मिरज. खांसाहेब अब्दुल करीम खां यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारा संगीत महोत्सव. हुबळीतील निर्णयानंतर मिरज गाठणं सोपं होतं. मिरजेचा हा महोत्सव तेथील एका दर्ग्यात भरतो. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही चमकदार कामगिरी गायक-वादकानं केली तरी टाळ्या वाजवता येत नाहीत. हा संकेत तिथला. त्याचं कारण त्या काळी कळलं होतं, पण आत्ता आठवत नाही (महोत्सवाची ती परंपरा आज तेथे कायम आहे की नाही याचाही पत्ता नाही). टाळ्या नाहीत; तरीही संगीताची मैफील? पुन्हा एक प्रश्न. प्रत्यक्ष मैफिलीत गेल्यावर त्याचा सच्चेपणा पटला. सुरांच्या सच्च्या भक्तांसाठी टाळ्यांची गरज नसते. मान डोलावण्यातूनही काय घडतं त्याचा अनुभव त्या तीन रात्री तिथं घेतला.
रागदारी कळण्याचा प्रश्न त्याही वेळी नव्हता (आजही नाहीच). दुसऱ्या रात्री गणपती भट यांचं गायन होतं. त्यावेळी उदयोन्मुख आश्वासक गायकांच्या यादीत आघाडीवर नाव असायचं त्यांचं. पावणेदोन तास हा तरूण गायक गायला. या मैफिलीपर्यंत तरी मी शास्त्रीय गायन या प्रकाराकडं फारसा आकृष्ट झालेलो नव्हतोच. हुबळीतील तीन रात्रींमध्ये गायनाच्या वेळेस बऱ्याचदा मी डुलक्या काढल्या होत्या. वाद्यसंगीत आलं की मात्र झोप उडायची. गणपती भट यांच्या गायनाला डोळे उघडे ठेवण्याची एक प्रकारे कसरत करावी लागली होती. कारण मित्रांसमवेत मी बसलो होतो ते पहिल्याच रांगेत. मित्र माझ्याच वयाचे, पण शास्त्रीय संगीतात माझ्यापेक्षा कित्येक पावलं पुढं असणारे. कोणी तबल्यात तर कोणी हार्मोनियमवर. कोणी गायन करणारा. तेवढी एकच गोष्ट डोळे उघडे ठेवण्यास पुरेशी होती. आरंभीचं गायन मी ऐकलं. सूक्ष्म स्वरूपात सूर कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण मध्येच कुठं तरी आतमध्ये काही तरी व्हायचं. अंगावर रोमांच यायचे एखाद्या तानेनंतर. गायनाच्या अखेरीला वीज चमकावी तशी एक तान घेत त्यांनी तराणा सुरू केला आणि मी उडालो. मनात खोलवर काही तरी झालं. डोळे मिटले गेले आणि एखाद्या पहाडावर आपण आहोत अशी प्रतिमा डोळ्यांपुढं आली. खाली खोलवर दरी आहे, समोरचा सुळका आकाशात घुसला आहे. आपण या पहाडाच्या कडेवरच आहोत...
बाहेर तराण्याची लय वाढत गेली. डोळ्यांसमोरच्या पहाडाची जागा हळूवारपणे फुलांचा एका ताटव्याने घेतली. काही क्षणांतच तो पूर्ण फुललेला ताटवा डोळ्यांसमोर उभा राहिला. दरी बेपत्ता, समोरचा पहाड बेपत्ता आणि विशेष म्हणजे मी उभा होतो तो पहाडही नव्हताच मुळी; ती सपाटीच होती. ताटव्याला जोडणारी. तराणा थांबल्यानंतर बराच काळ कानात ते सूर घुमत होते. डोळे मिटले की, त्या सुरांना साथ देत ताटवा समोर यायचा. केवळ अद्भूत.
आजही सकाळच्या संवादातून हे आठवलं तसं अंगावर रोमांच उठताहेत सारखे.
इथं मनःपटलावर काही प्रतिमा उभ्या राहिल्या म्हणून वर्णन करण्यासाठी शब्द सापडताहेत. एरवी सूरही कळत नसताना, ते कळू शकणाऱ्याचीही 'शब्दच नाहीत' अशी स्थिती होत असेल तर, आपलं काय? पुन्हा एक प्रश्नच.
