विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
18 Oct 2023 - 8:20 pm

एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्‍यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो.

आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्‍यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते. खरं तर उडत्या चालीची गाणी करणारा आणि त्यातही 'कॉपी-पेस्ट' करणारा म्हणूनच अनू मलिक कुप्रसिद्ध आहे. पण बहुतेकदा असं होतं की, शंभरातून तो एखादं असं मास्टरपीस गाणं लोकांसमोर देतो की त्या एका गाण्यासाठी त्याचे आधीचे शंभर गुन्हे माफ केले जातात. अनू मलिकची चेष्ठा करणारी लोकही त्याच्या या गाण्याबद्द्ल त्याचे आवर्जून कौतूक करताना दिसतील. 'मोह मोह के' खरं तर अशक्य भारी गाणं आहे, वरूण ग्रोव्हरच्या अर्थपूर्ण शब्दांना पॅपॉन आणि मोनाली ठाकूरने अतिशय कमालीचे सुंदर गायलेय, पण मला त्या गाण्यात सर्वात जास्त काही आवडलं असेल तर त्याच्या अंतर्‍यात वाजणारा सनईचा तो पीस.!!

अगदी तसंच दुसरं आठवणारं गाणं म्हणजे, शंकर एहसान लॉय या त्रयीने संगीत दिलेलं भाग मिल्खा भाग सिनेमातलं 'ओ रंगरेज' हे गाणं. या संबंध गाण्यात आणि पहिल्या मुखड्यानंतर वाजणारी सारंगीची धून माझ्या अत्यंत आवडीची अगदी पक्की लक्षात राह्यलेली आहे, इतकी की श्रेया घोषालच्या गोड किंवा जावेद बशीरच्या त्या विशिष्ट घोगऱ्या आवाजापेक्षा, सारंगीच्या त्या मधाळ धूनसाठी ते गाणे मी कैकदा ऐकलंय. संध्याकाळी ऑफिसातून निघालेलो असतो, तेव्हा नेमकं पश्चिमेकडे लाली पसलेली असते. थोडक्यात कातरवेळ सुरू होते, आणि त्या सर्वांग सुंदर दृश्याकडे पाहत हायवेवर एका लयीत चालणारी बाईक आणि कानातल्या हेडफोन्सवर वाजणारं 'ओ रंगरेज' गाणं सोबत त्यातली सारंगीची धून म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा परमावधी.

९० च्या दशकातली अशी फारशी गाणी आठवत नाही, जी काही आठवतात ती एक तर रेहमानची असतात किंवा जतीन ललितची. रेहमानने हिंदीत १९९९ साली सुभाष घईंच्या तालसाठी जी गाणी दिली, तो संपूर्ण अल्बमच मास्टरपीस प्रकारात मोडणारा होता. पण त्यातलं पटकन आठवणारं म्हणजे सुखविंदरच्या पहाडी आवाजातलं 'करीये ना' हे गाणं आणि त्यात वाजलेला घटम्! सुरूवातीला त्या वाद्याचं नाव मला माहिती नव्हतं, पण पुढे काही वर्षांनी इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर घटम् हे नाव कळालं आणि ते लिलया वाजवणार्‍या विक्कू विनायकरम या दाक्षिणात्य अवलियाबद्दलही वाचायलं मिळालं. जशी तालची गाणी, तशीच जतीन ललितने संगीत दिलेली येस बॉसची गाणी आणि त्यातल्या 'मै कोई ऐसा गीत गाऊ' या गाण्यात वाजलेले सॅक्सोफोन.! अभिजीत भट्टाचार्यची काही मोजकी गाणी मी कायम ऐकतो, त्यातलं हे एक गाणं त्याच्या आवाजासाठी जसं ऐकतो तसंच त्यातल्या सॅक्सोफोनसाठीही.

बाकी ९० च्या दशकातलं इतर आठवण्याजोगं काही नसलं तरी त्याआधीच्या ८०च्या दशकात आणि ९०च्या सुरूवातीला काही मोजक्या सिनेमांसाठी संगीत दिलेले शिव-हरी म्हणजेच ऑल टाईम लिजेंड्सच्या यादीतले संतूरवादक दस्तुरखुद्द शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांची अवीट गोडीची गाणी कधीही न विसरता येण्याजोगी !! म्हणजे मला एकवेळ स्वित्सर्लंड्च्या स्वर्गीय वातावरणात पिवळ्या शिफॉन साडीतली पदर वर धरून नाचणारी श्रीदेवी आठवणार नाही, पण तेच 'तेरे मेरे होंठो पे' या अफाट सुंदर गाण्याच्या सुरूवातीतली बासरीची धून आणि मग संबंध गाण्यात वाजणारी संतूर आणि या दोन्हीवर साज चढवणारा लताबाईंचा गोड आवाज, अगदी अर्धवट झोपेतही उठवल्यानंतर या गाण्याशी एका सेकंदाच्या आत एकरूप करून सोडतोच. चांदणी, लम्हे, सिलसिला आणि शाहरूखच्या डरची या द्वयींची सगळीच्या सगळी गाणी कधी ऐका आणि मागाहून मला धन्यवाद द्या.

