दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
3 Oct 2016 - 1:46 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा

.

जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे. जर्मनीच्या उत्तर टोकाच्या हाम्बुर्ग येथे अँजेला डोरीथी कास्नर यांचा १७ जुलै १९५४ रोजी जन्म झाला. आई इंग्रजी व लॅटिनची शिक्षिका आणि वडिल क्विट्झो येथील प्रोटेस्टंट चर्च ऑफिसचे काम करत असल्याने लहानपणापासून सुसंस्कृत आणि सुरक्षित वातावरणात वाढलेली अँजेला अभ्यासात रुची ठेवून होती. शाळेत असताना गणित आणि रशियन तिचे विशेष आवडीचे विषय होते. कास्नर कुटुंब नंतर इस्ट बर्लिनपासून ८० किमी वर असलेया टेंप्लिन गावात रहायला गेले. क्विट्झो काय किवा टेंप्लिन काय तेव्हाच्या पूर्व जर्मनीत होते आणि त्या वेळच्या राजकीय परिस्थीतीचे पडसाद कळतनकळत लहानग्या अँजेलाच्या मनावर आणि मेंदूवर कोरले जात होते. शाळा संपल्यावर तिने लाइपझिश युनिवर्सिटीमध्ये फिजिक्स शिकायला जाण्याचा निर्णय घेतला. तेथेच तिची भेट उलरिश मेर्केलशी झाली आणि दोघे विवाहबध्द झाले. लाइपझिशमध्ये शिकत असताना अँगेला इतर उपक्रमातही भाग घेत असे. तेथल्या विद्यार्थ्यांनी ७३-७४ साली एक पडका बुरूज शोधला, दुसर्‍या महायुध्दात त्याची पार पडझड झाली होती. १५५१ मधल्या ह्या मॉरिट्झबास्टेलचे ऐतिहासिक महत्त्व मुलांनी जाणले आणि तो पुनरुज्जिवित करण्याकरता चळवळ सुरू केली. त्याकाळच्या पूर्व जर्मनीतल्या प्रशासनाला हे मान्य नव्हतेच. पण ३०,००० च्या वर विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी हे काम लाइपझिश युनिव्हर्सिटीच्या देखरेखीखाली केले आणि एक सुंदर स्टूडंट क्लब तयार झाला. लाइपझिशमधले ते एक मोठे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. अँजेलाचा ह्या चळवळीत सक्रिय सहभाग होता.

उलरिश आणि अँजेला ह्या दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पूर्व बर्लिनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेथे अँजेला यांनी अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स & केमिस्ट्री येथे काम सुरू केले. एकीकडे तिथे शिकणेही चालूच होते. काही कारणास्तव १९८१ मध्ये उलरिश आणि अँजेला वेगळे झाले. क्वांट्म केमिस्ट्री वर संशोधन करून ८६ साली अँजेला यांनी पि एच डी प्राप्त केली. त्याच वर्षी नात्यातल्या एका लग्नाकरता त्या प्रथमच पश्चिम जर्मनीत आल्या. दोन्ही जर्मनीतली तफावत त्यांच्या डोळ्यांना,मनाला जाणवत होती. इकडे जर्मनीतच्या राजकारणात आणि समाजातही बदलाचे वारे वेगाने वाहत होते. १९८९ च्या नोव्हेंबर मध्ये बर्लिनची भिंत जमीनदोस्त करून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाली. वर्षभरात म्हणजे ३ ऑक्टोबर १९९० ला पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे पूर्ण एकत्रीकरण झाले. आजही त्यांना त्याबद्दल विचारले असता त्या म्हणतात तो अनुभव शब्दातीत आहे, तो आनंद शब्दांच्या पलिकडचा आहे. बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव मेर्केल यांच्यावर पडला आणि त्या तिकडे खेचल्या गेल्या. त्यांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधी पक्षाच्या डेमोक्राटिशं आउफब्रुक म्हणजे डेमोक्रेटिक अवेकनिंग ह्या चळवळीत उडी घेतली. ९० सालीच ह्या डेमोक्राटिशं आउफब्रुकचे सीडीयु मध्ये विलिनीकरण झाले आणि मेर्केलना प्रवक्तापदी नेमण्यात आले.

