बोट - शिक्षण

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
16 Jun 2016 - 3:05 pm

'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही.

तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग? अशा थापांना कोण भुलणार? स्वप्नवत गोष्टी खर्या नसतातच. म्हणून तर न आपण त्याला स्वप्नवत म्हणतो!

सतरा ते एकवीस वय, नो अभ्यास, नो परीक्षा, वर खिशात पैसे! म्हणजे मुलं बिघडण्याची गॅरंटीच! अगदी असा कोर्स असलाच तरी कोणता शहाणा बाप आपल्या पाल्याला असल्या टिनपाट कोर्सला पाठवेल?

पण आमच्या वडिलांनी (आप्पा – स्वीट टॉकरीणबाईंच्या ‘खरे सुपरमॅन – आमचे आप्पा’ या लेखातून तुम्ही आता त्यांना ओळखता) पाठवलं! याचं कारण हा कोर्स करून पुढे गेलेल्यांकडून या करियरबद्दल सगळी माहिती त्यांनी काढली होती. काय होता हा कोर्स?

फार वर्षं मरीन इंजिनियरिंग ट्रेनिंग उपेक्षित होतं. त्याला डिग्री तर नव्हतीच, डिप्लोमादेखील नव्हता. फक्त सर्टिफिकिट! खरं तर हे इंजिनियरिंग आहे हेच कुणाला पटलेलं नव्हतं. मरीन इंजिनियरिंगची खाजगी कॉलेजं सुरू होईपर्यंत संपूर्ण भारतात मरीन इंजिनियरिंगसाठी एकच सरकारी कॉलेज होतं. ‘लाल बहादुर शास्त्री कॉलेज’. ते ही अर्धं मुंबईला आणि अर्धं कलकत्त्याला. त्याला Directorate of Marine Engineering Training (DMET) असं ही म्हणत. त्यात वर्षाला जेमतेम शंभर इंजिनियर तयार व्हायचे. मग भारतीय नाविक कंपन्यांना ज्युनियर इंजिनियर मिळणार कुठून? त्यांच्या दबावाखाली सरकारने (म्हणजे Merchantile Marine Department, M.M.D., Govt of India) मोठ्या शिपयार्डना (मुंबईचं माझगाव डॉक, सिंदिया वर्कशॉप, कलकत्त्याचं गार्डन रीच वगैरे) शिकावू इंजिनियर (Apprentice Engineers) घ्यायला विनंती केली. त्यांना ही नवी जबाबदारी घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी क्लासरूम शिक्षणाला साफ नकार दिला. मग असा मध्यमार्ग निघाला की या शिपयार्डांनी एस् एस् सी नंतर चार वर्षांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं. पुस्तकी ज्ञान मुलांनी स्वतःचं स्वतः मिळवायचं. पुस्तकं इंग्लंडमध्ये छापलेली. या पुस्तकांना भारतात अजिबात खप नसल्यामुळे सबंद मुंबईत व्ही.टी. स्टेशनजवळ स्टर्लिंग बुक हाउस नावाच्या एकाच दुकानात आमची पुस्तकं मिळायची.

चार वर्ष संपली की M.M.D. एक परीक्षा घेणार. परीक्षेच्या पात्रतेसाठी चार वर्षांची हजेरी आणि या काळात काय काय प्रॅक्टिकल केलं त्याचा रिपोर्ट M.M.D. ला सादर करायचा. चार विषयांचे चार पेपर. पेपर फारसे अवघड नाहीत पण चार वर्षं अभ्यास न केल्यामुळे सगळेच ढेपाळलेले. साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच मुलं पास व्हायची. खरं तर प्रश्न फक्त ढेपाळल्याचा नव्हता. आमचं पुस्तकी ज्ञानाचं मुद्दलंच मुळात तोकडं होतं. माझ्या एका कोर्समित्राला (वर्गच नसल्यामुळे वर्गमित्र म्हणता येत नाही) असं वाटायचं की ०.१० म्हणजे ०.१ च्या दसपट!

