भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.
त्याचा आवाज कुठेही म्हणजे अगदी चालता चालता रस्त्यात जरी आला तरी पाउल पुढेच टाकवत नाही आणि तिथेच माझी तंद्री लागते मग बरोबर कोणीही असो…… मूड कुठचाही असो… तो बदलण्याचं सामर्थ्य फक्त ह्याच आवाजात ! आनंद, निराशा, उत्साह, वैश्विक सत्यकथन, वात्रटपणा वगैरे प्रकार ह्या आणि ह्याच स्वरात गोड लागतात…. तो गातो तेव्हा तो फक्त एकटा गात नसतो … त्याच्या आवाजात आपलंच मन गातंय असा अनेकदा भास होतो. काही आवाजच असतात असे… दैवी… आत खोल काळजात रुतून मनाचा ठाव घेणारे……
मला त्याची गाणी ऐकल्यानंतर वाटायचं की मला सुद्धा त्याच्यासारखं गाता यावं….किंबहुना मी जर गाऊ लागलो तर त्याच्यासारखाच गाईन असं नेहमी वाटायचं…पण अस्मादिकांचा आवाज म्हणजे (जाउदे, त्याविषयी न बोललेलंच बरं !) त्याकाळी म्हणजे साधारण १९९८-९९ साली सीडी, इन्टरनेट वगैरे गोष्टी इतक्या सर्रास उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्याची गाणी मिळवायची कुठून ? फक्त कसेट मिळायच्या, त्याही बऱ्यापैकी महाग होत्या. बाजारात शोधाशोध करून त्याच्या गाण्यांचं पुस्तक तर विकत आणलं आणि त्याची बरीचशी गाणी अक्षरशः पाठ केली. एक टेपरेकॉर्डर पण बाबांच्या मागे लागून विकत घेतला. गाणी तर पाठ झाली पण सुरांचं काय ? मला त्याच्यासारखं छान गाता यावं म्हणून मोठ्या आशेने एक संगीताचा क्लास सुरु केला (त्याने कुठलेही गाण्याचे शिक्षण घेतले नव्हते हे माहित असूनही !) पण गाणं काही जमेना… सूर आणि पेटी यांचा मिलाप काही केल्या होईना… पेटी वाजवली कि सूर विसरायचा आणि सूर धरला कि पेटी वाजवणं … अखेर त्या गुरूंनी माझा आणि मी गाणे शिकण्याचा नाद सोडला! प्राथमिक सारेगम झालं होतं फक्त पण त्याने काय होतंय ?
शेवटी मनात एक विचार आला की किशोरकुमारचा प्रत्यक्ष आवाज आपल्या बरोबर असताना आपण कशाला कुठे जाउन गाणं शिकायचं ? हे स्वरांच महाविद्यालय आपल्या बरोबर असताना कशाला कोणाची शिकवणी हवी आहे ? मी ठरवलं जितक्या जमतील तितक्या कसेट मिळवायच्या आणि त्यांच्या सुराबरोबरच आपला सूर मिसळायचा,मग काहीही होवो… झालं, साधना सुरु झाली. सुरुवातीला गाण्याबरोबर गाणं म्हणताना किशोरचे स्वर्गीय सूर आणि माझा गर्दभीय आवाज मिळून निराळं व्यंजन तयार व्हायचं … दिवस रात्र तहान भूक विसरून मी फक्त किशोरचीच गाणी म्हणत बसायचो … झपाटल्यासारखा रात्री अपरात्री उठून कधीही हा उद्योग सुरु करायचो… अनेकदा मला किशोरसारखं गाता येत नाही म्हणून अक्षरशः रडायचो सुद्धा, पण कुठे तो आणि कुठे मी ! सतत सराव करून करून माझा आवाज खरच हळूहळू बदलू लागला आणि सूर, ताल आणि लय यांचा थोडाफार अंदाज येऊ लागला. त्यानंतर घरात फक्त किशोर किशोर आणि किशोरच !! टेपरेकोर्ड ऐकून घरचे वैतागले आणि तो विकून टाकायची पण धमकी दिली मला … अगदी देवाच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहूनही माझं तेच चालू असायचं …. आईवडिलांना मी बहुतेक वाया जातोय वगैरे स्वप्नं पडायला लागली पण मी ठाम होतो. आणलेली कसेट मला व्यवस्थित तोंडपाठ झाली अगदी त्या गाण्यातल्या ठेहरावांसकट….असे अनेक महिने निघून गेले….माझे कॉलेजमधले कितीतरी मित्र अतिशय सुंदर गाणी म्हणायचे. मलाही कधीतरी तसं गाणं कॉलेजच्या कार्यक्रमात म्हणता यावं म्हणून माझा आटापिटा चालू होता.