एकत्रीकरणाआधीच्या पूर्व जर्मनीच्या लोथार दे मझियर यांच्या काळ्जीवाहू मंत्रीमंडळात त्यांनी प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आणि एकत्रीकरणानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत जिंकून त्या डॉइशं बुंडेसटाग मध्ये म्हणजे जर्मन पार्लमेंटमध्ये निवडून गेल्या. चॅन्सेलर हेल्मुट कोहेल ह्यांच्या मंत्रीमंडळात त्या मिनिस्टर फॉर वुमेन अँड युथ झाल्या. आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी कचेर्‍यांमध्ये स्त्रीपुरुष समान संधीचा कायदा आणला. प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे हे कटाक्षाने पाहिले आणि कुटुंब आणि कचेरीमधल्या वेळाचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने कामाच्या तासांमध्ये फ्लेक्सिबिलिटी आणली. मुलाच्या जन्मानंतर आई वडिल दोघांकरताही पालकत्वाची रजा मंजूर झाली. त्यांचे काम पाहता कोहेलनी त्यांना ९४ साली पर्यावरण आणि अणुसुरक्षा मंत्री केले. त्यांच्या कामाला आता वेग आला होता, क्षितिज विस्तारत होते. यु एन ची पहिली पर्यावरणपरिषद बर्लिन मध्ये आयोजित केली गेली आणि जगभरातल्या CO2 चे वाढत चाललेले प्रमाण कसे कमी करता येईल हा त्या परिषदेतला एक महत्त्वाचा विषय होता. चॅन्सेलर कोहेल त्यांच्या कामावर संतुष्ट होते. अनेकदा त्यांचा उल्लेख कौतुकाने ते 'माइन मेडशन' म्हणजे 'माझी मुलगी' असा करत असत. ९८ च्या निवडणूकीत कोहेल सरकारचा पराभव झाला आणि मग मेर्केलबाई सीडीयुच्या सेक्रेटरी जनरल झाल्या. सीडीयुच्या त्या जवळपास ९ वर्षे उपाध्यक्षा होत्या, मग २००० मध्ये त्या पार्टीच्या अध्यक्षा झाल्या. २००५ च्या निवडणुकीत चॅन्सेलर गेहार्ड श्रोडर ह्यांचा पराभव करून त्या जिंकून आल्या. सीडीयु, सीएसयु आणि एसपीडी ह्यांची ६ आठवड्यांच्या चर्चेनंतर युती होऊन मग मेर्केलबाईंना चॅन्सेलरपदाची शपथ दिली. जर्मनीच्या त्या पहिल्या स्त्री चॅन्सेलर आहेत. एका पुरूष प्रधान पक्षामध्ये राहून आपली यशस्वी वाटचाल त्या सातत्याने करत आहेत. कुटुंब आणि स्त्रियांच्या हक्कापासून उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांपर्यंत अनेकविध क्षेत्रांमधल्या त्यांच्या सक्रिय, सजग सहभागामुळे जर्मनीचा चेहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

फुकुशिमा न्यूक्लिअर प्लँट मधील भयंकर अपघातानंतर मेर्केलबाईंनी जर्मनीतल्या १७ पैकी ८ अणुभट्ट्या बंद करणार असल्याचे जाहीर केले. उर्जेचे दुसरे स्त्रोत वापरण्याच्या दॄष्टीने कोणती पावले उचलता येतील ह्यावर विचार सुरू केला आणि जागतिक तपमानवाढीच्या समस्येला हाताळताना जर्मनी अग्रेसर ठरू लागला. युरोपातल्या देशांनी एकत्र येऊन आपली वेगवेगळी चलने एकत्रित करून एकच युरो हे चलन स्वीकारावे असा प्रस्ताव आला. काही देशांची त्याला मान्यता नवह्ती पण युरोपच्या एकंदरीत अर्थकारणासाठी हे गरजेचे पाऊल होते आणि त्याचा पाठपुरावा करून जर्मनीसारख्या बलशाली देशाने डॉइशमार्क सोडून युरो स्वीकारला.युरोपियन युनियन मधला मेर्केल ह्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय आहे. जागतिक मंदीच्या लाटेत त्या समर्थपणे टिकून राहिल्या. जर्मनीला मंदीची झळ कमीत कमी पोहोचली. जर युरो गडगडला तर युरोप गडगडेल ह्या त्यांच्या विधानामुळे त्यांची युरोपियन युनियन वरची निष्ठा दिसून येते.

