मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

टर्मीनेटर · · जनातलं, मनातलं
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही. कधीकधी आपण वैयक्‍तिक समस्यांमुळे काळजीत असतो तर कधी आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे मक्ख-चिंताग्रस्त चेहरे, त्रासिक मुद्रा, परिचयातल्या कोणाच्या आजारपण,अपघात, मृत्यूची वा एखादी वाईट बातमी अशा गोष्टी, त्यांचा थेट आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नसूनही, नकळतपणे एक प्रकारच्या खिन्नतेचे जळमट आपल्या मनावर पसरवत असतात. मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान असल्याने अशाप्रसंगी भावूक होणे स्वाभाविक असले तरी अशा खिन्न अवस्थेत फारकाळ राहणे त्याला श्रेयस्कर नसते. अशी खिन्नता दूर करण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी चित्रपट बघून वा संगीत ऐकून आपला मूड ठीक करत असतील तर कोणी अन्य कुठल्या मार्गाने. माझ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून औदासिन्य झटकून टाकण्यासाठी हुकमी ठरलेला मार्ग म्हणजे युट्यूब वर आनंद आणि उर्जा ठासून भरलेल्या गाण्यांचे व्हीडीओ बघणे! त्यातले संगीत, नृत्य आणि कलाकारांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहणारा आनंद बघताना तुकोबांच्या 'आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।।' या अभंगातल्या ओळींच्या 'मी आनंदाचा, ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे, म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात' ह्या भावार्थाची प्रचीती येते आणि खिन्नता दूर होऊन मूड एकदम फ्रेश होतो. वेगवेगळ्या भाषांतील अशा गाण्यांच्या व्हीडीओंची माझी प्ले-लिस्ट तशी बरीच मोठी आहे. त्यातली काही निवडक गाणी खालील प्रमाणे आहेत.

Khaled - C'est La Vie

नव्वदच्या दशकात भारतात आंतरराष्ट्रीय पॉप संगीताचे पर्व सुरु झाले तेव्हा 'दि दि' ह्या लोकप्रिय गाण्याने आपल्या परिचयाचा झालेला नायजेरियन गायक खालीद् ह्याचे फ्रेंच आणि अरबी भाषेतील हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असून गाण्यातली उर्जा थक्क करणारी आहे.


Shakira - Waka Waka

खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या फुटबॉल सारख्या खेळाच्या २०१० सालच्या फिफा वर्ल्डकपचे अधिकृत गीत म्हणून मान्यता मिळालेले आणि उत्तमरित्या चित्रीत केलेले कोलंबियन गायिका आणि नृत्यांगना शकीराचे हे गाणे.


3

सेनोरीटा

हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देवल ह्या तिघांनी गायलेले आणि त्यांच्यावरच चित्रित केलेले, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ह्या चित्रपटातील स्पॅनिश आणि हिंदी भाषेतील हे गाणे ऐकायला आणि बघायला फार छान वाटते.


4

मल्हारी - बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी चित्रपटातील, रणवीर सिंग ह्या अभिनेत्यावर चित्रित केलेल्या ह्या गाण्यातला, नाचताना त्याने दाखवलेला जोश वाखाणण्याजोगा आहे.


झिंगाट - सैराट

अबालवृद्धांना आपल्या तालावर थिरकायला लावणारं सैराट चित्रपटातील हे गाणं माहित नसेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात विरळाच असेल. मला हा चित्रपट आवडला नसला तरी हे गाणं मात्र आवडतं.


तुफान आलयां - पाणी फाउंडेशन

'पाण्याचे दुर्भिक्ष' अशा गंभीर विषयावर आधारित असूनही, अजय-अतुल ह्यांचे संगीत, गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, किरण राव आणि अजय गोगावले ह्यांचा आवाज, नागराज मंजुळे ह्यांचे दिग्दर्शन लाभल्याने आणि नामवंत कलाकारांचा सहभाग असल्याने हा व्हिडिओ मनाला चांगलाच भावतो.


7

गुन गुन गुना रे - अग्निपथ

पुनर्निर्मित 'अग्निपथ' ह्या चित्रपटातील हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा ह्यांचा सहभाग असलेले हे गाणं आधी नुसते ऐकले होते तेव्हा आवडले नव्हते, पण चित्रपटात बघितल्यावर मात्र फार आवडले.


गल्लां गुडीयां - दिल धडकने दो

दिल धडकने दो ह्या चित्रपटातील, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, फरहान अख्तर अशा दिग्गज कलाकारांवर चित्रित केलेले आणि सुखविंदर सिंग व शंकर महादेवन ह्यांच्या दमदार आवाजातील हे गाणं बघताना पाय आपोआपच ठेका धरतात.


झल्ला वल्लाह - इशकजादे

इशकजादे चित्रपटातील ह्या गाण्यात गौहर खान आणि परिणीती चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या नृत्याने आणि हावभावांनी बहार आणली आहे. हे गाणंही चित्रपट पाहिल्यानंतर आवडायला लागलं.


१०

रूबरू - रंग दे बसंती

रंग दे बसंती चित्रपटातील आमिरखान, अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी, माधवन, सिद्धार्थ, कुणाल कपूर, सोहा अली खान असे सहभागी कलाकार आणि त्याला ए.आर.रेहमानच्या संगीताची जोड लाभलेले, मैत्री आणि अवखळ तरुणाईचे दर्शन घडवणारं असं हे सुदर गाणं.


११

मच गया शोर - खुद्दार

ऐशीच्या दशकातील खुद्दार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी वर चित्रित केलेले हे सदाबहार गाणे केवळ दहीहंडीच्या दिवशीच नाही तर कधीही ऐकायला/बघायला मजा येते.(युट्युब वर ह्या गाण्याचा चांगल्या प्रतीचा व्हीडीओ उपलब्ध नाहीये.)


१२

PSY - GANGNAM STYLE

१५ जुलै २०१२ रोजी युट्युब वर प्रदर्शित झालेल्या, साय (PSY) नावाच्या दक्षिण कोरियन नर्तक-गायकाच्या ह्या धमाल व्हीडीओने, डिसेंबर २०१२ मध्ये युट्युबच्या इतिहासात सर्वप्रथम १०० कोटी व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम नोंदवला आहे.


वाचन 15272 प्रतिक्रिया 0