थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
30 Nov 2008 - 3:15 pm

दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे.
मूळ लेख आणि २ व चर्चा

लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे. त्यात पुढे "अपुरे आकलन" किंवा "पुरेशा अभ्यासाचा अभाव", "पोकळ व बालीश" आणि काही मुद्यांवर "असहमती", तर काही मुद्यांवर "सहमती" अशी वाटचाल झालेली आहे.
या प्रतिसादातील एकेका मुद्याच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट करेन. त्यात लेखक म्हणून माझ्या कुवतीच्या अनुषंगाने झालेल्या टीकेला उत्तर देणार नाही.
एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप.
मुळातच माझ्या मते हा नुसता दहशतवाद नाही. दहशत पसरवणे हा एका मोठा युद्धाचा एक भाग आहे. हे युद्ध दोन असमान ताकदींमधील आहे. एका बाजूला आहे तो इस्लामचा मुखवटा पांघरून बसलेल्या पण वास्तवात आपल्या "मातृभूमी"च्या स्वातंत्र्यासाठी (ही धारणा रास्त किंवा वास्तव आहे किंवा नाही हा भाग वेगळा. ती धारणा अस्तित्त्वात आहे हे अमान्य करता येत नाही) संघटित झालेले काही समूह आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मते त्यांचे शत्रू आहेत. हे शत्रू म्हणजे कोण? तर स्वतः हे समूह सोडून उरलेला आंतरराष्ट्रीय समुदाय. तेव्हा यामगे इस्लाम हा कॉमन धागा असला तरी, प्रश्न तो नाही. प्रश्न त्याच्या पाठीमागे असलेल्या राजकीय उद्दिष्ट्यांचा आहे. मी लेखात म्हटल्याप्रमाणे इस्लामचा वापर येथे केवळ अनुयायी मिळवणे, कल्पिलेल्या संकटाचा आधार घेऊन मतपरिवर्तन घडवणे यासाठीच होतो आहे. कारण हे हल्ले करून इस्लाम सुरक्षीत होईल असे हे समूह म्हणत नाहीतच. त्या समुहाच्या वतीने हल्ले करणारे काय म्हणतात आणि त्या समुहांचे अधिकृत म्हणणे काय आहे यात तफावत का असते? त्या समुहांची भाषा राजकीय उद्दिष्ट्यांच्या समीप जाणारी असते. हल्ले करणारे अनुयायी त्या-त्या घडीला इस्लाम खतरेमेंचा नारा देत असतात. ही तफावतच स्पष्ट करते की येथे मुळातच डावपेच वेगळ्या स्वरूपाचा आहे. या समुहांचा एकही म्होरक्या (अगदी प्रभाकरन सकट) प्राणत्यागास सज्ज झालेला नाही. कधीच नाही. जे आहेत ते बिनचेहऱ्यांचे अनुयायी. हे काय आहे? आपण या समस्येची हाताळणी करताना या अनुयायांना लक्ष्य करणार आहोत, की त्यांच्यामागच्या मेदूंना असा माझा प्रश्न आहे. हे अनुयायी मिळू द्यावयाचे नसतील तर या प्रश्नाच्या मागे दडलेल्या राजकारणाला पुढे आणावे लागेल. अन्यथा 'इस्लाम', 'इस्लाम' करीत बसू आणि अधिकाधिक अनुयायी त्यांना मिळावेत अशी व्यवस्था करीत राहू.
आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात.
