दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
6 Oct 2016 - 12:06 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी

.

'ओफ्रा विनफ्रे शो' हा टॉक शो माहित नसेल अशी व्यक्ती विरळा! १९८६ साली सुरू झालेला हा कार्यक्रम २०११ पर्यंत जोशात चालू होता. ओफ्राची ओघवती, अकृत्रिम संभाषण पध्दत लोकांना इतकी आवडली की देशविदेशात ओफ्रा विनफ्रे नुसतीच माहित झाली नाही, तर कौतुकाला पात्र ठरली, प्रसिध्द झाली. ह्या ओफ्राचे बालपण आणि तरुणपण मात्र फार कष्टाचे, हालअपेष्टांचे आणि दु:खदायी गेले. त्यातून ती फिनिक्ससारखी भरारी घेत नुसतीच उभी राहिली नाही तर तिने उंच भरारी घेतली. मिसिपीपी मधल्या कोसिस्कु नावाच्या एका खेड्यात कुमारीमातेच्या पोटी ती २९ जानेवारी १९५६ रोजी जन्मली. तिची आई वेर्निटा ली ही एक कामकरी स्त्री होती आणि कोवळ्या वयातल्या चुकांमधून तिने ओफ्राला जन्म दिला होता. गरिबी तर पाचवीलाच पुजली होती.

लहानग्या बाळाला आजोळी सोडून वेर्निटा कामानिमित्त मिलावकी ह्या दुसर्‍या गावात गेली. तेथे ती आयाचे काम करत असे. छोटी ओफ्रा आपल्या आजीबरोबर त्या छोट्या खेड्यात वाढत होती. पैसा आणि सुविधा फार नव्हत्या पण आजीची माया आणि चर्चचा आधार होता. सहा वर्षाची झाल्यावर तीही आईबरोबर मिलावकी येथे रहायला गेली आणि तिच्या दुर्दशेला सुरुवात झाली. आईला कामानिमित्त बरच वेळ बाहेर जावे लागे. घरात ही लहानशी, टपोर्‍या डोळ्यांची निरागस ओफ्रा एकटीच असे. जेमतेम ९ वर्षांची असेलनसेल ती, स्त्रीत्वाचा अर्थही समजला नव्हता तेव्हाच तिच्या आईच्या मित्रांनी आणि घरातल्या म्हणवणार्‍या नातेवाईकांनी ओफ्रावर सतत अत्याचार केले. वयाच्या नवव्या वर्षापासून १३ वर्षापर्यंत तिने हे निमूटपणे सहन केले. कुंपणच शेत खात होतं, सशासारखी भेदरून गेलेली ओफ्रा मग तक्रार तरी कोणाकडे करणार? एकदा पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला तिने, पण पळून तरी जाणार कुठे? हा गहन प्रश्न होताच. शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला. अवघ्या १४ व्या वर्षी ती एका बाळाची आई झाली. ते बाळ जगलं नाही पण ओफ्राला मात्र जगाची दुनियादारी खूप शिकवून गेलं. नंतर नॅशविलेला वेर्नॉन विन्फ्रे ह्या तिच्या अनौरस बापाकडे तिची रवानगी झाली.

वेर्नॉन विनफ्रे तसा शिस्तवाला माणूस होता. त्याने मुलीची जबाबदारी निभावली. तिच्या अभ्यासाच्या बाबतीत तो आग्रही राहिला आणि फक्त पुस्तकी अभ्यासच नाही तर वक्तृत्व, अभिनय ह्यातही तिची रुची निर्माण केली. दर आठवड्याला तो ओफ्राला एक पुस्तक वाचून त्याचे रसग्रहण लिहायला लावत असे. त्याने ओफ्राला फक्त एक सुरक्षित घरटे दिले नाही तर पुढच्या आयुष्याची जणू शिदोरीच दिली. ओफ्रा मन लावून शिकत होती. वादविवाद, अभिनय, वत्कृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत होती. बक्षिसे मिळवत होती. एका प्रतिष्ठित वत्कृत्व स्पर्धेत ती जिंकली आणि तिला टेनसी स्टेट युनिवर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली. तिच्या छंदाला आता दिशा मिळत होती आणि तिच्या आयुष्यालाही.. १९७१ मध्ये तिथे ती स्पीच कम्युनिकेशन आणि परफॉर्मिंग आर्ट शिकायला गेली. ते करत असतानाच वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ती 'मिस ब्लॅक टेनेसी' स्पर्धा जिंकली आणि तिथेच तिला WVOL, ह्या रेडिओ स्टेशनवर नोकरीसाठी विचारणा झाली. कॉलेजसाठी हे पूरकच होते. तिने रेडिओ स्टेशनवर काम सुरू केले. तिच्या स्वप्नांना दिशा मिळू लागलेली दिसत होती. लवकरच तिला तिथल्या लोकल टीव्ही चॅनेलने पत्रकार आणि सूत्रधार म्हणून कामाकरता विचारणा केली. एकीकडे कॉलेज आणि टीव्ही असे दोन्हीचे शिक्षण चालू होते.

