दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

Primary tabs

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
10 Aug 2020 - 12:14 pm

सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक. आणि ही काही लिपीकपदासाठीची सरकारी खात्यातील, बॅकेची किंवा रेल्वेची परीक्षा नव्हे अभ्यास होता, पण परीक्षेला नेमकं काय येईल यांचा काही नेम नाही. मागच्या प्रश्नपत्रिकाचा काही आधार नाही. मी इतके दिवस निव्वळ घोकंपटटी चालू ठेवली होती. दिमागाचा पार भुग्गा होतो अशावेळी आणि कधी एकदा परीक्षेत सगळं काही ओकून डोकं मोकळं करतों असं होतं.

शेवटी हॉलतिकीट आलं एकदाचं. बघू सेंटर कुठे? किमान त्यामुळे तरी अभ्यास करण्यास उत्साह येईल...उगाचचं.... आपलं, मनास उभारी…वैगेरे…बघितलं हॉलतिकीट… वर्सोवा! ! ! जुहू-वर्सोवा लिकं रोडजवळचं कॉलेज. एकदा वाटलं परीक्षाकेंद्र जाऊन बघावं, परीक्षेअगोदर उगाच परीक्षेदिवशी धादंल नको, यापूर्वीं तिकडें कधी जाणं झालं नव्हतं पण मग मोबाईलकडे बघत आळस केला, म्हटलं “जाऊ देत…” गुगल मॅपवर बघू…जाऊ शोधत-शोधत… वर्सोवाला मेट्रोने जायचं अगोदरचं निश्चित केलं. शेवटी या परीक्षेच्या आदल्या रात्री अकरा वाजता झोपून एकदम अर्लामच्या साडेचारच्या ठोक्याला उठून सगळी तयारी करत पाच वाजता घरातून निघालो. वातावरण पाऊसाचं होतं खरं पण छत्री खांदयाला अडकवलेल्या बॅगतच होती. सहाच्या सुमारास घाटकोपर मेट्रो, सकाळी सकाळी मेट्रो ब-यांपैकी मोकळी पण मुंबईपण जपण्याइतपत माणसं होती, या मेट्रोच्या प्रवासाचा फायदा हा की प्रवास अल्हादायक आणि सुखकर असतो. आणि लोकलच्या प्रवासाची सवय झालेल्या माझ्यासारख्या मुंबईकराला हा प्रवास लक्षातच राहत नाही. नाही म्हणायला, असल्फाच्या आसपासच्या टेकडीपरिसरात वसलेल्या दुर्तफा झोपडपटटीतून मार्ग काढणा-या उन्नत मेट्रों कोणताही आवाज न करत गारेगार प्रवासाची अनुभूत देत काही अंशी आपल्याला पंख फुटल्याचा भास करुन देतें. गरीबी-श्रीमंती किती कोनात आणि किती अंशात मुबंईच्या या उपनगरातून वसलीय यांची झलक बघायची असेल तर मेट्रोचा प्रवास निश्चीत करावा. आडव्या जाणा-या रस्त्यांना उभं चिरत जाणारी मेट्रो, थोडाफार इंडस्ट्रियल एरिया, मोठमोठाली हॉटेल, एअरपोर्टचं किचिंतस होणार दर्शन, वेस्टन एक्सप्रेस हायवे आणि पुन्हा थराथरानीं एकमेंकावर कुरघोडी करणारी झोपडपटटी, त्याच्यां छप्परावर कोबंडयाच्या तु-यासारखी दिसणारे डिश एन्टीना, मंदीर-मशीदीचं होणार ओझरतं दर्शन. लोकलने म्हणालं तर तिथंही असं दिसणं होतं, पण ते जमीनीवरुन, इमारतीच्या वरच्या मजल्यापाशी डोकावता येत नाही. अर्थांत थोडं तिकीट महागं वाटतं पण रस्त्यावरच्या खडडयाकडे नजर गेल्यावर यांची किमंत कळते.

