राम राम मंडळी,
मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.)
"अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!"
असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले. आज माझा काय दुर्दैवी योग होता हे माहिती नाही, परंतु हा कार्यक्रम मी शेवटपर्यंत पाहिला आणि नंतर मला असा प्रश्न पडला की आज आपण नक्की काय पाहिलं?
नृत्याच्या स्पर्धा?, रडारडीचा तमाशा?, की लग्नाच्या बाजाराचा कौटुंबिक तमाशा? की स्टारप्लसने प्रेक्षकांना एखादं नाट्य दाखवून चुत्त्या बनवायचा केलेला प्रयत्न? (अर्थात, त्या प्रेक्षकात मीही आलोच!)
आता मंडळी, वास्तविक हा कार्यक्रम म्हणजे स्त्रीपुरुषांच्या एकूण सहा स्पर्धक जोड्यांचा सहभाग असलेली नृत्याची एक स्पर्धा होती. म्हणजे त्यात नक्की काय अपेक्षित असायला हवं हो? तर प्रत्येक जोडीने मंचावर यावं, काय ते नृत्य करून दाखवावं, आणि परिक्षकांनी त्यांना गुण द्यावेत व शेवटी कोण जिंकलं, कोण हारलं, पुढच्या राऊंड करता कोण टिकलं, कोण गळालं, हे जाहीर करावं. That's all! हो की नाही सांगा पाहू!
निदान माझ्या अल्पमतीला तरी कुठलीही स्पर्धा म्हटली की इतकाच अर्थ ठाऊक आहे! आणि स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. आणि अहो कला हा तर असा विषय आहे की त्यात प्रत्येक जण आयुष्यभर शिकतच असतो. तुम्हाआम्हा सर्वांना व्यापून टकणारा विषय आहे तो! अनंत आहे! कलेच्या अविष्कारात वेळेच्या घडीलाही महत्व असतं. एखादा स्पर्धक हारला म्हणजे तो कमी आहे आणि एखादा स्पर्धक जिंकला म्हणजे त्याचे हात त्या कलेत आभाळाला टेकले असंही समजण्याचं कारण नाही.
त्यामुळे जिंकलेल्या स्पर्धकाने अजून 'खूप काही बाकी आहे असं म्हणून हुरळून न जाता, व हारलेल्या स्पर्धकाने बेटर लक नेक्स्ट टाईम असं म्हणून अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत, साधना केली पाहिजे! निदान मला तरी यात कुठे गंभीर नाट्य, रडारड दिसत नाही. आपण जिंको किंवा हारो, कलेची साधना आयुष्यभर सुरूच ठेवली पाहिजे इतकी साधी खिलाडूवृत्ती ठेऊन कुठल्याही कलेकडे, स्पर्धेकडे पाहिले पाहिजे!
पण हे रिऍलिटी शोवाले याचा कसा तमाशा करतात, बाजार मांडतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा तो 'आजा माहिवे' चा कार्यक्रम!
आजच्या कार्यक्रमातले तमाशाचे दोन प्रसंग -
१) आज ज्या जोड्या नाचत होत्या, त्यापैकी एका जोडीचा नाच करून झाल्यावर त्यातल्या मुलीच्या घरचा एक कौटुंबिक तमाशाही दाखवण्यात आला. त्या जोडीतली जी मुलगी होती, ती म्हणे तिच्या बापसाला न सांगता त्या स्पर्धेला आली होती. त्यामुळे तिचा बाप तिच्यावर नाराज होता, त्याने मौनव्रत धारण केलं होतं. त्या मुलीची आयशी आज त्या कार्यक्रमाला आली होती. नाच झाल्यावर तिला सेटवर बोलावलं गेलं! मग "मम्मा, आय लव्ह यू.." असं म्हणून मायलेकी एकमेकींना मिठ्या मारून स्टेजवर रडल्या! वातावरण गंभीर. प्रेक्षक, परिक्षक सगळे गंभीर. प्रत्येकाचा गंभीर चेहेर्यावरून एकेकदा कॅमेरा फिरला. शिवाय त्या मुलीच्या बापसाला तो मुलगाही पसंत नव्हता म्हणे! मग त्या मुलाने आपल्या भावी सासूला जवळ घेऊन "मै जब कुछ बनके दिखाकर लायक बन जाउंगा तेव्हाच तुझ्या मुलीचा हात मागेन..!" असं म्हटल्यावर लगेच टाळ्यांचा कडकडाट. मगासचं गंभीर वातावरण आता निवळलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या चेहेर्यावर आता हास्य आणि समाधान आहे हे दाखवायला पुन्हा एकदा सर्वांच्या थोबाडाचा क्लोजप!
