सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास
Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास....
तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे. 'सुखदु:ख मीमांसा.' अनेक पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्ववेत्ते, दर्शने, भगवद्गीता, बुध्द तत्त्वज्ञान, अनेक समाजसुधारक व मानवी समाजाच्या विकासाचे अनेक पैलू यांच्या अनुषंगाने चिंतन करीत, हा अभ्यास happiness index पर्यंत पोचतो. दु:खी समाज दु:खी का याचबरोबर आनंदी मनुष्य कसा काय बरं आनंदी राहतो याचे चिंतन पुस्तकात मुद्देसूदपणे केलेले आहे.
मानवाच्या उत्क्रांतीसोबतच होत गेलेली मानवी मनाची गुंतागुंत आणि त्यासोबत बदलत आणि वाढत जाणारे दु:खाचेही पैलू यांचा उहापोह दुरिताचे तिमीर या पहिल्या प्रकरणात दिसतो. योगवसिष्ठात जरी दु:खाचे आधि आणि व्याधी म्हणजे मानसिक दु:ख व कायिक दु:ख असे दोन विभाग केलेले असले तरी बदलत्या परिस्थितीबरोबर त्यात निर्माण झालेली गुंतागुंतही या प्रकरणात उकलली आहे.
या अशा दु:खनिवृत्तीसाठी आधी सुरू होतो तो सुखाचा पाठलाग! 'कुणी सुख देता का सुख?' या प्रकरणात आनंद, ब्रह्मानंद, हर्ष, स्रमाधान अशा सुखाशी निगडीत भावनांचाही मागोवा घेताना 'हुकलेले सुख ज्याचे बीज पेरून जाते ते दु:ख 'अशीही दु:खाची एक वेगळी व्याख्या समोर येते.
सुखाचे ऐहिक, भावनिक, बौध्दिक असे पैलू समोर आणताना, गणिती नियम सापडल्यावर भान हरपून
अत्यानंदानी विवस्त्र धावणारा आर्किमिडीज हे सृजनाच्या आनंदाची महत्ता दर्शविणारे एक प्रातिनिधीक उदाहरण इथे समोर येते. त्याबरोबरच ऐहिक सुखापेक्षा बौध्दिक सुख किंवा कर्तव्यपूर्तीचे समाधानही मानवी मनाला जास्त भावते हे दाखविणारीही काही उदाहरणे येतात. त्याच अनुषंगानी सुखाबद्दलच्या चर्चेला इथे सुरुवात होते. इथे इ. स. पूर्व 600 ते 700 वर्षांच्या काळापासून पाश्चात्य तत्ववेत्त्यांनी सुखवादाचा केलेला उहापोह नक्कीच वाचनीय आहे.
सुख आणि दु:ख याची मीमांसा करताना त्यामागच्या ऐतिहासिक आणि पौराणिक तत्वज्ञानाचा अभ्यास मांडणे क्रमप्राप्त होते, कारण तो एकप्रकारे समाजमनाच्या जडणघडणीचा इतिहासच आहे. त्याच संस्कारांवर आजचे सुखदु:ख ठरताना दिसते. जीवनाचा अर्थ शोधण्याच्या मानवी प्रयत्नांच्या मार्गावरचेच अनेक टप्पे आपल्याला पुढील प्रकरणांमधून दिसतात.
सर्वेत्र सुखिन: सन्तु या प्रकरणातील षडदर्शने, पातंजल योगसुत्रे, उपनिषदांतील जीवनदृष्टी, याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद यांचे दु:खनिवृत्तीच्या दृष्टीतून केलेले मुद्देसूद विवेचन मूळातूनच वाचायला हवे. शिवाय गीतेचे अठरा अध्याय म्हणजे जणू दु:खनिवृत्तीचे अठरा मार्गच, हा भगवद्गीतेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही इथे दिसतो.