या सगळ्यात मराठीमध्ये आत्ता या घडीला आवर्जून आठवणारं एकमेव नाव म्हणजे अजय-अतुल. ही जोडी ठाऊक नाही असा एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही सद्यस्थितीला, इतकं प्रचंड आणि रसिकांना आवडणारं काम त्यांनी गेल्या दशकभरात करून ठेवलंय. मराठीत तर केलंच आहे, पण त्यासोबत हिंदीतही आपल्या नावाचा डंका त्यांनी चहुकडे वाजवला आहे. पण हे सगळं आत्ता एका बाजूला आणि त्यांनी संगीत दिलेलं रितेश देशमुखच्या माऊली सिनेमाचं शीर्षक गीत (टायटल साँग) एका बाजूला. जवळपास दहा वर्षांपूर्वी हा सिनेमा आलेला, त्यावेळी पुण्याला कामानिमित्त एके ठिकाणी बसमधून निघालेलो. हातातल्या नोकिया फोनला, जरा चांगल्या क्वॉलिटीचे हेडफोन्स जोडले आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं 'माऊली माऊली' हे गाणं सुरु केलं. या गाण्याच्या सुरूवातीलाच काही सेकंद पखवाज वाजतो, तो तुम्ही कधी नीट कान देऊन ऐकलाय का? त्या पखवाजाचा आवाज ऐकताना तुम्हाला त्यातून 'विठ्ठल विठ्ठल' असा आवाज आल्याचा भास कधी झालाय का? नसेल झाला, तर मग तुम्ही गाणं मनापासून ऐकलं नसावं कधीच. तर सुरूवातीच्या पखवाजाच्या आवाजामुळे जी ब्रह्मांनदी टाळी लागली बसच्या त्या किचाट वातावरणात, की पुढील संपूर्ण प्रवासभर लूपवर ते गाणं २५-३० वेळा ऐकतंच राह्यलो होतो. गाण्यातले गुरू ठाकूरचे अर्थपूर्ण शब्द जसे कायम लक्षात राहतील, अगदी तसंच गाण्यातला विठ्ठलाच्या जयघोषाचा भास करून देणारा पखवाजाचा तो आवाज कधीही न विसरता येण्याजोगा!

७०-८० च्या दशकातले विख्यात संगीतकार आर. डी बर्मन, हे त्यांच्या प्रत्येक गाण्यात एखाद्या विशिष्ट म्युझिक इंस्ट्रूमेंट्सचा पीस टाकण्याबाबत कायम आग्रही असायचे हे त्यांची गाणी आवडणारे दर्दी रसिकही नक्कीच मान्य करतील.

अशी इतरही अनेक गाणी आहेत, जी त्यातल्या वाद्याच्या एखाद्या विशिष्ट आणि हटके धूनमुळे त्यांचा ठसा कायमच उमटवत आली आहेत.

तुमच्या आठवणीत अशी कोणती गाणी आहेत, जी त्यातल्या एखाद्या विशिष्ट ट्यूनमुळे लक्षात राह्यलीएत?

वावरकलासंगीतप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

18 Oct 2023 - 9:07 pm | धर्मराजमुटके

बाकी सगळं ठीक पण बाईक चालवताना कानात हेडफोन घालून कमी असो वा जास्त आवाजात गाणी ऐकू नका ही मनापासून विनंती. लेखावर विरजण टाकणारा प्रतिसाद दिल्याबद्द्ल क्षमस्व !

तुषार काळभोर's picture

18 Oct 2023 - 9:13 pm | तुषार काळभोर

लेखकाचे नाव तीन चार वेळा वाचून पुन्हा पुन्हा खात्री केली की नाव चुकीचं तर वाचलं नाही ना!
आमिर खानसारखं वर्षातून एकच लेख लिहायचा संकल्प आहे की काय?

गवि's picture

18 Oct 2023 - 9:22 pm | गवि

होपलेस आहे केस अगदी.

