ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
सक्सेना कुटुंबाच्या नसानसात सैन्याचे रक्त वाहत होते. वडिल सैन्यात ऑफिसर असल्यामुळे मिलिटरी वातावरणातच भावंडं मोठी झाली. भावाने सैन्यात जाण्याचा निर्णय सहज स्वीकारला गेला. नव्हे, नव्हे आपला मुलगा सैन्यातच जाणार हे तर घरच्यांना माहितच होते. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिचाही सैन्यात जाण्याचा निर्धार पक्का झाला. तिचा नैसर्गिक ओढा तेथे होताच. पण आता त्याला निश्चित दिशा मिळाली. तिच्या स्वप्नांना पंख मिळाले. आय ए एफ ने मुलींना पायलट ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला होता. १९९४ मध्ये ट्रेनी पायलट मुलींची २५ जणींची ही पहिली बॅच! त्यावेळी मुलींना शॉर्टटर्म सर्व्हिस कमिशन मिळत असे. फ्लाईट लेफ्टनंट गुंजनलाही ७ वर्षांचे कमिशन मिळाले. १९९९ ला जेव्हा युध्दाला तोंड फुटले तेव्हा अवघी २४-२५ वर्षांची होती.
सन १९९९, कारगिल युध्दाला तोंड फुटले. रोज वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. भारतीय सैन्य निकराने लढत होते. कारगिलसारख्या दुर्गम भागात हेलिकॉप्टर्सने मदत पोहोचवणे, जखमी सैनिकांना बेसवर आणणे अशा कामांसाठी फायटर पायलट्सच्या बरोबरीने हेलिकॉप्टर पायलटसही लागतात. फोर्सेसमधल्या एकूणएक पायलटसना ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश आले. गुंजनने बोलावण्याची वाट पाहिली नाही. ती युध्दभूमीवर जाण्यासाठी शिध्द झाली. श्रीविद्या राजन ही तिची ट्रेनिंगपासूनची सखी, सहकारी फ्लाइट लेफट्नंटही त्यात होती. भारतीय सैन्याला बायकांनी युध्दभूमीवर असायची सवय नव्हती. ह्या मुली कारगिल सारख्या बर्फाळ प्रदेशात, विपरित नैसर्गिक स्थितीत आणि ते ही वॉरझोनमध्ये, मानसिक आणि शारिरिक खंबीरपणा दाखवू शकतील का? हे ऑफिसर्सच्या चेहर्यांवरचे प्रश्नचिह्न वाचत गुंजन आणि श्रीविद्या त्यांच्या 'चीता हेलिकॉप्टर' मध्ये चढल्या. काश्मीर खोर्यातल्या, लडाखमधल्या ठिकाणी युध्दाला तोंड फुटले होते. सामान्य माणसाला जिथे जगणे अवघड अशा जागी लढायचे होते. तो तणाव, कामाचे ते स्वरुप ह्या मुली झेपवू शकतील का? ह्या प्रश्नाचे उत्तर न बोलता आपल्या अपूर्व कामगिरीनेच ह्यांनी करून दाखवले.
चित्त्यासारख्याच चपळ अशा चीता हेलिकॉप्टर्सनी कारगिलच्या दर्याखोर्यात, टेकड्यांमध्ये लपलेल्या आपल्या सैनिकांमधल्या जखमी आणि शहीद सैनिकांना बेसवर सुरक्षित आणण्यासाठी त्या दोघी सिध्द झाल्या. त्यांच्यावर जबाबदारी होती ती जखमी सैनिकांना मेडिकल मदत पोहोचवणे, त्यांना बेसवर सुरक्षित आणणे, इतरही रसद पुरवणे आणि पाकिस्तानी सैन्याच्या लपलेल्या जागा हेरणे. त्यांच्या चॉपर्समध्ये शस्त्रास्त्रं तर नव्हतीच पण शत्रूचा हल्ला झाला तर संरक्षणासाठी आधारही नव्हता. डोंगरदर्यातून चॉपर द्वारे मदत पोहोचवणे आणि जखमींना औषधे देणे किवा बेसवर घेऊन येणे हे करतानाच पाकिस्तानी सैन्याच्या लपलेल्या जागा हेरणे अशा धोक्याच्या जागांवरून १०-१० फेर्याही कराव्या लागत. कुठूनही, कधीही हल्ला होण्याची शक्यता होतीच. क्रॅश लँडिग करावे लागले आणि ते ही शत्रूच्या छावणीजवळ करावे लागले तर संरक्षणासाठी म्हणून एक फुल लोडेड INSAS रायफल आणि रिवॉल्व्हर जवळ बाळगून जीवावर उदार होऊन शेवटच्या श्वासापर्यंत मायभू साठी लाढायला सिध्द होऊन जेव्हा फ्लाईंग ऑफिसर गुंजनच्या चॉपरने पहिली भरारी घेतली तेव्हा भारताच्या सैन्याच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातली वॉरझोनमध्ये विमान नेणारी गुंजन ही पहिली स्त्रीपायलट ठरली. ह्याआधी कधीही फायटर जेट तिने उडवले नव्हते पण.. आता पण आणि परंतु साठी वेळच नव्हता. मायभू साठी प्राणपणाने लढणे ह्याखेरीज दुसरा विचार नव्हता. खरे आव्हान होते ते वॉरझोनमध्ये प्रत्यक्ष जाणे, तेथे हवी ती मदत, रसद, दारुगोळा, अन्न पुरवणे आणि हे करत असताना स्वतःचे रक्षण करणे. जखमी सैनिकांना प्रसंगी उचलूनही चॉपरमध्ये ठेवताना आजूबाजूकडून हल्ला होत नाही ह्याचे भान ठेवत सतर्क आणि सजग राहत स्त्री म्हणून कोणतीही आणि कसलीही सवलत न घेता "वो झासीवाली मर्दानी जैसी ये दिल्लीवाली मर्दानी खूब लढी"!
ह्या दरम्यान एकदा ती सहकारी ऑफिसर बरोबर काश्मीरातल्या एका अगदी आतल्या भागातल्या लहानशा खेड्यात हेलिकॉप्टर घेऊन काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे थोड्याच वेळात मोठ्या संख्येने लोकं जमले, त्यांच्या चेहर्यावरचे बाई पायलट कशी दिसते? कशी असते? हे कुतुहल लपत नव्हते. गुंजनला त्याची खूप मजाही वाटली आणि विषादही.. देश एकीकडे किती प्रगती करतो आहे आणि ही त्याच देशातली मंडळी कुठल्या युगात आहेत.. युध्द संपल्यानंतर गुंजनचे रायफल घेऊन हेलिकॉप्टर मध्ये चढतानाचे फोटो पेपरमध्ये, आउटलूक सारख्या मासिकांमध्ये प्रसिध्द झाले आणि गुंजन लोकांना माहिती झाली. ती बाजारात किवा अन्यत्र कुठे गेली की लोक तिला ओळखून अभिवादन करू लागले, कौतुकाने बोलू लागले. बर्याचदा ती साध्या पोषाखात असली तर तुम्ही युनिफॉर्म का नाही घातला? आणि तुमची ए के ४७ कुठेय? असेही प्रश्न लोकं विचारत तेव्हा ती ते हसण्यावारी नेत असे. पण इतक्या साध्या गोष्टी, शिकल्यासवरल्या लोकांना माहित नसाव्यात याचा खेद तिला वाटत असे.
शत्रूच्या हल्ल्यापासून आपले विमान वाचवत, जोखीम पत्करुन द्रास आणि बटालिक सारख्या ठिकाणी आठवड्यातून डझनावारी फेर्या करून योग्य रसद पोहोचवताना, शत्रूची ठिकाणी हेरताना, त्याची माहिती वरच्या ऑफिसरला पुरवताना दिवस पुरत नसे. सोबतीला मृत्यूसखा सतत होताच. एकदा गुंजनचा 'चित्ता' कारगिल एअरस्ट्रिपवर झेप घेण्याच्या तयारीत होता. एवढ्यात शत्रूकडून एक मिसाइल थेट त्या दिशेने आले. पाकिस्तानने शिकार हेरली होती. पण थोडक्यात नेम चुकला आणि मिसाइल मागच्या टेकड्यांमध्ये पडले. घाबरून न जाता, जराही विचलीत न होता गुंजनने आपले काम मोठ्या धैर्याने चालू ठेवले. पाकिस्तानी सैन्य असलेल्या भागाजवळ जायची वेळ आलीच तर लढण्याच्या पूर्ण तयारीने भरलेली रायफल आणि पिस्तूल घेऊन तिचा चित्ता झेप घेत असे. आपल्या सैनिक बांधवाना हवी ती रसद पोहोचवणे आणि जखमी व शहीदांना सुरक्षित ठिकाणी आणणे ह्यात असणारे समाधान शब्दात सांगता येणार नाही. सेवामुक्तीनंतरही ती भारतीय सेनेशी जोडलेली आहेच. मि-१७ च्या हेलीकॉप्टर पायलटशी तिची लग्नगाठ बांधली गेली. म्हणतात ना, वन्स अ सोल्जर, ऑलवेज अ सोल्जर!
भारतीय सैन्याने स्त्रियांना आता केवळ शॉर्ट टर्म सर्व्हिस कमिशन न देता कायमस्वरुपी कमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा तिला आनंद होतो आणि हे पाऊल उचलण्यात नक्कीच तिच्या चित्त्याच्या कारगिलमधल्या झेपेचा सिंहाचा वाटा आहे. आता अधिकाधिक स्त्रिया जास्तीत जास्त आकाश कवेत घेऊ शकतील ह्याची तिला आशा आहे. तिची लहानगी प्रज्ञाही भारतीय सेनेच्या सेवेतच जाईल असा तिला विश्वास वाटतो. ऑपरेशन विजय' च्या विजयातली एक महत्त्वाची शिल्पकार असलेल्या गुंजनचा तिच्या अतुलनीय कामगिरीबद्दल 'शौर्य वीर पदक' देऊन सन्मान केला गेला. शौर्य वीर पदकाची ती पहिली महिला मानकरी आहे. गुंजनच्या पुढच्या प्रकल्पांसाठी खूप सार्या शुभेच्छा!
प्रतिक्रिया
4 Oct 2016 - 2:30 am | पिलीयन रायडर
खतरनाक!! अंगावर काटा आला ताई!
फार फार... फार अभिमान वाटला!
4 Oct 2016 - 3:07 am | रुपी
जबरी. तिच्या गगनभरारीला आणि योगदानाला सलाम!
लेखनशैलीही फार आवडली. हे सर्व अगदी डोळ्यांसमोर घडत आहे असे वाटले.
4 Oct 2016 - 8:20 am | मोदक
हा ही लेख आवडला.
एकच सुधारणा, ते "बर्फिल्या" ऐवजी "बर्फाळ" असा बदल करता का प्लीज?
4 Oct 2016 - 11:15 am | स्वाती दिनेश
@ मोदक, नक्कीच करते. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यु.
@ सोन्याबापू, तुमच्या मोलाच्या माहितीबद्दल धन्यु.
स्वाती
4 Oct 2016 - 8:36 am | रातराणी
अप्रतिम लेख आणि गुंजनला एक कड़क सलूट!!
4 Oct 2016 - 9:34 am | सतिश गावडे
या आजच्या काळातील झाशीच्या राणीला सलाम !!!
4 Oct 2016 - 9:53 am | कैलासवासी सोन्याबापु
मुळात ज्याने मिलिटरी ग्रेड चॉपर्स मध्ये प्रवास केलाय त्याला ते उडवणे काय दिव्य असते ह्याची पुसटशी कल्पना असते. रिक्रिएशनल हेलिकॉप्टर्स उडवणेच तेल काढणारे असते, तरीही त्यात सेफ्टी जरा जास्त असते, सिव्हिलिअन प्रवासी लोकांची सेफ्टी जपायला. अर्थात ती मिलिटरी ग्रेड चॉपर्स मध्ये सुद्धा असतेच पण एम ग्रेड मध्ये वजन कमी ठेवण्यावर अन कमी केलेल्या वजनाच्या बरोबरीचे गोळा बारूद केळी कोबी बोकड राशन कंबल वगैरे सैनिकांना पोचवण्यावर जास्त भर असतो, मेडीक हेलिकॉप्टर्स मध्ये तर अख्खी स्ट्रेचर बसवाची असतात, त्यात आजूबाजूला धुमधडाका सुरु अन ऐरोडायनॅमिक स्टॅबिलिटीचा पत्ताच नाही, विमानाचे पंख, त्यांचा कोन नीट सेट करून नॅव्हिगेट/फ्लाय केल्यास एअर कुशनवर उडतात, हेलिकॉप्टर मध्ये आजूबाजूला असणारी हवा फाडत वरचढायला लागते, थोडक्यात विमान जर बुलेट ट्रेन असली तर चॉपर म्हणजे रेल्स खाली लटकलेली स्कायबस असते! अन रेल म्हणजे हवा, बऱ्याचवेळी तर उडता उडता हवा अचानक विरळ झाली तर हेलिकॉप्टर्स एकतर गप्पकन 300 फूट वगैरे खाली येतात किंवा नशीब वाईट असले तर थेट जमिनीवर पडतात, हेलिकॉप्टर स्टॉल होणे हे फार विचित्र प्रकरण. त्यात गुंजन मॅम जिथे शौर्य दाखवत होत्या तिथे सरासरी उंची जगातल्या इतर युद्धभूमीपेक्षा लैच जास्त आहे, हवा प्रचंड जास्त विरळ आहे, अशात हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स कुचकामी असतात, मग एक हेवीलिफ्ट जितके सामान उचलेल तितके सामान 5 फेऱ्यात बारक्या हेलिकॉप्टरला पोचवायला लागते, त्यात मी वरती वर्णन केलेलं दिव्य वातावरण त्यात कागदागत हलके चॉपर अन त्यात भरलेले मौल्यवान सामान, जखमी सैनिक इत्यादी आहेत, बॉस कस लागतो भल्या भल्या पायलट लोकांचा, त्यामुळे गुंजन सिन्हा अन त्यांच्यासारख्या असंख्य हेलिकॉप्टर पायलट लोकांस आमचा मानाचा मुजरा कायम असतो, अन गुंजन मॅम सारख्या बहाद्दर स्त्री करता तर जास्तच _____/\_____
4 Oct 2016 - 10:16 am | तुषार काळभोर
बाप्पूंना बाडिस..
अजून काय बोलावे!
4 Oct 2016 - 10:38 am | एस
+2
4 Oct 2016 - 3:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१०००
5 Oct 2016 - 1:42 am | स्रुजा
बाप रे !! तेथे कर माझे जुळती... __/\__
5 Oct 2016 - 2:41 pm | अनिरुद्ध.वैद्य
___/\___
5 Oct 2016 - 2:52 pm | इशा१२३
छान लेख!दंडवत बहाद्दर सैनिकांना _/\_
13 Oct 2016 - 9:25 am | नाखु
फक्त दंडवत. बाप्पूनी फक्त प्रतिसादात न लिहिता जसं शत्राबाबबत एक लेख लिहिला तसाच सैन्यातील दळणवळण आणि युद्ध सामुग्रीवर लिहून आम्ची विचार जळमटे दूर करावीत.
गुगल्या फक्त माहीती देतो पण तुम्ही सोदाहरण सम्जावता म्हणून ही आग्रही हक्काची मागणी.
4 Oct 2016 - 11:40 am | वरुण मोहिते
लेखमालिका
4 Oct 2016 - 12:00 pm | आदूबाळ
जबरदस्त लेखमालिका चालली आहे.
एक सुचवू का? "चित्ता" हेलिकॉप्टर असा बदल करता येईल का? किंवा किमान "चीता" असा तरी?
4 Oct 2016 - 12:17 pm | स्वाती दिनेश
यू आर राइट. काही ठिकाणी चित्ता/चीता ऐवजी चिता झालेय, अर्थाचा अनर्थ होतोय. धन्यु.
स्वाती
4 Oct 2016 - 2:37 pm | मारवा
लेखमालेतले
हा आणी या पुर्वीचे सर्वच लेख आवडले.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
4 Oct 2016 - 3:32 pm | रेवती
सर्व भारतियांना अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व आहे.
4 Oct 2016 - 3:41 pm | यशोधरा
आवडला हा लेख!
4 Oct 2016 - 3:45 pm | प्रीत-मोहर
अजून एक उदाहरण.
स्वातीताई तुझे आणि बापूसाहेब तुमचे खूप आभार.कारतूस सर, अरुणिमा मॅम, परवा चा Indian paratroopers earning badge video, आणि आज हा लेख.
१ टक्का तरी यांच्यासारखं वागायला जमलं तरी भरुन पावेन
4 Oct 2016 - 3:47 pm | मेघना मन्दार
सगळे लेख अधाशासारखे वाचून काढले :) खूप छान !!
4 Oct 2016 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख खूप आवडला. एकंदर सर्व लेखमालाच अत्यंत वाचनिय आणि प्रेरणादायक आहे.
फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना आणि त्यांच्या स्त्री सहकार्यांनी आपल्या मार्ग शोधक (पाथ फाइंडर) कृतीने भारतिय हवाई दलाला अनेक क्रांतीकारक निर्णय घेणे सोपे केले आहे आणि आपल्या कृतीने ते निर्णय बरोबर आहेत हे सिद्धही केले आहे.
एक किंचीत खुलासा...
भारतातली वॉरझोनमध्ये विमान नेणारी गुंजन ही पहिली स्त्रीपायलट ठरली. ह्याआधी कधीही फायटर जेट तिने उडवले नव्हते
यामध्ये "विमान" हा शब्द "एअरक्राफ्ट" याचा समानार्थी म्हणुन वापरलेला दिसतो आहे. एअरक्राफ्ट हा इंग्लिश शब्द फिक्ड विंग एअरक्राफ्ट (ज्याला आपण मराठीत साधारणपणे विमान असे म्हणतो) आणि हेलिकॉप्टर या दोघांनाही वापरतात. मात्र, यानंतरच्या "ह्याआधी कधीही फायटर जेट तिने उडवले नव्हते" या वाक्याने जरा गोंधळ होत आहे. कारण हेलिकॉप्टर चालवण्यासाठी फायटर जेट उडवणे बंधनकारक नाही. फायटर जेट उडवणे हा हेलिकॉप्टर उडवण्यापेक्षा खूप वेगळा आणि तुलनेने अत्यंत क्लिष्ट प्रांत आहे.
अर्थातच, हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात आणि तेही लढाई चालू असलेल्या विभागात हेलिकॉप्टर उडवून रसद पोचविणे आणि जखमी सैनिकांची ने आण करणे हे असीम साहसाचे व कौशल्याचे काम आहे यात वाद होऊच शकत नाही.
इतक्या सुंदर लेखात तांत्रिक चुकीने कमतरता राहू नये यासाठीच केवळ हा खुलासा केलेला आहे.
4 Oct 2016 - 5:02 pm | स्वाती दिनेश
एअर क्राफ्ट ला विमान हाच मराठी शब्द सापडला. दुसरा सुयोग्य शब्द मिळाला नाही, तिने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की कारगिल च्या आधी तिने व श्रीविद्यानेही फायटर जेट उडवले नव्हते. चॉपर्स चालवली होती. पण हीवेळ्च अशी होती की हे केले नाही, ते माहित नाही.. अशा कोणत्याच गोष्टींना वेळ आणि थारा नव्हता. कारगिल युध्दात प्रामुख्याने चीता चॉपर्स त्यांनी चालवली,
बाकी तांत्रिक माहिती सोन्याबापू अथवा अजून त्ज्ज्ञ मंडळी देतील.
स्वाती
5 Oct 2016 - 12:14 pm | पद्मावति
सुरेख.
5 Oct 2016 - 3:16 pm | जिन्गल बेल
धन्स स्वाती ताई ....
सगळे भाग आत्ता एका दमात वाचून काढले...
पु.भा.प्र.....
5 Oct 2016 - 3:16 pm | पैसा
अतिशय अभिमान वाटण्यासारखी कामगिरी!
5 Oct 2016 - 4:43 pm | गिरिजा देशपांडे
हा पण लेख मस्त, गुंजनला _/\_
7 Oct 2016 - 5:21 pm | पूर्वाविवेक
सलाम या रणरागीणीला
13 Oct 2016 - 7:04 pm | मी-सौरभ
टू गुंजन सक्सेना.