एकंदरीत आयुष्य, मानव, जीवन, जग, मन व दु:ख या सर्वांकडे साक्षीभावाने पाहून वास्तवाबद्दल काही ठाम प्रतिपादन करणारा गौतम बुध्द, त्याची चार आर्य सत्य व इतर शिकवण ही अभ्यासल्याशिवाय दु:खनिवृत्तीकडे वाटचाल होऊ शकत नाही. 'सर्वम् क्षणिकम्' म्हणणारा बुध्द दु:खाचे मूळ तृष्णा आहे हे सांगून त्यापासून सुटकाही शक्य आहे, हे स्पष्ट करतो.
एरवी बौध्द तत्त्वज्ञानाबदल चर्चा करताना फारसा न अभ्यासला जाणारा महत्त्वाचा भाग इथे दिसतो तो म्हणजे मनाच्या पूर्ण संतुलित अवस्थेसाठी, समाधीसाठी आवश्यक असलेल्या चार मुख्य धारणा, 'मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा.' त्यांचे यथायोग्य विवेचन इथे वाचायला मिळते. वास्तवाकडे साक्षीभावाने पाहायला शिकवणाऱ्या या अशा तत्त्वज्ञानांची महिती आपल्याला या आहे हे असे आहे या प्रकरणात रोचक
पध्दतीने मांडलेली दिसते.
या सगळया काहीशा गंभीर चर्चेनंतर या प्रकरणात अभ्यास येतो तो झेनचा. मात्र झेन तत्त्व आणि गोष्टी वाचून चांदण्यात भिजण्याचा अनुभव ज्याचा त्यानीच घ्यावा. त्यावर वेगळे काय लिहिणार?
वस्तुस्थितीकडे जागरूकतेने पहावयास सांगणारे या शतकातले दु:खनिवृत्तीच्या वाटेवरचे मार्गदर्शक जे. कृष्णमूर्ती मात्र अनेक ठिकाणी दु:खाला 'आत्मदया 'असे संबोधतात. त्यांची अनेक महत्त्वाची आणि काहीशी दचकवणारी प्रतिपादने इथे सोपी करून मांडली आहेत. त्यातून मानवी मनाची गुंतागुंत उकलण्याचा प्रवास अधिक उद्बोधक होतो. प्रस्तुत प्रकरणात याशिवाय अस्तित्ववादी तत्त्वज्ञानातील मानवी अस्तित्व व दुःख यांकडे पाहण्याचा अगदी वेगळा दृष्टिकोन ही सविस्तरपणे मांडला आहे.
दु:खाचे मूळ शोधण्यात मानसशास्त्राच्या अभ्यासकांचाही मोठा वाटा आहे. पहिलं नाव अर्थातच फ्रॉईड. त्याचबरोबर इतरही मानसशास्त्रज्ञांची निरीक्षणे इथे विचारात घेतलेली आहेत. त्यातून लेखिकेने लिहिलेले भावनांचे विवेकनिष्ठ संतुलन कसे असावे याबद्दलचे चिंतन तर प्रत्येकाने समजून घ्यावे असे आहे. शिवाय एरीक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाने केलेले एक प्रतिपादन म्हणजे तर जगातील एक परखड सत्यच आहे, 'एकोणिसाव्या शतकात माणसाचा देवावरचा विश्वास उडाला आणि जणू देवच मरण पावला, ही समस्या होती. मात्र विसाव्या शतकात माणसातला माणूसच मरण पावला आहे, ही समस्या उद्भवली आहेत.' आजच्या काळातल्या माणसाच्या सुखदु:खाच्या मूळाशी जाताना हे सगळेच दृष्टिकोन खरोखरच मार्गदर्शक ठरतात.
फार पूर्वीपासून माणसातले माणूसपण जागे ठेवण्याचं खरं श्रेय जातं ते मात्र अनेक संतांकडे. 'जगाच्या कल्याणा...' या प्रकरणात अनेक संत, महंत, विचारवंत व समाजसुधारक यांचे मानवी दु:खाविषयीचे चिंतन व ते दूर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचा आढावा घेतला आहे.
