‘‘ फो ’’
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
बौद्धधर्मप्रसारक... भाग-१
बौद्धधर्मप्रसारक... भाग-२
बौद्धधर्मप्रसारक... भाग-३
बौद्धधर्मप्रसारक... भाग-४
बौद्धधर्मप्रसारक... भाग-५
गुणवर्मन जावाबेटातून चीनमधे आले त्यानंतर अंदाजे चार वर्षांनी मध्य भारतातून गुणभद्राने चीनमधे पाऊल ठेवले. याचा जन्म एका ब्राह्मणकुटुंबात झाला होता. याने महायान पंथाचा इतका खोलवर अभ्यास केला होता की लोक त्याला ‘‘महायान’’ या टोपणनावानेच ओळखू लागले. याचा चीनमधे येण्याचा काळ चीनी ग्रंथात ४३५ असा नमूद केला आहे. याने आठ वर्षात ७८ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. दुर्दैवाने यातील फक्त २८ ग्रंथ वाचले व उरलेले काळाच्या ओघात नष्ट झाले. हा पंडित वयाच्या ७८ व्या वर्षी चीनेमधेच मृत्यु पावला. याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे. ही नावे मी देत आहे कारण पुढे कधी कोणाला ही नावे लागली तर ती एके ठिकाणी सापडावीत.
१ श्रीमालादेवीसिंहनाद
२ संधीनिर्मोचनसूत्र
३ रत्नकारंदकव्युहसूत्र
४ लंकावतातसूत्र
५ कर्माच्या आड येणारे अडथळे दूर कसे करावेत या संबंधी मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ..
एक लक्षात घ्यावे लागेल की हे सर्व पंडीत लहानपणापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सुरवातीस जरी पाठांतरावर भर असायचा तरी थोड्याच काळानंतर त्या सूत्रांचा त्यांनी सखोल अर्थ शोधला असणार. शिवाय नंतर संघात जी वादविवाद करण्याची एक विशिष्ट पद्धत होती/असते त्यामुळे या सर्व श्रमणांची मते चांगली ढवळून निघायची. शिवाय एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वसामान्य भिख्खू होते तसे अत्यंत बुद्धीमान श्रमणही होतेच. आणि जे ब्राह्मण पंडीत ज्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यांना सर्व ज्ञान कसे जतन करायचे याचे चांगलेच ज्ञान होते.
गुणभद्रानंतर चीनमधे आला चाऊ फा कीन. याचे भारतीय नाव माहीत नाही. याने सहा ग्रंथांचे भाषांतर केले पण ते नंतर कुठेही सापडले नाहीत ना त्यावरील टीका सापडली. एका ठिकाणी हे ग्रंथ ७३० साली नष्ट झाले अशी नोंद आढळते. या ७३० साली असे काय घडले होते की बरेच बौद्ध ग्रंथ या वर्षी नष्ट झाले असा उल्लेख आढळतो. यावर कोणीतरी संशोधन केले पाहिजे.
४८१ साली अजून एक भारतीय पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव धर्मजालायास्स. हाही मध्य भारतातून आला. याचे भाषांतरातील योगदान विशेष नाही. पण याने एका ग्रंथाचे भाषांतर केले त्याचे नाव आहे अमितार्थसूत्र.
यानंतर पाचव्या शतकातील शेवटचा पंडीत जो चीनमधे आला त्याचे नाव होते गुणवृद्धी. हाही मध्यभारतातून आला होता. याने तीन वर्षात तीन ग्रंथांचे सहा भागात भाषांतर केले. त्यातील दोनच आज माहीत आहेत. १ सुदत्तसूत्र २ एक सूत्र ज्यात शंभर सूत्रांचा तौलनिक अभ्यास केला आहे.
आपण प्रथम पाहिले की काश्मिर व आफगाणिस्थानमधून हे पंडीत जात होते.
