फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.
असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.
अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.
" त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,
‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’
हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहीती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,
‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’
‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’
यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.
श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.
भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).
पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.
हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.
पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.
काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडीतांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.
त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती.
एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.
शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.
शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.
काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.
त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जिवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जिवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जिवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.....
काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली...
त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’...
दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे -
या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.
कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.
महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.
लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत... तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
25 Jul 2016 - 12:25 pm | खेडूत
सविस्तर माहिती देणारा लेख आवडला.
पुभाप्र.
25 Jul 2016 - 12:27 pm | पैसा
_/\_ अप्रतिम लेख. सुरेख सहज ओळख करून देता आहात. शेवटचे परिच्छेद फार विचार करण्याजोगे आहेत. सांस्कृतिक क्रांती आधीच्या संस्कृतीची तोडफोड केल्याशिवाय पुरती होतच नाही का?
25 Jul 2016 - 12:35 pm | कविता१९७८
मस्त माहीतीपुर्ण लेख ,
25 Jul 2016 - 12:38 pm | प्रचेतस
सुंदर लेख.
काश्यप मातंगाबद्दल अत्यल्प माहिती होती. ह्या लेखामुळे अगदी सविस्तर समजले.
कनिष्काने भरवलेली महापरिषद चौथी ना? पहिली परिषद बुद्धाचा शिष्य आनंद, दुसरी अजून कोणी आणि तिसरी अशोकाच्या काळात झाली होती.
25 Jul 2016 - 5:00 pm | जयंत कुलकर्णी
प्रचेतस,
दुरुस्ती केली आहे. धन्यवाद ! जरा डोक्यात सरमिसळ झाली होती.... :-)
25 Jul 2016 - 2:04 pm | एस
वाखुसाआ.
25 Jul 2016 - 2:14 pm | प्रीत-मोहर
नेहमीप्रमाणेच छान सांगताय.
पुभाप्र
25 Jul 2016 - 3:17 pm | अनिरुद्ध प्रभू
उत्तम लेख....
पुभाप्र...
25 Jul 2016 - 4:17 pm | यशोधरा
वा! सुरेख! वाखू साठवते.
25 Jul 2016 - 4:41 pm | सत्याचे प्रयोग
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
25 Jul 2016 - 4:47 pm | मितभाषी
लेख आवडला. अजून माहिती च्या प्रतिक्षेत.
बाकी "मातंग" चा आजचा अर्थ वेगळा आहे.
25 Jul 2016 - 5:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
नवी माहिती मिळाली. या आधी बोधिधर्म (नेमके नाव आठवत नाही) ह्यांच्याविषयी वाचले होते. पण ते मुख्यव्ते कलरीपायटम अन कुंगफुविषयी.
हे अन शाक्यमुनी वेगळे का?
25 Jul 2016 - 10:10 pm | अर्धवटराव
बस नाम हि काफि है.
अप्रतीम लेखमालेची अप्रतीम नांदी झाली आहे.
टिकुन राहिलेले ३ धर्म म्हणजे ताओ, कन्फ्युशिअस आणि बौद्ध धर्म काय? आज तर त्यातलं काहिच टिकुन नाहि चिनमधे असं ऐकतोय :(
26 Jul 2016 - 8:56 am | जयंत कुलकर्णी
अर्धवटराव,
तुमचा आयडी बदला राव. लिहिताना कसेतरीच वाटते. असो.
हे तिन्ही धर्म आजही चीन्मधे आहेत. खरे तर बौद्धधर्म तर आहेच पण इतर दोन चीनबाहेर पसरुन टिकून आहेत. मला असे म्हणायचे आहे की कम्युनिस्टांनी ज्या त्वेसाने या धर्मांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले, त्या मानाने तसे काहीच झाले नाही. उलट कम्युनिझम उतरणीला लागले, त्यांच्याच अनैसर्गिक तत्वज्ञानामुळे तर हे तीन अजुनही तग धरुन आहेत. मानवी मन अगाध आहे हेच खरं....