त्याचं ज्ञान बघितलं आणि मी सुखावलो! बाकीचे मॅट्रिक झालेले आणि मी गणित घेऊन इंटर सायन्स झालेलो. त्या वासरात माझी लंगडी गाय म्हणजे साक्षात आल्बर्ट आइन्स्टाइनच होती!

इतकं सोपं होतं काय सगळं? तसं नाही. चार वर्षांच्या प्रॅक्टिकलनी आमची सालटीच काढली! चार वर्षं कामगारासारखं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार काम. वर्षाला सहा सार्वजनिक सुट्ट्या. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी वगैरे. कॅजुअल लीव्ह एकही नाही. वर्षात एकवीस दिवस प्रिव्हिलेज लीव्ह. अठ्ठेचाळीस महिन्यांचं ट्रेनिंग व्यवस्थित विभागलेलं. नऊ महिने फिटिंग शॉप, नऊ महिने बंदरात आलेल्या बोटींवर जाऊन प्रत्यक्ष दुरुस्ती, चार महिने डीजेल रिपेअर, चार महिने वेल्डिंग शॉप वगैरे वगैरे.

माझ्या मित्रांपैकी कोणी MBBS करत होता, कोणी आर्चिटेक्चर, कोणी बी. कॉमला. सगळ्यांच्या वर्गात चिकार मुली. आमच्या माझगाव डॉकमध्ये मात्र साडेपाच हजार पुरुष फक्त! मित्रांना भरपूर सुट्ट्या. मी मात्र रात्री त्यांच्याबरोबर जाग्रण करून सुद्धा सकाळी साडेपाचला उठून हार्बर लाईनची लोकल पकडून डॉकयार्डला रवाना! मुलं म्हटल्यावर आम्ही खोड्या काढणार हे तर सहाजिकच होतं. माझगाव डॉकमधली आमची टिपिकल शिक्षा म्हणजे “भिंतीपासून बरोब्बर सहा इंच दूर उभा रहा एक तास!” बरोब्बर सहा इंच म्हणजे कसे? तर सहा इंचाची पट्टी आपल्या नाकानी भिंतीला दाबून धरायची! थोड्या वेळातच नाक जाम दुखायला लागायचं. डोळे उघडे ठेवले तर अगदी नाकासमोरची भिंत बघून बघून डोकं ठणकायला लागायचं.

या उलट माझा हेवा वाटण्यासारखं आमच्याकडे खूपच होतं. घरून न घेता देखील खिशात थोडे पैसे खुळखुळंत असायचे, अभ्यास नाही, परीक्षा नाहीत, प्रोजेक्ट नाही, सबमिशन नाही, पिक्चरचं स्टॉलचं तिकीट अडीच रुपये असल्यामुळे एकही इंग्रजी चित्रपट चुकवावा लागला नाही, गर्ल फ्रेंड नसल्यामुळे नाजुक भावनांचा संपूर्ण अभाव, पाहिजे तेव्हां भेळ खायची, पंधरा दिवसात एकदा तरी बियर घ्यायची असं सुखी माणसाचा सदरा घातलेलं जीवन.

माझगाव डॉकमध्ये आम्ही अप्रेंटिस म्हणजे धोबी का कुत्ता. ना घर का न घाट का. आम्ही ना युनियनचे सभासद होतो, ना कोर्स सोडून जाण्याची शक्यता. कोणीही आम्हाला शिकवायच्या फंदात पडला नाही. भरपूर काम द्यायचे. ते करता करता शिकतील असं साधं गणित. पडलेलं काम करण्यावाचून दुसरा उपायच नव्हता. प्रत्येक शॉपमधले इंजिनियर खाष्ट सासूप्रमाणे आम्हाला जुंपायचे. हळुहळु ज्ञान मिळत गेलं. हाताला घट्टे पडले, बॉयलरसूटवर डाग आणि काळी नखं नॉर्मल वाटायला लागली. मित्राची चालू न होणारी स्कूटर, पाण्याच्या टाकीमधला नीट न चालणारा लेव्हल कंट्रोल वगैरे दुरुस्त्या सहज करता येऊ लागल्या.

