'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?'
'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय. आधी खरे तर एखाद्याला मारताना दाखवत नव्हते. पण हळू हळू त्याची सुरूवात झाली. तेव्हा सिनेमात नुसते गोळी मारली किंवा चाकू खुपसला तरी पाहण्यार्या एखाद्याच्या तोंडून 'ईईईई' निघायचे, पण आता नेहमी खून, गोळ्या मारणे वगैरे पाहून त्याबाबत लोकांना बाबत जास्त काही वाटत नाही.
घरी चिकन करायचे म्हटले तर मी कोंबडी आणायला जातो तेव्हा त्यांना मारताना कधी पाहत नाही. फक्त ते तुकडे समोरच करून देतात ते दिसते. ह्यावरूनच 'बाकी शून्य' मधील जय सरदेसाईचा स्वत: कोंबडी कापण्याचा प्रकार आठवला. त्यालाही सुरूवातीला ते विचित्र वाटते, नंतर तो सराईताप्रमाणे ते करतो. त्याचप्रकारे मलाही बहुधा त्याची आता सवय झाली आहे. पण जेव्हा मी एखाद्याला
लहान मुलाला तिथे आणलेले पाहतो तेव्हा त्यांना लगेच सांगतो की लहान मुलांना तिथे आणू नका. ते आपण थोडं फार थांबवू शकतो पण टीव्हीवर जे सर्रास दाखवले जाते त्यावर अजून तरी जास्त काही थांबविणे होत नाही. दोन आठवड्यांपुर्वी एक मित्र आला होता माझ्या घरी, त्याच्या बायको आणि मुलासोबत. तेव्हा एका वाहिनीवर असेच काही तरी चालू होते, माझ्या लक्षात येऊन लगेच कार्टून चॅनल लावला. खरं तर त्यातही आजकाल काय दाखवतात मला माहित नाही. तरीही 'अभय सिनेमातील वाक्य आठवते, कमल हासन(अभय) ला कोणीतरी विचारतो की तुला हे लोकांना मारण्याचे प्रकार कसे सुचतात, त्यावर तो म्हणतो की 'कार्टून चॅनल मधून'. बापरे, म्हणजे मुलांची त्यातूनही सुटका नाही का?
मी वर म्हणालो की मला ही बहुधा त्याची सवय झाली असेल. कारण ३/४ वर्षापुर्वी AXN वर Fear Factor मध्ये एका मुलीला Bowling मध्ये १० पिन पडायच्या राहतात म्हणून तेवढेच म्हणजे १० जिवंत Beetles खायला सांगितले होते. तेव्हा तो प्रसंग पाहताना का माहित नाही पण मला मजा वाटली होती. :(
एक प्रश्न पडतो, मी मांसभक्षण करतो म्हणजे त्याबाबत संवेदनशील असणे विसंगत आहे का?
असो, टीव्ही वर तर आता सिनेमेच सोडा पण एखाद्या अतिरेक्यांशी एन्काऊंटरचे ही थेट प्रक्षेपण दाखवतात. अर्थात तिकडे प्रत्यक्षात काय होते हे दिसते, पण त्याचा वाईट परिणाम नको व्हायला.
त्यातल्या त्यात परवा जेव्हा दिल्ली मधील अतिरेक्यांच्या एन्काऊंटरचे थेट प्रक्षेपण दाखवले होते त्यानंतर एका वाहिनीवर, बहुधा IBN7 वर, एक रिपोर्टर सांगत होता की तिथे एका लहान मुलाने ते सर्व पाहिल्याच्या धक्क्यात होता. तर हा रिपोर्टर त्या मुलाला विचारत होता की 'उस बारे में कुछ बताओ'.
वरील सर्व आणि जर त्या ५/६ वर्षाच्या मुलाला त्या गोळीबाराबद्दल विचारले जात असेल तर आता वाटते की खरंच आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत का?
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 1:19 am | विसोबा खेचर
वरील सर्व आणि जर त्या ५/६ वर्षाच्या मुलाला त्या गोळीबाराबद्दल विचारले जात असेल तर आता वाटते की खरंच आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत का?
देवदत्तराव, स्फूट आवडले!
आपला,
(संवेदनशील) तात्या.
22 Sep 2008 - 6:49 am | प्राजु
संवेदना बोथट होत आहेत हेच खरे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 1:19 pm | प्रभाकर पेठकर
दूरदर्शन नव्याने सुरू झाले तेंव्हा एक विनोद वाचला होता. दूरदर्शनवर गाण्यांमधून अश्लिलता मुलांच्या नजरेस पडते असा एक जनमानसाचा कौल प्रसिद्ध झाला होता.