चला शेवटचा स्टॉप आलं एकदाचं.... वर्सोवा!. परीक्षाकेद्रं शोधत गाठायला गुगलमॅपची मदत घेत बराच वेळ गेला. पोहचलो एकदाचा सातच्या अगोदर. सहा-सात मजली, काचेचं बाह्यआवरण असलेलं महाविदयालय…कॉलेजचा गेट पार केला की आतमध्ये लगेचच बरी ऐसपैस मोकळी जागा होती…कॉलेजच्या आवारात शंभरऐक मांणस बसतील इतकी गादी निघालेली एकाच लाईनीत बसता येईल अशी लोखंडी आसनव्यवस्था. पेपर साडेनऊचा. खूप सारेजण आपला खोलीनंबर समोरच्या फलकावर बघण्यात व्यस्त होती. गेटवर सिक्युरिटी गार्ड असून नसल्यासारखेचं होते. सहाशे मुलं परीक्षेला येणारं मग कुठे आणि कसलं नियंत्रण. आणि हॉलतिकीट दाखवलं की गेटच्या आतमध्ये प्रवेश. तोही ब-यापैकी वैतागला होता पहिल्या अर्धांतासातच. काहीजणं, दुपारीचं बाहेर पडायला भेटणार म्हणून त्या कॉलेजच्या कॅटीनपाशी मिसळ, डोसा, मेदूंवडा आणि चायच्या आर्डंर देत हादडत होती. काहीजण एक निवांत कोपरा पकडून आपल्या सोबत आणलेल्या पुस्तकात डोकावून बसलेले. काही जण अजूनही सोशलनेट्वर्किंगच्या जगात एकटेच हसत-खिदडत बसलेले. काही मोबाईलशी चाळा करत बसलेले. कोणी या आवरात कुठेतरी निवांत कोपरा शोधत उभा असलेलं. काही घोळक्याने परीक्षा दयाला आलेले. या परीक्षेसाठी मार्काची पात्रता मिळवली की मग किती ही वेळा फेल व्हा काही हरकत नाही. वयाचंसुद्धा बंधन नाही. बहुतेक हा घोळका तोच असावा. माझी ही परीक्षा देण्याची पहिलीच वेळ आहे! काय माहित मी ही या घोळक्याचा भविष्यात भाग झालो तर.... एक-एक करत गर्दी वाढत होती…. काही सुजाण पालक आपल्या मुंलाच्या भविष्याची काळजी वाहवून आली होती. बावीस-तेवीस पार केलेल्या आमच्या सारख्यांना अजूनही आई-वडील परीक्षाकेद्रांवर का लागतात…? मला सकाळी सकाळी प्रश्न पडत होते खरे…काही पालक होऊन सुदधा परीक्षा दयायला आलेले…..पण अभ्यासाची म्हणून जी काही पुस्तक आणली होती ती न काढता मी टगळमगळ करत इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवत होतो. बाजूला रंगत असलेले किस्से ऐकत होतो…बहुतेक आर्टसची असणार…साहित्यकाची साहित्य लक्षात ठेवण्याची अंताक्षरी चालली होती. साधारण आत वर्गात प्रवेश साडेआठच्या सुमारास मिळणार होता. हॉलतिकीटवरच्या एका सूचनेने या चालू असलेल्या गोधंळाला शांतता प्राप्त करुन दिली. सूचना 'वरुन' आली होती, शिक्षण मंडळाकडून, कोणालाही बॅग आतमध्ये नेता येणार नाही! ! जितकीं जण आली होती परीक्षेला त्या सगळ्याकडे मोबाईल होते आणि तो मोबाईल आता बॅगतच ठेवणार….आपोआप बॅगेला किमंत प्राप्त होणार…तीचं बॅग इथे या बाहेरच्या आवारात ठेवायची म्हणजें… "अहो किमान वर्गाबाहेर तर ठेवू दया….","मंडळाने लिहून दिलं ठीकं पण आजकाल मोबाईल….","नुसता मोबाईलचं नाही अजूनही ब-याच महत्वाच्या गोष्टी असतात बॅगेत…" एक ना अनेक बोलणं कानावर येतं होतं… अनेक जणाचें मेंदूवडे अर्धवटचं होतें… अश्या बॅग्या कश्या बाहेर ठेवणार… तिथं गेटवर सिक्युरीटीवालांना कागद दाखवला तरी कोणालाही प्रवेश देतात…आणि आतमध्ये येवून बॅग घेवून गेला तर… इथं बॅग ठेवून आत जायचं कसं… साडेआठचे नऊ वाजत आले….मोबाईलमुळे अस्तित्व असलेल्या आमच्यासारख्या "सुशिक्षित" लोकांना हे असं बाहेर बॅगा सोडायचं तेही कुणाच्या जीवावर?.... तर या सुरक्षकाच्या भरोश्यावर….! जे काहीवेळापूर्वींचं आळसावलेत त्याच्यांवर…पुढारीपण करणारी लोक त्या महाविद्यालयाच्या सूचनाधारी मंडळीशी भांडत होतें…” असं कसं करता तुम्ही म्हण्याऱ्यांना "आम्हाला तश्या ऑर्डर आहेत” यांची उत्तर तयार…. मागच्या दहा मिनिटापासून हेच चालू होतं. “आणि हॉलतिकीटवर लिहिलं देखील होतं…काही आणू नये…”, “नेमकं अशा सूचना बनवणारे कुठल्या जगात राहून हया सूचना बनवतात त्यांनाच ठाऊक…”, “आता नाही म्हणायला ही सगळी कामाधंदयाला जाऊन परीक्षा देणारी बहुतेक तरुणमंडळी... मोबाईल तर आणारच ना…अजून काही मत… एव्हाना रांगा तयार झाल्या होत्या….हॅअ….काहीजण तयार ही झाली बॅग अशी बाहेर ठेवून आत मध्ये परीक्षा दयायला …अं…हे काय ..टाटा…ओ नो….त्या प्रवेशदवाराच्या पलीकडून बाय करणारे…अरे हे तेचं सगळें जण आहेत जे आपल्या आई-वडीलांना सोबत घेवून परीक्षा दयायला आलेले….आता मला माझी कीव येत होती….मी आता त्या पालकांकडे बघत होतो….काही पालक जरा जास्तच तरुण वाटले….नाही ही प्रियकर मंडळी… आता प्रेमात पडलेल्याचें फायदे बघत आपण कश्या कश्यात कमी पडलो याला दोष देत मग मी ही आवरातल्या एका आसनाखाली माझी बॅग ठेवली…त्यांच्या तपासणीला सामोरा गेलो. मशीन हातात घेवून अंग आणि खिसे चेक केल्यानंतर अखेर पाचव्या मजल्यावरच्या परीक्षेच्या खोलीच्या दिशेने आगेकूच केली…तरी सव्वानऊ झाले होते…आपली बॅग कोणी घेवून तर जाणार नाही ना यांची तर भीती मला काय सगळ्यानां होती….फक्त ज्यांचे पालक आणि प्रेमिका सोबत आले होते त्यांना ही फिकीर नव्हती…त्यांत पेपर लिहायचा आहे कसलहीं टेशन न घेता... खालती ठेवलेल्या बॅगचंसुद्धा…