आयर्लंड किंवा सावरकरांदींबाबत अगदी स्वाभाविक आहे. पंजाबातील दहशतवाद्यांनीही जगभरात सरसकट हल्ले नव्हते केले. येथे ज्याला "इस्लामी दहशतवादी" म्हणतो त्या समूहाचा शत्रू मुळातच तो समूह सोडून उरलेला आंतरराष्ट्रीय समुदाय आहे. त्यामुळे त्यांनी युद्ध मांडले आहे ते त्या आंतरराष्ट्रीय समुदायाशी. या समुदायाचे जेथे-जेथे हितसंबंध असतील तेथे ते हल्ले चढवतात आणि युद्धाचाच तो एक भाग आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली अशा समुदायाला जेरीस आणण्यासाठी त्यांनी अंगीकारलेला हा गनिमी कावा आहे. सामान्यपणे युद्ध म्हटले की, सशस्त्रांवरच हल्ला करावा हे तत्त्व असते. ते येथे पाळले जात नाही, कारण युद्धातील वैरी मानला गेला आहे तो संपूर्ण समुदायच (अमेरिका नामक जीवनपद्धतीविषयीच ओसामा बिन लादेन, अयमन अल जवाहिरी ओरडत असतात). त्यामुळे त्या-त्या समुदायाच्या राज्य नामक संस्थेला नमवण्यासाठी त्या संस्थेचा पाया असणाऱ्या नागरी समुदायावर हे हल्ले होतात आणि होत राहतील. कारण त्यांची स्ट्रॅटेजी ती आहे. "इस्लाम खतरेमें है"चा नाराही दिला जातो तो अनुयायी मिळवण्यासाठी. त्यापलीकडे त्याला महत्त्व नाही, हे त्याच्या पोटात शिरल्यानंतर ध्यानी येते.
पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात.
या मुद्याचे उत्तर दोन स्वरूपांत आहे. तमिळ दहशतवादी खचितच केवळ मुस्लीम नाहीत (श्रीलंकेतील तमिळींमध्ये हिंदू आहेत, ख्रिश्चनही आहेत आणि ते एलटीटीईमध्ये आहेत. एलटीटीईच्या ब्लॅक टायगर्समधील बहुतेकांचे प्रोफाईल पाहिले तर ते हिंदू असल्याचे दिसून येईल). शीख दहशतवादी होतेच. उत्तराचा हा एक भाग झाला. सर्व दहशतवादी मुसलमान असतात असे जे म्हणतो त्यातील दहशतवादी या शब्दाला माझी मान्यताच नाही. ते दहशत पसरवतात, पण ती दहशत त्यांनी मांडलेल्या एका युद्धाचा भाग आहे. आणि युद्धातील त्यांचा समुदाय (किमान बहुसंख्य तरी) मुस्लिमच आहे. तेथे इतर धर्मीय अनुयायांची अपेक्षा कशी करता येईल? त्यांच्या या युद्धामागील राजकीय उद्दिष्ट्य ध्यानी घेतले नाही तर हाती राहतो तो इस्लामी दहशतवाद. मग त्याची उत्तरे त्याच पद्धतीने शोधून काढण्याचा प्रयत्न होतो आणि तो फसतोय हे आजवरच्या हल्ल्यांतून ध्यानी येतेच.
या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे.
जरूर. चर्चा पुढे नेण्यास, माझे काही चुकत असेल तर ते दुरूस्त होण्याची ती संधी असेल (या भूमिकेतूनच लिहितो, दुर्दैवी हा शब्द पटला नाही. असहमतीत दुर्दैव कसले?).
"आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे.
