अपरिचित पोलो

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
21 May 2022 - 9:11 am

भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.

भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते. सगोल कांग्जेई हा क्रीडाप्रकार म्हणजे मणिपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन प्रकारच्या हॉकी खेळांपैकीच एक क्रीडाप्रकार होता. मणिपूरमध्ये मार्जिंग (पंख असलेला घोडा) या पोलो देवतेची उपासना करणाऱ्या स्थानिक समुदायात हा खेळ खेळला जात असे. तसेच स्थानिक लाई हाराओबा उत्सवात पोलो खेळणाऱ्या खोरी फाबा या खेळाच्या देवाची पूजा केली जाते. यावरूनच पोलो हा प्राचीन मणिपुरी खेळ असून इ. स. पहिल्या शतकात त्याचा उदय झाल्याचे संकेत मिळतात. पोलोला मणिपुरी भाषेत सगोल कांग्जेई, कांजाई-बाझी किंवा पुलु म्हटले जात असे.

मणिपूरमधील पारंपारिक पोलो खेळात दोन्ही संघांमध्ये सात-सात खेळाडू असतात. तेथे आढळणाऱ्या विशिष्ट शारीरिक ठेवणीच्या घोड्यांवर बसून हा खेळ खेळला जातो. आधुनिक पोलोप्रमाणे गोल करण्याची पद्धत या पारंपारिक पोलोमध्ये नाही, तर त्यामध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी घोड्यावर बसून लांब स्टिकच्या मदतीने चेंडू विरुद्ध संघाच्या बाजूकडील अंतिम रेषेपार नेणे आवश्यक असते. सामन्याच्यावेळी चेंडू उचलून नेण्याची आणि तसे करताना विरुद्ध संघाच्या खेळाडूंना त्याला थेट अडवण्याची परवानगी पारंपारिक पोलोमध्ये असे.

पोलो या खेळाला खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकार म्हणून मान्यता मिळाली ती भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर. ब्रिटिशांनी पोलोला आधुनिक, आंतरराष्ट्रीय स्वरुप दिले. त्यानंतर 1834 मध्ये आसाममधील सिल्चर येथे पहिला पोलो क्लब स्थापन झाला. 1860 च्या आसपास ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्यांनी हा खेळ ब्रिटनमध्ये नेल्यावर तेथे अनेक पोलो क्लब सुरू झाले. पुढे ब्रिटिशांनी या खेळात काही बदल करून त्याचा आपल्या अन्य वसाहतींमध्ये प्रसार सुरू केला. पण पोलोचा पाश्चात्य जगतात विस्तार जरा धीम्यागतीने होत राहिला. पुढील थोड्याच काळात या खेळाची नियमावली तयार होऊन हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाऊ लागला. सध्याच्या पोलोचे नियम पहिल्यांदाच ब्रिटनमधील हर्लिंगहॅम पोलो असोसिएशनने 1874 मध्ये तयार केले होते, पण त्यानंतर मणिपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या पोलोपेक्षा हा आधुनिक पोलो संथ बनला. परिणामी चपळता आणि घोडेस्वारीतील कौशल्यांचा अभाव या आधुनिक पोलोमध्ये दिसू लागला. संपूर्ण 19व्या शतकात या खेळावर भारतातील संस्थानिकांचे संघ आघाडीवर होते.

घोडदळातील जवानांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरलेला पोलो मध्ययुगात काँस्टँटिनोपलपासून जपानपर्यंत सर्वत्र खेळला जात असला तरी तो आधुनिक रुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तो भारतातूनच. असे असूनही आजही भारतात पोलो या खेळाविषयी फारशी माहिती आणि आकर्षण दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश भारत आणि ज्या संस्थानांमध्ये पोलो क्लब स्थापन झाले, तिथेच स्थानिक पातळीवर हा खेळ मर्यादित राहिलेला दिसतो.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/05/blog-post_21.html

संस्कृतीइतिहासमुक्तकक्रीडाप्रकटनलेखमाहिती

प्रतिक्रिया

सुखी's picture

21 May 2022 - 9:32 pm | सुखी

छान लेख

मध्यपूर्वेत "उंटांची सौंदर्य स्पर्धा" घेतली जाते. ह्या स्पर्धा तेथील लोकांसाठी खूप महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. वरून वरून विनोद वाटला तरी प्रत्यक्षांत हा विषय गंभीर आणि महत्वाचा असून ह्यावर बहुतेक रिसर्च हा राजस्थान विद्यापीठाच्या अंतर्गत होतो आणि त्याचा इतिहास सुद्धा बराच जुना आहे.

