सैराट - अफाट स्टोरी टेलींग

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
14 May 2016 - 12:41 pm

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने 'स्टोरी टेलींग' साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम 'स्टोरी टेलींग' साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

'नीयो-रियालिझम' ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या .हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय ;) )

कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. .सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

हे ठिकाणकलामौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलं लिहिलंय....आवडलं.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

14 May 2016 - 12:58 pm | मुक्त विहारि

ह्या निमित्ताने "सोत्रि" लिहिते झाले...

"सोत्रि" भाऊ, आता चावडीवरच्या गप्पा हाणायला नेहेमी आले तर उत्तम.

बादवे,

परीक्षण आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"सोत्रि" भाऊ, आता चावडीवरच्या गप्पा हाणायला नेहेमी आले तर उत्तम.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

14 May 2016 - 1:28 pm | चांदणे संदीप

लेख टेलींग!

बाकी सोत्री, आत्ताच तुमच्या बटाट्याच्या चाळीत आलोय. खोली नंबर काय आहे तुमचा?

Sandy

कंजूस's picture

14 May 2016 - 1:59 pm | कंजूस

सुन्न .

चाणक्य's picture

14 May 2016 - 2:05 pm | चाणक्य

ब-याच दिवसांनी बरक वाटलं. लेखाबद्दल सहमत.

सैराट बद्दल अगदी खरं सांगायचं तर, कळत नाहीये सैराट अजून आवडलाय का नाही ते. माझ्यासाठी मुख्य कारणं, संथ सेकंड हाफ आणि ज्या प्रकारे सिनेमाचा शेवट केलाय तो. शेवट भयानक अंगावर आला. बेकारच. मला माहिती होता शेवट तरीही अंगावर आला. पहिली रिअॅक्शन मनात आली, की ईतकंही काही वाईट दाखवायची गरज नव्हती. हाच शेवट जरा वेगळ्या पद्धतीने दाखवता आला असता. पण आता वाटतंय की मग त्याचा ईतका ईंपॅक्ट पडला असता का. माहीत नाही. जर तर च्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. हॅप्पी एंडींग तर विशेष पटलं नसतंच. पण सिनेमा बघितल्यानंतर दोन दिवसांनी कोल्हापूरचं मागच्या वर्षीचं आॅनर किलींग प्रकरण, जे खरं तर विसरूनही गेलो होतो मी, जालावर परत एकदा वाचण्यात आलं आणि जाणवलं की सिनेमाचा शेवट मनात घर करून गेलाय पण तो ख-या आयुष्यातही कुणाच्या तरी बाबतीत घडलाय ते लक्षातही नव्हतं आपल्या.
सैराटची स्टोरी तसं म्हणायला गेलं काही नविन नाहीये. पण सादरीकरण ?....बाॅस, नागराजची स्टाईल फार म्हणजे फारच वास्तववादी आहे. सिनेमॅटीक लिबर्टी वगैरे काही प्रकार नाही. जे काही आहे ते गरागरा कॅमेरा फिरवून समोर मांडतो. कुठेही 'बघा आपल्या देशात कसं होतं , किंवा बघा कसा अन्याय होतोय' टाईप प्रकार दाखवण्याचा प्रयत्न नाही, कसलाही संदेश वगैरे नाही, सोत्रि लेखात म्हणाले तसं काही प्रश्न वगैरे मांडतोय असा आवेश नाही, उत्तरं तर त्याहून नाहीत. फँड्रीमधे हे जास्त जाणवलं होतं. मला कुठलाही सिनेमा दोनदा बघायला जमत नाही. नागराजसारख्या लोकांचा मात्र परत परत बघतो. कारण पहिल्या झटक्यात सगळं डीटेलिंग माझ्या लक्षात येत नाही. ते ईतकं वास्तववादी आहे की बघताना मला पटकन जाणवत नाही. उदा. फँड्री मधे जब्या अन त्याचं कुटुंब डुक्कर बांधून नेतात तेव्हा बॅकग्राऊंडला असणारी शाळेची भिंत आणि त्यावरची फुले, आंबेडकरांची चित्रं. या लोकांनी ईतक्या वर्षांपूर्वी ज्यासाठी जिवाचं रान केलं त्याची त्यांच्याच राज्यात आज काय अवस्था आहे हे कुठल्याही संवादाशिवाय केवळ कॅमे-याच्या माध्यमातून नागराजने दाखवतो. आता हे काही आपल्याला ठाऊक नाहिये का ? ठाऊक आहे. शाळागळती वगैरे बद्दल वाचत असतोच की आपण. पण तरीही हा विरोधाभास कॅमेरा प्रभावीपणे टिपतो आणि ठसवतो. मला पहिल्या झटक्यात नव्हतं समजलं. तसंच भल्यामोठ्या माळरानावर जब्या अन् पि-याचं चिमणी शोधत भटकणं, त्याचं गावाबाहेर असलेलं घर, शालीला लिहीलेल्या पत्रात स्वतःचं पूर्ण नाव लिहीणं, वर्गातला अभंग वगैरे दृष्ये संवादाशिवाय बरच काही सांगून जातात. पहिल्यांदा बघताना एका झटक्यात नाही कळल्या मला या गोष्टी. फँड्रीचा शेवट पण पहिल्या झटक्यात कळलाच नाही (खोटं का बोला) नंतर झेपला. फँड्री बघून झाल्यावर मला साधारण असं फिलींग आलं होतं की आपण कामानिमित्त या गावात काही महिने रहायला आलोय. तिथलं सगळं रोज पहातोय. आणि मग आपलं काम झाल्यावर बदली होऊन परत आपल्या नेहमीच्या मुक्कामी आलोय. जे काय घडतंय ते फक्त बघितलंय. नक्की प्रश्न काय किंवा उत्तरं काय हे डोक्यात तयार नाही. हा नागराजच्या कॅमे-याचा परिणाम आहे. कॅमेरा.....मला वाटतं नागराजचं माध्यम आहे कॅमेरा. आपल्या डोळ्यांना दिसत नसलेल्या किंवा सतत दिसत असलेल्या गोष्टी नागराजचा कॅमेरा आपल्या समोर अश्या काही मांडतो की बास. फँड्री हळूहळू भिनत गेला. सैराटचं पण तसंच होईल असं वाटतंय.
मी नागराज भक्त नाही पण या दोन कलाकृती तरी जोरकस दिल्या आहेत नागराजने (पिस्तुल्या बघायचीये) आणि त्यावरून तरी साॅलिड दिग्दर्शक वाटतोय. पुढचं पुढे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला. पिस्तुल्या खुप दिवसापासून शोधतोय. मिळाला तर मला सेंडवा.
नागराज मंजुळे, पुढेही हटके चित्रपट देणार, यात काही वाद नाही.