---
ऐकण्याचा (फक्त ऐकण्याचा, समजून घेऊन ऐकण्याचा नव्हे) प्रवास सुरू झाला तेव्हा सुरवात झाली ती काही अल्बम्सनी. एखादी थीम घेऊन केलेल्या अल्बम्सचा काळ तो. कोल्हापुरात शाहुपुरीत रहायचो. जाय-यायचा रस्ता एस. टी. स्टँडसमोरून. तिथं आतल्या बाजूला एका दुकानात कॅसेट लावून ठेवलेल्या असायच्या शेल्फवर. आधीच्या दीडेक वर्षांत केव्हाही तिकडं पावलं वळली नव्हती. वळायची ती त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलकडं. कारण मिसळ हा त्यावेळचा आम्हा मित्रांचा पूर्ण आहार असायचा. रात्रीदेखील त्यासाठी आम्ही राजवाडा चौक गाठायचो. किंवा मग स्टँडवर बिर्याणी. त्या कॅसेटच्या दुकानाकडं पावलं वळली पहिल्यांदा तेव्हा खिशात एकूण होते शंभर रुपये. पुढच्या पंधरवड्याचा बसप्रवास आणि इतर खर्चासाठीचे. खाटकन त्या दिवशी तीस रुपये गेले. 'कॉल ऑफ व्हॅली'वर. चहा-बिस्कीटांवर दिवस कसे असतात त्याचा एक अनुभव नंतरच्या पंधरवड्यात त्या तीस रुपड्यांनी दिला. पण त्याच तीस रुपड्यांनी दिलेला दुसरा अनुभव अनमोल होता. तो अनुभव खर्चात पाडत गेला, कमावण्याची अक्कलही देत गेला.
'कॉल ऑफ व्हॅली'. अल्बम जुनाच; पण माझ्यासाठी नवा. हाती कॅसेट आल्यानंतर मी तडक खोली गाठली आणि वॉकमन सुरू केला. पूर्ण कॅसेट ऐकून काढली. आधी काहीही प्रतिक्रियाच उमटली नाही मनातून. कॅसेटचं कव्हर काढलं आणि पाहिलं तर सारी भाषा सांगीतिक. रागांची नावं. एक क्षण वाटलं तीस रुपये वाया गेले की काय? पुन्हा कॅसेट टाकली. ऐकू लागलो. बासरी आहे आणि संतूर आहे हे कलाकारांच्या नावावरून समजत होतं. पण ब्रिजभुषण काब्रा? यांचं वाद्य कुठलं? पुन्हा प्रश्नांची मालिका. पण त्याकडं दुर्लक्ष करून ऐकत गेलो. पहाडीमधल्या संतूरनं कब्जा केला आणि पाठोपाठ पिलू. दोन्हींमधून उमटणारी प्रतिबिंबं पुन्हा पहाडाचीच. हा पहाड सारखा का येतोय? धून पहाडीतील आहे म्हणून? केवळ तेवढंच असणार नाही. कारण पहाडी राग नसतानाही पहाड उभा राहतोच डोळ्यांसमोर. गणपतीच्या तराण्यानं उभा केला होता आणि तो तराणा पहाडीतला नव्हता एवढं निश्चित.
ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, स्वतःला बजावत गेलो. मग आणखी एक गोष्ट लक्षात येत गेली. हा वॉकमन कानाला असेल आणि त्यातून अशा काही सुरावटी असतील तर हातातलं काम सोपं ठरतंय. लेखन असो वा वाचन. दोन्ही. सुरावटींकडं ध्यान असतं का? खचितच नाही. पण त्यातलं काही समजत नव्हतंच. त्यामुळं ध्यान देण्याची गरज वाटत नव्हती. कारण प्राधान्याचं काम होतं हातातलं. लेखन किंवा वाचन (या प्रवासात आजही बालवाडीतच राहण्याचं कारण त्यावेळच्या त्या प्राधान्यक्रमात असावं कदाचित). मग ती एक गुरूकिल्ली ठरली. लेखन-वाचन करताना संगत हवी ती सुरावटींचीच. आणि सुरू झाला एक सिलसिला सुरावटींशी. त्यानिमित्तानं केलेल्या खरेदीशी.
