<<परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.>>
शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते. त्या दोन योदध्यांना कशाचेही भान उरत नाही.ह्या लढतीत, बलवान नराचा विजय होतो, आणि हरलेला घायाळ नर त्याच्या एरियातून निघून जातो. मग त्या एरियातील मादयांवर, जेत्या नराचा अधिकार असतो. नराने मादीला आकर्षित करुन घेण्यासाठी स्क्रेपिंग करणे आणी शेवटी त्याचा मादीशी संबंध येण्या पर्यंतच्या सगळ्या सिक्वेन्सला Rutting म्हणतात.
हुशार शिकारी, आपल्याकडील हरिणशिंगाचा एकमेकांवर घासून आवाज काढून नरांचे लक्ष वेधून घेतो. असा आवाज दोन नरांच्या झुंजीच्या वेळी तसंच नराने शिंग झाडावर घासताना येतो. त्यामुळे शिकारयाकडे अनायासेच इतर नर चालून येतात.नर बाणाच्या किंवा बंदूकीच्या टप्प्यात आल्यावर, त्याची शिकार करणं सोपं असतं. ह्या प्रकाराला Rattling म्हणतात.
पण म्हणून जंगलात कुठेही जाउन, असा शिंगांचा आवाज काढला की, नर तिकडे येतात का? नाही.
असा आवाज काढण्यासाठी, नरांची संख्या जास्त असलेला जंगली भाग निवडावा लागतो. तो भाग शोधण्याची सोपी युक्ती म्हणजे, त्या भागातील माद्या कधी पिल्ले घालतात ते पाहणे.
मादयांचे गर्भारपणाचा काळ सात महिने असतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मादी माजावर येण्याचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो.मादयांच्या माजावर येण्याच्या हंगामात त्यांना नराची साथ मिळाली तर त्या सात महिन्यांनी पिल्ले घालतात.म्हणजेच ज्या भागातील मादया जून ते जुलैमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात पुरेसे नर असतात.
ह्या काळात मादीला गर्भधारणा झाली नाही, तर ती परत पुढच्या फेब्रुवारी मध्ये माजावर येते. त्यामुळे ज्याभागात मादया सप्टेंबरमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात नर कमी असतात.
इथले शिकारी ह्या आडाख्यांबरोबरच, कोणत्या भागात पाइन वॄक्षांचे स्क्रेपिंग होत आहे, तसेच पुढच्या खुरांनी जमीन उकरली गेली आहे, पाला पाचोळा विस्कटला गेला आहे ते ही बघून आपले मचाण बांधतात.
मी, चार्ल्स आणी लुई,मागच्या वीकांताला, दोन दिवस रानात फिरुन काही हाती लागले नाही.दोन दिवस जंगलात फुकाची पायपीट मात्र झाली. जंगल जवळून बघायला मिळाले ते गोष्ट निराळी!
कधी लुईचा नेम चुकायचा तर कधी चार्लीचा. एकदा तर निसटता बाण बसून बक पळून गेला. चार्ली तसा अनुभवी खिलाडी, त्यामुळे तो इकडे तिकडे जाउन टेहळणी करुन आला की त्याला त्या भागात जास्त स्क्रेपिंग दिसायचे, किंवा एखाद्या भागात त्याच्या दिव्य दॄष्टीला पाला पाचोळा विस्कटलेला दिसायचा. त्याच्या सांगण्यावरुन मचाण हलवून जीव मेटाकुटीस आला. ह्या झाडावरुन उतरुन त्या झाडावर चढून मांडया भरुन आल्या. मात्र दोन दिवसांत अमेरिकेतील डिअर हंटींगची भरपूर माहिती मिळाली. तीच इथे दिली आहे.
शेवटी येता येता एक जंगली ससा आणी एक टर्की पक्षी मिळाला. त्यांचे चार्ल्सच्या रॅंचवर बार्बेक्यू करुन,त्यावर सगळ्यांनी आडवा हात मारला. बरोबर झक्कास वेस्ट इंडियन रम!!
कोकणात मी भेकरु (हरणाचा प्रकार)च्या लुसलुशीत मांसाची सागुती खाल्ली होती. डिअर हंटींग सिझनची सुरुवात झाल्यावर चार्ल्स आणी लुईसोबत, इथेही एखादे हरिण चापायला मिळेल म्हणून गेलो होतो, पण शेवटी ससा आणी टर्कीवर समाधान मानून परत आलो.
