प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in जनातलं, मनातलं
21 Oct 2020 - 10:53 pm

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

२२.०६.२०१९

.

काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात.

मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र श्री प्रकाश बाबुराव सरवदे

हाडाचा शिक्षक आणि विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापनाची धुरा पस्तीस वर्षे यशस्वीपणे सांभाळून निवृत्त झालेले प्रकाश सरवदे, प्रथम भेटीतच माझे जिवलग मित्र झाले.

काही व्यक्तींना प्रथमतः भेटल्यावर असे जाणवते की आपण यांना आधीही भेटलेलो आहोत, का बरे असे होते?

पंढरपुर सायकल वारीमध्ये माझ्यासह लक्ष्मण नवले, अतुल ओझा आणि संतोष शिर्के सामील झाले होते. संतोषचे नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, तरीही तो माऊलीच्या ओढीने सायकल वारीत सामील झाला होता.

दुपारच्या जेवणाचा मुक्काम तळेगावमधील माझा शाळकरी वर्गमित्र प्रकाशच्या घरी करूया, हा लक्ष्मण नवलेचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. प्रकाश भाऊंना दुपारी जेवायला येतोय याची सूचना दिली. दुपारी बारा वाजता लोणावळ्याला पोहोचलो. तेथून तळेगावसाठी जोरदार स्प्रिंट मारली. आज जुन्या हायवेला खूपच रहदारी असल्यामुळे साडेतीन वाजता तळेगावला प्रकाश सरवदेंच्या घरी पोहोचलो. हॉलमध्ये सुदर्शनचक्रधारी श्री कृष्णाची फ्रेम होती.

दुपारच्या जेवणास अंमळ वेळच झाला होता. पण सरवदे गुरुजी आमची वाट पाहत थांबले होते. शांत, धीरोदात्त, हसतमुख व्यक्तिमत्व; सफेत सदरा-लेंग्यात आणखी उठून दिसत होते. शिवाजी महाराजांसारखी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला भारदस्तपणा आणत होती. घरात शिरताच प्रकाश आणि त्यांच्या सौ. त्रिवेणी यांनी सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले.

पंगतीची तयारी झाली. आंम्ही सर्वजण जमिनीवरील सतरंजीवर मांडी घालून बसलो. प्रकाश भाऊ सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसले.

सुंदर शाकाहारी बेत होता. वरण-भात आणि त्यावर साजूक तूप तसेच पोळ्या, हिरवे वाटणे बटाटा रस्सेदार आमटी, हिरवी चटणी, लोणचं आणि गोड पदार्थ म्हणून काजू कतली होती.

जोरदार भूक लागली होती. जेवणाला सुरुवात करण्याअगोदर "यज्ञ शिष्टाशिनः सन्तो" प्रार्थना झाली. पोटात जठराग्नी सोबत भक्तीरस सुद्धा पाझरला होता. प्रकाशची पत्नी सौ. त्रिवेणी साक्षात अन्नपूर्णा होती. जेवणाला अप्रतिम चव होती. सायकलिंगचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. या सुंदर शाकाहारी पाहूणचारामुळे मन प्रसन्न झाले.

आता सुरू झाली गप्पांची मैफिल. चौकसपणामुळे प्रकाश भाऊंना विचारले, ' जेवणा अगोदर प्रार्थना का?' आपल्या रसना उद्विपित करण्यासाठी तसेच जठरातील पाचकरस पाझरण्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे. प्रथमतः जेवणाचा आस्वाद डोळ्याने, नाकाने, कानाने, त्वचेने आणि जिव्हेने घेणे अतिशय आवश्यक आहे. अन्नाचा परिपूर्ण आस्वाद पंचेंद्रियाने आणि मनाने घेतल्यामुळे त्याचे पचन सुफळ संपूर्ण होते. अतिशय अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक उत्तर प्रकाशभाऊंनी दिले होते.

.

विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापन क्षेत्रात ३५ वर्षांची सेवा त्यांनी दिली आहे. त्यातील २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सुविद्य पत्नी सौ त्रिवेणी आणि दोन मुली प्रियांका व मधुरा असा चौकोनी संसार. नुकतेच मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. प्रकाशभाऊ मे २०१८, मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर स्वाध्याय परिवारासाठी पूर्ण वेळ कार्यरत आहेत.

.

पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींच्या स्वाध्याय परिवाराचे वरिष्ठ सदस्य आहेत, प्रकाश भाऊ. त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर सात्विक भाव प्रकर्षाने जाणवत होते.

स्वाध्याय परिवार आणि दादाजींच्या कार्याच्या अनुषंगाने प्रकाश भाऊंशी चर्चा सुरू झाली.

ज्ञान, कर्म आणि भक्ती ही स्वाध्यायची त्रिसुत्री त्यांनी सविस्तरपणे सांगितली.

*मनुष्य गौरव* हा स्वाध्यायचा पाया आहे. श्रीमद भागवत गीतेतील तत्वज्ञान सर्वांना समजावणे आणि आचरणात आणण्यासाठी दादाजी कार्यरत होते. त्यांनी स्थापन केलेल्या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये सर्वांना प्रवेश आहे. स्वाध्यायचा अर्थ आहे, स्वतःला जाणणे, स्वतःचे अध्ययन करणे.

प्रकाश भाऊंशी चर्चा करताना, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींनी मनात पक्के घर केले.

"भक्ती प्रेमातून हवी भीतीतून नको"

परमेश्वराने आपल्याला सर्व काही बहाल केले आहे, त्यामुळे मंदिरात जाऊन काही मागणे मागण्याऐवजी या जन्मासाठी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत (Thanks Giving To God)

परमेश्वराची भक्ती प्रेममय असायला हवी. काही मागण्यासाठी किंवा भीती पोटी नको. हे तत्व मला पटले.

वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्यामुळे त्याचा प्रभाव लहानांवर तर पडतोच तसेच घरातसुद्धा प्रसन्न आणि शांततामय वातावरण निर्मिती होते. हे विचार तर भन्नाटच.

त्रिकाल संध्या करण्यामुळे वातावरण पवित्र होते.

सकाळी हाताचे दर्शन घेऊन "कराग्रे वसते लक्ष्मी" .....

दुपारच्या जेवणा अगोदर

*यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्* ....

आणि रात्री झोपण्या अगोदर

*ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥ प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥ ....

या प्रार्थना गृहसौख्य राखतात तसेच मनशांती देतात.

राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानात ऐकलेली एक गोष्ट प्रकाश भाऊ गेली कित्येक वर्ष आचरणात आणत आहेत.

ती म्हणजे, "रोज सकाळी उठल्यावर तोंड न धुता, तोंडात असलेली लाळ डोळ्यांच्या बुबुळाला लावणे". यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या चष्म्याचा नंबर नाहीसा झाला आहे.

मेडिटेशनचा त्यांनी सहज सोपा अर्थ सांगितला, "ध्यानधारणा म्हणजे जागृतपणी झोपेचा अनुभव घेणे. मन एकाग्र करणे."

प्रकाश भाऊंच्या चेहऱ्यावरील सुहास्य, सतत सकारात्मक ऊर्जा प्रसारित करत होते.

लक्ष्मण भाऊंनी प्रकाशबद्दल आणखी एक माहिती दिली ती म्हणजे, त्यांनी "पुणे कन्याकुमारी आणि परत पुणे" सायकलिंग केले आहे. खूप आनंद झाला, हे ऐकून.

आनंदाचा एखादा क्षण जरी जीवनात आला तरी खूप काही साध्य केलं असे समजायचे. हा विचार भावला मनाला.

तसेच आज कोणाचे तोंड पाहिले म्हणून दिवस खराब गेला, असे विचार जर येत असतील तर, देवाचे तोंड पाहावे म्हणजे असे नकारात्मक विचार येणारच नाहीत.

मुलगी प्रियांकाच्या लग्नाचा प्रसंग आठवला तेव्हा तर त्यांना स्वतःचे लग्न सुद्धा आठवले.

.

त्यांचा अभिनिवेश म्हणजे एखाद्या घटनेचे विश्लेषण करताना मनात सकारात्मक भाव ठेवणे. गुंता कोणी केला, यापेक्षा तो कसा सोडवता येईल या कडे लक्ष देणे.

प्रकाशभाऊ, जनसेवा करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता.

त्यांना मान, प्रशंसा, पद, पैसा, अधिकार, मोठेपणा याची कसलीही अपेक्षा नाही.

हाती असलेले काम सचोटीने करणे, हेच त्यांचे धेय्य आहे.

देव सतत मनात हवा, तरच चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी होणारच नाही, हे त्यांचे भाष्य मनाला उच्च पातळीवर घेऊन गेले.