मागे एकदा दहावी क कथा लिहायला घेऊन अगदी रंग भरत आल्यावर सोडलीन. नैसर्गिक लिखाणाची शैली
आणि प्रचंड पोटेन्शियल पण.. आळसाने वाया घालवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2023 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> होपलेस आहे केस अगदी.

नाविलाजाने सहमती. :/

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

18 Oct 2023 - 10:42 pm | तुषार काळभोर

पण लेखाशी मनापासून सहमत.
विठ्ठल विठ्ठल गाण्याविषयी .. गिटारच्या स्वरांनी हलकी सुरुवात होते. काही सेकंदाने त्याला टाळाची जोड मग शंखध्वनी आणि मग तो परिचित पखवाज. पुढे पाच मिनिटे निव्वळ सुख! रिपीट - परत एकदा सुख.. रिपीट - परत एकदा सुख.. कितीही वेळा!

विंजिनेर's picture

19 Oct 2023 - 1:49 am | विंजिनेर

शंकर एहसान लॉयचं रॉकफर्ड सिनेमातलं आसमां के पार आठवलं. त्यात २:४५ ला सुरू होणारा ९-१० सेकंदाचा व्हॉयोलिनचा पीस असाच वेड लावणारा आहे

ती प्रत्यक्ष संवादाविना प्रतिसादातून पोहचविणं हे एक आव्हानच आहे. तरी पण प्रयत्न करून बघतो.

तसं पाहायला गेलो तर वाद्यमेळाच्या बाबतीत ज्यांचा नेहमीच दबदबा असतो असे संगीतकार सहसा आत्ताच्या चर्चेत दिसणार नाही. याचं कारण म्हणजे काही तरी अचंबित करणारा अनुभव देण्यामध्ये हि मंडळी कमी पडतात. वाद्यमेळाच्या सुरेख लडी सुरवातीला आणि इंटरल्युडमध्ये वापरणं हिच त्यांची खासियत असते. असो. मी काही मला भावलेल्या गाण्यांचं मी संगीतकारांनुसार वर्गीकरण केलं आहे ते या प्रमाणे:

  1. शंकर जयकिशन: संगीत देण्याच्या त्यांचा आवाका आणि गाणं सजवणं हे केवळ थक्क करणारे असायचे. आणि त्यातही चमकून आपण नक्की काय अनुभवलंय असा परीणाम करणारी त्यांची गाणी अशी:
    • सिनेमा: दिल एक मंदिर. गाणं: "याद ना जाये बिते दिनों की". यातला अगदी काही सेकंदाचा अकोर्डीअनचा पीस. याच सिनेमातलं दुसरं गाणं म्हणजे "रुक जा रात ठहर जारे रे चंदा". या गाण्याच्या सुरवातीचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: प्रोफेसर. गाणं: "आवाज देके न हमें तुम बुलाओ". यातला गाण्याच्या सुरवातीचा तबल्याचा वळसा.
    • सिनेमा: झुक गया आस्मान. गाणं: "मेरे तुम्हारे बीच में अब तो ना परबत ना सागर". यात धृपदताच वापरलेला तबल्याचा वळसा.
  2. मदन मोहन: निव्वळ मधाळ संगीत. वाद्यमेळ नसता तरी देखील भावलं असतं अशा चाली. तरी पण काही तरी विस्मयकारक परिणाम ते निर्माण करीत असत.
    • सिनेमा: दुल्हन एक रात की. गाणं: "मैं ने रंगली आज चुनरिया सजना तोरे रंग में". सुरुवातीचा वाद्यमेळ एकदम थबकतो आणि काही सेकंदांनंतर सुरु होतो सतार आणि बासरीचा मुखडा.
  3. सी. रामचंद्र: मधाळ संगीतासाठी अजून एक दिग्गज नाव.
    • सिनेमा: अमरदीप. गाणं: "मेरे मन का बांवरा पंछी क्यों बार बार डोले". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर अचानक येणारा तबल्याचा वळसा.
  4. आर. डी. बर्मन: आर. डी. ने स्वतःच्या चालींपेक्षा आपल्या वडिलांच्या चालींसाठी खुप सुंदर वाद्यमेळ रचला असं मला वाटतं.
    • सिनेमा: तलाश. गाणं: "कितनी अकेली, कितनी तनाहा". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर येणारा गिटारचा झंकार आणि अगदी काही सेकंदांचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: शर्मिली. गाणं: "मेघा छाये आधी रात". सुरवातीचा वाद्यमेळ काहीतरी उडत्या चालीचं गाणं असेल अशी वातावरण निर्मिती करतो आणि अचानक सतार, तबला आणि बहुदा अकोर्डीअन चा चकीत करणारा पीस येतो.
राघव's picture

