येकाला उपासाचा फराळ मिळणार आहे. आज सकाळी उठल्या उठल्याच मी झाडाच्या शेंड्यावरून डोळे चोळत चोळत बघितले होते, एका शेतकर्याने गाडाभर उकडलेली रताळी आणून महाराजांच्या चरणी अर्पण केली होती. किती मज्जा ना!
वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, ताक त्याचबरोबर फलाहार ही आहे.
महाराज रामाला नैवेद्य देत आहेत. अगदी प्रेमाने रामरायाजवळ बसून त्याला घास भरवत आहेत. हे इतके सुंदर दृश्य पाहून नकळत आपलेही डोळे ओलावतात.
रामाच्या ताटातला थोडा प्रसाद चुलीवरच्या प्रसादात कालवला जातोय .त्यानंतर 'जय जय श्रीराम , 'जय जय श्रीराम' च्या गजरात फराळ वाढायला सुरु होते. पंक्तीवर पंक्ती उठत आहेत. आज गोंदवल्यात भक्तीचा महापूर लोटला. आहे.
गेले ८ दिवस, गुढीपाडव्यापासून सुरु असलेले रामाचे नवरात्र, उद्या दशमीला त्याचे पारणे करून सांगता होणार आहे.
मी बघितले, श्रीमहाराज स्वतः वाढायला उभे राहिले आहेत. कफनी कंबरेला बांधली आहे. आणि आता ते वरईचा भात वाढत आहेत. एकेकाजवळ जाऊन महाराज आपुलकीने चौकशी करून त्याला अगदी आग्रहाने वाढत आहेत.
आई सांगायची, आपल्याकडे आलेली प्रत्येक व्यक्ती नव्हे नव्हे प्रत्येक प्राणिमात्र ही रामाने पाठवली आहे आणि ती रामाचा पाहुणाच आहे, हि श्रींची धारणा आहे आणि आयुष्यभर हीच खूणगाठ बांधून ते गोंदवल्यात येणाऱ्या प्रत्येकाला ते वागवतात. त्यामुळे इथे येणाऱ्या स्त्रियांनाच काय पुरुषांनाही हे माहेरच वाटावे इतका गोडवा भरला आहे या स्थानी.
कमाल म्हणजे, बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज अगदी बोलावणे पाठवून भोजनाला आमंत्रण देत आहेत... नव्हे नव्हे, स्वतः हात धरून घेऊन येऊन बसवत आहेत. अश्या कैक पंक्ती उठतात. आता गावात एकही व्यक्ती जेवायचा राहिला नाही ही खात्री करून मग ही करुणासिंधु माउली आपल्या निकटवर्तीयांसोबत फराळाला बसते. रामाचे ताट श्रींना देण्यात येते. तर ते उठून प्रत्येकाच्या पानात त्यातला घासभर प्रसाद देत आहेत.
अश्या रीतीने सर्वांचा फराळ झाल्यावर उशीराने माजघरातील स्त्रिया भोजनाला बसतात.
तेव्हा महाराज परत उठून कंबरेला कफनी बांधतात, " गेल्या १० दिवसांपासून माझ्या मुलींना खूप काम पुरलेय... पहाटेपासून चुलीपुढे राबत आहेत बिचार्या " असे म्हणत, गंगुबाई, मुक्ताबाई, बनुबाई पटाईत मावशी यांना स्वतः वाढत आहेत. त्या मुलीही कृतज्ञतेने आलेले अश्रू पुसत श्रींकडे बघत आहेत.
सगळी आवरासावर झाल्यावर श्रीमहाराज परत कोचाकडे जरा आडवे व्हावे म्हणून येतात.. पण तेवढ्यात पंढरपूरला परत जाणारी मंडळी श्रींच्या दर्शनाला येतात, महाराज पुन्हा उठून बसतात. त्यांनी प्रसाद घेतलाय याची खात्री झाल्यावर गप्पा सुरु होतात. लोक नमस्काराला येत आहेत, महाराज एकीकडे या लोकांशी बोलत या लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत. कोणाच्या मुलीचे लग्न होत नाही, तर कोणाची शेती सावकारात अडकली आहे, तर कोणाचा मुलगा उनाडक्या करतोय, कोणाकडे अत्यंत गरीबी. महाराज सर्वांना रामनामाचे महत्व वारंवार पटवून सांगत आहेत!
दिवेलागणी व्हायला आलीय . मंदिरातली गर्दी संपत नाहीये. आता थोड्याच वेळात म्हणजे रात्री ८ वाजता म्हणे पालखी निघणार आहे, रामरायाची! रामाच्या पुढे मोठ्या समया तेवत आहेत. कोचाच्या मागे असलेल्या भिंतीवर असलेल्या कंदिलाने भिंत उजळून गेली आहे. मंदिरातल्या कोनाड्यात मातीचे तेलाचे दिवे, पणत्या लावण्यात आल्या आहेत.
मी जरा सावरून बसले. बाहेर फुलांच्या माळांनी पालखी सजवणे सुरु आहे. मशाली पेटवल्या गेल्या आहेत, श्रीमहाराज 'जानकी जीवन स्मरण जय जय राम' असे म्हणत कोचावरून उठतात. आणि "जय श्रीराम, जय श्रीराम" या जयघोषात श्रीरामाच्या छोट्या मूर्तीना पालखीत स्थानापन्न केले जाते. आणि अश्याच जयघोषात पालखी नगरप्रदक्षिणेला प्रस्थान करते. आपल्या लाडक्या रामाचे दर्शन सर्व गावाला व्हावे अशी श्रींची इच्छा असते. आज महाराज स्वतः चवऱ्या ढाळायला उभे आहेत. .. मधेच अत्यंत प्रेमाने रामरायाच्या मुखाकडे बघत आहेत. गाणी, भजने गात पालखी रवाना होते.
आणि इकडे मी सुटकेचा निश्वास टाकला. भयंकर भूक लागली होती. चांगलाच उपास घडला होता. समोर पहिले तर रामरायाच्यासमोर फराळाच्या प्रसादातील काही शिते पडली होती. मंदिरात तुरळक गर्दी होती.. आता मी ते निर्धास्तपणे खाऊ शकणार होते.
अश्या रीतीने रामाचा प्रसाद मलाही मिळाला ! प्रसाद ग्रहण करतांना वारंवार रामाच्या, सीतामाईच्या, लक्ष्मणाच्या मुलायम चरणांना स्पर्श होत होता. खूपच छान वाटत होते. वर बघितले तर रामराया इतका गोड हसत होता. सीतामाई, लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर ही सुमधुर हास्य होते. . अन मी बघितले की रामाच्या डाव्या हातात धनुष्य असल्याने उजव्या हातात फक्त एक गुलाबाचे फुल होते. मी थोडा धीर एकवटून रामाच्या हातावर जाऊन बसले! आता अगदी जवळून दिसत होता रामराया. मानेवर रुळणारे कुरळे केस, रत्नजडित मुकुट, काळेभोर डोळे, त्याची नाजूक जीवणी, उंच कपाळ, कपाळी गंध, गळ्यात मोत्याच्या माळा, सोन्याचा चपलाहार, हातात सोन्याची कडी, बोटात अंगठ्या, बाजूबंद, असा देखणा, राजबिंडा दिसत होता रामराया.. हे रूप बघत बघत माझा तिथेच डोळा लागला.