पूजेची सक्ती नाही तर परमेश्वराचे रूप आपल्या चित्तात उतरविणे, त्यांचे गुण आपल्यात मनात रुजविणे आणि ते आचरणात आणणे; हीच खरी ईश्वर भक्ती आहे, हे तत्वज्ञान भावले.

सद्गुणांचा वापर जीवनात होणे महत्वाचे आहे तसेच त्यातून लोककल्याण होणे सुद्धा आवश्यक आहे. या विचारांनी मन भावविभोर झाले.

जवळपासच्या गावात दादाजींकडून मिळालेले स्वाध्याय तत्वज्ञान सांगणे, हा उपक्रम प्रकाश भाऊ गेली ३५ वर्ष करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकजीवन सुसह्य करणे हा प्रकाशभाऊंचा ध्यास आहे.

पांडुरंग शात्री आठवलेंच्या (दादाजींच्या) विचारांचा प्रचंड पगडा आहे प्रकाशभाऊंचा जीवनावर आहे.

खरोखर "ते सेफ हँड मध्ये आहेत"

योग्य गुरू मिळाले हे त्यांचे परम भाग्य आहे.

जवळपास पस्तीस-चाळीस गावांशी त्यांचा संपर्क आहे.

परमेश्वराची भक्ती कशी करावी याची प्रेरक महिती प्रकाशभाऊ या गावात देतात.

त्यामुळे शेकडो कुटुंबांचे जीवन सुखी समाधानी झाले आहे.

प्रकाशभाऊंनी शेवटी अतिशय प्रेरक गोष्ट सांगितली ती म्हणजे, " आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी, पारदर्शीपणा हवा "

इतक्यात त्रिवेणी वहिनीने मस्त मसालेदार चहा सुद्धा बनविला. तास-दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. आता आम्हाला पुणे गाठायचे होते.

सरवदे कुटुंबाला शुभ कामना देऊन सायकलने पुण्याला प्रस्थान केले.

आयुष्य खूपच तोकडे आहे, म्हणूनच आपल्या जीवनाला आश्चर्यकारकरीत्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वांची प्रशंसा करायलाच हवी.

प्रकाशभाऊंचा जीवनपट खालील चार ओळी अधोरेखित करतोय.

वाट होती खडतर, केला खूप प्रयास !

कष्टांच फळ सोन म्हणून त्याचीच धरली कास !

दिला साऱ्यांना आधार, नाही धरला हव्यास !

उज्वल यशाला तुमच्या, आमचा सलाम खास !

" प्रकाश सरवदे" ... म्हणजे तळेगावाचे अथांग तळे

एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व माझ्या जीवन सफरीत समाविष्ट झाले होते.

खूप भाग्यवान आहे मी ! ! !

.

सतीश विष्णू जाधव

श्री प्रकाश बाबुराव सरवदे यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८८१९०३३८३

संस्कृतीसमाजसद्भावनालेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

सरवदेभाऊंना सांगून टाकला आहे का हा लेख? माझ्या माहितीप्रमाणे स्वाध्याय परिवार वाले जाहिरात किंवा प्रसिद्धी करत नाहीत.

सतीश विष्णू जाधव's picture

24 Oct 2020 - 10:56 pm | सतीश विष्णू जाधव

होय.....,

हा लेख मला भावलेली व्यक्ती म्हणून लिहिला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2020 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन चाळले, स्वाध्यायींच्या कामाची ओळख आहे, कधी तरी या कामात राहीलो आहे. आमचं एक उपक्र्मवरील लेखन स्वाध्यायींचा मनुष्य गौरव दिन. (लेखन जाहिरात)

-दिलीप बिरुटे

खेडूत's picture

25 Oct 2020 - 7:35 am | खेडूत

परिचय आवडला.
सतत नकारात्मक पोस्ट्स येत असताना असे लेख आशेचा किरण होतात.
अश्या लोकांचा परिचय ते स्वतः करत नाहीत, पण इतरांनी करून द्यायलाच हवा, नाहीतर सगळ्यांना कळणार कसे? हजार वाचकात एकाने प्रेरणा घेतली तरी मोठा फायदा समाजाचा आहे.
पूर्वी नानाजी देशमुख किंवा हल्ली अनेक दुर्लक्षित पुरस्कार विजेते झाल्यावर मग आपल्याला त्यांचं काम समजतं. खरे हिरो लोक समोर येत नाहीत.