एका टीव्ही समोर एक लहान मुलगा एक लहान मुलगी गप्पा मारत बसलेली दाखविली होती. त्यातला मुलगा त्या मुलीला म्हणतोय, 'मिने, बंड्याची आई नं अगदी भोळी आहे. तिला अजूनही वाटतं की देवबाप्पाच मुल पोटात ठेवतो.'
मी स्वतः फर्स्ट इयरला असताना (१९७०) एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता. त्यातील चुंबन दृष्ये पाहून माझ्याच घशाला कोरड पडली.
पण माझा मुलगा 'बे-वॉच' सिरियल पाहात मोठा झाला. त्याचा निर्विकार चेहरा पाहून मला आश्चर्य वाटायचं.
आता टीव्ही वर काही कार्यक्रम पाहताना काही आक्षेपार्ह दृष्य आली (माझ्या दृष्टीने) आणि शेजारी माझा मुलगा बसलेला असला तरी त्याला किंवा मला ऑकवर्ड वाटत नाही. आमची दोघांचीही नजर बहुतेक मेली आहे.
पण हे अपरिहार्य, अनिवार्य आहे असे वाटते.
जेंव्हा मिडीया इतकी 'प्रगल्भ' नव्हती तेंव्हाही मुलभूत गरजा सहज पुरवल्या जायच्या. जसे पत्यांचे कॅट, मस्तरामची पुस्तके, भिंग असणारी की-चेन इ.इ.इ. त्यामुळे ह्या गोष्टींचा बाऊ करु नये.
बहुतेक कार्टून्स मध्ये हाणामारीच दाखविलेली असते. अगदी टॉम आणि जेरी काय आहे? तलवार, पिस्तूल, बाँब, रॉकेटचा सर्रास वापर असतो. इतरही अनेक कार्टून कॅरेक्टर्स आहेत (ज्यांची नांवेही मला ठावून नाहीत्) ती सर्व अनेक शस्त्रास्त्रांनी लोडेड दाखवतात. माझ्या भाचीचा मुलगा केजी टू मधे आहे. त्याच्या घरी गेल्यावर नेहमी तो माझ्यावर खेळण्यातले पिस्तूल रोखतो. तसेच आता मनगटी घड्याळातही काही शस्त्रे असतात असे मला नव्याने ज्ञान त्याने करून दिले आहे. क्रिश, स्पायडरमॅन, हनुमान (वुईथ गदा) अशा विविध रुपात मला भेटणे तो पसंद करतो. त्याच्या समाधानासाठी मला मार खाऊन मेल्याचे सोंग करावे लागते. पण कधी कधी मीही त्याला माझी मसल पॉवर दाखवून सांगतो की, 'मी आई देईल ते सर्व काही खातो, म्हणून माझ्याकडे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त ताकद आहे.'
ह्या वाक्याचा दोन दिवस फायदा होतो असे त्याची आई (माझी भाची) सांगत होती.
22 Sep 2008 - 8:11 pm | देवदत्त
हे अपरिहार्य आहे की नाही ह्या बाबतीत संभ्रमित आहे.
तसेच मी जे लहान मुलांना खाटकाच्या दुकानात नेले जाते ते लिहिले त्याबाबतीतही एक लक्षात आले की जरी आपण स्वतः नाही घेऊन गेलो तरी भरपूर मटणाच्या दुकानात बोकड कापून लटकविले असतात. ते येता जाता दिसतातच.
बाकी मुद्दे पटले. सभोवताली जे काही घडत असते त्याचा फरक पडत जातोच आपल्यात.
(मूळ लेखात मी Fear Factor ऐवजी चुकून Who Dares.. Wins लिहिले. तो बदल केला आहे.)
22 Sep 2008 - 8:22 pm | लिखाळ
स्फुट चांगले आहे. सरावाने आपल्या भावना बोथट होतात हे खरेच.
हे जसे दु:खाच्या बाबतीत आहे तसे आनंदाच्या सुद्धा.
>>मी मांसभक्षण करतो म्हणजे त्याबाबत संवेदनशील असणे विसंगत आहे का?<<
या बाबत मत तयार झाले नाही. हा प्रकार गुंतागुंतीचा आहे.
--लिखाळ.