दोन पर्यवेक्षक अगोदरच प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिकेसह वर्गात हजर होते…तीस मुलांसाठी दोन पर्यवेक्षक जरा जास्तच होते…अजून दहा मिनीट बाकी….मी माझा क्रंमाक शोधत बाकापाशी आलो आणि बसलो…आणि बघतो तर काय वर्गाच्या थेट समोरच्या खिडकीतून दिसणारा अंथाग समुद्र. माझ्या सारख्या मुंबईच्या ईशान्य टोकाला राहणा-याला, खाडी आणि तलावाशी ओळख असणा-याला अश्या लाटा डोळ्यांनी बघत पेपर लिहण्याची (नाही निव्वळ गोळे करण्याची!) ही पहिलीचं वेळं. इथं बाकापाशी ओळखपञक आणि हॉलतिकीट वरचा चेहरा तपासणं चालू होतं. मागच्याबाजूला खिडकी आणि रहिवाशी इमारतीचा परिसर. वर्गात समोरचा फिकट हिरवा दिसणारा दिसणारा फळा…ब-यापैकी परीक्षार्थी गैरहजर होते….त्यामुळे वर्ग जरा जास्तच मोकळा वाटत होता…इकडे तिकडे विचारत खाणाखुणा करत एकमेकांना उत्तर विचारायचा संबधच नव्हता…. उत्तर आणि दक्षिण दिशेला दोन वेगवेगळ्या विषयावरच्यां परीक्षाबददल, दोघांनाही एकमेंकाबददलच्या विषयाबदल काही माहित नसणार…कोण सोशलवर्क, कोण इकॉनामिकस, कोणी आर्टस…कोणी आमच्या सारखं कार्मेसवालं…त्यातहीं प्रत्येकाला वेगवेगळें सेट ए,बी,सी,डी…म्हणजें खरी परीक्षा…आता मला त्या शिक्षणमंडळाच्या अधिका-यांचा बुदधीची क्षमता कळून आली होती…. पहिला पेपर सव्वातासाचा म्हणजे पावणेअकराला संपणार….आणि साठ प्रश्न त्यातलं पन्नासाची उत्तर दयायची.. फक्त उत्तरपत्रिकेतील प्रश्नक्रंमाकासमोरचा योग्य पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल रंगवायचा…काही वय, आकडेमोडे, लॉजिकवाले प्रश्न, मानवी व्यवहार, परिच्छेदावरुन उत्तर…इंग्रजीत प्रश्न नाही समजला तर हिदींतही बाजूच्या पानाकडे बघा…म्हणजे अजून डोकेदुखी… काही गोल प्रामाणिकपणे भरले….काही नुसतेचं नकळत भरले…काही प्रश्न दिमागाची हटवणारे…जागतिक प्रदुषण, संगणकाचे भाग, बायनरी कोड, दूरजवळची अंतर, आई-वडीलाच्यां वयावरुन मुलाचं वय, भारताचे संविधान, रिसर्चचे प्रकार…काहीच्या उत्तराबदल शाशंक होतो…”अजून पंधरा मिनिट आणि वीस प्रश्न बाकी”…. काहीच समजत नव्हतं कुठलचं लॉजिक कामी येत नव्हतं….बर झालं निगेटिव्ह मार्कीगं नव्हतं…नाहीतर रिझल्ट निगेटिव्हमध्येच!…आता काय करायचं…कशी दयायची उत्तर…समोरच्या समुद्रावर नजर होती…खेळ ठरला मनाचा….समोरच्या प्रश्नांपैकी सगळ्यात जवळचे वाटणारे दोन पर्याय मनात आणायचे….डोळे बंद करायचे…आणि त्या पाचव्या मजल्यावरुन दिसणा-या लाटामध्ये जो पर्याय दिसणार…तो रकाना रंगवायचा…घडाळ्याकडे नजर होती… विचार करायला वेळ नव्हता…जो दिसेल तो गोल रंगवत होतो….नेमकं तिकडें बेल वाजली आणि इकडं लाटेतं दिसलेला शेवटच्या प्रश्नक्रमांकासमोर ‘सी’चा गोल रंगवत….दिला एकदाचा पन्नास उत्तराचा खेळ नशीबावर सोपवून…