25 Jul 2016 - 11:38 pm | खटपट्या
फोटो दीसत नाहीत
25 Jul 2016 - 11:50 pm | अमितदादा
माहितीपूर्ण लेख ...
26 Jul 2016 - 9:47 am | गणामास्तर
जबरदस्त माहितीपूर्ण लेख. अफगाणिस्तान वगैरे भागात बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याच्या हकीगतीची आता उत्सुकता लागली आहे.
बाकी, श्वेताश्व मठाच्या लुटीचे वर्णन वाचून कसे तरीच वाटले.
सध्या चीन मध्ये धार्मिक बाबींत कितपत स्वातंत्र्य आहे अथवा ढवळाढवळ आहे याबद्दल कुणी सांगू शकेल काय?
26 Jul 2016 - 9:54 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
26 Jul 2016 - 2:43 pm | मारवा
राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले.
आपल्या म्हणण्यावरुन प्रथमदर्शनी असे दिसते की भिक्खुंना मांसभक्षण करण्यास परवानगी मुळात नव्हती.
मात्र राजकारण्यांनी संघाचे मूळ नियम मोडुन ती नंतर दिली.
मात्र स्वतः सिद्धार्थ गौतमबुद्ध यांचा मृत्यु त्यांच्या एका शिष्याच्या घरी त्याच्या आग्रहावरुन डुकराचे मांस खाण्याने वयाच्या ८१ व्या वर्षी (चुकभुल देणे घेणे ) व त्याने पोट बिघडल्याने झाला हा जो उल्लेख वाचण्यात आलेला आहे.
त्यावरुन काहीसे विसंगत वाटले. म्हणजे स्वतः मांसभक्षण करत होते मात्र भिक्खुंना नियम न खाण्याचा बुद्धांनी लावला होता असे काही विसंगत झाले का ?
दुसरी बाब असेही वाचण्यात आहे की स्वतः मरुन पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यात काहीही गैर नाही मात्र त्यासाठी हिंसा करु नये प्राण्याला स्वतःहुन मारु नये असा दंडक बुद्धांनी घातलेला होता. याच प्रभावातुन श्रीलंकेतील हॉटेल्स मध्ये
"येथे स्वतःहुन नैसर्गिक मृत्युने मेलेल्या प्राण्यांचेच मांस वाढण्यात येते" असे बोर्ड असतात असा उल्लेख वाचल्याचे स्मरते. ( हा त्या व्यावसायिकांचा बुद्धीस्ट ग्राहकांना गिल्ट फ्रि करण्याचा एक प्रकार असावा )
तर सत्य काय आहे जाणुन घेण्यास आवडेल.
की माझी बुद्धाच्या मृत्यु विषयक कारणाची माहीतीही चुकीची आहे कदाचित ?
26 Jul 2016 - 2:50 pm | जयंत कुलकर्णी
मारवाजी,
आपण म्हणता ते बरोबर आहे. बुद्धाचा मृत्यु तसाच काहीतरी झाला पण त्या मृत्युनंतर बौद्धधर्मात व संघात बरेच बदल झाले व संघाचे नियम कडक करण्यात आले. किंबहुना एका महा परिषदेच्यावेळी यावरुन वाद होऊन बौद्धधर्मात अनेक पंथ निर्माण झाले असा उल्लेख आढळतो. स्वतः बुद्ध स्त्रियांना संघात प्रवेश देण्याच्या विरुद्ध होता पण शेवटी त्यांना नंतर तो द्यावा लागला. हे आपले एक उदाहरण...
चुकभुल देणेघेणे !
26 Jul 2016 - 2:59 pm | अभ्या..
ओह्ह्ह्ह
जबरदस्त विषय घेऊन तेवढेच जबरदस्त लेखन झालंय जयंतराव.
अप्रतिम.
2 Aug 2016 - 11:53 am | म्हया बिलंदर
पुभाप्र...
4 Aug 2016 - 2:26 pm | सपे-पुणे-३०
छान ! अतिशय माहितीपूर्ण लेख.
18 Jan 2017 - 3:21 pm | मीधृवतारा
नक्कीच विचार करायला लावणारा लेख आहे