मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जे न देखे रवी...
15 Apr 2016 - 6:56 am

कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे. मूळ कवितेचा दुवा इथे आणि अदम गोंडवी साहेबांबद्दल विस्तृत माहिती इथे.

--------------------------------------------------------------------

मी चांभारगल्लीपर्यंत घेऊन चलतो तुम्हाला

या, अंगावर घ्या ह्या भाजत्या उन्हाला
मी चांभारगल्लीपर्यंत घेऊन चलतो तुम्हाला

ज्या गल्लीत उपासमारीच्या छळाला कंटाळून
मेली ती फुलाबाई बिचारी विहीरीत उडी टाकून

आहे डोक्यावर नीट धरुन काटक्याची मोळी
येत आहे समोरुन ती पोरगी तुक्याची भोळी

चालते अशी की छंद वृत्तांना देते दिशा
मी म्हणतो हिला शरयूपारची मोनालिसा

कशी भयभीत आहे ही हरीणी घाबरलेली
भासते कळी जणू वेलीवरची कुरतडलेली

कालपर्यंत तर बडबडी होती आज कशी शांत आहे
माहित आहे का कोण ह्या मौनाच्या कारणांत आहे

होते ते पावसाळी दिवस तुक्या होता बाजारहाटा
झोपली होती म्हातारी टाकून ओसरीत खाटा

मावळत्या सूर्याची किरणे उतरत होती बांधावरुन
चार्‍याचा भारा घेऊन ती येत होती शेतावरुन

येत होती ती चालत मग्न आपल्या विचारात
काय माहित तिला, आहे कोणी लांडगा पवित्र्यात

दैवगतीपासून अजाण कृष्णा अजाणत्या रस्त्यांमधे
वळणावर फिरता तोच कळले आहे अनोळखी हातांमधे

किंकाळी मारलीही पण ओंठातच मिटून राहिली
धडपडली आधी मग थकली मग पडून राहिली

सुर्यकिरणे नदीवर खेळत होती, केव्हाची मावळून गेली
वासनांच्या अंध ज्वाळांमधे तिची शुचिता जळून गेली

आणि त्या दिवशी हा वाडा हसत होता खुशीत
शुद्ध आली तेव्हा कृष्णा होती बापाच्या कुशीत

जमला जमाव असला घनघोर महापूर होता
जो असो तो आपलेच ऐकवण्या आतुर होता

पुढारुन मंगलने विचारले काका असा मौन का
विचार पोरीला अखेर तो नराधम कोण होता

असो संघर्ष कोणताही आम्ही मागे फिरणार नाही
कच्चंच खावून टाकू जीवंत त्यांना सोडणार नाही

दैवगती असे म्हणून कसे काय आम्ही हे टाळावे
आणि त्या हराम्यांनी मायबहीणींना विटाळावे

म्हटले कृष्णाला ताई झोप मी म्हणतो म्हणून
बचाव शक्य नाही त्या पाप्याचा माझ्यापासून

झुळूक ह्या वार्‍याची पोचली ठाकुरांच्या दारी
ते सगळे जमले होते आले सरपंच्याच्या घरी

डोळे आहेत रोखलेले भाल्याच्या लांबट पात्यावर
बघा सुखराज सिंग बोलले खर्रा ठोकून हातावर

काय सांगू सरपंचभाऊ काय दिवस आलेत बघा
कालपतुर जे पायाखाली ते साहेब झालेत बघा

म्हणते सरकार की आपसात मिळून मिसळून राहा
डुक्करांच्या पिल्लांना आता गुलाम नाही हरिजन बोला

हेच बघा ना ही कृष्णा आहे ना चांभारांमधे
पडला शिंपल्यातला मोती कसा गावंढळांमधे

जशी पावसाळी नदी अल्लड नशेत धुंद आहे
हाथ ठेवू देत नाही कुल्ह्यांवर गर्व प्रचंड आहे

पाठवत पण नाही सासरला हिला हा तुका
मग धरले मिठीत कोणी तर काय त्या चुका

आज शरयुपलिकडे आपल्या श्यामला धडकली
कळत नकळत तीनेही जीवनाची मजा चाखली

ते तर मंगल ने बघितले म्हणून बाहेर फुटले
नाहीतर त्या मरतुकडीने काहीच नसते म्हटले

आपल्याला तर माहित आहे मंगलच एक कपटी आहे
त्याच्या बळावर पोलिसांत जाण्याची तुक्याची युक्ती आहे

उद्या सकाळी जर बाप लेकाच्या हाताला बेडी पाहील
गावाच्या गल्लीबोळांतून तुमची इभ्रत काय राहील