अगदी बरोबर. पण राजकीय तोडग्याबरोबरच मी युद्ध म्हणूनही त्याकडे पहावे असे म्हणतो आहे. म्हणजेच ही समस्या हाताळण्यासाठीचा डावपेच दुपदरी असणे आवश्यक आहे. एकीकडे युद्ध म्हणून सशस्त्र सामना आणि त्याचवेळी त्या समुदायाच्या राजकीय उद्दिष्ट्याची परिपूर्ती किंवा त्यामागील कारणांचे निर्मूलन असा दुसरा भाग या डावपेचात असणे आवश्यक आहे. यापैकी पहिल्या भागाचा स्वीकारही आपण पुरेपूर केलेला नाही. इराक आणि अफगाणिस्तानात जे घडते आहे त्याचे इतर संदर्भही ध्यानी घेणे आवश्यक आहे. तेथे अंतर्गत स्वरूपात जो हिंसाचार, बंडाळी आहे ती सरळ-सरळ विदेशी शक्तींना हाकलून देणे या मुद्याशी जोडलेली आहे. तेथील त्या मुद्यांनाच पुढे करीत हा स्टेटलेस स्वरूपाचा समुदाय इतरत्रही युद्ध मांडून बसला आहे. दुसऱ्या भागाची मानसीक तयारीही यात दिसत नाही. दहशतवाद हा अद्यापही आपण 'लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम' अशा स्वरूपात पाहतो आहोत. म्हणूनच केवळ पोलीसी बळकटीकरणासारख्या आणि पुढे फेडरल एजन्सी वगैरेसारख्या उपायांचाच विचार होतोय. मुंबईच्या हल्ल्यात लष्कर, नौदल, हवाईदल यांची मदत घ्यावी लागली, नव्हे त्यांच्याकडूनच ऑपरेशन पार पाडावे लागले म्हणजे त्या हल्ल्याचा स्केल किती आहे हे ध्यानी येतेच. ही इतकी तयारी दहशतवाद्यांनी केली असे अप्रूप आपण वाटून घेत बसतो आणि विचार करतो, पण युद्धाला निघालेल्यांकडून ही तयारी प्राथमिकच म्हणावी लागते.
लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल.
माझा मुद्दा काहीसा असाच आहे.
हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते...
माझे प्रतिपादन असे आहे - "अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही." त्याची गरज नाही म्हणजे सखोल नियोजनाची गरज नाही, असा अर्थ निघतोय त्यातून हे खरे, पण माझे म्हणणे आहे की, तसे वाटण्याची गरज नाही. कारण "मुंबईच्या हल्ल्यानंतर जवळपास प्रत्येक जण या हल्ल्यामागे अगदी तपशीलवार तयारी कशी आहे याचे वर्णन करीत बसला आहे. ही तयारी असणे स्वाभाविक आहे हे ध्यानी घेतले जात नाही, कारण हे युद्ध आहे हेच मुळात मनात रुजलेले नाही."
एकूण युद्ध करायला निघालेल्यांसाठी ही तयारी विशेष नाही. रंगीत तालीम हा तर एक भाग आहे. या "दहशतवाद्यां"चे प्रशिक्षण किती काळ झाले वगैरे तपशील समोर आले आहेत. ते प्रशिक्षण हीही एक तयारीच आहे. आणि अशी तयारी कुठल्याही फुटकळ संघटनेकडून शक्य नसते. म्हणजे येथे संघटन सखोल विचार करणारे, मिळेल ते हत्यार आपल्या लढ्यात उपयोगात आणणारे, नव्या हत्याराचा विचार करणारे आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. हल्ला करण्यासाठी नियोजन आणि हल्ला प्रत्यक्ष कसा होईल याचे नियोजन असा हा भेद आहे. कराचीतून निघून मुंबईत जाऊन अमूक-अमूक लक्ष्य करावयाचे, त्यासाठी हेहे साधनस्रोत, हे अनुयायी अशा स्वरूपाचे नियोजन अपेक्षितच, कारण हे युद्ध आहे. एकाद-दुसरा हल्ला नाही. प्रत्येक हल्ला ही त्या संघटनांसाठीची एका व्यापक युद्धातील एकेक लढाई आहे.
मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते.
मुद्दे मांडले असते तर असे निष्कर्ष मी निश्चितच बदलले असते.