मेर्केलबाईंना स्वयंपाकाची आवड आहे. त्यांचे कार्तोफेल सुपं म्हणजे पोटॅटो सूप आणि फ्लाउमन कुकन म्हणजे प्लम केक ही खासियत आहे. आता त्यांच्या व्यापातून त्यांना कुकिंग साठी कमी वेळ मिळतो किंबहुना मिळतच नाही पण करियरच्या सुरुवातीच्या काळात अगदी मंत्री झाल्यावरही प्लमच्या सिझनमध्ये त्यांचा एखादा विकांत प्लम केक बेकिंगसाठी राखून ठेवलेला असे. अजूनही जुन्या सहकार्‍यांकडून त्यांच्या प्लम केकची आठवण काढली जाते. त्यांचे फूटबॉल प्रेम सर्वश्रुत आहेच. २०१४ साली जर्मनीने जेव्हा फूटबॉल विश्वचषक जिंकला तेव्हाचा त्याचा आनंद कान्सलेरिन म्हणून तर तर होताच पण एक फूटबॉलवेडी प्रेक्षक म्हणून जास्त होता.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्या बरोबरची बर्लिनमधील त्यांची भेट दोन्ही देशांमधल्या व्यापारी संबंधांसाठी महत्त्वाची ठरली. तर मोदी-मेर्केल भेटीनंतर त्यावर कळस चढला. भारत आणि जर्मनी मधील व्यापाराला जलदगतीने मंजुरी मिळावी ह्याकरताचा करार झाला. २००९ मध्ये भारतातर्फे त्यांना जवाहरलाल नेहरु अ‍ॅवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशविदेशातून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. फोर्ब्जच्या "मोस्ट पॉवरफूल वुमन ऑफ द वर्ल्ड" ह्या सन्मानावर त्यांनी २००६ पासून नऊ वेळा हक्क बजावला आहे. टाइमच्या २०१५ च्या त्या 'पर्सन ऑफ द इयर' आहेत. २००५ पासून जर्मनीच्या कान्सलेरिन असलेल्या मेर्केलबाईंना आयुरारोग्य लाभो आणि त्या देशाच्या आणि युरोपच्या पर्यायाने जगाच्या राजकारणात अशाच तळपत राहोत ह्या शुभेच्छा!

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

अँगेलाबाईंच्या कारकिर्दीचा आढावा आवडला. एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून आधी त्यांच्याबद्दल काही ओळी वाचनात आल्या होत्या पण इतकी माहिती नव्हती.

मेर्केलबाईंची काही काही धोरणे खटकतात. कधीकधी असे वाटते की त्या स्वतःच्या 'आयर्न लेडी' च्या प्रतिमेत अडकून पडल्या आहेत. असो. तरीही अर्थात त्यांचे कर्तृत्व कमी होत नाही.

लेख आवडला. मधल्या दोन परिच्छेदांमध्ये संपादनाची आवश्यकता आहे. काही भाग दोनदा उद्धृत झाला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Oct 2016 - 8:37 am | कैलासवासी सोन्याबापु

+११

फक्त टेसी थॉमस अन अरुणीमा सिन्हांच्या रांगेत मर्केलबाई काही पटल्या नाहीत तितक्याश्या हे ही नोंदवतो.

नमकिन's picture

3 Oct 2016 - 9:23 am | नमकिन

जागतिकीकरणाचा परिणाम, तसेच मिपाच्या कक्षा रुंदावतायत!

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 11:31 am | महासंग्राम

आज ०३ ऑक्टोबर २०१७, आजच जर्मनीच्या एकीकरणाला २७ वर्षे पुर्ण झालीत!!!

स्वाती दिनेश's picture

3 Oct 2016 - 12:08 pm | स्वाती दिनेश

आज जर्मनीचा एकत्रीकरण दिवस, ते निमित्त साधून फ्राउ मेर्केल ना आजच्या दीपशिखेमध्ये त्यांचा लेख टाकला.
@ एस, दोनदा आलेला भाग संपादन करते. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यु.
स्वाती

रुपी's picture

4 Oct 2016 - 2:45 am | रुपी

लेख आवडला.

पद्मावति's picture

4 Oct 2016 - 12:17 pm | पद्मावति

+१

खेडूत's picture

4 Oct 2016 - 1:14 pm | खेडूत

आढावा आवडला.
त्यांची निर्वासित धोरणं पटत नाहीत. एका नंदनवनाची रांगोळी केल्याचे पाप इतिहास त्यांच्याच माथी मारेल असं वाटतं..

बाकी आमच्या मार्थाकाकूंच्या हातचा प्लम केक आणि कार्तोफेल सालाट आठवून 'श्मेक्ट गूट' तोंडात आलं!