“तुला चांगले मार्क असतात. तरी तू सर्टिफिकिट कोर्स का घेतलास?” या सोसायटीतल्या काका/काकूंच्या प्रश्नाला मी सुरवातीला मन लावून स्पष्टीकरण देत असे. मग लक्षात आलं की पालकांच्या डोक्यातून शिक्षण=डिग्री हे समीकरण काढणं अशक्य आहे. त्यामुळे पुढेपुढे मी वाट्टेल ती उत्तरं द्यायला लागलो. “परीक्षेला मी खिशात चिठ्ठ्या नेतो त्यामुळे मला चांगले मार्क पडतात” पासून “माझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्या वडिलांची शिपिंग कंपनी आहे आणि आमचं लग्न झाल्यावर ते ती कंपनी मला देणार आहेत.” पर्यंत काहीही! ह्याचा रिपोर्ट वडिलांकडे जायचा आणि माझं जाम बौद्धिक घेतलं जायचं.

चार वर्षांनी परीक्षा पार करून बोटीवर रुजू झालो आणि मला सुखद धक्काच बसला ! चीफ इंजिनियरच्या पदाला पोहोचेपर्यंत मशिनरीबद्दलची जी काय कामं इंजिनियरला करायला लागतात ती सगळी आम्ही माझगाव डॉकमध्ये चार वर्षात केली होती! ज्या शिक्षणपद्धतीला डिग्री किंवा डिप्लोमाचीही राजमान्यता नाही ती शिक्षणपद्धती प्रत्यक्षात किती परफेक्ट आहे याचा मला साक्षात्कार झाला.

मरीन इंजिनियरिंगचं शिक्षणामध्ये आणखी एक वेगळेपण आहे. बोटीवर प्रथम चढतेवेळी त्याने सगळ्यात कनिष्ठ अभियंत्याची परीक्षा दिलेली असते. चीफ इंजिनियरच्या हुद्द्यासाठी त्याला चार परीक्षा द्याव्या लागतात. प्रत्येक परीक्षा देण्यासाठी काही अटी आहेत. आधीची परीक्षा दिल्यानंतर त्याने अमुक हुद्यावर कमीत कमी इतके महिने काम केलेलं असलं पाहिजे. ती बोट ‘चालती’ पाहिजे. (नांगर टाकून बसलेली असता कामा नये.) त्याची अश्वशक्ती अमुकपेक्षा जास्त पाहिजे. त्यावर निदान अमुक मशिनरी असली पाहिजे. व्यसनांसंबंधी कारवाई त्याच्यावर झालेली असता कामा नये. वगैरे.

मी म्हटल्याप्रमाणे या चारही परीक्षांचा कुठल्याही युनिव्हर्सिटीशी संबंध नसल्यामुळे त्याला डिग्री, डिप्लोमा नव्हता. फक्त सर्टिफिकिट. मात्र या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फारच म्हणजे खरोखर फारच वंडरफुल! अभ्यासक्रम अतिशय अस्पष्ट. तरीही लेखी आणि तोंडी प्रश्न असे असायचे की ज्याने खरोखर बोटीवर कामात रस घेतला आहे त्याला सोडवता येतील. पण पासिंग सत्तर टक्क्यांना असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात थोडेच जण सुटायचे. दोन - तीन अटेम्प्ट्स हे नॉर्मल. काही जण वर्षानुवर्ष तिथेच घुटमळंत राहायचे. त्यांना आम्ही ‘दीपस्तंभ’ म्हणायचो. या परीक्षांमध्ये डिस्टिंक्शन, फर्स्ट/सेकंड क्लास वगैरे प्रकारंच नाहीत. पास किंवा फेल. बस्स्. (कॉम्प्यूटरचा शोध लागण्याच्या आधीपासून आम्ही बायनरी सिस्टिम वापरतोय.)