अखेर सतत त्याच गोष्टीचा ध्यास घेतल्यामुळे मला किशोरची बहुतेक गाणी पाठ झाली पण मला गाणं येतंय की नाही हे कसं कळणार? कारण त्यात त्याचे स्वर आणि पार्श्वसंगीत एकत्रच होतं. दरम्यानच्या काळात कधीतरी मला "कराओके" या प्रकाराचा सुगावा लागला आणि अलीबाबाच्या गुहेत प्रवेश मिळाल्यासारख वाटलं. मग दिवस रात्र ती सीडी आणि मी …कुठेही जाणे नाही, येणे नाही, खाणे पिणे नाही …फक्त कराओके आणि मी, बस ! माझी भीड आवाज सुटल्यामुळे चेपू लागली आणि अखेर माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी किशोरची मनोमन आठवण काढून तोंड उघडलं आणि अहो आश्चर्यम …. ते गाणं चक्क जमलं की हो ! मग काय …. धमाल …. त्यानंतर पुढच्या पोस्ट ग्रजुएशनच्या दरवर्षीच्या कार्यक्रमात माझं गाणं ठरलेलंच. गम्मत म्हणजे तालमीच्या वेळेला न जमलेलं गाणं स्टेजवर मात्र चपखल जमून जायचं,कसं ते देवच जाणे !
आता मी ह्या प्रकाराला बराच सरावलो आहे.त्याच्यासारखं नाही तर निदान त्याची बरीचशी गाणी गाउन मला खूप बरं वाटतं. मला स्वतःला प्रचंड मानसिक शांतता मिळते ह्यातून…आज अजूनही कधी कंटाळा आला तर मी, करोके आणि गाणी आणि… दे धमाल ! एक मात्र नक्की की थोडाफार तानसेन व्हायला आधी उत्तम कानसेन असावंच लागतं. आता फक्त एकाच ध्यास आहे… "योडलिंग"चा … बघूया कसं आणि कधी जमतंय ते !
जय हो बाबा किशोर कुमारम !!
प्रतिक्रिया
29 May 2016 - 12:48 am | शि बि आय
वा..
गाते रहो...
29 May 2016 - 4:45 am | चांदणे संदीप
आयुष्यातला सगळ्यात आवडता विषय!! तासनतास बोलूही शकतो, मिपासर्वरची अर्धीआधिक जागाही खाऊ शकतो! ;)
"चारू चंद्र की चंचल चितवन" ऐकायला घेतलं की साक्षात किशोर कुमारच आपल्याला शिकवतोय असं वाटून जबरदस्त मूड होतो गाणं शिकण्याचा!
आणि लेखात आल्याप्रमाणे डिट्टो असंच केलय मीही लहानपणापासूनच, फक्त कराओकेचा शोध अजून लागायचाय. किशोरची खूप गाणी मी ऐकून ऐकून वहीत उतरून घेतली आणि पाठ केली. एकदा किशोरच्या गाण्यांपैकी इंस्पीरेशनल/मोटीव्हेशनल गाण्यांची यादी करायला बसलो होतो तर शंभर-सव्वाशेच्या पुढे गेलो नि थांबलो. ("तू पी और जी" हे गाणंही कदाचित कुणाला प्रेरणादायी वाटू शकत तो भाग वेगळा! ;) )कदाचित अजून खूपच पुढे जाता आलं असतं! हेच प्रेमगीतांबद्दल आणि उदास करून सोडणाऱ्या आर्त गाण्यांबद्दल!!
किशोरच्या गाण्यावर माझ्यामते मी सर्वात जास्त प्रेम करतो. खरंतर शब्दांत न सांगण्यासारखी गोष्ट आहे ही तरीही.... आयुष्याची संध्याकाळ जेव्हा कधी होईल तेव्हा ती फक्त आणि फक्त किशोरच्या गाण्यासोबत गुणगुणत निवांतपणे मावळली गेली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे!
किशोरची बहुतेक सगळ्या मूडवर गाणी आहेत. आणि एकटे असताना तर किशोरच्या गाण्यांशिवाय दुसरा खंबीर आधार नाही.