पहिला पेपर कसाबसा संपला. पुढचा पेपर सव्वाअकरा वाजता म्हणजे आता अर्धांतास मोकळा. पुढच्या पेपरमध्ये प्रश्न पन्नास आणि सगळे सोडवायचे. एवढे दिवस केलेल्या अभ्यासातलं एवढसं पण आठवत नव्हतं. मनातल्या मनात रिविजन काय डोबंलाची करणार…. समुद्राला संमातर दिशेने असलेल्या विजेच्या तारावर सरळ रेषेत काही पक्ष्यांचा येण्याजाण्याचा खेळ मागच्या काही तासापासून मी पाहत होतो. मगाशी गोळे रंगवायची लगबग होती…आता थोडं निवांत होतो. कश्याचंच बंधन नसणं….हव तसं जंगण….मुक्तपणे….इतक्या उंचावरुन आजूबाजूचा रहाटगाडा पाहत बसायचं…काय मजा येतं असेलं ना. या पक्ष्यांना खंरच काही गुपित माहित असतील…त्यांना मन असेल…त्यांनाही माणसांबदल…आजूबाजूच्या जगाबददल…प्रश्न पडतं असतील... का फक्त खा, प्या आणि उडा एवढचं…काहीतरी खूणागाठा बांधून विश्वनिर्मात्याने त्यांना इथं निर्माण केलं असेल नाही का… मनात विचाराचं काहूर वाढतचं चाललं होतं…समोर लाटा खूपचं जोरजोरात किना-यावर येत होत्या. आता मात्र जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्या वीजेच्या ता-यावरुन पक्षी एक-एक करत उडून जाऊ लागले….काहीनीं वर्गासमोरच्या खिडकीजवळ आसरा घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्यां स्वातंत्र्याची कीव येत होती…आपण का परीक्षेला आलोय याची जाणीव झाली…शेवटी पैसा कमवायचायं….एक आसरा या ऊन, वारा, पाऊस याच्यांपासून बचावासाठी….या जगाच्या रहाटगाडयाच्यां चाकात आपण कसं गुरफटलोय ते कळून चुकलयं…पुन्हा दुसरा पेपर सुरु झाला….मात्र पुन्हा हा देखील पेपर कठीण जात होता….आणि पुन्हा उरलेल्या पंचवीस प्रश्नांना समोरच्या समुद्रमंथनातून येणा-या ए,बी,सी,डी मधून निवडायला तयार झालो…इकॉनामिकस, बेसिक अंकाऊटस, डिमाडं सप्लाई करव, कॅपिटल गिअरिंग रेशो कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता. यावेळी मात्र लाटासोबतचा खेळ फार कमी वेळात संपला…. मात्र सकाळी त्या इतर मुलांनी का मिसळपाव, मेंदूवडे खाले याचीं प्रचिती मला आता सव्वाबारा वाजता येत होती…किमान चहा तरी प्यायला हवा होता पोटात कावळे ओरडत होतें…शेवटी बेल वाजली.

