इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः
"उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!"
एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो....
सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती...
"कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल"
"पाचच मिनिटं गं आई"
ह्यानंतर... र. ना. पराडकर यांच्या आवाजात कवी सुधांशु यांची रचना....
"आता उठला नाहीस ना तर डोक्यावर गार पाणी ओतीन हा."
आकाशवाणी पुणे - सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत.....आजच्या ठळक बातम्या....
बालपणीची कैक वर्षं पहाटेच्या ह्या वाक्यांचा सीक्वेन्स कधी चुकला नाही. मला तर अजूनही कित्येकवेळा पहाटे जाग येताना ही वाक्यं ऐकू येतात. पण ह्या वाक्यांमध्ये कधीतरी वार्याची सुखद झुळुक यावी तसा आवाज यायचा...
"इन खम्स खपिल डेव फ्रॉम द पॅडिंग्टन एंड.... शॉर्ट ऑफ लेन्ग्थ आउटसाईड ऑफ. दॅट हॅज बीन अ गुड खन्सिस्ठंठ लाइन बाय खपिल."
कधी उठायला फारच उशीर झाला तर एक गेंगाण्या आवाजाचं ओरडणं....
"गॉठीssठीम.......व्हॉट ए रिपर!!!!!!! इंडिया हॅव गॉट द ब्रेकथ्रू दे नीडेड"
कानात अजून वाजतात ते आवाज. डिसेंबरच्या थंडीत दुलईत गुरफटून किलकिल्या डोळ्यांनी चॅनल नाईनचं ते कमाल प्रक्षेपण आधी कानांनी आणि मग डोळ्यांनी अनुभवणं. बॅट्समन गार्ड घेताना त्याच्या बुटांच्या आवाजाची खरखर त्या अर्धवट झोपेत सुद्धा स्पष्ट ऐकू यायची. आणि ऐकू यायचं ते क्रिकेट कॉमेंटरीच्या दैवतांच्या आवाजातलं केवळ अविस्मरणीय समालोचन.
एखादं गाणं ज्याप्रमाणॅ फक्त गायकाचं नाही तर गीतकार, संगीतकार, अरेंजर, वादक, रेकॉर्डिस्ट ह्या सगळ्यांचं असतं, तसंच क्रिकेट हा फक्त खेळाडूंचा नाही तर अम्पायर्स, स्कोरर्स, ग्राउंडस्टाफ, सपोर्ट स्टाफ ह्या सगळ्यांचा खेळ असतो. आणि मैदानावरच्या घडामोडी फक्त माहितीपूर्ण नाही तर रंजक करून आपल्यापर्यंत पोहोचवणार्या कॉमेंटेटर्सबद्दल तर क्या कहने?
लहानपणी दूरदर्शनवर सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजता लागणार्या "क्रीडांगण" मधल्या चंद्रशेखर संत आणि व्ही व्ही करमरकरांपासून ते क्रिकेट कॉमेंटरीचा लेजंड रिची बेनॉ पर्यंत कितीतरी लोकांनी आमची "आवाज की दुनिया" समृद्ध केली.
मिलिंद वागळ्यांचा आवाज पुणे मॅरेथॉन आणि PARA च्या मोटोक्रॉस स्पर्धेच्या वेळी हमखास ऐकू यायचा. एरवी दूरदर्शन वरची क्रिकेट कॉमेंटरी म्हणजे डॉ. नरोत्तम पुरी हे समीकरण होतं. अतिशय मृदुभाषी आणि "चार्मिंग" व्यक्तिमत्व. तेव्हा फारसं कळायचं नाही, पण नरोत्तम पुरींइतकं अजून कोणीच लक्षात राहिलं नाही. कधी कधी टीव्हीवरची कॉमेंटरी इतकी रटाळ असायची की टीव्हीचा गळा आवळून आम्ही रेडियो लावून ऐकायचो. रेडियोवरची नावं आठवतात ती म्हणजे सुधील दोशी, रवी चतुर्वेदी आणि आकाश लाल ! "नमश्कार - कानपुरके ग्रीन पार्क इस्टेडियमसे मैं रवि चतुर्वेदी .... " वगैरे वगैरे सुरू झालं की खरोखरंच तिथला "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहायचा. "... अगली गेंद...ऑफइस्टंप के बाहर... थोssडीसी ओवरपिच..... और वेंगसरकरने बहोsssतही उम्मदा तरीकेसे ये खेल दिया है कव्हर्स क्षेत्रमेंसेचार्रर्रर्रर्रर्रन..." हा प्रकार केवळ लाजवाब ! एकतर ह्या रेडियो समालोचकांची शब्दसंपदा अगाध असायची. क्रिकेटच्या टर्म्स सोडल्या तर इंग्रजी शब्दांचा वापर फार कमी असायचा. सगळा असली देसी घी वाला मामला. एकदा तर चतुर्वेदीसाहेब सिद्धूनी सिक्सर मारल्यावर "... ये छे रन और दर्शक आंदोलित" असं ओरडले होते. मज बालकाला नंतर बरीच वर्षं लोकं कसली कसली आंदोलनं वगैरे करतात म्हणजे एकत्र येऊन टाळ्या - शिट्ट्या मारत घोषणा देतात आणि एकंदर कल्ला करतात असंच वाटत होतं. दोन बॅट्समन "विकेट के बीच में विचार-विमर्श और वार्तालाप करते हुए" ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर दोघेजण हेल्मेट, पॅड वगैरे घालून स्मिता तळवलकर आणि चारूशीला पटवर्धन स्टाइलमध्ये कागद वगैरे हातात घेऊन गंभीर डिस्कशन करतायत असं चित्र उभं राहिलं होतं. पण रेडियो कॉमेंटेटर्स मैदानावरच्या घडामोडी जिवंत करायचे हे नक्की.