'पंचमहाभूत' या संकल्पनेवर आधारलेले वेगवेगळे अल्बम कॅसेटच्या रुपानं आले. हे काही अस्सल शास्त्रीय स्वरूपातले आहेत का, तर काहींच्या मते नाहीतही. पण ते खोलीवर आले. संतूर आवडू लागलं म्हणून शिवकुमारांच्या काही कॅसेट्स आल्या. मध्ये धाडस करून एकदा सरोद आणि सतारही आणली. ही दोन्ही वाद्यं मला तरी संतूरपेक्षा ऐकण्यास जड वाटत आली होती. पण तीही ऐकली. एकदा-दोनदा नाही. वेगवेगळ्या वेळी बऱ्याच वेळेस ऐकली. पण मनात मात्र घर केलं होतं संतूरनंच. सनई हे वाद्य तसं या ऐकण्याच्या संदर्भात अतिपरिचयात-अवज्ञा अशा स्वरूपाचं ठरलं होतं. पण इतर काही कॅसेट आल्या. त्यात शोभा गुर्टूंचा समावेश होता. ठुमरी.
ऐकत होतो. रात्रपाळी झाली की, तेव्हा रेडिओवर उशीरा शास्त्रीय संगीत राष्ट्रीय केंद्रावर चालायचं. तेही ऐकायचो आवडीनं. सोबत काम करणाऱ्यांपैकी एक-दोघे ज्येष्ठ कर्मचारी थोडं फार कळणाऱ्यापैकी होते. त्यांच्या चर्चा सीमेवरून ऐकायच्या.
पण जाण? नाहीच.
---
रागसंगीत आणि त्याचं काळाशी नातं हा विषय आता समोर आला. रागाचं, त्यातल्या सुरांच्या क्रमाचं नातं प्रत्येक प्रहराशी असतं असं कोणी तरी सांगितल्याचं ऐकलं. या विषयावरच्या चर्चांच्या सीमेवर राहण्याचा तो काळ. त्यामुळं ती ऐकून आपण काय ऐकतोय त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न एवढंच त्याचं महत्त्व. म्हणजे असं की, मी शास्त्रीय संगीत ऐकतो म्हणजे काय करतो, असं एकदा या विषयाशी दुरान्वयानंही संबंध नसणाऱ्या मित्रानं विचारलं. त्याच्यासमोर फेकण्यासाठी आपण एक वाक्य तयार करू शकतो असा हा प्रयत्न. पंडित जसराजांच्या 'अष्ट प्रहर' या चार कॅसेट दाखल झाल्या संग्रहामध्ये, त्यामागचं कारण तेच. समजून घेण्याचा प्रयत्न करू, ही भावना. हे अशा स्वरूपाचं ऐकण्याचा तो पहिलाच प्रयत्न. आधी प्रहर वगैरेंकडे लक्ष देण्याचा उगाचच प्रयत्न केला, पण एकूण कानाची बैठकच अशी की, त्यांची गायन सुरू करण्याआधी श्लोक सादर करण्याची पद्धतीच भाव खाऊन गेली (पुढे हा श्लोक आणि त्यांचं ते आधीचं "जय हो" यांचा पगडा अधिक... मग त्यावरची टीकाही कानी आली... असो). प्रहर आणि त्यानुसार राग ऐकणं नंतर बाजूला पडलं. पुढं माझ्या ध्यानी आलं की, आपलं चुकतंय. हा प्रांत आपल्यासाठी तरी स्वयंसाधनेचा नाही. कारण सूरच कळत नाहीत. तेव्हा इथं आपल्याला गुरूच करावा लागेल. हा 'साक्षात्कार' झाला तेव्हा मात्र त्या कॅसेट सरळ उचलून शास्त्रीय संगीत कळतं अशा एका ज्येष्ठ स्नेह्याला देऊन टाकल्या आणि शास्त्रीय संगीत समजून घेण्याचा तो एक प्रयत्न सुरू होण्याआधीच विझून गेला.