खडा, बुलंद पहाडी आवाज, कधी धीरगंभीर, तोच कधी मृदु मुलायमही होतो. मजा-मस्ती करत असतानाच कधी डोळ्यात पाणीही आणतो. काही गाणी तर फक्त आणि फक्त किशोरच म्हणू शकला असता अशी आहेत. ते यॉडलिंग वगैरे जरी पश्चिमेकडून उसणं आणलं असलं तरी त्याला इथल्या रंगात रंगवणं फक्त किशोरलाच जमल. म्हणजे बघा, तुमचे ते इतर गायकही करतात की यॉडलिंग, तर ते निव्वळ रस्त्याकडेच्या चायनिजच्या हातगाडीवर पाणी घालून मिळणाऱ्या टोमॅटो केचअप सारखं असतं!! दिसत तर लाल पण दुसऱ्या खाण्याच्या जिनसालाही बेचव करून सोडणारं!!
जास्त होतंय, थांबतो!!
बाकी, तुमच्या आवाजाची एक ऑडियो क्लिप टाकायला पाहिजे होती!
कट्टर किशोर फॅन
Sandy
तरी इतरांचीही आवडीने ऐकणारा
Sandy
(याला कट्टर म्हणावे का?)
29 May 2016 - 5:47 am | मुक्त विहारि
+ १
29 May 2016 - 6:31 pm | माम्लेदारचा पन्खा
ऑडिओ कुठून टाकणार.....!
29 May 2016 - 5:45 am | मुक्त विहारि
आणि
के. एस. सैगल, मुकेश, महंमद रफी...
ह्यांनी जे काही दिलंय आणि तृप्त केले आहे, ते इतर नाही देवू शकत.
29 May 2016 - 7:33 pm | भंकस बाबा
यात एक येसुदास देखिल जोडून घ्या
29 May 2016 - 8:42 am | स्पा
गाणे ऎकवा की नुसते कवतिक लिहिलेत, अम्हाला पण संधी द्या तुमचे कवतिक कराची ;)
29 May 2016 - 10:05 am | मुक्त विहारि
त्यामुळे किशोर कुमारचे "पिया पिया पिया" एखाद्याला प्रचंड आवडेल किंवा एखाद्याला आवडणार नाही.
29 May 2016 - 7:54 pm | संदीप डांगे
मला थेट किशोरच्याच आवाजात तशाच हरकती घेऊन गाता येते ह्या गोष्टीची जाणीव ज्या दिवशी (बारावीत असतांना) झाली त्यादिवसापासून अनेक दिवस हीच परिस्थिती होती माझी. जुने दिवस आठवले. सगळी गाणी मुखपाठ होती. घरच्यांना व शेजार्यांना त्रास होऊ नये म्हणून लांब मोकळ्या मैदानात जाऊन एकटाच रात्री-बेरात्री बेंबीच्या देठापासून 'दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नस नसमें' ओरडत फिरायचो. ;)
29 May 2016 - 8:06 pm | चांदणे संदीप
डांगेअण्णा द्या टाळी!
यानिमित्ताने किशोरफ्यांसने आपापल्या (कसल्याही) आवाजात किशोरचे गाणे म्हणून इथे टाकले तर?? कैशी हय आयड्या?
Sandy
29 May 2016 - 10:07 pm | संदीप डांगे
एक लंबर. गुरू हो जाओ शुरू. ;)
29 May 2016 - 11:52 pm | स्पा
आय एम इण
31 May 2016 - 12:06 pm | चांदणे संदीप
ऑडियो कुठून कसां अपलोडवायचा इथे? सम्बडी हेल्प!!
Sandy
31 May 2016 - 7:59 pm | आदूबाळ
"आ के सीधी लगी दिल पे ऐसे कटरिया..." हे हाफ तिकीटमधलं सेफ गाणं म्हणून उपक्रमास हातभार लावला जाईल.
1 Jun 2016 - 12:22 am | बोका-ए-आझम
हे गाणं मस्तच आहे. मी काॅलेजमध्ये असताना हे गाणं म्हटल्याबद्दल वट्ट १० रुपये बक्षीस मिळाले होते. (१९९३ साली.)
आ मै तेरी याद मे सबको भुला दूं
दुनिया को तेरी तसवीर बना दूं
मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दूं
दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नसनसमे!
ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे!
दिल क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाए!
जाने कहां जबराट किसीको किसीसे प्यार हो जाए!
उंची उंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे!
ना कुछ तेरे बसमे ज्यूली ना कुछ मेरे बसमे!
11 Jun 2016 - 3:49 pm | अभ्या..
हायला भारीच.
कधी पण हे गाणे लागले की माझ्याकडून "ना कुछ तेरे बस मे ज्युली, ना कुछ मेरे ट्रक मे" असेच म्हणले जाते हो. :(
.