(अफगाणिस्थानमधे काहीच काळापूर्वी जे मेस आयनाक नावाचे शहर सापडले त्याबद्दल वाचल्यावर पूर्ण अफगाणिस्थान हा कसा बौद्धधर्मिय होता आणि तेथे अमेक बौद्धमठ कसे होते याची कल्पना यावी. याबद्दल विकीवर माहिती उपलब्ध आहे. व त्यावर एक माहितीपटही आहे. तो जरुर बघावा.) नंतर मध्यभारतातून ते जाऊ लागले. आता याच्या पुढच्या काळात दक्षिण भारतातून काही पंडीत जाणार होते. पहिला होता धर्मरुची. यांनी कुमारजिवांना त्यांच्या कामात मदत केली आणि स्वत: दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ श्रद्धाबलधानावतार मुद्रा सूत्र आणि २ सर्व बुद्धविषय अवतार सूत्र.. हा मठांच्या नियमांचा तज्ञ होता. हे नियम चीनमधील इतर मठांतून शिकविण्यासाठी फिरताना हा चँगॲनमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाने त्याच्याबद्दल परत काहीही ऐकू आले नाही....
यानंतर मध्यभारतातून रत्नमती नावाचा पंडीत चीनमधे आला. याने तीन ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील एक होता, महायानोत्तरतंत्रशास्त्र. चीनमधील तांत्रिक पंथाचा हा पहिला उल्लेख आहे. याचा अर्थ हा चीनमधे येण्याआधी या शास्त्राचा चीनमधे चंचूप्रवेश झाला असणार. आपल्या प्रसिद्ध ह्युएनत्संगला या विषयात फार रस होता. याबरोबर धारिणींचा व तंत्रमंत्रांचा चीनीजनमानसात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही. याने भाषांतर केलेला दुसरा ग्रंथ होता सद्धर्मपुंडरिकसूत्र शास्त्र.
त्याच वर्षी अजून एक थोर भाषांतरकार चीनमधे आला. त्याचे नाव होते बोधीरुची. हा उत्तर भारतातून चीनला गेला असे म्हणतात. पण याने भाषांतरावर जास्त भर न देता धर्मप्रसाराच्या कामाला वाहून घेतले. तरीसुद्धा त्याने २७ वर्षात ३० भाषांतरे केली आणि त्यातील जवळजवळ सगळी आज उपलब्ध आहेत. अर्थात चीमनमधे. त्यातील काहींची नावे आहेत, १ लंकावतारासूत्र २ गयाशिर्ष ३ रत्नकुट ४ विद्यामात्रासिद्धिसूत्र ५ सताक्षरासूत्र.
५२४ साली बुद्धशांत नावाचा एक पंडीत चीनमधे आला त्याने चीनमधे अंदाजे २५ वर्षे व्यतीत केली असावीत असा अंदाज आहे. त्याने भाषांतर केलेले काही ग्रंथ आहेत, १ धशधर्मक २ अशोकदत्तव्याकरण ३ सिंहनाडीकासूत्र.. यानंतर प्राचीन नगरी बनारसमधून एक पंडीत चीनला गेला. त्याचे नाव होते गौतम प्राज्ञऋषी. याने तीन वर्षात १८ भाषांतरे केली. यातील बरीच ७३० सालापर्यंत उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे पण आता फक्त १३ ग्रंथांचाच उल्लेख सापडतो. त्याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे आहेत, १ व्यासपरीप्रिच्छा २ विमलदत्तापरिप्रिच्छा ३ एकश्लोकशास्त्र व चौथे अष्ठबुद्धकसूत्र.