१९७६ मध्ये मग ती बाल्टिमोरला WJZ-TV News मध्ये सहसूत्रसंचालक म्हणून गेली. कार्यक्र्माचे नाव होते 'पिपल आर टॉकिंग'! ओफ्राच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाने आणि सहज शैलीने लवकरच हा कार्यक्रम लोकांना खूप आवडू लागला. जवळपास ८ वर्षे तिथे ती रमली. १९८४ च्या जानेवारी महिन्यात ओफ्राला शिकागोच्या टीव्ही स्टेशन कडून एक सकाळचा अर्ध्यातासाचा कार्यक्रम, ए. एम. शिकागोचे सूत्रसंचालन करण्यासाठी निमंत्रण आले. २ जानेला तिचा पहिला कार्यक्रम झाला आणि काही दिवसातच टीआरपी इतका वाढला की कार्यक्र्माची वेळ वाढवून तो एक तासाचा करण्यात आला. आणि ८ सप्टेंबर ८६ मध्ये एका नव्या पर्वाला सुरूवात झाली. ए एम शो चे बारसे झाले, 'द ओफ्रा विनफ्रे शो'! ८६ साली सुरू झालेला हा कार्यक्रम २०११ पर्यंत चालला. अमेरिका तर तिच्या प्रेमात पडली होतीच तिच्या अकृत्रिम सहज शैलीने जवळपास सार्‍या जगाला तिने भुरळ घातली. मायकेल जॅकसन, अमेरिकन सायक्लिस्ट आणि टूर दे फ्रान्स चा सात वेळा विजेता लान्स आर्मस्ट्राँग, ऐश्वर्या राय, टॉम क्रूझ, बराक ओबामा अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती तिने आपल्या सहज शैलीत खुलवल्या.

एकीकडे ती यशाची उंचच उंच शिखरे चढत होती पण मनात कुठेतरी कोवळ्या वयातल्या जखमांचे ओरखडलेले ठसे अजून ओले होते. आपल्याकडे कोणाचे 'त्या' दॄष्टीने लक्ष जाऊ नये म्हणून तिने आपले वजन बेसुमार वाढू दिले. पण पुढे मात्र तिने जवळपास ४५ किलो वजन कमी केले आणि १९९५ च्या वॉशिंग्ट्नच्या मरीन कॉर्प्स मॅरेथॉनमध्ये धावली. तिला स्टीव्हन स्पिलबर्ग च्या द कलर पर्पल मधल्या सोफियासाठी विचारणा झाली आणि तिच्या पंखांची भरारी अजून उंच जाऊ लागली. हार्पो फिल्मस नावाची स्वतःची फिल्म कंपनी काढली. बिलव्हेड, बिफोर वुमन हॅड विंग्ज, ग्रेट डिबेटर्स अशा चित्रपटांची निर्मिती केली. ओफ्रा विनफ्रे स्पिक्स, द सोल अँड स्पिरिट ऑफ सुपरस्टार, व्हॉट आय नो फॉर शुअर, जर्नी टू बिलव्हेड अशी अनेक पुस्तकेही लिहिली. द ओफ्रा मॅगेझिन आणि ओ अ‍ॅट होम अशा मासिकांची निर्मिती केली. सृजनाच्या सर्व कलांमध्ये ती विहरत होती. 'द क्वीन ऑफ ऑल मिडिया' असे तिला कौतुकाने म्हटले जाऊ लागले. ती आहेच जनसंपर्काच्या सगळ्या माध्यमांची महाराणी! आत्ताही ती टीव्ही शोजच्या निर्मितींमध्ये व्यग्र आहे. 'सध्या व्हेअर आर दे नाउ?' नावाचा एक रिअ‍ॅलिटी शो ती करते आहे.