19 Oct 2023 - 2:01 pm | राघव

एस. डी. बर्मनः

  • सिनेमा: काला बाझारः खोया खोया चांद.. त्यातली कडव्यांमधलीच बासरीची अप्रतीम कलाकारी.. आणि ओ हो हो म्हणतांनाचा दिलेला इको इफेक्ट! निव्वळ अप्रतीम!
  • सिनेमा: गाईडः पिया तोसे नैना लागे.. त्यातलं दर कडव्याच्या शेवटाला टीपेला नेलेला गजब वाद्यमेळ!

ओ. पी. नय्यर:

  • सिनेमा: तुमसा नही देखा: यूं तो हमने.. त्यातला केवळ एक टिंग! दर कडव्याच्या शेवटी येणारा.. त्याच्याशिवाय गाणं अगदी अपुरं वाटतं!
  • सिनेमा: कश्मीर की कली: है दुनिया उसीकी.. यातला सॅक्सोफोन.. लाजवाब!

शेप ओफ यू हे गाणं वेस्टर्न मध्ये सुरूवातीचे बिट्स आणि हून हा वगैरे म्हणतो ते आणि तेच कर्नाटिक क्लासिकल धूम ताना ना...हे वाजत ती ट्यूनच खुप वेळा ऐकते.
बाकी लेखामधले सगळ्या ट्यून कानात आपोआप वाजल्या.

विअर्ड विक्स's picture

20 Oct 2023 - 10:25 am | विअर्ड विक्स

माझे पण एक दोन मोती

१. बाहुबली - किरावानी ची व्हायोलिन पिस जबरी आहे . व्हायोलिन सारखे वाद्य रण वाद्य स्वरूपात वापर निव्वळ अशक्य आहे. गाणी व पार्श्वसंगीत दोन्ही अव्वल दर्जा
२. मेरे सनम - " पुकारता चला हू में " गिटार वर मस्त खेळलेले गाणे आहे
३. दिल चाहता है - सगळी गाणी - शंकर एहसान लॉय ने धुमाकूळ घातलाय . " जाने क्यू " गाण्यात ते ऑस्ट्रलियन वाद्य " डीजेरीदू " चित्रविचित्र आवाज वाले पण सुखावते. तन्हाई गाण्यातील पोकळी फास्ट पेस वाद्याने कशी साधली हि एक किमयाच आहे . " वो लाडकी है कहा " यात बासरी चे पीस भारी आहेत .
४. नटरंग - काय नि किती लिहू "मला जाऊ ना द्या घरी" या गाण्यातील ढोलकीसाठी!!!! खेळ मांडला मध्ये सोनाली कुलकर्णी भेटल्यावर टाळवाड्याचा पीस अप्रतिम आहे .
सध्या एवढेच लिहून थांबतो

प्रसाद गोडबोले's picture

20 Oct 2023 - 11:04 am | प्रसाद गोडबोले

किसन देवा , मिपावर परत आल्याचे , लिहिते झाल्याचे पाहुन आनंद झाला :)

गाणी खूप आहेत अशी. पण सध्या मुकुल शिवपुत्र ह्यांच्या जुन्या इन्टर्व्यु मधील "जुगन जुगन हम योगी" ही कबीराची रचना डोक्यात फिरते आहे कित्येक दिवस.
https://www.youtube.com/watch?v=93YU_QJUItI&t=43s

आणि राकेश चौरसिया ह्यांचे आफ्टर्नून मेडिटेशन
https://www.youtube.com/watch?v=7LuavP-CcEc&t=826s

बाकी लिहिते रहा . जुन्या मित्रांना इथे परत आलेले पाहुन छन वाटतं

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2023 - 5:30 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

20 Oct 2023 - 5:31 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !

माझ्या कडुन वानगी दाखल :
सपनें सिनेमातील :आवारा भंवरें जो हौले हौले गायें (ए आर रेहमान - गुलजार - हेमा सरदेसाई- आणि मलेशिया वासुदेवन.
यात अप्रतिम सुरावटी आणि संगीत आहे... रोझातल्या गाण्यांची आठवण करुन देणारं

कसं जमतं लोकांना असं लिहायला? आणि असं ऐकायला?

