खुर्ची

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
23 Dec 2015 - 4:06 pm

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस.
दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त.
कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली. त्यापैकी ‘उठा’ ही खूण समजली पण त्यानंतरची काही समजेना.
मी तटकन उठले. मग लक्षात आलं, खुर्ची !
झटक्यात मी खुर्ची रिकामी केली, आणि बॉस नं. १ विजयी चेहेऱ्याने तिच्यावर स्थानापन्न झाले.
बापरे ! इतका बावळटपणा आयुष्यात कधी केला नव्हता. खुर्ची हा वरिष्ठांचा पदसिद्ध हक्क ! मी विसरले तरी कशी ? हर हर, कुठे फेडू हे पाप ?
‘सॉरी, सर !’ मी काकुळतीने.
‘हां, ठीक आहे..’
मग करंट फायली मागवल्या गेल्या. कागदी घोडे खेळू लागले. छुपे डाव प्रतिडाव रंगू लागले.
आणि सरप्राईज व्हिजिटची दैनंदिनी सुरु झाली....!
दोन तासांनी सर्व मंडळी रीतसर थंड पेय वगैरे घेऊन रवाना झाली. त्यांना सहास्य वदनाने कारच्या दरवाज्यापर्यंत जाऊन निरोप दिल्यावर मी केबिनीत परत आले. खुर्ची सरळ केली आणि तिच्यात बसले.
मघाच्या जराशा गमतीदार प्रसंगावरून सहजच माझ्या उमेदीच्या दिवसातील एका उमद्या बॉसची आठवण आली. हे बॉस रिटायरमेंटला आलेले. चकचकीत टक्कल. काळेभोर लुकलुकते मिस्कील डोळे. हसरा चेहेरा. एकूणच प्रसन्न व्यक्तिमत्व ! खरं सांगायचं, तर त्यांच्या हाताखाली उमेदवारी करत शिकताना आम्हाला ते कधी वरिष्ठ आहेत असे वाटायचेच नाही. माणूस ब्रिटीशकाळात नोकरी केलेला. कडक शिस्त, वक्तशीरपणा, गुणग्राहकता हे अलीकडे दुर्मिळ झालेले गुण त्यांच्याकडे मायंदाळ. तरीही माणूस दिलखुलास, कुटुंबवत्सल आणि हौशी. असे असूनही व्यवहारी.
दौऱ्यावर गेले की कुटुंबियांसाठी तिथली एखादी हटके चीज घेतल्याशिवाय दौरा पूर्ण होत नसे त्यांचा. खानपानातील दर्दी. पण खाण्याचे ‘बिल’ कधी कनिष्ठांना चुकते करावे लागले नाही. कंत्राटदार जर आपणहून देत असेल तर मात्र इग्नोर करत. मुद्दाम कधी काही मागत नसत. खानपानातले दर्दी असले, तरी ‘खाबुगिरी’ पासून मात्र कटाक्षाने दूर. पैसे कधी घेत नसत. पण कंत्राटदारांनी आपणहून काही सुविधा दिल्या तर त्यांची ना नसे.
प्रोजेक्ट डिव्हिजन असल्यामुळे आम्हा लोकांचा काँट्रॅक्टरांशी नेहमीचा राबता. बॉस काँट्रॅक्टरांशी सलोख्याचे संबंध ठेवून असत, पण जवळिकीचे नाही.
नोकरगिरीतल्या बऱ्याच खाचाखोचा, केव्हा नमते घ्यावे, केव्हा स्वातंत्र्य घ्यावे, हे मी त्यांच्याकडून शिकले. जरा चांगली ओळख व जवळीक झाल्यानंतर एकदा मी विचारले,
‘सर, तुम्ही या काँट्रॅक्टर लोकांना दूर ठेवता, पण त्यांनी टूरसाठी गाडी, जेवण दिले तर कसे काय स्वीकारता ?’