गेल्या शतकातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व, स्वामी विवेकानंद यांचा या बाबतीतला काहीसा दुर्लक्षिला गेलेला दृष्टिकोन, लेखिकेने इथे मांडला आहे. स्वामीजींच्या मते, दु:खाची कारणे, नाकर्तेपणा, आळशीपणा, दुबळेपणा व नुसताच जल्लोष करण्याची उत्सवी मानसिकता ही आहेत. त्याशिवाय त्यांच्यामते 'काल्पनिक व भयंकर अशा विषमतेचा नाश करणे हेच धर्माचे अंतिम लक्ष्य होय.'
समाजातील एकंदरीत रहाणी, कामकाज, बुध्दी यामुळे निर्माण होणाऱ्या विषमतेसोबतच एक मूलभूत प्रश्न स्त्री-पुरुष विषमता यामुळे निर्माण होणारे प्रश्नदेखील पुढे अभ्यासलेले आहेत.
मानवाच्या सुखासाठी म्हणून जगात जी औद्योगिक, तांत्रिक क्रांती होऊन एकूणच समाज, अर्थव्यवस्था व व्यववहार यांच्यावर परिणाम होऊन समाजाच्या प्रश्नांमध्ये पडलेली भरही इथे लक्षात घेतली आहे. रसेलने मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने इथे जैविक आणि भौतिक विकासापेक्षा मानव्याचा विकास महत्त्वाचा ठरतो, याबद्दलही लेखिकेचे चिंतन वाचनीय आहे. या संदर्भातील आदिवासींच्या जीवनदृष्टीचा आढावा मननीय ठरतो. एकंदरीत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी
सुद्धा हे पुस्तक उपयोगी ठरू शकेल, अशी मांडणी इथे दिसते.
शेवटच्या प्रकरणात प्रश्नावलीच्या आधारे सामान्य माणसांच्या विचारांचा आढावा घेताना दु:खाच्या मानवी जीवनातील प्रयोजनाचीही चिकित्सा केली आहे. त्याशिवाय आत्महत्येच्या मानसिकतेचाही विचार केलेला आहे. इथे बुध्यांक व भावनांक यासोबतच सामाजिक भावनांक व अध्यात्मिक बुध्दांक यांचाही विचार केलेला दिसतो. यांच्यामध्ये लेखिकेने विनोद बुध्यांकाचीही त्यात भर घातलेली आहे. त्याशिवाय उच्च हॅप्पीनेस इंडेक्स असलेल्या देशांतील समाजाचेही विश्लेषण मनोवेधक आहे.
दोस्तोव्हस्कीच्या मते 'दु:खाचा स्रोत जाणणे म्हणजेच सर्वात मोठा आनंद'! अशा दु:खनिवृत्तीच्या आणि आनंदबोधाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या व्यक्तींना हे पुस्तक नक्कीच मदत करेल.
-- कविता
,,*********
डॉ. मीरा केसकर यांचे मिसळपाव.कॉम वरील लेखन येथे https://www.misalpav.com/user/20252/authored वाचता येईल.
सुख-दुःख मीमांसा
लेखिका – डॉ. मीरा केसकर
प्रकाशक – प्राजक्त प्रकाशन, पुणे
पृष्ठ- २५६
किंमत – २६०रुपये
प्रतिक्रिया
10 Oct 2018 - 7:01 pm | कंजूस
संत महंत स्वामी हे समाजातील दु:ख दूर करतात हीच मोठी भ्रामक समजूत असते. सुख असताना सर्व समाज जवळ येतो पण दु:ख एकट्यालाच भोगावे लागते. तेव्हा कोणी कामास येत नाही. कोणाचे कोरडे सल्ले दु:खाचे खड्डे भरू शकत नाहीत.
हे माझे मत.
12 Oct 2018 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार
क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं !
कर्तव्य पथ पर जो मिला, ये भी सही वो भी सही !!
अर्थात हे कितीही पटत असले तरी पुर्णपणे कृतीत उतरवणे जमलेले नाही
पैजारबुवा,
14 Oct 2018 - 2:37 pm | उपयोजक
पुस्तक परिचय आवडला!
16 Oct 2018 - 11:55 am | मूकवाचक
+१