टीव्हीवरचं क्रिकेट म्हणजे चॅनल नाइन हे अतूट समीकरण होतं. आणि चॅनल नाइन - रिची बेनॉ हे अजून अतूट नातं.
"ग्लोsssssssssरियश शनशाईन हीर अॅठ दि गॅबा ठुडे... अँड वी आर इन फॉर शम फँठॅश्टिक डेज ख्रिखेट" हे शब्द अजून माझ्या कानांत आहेत. बेनॉ म्हणजे बोलण्यात अगदी योग्य चढाव उतार, मोजून मापून वापरलेले शब्द आणि चक्क "बोबडेपणा"!!! बेनॉ हे एक वेगळंच रसायन होतं. म्हणतात ना 'झाले बहु, होतील बहु'... अगदी त्यातला प्रकार. बाकी काही म्हणा राव... कॉमेंटरी करावी तर ऑस्ट्रेलियन्सनी ! एकतर ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसच्या वेळेचा आपल्याकडचा माहौलच वेगळा असतो. ती थंडी, अर्धवट झोपेची ग्लानी पहाटे उठल्या उठल्या क्रिकेटचा आस्वाद घेणं. त्यात त्यांची अफलातून मैदानं, ते रंगीत कपडे, ते सुंदर सुंदर प्रेक्षक.... आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे त्यांचे कॉमेंटेटर्स! त्यांचा अॅक्सेंट ऐकायला मी क्रिती सेननबरोबरची माझी "डेट" कॅन्सल करीन ! विशेषतः "एकारान्त" शब्दांचा "आय" असा जो उच्चार करतात ना... जियो ! ! ! "टुडे" चं "ठुडाय"..."ऑस्ट्रायलिया"... "गेम" चं "गायम"..."मॅक्ग्रा"चं "मक्ग्रार"... असं काय काय करतात ना... अहाहाहा ! माझं 'स्पोकन इंग्लिश' चाटे क्लासेसला न जाता देखील चांगलं झालं ते ह्यांच्यामुळेच.
बेनॉचं नमन झालं की मी वाट बघायचो माझ्या सर्वांत आवडत्या कॉमेंटेटरची.... द व्हॉईस ऑफ MCG बिल लॉरी ! ! ! नाकातला गेंगाणा आवाज.. पुन्हा तो ऑस्ट्रेलियन अॅक्सेंट... टीव्ही प्रेक्षकांत excitement निर्माण करण्याची प्रचंड ताकद.... एक्सक्लेमेशन्स.... "गॉठिम"... "गॉssssssन".. नुसतं "ohhhhhhh" पण तितकंच उत्कंठा निर्माण करणारं.
त्यांच्या जोडीला फेसाळत्या बियरसारखा उत्साहानी सळसळणार्या आवाजाचा टोनी ग्रेग आणि खवचट कॉमेन्टेटर्सचा मेरुमणी इयन चॅपल. टोनी ग्रेग आपल्या शब्दांनी आणि अजोड शैलीने क्रिकेटर्सना विशेषतः सचिन तेंडुलकरला नुसत्या हीरो च्या पलिकडे "लार्जर दॅन लाईफ" बनवलं. जर का Over the top she goes... That's a biggie... What a player... What a wonderful player ही वाक्यं नसती तर कदाचित सच्याच्या डेझर्ट स्टॉर्मची लज्जत तितकी राहिली नसती. त्याची "Ooooo up she goes into the crowd" म्हणतानाची energy कोण विसरेल? ग्रेगनी क्रिकेटमधलं नाट्य नुसतं प्रेक्षकांसमोर मांडलं नाही तर त्यानी क्रिकेट कॉमेन्टरी exciting बनवली. तो म्हणजे क्रिकेटपटू त्याचे लाडाचे विद्यार्थी असल्यासारखा त्यांचं कौतुक करायचा.