काल पासून नागराज मंजुळेच्या कौटुंबिक गोष्टींची चर्चा होत आहे.
कसंही करुन नागराज मंजुळेला डिस्टर्ब करण्याचा हा प्रयत्न आहे.

-दिलीप बिरुटे

परीक्षण आणि प्रतिसाद दोन्ही खास!

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2016 - 2:05 pm | कानडाऊ योगेशु

दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता.

कदाचित तर चित्रपट इतका अपील झाला नसता. पण जो शेवट दाखवला आहे तशी केस १००० तुन एखादी होत असावी.जर गोड शेवट दाखवला असता तर तो कदाचित जास्त वास्तवदर्शी वाटला असता.पण मग चित्रपटाचा इम्पॅक्ट राहीला नसता.(इथे शोले मधे बच्चन मरतो ह्या शेवटाची आठवण झाली.)

चाणक्य's picture

14 May 2016 - 2:11 pm | चाणक्य

नीयो-रियालिझम' ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या .हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय

याच्याशी प्रचंड सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2016 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोर्ब्स मासिक’नेही ‘सैराट’ची दखल घेतल्यामुळे ‘सैराट’च्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवल्याचे बोलले जात आहे. ( बातमी सौजन्य : दै. लोकसत्ता )

-दिलीप बिरुटे
(मिपा सैराट फ्यान क्लब सदस्य)

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2016 - 9:22 am | श्रीरंग_जोशी

सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिपावरचा सैराटबाबत प्रकाशित झालेल्या लेखांपैकी मी वाचलेला हा पहिलाच लेख. या चित्रपटाबाबत तुम्ही मांडलेले विचार आवडले. नागराज मंजुळेंचे यापूर्वीचे चित्रपट हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता आहे. आमच्या सुदैवाने स्थानिक महाराष्ट्र मंडळाने ५ जून रोजी या चित्रपटाचा खेळ आयोजित केला आहे.

धनावडे's picture

16 May 2016 - 12:47 am | धनावडे

आजच तिसऱ्यांदा बघितला

खटपट्या's picture

16 May 2016 - 2:48 am | खटपट्या

आवडला लेख...

रायनची आई's picture

16 May 2016 - 5:03 pm | रायनची आई

मी पण शनिवारीच पाहिला हा चित्रपट..खूप वर्षानी मराठी पिक्चर पाहिला.खूप आवडला.अस्वस्थ व्हायला झाल पिक्चर पाहून.रात्री झोपेत पण त्यातले सीन्स डोळ्यासमोर येत होते.