धर्मसमाजजीवनमानप्रकटनलेखमत

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Nov 2008 - 5:52 pm | विसोबा खेचर

हम्म! सर्व लेखन पुन्हा एकवार वाचून पाहतो..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Nov 2008 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म! सर्व लेखन पुन्हा एकवार वाचून पाहतो..

विजय राणे's picture

30 Nov 2008 - 6:28 pm | विजय राणे

आपल्या लिखाणातून आपला लष्कराशी संबंधित नाही आणि या विषयातला अभ्यासही हे सिद्ध होते. उगाच काहीतरी लिहित जाऊ नका. हा विषय अगदी गहन आहे. आपल्याला त्याची माहिती नसताना त्यात आपण हात घालण्याची हिम्मत केलीय. आपल्या हिम्मतीला खरे तर "दाद' द्यायला हवी.

विसुनाना's picture

1 Dec 2008 - 12:41 pm | विसुनाना

अशासाठी की आपल्या लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत व्हायला आवडले असते. इतर अनेक बाबतीत आपली मते बर्‍यापैकी एकसारखी असतात. पण येथे तसे घडले नाही. :(
विचार करत आहे.

भोचक's picture

1 Dec 2008 - 6:00 pm | भोचक

तुमच्या बहुतांश मतांशी सहमत. दहशतवाद्यांच्या राजकीय उद्दिष्टांआड इस्लामी दहशतवादाचा मुखवटा आहे हे पटते. पण मुंबई वा गेल्या काही महिन्यात देशांत झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भात या दहशतवाद्यांचे राजकीय उद्दिष्ट काय असावे? हे कुठेही स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेणे यातून त्यांचे राजकीय उद्दिष्टही अनेकदा स्पष्ट होत असते. (उदा. कोणती संघटना ती जबाबदारी स्वीकारते त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय ते कळते) तसे या हल्ल्यांत झालेले नाही. अद्याप तरी त्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही. डेक्कन मुजाहिदीन या नावाला फारशी ओळख नाही. त्यातून त्यांचे हेतूही स्पष्ट होत नाही. पाकिस्तानातील एखाद्या गटाने हे हल्ले केले असे म्हटले तरी त्यामागचे उद्दिष्ट काय असावे?

काश्मीरचे स्वातंत्र्य हा मुद्दा असेल तर या हल्ल्याचे नेतृत्व करणार्‍या मंडळीत काश्मीरी असणे आवश्यक आहे. तसे अद्याप तरी दिसून आलेले नाही. कारण तो धर्माच्या नावावर अतिरेकी जमवेल. पण त्याचे राजकीय उद्दिष्ट हे त्याच्या डोक्यात पक्के असेल आणि त्याचे सहकारी इस्लाम म्हणून लढतील.

त्याचवेळी पाकिस्तानात होणार्‍या अंतर्गत हल्ल्यांचा हेतूही काय असावा? बेनझीर भुट्टोंची झालेली हत्या, नवाज शरीफ व खुद्द मुशर्रफ यांच्यावर अनेकदा झालेले हल्ले हे का झाले असावेत? माझ्या मते कडव्या दहशतवादी गटांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे नेते अडथळे ठरतील त्यांची ते हत्या करणार हे उघड आहे. याही कडव्या गटांत काश्मिरी मुस्लिमांचा सहभाग असणे आवश्यक असेल. कारण त्यांना आपल्याला बाहुले ठरणारा नेता हवा आहे. कारण काश्मिर प्रकरणात एकूणातच भारताविरोधी भूमिका घेणार्‍या राजकीय नेत्यालाच त्यांचा पाठिंबा असेल.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 12:31 pm | नाना चेंगट

४ वर्षांनंतर तुम्हाला या लेखमालेतील विचारांबद्दल काय वाटते? समर्पक आहेत की काही त्रुटी जाणवते? सध्या तुम्ही तुमच्या विचारांकडे तटस्थपणे पाहिले तर तुम्ही काय म्हणाल?

श्रावण मोडक's picture

16 Feb 2013 - 1:11 pm | श्रावण मोडक

चार वर्षांनंतर वास्तव बदललेले असेल तर माझे विचार बदलले असले पाहिजेत. वास्तव तेच असेल तर विचार बदलता कामा नयेत - हे एवढे तुम्हालाही मान्य व्हावे.
माझ्या दृष्टीने विचार बदलावेत, असा वास्तविक बदल झालेला नाही. अर्थात, वास्तवात झालेला तसा बदल तुम्ही दाखवून दिलात तर मला त्यांचा विचार करून आधीच्या संदर्भात माझे विचार कसे बदलले आहेत हे पाहावे लागेल आणि ते मांडावे लागेल. वास्तव बदलले नाही, असे मी म्हणतोय, कारण हे सारे विचार ज्या भूमिकेतून आले आहेत ती भूमिका तशीच आहे. माझ्या मते आजही "इस्लामी दहशतवाद" यामागे राजकीय उद्दिष्ट्ये आहेत, आणि त्यांचा सामना राजकीय स्तरावर करावाच लागेल. दहशतवादाला केवळ बळाचा आविष्कार मानून (एकमेव) बळानेच त्याचा सामना करण्यातून शाश्वत उपाय होणार नाही. तसा शाश्वत उपाय (एकमेव) राजकीय आघाडीवरही मिळणार नाही. या दोहोंची सांगड घालावीच लागेल आणि त्यात राजकीय आघाडी किंवा मुत्सद्देगिरीलाच अधिक वाव असला पाहिजे.
चार वर्षांनंतर माझ्या या मांडणीविषयी तुमचे मत मांडलेत तर चर्चा अधिक पुढे जाईल. :-)