आता तिसरा पेपर दोन वाजता म्हणजे दीड वाजता वरती यायचं… मी आता पहिल्यादां वर्गाबाहेर आलो. म्हटलं आता खिडकीसमोरुन नको…थोडयाश्या वरच्या बाजूला असलेल्या पाय-यावरुन बघितलं…ओ मॉय गॉड….आजूबाजूच्या झाडीनीं वसलेल्या त्या भागात आता समुद्रकिनारा स्पष्ट मोठाला दिसत होता….वाळू मध्ये उनाडग्या करणारी टपोरी पोरं, किना-याच्या वरच्या बाजूला असलेलीं झोपडपटटी, कुणाचंही न ऐकणा-या आपल्याच नादात असलेल्या लाटा म्हणजे वर्गातून जे बघतं होतो ती झलक होती तर….इतक्यां उंचावरुन समुद्र दररोज बघता येणा-या समोरच्या त्या झाडी पलीकडल्या इमारतीमधल्या लोकांचा मला खरंच हेवा वाटत होता सकाळी झोपतून उठल्या-उठल्या समोर रिफरेश करायला समुद्र दिमतीला…वा! या कॉलेजमध्ये इजिंनीअरिगं करण्याला येथून समुद्र पाहत शिकताना किती मजा येतं असेलं…. मी आता येथेच रमत बसणार…इतक्यात कुणीतरी खालती असलेल्या बॅगाची आठवण करुन दिली आणि मी भानावर आलो.

