...पुढच्या वर्षी लौक्कर या..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 Sep 2008 - 12:11 am

राम राम मंडळी,

गेले १०-१२ दिवस सुरू असलेला गणेशोत्सव काल अखेर संपला. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती काल आपापल्या घरी गेले.

आम्ही देखील काल दुपारी साडेअकरा-बारा वाजल्यापासून ते आज सकाळपर्यंत आमच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो होतो. लालबाग, परळ, चिंचपोकळी आदी गिरणंगाव परिसर मांणसांनी अक्षरश: फुलून गेला होता. रस्ते, इमारती, चाळी, गच्च्या इत्यादी सर्वत्र ठिकाणी लोकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला प्रचंड गर्दी केली होती. मुंगीलादेखील पाय ठेवायला कुठे जागा नव्हती. अधनंमधनं पाऊसवार्‍याचा मारा होत होता तसं लोकांच्या उत्साहालाही उधाण येत होतं!

लालबागचा राजा हा मूळचा कोळीबांधवांचा. त्यामुळे अनेक कोळी स्त्रीपुरुष आपल्या पारंपारिक वेषात मस्त नाचत होते, धमाल करत होते. "गणपती बाप्पा मोरया..", "लालबागच्या राजाचा विजय असो...", "ही शान कुणाची? ... लालबागच्या राजाची...!" इत्यादी आरोळ्यांनी सारा आसमंत दणाणून गेला होता!

खूपच लाईव्हली अनुभव होता तो!

चिंचपोकळी, आग्रिपाडा, ग्रॅन्टरोड अशी ठिकाणं करत करत अक्षरश: लाखो माणसांचे हार-तुरे-मुजरे-नमस्कार-चमत्कार स्विकारत एखाद्या सार्वभौम राजाच्या दिमाखात लालबागचा राजा अखेर गिरगाव चौपाटीवर पोहोचला! तिथेही प्रचंड जनसमुदाय त्याच्या स्वागताला उभा होता. राजाच्या विसर्जनाकरता एक पेश्शल तराफा सज्ज होता. समुद्रामध्ये अगदी आतपर्यंत, एक्चुअल विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत अनेक माणसांनी भरलेल्या छोट्यामोठ्या ५०-६० बोटींनी राजाची सोबत केली!

खूपच सुंदर सोहळा होता तो!

असो,

आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहायची! सरता गणेशोत्सव तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी देवो ही लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना...! :)

राजाच्या विसर्जनाची बातमी इथे वाचा व सुरवातीची काही दृष्ये इथे पाहा!

लालबागच्या राजाचा विजय असो....

आपला,
तात्या लालबागकर.

अवांतर - गेल्या १७-१८ वर्षांच्या कालावधीत मला या उत्सवाच्या निमित्ताने लालबाग परिसरात खूप जिवाभावाचे मित्र मिळाले, बापू सामंतांसारख्या वृतीने अस्सल मुंबईकर असलेल्या काही लालबागकर वल्लीही भेटल्या. त्या वल्लींबद्दल लिवणारच आहे मी इथे केव्हातरी! :)

दोनचार सणसणीत शिव्या देणारी आणि पाठीत प्रेमानं जोरात रट्टा हाणणारी जना कोळीणही भेटली! :)

शेवटी सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू म्हणजे माणसामाणसांचं एकमेकांना जोडलं जाणं, प्रेम, आपुलकी आणि ऋणानुबंध! लालबागच्या राजाच्या निमित्ताने मला तरी या सर्व गोष्टी अगदी पुरेपूर मिळाल्या, मिळताहेत!

आपला,
(जना कोळणीचा लाडका!) तात्या तांडेल.

:)

संस्कृतीसमाजमौजमजासद्भावनाशुभेच्छाअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

16 Sep 2008 - 12:55 am | प्राजु

सरता गणेशोत्सव तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी देवो ही लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना...!

पुढच्या वर्षी लवकर या...!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वगत : तात्यांनी आधी रोशनी, शिंत्र गुरूजी आणि बसंताचं लग्न पार पाडावं आणि मगच बाकीच्यांना लेखणीवर घ्यावं.