१९९८ मध्ये तिने 'ओफ्राज एंजल नेटवर्क' नावाची एक संस्था स्थापन केली ज्यातून 'हरिकेन कतरिना' पिडितांसाठी तिने ११ लाख डॉलर्स जमवले आणि स्वतःच्या १० लाख डॉलर्सची त्यात भर घालून ते हरिकेन कतरिना आणि रीटा वादळाच्या आपत्तीला वर्ष पूर्ण होण्याच्या आत टेक्सास, लुइझाना, अलाबामा येथे घरे बांधली गेली. ह्यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये स्वतःचे कपडे, दागिने, शूज अशा असंख्य गोष्टींचा तिने लिलाव केला. त्यातून जमा झालेला पैसा तिने साउथ अफ्रिकेतल्या 'ओफ्रा विनफ्रे लिडरशिप अ‍ॅकेडमी फॉर गर्ल्स' ह्या संस्थेकरता दिला. २००७च्या जानेवारीत जोहान्सबर्ग मध्ये २२ एकर जमिनीवर ही अ‍ॅकेडमी उभी केली आहे. सुरुवातीला तिथे १५० मुली होत्या आता संख्या वाढून ४५० पर्यंत गेली आहे. येथे संगणकवर्ग, सायन्स प्रयोगशाळा, लायब्ररी, अभ्यासिका वर्ग थिएटर आणि ब्यूटी सलून सुध्दा आहे. समीक्षकांनी ही अ‍ॅकेडमी फारच उच्चभ्रू आहे अशी टीका केली, तिला खोडून काढताना ओफ्रा म्हणते जर मुली अशा सुंदर वातावरणात आणि सुसंस्कृत शिक्षकांच्या सहवासात असतील तर त्यांच्यामधली आतली सुंदरता बाहेर येईल. त्यांना फुलू दे, त्यांना ती सुंदरता अनुभवू दे. ह्यात शो बाजीचा किवा उच्चभ्रूपणाचा काही संबंध नाही. ह्या अ‍ॅकेडमीतल्या मुलींसाठी स्वतः ओफ्रा सॅटेलाईट द्वारे काही वर्ग घेते. स्वतःला ज्या सुविधा मिळाल्या नाहीत, किंबहुना जे हक्काने मिळायला हवं ते बालपणही मिळालं नसताना तिने ह्या कोवळ्या मुलींचा, त्यांच्या सर्वंकश व्यक्तिमत्व विकासाचा विचार करून ही अ‍ॅकेडमी काढल्याबद्दल नेल्सन मंडेलांनी ओफ्राचे कौतुक केले आहे.

'नॅशनल म्युझिअम ऑफ अफ्रिकन अमेरिकन हिस्टरी अँड कल्चर' ला सुध्दा तिने १२ लाख डॉलर्स देणगी दिली. ह्या व्यतिरिक्त शैक्षणिक संस्था, वेगवेगळ्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी तिने ४० लाखांच्या वर देणग्या दिल्या. अटलांटा, जॉर्जिया मधल्या कॉलेजांमध्ये ४०० च्या स्कॉलरशिप्स दिल्या. ज्या टीव्ही ने तिला ही कीर्ती, हे यश दिले तिथे तिला जेव्हा २० वर्ष पूर्ण झाली तेव्हा तिने ती साजरी करण्याचा वेगळाच सोहळा केला. आपल्या सर्व सहकारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तिने हवाई बेटांवरची सहल आयोजित करून सगळ्यांना चकित केले. हजारच्या वर लोकं होते ते..

समाजाने तिला जी कीर्ती, मान सन्मान, कौतुक दिले त्याच्या कित्येक पटीने ती ते परत करते आहे. अमेरिकेतल्या पहिल्या ५० दानशूर व्यक्तिंमधली ती पहिली काळी व्यक्ती ठरली. बॉब होप मानवता पुरस्काराची ती पहिली मानकरी ठरली. तिच्या टीव्हीवरील उत्कृष्ठ योगदानाकरता मानाचा एम्मी पुरस्कार प्राप्त झाला. तर २०१३ मध्ये प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रिडम हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान तिला प्राप्त झाला.

एका कोमेजणार्‍या कळीचे पूर्ण विकसित फूलातले हे रुपांतर, तिचा हा जीवनप्रवास थक्क करणारा आहे!

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

6 Oct 2016 - 12:12 am | पद्मावति

ओफ्राचं हे रूप अधिकच आकर्षक वाटतंय. सुंदर लेख.

जेव्हा पहिल्यांदा टी.व्ही.वर तिचा शो पाहिला तेव्हा तिची लोकप्रियता, ती आल्यावर लोकांनी केलेले तिचे स्वागत पाहून आश्चर्य वाटले होते, तोपर्यंत मला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. पण काही दिवस तो शो पाहिला आणि त्यात येणार्‍या लोकांबरोबरची तिची आपुलकीची वागणूक पाहून भारावून गेले, त्यानंतर समजले की ती इतकी लोकप्रिय का आहे. आणि त्यानंतर तिच्याबद्दल आणखी माहिती मिळत गेली तसा तिच्याबद्दल आदर वाढतच गेला.