लिफ्टच्या जवळ आधीच खूप गर्दी होती…. मग पाच मजले उतरत धावत-धावत खाली उतरलो….बॅग सुरक्षित ठिकाणी होती…या शिपाई लोकांनी खूप मोठं काम केलं होतं…लोकांची अस्तित्व सुरक्षित ठेवण्याचं….सोबत बॅगेतून आणलेली बिस्किट खातं मी माझ्या प्रश्नप्रत्रिका बघत चुकींच्या उत्तराची चहलपहल करत होतो. इकडे त्या कॅटीनपाशी भलीमोठी दोनशे लोकांची रांग सुरु होती. कॅटीनवाले सुदधा पूर्ण तयारीनिशी होते. या दुस-या पेपरशी निगडीत थोडीफार फारकत जरी असली तरी मिळता-जुळता असलेल्या अभ्यासक्रमाशीं तिसरा पेपर….अजून काही डोक्यात साठवायला मन तयार नव्हतं…तरीदेखील जेवढं वाचता येईल तेवढं वाचतं होतो…इकडे लग्नसंभारभाप्रमाणे त्या सगळ्या आवरात लोकांची खाण्याच्या त्या ताटासकट जागा मिळवण्याची भूपाळी जेवणावेळेची तगमग ईथेही होतीच. माझ्या शेजारी बसलेल्या एकाचं बॅगेतून डबा काढत घास खातं-खांतच फोनवर बोलणं चालू होतं “अरे पहिला पेपर नीट गेला ….दुस-यातलं काहीचं येत नव्हतं…जो मागच्या वर्षी पास झाला असेल त्याला देखील यंदाचा पेपर सोडवता येणार नाही” आजूबाजूला सा-याचीं माझ्यासारखीच अवस्था आहे…मनाला धीर येणं म्हणजें काय तर हे….आपल्यासारखीच दुस-याची अवस्था असेल तर आपलं आता काय होणार याची काळजी वाटून राहत नाही…काहीजणांनी कित्येक वर्षापासूनची सहभोजनाची हौस या निमित्ताने भागवून घेत जमिनीवर बैठक मारली. “अरे बॅगा किमान वर्गासमोर ठेवायला दिली पाहिजे होती”…सकाळचं पालुपदं आताही चालूं होतं. काहीजण आता तेथल्या सिक्युरिटीशी वाद करत होते आणि तो देखील तितक्याच आत्मविश्वासाने “काही होणार नाही, इथं कोण येणार नाही…” आपली बाजू लावून धरण्याचे काम करत होते. “इथे सीसीटीव्ही सुदधा नाही आहेत, उदया काय चोरीला गेलं म्हणजे?”तेचं मगाचे पालक व प्रेमियुगुलाचां समुदाय भुकेलेल्या परीक्षार्थीनां बघुन त्यांच्या प्लेटीतला मेंदूवडा उचलत “वरुनचं तशी नोटीस आलीय…वरुन ऑर्डर आली म्हणून काय झालं….थोडातरी कॉमनसेन्स राखा…” आता सकाळपासूनच्या बाता आता भरपेट करत होते इतकेच….मॅनेजमॅटकडे यांची उत्तर नव्हती. आता पोट भरली होती…प्रेमीयुगुल अजूनही पेपर मधली उत्तर तपासण्यात मश्गूल होती…त्यांनाच खरी आपल्या जोडीदाराच्या भविष्याबदल चितां होती. आणि पुन्हा एकदा आपल्या बॅगा ठेवत खिसे आणि इतर तपासणी करत आतमध्यें सोडण्याचें काम सुरु झाले. आता पुन्हा काय चेक करायचं पण मॅनेजमेंटला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एखादा महाभाग मागच्या पेपरचा अनुमान घेत येणा-या तिस-या पेपरसंबधी नोटस घेवून गेला तर…. त्या गर्दीत काही जण आपला रोष “मागच्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देतोय पण असा गोधंळ बघितला नव्हता असं म्हणून व्यक्त करत होते…” अजून दोन-तीन आवाजांनी तर अकरा, बाराचा आकडा सांगितला…आणि आपल पण असंच होणार की काय असं वाटू लागलं. दीड वाजायला अवकाश होता…मी पाचव्या मजल्यावर येवून पुन्हा समुद्र पाहत होतो…किना-यावर त्या दुपारच्या उन्हात कोणीही नव्हतं….इथे माझ्या शेजारी आणखी काहीजण हा नजारा पाहत होती…मला क्षितीज हा प्रकार फार भयानक वाटतो…जे खरचं कधी होणार नाही…जे दोघ कधीच एकमेकांना भेटणार नाहीत ते भेटल्यासारखं वाटणं…डोळ्याना सुखावणार, दिसणारं…असत्य….. एका ठराविक ठिकाणावर संपून गेला असावा वाटणारा हा समुद्र स्वत:सोबत किती-किती अनादी वर्षांपासून इथे पृथ्वीवर होण्या-या स्थित्यांतराचा साक्षी असेल ना…..आपणही एक दिवस नष्ट होऊ…जाऊ यांच्यातच मिसळून तरीदेखील हा इथेच असेल… लाटामागून येणा-या लाटा…यांला माहिती असेल का यांच्या अस्तित्वाचा सुरवातीचा काळ…त्यांने राखून ठेवलेली अनेक गुपित….लाखों किलोमीटरवरच्या चंद्राबरोबरचं त्याचं नातं…पुढेही टिकून राहिल का हे आकर्षण….