बोलण्याचा ढंग असा की तावात सगळे आले
हवा गरम झाली मिशांवर हात फिरते झाले

क्षणिक आवेशाच्या त्या गरमीत प्रत्येक तरूण आंधळाच होता
हो, पण विधात्याने लिहिलेला खेळ मात्र काही वेगळाच होता

रात्रीला न आलेलं ते वादळ, आता घोंगाळलं होतं
सकाळ होता होता तिथलं दृश्य ओंगाळलं होतं

डोक्यावर टोपी वेताची लाठी धरलेली हाताशी
एक डझन शिपाई होते ठाकुरांच्या दिमतीशी

घेरलेले वस्तीला बोलला फौजदार ताठ्यात
"कोण आहे मंगल, बाहेर निघ ये पुढ्यात"

निघाला मंगल झोपडीची पाल थोडी उघडून
एका शिपायाने तेव्हाच हाणली लाठी धरुन

खाली पडला मंगल तर कपाळ बुटावर आपटले
ऐकु आले मग, "त्या चोरीच्या मालाचे काय केले"

"कसली चोरी, माल कोणता" त्याने जसे हे म्हटले
एक लाठी आणखी पडली बस भान असे गळपाटले

शुद्ध हरपून तो पडला जसा झोपडीच्या दारावर
ओरडून मग निरिक्षक कडाडला त्या ठाकुरांवर

"काय बघताय माझ्या थोबाडाकडं! थुंका ह्याच्या तोंडावर
पेटवून आणा काहीतरी आणि टाका ह्या झोपडीवर "

आणि मग सूडाची वावटळ तिथे वळवळू लागली
असहाय दुर्बलांची झोपडी जळू लागली

लहानगं बाळ व म्हातारा जो अजुन तिकडे अडकला होता
तो अभागी जीव आता हिंसक गर्दीत सापडला होता

घरटे जळतांना बघून ती त्राण जाऊन पडू लागली
काही मनातल्या मनात मात्र काही जोराने रडू लागली

"सांगा ह्या कुत्र्याच्या पिल्लांना की भाव खाऊ नका
माझ्या हुकुमाशिवाय इथून कुणी कोठेही जाऊ नका"

हे निरिक्षक साहेब होते ओठांतून शब्दफुलं टपकवत
फिरत होते लोकांना आपल्या दंडुक्याने फटकवत

मग कडाडले, "ह्यांना दंडुक्यांनीच सुधारला पाहिजे
ठाकुरांशी ठणकेल जो कोणी त्याला मारला पाहिजे"

एक शिपाई बोलला, "सायकल कुठे ओढून नेऊ
शुद्धीत आला नाही मंगल म्हणाल तर सोडून देऊ"

बोलला ठाणेदार, "पोपटासारखा नको बोंबलून
शुद्धीत नाही आला तर लाठ्यांवर घे करकचून

हे समजतात की ठाकुरांशी भिडणे हातावरचा मळ
अशा हलकटांना, घर नको, पुरे तुरुंगातला खळ"

विचारत असतात मला लोक नेहमीच हा सवाल
"कसाय सांगाना शरयुपारच्या कृष्णाचा हालहवाल"

त्यांच्या उत्सुकतेला शहरी नग्नतेच्या तापांना
सडत चाललेल्या लोकतंत्राच्या कपटी दलालांना

धर्म संस्कृती आणि नैतिकतेच्या ठेकेदारांना
राज्याच्या मंत्रीमंडळाला केंद्राच्या सरकारांना

मी निमंत्रण देत आहे - या माझ्या गावात
नदीच्या किनार्‍यांवर घनघोर आमराईच्या छायेत

गाव जिथे आज पांचाली नागडी केली जात आहे
किंवा अहिंसेची जिथे नथ उतरवली जात आहे

तडफडतात कितीतरी मंगल ढुंगण झाकायच्या कापडासाठी
विकतात शरीर कितीतरी कॄष्णा भाकरीच्या तुकड्यासाठी

____________________________________________

कवितेत काही शब्द बदलून घेतले आहेत, कथन प्रवाही ठेवण्यासाठी अगदी शब्दशः भाषांतर टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

वाङ्मयकवितासमाज

प्रतिक्रिया

नाना स्कॉच's picture

15 Apr 2016 - 8:04 am | नाना स्कॉच

कानसुलं गरम केलीत हो तजो!! असलं काहीतरी नका पोस्टत जाऊ साहेब :'(

म्हणूनच तर फुलनदेवी पैदा होतात!...

