फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली.
उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम
__________________________________________________________________________
"सोड रे मला सामान बांधून आवरू दे पटापट", शाहिदा पदर सोडवत म्हणाली.
"मग सांग ना अम्मी ?? "
"नजमी आता ऐकलं नाहीस तर माझा मार खाशील".
"तर मग सांग ना अम्मी आपण कुठे चाललो आहोत ?"
"अरे बाबा, आपण पाकिस्तानला चाललो आहोत" शाहिदा ने उत्तर दिलं.
ते ऐकून नजमी मोठ्या-मोठ्याने ओरडायला लागला, ''हम पाकिस्तान जाएँगे, लेकर रहेंगे पाकिस्तान, पाकिस्तान जिन्दाबाद कायदे-आजम जिन्दाबाद!''
ते नारे देत असतानाच बाहेरून त्याचे अब्बा आले आणि त्याला नारे देताना पाहून ओरडून म्हणाले
"नजमी"....
बिचारा नजमी तो आवाज ऐकून गप्प होऊन एका कोपर्यात जाऊन बसला. पुढे सलीम शाहिदाला ओरडून म्हणाला, माहीत नाही या बायका कशा कामं करतात. तीन तासांपासून सामानाची आवराआवर करते आहे, पण अजून झालं नाही. एकतर आधीच उशिर झालाय, वरतुन हा नजमी 'पाकिस्तान जिंदाबाद' चे नारे देतोय. एखादया हिंदू किंवा शिखाने ऐकलं तर आपली प्रेत पण नाही पोचणार पाकिस्तानात.
सलीमला चिडलेला पाहून सलिम ची बहीण जुबैदा आणि बायको शाहिदा अजून लगबगीने सामान आवरायला लागल्या. काहीही मागे सोडायचं नव्हतं. शाहिदाला वाटत होतं ग्रामोफोन, मौल्यवान दागदागिने, जरीचे कपडे, लित्येक वर्षाच्या आठवणी जागवणारे फोटो, पुस्तके सगळं सगळं सोबत घ्यावं, पण सलीम पुन्हा चिडून म्हणाला, "आता सोड त्या ग्रामोफोन आणि फोटोना. जिवंत राहिलो तर पुन्हा बनवु". बारा वाजून गेले आहेत, रात्रीत आपण हिंदुस्थानची सीमा पार करायला हवी.
आणि शेवटी सव्वा बारा वाजता ते छोटंसं कुटुंब घोड्यांवर स्वार होवून हिंदुस्तान आपली मातृभूमी सोडून पाकिस्तान कडे....
वाटेवर सगळीकडे एकप्रकारचा गूढ अंधार भरून राहिला होता. गावातला चौकीदार आणि दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांचे आवाज सोडले तर प्रत्येक जण गाढ झोपेत होतं. त्याच वेळी सलीम, शाहिदा, जुबैदा, नजमी आणि त्यांचा नोकर अक्रम जड पावलांनी हिंदुस्तान सोडून दूर पाकिस्तानकडे चालले होते. आपल्या गावापासून दूर जाण्याच्या विचाराने अत्यंत अस्वस्थ होत, सलीम अत्यंत खचल्या मनाने पाऊल उचलत चालला होता.
अगदी त्याच वेळी त्याला हिंदुस्तानांतल्या स्वार्थी नेत्यांची आठवण झाली, जे देशाच्या सामान्य जनतेच्या भल्याच्या विचार सोडून फक्त आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते. त्याला मोठयाने ओरडावं वाटलं,
"ए हिंदुस्तानच्या हिंदू-मुसलमानांनो !!! या जमिनीवर ना पाकिस्तान होऊ देऊ नका ना खलिस्तान. या जमिनीवर एक असा देश बनवा, जिथे जातीय दंगली नसतील. प्रत्येक माणसाचा हृदय प्रेमाने ओतप्रेत भरलेले असेल. शेतकरी-कामगारांवर अत्याचार होणार नाहीत. आणि असं जरा होणार नसेल तर या देशात असा भयंकर प्रलय आणा ज्यात हि जमीन आणि इथले लोकं वाहून जातील नेहमी साठी, राहील तर फक्त तो हिमालय, त्याचं शिखर ज्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात धोक्याची सूचना लिहिली असेल :
"इथे कधीकाळी एक सुजलाम-सुफलाम देश वसायचा, ज्याला 'सोने कि चिडिया' म्हटलं जायचं, इथेच कधीकाळी जगाला शांतीचा विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे दूत जन्माला आले होते. पण इथला समाज, षंढ लोक अल्पसंख्यांक, निःशस्त्र लोकांना मारून, स्त्रियांचं पावित्र्य भंग करून स्वतःला बहादूर समजत होता. इथे दरवर्षी गाय आणि डुक्करांच्या नावावर दंगे होऊन हजारो लोकांचा बळी जायचा.