पावणेदोन वाजले…. आतमध्ये वर्गात येऊन बाकावर बसलो पण अजूनही लाटा दिसत होत्या….इकडे कूजबूज सुरु झाली की हा पेपर सोडवायला केवळ एक-दीड तास पुरेसा आहे…सगळे अनुभवी परीक्षार्थी….मला आश्चर्य वाटलं कसं शक्य आहे… यावेळी पंच्याहत्तर प्रश्न…. सगळे सोडवायचे आणि अडीच तास….…पेपर सुरु झाला. पहिल्या एक तासा नंतर तीन दहाच्या सुमारास काही जणानीं आपली गोळे करुन झालेली उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे जमा करत बाहेर निघालेसुदधा मात्र त्यांना प्रश्नपत्रिका बाहेर नेण्यास मनाई होती ती ईथेच पर्यवेक्षकांकडे जमा करावी लागणार होती जर साडेचार वाजेपर्यंत थांबल्यात तरच प्रश्नपत्रिका नेता येणार होती (शिक्षणमंडळाचे वरुन आलेले आदेश काय करणार!), काहीजणं साडेतीन, पावणेचार वाजता जायला तयार झाले…पणं प्रश्नपत्रिका पुढच्या परीक्षेच्यावेळी अभ्यास करायला उपयोगी पडेल म्हणून साडेचारपर्यंत बसून राहणार होते….मला शिक्षणमंडळाच्या आदेशापासून…पुढच्या परीक्षेवर अवलंबून राहणा-या माझ्यासारख्या सगळ्याबदल हसूं येत होतं… सुटण्याअगोदर दिली असती प्रश्नपत्रिका घेवून जाऊ तर कोणता मोठा प्रश्न उभा राहणार होता…नेमक्या कुणाला त्यामुळे कॉपी करायला मदत होणार होती… हया प्रश्नपत्रिका ठेवून निघून गेल्यावर काही दिवसातं नेटवर उपलब्ध झाल्या असत्या, हा आमचा मूर्खपणा, जे आम्हाला त्याचं आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिका हव्या होत्या….चार वाजले…मी पुन्हा एकदा शाशंक होतो…पंच्याहत्तर मधले अजून बरेच प्रश्न मी मनाच्या आणि समुद्रमंथनातून लाटेवर येणा-या उत्तरावर सोडून दिल्या. मनी आणि कॅश मार्केट ते मोड मिडयन, बॅका, त्यांची स्थापनासाल, आंतराष्ट्रीय नाणेनिधी, पुन्हा डिमाडं स्पलाय, इलास्टीसीटी सगळं… सगळं… काय बरोबर?....काय चूक?…चारीहीच्या चारी पर्यायबरोबर. कोणतेतरी दोन निवडा… आणि.…. खेळ सुरु. इकडे माझ्या उजव्या बाजूकडील दोन महिलामंडळीनी सगळे गोळे रंगवून झाल्यावर आपआपसात चर्चासत्र सुरु केलं आणि आता यांत कोणत्याही गनिमी कावा नसल्याचं पर्यवेक्षक मंडळीना लक्षात आल्यानं त्यांनीही दुर्लक्ष करत त्यांना मूकसंमती देऊन टाकली. बरं चालं होत त्यांच…बाता पेपरावरुन महागाईवर आल्या होत्या. दोघीही सगळी उत्तर अंदाजे लिहिल्याचं बोलत होत्या. सव्वाचार वाजले. मी ही आता वैतागलो होतो. परीक्षा मनासारखी गेली नव्हती, आता पुन्हा एकदा पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार असचं वाटतं होतं. पाऊस वाढतच होता. आणि खिडकीच्या बाजूच्या तावदानावर येवून बसणा-या पक्ष्याची संख्या वाढत होती. इतक्या उंचीवरुन समुद्राच्या लाटा आणि परीक्षा असा माहौल पुन्हा येईल का माहित नाही.