एनीवे मी पण भारी गाणी म्हणतो हां, दुसरे कुणी असे म्हणत नाही ही गोष्ट वेगळी.
30 May 2016 - 3:03 am | अश्विनी वैद्य
किशोरदांचे गाणे म्हणजे अगदी चहा सारखे, कधीही, कुठेही तो आवाज कानांवर पडला की, मूड आपोआप तयार होतो… मनात एक तरतरी सहज उमटते…!
30 May 2016 - 8:51 am | नाखु
अष्टपैलु गायक:
देवानंदसाठी=त्याच्या सारखीच तब्येतीत छेडछाड
राजेशसाठी = याडलींग आणि लाडीकता
अमिताभसाठी = रांगडा आणि धुसमुसळा
धर्मेंद्र= गंभीरही/प्रेमळही
किशोरचा आवाज म्हणजे पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाएं जाय उसके जैसा !
किशोरभक्त नाखु
11 Jun 2016 - 3:44 pm | संदीप डांगे
बिनशर्त संपूर्ण सहमती.
30 May 2016 - 5:36 pm | ए ए वाघमारे
कराओकेचा शोध मलाही जरा उशीराच लागला. आम्ही त्याला पूर्वी 'ट्रॅक'वर गाणे म्हणत असू.नंतर त्यालाच कराओके म्हणतात असे कळले. पूर्वी ही वांजंत्रीवाल्यांची आणि ऑर्केस्ट्रावाल्यांची मक्तेदारी होती.आता फारच सोपे आहे. जे कराओके करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी माझी पद्धत खालीलप्रमाणे-
०१. यूट्यूबवर असंख्य हिंदी गाण्यांचे कराओके ट्रॅक्स उपलब्ध आहेत.काही विडीओत लिरिक्स सुद्धा असतात.यातही वाजवाणार्यांची क्वालिटी आहे. पण मला गाणी पाठ असल्याने मी विडीओ फक्त ऑडिओ फॉर्माटमध्ये उतरवतो. यासाठी तुम्ही ClipGrab हे फुकट सॉफ्टवेअर वापरू शकता.यात हव्या त्या फॉर्माटमध्ये व क्वालिटीने विडीओ उतरवता येतो.
०२. Audacity हे फुकट सॉफ्टवेअर व त्याचे MP3 प्लगइन उतरवून घेऊन इन्स्टाल करावे. हे रेकॉरडिंगचे फुकटातले (ओपन सोर्स) सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. यात आधी डाऊनलोड केलेला कराओके ट्रॅक इम्पोर्ट करावा आणि मग रेकॉर्डचे लाल बटन दाबून गाणे रेकॉर्ड करावे.यासाठी माइक-कम-स्पीकर असलेला साधा चॅटिंग करण्याचा हेडफोनही उपयुक्त ठरतो. थोडं अजून प्रो वाटण्यासाठी प्रोफेशनल माइकही घेऊ शकता. मात्र लॅपटॉपला (स्पीकर+ माईक) एकच कॉम्बो ऑडिओ पोर्ट असल्यास थोडी अडचण येवू शकते.
०३.बाकी Audacity त क्रिएटीव्हीटीला भरपूर वाव आहे. चांगले प्रोफेशनली रेकॉर्ड केलेले कराओके ट्रॅक मात्र विकतच घ्यावे लागतात.
31 May 2016 - 12:45 pm | सस्नेह
टाका इथे एक नमुना. इन मीना डीका...
हे कराओके काय प्रकरण आहे ?
31 May 2016 - 3:39 pm | तिमा
हे वापरताना एक गोष्ट लक्षांत घ्यायला हवी. तुम्ही कुठलंही गाणं, ओरिजिनल पट्टीत(पीच) गाऊ शकाल, असे नाही. ती पट्टी तुम्हाला उंच पडत असेल तर आधी ऑडोबी सारखे सॉफ्टवेअर वापरून पट्टी आपल्या आवाजाला योग्य अशी करुन घ्यावी व मग आपल्या नॅचरल आवाजात गावे. म्हणजे, घशावर ताण येणार नाही.
31 May 2016 - 3:54 pm | स्पा
+१
31 May 2016 - 7:57 pm | मी-सौरभ
ऐकायला सगळेच आवडतात.
मा पं : एकदा बसुया, तुम्ही गा आम्ही ऐकु (आनी खाऊ / पिऊ)
31 May 2016 - 7:59 pm | माम्लेदारचा पन्खा
सगळ्यांनाच ह्या धुमशानात सामिल होऊ देत की.... कराओके मात्र लागतील बरेच...