‘त्याचे काय आहे बेटी,’ ऑफिसपासून दूर असताना आणि सहकारी नसताना ते मला बेटी म्हणत.
‘.. यांना जर आपण फार सवलती दिल्या आणि काहीच देणेघेणे नसल्यासारखे राहिलो, तर ते संशय खाऊन राहतील, हा आपल्याला कुठे पकडतो की काय ? आणि एक दिवशी संधी साधून पिटाळून लावतील. त्यांना ‘ऑड’ वाटू नये म्हणून थोडं सांभाळावं लागतं !’
असं त्यांचं व्यवहारी तत्वज्ञान. कामानिमित्ताने मी आणि माझे सहकारी कित्येकदा त्यांच्या घरी जात असू. आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमळ पाहुणचार घेऊन गप्पा मारत विसावत असू.
तर असे हे बॉस एकदा ऑफिस परिवार म्हणजे आमच्यासह एका नवीन ऑफिसरला भेट द्यायला फिल्ड ऑफिसवर गेले. ऑफिसर तरुण आणि सिन्सिअर होता. नोकरीला लागून त्याला वर्ष झाले असेल. पण इथले सगळे ‘रिवाज’ त्याने व्यवस्थित आत्मसात केले होते. त्याचे रिपोर्ट्सही चांगले होते. त्याचे काम आम्ही आधी पाहून आलो होतो. सुबक आणि शिस्तशीर काम.
आम्ही त्याच्या छोट्याशा ऑफिसात गेल्यावर तो धडपडून खुर्चीतून उठला आणि बॉसना नम्रपणे म्हणाला,
‘प्लीज टेक चेअर सर.’
‘नो यंग मॅन, ती तुझी खुर्ची आहे. इथे तू इन-चार्ज आहेस. प्लीज सिट’
आणि बॉस त्याच्या टेबलसमोरच्या मोडक्या खुर्चीत आपला अघळपघळ देह सावरत बसले.
तो थक्कच झाला. हे प्रथेच्या विरुद्ध होते. आतापर्यंत यांच्यापेक्षाही छोटे साहेब लोक येऊन गेले त्यांनी याची खुर्ची हक्काने घेतली होती. आणि हे तर त्यांचेही साहेब. तो बावचळून काही सेकंद उभा राहिला. मग घाबरत घाबरत सावकाश खुर्चीत टेकला.
आम्हीपण आ करून बघत राहिलो. पण बॉसचा सनकी पणा माहिती असल्याने फारसे नवल वाटले नाही.
‘त्याचे काय आहे पानसरे, मी तुमच्या ऑफिसात आलो आहे आणि तुम्ही इथले अधिकारी आहात. ही तुमची कर्मभूमी आहे. आणि तुमची खुर्ची हे तिचे केंद्र. मी इथे बसलो, तर त्या कर्माला न्याय देऊ शकणार नाही.’
‘ते कसे काय सर ? तुम्ही तर आमच्यापेक्षा अनुभवी.’
‘ते बरोबर आहे. पण तुमच्या कामावर सर्वस्वी तुमचाच अधिकार आहे, आणि ही खुर्ची त्याच अधिकाराची निदर्शक आहे. असं बघा, मी या खुर्चीत बसलो, आणि एखादा ग्राहक मला खुर्चीत पाहून त्याच्या कामासंबंधी काही माहिती विचारू लागला, तर मला उत्तर देता येईल काय ?’
‘...नाही सर.’
‘करेक्ट ! म्हणूनच तुम्हीच या खुर्चीत बसायचं. मी पाहुणा. काम बघणार आणि जाणार. कसं ?’
आणि बॉस त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधे गडगडाट करून हसले !
..आजही या हटके स्टाईलच्या अनोख्या बॉसची आठवण आली की माझ्या मनात ‘बेटी’ ही हाक घुमते आणि हातातला पेन ठप्प होतो ...!