पालखी जाऊन बराच वेळ झाला होता. एवढ्यात दूरवरून टाळ- चिपळ्यांचा आवाज, त्यापाठोपाठ भजने ऐकू यायला लागली. अगंबाई, नगर प्रदक्षिणा घालून पालखी परत आली वाटते! म्हणत मी गडबडीने रामाच्या करतलावरून उडी मारली ते सरळ समोर उभ्या मारुतीरायाच्या मागेच अन् लपून बघू लागले.

।। छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप ।।
श्रीमहाराज उत्कटतेने भजन म्हणत होते. दिंडी दरवाजात असतानांच पालखींवरून लिंबलोण उतरवून टाकण्यात आले. आणि टाळ - मृदंगाच्या आवाजात रामरायाची आरती करण्यात येतेय.
बराच अंधार झालेला आहे. मशालींच्या उजेडात पालखी आत येते. श्रीमहाराज रामरायाला सन्मानाने उचलून गाभाऱ्यात बसवतात. त्याबरोबर एकच जयजयकार होतो. रामावर फुले उधळली जातात. आणि पुन्हा रामाची आरती होतेय. समयांच्या प्रकाशाने गाभारा उजळून निघाला आहे.
फराळासाठी आता दूध, केळी देणार आहेत. रात्री ११ वाजता मंडळी प्रसादाला बसतात. तेव्हा श्रीमहाराज त्यांना उद्देशून म्हणत आहेत, कि नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्याचे ध्येय नाही. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि उपासनेला नामासारखा उपाय नाही. म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवतो. प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली."