कालांतराने डिग्री असावी अशी मागणी जोर धरू लागली. डिग्री म्हटल्यावर महाविद्यालय आलंच. इंडियन मॅरिटाइम युनिवर्सिटी (IMU) नावाची युनिवर्सिटी केंद्र सरकारनी चेन्नईला स्थापन केली. (तेव्हांचा नौवहन मंत्री कुठल्या प्रदेशातला होता हे सांगणे न लगे.)

त्याच बरोबर सरकारने खाजगी कॉलेजांना हा डिग्री कोर्स चालवायला परवानगी दिली. खाजगी कॉलेजं दोन प्रकारची आहेत. काही माझ्या कॉलेजसारखी शिपिंग कंपन्यांनी चालवलेली आहेत. काही शिक्षणसम्राटांनी. दोघांची विचारसरणी थोडी वेगळी असू शकते. क्षितिजही वेगवेगळं असू शकतं. आमचा प्रत्येक विद्यार्थी पास झाल्यावर आमच्याच कंपनीच्या बोटीवर अधिकारी होतो. त्यामुळे ज्या मुलाला शिस्तीचं वावडं आहे, दारूची सवय आहे अथवा शिक्षणात रस नाही तो पुढे जाऊन बोटीवर लाखो डॉलरचं नुकसान करण्याआधीच तण बाजूला काढणं जरुरीचं असतं आणि मुख्य म्हणजे ते करता येतं.

डिग्री झाल्यामुळे कोर्सचा साचा आमूलाग्र बदलला. मुख्यत्वे प्रॅक्टिकल असलेला कोर्स आता मुख्यत्वे पुस्तकी झाला. आता गोचीच झाली. बोटीवर आम्हाला काम हातानीच करावं लागतं. या ग्रॅजुएट मुलांकडे भरपूर निरुपयोगी पुस्तकी ज्ञान आणि हाताला कौशल्य मात्र शून्य! पण जशी दिलेली पगारवाढ परत घेता येत नाही तसं आता डिग्रीकडून परत सर्टिफिकिटला आणणं अशक्य होतं. मग मध्यमार्ग काढण्यात आला.

डिग्री मिळण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने प्रत्यक्ष बोटीवर तरी apprenticeship करावी नाहीतर कॉलेजने आपल्या आवारात बोटीची इंजिन रूम बांधून त्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं. अशा बांधलेल्या इंजिनरूमला Ship-In-Campus (SIC) असं म्हणतात. दोन्ही पर्यायांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत. बोटीवर apprenticeship करायची म्हणजे शिपिंग कंपनीची हा खर्च करायची तयारी पाहिजे. एका व्यक्तीची रहाण्याची जागा, जेवण, विमानाचं तिकीट, व्हिसा, इन्शुरन्स वगैरे. कॉलेजमध्ये SIC बांधणं काही खायचं काम नाही. प्रचंड खर्चिक. कॉलेजांना कसं परवडणार?

काहींनी पहिला तर काहींनी दुसरा पर्याय निवडला. आता बर्यापैकी समतोल साधला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही.

मरीन कॉलेजं आणि शहरात दिसणार डिग्रीचं नॉर्मल कॉलेज यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सरकारनी मरीन कॉलेज कसं चालवलं गेलं पाहिजे याबाबतीत काटेकोर नियम घालून दिलेले आहेत.