त्यांची निर्वासित धोरणं पटत नाहीत. एका नंदनवनाची रांगोळी केल्याचे पाप इतिहास त्यांच्याच माथी मारेल असं वाटतं..

अगदी अगदी.

का? काय चूकीचं धोरण आहे त्यात? तिची नजर पुढच्या काही वर्षांवर आहे. एजिंग जनरेशन आहे जर्मनीची. अजुन ५ वर्षांनीच याचे परिणाम जॉब्ज वर , पेन्शन वर दिसायला लागेल. शिवाय युरोप मध्ये जर्मनी चं एक पाऊल पुढे राहील च. तिच्या स्वत"च्या पक्षाचं भविष्य, जर्मनी चे प्रश्न आणि पूर्ण युरोप मध्ये तिची पुढची काही गणितं पाहिल्यास मला हे चूकीचं वाटत नाही. कॅनडाचे पण आहेत च ते धोरणं फक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पण गेल्या वर्स्।आत कॅनडामध्ये ३२०००० लोकं इमिग्रेट होऊन आले आहेत. त्या लोकांनी कुठे जायचं?

स्वाती ताई , या लेखासाठी खास धन्यवाद. मला ही बाई फार आवडते/.

स्पार्टाकस's picture

6 Oct 2016 - 12:26 am | स्पार्टाकस

इमिग्रेशन धोरणात चुकीचं काही नाही, फक्तं आपण कोणाला जर्मनीत आणून वसवतो आहोत आणि त्याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात याकडे मर्केलबाईंनी सोईस्कर काणाडोळा केलेला आहे. सिरीयातून आलेल्या निर्वासितांनी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच याची चुणूक दाखवली होती.

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2016 - 12:33 am | स्वाती दिनेश

सिरियनांबद्दलचे त्यांचे धोरण सामान्य जर्मन जनतेलाही पटत नाहीच, त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, पण तरीही त्यांचा करियर ग्राफ आकर्षक वाटल्याने शेअर करावेसे वाटले,
स्वाती

येस्स, त्यांनी चूका केल्या आहेत तिकडे जाऊन आणि त्याला आळा घालायलाच हवा. आणि त्या इतर क्रिमिनल्स नी पण केल्याच असत्या पण त्या चुकांना आळा घालणं सोपं आहे. त्यांच्यापुढचे इतर प्रश्न बघता हे तुलनेने सोपं आहे म्हणायला हरकत नाही.

इमिग्रेशन धोरणात वाईट काही नाही, पण ऐतिहासिक चुकांचा अपराधभाव असल्याने म्हणा किंवा खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे व्हाईट मॅन्स गिल्ट म्हणा - अनिर्बंध इमिग्रेशन चालवलं आहे ते जर्मनीला घातक ठरेल असं वाटतं.

जर्मनीच्या बाबतीत फक्त व्हाईट मॅन'स गिल्ट असेल असं वाटत नाही. त्यांना स्वत :ला ही वणवण चांगली जवळुन माहिती आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोप मधुन अनेक जर्मन्स ना हुसकावलं गेलं. ते तेंव्हा लेबर कँप मध्ये राहत होते, दोस्त राष्ट्रांच्या ताब्यातल्या जर्मनी मध्ये यायच्या आधी अनेकांनी या कँप्स मधलं जीवन जवळुन बघितलं आहे. त्याकाळी हा नंबर काही मिलियन्स मध्ये होता. आणि हे अगदी १९५० मध्ये झालं आहे. आपल्याला फाळणी जितक्या तीव्रतेने आठवते तितकीच ही आठवण पण ताजी असणार त्यांच्या साठी. त्यामुळे ही असेल पण सुरुवातीला जेंव्हा सिरीयन्स आले तेंव्हा जर्मन्स ने त्यांचं स्वागतच केलं. या सगळ्यात एक खुप मोठा प्रशासकीय नियोजनाचा भाग असतो (पोस्ट मॅथ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), म्हणजे ह्या लोकांना वेळेवर घरं देणं , त्यांना नोकर्‍या मिळणं, तोपर्यंत पुरेसा भत्ता मिळणं ई. या नियोजनात जर जर्मन सरकार कमी पडलं असेल तर मात्र ते जनतेची नाराजी ओढवुन घेत असतील. पण मोठ्या पिक्चर कडे बघितलंत तर अजुन काही वर्षांनी यात फरक पडला असेल असं वाटतं.