आणि त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इयन चॅपल. संजय मांजरेकर, रमीझ राजा, रनजित फर्नांडो हे त्याचेच विद्यार्थी. ह्यांच्याकडून कोणाचं दिलखुलास कौतुक ऐकणं म्हणजे राजदीप सरदेसाईकडून मोदींचं कौतुक ऐकण्याइतकं दुरापास्त. त्यात कोणाचं जरा कुठे बरं चाललं असलं की ह्यांनी One wicket here and Australia can get right back in the game म्हणायलाच पाहिजे. आणि असं म्हणलं रे म्हणलं की आमचा सेट बॅट्समन मिडऑफला कॅच देणार! अश्या वेळी ह्या कॉमेन्टेटर्सचा भयंकर राग यायचा. पण जेवणात तरी सगळेच पदार्थ गोड असून कसं चालेल? काहीतरी आंबट - तुरट लागतंच की.
मूछें हो तो नथ्थूलाल जैसी हो वरना ना हो. तसं Pitch report हो तो मायकल होल्डिंग जैसा हो वरना ना हो. होल्डिंगचा रन अप जितका प्रेक्षणीय तितकाच त्याचा कॅरिबियन accent श्रवणीय. Bounce ह्या शब्दाचा उच्चार मायकल होल्डिंग जसा करायचा तसा आधी कोणी केला नाही आणि पुढे कोणी करणार नाही. तसाच बॉयकॉटचा टिपिकल यॉर्कशायर अॅक्सेंट. खऊट इंग्रज म्हातार्यांबद्दल प्रेम निर्माण करायला लावणारा.
प्रत्येक कॉमेंटेटर आपलं वैशिष्ट्य घेऊन येतो. गावसकरचं सडेतोड बोलणं आणि critical acclaim, रवी शास्त्रीचं "that went like a tracer bullet", डॅनी मॉरिसनची टिपेच्या स्वरातली कॉमेन्टरी, मार्क निकोलसचा वेगळा अंदाज, मंदिरा बेदीचे किंवा आताशा मयंती लँगरचे ड्रेसेस ... प्रत्येकाची आपली वैशिष्ट्यं. पण आमच्या बिल लॉरीची किंवा फॉर दॅट मॅटर मार्क टेलरची सर ह्यांना नाही. एखाद्या गायक / गायिकेचा गळा "प्लेबॅक"चा आहे म्हणतात ना... तसा बेनॉ, टोनी ग्रेग, बिल् लॉरी, मार्क टेलर, मायकल होल्डिंग, न्यूझीलंडचा इयन स्मिथ, आताचा नासिर हुसेन ह्यांचा गळा "कॉमेंटरी"चा होता! त्यातून ही सगळी मंडळी कित्येक वर्ष स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली. त्यामुळे त्यांना नुसता समालोचनाचा नाही तर समीक्षेचाही अधिकार!
पण स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नसताना सुद्धा प्रत्येकाच्या आवडत्या कॉमेन्टेटर्सच्या यादीत हमखास असणारा आमचा आवडता समालोचक हर्षा भोगले. रिची बेनॉ हा Voice of Cricket असेल तर हर्षा भोगले voice of the cricket fan आहे. व्हॅनिला आईस्क्रीमवरच्या चॉकलेट सॉससारखा मखमली आवाज आणि त्याहून कितीतरी महत्वाचं म्हणजे क्रिकेटबद्दलचीच नाही तर सगळ्याच खेळांवद्दलची आत्मीयता आणि खेळाडूंबद्दलचा आदर. एखाद्या तळाच्या बॅट्समननी सिंगल काढून मुख्य फलंदाजाला स्ट्राइक द्यावा तसा आपल्या बरोबरच्या क्रिकेटपटूला बोलतं करणारा आणि गरज पडेल तेव्हा लेट कटचा चौका मारणारा!
अजून कितीतरी कॉमेन्टेटर्स आहेत पण ह्या लोकांची कॉमेन्टरी ही क्रिकेट आणि क्रिकेटर्सच्या प्रेमात चिंब भिजलेली असते. आणि जर तो समालोचक स्वतः त्या खेळानी बेहोष होत नसेल तर तो प्रेक्षकांना बेहोष करणार तरी कसा? ह्या लोकांनी समोर चाललेल्या खेळाच्या पलिकडे जाऊन आम्हाला क्रिकेटचा मझा घ्यायला शिकवलं. ह्यांच्या शब्दांनी ह्यांच्या वर्णनांनी आमची "आवाज की दुनिया" समृद्ध केली.