या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना घरी राहायला परवानगी नाही. कॉलेजच्या होस्टेलमध्येच राहायला पाहिजे. त्यांचा दिनक्रम सकाळी साडेपाचला उठून कवायत, योगासनांपासून सुरू होतो तो रात्री साडेनऊला Lights Out पर्यंत. बारीक क्रू कट केलेले केस. घरचे कपडे वापरायचे नाहीत. तीनच प्रकारचे कपडे चालतात. युनिफॉर्म (पांढरे पॅण्ट-शर्ट, काळे बूट), किंवा बॉयलरसूट किंवा खेळायचे कपडे. शीख असल्यास दाढी ठेवलेली चालेल. बाकीच्यांनी रोज दाढी केली पाहिजे. रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत बाहेर जायला परवानगी. परत आल्यावर तोंडाला दारूचा वास आला तर alcholyser चाचणी केली जाते. पहिल्या वेळेस एक वर्षाचा सक्तीचा ड्रॉप. दुसर्यांदा झालं तर बाय बाय!

होस्टेलचे सगळे वॉर्डन हे भारतीय नौदलातून रिटायर झालेले आहेत. शिस्तीला कडक आणि कवायतीची आवड. आमच्याकडे क्लासला दांडी मारण्याचा प्रश्नच नाही. उशिरा आला किंवा होमवर्क केला नाही की लगेच करेक्शन! एक पाच मजली लोखंडी टॉवर आहे. त्यावर धावत चढउतार. काय निष्काळजीपणा केला आहे त्याबरहुकूम तीन पासून सात वेळांपर्यंत.

आमच्या कॉलेजमधलं Ship-In-Campus खासच आहे. असायलाच हवं. आमच्या कंपनीने ते बांधायला अठरा कोटी खर्च केले असं ऐकतो. खरंखोटं देव जाणे, पण भारतातलं सर्वोत्तम आहे हे खचितच. ज्यांचा Maritime Training शी संबंध येतो तो प्रत्येक मनुष्य आणि कित्येक शिपिंग कंपन्यांचे मालक हे बघायला कार्ल्याला येऊन गेले आहेत. उत्तम चालणारं मुख्य इंजिन, जनरेटर्स, बॉइलर्स, सुकाणू, एअर कंडिशनिंग प्लांट्स, हायड्रॉलिक मशिनरी, न्यूमॅटिक (हवेच्या दाबावर चालणारी) मशिनरी, कॉम्प्रेसर्स, इलेक्ट्रिक मोटर्स वगैरे. मुलं ही मशिनरी स्वतः चालवतात. याव्यतरिक्त भरपूर न चालू शकणारी मशिनरी आहे. त्यांचे भाग अन् भाग मुलं स्वतःच्या हातानी सुटे करतात आणि परत जोडतात, शिवाय वेगवेगळ्या अडचणींचा आभासी निर्माण करणारे महाग सिम्युलेटर्स आहेत.

इंजिनियरिंग सोडून बाकी बोटीवर उपयोगी पडणार्या कला देखील मुलं इथे शिकतात. अग्निशमन करायला, प्रथमोपचार द्यायला , वल्ह्यांची होडी चालवायला वगैरे.

जुनं ते सोनं असं आमच्या पिढीचे लोक प्रत्येक बाबतीत उगीचच म्हणतात. जर ते खरोखर सोनं असतं तर आपण ते का बरं सोडून दिलं असतं? त्याहून चांगलं काहीतरी दिसलं किंवा जे होतं ते असह्य झालं म्हणूनच ना आपण ते सोडलं? असो. विषयांतर नको.

आमच्या ट्रेनिंगच्या बाबतीत मात्र असं ठामपणे म्हणता येईल की आजचं शिक्षण पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी सुधारलं आहे. आणि आजही दिवसेन् दिवस त्यात सुधारणा देखील होत आहे.

तंत्रनोकरीशिक्षणलेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Jun 2016 - 3:16 pm | विजुभाऊ

सुंदर आणि उपयुक्त माहिती.
हा कोर्स दहावी नंतर आहे की बारावी नंतर?

छान माहिती. वेगळेच अनुभवविश्व खुले होते आहे.

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 3:25 pm | जव्हेरगंज

मस्त माहिती!