२) आजच्या स्पर्धकांपैकी एक जी जोडी होती, त्यातली मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्सुलमान! त्यामुळे त्यांचा नाच संपल्यावर हिंदूमुस्लिम प्रश्न, त्यांच्या घरचे रितीरिवाज, ती मुलगी त्या मुलाच्या घरी सूट होईल किंवा नाही, धर्म कुणाचा बदलणार? इत्यादी प्रश्न त्या स्टारप्लसच्या सेटच्या ऐरणीवर घेतले गेले! त्या मुलाचा थोरला भाऊ, त्याची वहिनी आणि दोन पुतणे इत्यादी मंडळींना सेटवर पाचारण करण्यात आलं. मग त्या थोरल्या भावाने आपला धाकट्या भावाच्या या आंतरधर्मीय लग्नास विरोध आहे असं ठासून सांगितलं. थोरल्या वहिनीने त्या मुलीला "तुझा धर्म वेगळा, रितिरिवाज वेगळे, तू आमच्या घरात सूट होणार नाहीस" असं सांगितलं! त्यानंतर त्या मुलीच्या घरच्या हिंदू मंडळींचा त्या लग्नाला विरोध आहे असं सांगणारं एक क्लिपिंग दाखवलं गेलं. मग परिक्षक मंडळींनी, 'ते दोघे जर एकमेकांवर प्यार करत असतील तर त्यांनी लग्न करणं कसं योग्य आहे, म्हटलं तर ते पळून जाऊनही लग्न करू शकतात!' असा सूर लावला! हे सगळं झाल्यावर मग त्या हिंदू मुलीने तिथेच गळा काढला. मग त्या थोरल्या वहिनीने त्या "जाऊ" म्हणून पसंत नसलेल्या मुलीस जवळ घेऊन तिचे सांत्वन केले!"
अरे हे नक्की चालू तरी काय आहे भांचोत? नृत्याची स्पर्धा आहे की तमाशा? पण चुकलो मंडळी! आज जी काही थेरं दाखवली गेली त्याला "तमाशा " असं संबोधणं हे योग्य होणर नाही. महाराष्ट्रातील एका पारंपारिक लोककलेचा तो अपमान होईल!
मग शेवटी निकाल!
पुन्हा एकदा वातावरण गंभीर अन् नाट्यमय. प्रेक्षकांचे, परिक्षकांचे चेहेरे चिंतातूर! सहा जोड्यांपैकी एक कुठलीतरी जोडी आज बाद होणार होती! आणि थोडा वेळ नाट्यपूर्ण पॉजेस आणि वेळ काढत शेवटी एकदा बाद जोडीचे नाव जाहीर झाले! इतर जोड्यांच्या आता एका डोळ्यात हासू अन् एकात आसू! हारलेल्या जोडीबद्दल सहनुभूती म्हणून परिक्षकही रडले, तिघा परिक्षकांनी एकमेकांना धीर दिला आणि सांत्वन केले!
आता शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. जी जोडी बाद झाली होती त्यातल्या मुलीला ती हार सहन न झाल्यामुळे सेटवरच चक्कर आली आणि ती खाली पडली. तिच्या जोडीदाराने तिला सावरलं, परिक्षक मंडळी तिच्या दिशेने धावली. जिंकलेल्या जोड्यांपैकी कुणीतरी एक जण बिसलेरी बाटली घेऊन धावला अन् मुर्छित मुलीच्या चेहेर्यावर त्यातले पाणी शिंपडले. शेवटच्या दृष्यात त्या मुलीला एका कारमध्ये बसवून ती कार कुठेशी रवाना झाल्याचे दाखवले अन् आजचा स्टारप्लसचा 'आजा माहिवे' चा एपिसोड संपला!