त्या काळात राजा, राजापूत्र, राण्या, सरदार, श्रीमंत व्यापारी यांनी बौद्धधर्म स्विकारुन संघात प्रवेश घेतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आता राजाने राज्य कारभार सोडून संन्यास घ्यावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल कदाचित पण बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव प्रचंड होता याबद्दल दुमत असायचे कारण नाही. सर्वसंसार परित्याग करुन हे महान लोक सहजपणे श्रमण होत व धम्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत. याचे एक उदाहरण म्हणजे उद्यानच्या राजाच्या एका मुलाने सिंहासनाचा त्याग करुन संघाची वाट धरली होती. हे राज्य सध्याच्या गिलगिट भागात असावे. या राजपुत्राचे नाव होते उपशुन्य. त्याने नंतर चीनची वाट धरली. त्याने एकूण पाच ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील दोन आहेत, १ विमलकिर्तीनिर्देश २ सुविक्रांतविक्रमी सूत्र. याच भागातून अजून एक पंडीत चीनला गेला त्याचे नाव होते, विमोक्षप्रज्ञऋषी. हा कपिलवस्तूतील एका शाक्य कुटुंबातील होता. याने गौतमप्रज्ञऋषी नावाच्या दुसऱ्या एका महंताबरोबर पाच ग्रंथांवर काम केले. त्यातील दोन आहेत, १ विवादसमानशास्त्र २ त्रिपूर्णसूत्रोपदेश
सहावे शतक :
या काळात नरेंद्रयास, जिनगुप्त व त्यांचे आचार्य जिनयास्स व ज्ञानभद्र या महंतांनी चीनच्या बौद्धधर्मावर बराच प्रभाव टाकला. किंबहुना असे म्हणवे लागेल की जे काही बौद्धधर्माचे स्वरुप आज चीनमधे दिसते त्याचा पाया या महंतांनीच घातला. या काळात बौद्धधर्मप्रसारकांना चीनमधे फार छळ सहन करावा लागला. त्याकाळात चीनमधे अनेक घराणी विविध प्रदेशांवर राज्य करुन गेली. क्वचितच एखादे घराणे दीर्घकाळ राज्य करीत असे. धम्मद्वेष्टा राजा गादीवर आला की हे महंत अज्ञातवासात जात असत, लपून बसत व बौद्धधर्माचा पाठिराखा गादीवर आल्यावर परत आपले काम जोमात सुरु करीत.
यानंतर एक महत्वाचा महंत चीनमधे आला त्याचे नाव होते परमार्थ. या बौद्ध धर्मगुरुबद्दल बरीच माहिती चीनी ग्रंथात आढळते. हा नानजिंगला अंदाजे ५४८ साली आला. तो चीनमधे २१ वर्षे राहिला. तेवढ्या काळात त्याने एकूण ४० भाषांतरे केली. हा अंदाजे ५६९ साली मृत्यु पावला तेव्हा त्याचे वय होते ७१. भाषांतरामधे त्याचा क्रमांक चौथा लागतो. पहिले तीन आपण पाहिलेच आहेत. त्याने भाषांतरीत केलेल्या ग्रंथांवर प्रवचने दिली ती त्याच्या एका शिष्याने लिहून ठेवली. गंमत म्हणजे ती अस्सल चीनी भाषेत असल्यामुळे ती मूळ भाषांतरांपेक्षा मोठी झाली आहेत पण ती अचूक आहेत असे म्हणता येईल.
याचे अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे त्याने चीनी भाषिकांना समजेल अशी भाषा त्याच्या प्रवचनात व लेखनात वापरण्यास सुरुवात केली. त्याची काही उदाहरणे आपण नंतर वाचूयात. अगोदर तो कोण होता, कुठला होता हे आपण पाहू.
परमार्थ याचा एक लाडका चीनी शिष्य होता, ज्याचे नाव होते हुई-काई. याच्या भाच्याने परमार्थाचे एक चरित्र लिहिले होते. याच्यातून थोडीफार जी माहिती मिळते त्यातून हे स्पष्ट होते की हा चीनी नव्हता तर भारतीय होता. याचे पुर्वाश्रमीचे नाव होते कुलनाथ. याचा जन्म झाला होता मध्यभारतातील उज्जैनमधे. हा जन्माने ब्राह्मण असून त्याचे गोत्र भारद्वाज होते. त्या ग्रंथात लिहिले आहे की त्याची नितिमत्ता अत्यंत उंच दर्जाची होती. त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. साहित्य, जादू, चित्रकला व हस्तकलेमधे याने चांगले प्राविण्य मिळविले होते. परमार्थाने तारुण्यात काय केले याबद्दल कुठेही विशेष माहिती मिळत नाही. परंतू तो काळ त्याने निव्वळ अभ्यासात व्यतीत केला असावा. अनेक देश विदेशांचा प्रवास करीत त्याने फुनानमधे मुक्काम ठोकला. फुनान म्हणजे आत्ताचे दक्षिण व्हिएटनाम. (मेकाँग नदीचे खोरे) हा भाग त्याकाळात पूर्णपणे हिंदू होता. त्याकाळी चीनमधे राज्य करीत असलेल्या लिअँग घराण्याच्या वू नावाच्या राजाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अतोनात संपत्ती खर्च केली होती.