राजाभाउ's picture

16 Jun 2016 - 3:26 pm | राजाभाउ

मस्त !!!
तुमच्याकडे खरच अनुभवांचा खजीनाच आहे राव !!!

स्वप्निल रेडकर's picture

16 Jun 2016 - 3:31 pm | स्वप्निल रेडकर

खूप सुंदर लेख !या क्षेत्रात जायची इच्छा असलेल्या साठी मार्गदर्शक !!!

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2016 - 3:34 pm | टवाळ कार्टा

भन्नाट :)

खेडूत's picture

16 Jun 2016 - 3:52 pm | खेडूत

एका वेगळ्या करियर आणि विश्वाची छान माहिती!
नवमॅट्रिक मुलांनी आणि पालकांनी वाचावा असा झालाय.

नाखु's picture

16 Jun 2016 - 3:53 pm | नाखु

या क्षेत्रात जायची इच्छा असलेल्या साठी मार्गदर्शक !!!

कुठलीही भिती अथवा पुरवग्रह न ठेवता करता येईल असा एक चांगला व्यावसायीक अभ्यासक्रम.

पुभाप्र

मुक्त विहारि's picture

16 Jun 2016 - 4:01 pm | मुक्त विहारि

मस्त.

आदूबाळ's picture

16 Jun 2016 - 5:17 pm | आदूबाळ

जबरदस्त लेख.

अवांतर कुरकूर : गेल्यावर्षीच्या श्रीगणेश लेखमालेच्या वेळी कुठे होतात?

पद्मावति's picture

16 Jun 2016 - 5:27 pm | पद्मावति

मस्तं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2016 - 6:37 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपयुक्त माहितीचा लेख. धयवाद ! या व्यवसायशिक्षणाबद्दल पूर्ण अज्ञानी होतो, बहुतेक जणांची तीच स्थिती असावी.

यशोधरा's picture

17 Jun 2016 - 6:50 am | यशोधरा

मस्त लिहिलेय.

प्रचेतस's picture

17 Jun 2016 - 8:48 am | प्रचेतस

खूपच छान लिहिलंय.

स्वीट टॉकर's picture

17 Jun 2016 - 10:06 am | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद.

विजुभाऊ - दोन प्रकारचे आहेत. बारावी नंतर चार वर्ष, किंवा बी.ई. मेकॅनिकलनंतर एक वर्ष.

आदूबाळ - मला तर श्रीगणेश लेखमालेबद्दल काहीच वाचलेलं आठवत नाहिये.

आदूबाळ's picture

17 Jun 2016 - 12:15 pm | आदूबाळ
मुक्त विहारि's picture

17 Jun 2016 - 5:19 pm | मुक्त विहारि

बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन किंवा बी.ई. इलेक्ट्रिकल पण चालतात का?

स्नेहल महेश's picture

17 Jun 2016 - 2:01 pm | स्नेहल महेश

खूपच छान लिहिलंय.

गवि's picture

17 Jun 2016 - 2:36 pm | गवि

खास.. !!!

उत्कृष्ट. तुमचं व्यक्तिमत्व भारी आहे हे लेखनशैलीतून स्वच्छ दिसतं.

आणि असं व्यक्तिमत्व अशा भन्नाट अनुभवांतूनच बनतं.

केंट's picture

17 Jun 2016 - 3:40 pm | केंट

उत्कृष्ट

मोदक's picture

17 Jun 2016 - 5:29 pm | मोदक

सुंदर लेख..!!!!

अर्धवटराव's picture

17 Jun 2016 - 10:57 pm | अर्धवटराव

तुम्ही जबरी मास्तर आहात सर.