मंडळी, खरंच काय म्हणावं या बाजाराला? काय म्हणावं कलेच्या या व्यभिचाराला? नृत्यासारखी अवघड कला! ज्यात पं बिरजू महाराजांसारखी, पं दुर्गालालसारखी, आयुष्यभर खडतर साधना केलेली मंडळी आहेत त्या नृत्याच्या स्पर्धेच्या या बाजाराला म्हणावे तरी काय?
त्यापेक्षा काही वर्षांपूर्वी मुंबईच्या फोरासरोडवरच्या ज्या एका बाजारात एका देशीदारूच्या बारमध्ये मी नौकरीला होतो, तो बाजार कितीतरी बरा! काय ते पाचपंचवीस रुपये घेतले आणि आलेल्या गिर्हाईकासोबत झोपले. बात खतम! गिर्हाईकाच्या शरीराची आग विझली, बाईच्या पोटाची आग विझली! मॅटर एन्डस्! इतका स्वच्छ, अन् रोकडा बाजार होता तो..! कलेच्या नावावर रडारड, नाट्य, एसएमएसचे आर्थिक राजकारण, इत्यादी कलेचा व्यभिचार मांडणारा बाजार तरी नक्कीच नव्हता तो!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
21 Sep 2008 - 6:11 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी तर नादच सोडला आहे. एखादा कार्यक्रम आनंद देतो बा़की सगळा बाजार.
वि.प्र.
21 Sep 2008 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर
स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही.
त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात).
मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत.
अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.
21 Sep 2008 - 7:01 pm | सखाराम_गटणे™
निव्वळ फालतु पणा चालु आहे.
फुकट डोक्याला ताप आहे.
मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
(सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)
21 Sep 2008 - 8:25 pm | देवदत्त
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..'
मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत.
त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित.
आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.
21 Sep 2008 - 8:49 pm | सखाराम_गटणे™
त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित.
जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे.
आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय?
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
21 Sep 2008 - 9:15 pm | देवदत्त
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
=)) मला आधी वाटले प्रतिसादातच हे वाक्य आहे. तेव्हा कळलेच नव्हते.
21 Sep 2008 - 8:44 pm | यशोधरा
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(
21 Sep 2008 - 8:51 pm | रेवती
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे).
रेवती
21 Sep 2008 - 9:02 pm | सर्वसाक्षी
तात्या,
काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्या मुलाचे भांडवल करुन जाणार्या येणार्याला भावनाविवश करुन भीक मिळवतात.
आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात!
आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात.
स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत!
कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात!
लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.
21 Sep 2008 - 9:08 pm | सखाराम_गटणे™
>>लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.
बरोबर
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
21 Sep 2008 - 9:20 pm | प्रमोद देव
झुकानेवाला चाहिये....हेच खरे!
21 Sep 2008 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झुकानेवाला चाहिये....हेच खरे!
सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्यांनी नुसता वैताग आणला आहे.
सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.
21 Sep 2008 - 9:34 pm | रेवती
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच.
चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं.
रेवती
21 Sep 2008 - 9:58 pm | प्राजु
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्या लोकांच काम.
या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 1:15 am | अभिजीत
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत.
रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे.
माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल -
१. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) -
- 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे
२. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) -
- 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट'
३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे -
- 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. )
४. गेम्-शोज -
- ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत.
५. शौर्य, धाडस, भीती वगैरे -
- ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज'
६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम
- 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल!
जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की.
असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात -
१. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.)
२. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.)
पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'!
एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात.
कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते
22 Sep 2008 - 1:24 am | विसोबा खेचर
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते!
तात्या.