So that's all from the presentation area for today. See you at the start of the next match
© - जे.पी. मॉर्गन
प्रतिक्रिया
14 Dec 2020 - 10:58 am | विजुभाऊ
झकास मस्त मजा आली
ते एक सिद्ध पाजी राहिलं की
14 Dec 2020 - 10:59 am | विजुभाऊ
सिदुधु
14 Dec 2020 - 11:38 am | लोनली प्लॅनेट
माझे आवडते समालोचक
न्यूझीलंड चा इयन स्मिथ (2019 वर्ल्ड कप फायनल चे समालोचन कोण विसरेल).
ऑस्ट्रेलिया चे बिल लौरी (1999 वर्ल्ड कप सेमी फायनल) आणि मायकल स्लेटर.. हे दोघेही सध्या फॉक्स स्पोर्ट्स कडे नसल्याने आता ऑस्ट्रेलिया तील सामने पाहण्यात मजा येत नाही.
वेस्ट इंडिज चा इयान बिशप (remember the name!)
इंग्लंड चा नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉइड.
दक्षिण आफ्रिकेचे पोमी बांगवा आणि माईक हेसमन.
आणि भारताचा फक्त सुनील गावस्कर.
आणि ज्याचा आवाज ऐकला की टीव्ही चा आवाज mute करावा लागतो ते म्हणजे संजय मांजरेकर,वसीम अक्रम,शॉन पोलॉक, इन चॅपल,टोनी कोझियर.
15 Dec 2020 - 8:53 pm | स्पार्टाकस
अँथनी विल्यम 'टोनी' ग्रेग चा आवाज कानावर पडला नाही का कधी?
14 Dec 2020 - 12:50 pm | नावातकायआहे
जेफ्री बॉयकॉट !
14 Dec 2020 - 12:53 pm | नावातकायआहे
अत्यंत मार्मिक आणि कडू ....
14 Dec 2020 - 1:16 pm | महासंग्राम
फारच सुरेख लेख..सध्या आकाश चोप्राचं समालोचन पाहून त्याला कॉमेंट्री बॉक्स मधून बाहेर काढून बदडाव वाटतं.
बादवे तेवढी क्रिती बरोबरची डेट रद्द झाल्यास आमची शिफारस करावी ही नम्र विनंती
आपला हर्षा भोगले आणि क्रिती चा पंखा
महासंग्राम
14 Dec 2020 - 1:45 pm | बेकार तरुण
मस्त लेख... आवडला.. खूप आठवणी जाग्या झाल्या....
स्वतः क्रिकेटपटु नसुन समालोचनात मानाच स्थान मिळवणारा अजुन एक म्हणजे - Tony Cozier
14 Dec 2020 - 2:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
लहानपणी आम्ही पण बर्याच वेळा टिव्हीवर मॅच लावून रेडीओ ची कॉमेट्री ऐकायचो
पैजारबुवा,
14 Dec 2020 - 2:21 pm | श्रीगुरुजी
आकाशवाणीवर पूर्वी डिकी रत्नाकर आणि आनंद सेटलवाड चांगले समालोचन करायचे.
14 Dec 2020 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है. लेखन वाचून मजा आली. काही कमेट्रटर्स डोळ्यासमोर आले. आपण म्हणता तसे, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, आकाशलाल नेहमीच आवडले. टोनी ग्रेग, सनी, उच्चच. बाकी, अनुक्रमे तसेच. इंग्रजी कमेट्री लागली की अनेकदा आवाज कमी किंवा बंदही केल्याचे आठवते. पण हिंदी मंडळीं जब्रा.
मराठीतले बाळ पंडित क्रिकेट समालोचनातही मजा आणायचे, उजव्या यष्टीकडून डावीकडे, मध्यम तीव्र गतीची गोलंदाजी, हळुवार मारा, चेंडुने सीमापार जाणे, चार धावा, उंचावून मारलेला फ़टका, उत्तम क्षेत्रररक्षण वगैरे.... आकाशवाणीच्या मुंबै केंद्रावरुन क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णनांनी मजा आणली आहे.