काहि प्रश्न...
आप्पांनी हा कोर्स तुमच्यासाठी का निवडला ? त्याकाळात आपल्या मुलाचं आणि त्याच्या भविष्याचं इतकं काटेकोर अ‍ॅनॅलिसीस करणं म्हणजे... व्हिजनरी आणि ज्यिनीयस __/\__

भारताला समुद्री व्यापाराची परंपरा आहेच, शिवाय इंग्रजी शासनात भारत संरक्षण आणि व्यापार, दोन्हि क्षेत्रात आधुनीक जगाशी परिचीत होताच. मग इतक्या महत्वाच्या क्षेत्राच्या शिक्षणाबाबत इंग्रजांनी कुठलीच व्यवस्था का केली नसावी? पंडीतजींच्या चौकस नजरेतुन सुद्धा हा विषय कसा काय निसटला?

गामा पैलवान's picture

17 Jun 2016 - 11:42 pm | गामा पैलवान

अर्धवटराव,

इंग्रजांनी देशी शिक्षणाची पार वाट लावली. ते राज्यकर्ते होते. त्यांनी कशाला नेटिव्हांना प्रशिक्षित करायचं?

नेहरूंनी ब्रिटीशांची परंपरा पुढे चालवली. म्हणून मी तरी भारत स्वतंत्र झाला असं मानंत नाही. गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

17 Jun 2016 - 11:24 pm | बोका-ए-आझम

माझ्या वडिलांनी ग्रेट ईस्टर्न शिपिंगच्या लोणावळा येथील प्रशिक्षण महाविद्यालयात शिकवलं होतं. तिथल्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या. त्या सर्वांना उजाळा मिळाला!

स्वीट टॉकर's picture

17 Jun 2016 - 11:50 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
पुन्हा धन्यवाद !

बी.ई. इलेक्ट्रिकलनंतर Electro Technical Officer (ETO) असा कोर्स आहे पण तो नुकताच सुरू झाला आहे. (दोन वर्षांपूर्वी.) त्यानंतर इलेक्ट्रिकल ऑफिसर बनता येतं पण नवीन असल्यामुळे त्याच्याबद्दल ग्वाही नीट देता येत नाही.

गवि - व्यक्तिमत्व भारी वगैरे काही नाही. मात्र ते भारी आहे असं लोकांना वाटावं असा प्रयत्न मी करंत असतो. तो काही प्रमाणात यशस्वी होतोय असं दिसतंय ! हॅ हॅ !!

अर्धवटराव - खरं तर तुमच्या कौतुकामुळे आज मला हा निर्णय कौतुकाचा वाटायला लागला. त्या वेळेस तो फक्त माझ्या क्षमतांबरहुकूम घेतलेला निर्णय होता. मी गणित सायन्स मध्ये बरा म्हटल्यावर इंजिनियर हे ओघानी आलंच. खेळात आणि हातानी काम करण्यातही बरा म्हणून मरीन इंजिनिअर. अगदी सरळसोट निर्णय तेव्हां आम्हाला सगळ्यांनाच वाटला होता.

आजही डिग्रीची जरूर त्या कोर्सला नाही. कारण थिअरिटिकल ज्ञान फारसं कामाला तिथे येत नाही.
पूर्वी बोटीवरच इंजिनरूममध्ये काम करणारे खलाशी आणि फिटर अमुक वर्षं अनुभव घेतल्यावर परीक्षा देवून मरीन इंजिनियर बनू शकंत होते. कॉलेज काढल्यानंतर ती पद्धत बंद करण्यात आली.

अभिजीत अवलिया's picture

19 Jun 2016 - 4:19 pm | अभिजीत अवलिया

छान माहिती.

अजया's picture

19 Jun 2016 - 5:34 pm | अजया

मस्तच लेख.रंजक आणि माहितीपूर्ण.

नमकिन's picture

19 Jun 2016 - 8:12 pm | नमकिन

खलाशी व फिटरवर अन्याय करणारा निर्णय आहे असे नाहीं का वाटत?

स्वीट टॉकर's picture

20 Jun 2016 - 2:41 pm | स्वीट टॉकर

शंकाच नाही. मात्र एकदा त्याला डिग्री द्यायची म्हटल्यावर यू जी सी च्या अटी पूर्ण केल्याच पाहिजेत.