हा देश पाण्यात जायच्या आधी इथे काही कपटी राजकारणी जमात रहायची ज्यांच्या मुळे या देशाची फाळणी झाली. जिथे एकीकडे उंचच उंच महाल होते तर दुसरीकडे अंधाराने भरलेली झोपडी. आयुष्य तर होतं पण सडलेलं,कुजलेलं. इथल्या कवी-लेखकांना आपल्या देशाच्या विकासाबद्दल लिहिणं बहुदा अपमानकारक वाटत होतं. इथे कधीकाळी एक सुजलाम-सुफलाम देश वसायचा, ज्याला 'सोने कि चिडिया' म्हटलं जायचं."
आणि अचानक त्याच्या विचारांची तंद्री तुटली, त्याने समोर पाहिलं तर आगीमधे वेढलेलं अमृतसर शहर दिसत होतं. सारेच एकमेकांच्या जिवावर उठलेले, शहरातला प्रत्येक जण हर-हर महादेव, सत श्री अकाल आणि नारा-ए-तकबीर च्या गगन-भेदी नाऱ्यांसोबत एकमेकांना मारण्यात मग्न होता. स्त्रिया आणि लहान मुलांच्या दुर्दैवी किंकाळ्यांनी जणू पुढचे सारे आवाज बंद होऊन गेले होते. हे तेच अमृतसर शहर होतं जिथे कधीकाळी ईद आणि नानकपौर्णिमा एकसोबत मनवली जायची, इथेच ती पवित्र जालियनवाला बाग होती जिथे कधीकाळी हिंदू-मुसलमानांनी देशासाठी एकत्र होवून छातीवर गोळ्या झेलल्या. पण आज तिथेच स्त्रियांची अब्रू लुटण्यात धन्यता मानली जावून, सगळीकडे जणू रक्ताची होळी खेळली जात होती.
त्याची नजर शहराकडे लागलेली असतानाचा तिथे विस-पंचविस तलवारी आणी बंदुका घेतलेल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्यादेखत त्याची बहीण जुबैदावर बलात्कार करून तिचा जीव घेतला, एका वारात अक्रमला संपवलं आणि तलवारीने नजमी चे दोन तुकडे केले. त्यांनी सलीम आणी शाहिदाला जिवंत तर सोडलं पण त्यांच्यासाठी हे जीवन आता जणू नरकच होतं. सलीम तर फक्त जख्मी झाला होता, पण शाहिदा मुलाचं दुःख आणि आणि जखमा यामुळे जणू वेडीपिशी झाली होती. सलीमने तिला आधार दिला आणि ते दोघ पाकिस्तानकडे चालते झाले, पण शाहिदा पावलापावलांवर ओरडत असायची.
"मला सोडा. तो पहा.. माझा नजमी मला बोलावतो आहे. मी माझ्या नजमीकडे चालली."
त्याच वेळी सलीम भरल्या आवाजात तिची समजूत काढायचा, "नजमी कुठे आहे ? तो तर खुदाताला कडे पोहोचला आहे."
पण शाहिदावर त्याच्या गोष्टींचा काहीच फरक नव्हता. उलट ती अधिकच आवेशाने ओरडून म्हणायची, "मेला तर सलीम आहे. माझा नजमी माझ्याकडेच आहे, आता तो तरुण झाला आहे. तो पहा त्याच्या बायको सोबत येतोय तो. पण तुम्ही त्याला आता पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देण्यापासून नाही रोखू शकत. लेकरा मोठ्याने म्हण पाकिस्तान झिंदाबाद, कायदे-आझम झिंदाबाद!!"
त्याच वेळी सलीम ओरडला, "शाहिदा पटकन चल, ती पहा सरहद समोरच आहे. आता लौकरच सकाळ होईल तो पर्यंत आपण सरहद पार करून घेऊ".
पण शाहिदावर या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. ती म्हणाली," नाही नाही मी पाकिस्तानात नाही जाणार, तिथे धर्माच्या नावावर खून पाडले जातात, माणसाच्या रूपात लांडगे राहतात. मी तर हिंदुस्थानातच राहणार." आणि मग पुन्हा स्वतःउठून म्हणाली, " नाही नाही मी इथे नाही राहणार. इथे धोका आहे. मी पाकिस्तानात जाणार."