आणि महाराष्ट्राने स्वतःला जास्त पुरोगामीही समजू नये. इथेही कमीजास्त प्रमाणात हेच सुरू आहे! :-(

आणि महाराष्ट्राने स्वतःला जास्त पुरोगामीही समजू नये. इथेही कमीजास्त प्रमाणात हेच सुरू आहे! :-(

+1

जयंत कुलकर्णी's picture

15 Apr 2016 - 9:11 am | जयंत कुलकर्णी

तजो,
सुन्न करणारी ही हिंदी कविता मराठीत आणणे अवघड आहे. हिंदीचा बाज वेगळा मराठीचा वेगळा. तुमचे भाषांतर हिंदीचे आहे हे उमगते (ते नैसर्गिकच आहे) पण तुम्ही ते अशा खुबीने केले आहे की मूळ कविता व भाषांतर यातील फरकाची रेषा अत्यंत फिकट होत चालली आहे हे जाणवते. हिंदीत अशी अनेक काव्यरत्ने आहेत ती जर भाषांतर करुन मराठीत आणायचे ठरवलेत तर एक मोठे काम आपल्या हतून होईल....बघा हे जमते आहे का... म्हणजे मला खत्री आहे जमेलच.. ( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-)

अनुप ढेरे's picture

15 Apr 2016 - 11:22 am | अनुप ढेरे

जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर

किंचित असहमत. वादावादी गरजेची असते.

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 2:40 pm | तर्राट जोकर

धन्यवाद जयंतजी, गेल्या तीन चार कवितांपासुनच अनुवादाचे काम सुरु केले आहे. एका भाषेचा आशय, विषय, लहजा सही सही पकडून दुसर्‍या भाषेत आणणे हे खरेच शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे हे जाणवायला लागले. पण मजा येते आहे. ह्या कवितेचा हिंदी बाज उत्तर हिंदुस्थानातल्या लोकगीतांच्या पद्धतीचा आहे असे वाटते, अर्थात माझा तेवढा अभ्यास नाही. तो बाज तसाच मराठीत आणू शकलो असेल तर यशस्वी झालो असे वाटेन.

वेगवेगळ्या ढंगांच्या, मराठी जनांत जास्त माहित नसलेल्या हिंदी कवींच्या रचना इकडे मांडण्याचा संकल्प आहे. बघू, कितपत जमतो ते. आपला आशिर्वाद असु द्या आणि कुठे चुकले तर मार्गदर्शन अवश्य करा.

अजया's picture

15 Apr 2016 - 10:04 am | अजया

अगदी सहमत.तजो अप्रतिम अनुवाद.

अनुप ढेरे's picture

15 Apr 2016 - 10:14 am | अनुप ढेरे

सुन्न करणारी कविता. अप्रतिम अनुवाद केलाय तजो.

राही's picture

15 Apr 2016 - 10:20 am | राही

अनुवाद जमून गेलाय. हिंदीचे जळजळीत, अर्थवाही आणि तीव्र-थंड उपहासात्मक शब्द मराठीत आणणे ही मोठीच कसरत असते. हिंदीचे शब्दवैभव दांडगे आहे. अर्थबहुल अल्पशब्दी लिखाण नेहमीच अनुवादात कसोटी पाहाते. मला तर इंग्लिश्पेक्षा हिंदीच कठिण वाटत आलीय अनुवादासाठी.
जमलाय.
आवडला अर्थात.
आशयाविषयी काय बोलणार? बोलायचे होते ते सर्व कवितेत आहेच.

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 2:47 pm | तर्राट जोकर

राहीजी, धन्यवाद. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आशय, विषय आणता आला तरी एखाद्या भाषेतलं सौंदर्य स्थलांतरीत होऊ शकत नाही.

मला हिंदी आणी मराठी दोन्ही तितक्याच प्रिय आहेत. पण अनुवाद करतांना बर्‍याच शब्दांवर अगदी ठप्प होउन जातं डोकं. तो अर्थ, तोच आशय, तीच लय पकडण्यासाठी नेमका शब्द शोधतांना त्रेधा उडते. नुसते शब्दाला शब्द दिला तर कविता ठोकळेबाज होते, मरते. त्यापेक्षा नकोच असे होउन जाते. मला माझ्या मर्यादा जाणवतात. आपली भाषा म्हटली तरी चपखल शब्दसंग्रह कमी पडतो हे भाषेच्या कमतरतेपेक्षा वैयक्तिक कमतरता वाटते. आधीच्या एका अनुवादावर अभ्याच्या दोनच ओळी अगदी स्वयंभू काव्य होत्या. त्यात व्यक्त झालेली कळकळ उसनी वाटत नव्हती, अस्सल वाटत होती.

अभ्या..'s picture

15 Apr 2016 - 3:44 pm | अभ्या..

जमलेय जमलेय जोकरभाव.
अग्दी एक लंबर जमलेय.
.
पण तुम्ही निवडलेल्या अन अनुवादलेल्या कविता डोस्कं खातात एवढं मात्र निश्चित.