त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशोदेशीचे अनेक बुद्धिमान महंत तो स्वखर्चाने चीनला आणत असे. या सम्राटाला जन्म-मृत्युच्या चक्रात अडकण्याची प्रचंड भिती वाटत असे. महायानामधे यावर काहीतरी उपाय सापडेल या आशेने त्याने अशा महंतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच शोधात फुनानमधून त्याला हे रत्न हाती लागले. ही माहिती खरी असावी कारण हा ग्रंथ ५९७ साली लिहिण्यात आला होता म्हणजे परमार्थ चीनला आल्यानंतर जेमतेम साठ वर्षांनी. या लेखकाचे नाव होते पाओ-कुई. याचाही मृत्यु परमार्थाच्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी झाला. त्यामुळे या लेखकाने लिहिलेली ही माहिती बऱ्यापैकी विश्र्वसनीय आहे. अलिकडे सापडलेल्या काही ग्रंथात परमार्थच्या चीनच्या प्रवासाची माहिती आढळते. त्यात सम्राट वूने मगधाच्या दरबारात काही प्रतिनिधी सूत्रे व ग्रंथ मिळविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळेस त्या प्रतिनिधींची गाठ कुलनाथाशी पडली. त्याने प्रथम चीनला जाण्यास ठाम नकार दिला पण बऱ्याच प्रयत्नांनंतर तो त्याच्या एका शिष्याबरोबर चीनला जाण्यासाठी जहाजात चढला. त्या शिष्याचे नावही दिले आहे – गौतम. त्यावेळेस त्याने मगध सम्राटाकडून लाकडात कोरलेली बुद्धाचे एक प्रतिमा चीनी सम्राटासाठी बरोबर घेतली. असे म्हणतात या प्रतिमेची नक्कलच मग सर्वदूर बुद्धाचे चित्र म्हणून प्रसारीत झाली.
परमार्थ नान्हाईला २५ सप्टेंबर ५४४६ या दिवशी पोहोचला. नान्हाई म्हणजे हल्लीचे कॅन्टन किंवा ग्वाझाऊ. ज्याचा चिनी अर्थ आहे तांदूळाचे शहर. जेव्हा तो दरबारात पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वत: सम्राट पुढे आला. एवढेच नव्हे तर आपल्याला वाचून आश्र्चर्य वाटेल, सम्राटाने परमार्थाला साष्टांग नमस्कार घातला. सम्राटाचे वय त्यावेळेस होते ८५. असे आजवर चीनमधे कधीच घडले नव्हते. त्यानंतर सम्राटाने परमार्थाशी एका मठात (पाओ-युन) चर्चा केली. दुर्दैवाने परमार्थाला सम्राटाविरुद्ध चाललेल्या बंडाळीची कल्पना आली नाही. टोबा जमातीच्या हौ-चिंग नावाच्या एका नेत्याने सम्राटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या रणधुमाळीत सम्राट वूची उपासमार करुन त्याचे हत्या करण्यात आली. त्या अगोदर परमार्थाला जेमतेम दहा महिने राजाश्रय मिळाला असेल नसेल. त्याने नानकिंगमधून पळ काढला व तो नानकिंगच्या आग्नेय दिशेला १५०० मैलावर असलेल्या सिॲओ पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे फुचुन प्रांताचा अधिपती असलेल्या लु-युआन-चे नावाच्या सरदाराने त्याला आश्रय दिला. यानेही नुकताच बौद्धधर्म स्विकारला होता. तेथे राजाश्रय मिळाल्यावर परमार्थाने परत एकदा आपले भाषांतराचे काम सुरु केले. त्यावेळेस अशा धामधुमीच्या कालातही त्याच्या हाताखाली वीस तज्ञ काम करीत होते यावरुन या कामाचे महत्व लक्षात येते. दुर्दैवाने यातील बरेच ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाले आहेत.