प्रसाद आटोपल्यावर सर्वत्र निजानीज होते. बरीचशी मंडळी दशमीचे पारणे करूनच जाऊ म्हणून मुक्कामी थांबली आहेत. काही गावामारुतीच्या मंदिरात झोपायला गेली तर काही मंदिरातच रामासमोर इकडे तिकडे झोपली आहेत.
रात्री महाराज कंदील घेऊन सर्वांची झोपण्याची व्यवस्था झाली आहे, हे पाहून शेजघराकडे रवाना होतात. जाता जाता बाजूलाच असलेल्या
आईसाहेबांच्या शेजघरात डोकावतात. कंदील वर करून बघतात तो आईसाहेब पाटावर बसून स्वस्थतेत माळ ओढत रामनाम घेत बसल्या आहेत.
समाधानाने मान डोलवत महाराज आपल्या शेजघरात येतात. पलंगाच्या बाजूला पाटावर कंदील ठेवून त्याची वात बारीक करून थोडा वेळ तेही नाम घेत बसतात. बऱ्याच उशिराने हातातली माळ कंदिलाजवळ पाटावर ठेवून झोपी जातात.
आणि आपल्याला इकडे माजघरात भुईमुगाच्या २-४ शेंगा सापडल्या आहेत. आपण त्या घेऊन कुठे बरं या फोडून खाव्यात या विचारात मागचा पुढचा विचार न करता महाराजांच्या शेजघरात प्रवेश करतो. महाराज शांत चित्ताने डाव्या कुशीवर वळून निजलेले आहेत. आपण पलंगाखाली सुरक्षित जागा बघून शेंगा फोडायला सुरुवात करतो.
आणि त्या आवाजाने महाराजांची झोपमोड होते. महाराज कुशीवरून हात टेकून उठतात, आणि कंदिलाची वात जरा मोठी करून ,' कोण ते?' असे म्हणतात.
आपण एकदम दचकतो. त्या क्षणी हे ही आठवते की आई म्हणाली होती, महाराज दयासिंधु आहेत. ते कोणाचेही मन दुखवत नाही.
मग धीर करून आपण पुढच्या दोन पायात शेंगदाणा पकडून श्रींना सामोरे येतो. महाराज हसत हसत म्हणतात, ' तू आहेस होय" ! तू जेवायची राहिली होतीस वाटते.' असू दे असू दे ! चालू दे तुझं! " असं म्हणत आपल्याला जवळ घेतात, आणि पाठीवरून त्यांचा कोमल हात फिरतो. भर उन्हाळ्यात इतके गारेगार वाटते म्हणून सांगू.. जणू चांदण्यांची शीतलताच अनुभवतोय! समाधीच लागली आपली! त्रेतायुगात रामरायाने खारुताईच्या पाठीवरून हात फिरवला होता ना, तेव्हा अगदी असेच झाले असेल तिला. आणि त्या क्षणी जाणवले की या खोलीत एकसारखा रामनामाचा ध्वनी ऐकू येतोय. कुठून येतोय बरं? तर श्रींच्या अंगप्रत्यांगातून येतोय.
त्या क्षणी असे वाटून गेले की आपल्यालाही मनुष्यासारखी वैखरी वाणी असती तर!

तेवढ्यात आपल्या अंगावर पाण्याचे दोन चार टपोरे थेंब पडतात. पाठोपाठ शब्द कानावर येतात.,

शङ्खमध्ये स्थितं तोयं भ्रमितं केशवोपरि।
अङ्गलग्नं मनुष्यानाम् ब्रह्महत्यायुद्धं दहेत्॥
तथास्तु! तथास्तु... !! तथास्तु ..!!! !

.... रामाssss आपण इतका वेळ समाधी मंदिरात होतो तर!

जय श्रीराम!

संस्कृतीधर्ममुक्तकविचारआस्वादलेख

प्रतिक्रिया

छानच लिहिलंय. रामनवमीचा उत्सव वर्णन सुंदर केलंय.
काही संतपुरुष असतात. गोंदवल्याचं रामनवमी अन,
अन्नदान तर मोठा विषय.

जयश्री राम

आर्या१२३'s picture

20 Apr 2024 - 12:52 pm | आर्या१२३

धन्यवाद, उग्रसेन

Bhakti's picture

20 Apr 2024 - 2:03 pm | Bhakti

सुंदर लिखाण!
नगरचे चिंतामणी डॉक्टर गोंदावले महाराज यांचे मोठे भक्त. यांनी थोरले श्रीराम मंदिर नेप्ती इथेही उभे केले आहे.आम्ही नेहमी जातो.मी तर १० किमी रनिंग करत एकदा गेले होते.इतकी सुंदर बाग बनवली आहे त्यांनी,...ना ना प्रकारची फुलझाडे,नक्षत्र बाग,गोठा , सुंदर राम मूर्ती!
वानप्रस्थाश्रमासाठी त्यांनी खूप आधीपासून ही तयारी सुरू केली होती.ते पाहून आपलाही वानप्रस्थाश्रम असाच असावा मला वाटत राहतं.
यंदा रामनवमीला आम्ही गेलो तेव्हा असाच भगर,आमटी,ताक, बटाटा भाजी,केळी, राजगिरा लाडू आणि अखंड श्रीराम नामस्मरण हाच आहार होता.