शेवटची बेल झाली आणि तीन पेपरसह मी ही मागच्या अनेक महिन्यापासूनचा डोक्यात साठवलेल्या अभ्यासचां भार हलका करत इमारतीचे मजले उतरत खाली बॅग शोधू लागलो…मागच्या अडीच तासामुळे…डोक जरा भ्रमिष्ट झाल्यासारखं वाटतं होतं…कोठे ठेवली…इथे..नाही….हा…सापडली… बॅग सापडली…मोबाईलही होता…बॅगा अडकवतं खूप जणं पेपर सोपा-कठीण असल्याचं एकमेकांना सांगत रस्त्यावरुन चालत होती…आता पुन्हा समुद्र उंचावरुन पाहत वेळेशी बांधील राहत…लाटाच्या मदतीने सोडवलेली उत्तर….पुन्हा कधी माहित नाही? बाहेर पाऊस नव्हता. ओलसर रस्तावरुन चालत, यावेळी गुगलमॅपची मदत न घेता मेट्रो गाठली…. “पेपर कसा गेला?” या घरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दयावं यांचा विचार सुरु झाला…

-लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

धोरणसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

रातराणी's picture

11 Aug 2020 - 2:32 am | रातराणी

Apratim!!

king_of_net's picture

11 Aug 2020 - 11:56 am | king_of_net

छान लेखनशैली !!

सिरुसेरि's picture

11 Aug 2020 - 3:38 pm | सिरुसेरि

सुरेख अनुभव कथन . हि परिक्षा कुठल्या विषयाची होती ?

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2020 - 8:59 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर ! जबरदस्त !
तुमची लेखनशैली खिळवून टकणारी आहे, अगदी चित्रदर्शी !
तुमच्या बरोबर परिक्षा हॉलमध्ये आहे असं वाटलं.
माझ्याही परिक्षेचे प्रसंग आठवले !

वाह लेखनवाला. लिहित रहा
तुमच्या लेखणीला _/\_

वीणा३'s picture

12 Aug 2020 - 1:56 am | वीणा३

लिहित रहा.