ज्या बंडखोराने वू सम्राटाची हत्या केली होती, अनेक मठ उध्वस्त केले होते त्याला आता बौद्धजनांचा पाठिंबा आवश्यक वाटू लागला. बौद्ध जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्याला बौद्धधर्मियांमधे मान आहे अशा परमार्थाला राजधानीत येण्याचे आमंत्रण दिले. नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता. यात हाऊ-चिंगचा दुसराही एक उद्देश होता. परमार्थाला जवळ ठेवून त्याच्यावर लक्षही ठेवता येणार होते व बौद्धधर्माचा अभ्यास त्याच्या दरबारी चालू आहे असा देखावाही ऊभा करत येणार होता. असो. परमार्थ राजधानीत पोहोचला. चारवर्षापूर्वी त्याने याच दरबारात मानाने पाऊल ठेवले होते. चार महिने हाऊ चिंगच्या दरबारात स्थानबद्धतेत काढल्यावर परत एकदा सत्ताबदल व रक्तपात परमार्थास पाहण्यास मिळाला. त्यानंतर सम्राट युआनच्या काळात मात्र परमार्थाने शहाणपणा करुन दरबार सोडला व नानकिंग शहरात चेंग-कुआनच्या मठात आसरा घेतला. तेथे त्याने सुवर्णप्रभाससूत्राचे भाषांतर केले. नंतरच्या काळात त्याने चीनमधे बराच प्रवास केला. त्याचे वर्णन करणे शक्य आहे पण वाचकांना कदाचित ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे म्हणून ते येथे देत नाही. पण प्रवासात पाओशिएन मठात त्याने मैत्रेयसूत्राचे व अजून एका सूत्राचे भाषांतर केले. दहा वर्षे प्रवास केल्यानंतर परमार्थाला आता घरी जाण्याची ओढ लागली असावी.... त्याच्या चरित्रात लेखक लिहितो...
‘‘ बौद्धधर्माचा एवढा प्रचंड अभ्यास केल्यानंतर, त्याच्या प्रसारासाठी एवढी पायपीट व समुद्र पार केल्यानंतर हळुहळु त्याला उमगले की त्याला जे पाहिजे होते ते या शिकवणीत मिळत नाही. बौद्धधर्माची शिकवण अपूर्ण आहे हे उमगताच तो खचला. खिन्नतेने त्याच्या विचारांवर मात केली. त्याने लंकासुखाला (मलेशियाला) जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी व शिष्यांनी त्याला तेथेच राहाण्याचा इतका आग्रह केला की त्यांचे मन त्याला मोडवेना. त्याने जहाजात चढण्याचा निर्णय रद्द केला व परत एकदा भाषांतराच्या कामाला लागला.... चीन सोडण्याचा विचार नंतर त्याच्या मनात अजून एकदा आला व त्यावेळी तो एका छोट्या बोटीतून प्रवासाला लागलाही पण त्याच्या दुर्दैवाने ती बोट उलट फिरलेल्या वाऱ्यामुळे परत किनाऱ्याला लागली. शेवटी शेवटी तर या सगळ्याचा कंटाळा येऊन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कँटनच्या उत्तरेला असलेल्या पर्वतात तो आत्महत्या करण्यास गेला असता त्याचा एक शिष्य अभिकोषधर्मावर प्रवचन देत होता. त्याला हे कळल्यावर त्याने डोंगरात धाव घेतली. असे म्हणतात तेथे खरोखरच पाठ शिवणीचा खेळ झाला. त्या प्रांताच्या राज्याधिकाऱ्यानेही काही सैनिक पाठविले व स्वत: तेथे हजर झाला. त्याने तर त्याच्यापुढे चक्क लोटांगण घातले व शेवटी काही दिवसांनी परमार्थाची मानसिक स्थिती मूळपदावर आली. दुर्दैवाने या आलेल्या झटक्यानंतर त्याचा अत्यंत लाडका शिष्य, हुई-काई एका आजारात मृत्युमुखी पडला. तो धक्का सहन न होऊन परमार्थही आजारी पडला व त्या आजारपणातच त्याचा अंत झाला. तेव्हा त्याचे वय होते ७१. दिवस होता १२ फेब्रुवारी ५६९. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार कँटनच्या बाहेर उरकण्यात आला व तेथे एक त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्तूपही उभारण्यात आला...
