आठवणी

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
2 Mar 2021 - 6:07 pm

मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते. काही लुकलुकणाऱ्या आठवणी आकर्षक वाटतात, काहींचा रंग मनाला हुरहुर लावतो तर काही धूमकेतू प्रमाणे आयुष्यात एकदाच सुदर्शन देऊन कायमच्या परागंदा होतात. आपण मात्र चंद्रासारखे ठळक राहतो, दर पंधरवड्यात कलांचे खेळ करत. आठवणींची निर्मिती आपल्या हातात नाही. आठवणींच्या तिजोरीचा खजिनदारही आपल्याला ठाऊक नाही. आपण त्या तिजोरीच्या भिंती फक्त. कुणी एका भेटीत मनाचा ठाव घेतात तर काहींना दररोज भेटूनही त्यांना मनात जपून ठेवावेसे वाटत नाही. लोक म्हणतात की आठवणींना बिलगले की दुःख होते. मला नाही असं वाटत. कारण आठवणी या नेहमी आनंददायीच असतात. जे जे निर्मळ, सात्विक व आनंददायी ते ते शक्य असल्यास जसेच्या तसे अथवा निदान स्मृतींच्या स्वरूपात जतन करून ठेवावे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपण वाईट आठवणी जतन करूच शकत नाही. दुःख देणारे अनुभव असतात आठवणी नव्हे. मग तरीही आठवणींनी मने सुन्न का व्हावीत? याचे उत्तर आपल्याला त्या आठवणी नको असतात. ते क्षण, ती व्यक्ती, ती घटना, आपल्याला पुनःपुन्हा जगायची असते. 'ती' सोबत सदैव हवी असते. आठवणी म्हणजे निरोपावर शिक्कामोर्तब! तो निरोप आपल्याला नको असतो. कुणाच्या आठवणींनी मन व्याकुळ झाले तर त्याचा अन्वयार्थ एकच - जीवनाचे 'अर्थकोडे' सुटणार होते इतक्यात आपण समानार्थ शोधू लागलो.

धोरणमांडणीमुक्तकप्रकटनविचारलेख