खुद्द कॅनडाचे रेफ्युजी कँप्स अजुन मुख्य शहरांत आलेले नाहीयेत. अजुन इतके रेफ्युजीज पण आले नाहीयेत पण निदान माध्यमं त्यांचं स्वागत करतायेत, काही फील गुड बातम्या छापुन आणतायेत सतत. कॉन्झर्वेटिव्ज चा जो पारंपारिक मतदार आहे तो थोडासा संशयाने बघतोय एकुण प्रकाराकडे पण निदान जाणवण्याइतपत असंतोष अजुन नाहीये.

हुप्प्या's picture

7 Oct 2016 - 9:29 pm | हुप्प्या

१९५४ साली जन्मलेल्या बाईला छावणीचा काही अनुभव असेल असे वाटत नाही. दुसर्या महायुद्धापासून हे अंतर पुरेसे लांब आहे त्यामुळे तोही प्रत्यक्ष अनुभव नाहीच.
कॅनडाचा पंतप्रधान, ही बाई, इंग्लंडचे अनेक माजी पंतप्रधान ह्या सर्वांना जोडणारा एकच धागा म्हणजे श्वेतवरणी अपराधगंड अर्थात व्हाईट मॅन्स गिल्ट (मॅन हा पुरुष ह्या अर्थी न घेता माणूस ह्या अर्थी घ्यावा).

जर्मनीत बायकांवर बलात्कार, विनयभंग, अपमान असे अनेक प्रकार अरबी निर्वासितांनी केलेले आहेत. त्यातले अनेक पॉलिटिकली करेक्टच्या हव्यासापोटी दाबून टाकले गेले. नव्या वर्षाच्या दिवशी तो प्रकार इतका हाताबाहेर गेला की तो दाबणे अवघड बनले.

सौदी अरेबिया वा कुवेत सारखे अत्यंत श्रीमंत अरबी देश ह्या निर्वासितांना फारसे स्वीकारताना दिसत नाहीत. पण जर्मनी मात्र अमर्याद संख्येने अशा लोकांना सामावण्याचा प्रयत्न करत आहे हे अनाकलनीय आहे.

पुढच्या निवडणूकीत बाईंना डच्चू मिळो आणि कुणीतरी डोके ठिकाणावर असणारा नेता मिळो.

अहो ती प्रत्यक्ष जन्मली नसेल तरी स्वतः मर्केल काय आणि जनता काय, या गोष्टी संवेदनशीलतेने बघणार च ना? आपण ही फाळणी बद्दल अजुन ही चर्चा करतोच की. आपण सगळे पाकिस्तानातून ट्रेन मध्ये बसून आलो आहोत का?

"अनेकांनी कँपमधील जीवन जवळून पाहिलेले आहे" ह्या अनेकांत मर्केल बाईंचा समावेश होत नाही असे मला दाखवायचे होते. तिने कँपमधील जीवन जवळून पाहिले असण्याची सुतराम शक्यता नाही वाटत.

तिच्या धोरणावर कँपच्या जीवनाचा वा द्वितीय महायुद्धाचा थेट प्रभाव नाही. असलाच तर तो अप्रत्यक्ष आहे.

संवेदनेने बघणे आणि त्या संवेदनेच्या आहारी जाऊन आपल्या मायभूमीचे वाटोळे करणे जिच्या नेतृत्त्वाची जबाबदारी जनतेने आपल्या शिरावर टाकली आहे ह्यात मला तरी फरक दिसतो. दुर्दैवाने मर्केलबाईना तो कळत नाही असे वाटते.

पण मोठ्या पिक्चर कडे बघितलंत तर अजुन काही वर्षांनी यात फरक पडला असेल असं वाटतं.

असं म्हणतायत खरे सगळे, पण मला अजूनही शंका आहे. ज्या पद्धतीने हे इमिग्रंट्स आपल्याला आश्रय देणारा देश हा बापाचा माल असल्यागत वागतायत त्यामुळे तर ती वाढलीच आहे.

पैसा's picture

5 Oct 2016 - 3:09 pm | पैसा

ओळख आवडली

इशा१२३'s picture

5 Oct 2016 - 9:42 pm | इशा१२३

छान ओळख!

टर्मीनेटर's picture

6 Oct 2016 - 9:39 am | टर्मीनेटर

छान माहिती... पण सिरियनांबद्दलचे त्यांचे धोरण हे Brexit साठी कारणीभूत असलेल्या तीन महत्वाच्या घटकांमधील एक आहे.