परमार्थाचे चीनीबौद्धधर्मातील व चीनी बौद्धजिवनातील योगदान काय यावर आपण थोडीशी माहिती घेऊ.
चीनमधे सहाव्या शतकात बरीच जुनीपुराणी माहिती गोळा करुन ग्रंथ लिहिण्यात आले.. एकाचे नाव होते काओ-सेंग-शुआन..म्हणजे थोर बौद्ध भिख्खूंची चरित्रे. यात या महंतांच्या तत्वज्ञाची माहिती तर आहेच पण ते सामान्य माणूस म्हणून कसे होते याबद्दलही माहिती आहे. दुसरा होता सु-काओ-सेंग चुआन, हा या ग्रंथाचा दुसरा भाग होता. या दोन्ही ग्रंथांवर फ्रेंच तज्ञांनी अतोनात कष्ट घेऊन काम केले आहे. आज या महंत/पंडीतांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती या ग्रंथांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे बेतलेली आहे.
लिअँग आणि चेन घराण्याची सत्ता असताना जी काही राजकीय उलथापालथ झाली त्यात परमार्थाने उच्चवर्गातील चीनी बुद्धिवंतांना योगाचाराची दिक्षा दिली. त्यांच्यामधे योगाचाराची गोडी निर्माण केली. त्याचा प्रभाव पार ह्युएनत्संगपर्यंत टिकला. आपल्याला कल्पना असेलच ह्युएनत्संगने योगाचाराचे एक विद्यापीठच काढले होते. हिंदूंचा योगाभ्यास आणि बौद्धांचा योगाचारामधे बराच फरक आहे. पण योगाचाराचा पाया योगाभ्यासच आहे असे मला वाटते. कारण चौथ्या-पाचव्या शतकात दोन ब्राह्मण बंधूंनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यांचा योगाभ्यास झालेला असणार. त्यांची नावे होती आसंग व वसूबंधू. यातील वसूबंधू हा पहिला योगाचारी म्हणून ओळखला जातो. चीनला जाण्याआधी परमार्थावर या दोघांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला असणार. (परमार्थांचा जन्म वसूबंधू नंतर १५० वर्षांनी झाला) किंवा म्हणूनच त्याला योगाचारात रस निर्माण झाला असावा. शिवाय वल्लभींच्या राज्यात तोपर्यंत योगाचाराच्या एका विद्यापीठाची अगोदरच स्थापना झाली होती. आपल्याकडे परंपरा जपण्याची तेव्हाची पद्धत लक्षात घेता परमार्थावर वसूबंधूचा प्रभाव पडणे सहज शक्य आहे. एक लक्षात घेतले पाहिजे हे तिघेही योगाचारी होण्याआधी महायानी होतेच. परमार्थाला ‘जाणीवेतून केलेले कर्म आणि त्या दोन्हीचे अध्यात्मिक साक्षात्काराशी असलेले नाते’ याचे विश्र्लेषण करण्यात अत्यंत रस होता. तो विचारे, ‘‘जर मनुष्य स्वभाव मूळत: चांगला आहे व प्रत्येकजण अध्यात्मिक साक्षात्कारास पात्र आहे तर मग मनुष्यप्राणी यावर विश्र्वास का ठेवत नाही आणि साक्षात्कारी माणसांसारखे का वागत नाहीत?’’ महायनाच्या मुळापाशी हाच प्रश्र्न आहे आणि ज्यावर परमार्थाने आयुष्यभर विचार केला. शेवटी काय झाले हे आपण पाहिलेच आहे. योगाचारामुळे त्याच्यावर चीनमधे भरपूर टीकाही झाली पण शेवटी ताओवाद्यांना व कनफ्युशियस तत्वज्ञानी यांच्यावरही योगाचाराचा थोडासा का होईना प्रभाव पडलाच. हे यश परमार्थाचेच म्हणावे लागेल. हे तत्वज्ञान परदेशातील लोकांना सांगणे किती अवघड आहे हे आपणाला माहितच आहे. उदा. पाश्चिमात्य तत्वज्ञानात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे जो बघतो ते सब्जेक्ट आणि जे दिसते ते ऑब्जेक्ट. पण योगाचारामधे ग्राहक आणि ग्राह्य ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत आकलक आणि आकलन. तुम्ही एखादी वस्तू बघितलीत पण त्याचे आकलन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एखादा रंगांधळा लाल रंगाला करडा रंग म्हणतो तर तुम्ही लाल....मला हे थोडक्यात चांगले समजवून सांगता येणे अवघड आहे. पण हा सर्व चित्ताच्या पटलावरील प्रतिमांचा खेळ आहे असे योगाचारी त्या काळात मानत. उदा मी डोळे मिटले मग माझ्यापुरता समोरचा डोंगर अस्तित्वात नाही...इ.इ.इ. आत्ताचे माहीत नाही. त्यातही बराच बदल झालाच असेल. असो. तर असे हे तत्वज्ञान त्या धामधुमीच्या काळात चीनी बुद्धिमान लोकांना समजवून सांगणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करु शकतो. शिवाय हे सगळे चीनी भाषेत.