पण ऐकणं थांबलं नाहीच. त्यातून मनात प्रतिमा, प्रतिबिंबं निर्माण होणं तर थांबलं नाहीच.
त्याचाच हा पुढचा अनुभव. पुन्हा इथं संतूरच आहे. पण अनुभव वेगळा. माझी ती मर्यादा असावी कदाचित. 'म्युझिक ऑफ माऊंटन्स' नावाचा एक अल्बम आहे शिवकुमारांचा. त्यातल्या रचना आजही मी असंख्यवेळेस आवडीने ऐकतो. अनेक जण ऐकत असतील. या रचना मी आधी त्यांची नावं न पाहताच ऐकायचो. ज्या क्रमानं अल्बममधून येतील त्याच क्रमानं. एके दिवशी रात्री काम करीत बसलो होतो. झोपण्याची चिन्हं नव्हती. बराच काळ गेला आणि तो अल्बम सुरू झाला. काही वेळानं अचानक कान टवकारले. नवी सुरावट कानी घुमू लागली. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला. सकाळ झाली की काय म्हणून चमकून मी पाहिलं, बाहेर अंधार दिसत होता. घड्याळाकडं पाहिलं, काटे पाचच्या आसपास होते. लक्ष सुरावटीकडं वळवलं. तिचं नाव होतं 'हिमालयन डॉन'. पहाटेची ही अनुभूती वेगळीच होती. मग बारकाईनं पुन्हा सारी नावं पाहिली तर त्यात चक्क अष्टप्रहर गुंतलेले होते. सनराईज ऑन द पीक्स, ट्वायलाईट झोन, इव्हनिंग प्रेयर (आता ट्वायलाईट आधी की इव्हनिंग प्रेयर? माझ्या मते, माझा क्रम बरोबर आहे), शिकारा बाय मूनलाईट... मध्ये इतर. अर्रे!!! हे तर अशा क्रमानं ऐकलं पाहिजे एकदा. एकदा कशाला? त्याच क्षणी पुन्हा रचना फेरमांडणी करून घेतल्या आणि हातचं काम बाजूला ठेवून ऐकत बसलो. साधारण तासाभराचा काळ होता तो आणि पहाटेच्या त्या प्रहरी प्रसन्न अनुभव घेत मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा इतर रचनांची नावं पाहिली. त्या रचनांची नावं बॅलड, एकोज फ्रॉम द व्हॅली, स्प्रिंगटाईम, माऊंटन लव्ह सॉंग, स्पिरिट ऑफ कश्मीर अशी आहेत. त्यावरून ना त्यांचा प्रहर कळतो, ना राग. पण अनेकदा ऐकल्यानंतर काही ठोकताळे बसले आणि या साऱ्या रचना काळानं वर्णन होणाऱ्या रचनांच्या मध्येच कुठंतरी बसतात असं वाटू लागलं. आजही ऐकतो ते त्याच क्रमानं. हे बरोबर आहे की चूक? ठाऊक नाही. राग कळणारा एखादा त्यातलं बरोबर काय आणि चूक काय हे सांगून त्याचा नवा क्रम समजावून देऊही शकेल. पण... पण हिमालयन डॉन ऐकताना झालेली पहाटेची अनुभूती? तिचं काय? तो माझ्यासाठी नुसताच अज्ञानातील आनंद नाही तर अज्ञातातील आनंदही आहे. तो आता बुद्धीच्या कसोटीवर कसा तपासून पहायचा?
- क्रमशः -
प्रतिक्रिया
8 Oct 2008 - 11:37 pm | धनंजय
सर्व भागांचे एकत्रित दुवे:
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
8 Oct 2008 - 10:03 pm | यशोधरा
वा! रंग भरायला लागला आहे... एखादी महफिल उत्तरोत्तर रंगत जावी तसं लिखाण खुलतय.. वाचायला खूप छान वाटतंय.
8 Oct 2008 - 10:34 pm | भाग्यश्री
वा सुंदर.. गणपती भट यांच्या मैफीलीमधला अनुभव अफाट..
शिवकुमार शर्मांच्या सीडींची नावं दिलीत हे बरं झालं.. आता ऐकता येईल..