नाना चेंगट's picture

16 Feb 2013 - 1:42 pm | नाना चेंगट

सहमत आहे. वास्तव बदललेलं नाही हे मान्य. बळ आणि मुत्सद्देगिरीचा वापर करायला हवा हे सुद्धा मान्य. बळापेक्षा मुत्सद्देगिरीला वाव जास्त असायला हवा हे सुद्धा तत्वतः मान्य. तत्वतः का तर समोरील पक्ष सुद्धा मुत्सद्देगिरिला प्राधान्य देत चर्चेला तयार असेल तर चर्चा करायलाच हवी. परंतु चर्चेआड दिशाभुल करुन बळाचा वापर करुन नामोहरम करायचा प्रयत्न करायचा हे धोरण समोरील पक्ष स्विकारत असेल तर चर्चेचे गुर्‍हाळ विफल होण्याची शक्यता वाढते. अशा वेळेस काय पर्याय शोधता येतात त्याचा विचार करायला हवा. काश्मिर समस्येचा विचार केल्यास साम दाम दंड भेद या पैकी साम आणि दंड हे वापरुन झाले आहेत. दाम (केवळ पर्यटनामुळे नव्हे तर उद्योगाच्या सहाय्याने जनतेला कामधंदा, रोजगार यामधे गुंतवून ठेवणे) तसेच भेदाचा वापर करुन तेथील संघटन खीळखिळे करणे व जमल्यास संपवणे असे प्रकार करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे असे आपण मानू शकतो का? (इथे काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या घोषणेनुसार भारत सरकारची जबाबदारी काय असू शकते त्या अनुषंगाने विचार केला आहे. काश्मिर स्वतंत्र आहे असा विचार केला तरी कधी न कधी तेथील निवासी जनतेला, ज्यांना आपण फुटीरतावादी नेते म्हणतो त्यांच्या प्रभावळीतून मुक्त होणे आवश्यक वाटेलच, तेव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावणार आहेच. कारण बंडखोरी यशस्वी झाली की क्रांती होते आणि क्रांतीतच पुढील बंडखोरीची बीजे असतातच.)

श्रावण मोडक's picture

16 Feb 2013 - 1:51 pm | श्रावण मोडक

समोरचा पक्ष चर्चेला तयार नाही, असे आपण मानू. (सरसकट तसे नाही. रादर, साम, दाम, दंड, भेद यातील 'भेद' काही ठिकाणी चालू आहेच...) मुत्सद्देगिरी तिथेच असते, असे मला वाटते. चर्चेला तयार नसणाऱ्यांना चर्चेला आणणे, त्यातच गुंतवणे आणि त्यातूनच मार्ग काढणे यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात, असे मला वाटते.
काश्मिरात काही गोष्टी होताहेत. स्वतंत्र बोलू.

विसुनाना's picture

16 Feb 2013 - 3:07 pm | विसुनाना

पण चार वर्षांत समोरचा पक्ष एकसंध राहिलेला नाही. राष्ट्र या संकल्पनेवर पाकिस्तानातल्या कट्टर इस्लामवाद्यांनी मोठाच आघात केलेला आहे. आता बोलणी करायची तर कुणाशी? पाकिस्तान सरकारशी? पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयशी की तिथल्या कट्टरपंथीय संघटनांशी?
भारताने पाकिस्तान-काश्मिरबाबत मुत्सद्देगिरी करण्याला फारसा वावच राहिलेला नाही. मध्ये मुंडकी उडवण्यावरून तर प्रकरण फारच पुढे गेलेले होते.