उज्जैनचा हा ब्राह्मण श्रमण होतो. धम्माचा अभ्यास करतो. त्यातूनही अवघड अशा योगाचाराचा अभ्यास करुन परदेशी जातो, व तेथे भव्य, दिव्य कार्य करतो...याचे काय स्मारक उज्जैन मधे आहे? त्याचे कोणी वंशज आहेत का? त्याच्या तारुण्यातील वर्षांचा हिशेब लागत नाही तो लागेल का ? असे अनेक प्रश्र्न माझ्या मनात येतात. मीही कल्पनेने त्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.....
यानंतर चीनमधे आला नरेंद्रयास्स.
नरेंद्रयास्स यांचे चरित्र आपल्याला चीनी सिऊ काओ सेंग त्सुआन या ग्रंथात वाचण्यास मिळते. हा उद्यानचा रहिवासी होता. याने भारतभर प्रवास केला होता. तो श्रीलंकेलाही जाऊन आला. त्यानंतर त्याने चीनला जाण्याचे ठरविले. पाच सहाय्यकांबरोबर त्याने हिंदूकुश पर्वत रांगा चढण्यास सुरुवात केली. लवकरव त्यांच्या समोर दोन रस्ते उभे ठाकले. एक रस्ता जो अत्यंत कठीण होता तो माणसांसाठी होता आणि जो सोपा होता त्यावर राक्षसांचा वास होता. म्हणजे बहुदा चोर, दरोडेखोरंच्या टोळ्या यांचा वास असावा. बरेच वाटसरू, व्यापारी सोपा मार्ग पकडत व लुटले जात किंवा मारले जात. या फाट्यावर एका राजाने वैश्रमणाचा एक भव्य पुतळा उभा केला होता. हा पुतळा ज्या दिशेला बोट दाखवित असे तो मार्ग बरोबर असा संकेत होता. यांच्याबरोबर जे श्रमण होते त्यातील एकाने नजरचुकीने चुकीचा मार्ग पकडला. अवलोकितेश्र्वराची प्रार्थना करुन जेव्हा त्याने त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत त्या रस्त्यावर सापडले. त्या काळात त्या भागात तूर्की वंशाच्या लोकांच्या चीनी लोकांशी चकमकी चालू होत्या. त्या संकटांवर मात करुन तो चीनच्या राजधानीत पोहोचला अंदाजे ५५६ मधे. त्यावेळेस त्याचे वय होते ४०. चीनमधे आल्यावर त्याने तिएन-पिंग मठात राहण्यास सुरुवात केली व अर्थातच भाषांतराचे काम हाती घेतले. असे कित्येक ग्रंथ अहेत जे भारतातून नष्ट झाले होते पण चीनमधे शाबूत होते. त्या चीनी ग्रंथांचे फ्रेंच अभ्यासकांनी फ्रेंच भाषेत भाषांतर केले जे परत संस्कृतमधे भाषांतरीत करण्यात आले आहेत. नरेंद्रयास्साने ज्या ग्रंथांचे भाषातर केले त्यातील काही – १ पो-सुकिएन चे सुन मेइ किंग २ युई त्संग किंग ३ युईतेंग सान मी किंग...