धोरणसमाजनोकरीरेखाटनप्रकटनसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

नाखु's picture

23 Dec 2015 - 4:18 pm | नाखु

साहेबाला आणि हाफीसला थेट समोर उभे केलेत.

कनीष्ठांना त्रास देणे हा वरिष्ठांचा "पद"सिद्ध हक्क असावा असे सध्या (खाजगीत) असूनही अनुभवतो आहे.

चाकरमानी नाखु

स्वतःच्या अधिकाराला योग्य सन्मान प्राप्त करायचा असेल तर दुसर्‍याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता त्याच्या अधिकाराचा सन्मान ठेवला पाहिजे.
अगदी पटले. सर्वजण असे वागतील तो सुदीन.

एस's picture

23 Dec 2015 - 4:40 pm | एस

बाकी बहुतांश भारतीय वरिष्ठांमध्ये 'लिक अबव्ह अ‍ॅण्ड किक बिलो' हीच प्रवृत्ती दिसते.

नाखु's picture

23 Dec 2015 - 5:13 pm | नाखु

मुका = वर्च्याला मुका

दम = खालच्याला दम

असे म्हणले जाते.

प्रतीसाद मात्र नाखु

मृत्युन्जय's picture

23 Dec 2015 - 5:05 pm | मृत्युन्जय

मी जिथे काम करतो तिथले सीएमडी हे पथ्य पाळतात. ते एखाद्याच्या केबिन मध्ये गेले तर कधीच त्याची खुर्ची वापरणार नाहित. अर्थात आमचे सरकारी ऑफिस नाही खाजगी कंपनी आहे, पण तरीही....;.

कपिलमुनी's picture

23 Dec 2015 - 5:25 pm | कपिलमुनी

व्यक्तीचित्र आणि अनुभवकथन आवडले

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 5:26 pm | प्रचेतस

किस्सा आवडला.

तुषार काळभोर's picture

23 Dec 2015 - 5:34 pm | तुषार काळभोर

माझ्याकडे आला तर उभा राहून बोलतो, अन् मी बसून :)
सुरुवातीला काही वेळा मी उभा राहायचो, पण तुमच्या तुळतुळीत बॉस सारखा हा सुद्धा मला बसायला लावायचा. एखाद्या मिनिटाचं काम असेल, तर उभं राहून बोलतो अन् जातो. जास्त वेळ लागणार असेल, तर स्वतः एखादी खुर्ची ओढतो व बसतो.

त्याचा बॉस (माझा एन+२). एकदम विरुद्ध. मी जर त्याच्याशी काही कम्युनिकेशन केले तर, त्याला कमीपणा वाटतो. 'हा माझ्याशी थेट कसा बोलतो' म्हणुन. जर कधी एखादी मेल त्याला टू ठेवून पाठवली, तर त्याचा १ मिनिटात माझ्या एन+१ला फोन येतो, 'तू का नाही पाठवली?'

अन् आमचे साईट जीएम! त्यांना माहिती असतं, हापिसात कुणाच्या ड्रॉवरमध्ये बिस्किटांचे पुडे असतात. (कुणाकडे कोणते असतात ते पण!) मग जाऊन हक्काने मागून घेतात. तेसुद्धा कुणाच्याही जागेवर गेल्यावर, त्याला उठून देत नाहीत.

आदूबाळ's picture

23 Dec 2015 - 5:51 pm | आदूबाळ

माझ्या पहिल्या नोकरीत जे नमुने भेटले ते फारच थोर होते. चांगले वाईट दोन्ही. त्यानंतर बर्‍याच नोकर्‍या बदलल्या, पण तसे लोक काही अजून भेटले नाहीत.

हा किस्सा वरून नं० २ असलेल्या बॉसचा. म्हणजे माझ्या डोक्यावर चार लेव्हल. याला आपल्या टेबलावर पाट्या ठेवायचा नाद होता.

त्यातली एक पाटी: "इन माय केबिन, देअर इज अ स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टु सिट डाऊन." आता पाटी ठेवणे वगैरे चमत्कारिकपणा वगळता भावना चांगली होती.

[अवांतर - आणखी एक पाटी. "टु अर इज ह्युमन. टु ऑडिट - डिव्हाईन." ही तर खास संगमरवरी पट्टीवर कोरून घेतली होती!]

कंजूस's picture

23 Dec 2015 - 6:00 pm | कंजूस

किती छान दास'बोध!

DEADPOOL's picture

23 Dec 2015 - 6:01 pm | DEADPOOL

किस्सा आवडला!

DEADPOOL's picture

23 Dec 2015 - 6:02 pm | DEADPOOL

किस्सा आवडला!

विवेकपटाईत's picture

23 Dec 2015 - 6:20 pm | विवेकपटाईत

आपली हयात तर येस सर येस सर करण्यात गेली. त्या मुळे हा किस्सा अधिकच आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2015 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त किस्सा ! आमचा खाक्या : आम्ही ज्या खुर्चीवर बसतो ती बॉसची खुर्ची होते ! ;) :)