अमेरिकेत घोडयाना फारच महत्व असल्याने equestrian ह्या विषयावर भरपूर अभ्यास होतो. एके काळी उंटा प्रमाणेच अश्वविद्येंत सुद्धा भारत अत्यंत प्रगत होता. काळाच्या ओघांत हे ज्ञान लुप्त होत आहे. माझे एक पूर्वज अश्वपारखी होते. अश्वविद्येवर त्यांची काही बाडे होती ती माझ्या काकांनी कुठल्यातरी ऐतिहासिक संघटनेला दान केली. भारतीय अश्वपारखी अनेक स्पर्धा घ्यायचे आणि त्यांच्या कौशल्याने युरोपिअन लोक थक्क होऊन जायचे. एक कौशल्य म्हणजे एक वित रुंदीच्या फळीवरून घोडा चालवणे, मध्ये पोचल्यावर तो घोडा फिरवणे. ही फळी विहिरीच्या तोंडावर ठेवली जायची त्यामुळे चूक झाल्यास घोडा जखमी होण्याची शक्यता असायची. अश्वविद्येचे जनक कदाचित नकुल ह्यांना मानले जायचे.

अश्वारोहण हि पुरुषांची मक्तेदारी भारतांत नसून महिलांसाठी सुद्धा हे महत्वाचे कौशल्य मानले जायचे. बंगाल प्रांतातील अश्वारोही अनावृत्त महिलांची चित्रे/आकृती असलेल्या बरण्या LA मधील वस्तू संग्रहालयांत आहेत. ह्यांचा काळ २१०० वर्षे जुना आहे. शिलाहोत्र संहिता हे अश्वविद्येवरील पुस्तक सुद्धा त्याच काळांतील आहे.

घोडा हा भारतीय इतिहासासाठी वादग्रस्त विषय ठरला. हरप्पा मोहेंजदरो आणि वेदिक लोक ह्यांचा संबंध काय ? हा विषय जुना आहे. हरप्पन संस्कृती हि भारतीय होती आणि आर्य बाहेरून आले असे सांगण्यात आले. घोडा हा रिग्वेदांतील सर्वांत महत्वाचा प्राणी आहे. पण हरप्पांत घोड्याचे काहीही अवशेष किंवा चित्रे सापडली नाहीत. त्यामुळे हार्वर्ड चे मायकेल विटझेल (हे विद्वान असले तरी थोडे वंशभेदी आहेत) ह्यांनी थियरी काढली कि वेदिक संस्कृती हि हररप्पन संस्कृतीच्या नंतर निर्माण झाली. किंवा इतर ठिकाणी विकसित होऊन भारतांत आली आणि ह्याच मंडळींनी घोडा भारतात आणला.

त्यानंतर जणू काही हि थियरी देवानेच दिली आहे ह्या प्रमाणे इतर लोकांनी त्याला गांभीयऱ्याने घेतले आणि ह्या विषयाच्या विरुद्ध काहीही रिसर्च प्रकाशित करण्यास नकार मिळू लागला. घोडा भारतांत आधीपासून आहे आणि हरराप्पा पेक्षाही शेकडो वर्षे आधी भारतांत, राजस्थान, हरियाणा प्रदेशांत घोडा होता ह्याचे निर्विवाद पुरावे मिळाले असले तरी वैदिक संस्कृती हि कदाचित ४००० वर्षांपेक्षा जुनी असू शकते ह्या रिसर्च ला विदेशी जर्नल्स फाट्यावर मारतात.

तर्कवादी's picture

23 May 2022 - 4:40 pm | तर्कवादी

रंजक माहिती. लेख आवडला