व अजून चार आहेत. दुर्दैवाने तार्तार वंशीय चाऊ घराण्याची सत्ता आल्यावर हे सगळे चित्र पालटले. त्यावेळचा चाऊ राजा हा बुद्धाचा द्वेष करीत असे. सम्राट वौ’ने बुद्धधर्म चीनमधून हद्दपारच केला असे म्हणायला हरकत नाही. सगळे धर्मगुरु, श्रमण, पंडीत त्यामुळे अज्ञातवासात गेले किंवा परत आपल्या मूळस्थानी गेले. सुदैवाने त्यानंतर गादीवर आलेले सुई घराणे हे बौद्धधर्माचे आश्रयदाते असल्यामुळे परत एकदा धर्माने चीनमधे जोर धरला. परत आलेल्या श्रमणांनी आपल्याबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ आणले होते त्याचे भाषांतर करण्यासाठी नरेंद्रयस्साचे नाव पुढे आले. त्याला अज्ञातवासातून सन्मानाने परत राजधानीमधे बोलाविण्यात आले व नवीन ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी तीस श्रमणांना त्याच्या हाताखाली देण्यात आले. या सहाय्यकांच्या मदतीने त्याने तीन वर्षात आठ ग्रंथांचे भाषांतर केले. मी जेव्हा ग्रंथ म्हणतो तेव्हा पानांची संख्या हा आधार न धरता विषय हा आधार धरला आहे. काही शेकडो पानांचे असतील तर काही थोड्या पानांचे असावेत. या चमूने केलेले भाषांतर तेवढे समाधानकारक नसल्यामुळे अजून एका पंडीताला शोधून काढण्यात आले. हाही त्या काळात भूमिगत झाला होता. त्याचे नाव होते जिनगुप्त. त्यावेळेस नरेंद्रयास्स कुआन झी मठात रहात होता.
जिनगुप्त येईपर्यंत भाषांतराचे काम स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर चारच वर्षांनी या थोर माणसाचा मृत्यु झाला. थोर यासाठी की त्याने अत्यंत कठीण काळात बौद्धधर्माची पताका फडकत ठेवली होती. भुमिगत राहून एखाद्या क्रांतीकारकांसारखे त्याने श्रमणांचे जाळे विणले. त्याने हे जे मोठे काम केले त्यासाठी त्याच्या असमाधानकारक भाषांतराला क्षमा केली पाहिजे......
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
या लेखांमधे नावाची व काळाची गडबड उडाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया समजून घ्या.
प्रतिक्रिया
24 Sep 2016 - 1:23 am | एस
ज्या फ्रेंच अभ्यासकांमुळे हे आपल्याला माहीत झाले त्या अभ्यासकांना सलाम. लेख वाचून थक्क झालो आहे.
24 Sep 2016 - 9:29 am | प्रचेतस
अप्रतिम लेखन.
24 Sep 2016 - 10:00 am | यशोधरा
अतिशय सुरेख लेखन.
+१
25 Sep 2016 - 12:53 pm | अमितदादा
उत्तम. जर ह्या लेखमालेचा शेवटचा भाग सर्व भागांचा सार म्हणून दिला तर बरं होईल ( हि विनंती आहे, तुमचा तसा प्लॅन नसेल तर नाही दिला तरी चालेल), कारण साधकांची नावे, ग्रंथ, आणि काळ यांचा काही मला मेळ लागेना.
25 Sep 2016 - 2:28 pm | मारवा
_/\_
दंडवत स्वीकारावा.
26 Sep 2016 - 11:47 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
28 Sep 2016 - 5:10 pm | पैसा
एवढी चिनी भाषेत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध आहेत तर त्यांची मूळ किती संस्कृत्/पाली भाषेतील पुस्तके उपलब्ध असतील? का नालंदा तक्षशीला चा नाश आणि इतर आक्रमणात ती नाहिशी झाली?