तर्राट जोकर's picture

16 Apr 2016 - 12:11 am | तर्राट जोकर

धन्स अभ्याभौ, डोस्कं खाणार्‍या कविताच आपल्याला आवडतात. ;-)

वेल्लाभट's picture

15 Apr 2016 - 11:00 am | वेल्लाभट

जबर जमलीय ही ! वाह.

हात शिवशिवले वाचताना.

बोका-ए-आझम's picture

15 Apr 2016 - 11:35 am | बोका-ए-आझम

फक्त कळी कुरतडलेली ऐवजी कुस्करलेली हे जास्त समर्पक वाटलं असतं. बाकी अनुवाद जबरदस्त!

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 11:51 am | mugdhagode

.

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 2:48 pm | तर्राट जोकर

नाना स्कॉच, एस, अनुप ढेरे, अजया, वेल्लाभट, बोकाभाऊ, मुग्धातै, सबको धन्यवाद. :-)

साहेब..'s picture

15 Apr 2016 - 3:14 pm | साहेब..

सुन्न करणारी कविता

पैसा's picture

15 Apr 2016 - 3:46 pm | पैसा

:( सुरेख भावानुवाद!

चांदणे संदीप's picture

15 Apr 2016 - 3:51 pm | चांदणे संदीप

असेच अजून हिंदी साहित्य सागरातील रचना वेचून आणत रहा आमच्यासाठी.

Sandy

तर्राट जोकर's picture

16 Apr 2016 - 12:12 am | तर्राट जोकर

येस्सार. धन्स! :-)

जव्हेरगंज's picture

15 Apr 2016 - 8:02 pm | जव्हेरगंज

__/\__

खरंच जळजळीत !

भावानुवाद इतका उत्तम जमलाय की मूळ कविता वाचायची गरजच वाटली नाही!

जियो !!

तर्राट जोकर's picture

16 Apr 2016 - 12:11 am | तर्राट जोकर

अरेव्वा. ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2016 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

ऊत्तम भावानुवाद ! मूळ कवितेतेले सुन्न करणारे भाव आणि वेदना, दोन्ही बरोबर पोहोचले.

तुमची मराठीवरची मांड उत्तम आहे हे या लेखनात दिसते आहेच ! अजून येऊंद्या.

( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-)

वादविवाद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, त्यामुळे तो थांबविणे योग्य होणार नाही.

परंतु, वादविवादाच्या गरमागरमीत, "योग्य उत्तराचा शोध घेणे" हा वादविवादाचा खरा उद्येश विसरला जाऊन तो बर्‍याचदा कळत-नकळत "काहीही करून स्वतःचा मुद्दा जिंकणे" असा कधी होतो हे ध्यानात येत नाही. तसे झाले की तो लोकशाहीला मारक ठरतो. इतके भान ठेवणे खूप जरूरीचे आहे.

हे तुम्हाला नाही तर उर्धृत वचनामुळे आठवलेले एक सर्वसामान्य निरिक्षण आहे. :)

तर्राट जोकर's picture

16 Apr 2016 - 12:10 am | तर्राट जोकर

धन्यवाद डॉक्टरसाहेब. :)

प्राची अश्विनी's picture

15 Apr 2016 - 9:00 pm | प्राची अश्विनी

अतिशय प्रभावी!

रातराणी's picture

15 Apr 2016 - 10:16 pm | रातराणी

सुन्न :(

तर्राट जोकर's picture

16 Apr 2016 - 12:13 am | तर्राट जोकर

रातराणी, पैसाताई, साहेब.., धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

16 Apr 2016 - 12:08 pm | मृत्युन्जय

दाहक वास्तव आहे हे. अनुवाद छान जमला आहे.

बिह्रार आणि यु पी मध्ये भीषण परिस्थिती आहे जातियवादाची. अर्थात भोतमांगे कुटुंबाची करुण कहाणी बघता महाराष्ट्राही मागे नाही .

नीलमोहर's picture

16 Apr 2016 - 12:36 pm | नीलमोहर

असे लिखाण एरवी कधी वाचनात आले नसते, ते सहज-सोप्या शब्दांत सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक आभार.
तुमचे लिखाण प्रभावी असतेच त्यामुळे मूळ कविता शक्यतो वाचली जात नाही.

भरत्_पलुसकर's picture

16 Apr 2016 - 5:09 pm | भरत्_पलुसकर

_/\_

विजय पुरोहित's picture

17 Apr 2016 - 7:20 am | विजय पुरोहित

फार भयानक, सुन्न करणारा अनुभव आहे ही कविता. भाषांतर अगदी प्रभावी केलेयंत हे ही नमूद करतो.