1 Jun 2016 - 12:15 am | बोका-ए-आझम
९१.९ एफ एम वर एक अप्रतिम कार्यक्रम असतो. सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ११. सुपुत्र अमितकुमार संचालन करतात. किशोरजींचे किस्से आणि गाणी. धमाल असते. जरुर ऐका.
बाकी काराओकेसाठी माझं आवडतं गाणं - मेरी प्यारी बिंदू.
त्यातली - मेरी जीवन की नैया बीच भंवरमे बुडबुड गोते खाये झटपट पार लगाले - ही ओळ म्हणजे कहर आहे!
1 Jun 2016 - 12:03 pm | समीरसूर
किशोर कुमारला आमचा सदैव दंडवतच आहे! महान गायक. त्याच्यासारखा गायक पुन्हा होणे नाही. अर्थात त्याकाळातल्या संगीतकारांनादेखील याचे श्रेय दिले गेले पाहिजे. आरडी नसता तर किशोरची कित्येक गाणी जन्मालाच आली नसती. आरडीने किशोरला जो न्याय दिलेला आहे तो इतर कुठलाच संगीतकार देऊ शकला नाही हे खरे!
नुकतेच एका घरगुती मैफिलीत किशोरचे "तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और जुबांपर आज दिल की बात आ गयी" हे गाणे (चित्रपट: कामचोर, संगीत: राजेश रोशन) म्हटले आणि सगळ्यांना बऱ्यापैकी आवडले. एकदम सोपे आणि मधुर चालीचे गाणे आहे हे. कॉलेजात असतांना "नीले नीले अंबरपर चांद जाब आये..." या गाण्यासाठी (चित्रपट: कलाकार, संगीत: कल्याणजी-आनंदजी) मित्र बराच आग्रह करायचे. खूप सुंदर गाणे!
गायला सोपी गाणी. चाली उडत्या.
महमान नजर की बन जा - पाताल भैरवी - बप्पी लाहिरी
एक एक हो जाये फिर घर चले जाना - गंगा जमुना सरस्वती - अनु मलिक
इंतेहा हो गयी - शराबी - बप्पी लाहिरी
जीवन के इस मोड पे - झूठा कहीं का - आरडी
1 Jun 2016 - 12:08 pm | स्पा
आपापल्या आवाजातली किशोर ची गाणी रेकोर्ड करून एकत्र संकलित करू इकडे मजा येईल
1 Jun 2016 - 12:45 pm | चांदणे संदीप
मी कधीचा आवरून बसलोय...कधी सुरू करायची पार्टी??
ते ऑडियो अपलोड करण्यासाठीही विचारले तर कुणी उत्तरच द्यायला तयार नाही राव! :(
Sandy
1 Jun 2016 - 12:47 pm | स्पा
:(
1 Jun 2016 - 12:51 pm | आदूबाळ
मीडियाफायरवर अपलोड करा नाहीतर सरळ तूनळीवर.
11 Jun 2016 - 3:41 pm | संदीप डांगे
सॅन्डीभाय, इथे अपलोड करा. https://soundcloud.com/
11 Jun 2016 - 6:38 pm | टवाळ कार्टा
हायला मापं छुपेरुस्तुम निघाले
4 Aug 2016 - 1:41 pm | माम्लेदारचा पन्खा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
4 Aug 2016 - 4:48 pm | मी कोण
नमस्कार मंडळी,
मी आताच मिपाशी नवीन जोडला गेलो आहे.सुरुवातच माझ्या आवड्त्या कीशोरबद्द्ल लिहीण्यापासुन झाली तुम्हा सर्वांमुळेच.
मेरे दिल के तार छेङ दिये आपने. मी किशोरची अनेक गाणी लुपमध्ये टाकुन रीपीट करुन ऐकत असतो.त्याचे "जिंदगी का सफर है ये कैसा सफर?" या गाण्यात जिंदगीची सच्चाइ आहे जी अनेक पिढ्या कायम रहाणार आहे.
5 Aug 2016 - 8:34 pm | बाजीगर
तुमचा हा विनय आहे कि स्स्वता:कडे कमीपणा घेता.पण एवढे झपाटून जाण्यातचं तुमचं असामान्यत्व दिसतयं. किशोरदा होतेचं तसे.एका आयुष्यात ते चार आयुष्य जगले.करा तुमची गाणी अपलोड.तुमच्च्याकडे स्स्टाईल आहे.लिहीत रहा.गातरहा.