स्रुजा's picture

6 Oct 2016 - 1:33 am | स्रुजा

सुरेख ! ओप्रा आवडतेच. छान हटके मुली निवडते आहेस लेखमालेसाठी.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2016 - 4:25 am | पिलीयन रायडर

मी सुद्धा ओप्राचे नाव इथे आल्यावर खुपच ऐकले. पण अजुन कधी तिच्या मुलाखती पाहिल्या नाहीत :( आता नक्की पाहिन.

पण तिच्या कार्यक्रमां व्यतिरिक्त तिचे हे काम माहिती नव्हते. वाचुन छान वाटले.

मी-सौरभ's picture

6 Oct 2016 - 8:31 pm | मी-सौरभ

टू

पण अजुन कधी तिच्या मुलाखती पाहिल्या नाहीत :( आता नक्की पाहिन.

पण तिच्या कार्यक्रमां व्यतिरिक्त तिचे हे काम माहिती नव्हते. वाचुन छान वाटले.

ओप्रा विनफ्रे यांची ओळख आवडली. ही लेखमाला फार छान रंगत चालली आहे.

अजया's picture

6 Oct 2016 - 9:18 am | अजया

ओप्राचे हे पैलू माहित नव्हते.
ही मालिका मिपा फेसबुक पेजवरुनही आवर्जून वाचली जातेय.अभिनंदन स्वातीताई!

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Oct 2016 - 9:49 am | अनिरुद्ध.वैद्य

ह्यांचा फक्त टॉक शोच माहिति होता, पण आपल्या लेखातुन, ओफ्राचे प्रेरणादायी अन वेगळे व्यक्तिमत्वाची ओळख झाली.

आपली लेखमाला छान रंगतेय. आवर्जुन नव्या लेखाची वाट बघतो!

धन्यवाद!

एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी!

वरुण मोहिते's picture

6 Oct 2016 - 10:29 am | वरुण मोहिते

जबरदस्त परिचय. लेख अजून थोडा मोठा असता तरी चाललं असतं. नुसतं अमेरिकेतच नाही तर बाकी सगळीकडेही ह्यांचे फॅन खूप आहेत .

सतिश गावडे's picture

6 Oct 2016 - 11:19 am | सतिश गावडे

ओप्रा विनफ्रे यांची ओळख आवडली.

अतिशय सुंदर लेख या लेखमालेत येत आहेत. अनेक ज्ञात अज्ञात कर्तुत्ववान स्त्रियांची ओळख होत आहे.

उल्का's picture

6 Oct 2016 - 11:57 am | उल्का

स्वातीताई तुझी लेखन शैली खूप आवडली.
मस्तच!

मंजूताई's picture

6 Oct 2016 - 1:52 pm | मंजूताई

लेख! पुभाप्र!

रेवती's picture

6 Oct 2016 - 5:18 pm | रेवती

हा लेखही आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका कर्तबगार स्त्रीची सुंदर ओळख !

इशा१२३'s picture

6 Oct 2016 - 8:58 pm | इशा१२३

+१ असेच म्हणते!

सखी's picture

6 Oct 2016 - 10:03 pm | सखी

स्वाती ओप्राची छान ओळख करुन दिली आहेस. तिने दिलेल्या देणग्या अगणित आहेत - तिचा मुख्य भरच मुलींच्या शिक्षणावर असतो. स्वतःच्या प्रसिद्धीचा उपयोग करून घेत तिने खूप विधायक कामे केली आहेत.
कतरीना वादळाच्या ब-याच आधी एंजल नेटवर्कने 12 देशात 55 शाळा बांधुन त्यांना शाळेसाठीही बाकी आवश्यक सामग्रीसाठी मदत केली आहे.
थोड्या सुचवण्या फक्त ऊच्चार वेगळा होतो म्हणून.
टेनेस - टेनसी
हुरिकेन - हरिकेन
ही लेखमालाच सुरेख होत आहे. ह्या सगळ्या विद्युलता- इतकी संकटं आली तरीही त्यांचं कर्तुत्व वीजेसारखेच तळपते आहे.

स्वाती दिनेश's picture

7 Oct 2016 - 12:01 am | स्वाती दिनेश

अग, जर्मनांच्यामुळे हुरिकेन लिहिले गेले, :) ओप्रा सुध्दा ते प आणि फ च्या मधलाच उच्चार करतात. लिहिता येत नाही असा.. असो. हरिकेन, टेनसी असे बदल करते.
स्वाती

मला वाटते हे पण उच्चार थोडे वेगळे आहेत.
मिलावकी - मिलवॉकी,
नॅशविले - नॅशविल

द कलर पर्पल मधला तिचा अभिनय एकदम नैसर्गिक होता.

द कलर पर्पल मधला तिचा अभिनय एकदम नैसर्गिक होता.

पैसा's picture

15 Oct 2016 - 5:35 pm | पैसा

सुरेख ओळख