चार्ल्स आणी लुईने अजूनही हिंमत हारलेली नाही. पुढच्या वीकांतात परत जायचे प्लॅन्स आखले जातायत. त्यांच्याकडची लुईझिआना वाईल्ड लाइफ डिपार्टमेंटने दिलेली, शिकारीवर लावण्याची “किल स्टीकर्स” त्यांना खुणावतायत.
प्रतिक्रिया
4 Nov 2008 - 7:14 pm | लिखाळ
छान लेख आहेत !
असे वेगळे अनुभव वाचायला आवडतात. शिकारीची बरेच माहिती गोळा केली आहेत..
या शिकारींना परवानगी हरणांच्या बेसुमार वाढणार्या संख्येला आवर घालण्यासाठी म्हणून दिली जाते का? या शिकारींचा तेथल्या वन्यजीवनाच्या तोलावर काही वाईट परिणाम होणार नाही असे अभ्यासूनच ही पद्धत चालू ठेवली असणार असा अंदाज आहे. याबद्दल सुद्धा काही माहिती असेल तर लिहा.
--लिखाळ.
4 Nov 2008 - 8:04 pm | कपिल काळे
लिखाळ्भौ
तुम्ही बरोबर ओळखलात. इथे जरी प्रत्येकाला ६ शिकारींची परवानगी असली तरी, शिकार करणारया प्रत्येकालाच ६ मिळतीलच असे नाही. शिवाय लायसन्स असल्याशिवाय शिकारीला जाता येत नाही. नवीन लायसन्स मिळण्याच्या अटी फारच कठीण आहेत.
शिकारीसाठी आवश्यक माहिती जंगल खात्याकडूनच दिली जाते. म्हणजे कुठे स्क्रेपिंग किंवा रटींग चालू आहे वगैरे.
परंतु हा हे सगळं हौस म्हणूनच केलं जाइल ह्याची दक्षता म्हणून निर्बंध आहेत.
त्यामुळे शिकारीमुळे कमी होणारी संख्या, ही नवीन जन्माला येणारया पिल्लांच्या काही फ्रेक्शन असते. ह्याशिवाय लेखात सांगितल्याप्रमाणे मादीच्या शिकारीवर निर्बंध आहेतच.
http://www.wlf.louisiana.gov/ ही लुईझिआना राज्य सरकारची वेबसाइट अधिक संदर्भासाठी वाचू शकाल.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
4 Nov 2008 - 7:34 pm | प्राजु
सुरेख माहिती दिली आहे. नहीतर, आम्हाला कशाला समजते अशी हंटींग ची माहिती. :)
दोन्ही भाग वाचले. खूप आवडले. माहिती सगळी इथे लिहिपर्यंत आपल्या लक्षात राहिली हे विशेष .. नाहीतर, बरेच मुद्दे राहून जातात सांगायचे.. (असं माझं तरी होतं).
शिकार करण्यासाठी इतके काटेकोर नियम आहेत आणि शिकारी ते नियम पाळतात...ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Nov 2008 - 8:08 pm | कपिल काळे
धन्यवाद प्राजु.
लुई आणि चार्ल्स ला प्रश्न विचारुन सतावलं होतं. नवीन मुद्दा सापडल्यावर लिहून ठेवला होता. पण जंगलात तोंड बंद ठेवायला लागतं म्हणून(हरिण जाइल ना पळून!), नाहीतर अजून एखादा भाग झाला असता.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
4 Nov 2008 - 8:18 pm | लिखाळ
> पण जंगलात तोंड बंद ठेवायला लागतं म्हणून(हरिण जाइल ना पळून!), नाहीतर अजून एखादा भाग झाला असता.<
मग एक भाग कोराच टाकायचा :) (हघ्या.)
सकाळच्या मुक्तपिठ मध्ये 'अमेरिका म्हणजे फक्त कोक आणि बर्गर नाही' असा लेख आला होता तो तुमचाच का?
--लिखाळ.
4 Nov 2008 - 8:32 pm | कपिल काळे
हो हो मीच तो कोक पिझ्झा वाला. बर्गर नव्हतं शीर्षकात. झालं काय की, त्याच्या चित्रात बर्गर दाखवला सकाळच्या स्टाफ आर्टीस्टने.