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 8:06 pm | अमरेंद्र बाहुबली

विठ्ठल विठ्ठल गाण्या बद्दल सहमत, असंख्य वेळा एकतो गाणं
तसंच मोरया सिनेमातील मोरया गाण्याचं संगीत ऐका निव्वळ अप्रतिम. सुरूवातीचा आलाप (का काय म्हणतात ते) संपल्यावर जे ताशा नी ढोल ज्या लयीत वाजतात ते कुठलंच ढोलपथक वाजवू शकत नाही. हेडफोन घालून लगेच ऐका, १.२० पासून पुढे खास करून. https://youtu.be/DPH4r-nRNE0?si=HlO6RC8-IAsdtlsC

मराठीतील आतापर्यंत सर्वात सुंदर, कल्पक नी श्रवणीय गाणं बनलं असेल तर माझ्यामते अगं बाई अरेच्चा मधलं प्रभातगीत हे गाणं सिनेमाचा१९६०-८० -२००० चा काळ एकामागे एक ऊभं करत जातं.
पहात पहात ऐका
https://youtu.be/8YpbLqps_w4?si=auX3GvNznZFBfAZj

तसंच चम चम करता है नशीला बदन मधली एक धून पण भारीय.
बाकी अंकीत तिवारी हा गायक अरजीतसींगमुळे झाकोळला गेलाय. त्याची गाणी भयानक सुंदर असतात. एकदा अंकीत तिवारीची प्लेलीस्ट प्ले करून पहा.
मी चारचाकीत जाता येताना हे लव मॅशप प्ले करून ऐकत बसतो.
https://youtu.be/mUtW9z8_cOY?si=DQLltd7HTcF3JUUx

इंग्रजी आवडते गाणे.
ओन एंड ओन
हर्लीस इन हवाई
लेट मी लव यू
अलोन
अजून बरेच आहेत पण आठवेना.
रच्याकने गाणे ऐकून ऐकून पण बोर व्हायला होतं. मग ध्रूव राठीचे विडीओ ऐकत बसतो.

रच्याकने सध्या टीवीवरच्या म्यूसीक चॅनल्स वर सतत रडते गाणे चालू असतात. त्यात एखादं दनदनाट करनारं गाणं लागलं की माझा सव्वा वर्षाचा मूलगा मस्त ठेका धरतो. तेवढाच काय त्याचा डांस पहायला मिळतो. लॅपटाॅप किंवा स्पिकरवर गाणं लावलं तर तो आजिबात नाचत नाही. गाणं टीवीवरच हवं नी दनदनाट करनारंच हवं तरच भट्टी जमून येते. आपण स्क्रिन मीररींग करून लावावं तर तेही त्याला चालत नाही. (कसं कळतं काय माहीत) :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Dec 2023 - 11:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा अवलिया भारतीय सिने सृष्टीत धूमकेतु सारखा अवतरला आणि ३-४ चित्रपटांना संगीत देउन निवर्तला. अर्थात पाकिस्तानात आणि जगभरात ते आधी लोकप्रिय होतेच.

जावेद अख्तर बरोबर "संगम" हा त्यांचा अल्बम साधारण १९९७ मध्ये आला त्यातील अनेक गाणी सुंदर असली तरी "आफ्रीन आफ्रीन" या गाण्याने सगळ्यात जास्त विक्रम केले. त्यातील सानीधपमगनीसा-सानीधपमगरेगसा या सुरुवातीच्या आलापाबरोबर वाजणारा ढोलक आणि घटम(यानंतर कोरस सुरु होतो) सुंदरच आहे.

मग बॉबी देओल आणि ऐश्वर्या रायचा पडेल "और प्यार हो गया" हया चित्रपटाचे त्यांचे संगीत .पुन्हा जावेद अख्तरचे शब्द आणि नुसरत साहेबांचा साज "फूलो पर शबनम की नमी है,रंगो की मेहेफील सी जमी है,मौसम भी मंजर भी मै भी ,कहते है बस तेरी कमी है" प्रत्येक ओळीनंतर येणारा म्युझिक पीस मस्तच.

पण त्यांचे माझ्यामते सगळ्यात भारी काम म्हणजे कच्चे धागे चित्रपटाचे संगीत. प्रत्येक गाण्यात अनवट पहाडी धून "तेरे बिन नै जीना मर जाना ढोलणा" च्या ईंटरल्युड मधील वाद्यमेळ, "खाली दिल नही जान भी" मधील ढोलक आणि व्हायोलीन मस्त.

बाकी प्रतिसादांमधील अजय-अतुल आणि शिव-हरी यांच्या संगीताबद्दल सहमत.