-दिलीप बिरुटे
14 Dec 2020 - 5:36 pm | कानडाऊ योगेशु
साधारण ९० च्या दशकात परदेश दौर्यावर हिंदी कॉमेंटेटर्स नसत असत.तेव्हा मनिंदरसिंग व अजुन अश्याच कुणा निवृत्त क्रिकेटरला दूरदर्शन्च्या स्टूडिओ मधुन बसुन कॉमेंटरी करायला लावत असत.जेवढे दर्शकाला दिसते तेवढेच त्यांनाही दिसत असे त्यामुळे बर्याच वेळेला बॅट्समनने जोरात शॉट मारला आणि तो सीमारेषेपार जाणार असे दर्शकांना जसे वाटत असे तसेच त्यांनाही वाटत असे आणि त्यामुळे समालोचन काहीसे "बल्ला जोर से घुमाया और ये चार रन..लेकिन बाऊंड्रीपे फिल्डर ने रोक दिया" अश्या प्रकारचे होत असे.मध्ये मध्ये काहीवेळेस टी.वी दर्शकांना उल्लु बनवण्यासाठी कॉमेंटरी बॉक्सही दाखवत असत पण स्टुडिओतल्या लाईटचे टेक्श्चर लगेच कळत असे.काही दिवसांनंतर जेव्हा ही क्लृप्ती कळली त्यानंतर टीवी चा आवाज बंद करुन मॅच बघत असू.
14 Dec 2020 - 6:15 pm | मूकवाचक
अप्रतिम लेख!
14 Dec 2020 - 11:09 pm | विजुभाऊ
आम्ही टिव्हीच्या आवाज बंद करून रेडिओ लावायचो
15 Dec 2020 - 12:02 am | दुर्गविहारी
भारी लेख आणि तितकेच उत्तम प्रतिसाद !
15 Dec 2020 - 1:51 am | अमीबा
सुंदर लेख! खूप आवडला.
तसा हा लेख क्रिकेटची 'आवाजकी' दुनियाचा आहे, पण ह्याविषयीची आणखी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहवत नाही. माझ्या लहानपणी आधीच्या दिवशी मॅच पाहिली/ऐकली असली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मॅचचा सगळा वृत्तांत वाचायला मला जाम मजा यायची. पत्रकारांची नावं आठवत नाहीत, पण त्या बातम्यांची शीर्षके आणि कन्टेन्ट मला आवडायचे. आताशा वर्तमानपत्रांतून येणारा मॅचेसचा आढावा तितकासा रंजक वाटत नाही. धावचीत, यष्टिचीत, झेलबाद, यष्टीरक्षक असे शब्द, किंवा अगदी फलंदाज आणि गोलंदाज हे शब्दसुद्धा क्वचित वाचायला मिळतात. कदाचित या आणि अशा इतर मराठी शब्दांमुळेच मला ते मॅचेसचे वृत्तांत आपलेसे वाटायचे, आवडायचे, आणि त्या वयाच्या समजेप्रमाणे समजायचे. आता जास्त मॅचेस लाईव्ह पाहायला मिळत असल्यामुळे म्हणा किंवा आधीसारखे वृत्तांत येत नसल्यामुळे म्हणा, फारसा इंटरेस्ट येत नाही मॅचबद्दलच्या मराठी बातम्या वाचायला.
15 Dec 2020 - 9:54 am | चौकटराजा
दिस इज बाँबे व टू एटी एट पॉईंट फाइव्ह मीटर्स अँड थर्टी वन पॉईंट झिरो वन मीटर्स ....वी नाव टेक यू तो ब्रेबर्न स्टेडियम फॉर द रनींग कॉमेंट्री ....
अवर कॉमेंटेटर्स आर अनंत सेटलवाड , राजू भारतन अँड केकी तारापोर ... अँड एक्स्पर्ट कॉमेंटस बाय विजय मर्चंट ... ओव्हर टू ब्रेबर्न स्टेडियम ...
गुड मॉर्निंग लिस्नर्स ... हिअर इज विजय मर्चंट रिपोर्टींग फ्रॉम ब्राबन स्टेडियम विथ ब्राईट सनी मॉर्निंग . एअरलीर वेस्ट इंडीज स्कीपर वन द टॉस अँड इलेक्टड टू बॅट .. कीपिंग इन माईड इंडिया हैव चंद्रशेखर अँड वेंकट राघवन .. अँड कुड बी डिझास्ट्रस ऑन लास्ट डे ....
15 Dec 2020 - 10:18 am | प्रचेतस
हल्लीचे मायकल क्लार्क, मायकेल स्लेटर, केविन पीटरसन पण उत्कृष्ट कॉमेन्ट्री करतात. मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन मात्र टुकार.
16 Dec 2020 - 5:23 pm | सोत्रि
झक्कास लेख!
- (सिद्धूच्या कमेंट्रीचा पंखा) सोकाजी