हुप्प्या's picture

6 Oct 2016 - 10:13 am | हुप्प्या

अशा प्रकारच्या श्वेतवर्णीय लोकांमधे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे व्हाईट मॅन्स गिल्ट अर्थात काही श्वेतवर्णीयांत असणारी एक अपराधी भावना. आपण इतके समृद्धीत वाढलो. सुखात बालपण, तरुणपण गेले. पण आता वंचित लोकांकरता काहीतरी केलेच पाहिजे. ही भावना तशी वाईट नाही. पण इथेही तारतम्य सोडून अतिरेकी काहीतरी करुन चांगल्या गोष्टीचे वाटोळे करणे हे ह्या अट्टाहासापायी घडते. इस्लामी संस्कृतीत वाढलेल्यांबद्दल अतोनात प्रेम, त्यांच्या कुठल्याही अवगुणावर टीका करणे कटाक्षाने टाळणे. आणि त्यांना दोन्ही हात पसरून आपल्या देशात पायघड्या घालून बोलावणे.
सिरिया वा अन्य अरबी देशातले लोक बायकांशी वेगळे वागतात. त्यांना अगदी बुरख्यात गुंडाळले नाही तरी त्यांचे स्थान हे जर्मनी वा इंग्लंडच्या बायकांच्या बरोबरीचे नसते. बायकांमधे नोकरीचे प्रमाण खूपच कमी आहे. बहुतेक अरबी पुरुष मोकळेपणाने अनोळखी बाईशी व्यवहार करत नाहीत. असे लोक हजारोंच्या संख्येने जर्मनीसारख्या देशात येतात. अनोळखी संस्कृती. मग स्विमिंग पूल, डान्स क्लब अशा जागी अल्पवस्त्रातल्या बायका दिसल्या की त्यांच्याकडून गैर वर्तन होऊ लागते. अशी अनेक अनेक उदाहरणे दिसतात.
कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक ओळख करुन न देता भरमसाट अरबांची अशी आयात करणे हे तिथल्या मुक्त संस्कृतीला घातक ठरणार आहे. जर्मनीची आपल्या संस्कृतीला त्यागण्याची तयारी असेल आणि अरबांप्रमाणे आपल्या बायकांवर बंधने घालणे त्यांना चालणार असेल तरच अरबी लोकांना जर्मनी आपले वाटेल नाहीतर त्यांच्याकडून अशीच दुष्कृत्य्रे घडणार.
मर्केलसारख्या गंडाने पछाडलेल्या बाईला ते कधी कळणार नाही. कदाचित निवडणुकीत मार बसला तर कदाचित ती शुद्धीवर येईल. पण असल्या अपराधी गंडाचे बळी ठरलेले
लोक युरोप (आणि कॅनडाही) चे नेते बनणे तिथल्या नागरिकांना घातक आहे.

अशा विषयात संबंधित उत्सवमूर्तीवर स्तुतीसुमनेच उधळायची हा संकेत न पाळल्याबद्दल क्षमस्व. पण राहवले नाही.

बोका-ए-आझम's picture

6 Oct 2016 - 10:23 am | बोका-ए-आझम

नाझींच्या काळात जे अत्याचार झाले, त्यापासून जर्मनीला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जर्मन, विशेषतः पश्चिम जर्मन सरकारने प्रयत्न केले होते, कारण त्यांनी स्वतःला नाझी राजवटीचे वारसदार असं घोषित करुन सर्व युद्धगुन्ह्यांची जबाबदारी घेतली होती. १९७२ मध्ये म्युनिक आॅलिंपिक्समध्ये झालेल्या इझरेली खेळाडूंच्या हत्याकांडाच्या वेळीही हे जर्मन धोरण दिसून आलं होतं. पण नाझी हे अरबांच्या बाजूने होते आणि अरबांचा ज्यू द्वेष हे त्यांनी अरबांना पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण होतं. मर्केल दुर्दैवाने हे लक्षात घेत नाहीयेत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व कमी होत नसलं तरी हे धोरण त्यांचं आॅपरेशन ब्ल्यू स्टार ठरण्याची शक्यता फार जास्त वाटतेय.
लेख उत्तम. पण हे मुद्दे मांडायला हवेत असं वाटलं म्हणून लिहिले आहेत.

मदनबाण's picture

7 Oct 2016 - 8:41 am | मदनबाण

याच जोडीला Deutsche Bank आणि बँकेचे £36 TRILLION डेरिव्हेटिव्ह बुक याबाबतीत काय होते ते आता पाहण्यासारखे आहे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृत