चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला. डिसेंबरच्या परीक्षेच्या अभ्यासाला या खोलीत तर पालवी फुटायला सुरुवात झाली होती खरी पण आता त्या पालवीला नाजूक हातांनी उचलून त्या परीक्षेला पास करावे लागणार आहे. जी ती उदास गाणी माझ्यात रूतून बसली, संग्रहात तेवढीच राहिली आहे आणि त्यांना व्यक्तिगत रूप मिळाले आहे, त्या गाण्यांना भर मित्रांच्या मेळाव्यात स्थान नाही आणि म्हणून कुणी मला माझ्या संग्रहातले गाणे लावण्यास सांगितले तर माझी नाचक्की ओढवण्याचा प्रसंग निश्चित आहे. अश्या गाण्यांना केवळ मनात स्थान असते, आणि हे मन मी माझ्या लिहिण्यातून व्यक्त करतो. त्या गाण्यांचे ओघ मला छळत असतात; कधी दिवसा त्या ओळी मनावर उमटल्यावर माझे डोळे पाणावतात आणि तेच रात्रींत ऐकत ऐकत त्यांचा लख्ख प्रकाश काचत राहतो. ही तेजाळ गाणीच खरी, अंधाराचे वर्णन करत करत जीवनात प्रकाशाचे अस्तित्त्व जाणवून देणारी, मनाला त्याच्या संवेदनांची ओळख करून देणारी. कोणाचाच विरह नाही, मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे, त्यांनी माझी कसली तरी परतफेड केली असे वाटते आहे. कधी नदीच्या प्रवाहात किंवा समुद्राच्या लाटांमध्ये दगड भिरकावा, वाऱ्याचा वेग कानांनी तासन् तास ऐकत राहावा त्याप्रमाणे मनाच्या डोहात माझं मीपण भिरकावून द्यावे, मनाच्या वेगाने जीवन आयुष्यभर पेलावे आणि त्या दगडाचे भविष्य आपल्याला जसे माहिती नसते, तसे माझे भविष्य अगदी मनाच्या कोलाहलात विलीन, नामशेष व्हावे असे वाटते आहे. उंच एकच उडीने दरीच्या आत उतरून सारेच संपवावे वाटते आहे. सभोवतालचा एकेक कण आपल्याला आव्हान देत आहे, असा अनुभव जाणून घेणे माणसालाच का निसर्गाने दिले असावे. डोंगर नद्या समुद्र दऱ्या न् त्यासभोवताली सोबतीला सजीव सचेतन जीवसृष्टी वेढून असणे आणि त्यांच्या अस्तित्वाचे सातत्य असणे माणसाव्यतिरिक्त कोणत्याही जीवाला स्फूर्ती देत नाही, आणि ह्या शाश्वत स्मारकांना ऋतूंचे कोंदण लाभले आहे हे जाणवणे आणि ते साजरे करणे सुद्धा केवळ माणसालाच का येत असावे. अश्या प्रेरणेने एक दिव्य आयुष्य जगणे माणसाला शक्य होत असते. आता तर असे होत आहे की ही शाश्वततेची रूपं एका बाजूला राहिली आहेत, आणि त्यामुळे चेतनहीन स्थिती, नैराश्य आले आहे. प्रतिशाश्वत रूपं म्हणवणारे जे की पुढची एकच पिढी फारतर टिकेल अशी एका बाजूला सभोवताली व्यापत आहे, आणि त्यांचा मला एक प्रचंड त्रास होत आहे. पण जरी सभोवताल प्रेरक नसला तरी मनाला शाश्वततेची ओढ थोडीच मागे हटणार आहे, ती या गाण्यांनी मी भरून काढत आहे. जीवन तत्क्षणी थांबावे किंवा माणसांचा तिटकारा यावा इतपत या गाण्यांना मी जवळ केले आहे.
हँसने की चाह ने कितना मुझे रुलाया है
कोई हमदर्द नहीं, दर्द मेरा साया है
दिल तो उलझा ही रहा जिंदगी की बातों में
साँसे जलती हैं कभी कभी रातों में
किसी की आह पर तारों को प्यार आया है
सपने छलते ही रहे रोज नयी राहों से
कोई फिसला है अभी अभी बाहों से
किसकी ये आहटें, ये कौन मुस्कुराया है
– कपिल कुमार, ‘आविष्कार’ चित्रपट १९७४
प्रतिक्रिया
29 Nov 2017 - 8:42 pm | एस
आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहातसे दिसतेय. या टप्प्यावर नैराश्य वगैरे येणे फारच सामान्य गोष्ट आहे. यातून सावरून पुढे जाऊ शकलात तर नंतर कळेल की आयुष्य एकूणच त्यातल्या सर्व सुखदुःखांसह रोचक, मी तर म्हणेल की मजेशीर आहे. :-)
मनःपूर्वक शुभेच्छा.
29 Nov 2017 - 8:43 pm | समयांत
धन्यवाद एस
30 Nov 2017 - 9:15 am | सौन्दर्य
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.
30 Nov 2017 - 9:15 am | सौन्दर्य
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.
30 Nov 2017 - 6:14 pm | समयांत
मनावर उदासी नाही
...हे लिहिलंय की.
वेडेवाकडे विचार नावालासुद्धा शिवले नाहीत हो, उदासगाणी आनंदात ऐकलीत.
1 Dec 2017 - 12:36 am | सौन्दर्य
उत्तम, मग चालू द्या तुमची उदास गाणी ऐकण्याचा छंद.
4 Dec 2017 - 9:42 pm | ज्योति अळवणी
लेख म्हणून छानच आहे. आणि उदाशी नाही... हे वाचल्यावर बर वाटल.
30 Nov 2017 - 4:15 pm | Nitin Palkar
छान लिहिलंय. पण.... मनाची उदासीनता कुरवाळत बसल्याने कमी न होता वाढतच जाते. पाडव्याला जसं आपण कणभर कडुलिंब खातो आणि नंतर भरपेट गोड जेवतो तसंच आयुष्याचही असतं. "मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे," बेरोजगारीमुळे आयुष्याला दिशाहीनता येत नाही तर सकारात्मक विचारांच्या अभावाने आणि योग्य प्रयत्नांच्या अभावी आयुष्य दिशाहीन वाटते. केशवसुतांच्या 'सतारीचे बोल'या कवितेतील नायकाप्रमाणे या लेख नायकाची मनस्थिती आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.
30 Nov 2017 - 6:26 pm | समयांत
धन्यवाद, उदासीनता कुरवाळणे यापेक्षा बरेच पुढचे लेख-नायकाच्या मनात येत आहे, निसर्गाची स्फूर्ती त्याला लाभत नसल्याने अस्वस्थता आली आहे. माणसांनी चालवलेला प्रतिशाश्वततेच्या हव्यासाचा त्याला उबग आलेला आहे.
मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.
ह्या सूचनेचा उगम आणि प्रयोजन समजले नाही. आणि मनाचा दुबळेपणा कुठे जाणवला तेही.
30 Nov 2017 - 4:57 pm | मराठी कथालेखक
उदासगाण्यांची मैफल सजवण्यास मला नेहमीच म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवडले आहे.. उदासगाण्यात मन रमवणे म्हणजे दु:खी कष्टी असणे असे नव्हे.
त्या गाण्यातील शब्द त्यातला आशय वा संदर्भ यांचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसला तरी काही उदासगाणी मनात घर करुन रहातात.
दिल के अरमां आसूओमे बह गये.. हे एक अतिशय जीवघेणं गाणं.. तशी अनेक आहेत , पण सगळ्यांबद्दल आता लिहिणे शक्य नाही.
दूसरे एक असेच अप्रतिम पण फारसे लोकप्रिय नसलेले गाणे (खरेतर अनेकांना हे गाणे माहितच नसावे) .. गुलजारच्या किताब चित्रपटात एका अंध भिकार्याने गायलेले दाखवले आहे .. ऐकून बघा.
मेरे साथ चले ना साया
30 Nov 2017 - 6:17 pm | समयांत
अगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला, धन्यवाद. मला 'किताब' मधले गुलजार यांचे गीत माहिती नव्हते. याचाही उदासगाणी सारखा आस्वाद घेता येईल.
1 Dec 2017 - 2:47 pm | Naval
खुप सुन्दर लेख....तलत मेहमूद उदासगाण्यांचा बादशाह... त्याच्या तलम आवाजाने कायम वेड केलं. "श्याम -ए -गम की कसम" "सीने मी सुलगते है अरमा", "ए मेरे दिल कहीं और चल" कित्ती गाणी आठवली एकदम. मुकेश ची उदासगाणी पण लाजवाब !
1 Dec 2017 - 3:53 pm | मराठी कथालेखक
ए मेरे दिल कहीं और चल हे लताचं पण आहे.. पण तलतच्या आवाजातलं जास्त हळवं वाटतं.
1 Dec 2017 - 4:31 pm | समयांत
सुंदर उदासगाणी..
1 Dec 2017 - 3:49 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद,...
चला तर मग काही उदास गाण्यांची उजळणी करुयात...
श्रेया घोषालच्या आवाजातील "उज़डे से लम्हो को आस तेरी.. जख्मी दिलोंको है प्यास तेरी..." की मन वेदनेच्या एका वेगळ्याच विश्वात फिरुन येतं (गाणं तुम्ही ओळखलं असेलच !!)
1 Dec 2017 - 4:28 pm | समयांत
नूर ए खुदा..
गुलजार यांचे सितम १९८२ मधले "सारा दिन जागे तो बेजान सी..."
2 Dec 2017 - 11:02 pm | मराठी कथालेखक
2 Dec 2017 - 11:17 pm | मराठी कथालेखक
गाणं पहायला जरा कृत्रिम वाटतं .. म्हणजे आर्ट सिनेमाचा टिपीकल फॉर्म्युला वापरुन चित्रीकरण केल्यासारखं ..पण शब्द , संगीत आणि आवाज अप्रतिम.
3 Dec 2017 - 1:53 pm | मराठी कथालेखक
4 Dec 2017 - 3:24 pm | सानझरी
छान लिहीलाय लेख. उदासगाणी का आवडावीत याला काही कारण नसतं. मराठी कथालेखक यांच्या मताशी सहमत.
'सजनवा बैरी हो गये हमार' हेही असंच एक उदास पण सुंदर गाणं. यावरची अनुराधा पाटील यांची कविताही चांगली आहे..
मनाची दारं बंद करून घेतली तरी
कानावर येतच राहतात वा-यामधून
'सजनवा बैरी हो गये हमार ...'चे
दाटलेल्या आवाजातले करूण स्वर
आणि अनोळखी गावातल्या रस्त्यांमधून
पावसापाण्यात आडोसा शोधत
एखाद्या अनामिक वळचणीखाली
उभं राहताना आठवावं
दूर देशातलं आपलं घर...
तसं वाटत राहतं काही काही.
नसूनही परका होऊन गेल्यासारखा
वाटणारा, एक प्रिय चेहरा
डोळ्यांसमोर तरळतो धुक्यासारखा...
आणि कोसळत राहतात
दूर देशातल्या आपल्या नसलेल्या
घराच्या भिंती..
5 Dec 2017 - 10:07 pm | समयांत
धन्यवाद, खूप सुंदर
4 Dec 2017 - 5:18 pm | चौथा कोनाडा
खुपशी उदासगाणी ऐकल्यानंतर, अण्टिडोस म्हणुन मी हे गाणं ऐकयचो.
सुंदर साधे शब्द असणारं मस्त गाणं आहे, नक्की ऐका :
https://www.youtube.com/watch?v=JlrTmlnAaU0
5 Dec 2017 - 10:08 pm | समयांत
भारीच..
5 Dec 2017 - 2:49 pm | समयांत
<a href="https://youtu.be/dZpqttQS1XI">
<a href="https://youtu.be/PQm7-m0vqNk">
<a href="https://youtu.be/NgEQL8UOAG4">
<a href="https://youtu.be/f_-OZwVkB88">
<a href="https://youtu.be/VikpRgkRxyo">