सुबोध खरे's picture

23 Dec 2015 - 6:42 pm | सुबोध खरे

पदाचा/ खुर्चीचा मान
मी लष्करात असताना किंवा कॉर्पोरेट रुग्णालयात असताना जरी विभागप्रमुख होतो तरीही आपल्या कनिष्ठाच्या खुर्चीत कधीच बसलो नाही. गरज असेल तेंव्हा दुसरी खुर्ची मागवून बसत असे. फार काय माझ्या दवाखान्याच्या शेजारीच सौ. चा दवाखाना आहे. तिथे सुद्धा मी तिच्या खुर्चीत सहसा बसत नाही. फक्त जर ती नसेल आणि मी तिच्या जागी रुग्ण पाहत असेन तरच त्या खुर्चीत बसून रुग्ण तपासतो. माझ्या दवाखान्यात स्वागत सहायीकेच्या खुर्चीत( ती नसताना) मी स्वतः बसत नाही किंवा कोणा रुग्णालाही बसू देत नाही.
प्रत्येक माणसाचा व्यक्ती म्हणून (आणि त्याच्या पदाचा/ खुर्चीचा) सन्मान असतो, मग तो तुमचा कनिष्ठ असेल किंवा अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल.
लष्करात तुम्हाला तुमच्या कनिष्ठाने सलाम केला तर तुम्ही त्याला उलट सलाम केला पाहिजे हा दंडक आहे. हि प्रत्येक माणसाला मान देण्याची पद्धत/ परंपरा आहे आणि तुम्ही त्याला उलट सलाम न करणे हा त्या माणसाचा अपमान समजला जातो. मग तो लष्कर प्रमुख असो आणि त्याला सलाम करणारा नुकताच भरती झालेला रिक्रूट असो.

आम्हाला कधी बाॅस असायची वेळ आली नाही आणि आमच्या खुर्चीवर बसायची भल्याभल्यांची हिंमत नाही ;)

तुमच्या खुर्चीत बसण्याचा कसूर करू एकवेळ पण तुमच्यासमोरच्या खुर्चीत बसायची हिंमत नाय बाॅ !

रातराणी's picture

23 Dec 2015 - 9:20 pm | रातराणी

आवडला किस्सा. नेहमीप्रमाणे खुसखुशीत.

जव्हेरगंज's picture

23 Dec 2015 - 10:21 pm | जव्हेरगंज

परफेक्ट!

बोका-ए-आझम's picture

23 Dec 2015 - 11:30 pm | बोका-ए-आझम

कामं करत असल्यामुळे खुर्ची आणि तिचा मान याचा कधी संबंध आला नाही. फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात दिग्दर्शकाच्या खुर्चीला प्रचंड मान असतो. तो एक-दोन वेळा अनुभवायला मिळालेला आहे. बाकी लेख छानच. चांगला बाॅस मिळणं हा योगच म्हणावा लागेल. मला शिक्षणक्षेत्रात फार चांगल्या बाॅस मिळाल्या. दुर्दैवाने याच वर्षी जून महिन्यात त्या गेल्या पण कुणीही हेवा करावा अशी लोकप्रियता त्यांना त्यांच्या सहका-यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्येही लाभलेली होती.

रेवती's picture

24 Dec 2015 - 12:04 am | रेवती

लेखन आवडले.

उगा काहितरीच's picture

24 Dec 2015 - 1:08 am | उगा काहितरीच

छान जमलेय व्यक्तीचित्रण ...

सौन्दर्य's picture

24 Dec 2015 - 1:48 am | सौन्दर्य

साहेब आणि खुर्ची ह्यांचे नाते मस्त रंगवलंय. लिखाण आवडलं.

कुसुमिता१'s picture

24 Dec 2015 - 9:40 am | कुसुमिता१

आवडल लिखाण!!
"माझा मान राखा..मला महत्व द्या" अशा वृत्तीच्या लोकांबद्द्ल खरच कधी खरा आदर वाटूच शकत नाही. तुमच्या बॉससारख्या व्यक्ती दुर्मिळ असतात खरोखर..

हेमंत लाटकर's picture

24 Dec 2015 - 11:29 am | हेमंत लाटकर

खुर्चीचा किस्सा आवडला.

हेमंत लाटकर's picture

24 Dec 2015 - 11:31 am | हेमंत लाटकर

दुसर्याला मान दिला तर तो आपल्याला मान देईल.

यशोधरा's picture

25 Dec 2015 - 11:04 am | यशोधरा

किस्सा आवडला.

मनीषा's picture

25 Dec 2015 - 1:24 pm | मनीषा

खुर्चीचा किस्सा आवडला.

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2015 - 1:25 pm | नगरीनिरंजन

किस्सा आणि सांगायची पद्धत आवडली.