श्रावण मोडक's picture

16 Feb 2013 - 3:21 pm | श्रावण मोडक

मी जे लिहिलं ते एकंदर इस्लामी दहशतवाद म्हणून. त्यात पाकिस्तानविशिष्ट असे मी काही म्हणत नाहीये.
पाकिस्तानविशिष्ट बोलायचे तर मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "काश्मिरात काही गोष्टी होताहेत". अधिक तपशिलात सांगू शकत नाही, पण इतके नक्की की तिथे, काही प्रमाणात तरी, मुत्सद्देगिरी आणि बळ अशा दोन्ही गोष्टी होताहेत. त्यात अडथळे आहेतच. एक अडथळा पाकिस्तान (किंवा जे खंडीत राष्ट्र आहे ते). तिथेच मुत्सद्देगिरीची कसोटी आहे.

राही's picture

18 Feb 2013 - 8:35 pm | राही

कश्मीरमध्ये बर्‍याच गोष्टी होताहेत.
खरे आहे. दाम आणि भेद हे देखील.

हुप्प्या's picture

19 Feb 2013 - 12:08 am | हुप्प्या

सौदी अरेबिया हे अत्यंत श्रीमंत राज्य आहे ह्याबद्दल संदेह नसावा. १९८० पासून त्या देशाने आपल्या वहाबी विचारांच्या रानटी, ताठर इस्लामचा प्रचार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसा वापरायला सुरवात केली. (१९७९ साली मक्का मशिदीवर काही धर्मपिसाटांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून) सौदी अरेबियातील कट्टर इस्लामी लोकांना खूश करायला आणि सौदी सरकारची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून हा उपाय केला गेला. पण ह्याचे घातक परिणाम अन्य देशात दिसू लागले आहेत. इंडोनिशिया, मलेशिया हे देश पूर्वी फार मवाळ समजले जायचे. तिथले मुस्लिम लोक स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले होते. तिथले उत्सव, भाषा, रीतीरिवाज पाळत होते. पण आता ते बदलत आहे. आखाती देशाचा पैसा आणि तिथला विखारी प्रचार यामुळे तिथेही कडवा इस्लाम उदयास येत आहे. स्थानिक रीतिरिवाज त्यागून मूळ इस्लामच कसा चांगला असे लोकांच्या मनावर बिंबवले जाते आहे.
हाच प्रकार अफ्रिकेत, भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातही होत आहे. भारतात सुफी परंपरा, अफ्रिकेतील तिथला जादूटोणा वगैरेसारखे प्रकार इस्लाममधे मिसळून थोडा सौम्य इस्लाम बनू घातला होता त्यावर ह्या अरबी इस्लामी दहशतवादाचा मोठा प्रभाव पडतो आहे.

झाकिर नाईकासारख्या वरवर अभ्यासू वाटणार्‍या धर्मपिसाटाचे विचार ऐकलेत तर हे लगेचच कळेल. बुरख्याचे महत्त्व, पीरदर्ग्यापुढे नतमस्तक होणे कसे गैरइस्लामी आहे हे समजावणे वगैरे.

त्यामुळे इस्लामी दहशतवाद हा अगदी खरा आहे. तो निव्वळ एक राजकीय लढ्याचा मुखवटा आहे असे मानणे भोळसटपणाचे आहे. मुळात इस्लाम हा अरबी संस्कृतीचे वर्चस्व गाजवणारा आहे. तथाकथित इस्लामी नेते कुराण हे केवळ अरबीतून वाचावे असे ठणकावून सांगतात. अनुवाद वगैरे त्यांना मंजूर नसतो. नमाज पढताना जे काही म्हटले जाते ते केवळ अरबी आणि निव्वळ अरबीतच असावे असा नियम आहे. नमाज पढणार्या गटात एकही जण अरबी जाणत नसला तरीही ह्यात बदल संभवत नाही. आणि अफाट पैशाचे पाठबळ. ह्या जोरावर हा घातक प्रकारचा इस्लाम जगभर पसरावा म्हणून एक मोठी मोहिम राबवली जात आहे. साम, दाम, भेद, दंड सगळे उपाय वापरुन त्याचे अनुयायी काम करत आहेत. आणि हे अन्य धर्मियांकरता धोक्याचे आहे.