असं उलट सुलट बोलता बोलता ते एकदाचे सीमेजवळ पोहचले, पण तिथे तिची तब्बेत अजूनच खराब झाली आणि तिने सलीमच्या मांडीवर प्राण सोडला.
शहिदाच्या मृत्यूने सलीमच मानसिक संतुलन बिघडलं आणि तो पाकिस्तानचं दिशेने चालू लागला. पण... तो पाकिस्तान मध्ये गेलाच नाही. आजही तो एक हरबंस पुरा आणि अटारीच्या दरम्यान फिरताना दिसतो.
जेव्हा तो हरबंसपुर्यात पोचतो, तेव्हा म्हणतो "नाही नाही मी इथे नाही राहणार इथे बायकांची अब्रू लुटून धिंड काढली जाते. मुलांचा निर्दयपणे खूप पाडला जातो. मी इथे नाही राहू शकत. मी पाकिस्तान सोडून हिंदुस्तानात चाललो आहे.... ". असं बोलून तो हिंदुस्तानाकडे चालू लागायचा.
पण अटारीच्या थोडं पुढे गेल्यावर तो एक दगड उचलून छातीशी कवटाळायचा आणि म्हणायचा, " तू कुठे गेला होतास पोरा, चल तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो. आपण इथे नाही राहू शकत. हा हिंदुस्तान आहे, इथे राहणारे माणुसकीचा ढोल पिटून तिचाच खून करतात. स्त्रियांची अब्रू लुटणं इथे किरकोळ बाब आहे. ते घराची राख रांगोळी करतात, लहान मुलांना निर्दयीपणे गोळ्या घालून म्हणतात, 'हिन्दुस्तान जिन्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद'. जणू काही यांच्या म्हणण्याने पाकिस्तान मरणार आणि हिंदुस्तान जिवंत होणार आहे. "चल, तुझी आई तुला कधीची शोधते आहे",. असं म्हणून तो दगड घेऊन हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ पोचला खरा पण तिथे शाहिदा न दिसल्याने तो रडायला लागला आणि म्हणाला,
"न जाणे तुझी आई कुठे गेली, इथेच गेलो होतो मी तिला. पण तू घाबरू नकोस पोरा, इथे तुला कोणी म्हणणार कारण, हि हिंदुस्तान आणि पाकिस्तानची सरहद आहे.
इथे पोचल्यावर प्रत्येक माणसाच्या जीवात जीव येतो, इथे पोचल्यावर जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित होतात.
इथे हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या जिंदाबाद चे नारे देऊ शकतो.
इथे हिंदुस्तान आणि पाकिस्तान दोन्ही मुर्दाबाद म्हंटल जावू शकते. कारण, हि जागा हिंदुस्तान आणि पाकिस्तान च्या नेत्यांची जहागीर नाही..... हि हिंदुस्तान आणि पाकिस्तानची सरहद आहे. .... ! "
प्रतिक्रिया
27 Aug 2016 - 8:34 am | क्षमस्व
खूप छान लिहिलंय!
27 Aug 2016 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
भाऊ, तुमच्यात एक प्रचंड मोठा लेखक/अनुवादक लपलेला आहे हो! त्याला जोपासा, संगोपन करा त्याचे, त्याला मोठे करा , तुमचे शब्द वाचता वाचता मन कधी फाळणीकालीन सेपिया टोन मध्ये पोचले कळले ही नाही मला ! जियो और खूब लिखो जनाब
28 Aug 2016 - 10:03 pm | महासंग्राम
नक्कीच प्रयत्न करेन बापूसा !!!
27 Aug 2016 - 6:04 pm | अभिजीत अवलिया
आवडले लिखाण
27 Aug 2016 - 6:29 pm | यशोधरा
अनुवाद जमला आहे. हे सगळे वाचणेही अत्यंत त्रासदायक आहे..
27 Aug 2016 - 11:46 pm | बोका-ए-आझम
छुपे रुस्तम निघालात अगदी!
28 Aug 2016 - 10:02 pm | महासंग्राम
नाही नाही ... जसं जमतंय तसं करतो प्रयत्न
29 Aug 2016 - 8:55 am | नाखु
धूमाकूळ घालायचेच ठरवले आहे...
गुलजारांच्या लिखाणावर वाचलेला लेख आठवला.
संपुर्ण पुस्तक वाचायला घ्यायला अजूनही मन होत नाही,पण घ्यायला पाहिजेच असेही वाटते
नेमस्त अनुवाद
4 Dec 2016 - 10:55 pm | पैसा
अस्वस्थ करणारा अनुवाद!