मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये.
मी त्यांच्या ’थर्राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो. ह्या आवृत्तीचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यात ’अमर विश्वास’ ह्या पात्राच्या जन्मकथेचा जन्म कसा झाला, हे त्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत शिरवळकरांनी सांगितले आहे. ही आवृत्ती मला आधी पुणे मराठी ग्रंथालयात वाचायला मिळालेली असल्यामुळे मला माहित होते. पुढे त्यांच्याकडे ह्या आवृत्तीची प्रत खराब झाल्यामुळे ती वाचनालयातून डिसकार्ड करण्यात आली होती.
तर ही आवृत्ती शोधताना मी सदाशिव पेठेतील लोकमान्य वाचनालयात गेलो. मी एखादे पुस्तक शोधताना समोरच्या व्यक्ती आणि ग्रंथालयाला सांगतो की, मी शिरवळकरांच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहे आणि मला त्यांच्या काही पुस्तकांची गरज आहे. जर तुमच्याकडे ती प्रत उपलब्ध असल्यास ती मला पाहायला मिळेल का? जर मी तुम्हाला त्या पुस्तकाची नवीन प्रत उपलब्ध करून दिली तर जुनी प्रत तुम्ही मला देऊ शकाल का? किंवा अगदीच हे नसेल तर तुम्ही मला त्या आवृत्तीचे फोटोज् किंवा झेरॉक्स काढून घेण्यासाठी मदत करू शकाल का? ह्या सर्व गोष्टींना नकार आला तर, मी त्या ग्रंथालयाचा सभासद होतो आणि हवे असलेल्या पुस्तकाच्या प्रतीच्या झेरॉक्स काढून घेतो.
या आधी मला मी कॉलेजमध्ये असताना तिथे सभासद होण्यास गेलो असता, त्या ग्रंथालयाचा फार काही चांगला अनुभव आला नव्हता. पण ह्या वेळेस विषय वेगळा होता.
मी तिथे गेल्यावर त्यांना ’थर्राट’च्या आवृत्तीबद्दल विचारले. त्यांच्याकडे ती उपलब्ध नव्हती. पण तिथल्या चालकांना माझी माहिती मिळवायच्या गोष्टीचे कौतुक वाटले. त्यांनी विचारपूस करताना मी फार मोठ्या अभिमानाने सांगितले की माझ्याकडे ’ऑब्जेक्शन युवर ऑनर’ची पहिली प्रत आहे. अंधारछाया आहे, आणि बरेच काही! त्यांनी अंधारछायाचा विषय निघताच त्यांनी मला म्हटले, तुम्ही ’धुकं-धुकं’ पाहिले आहे का? मला धुकं-धुकं ची एकत्रित आवृत्तीची द्वितियावृत्ती माहिती होती. ती मी सांगितली. तर त्यांनी सांगितले की, ह्या धुकं-धुकंची मोठ्या आकारातील आवृत्ती होती. मला धक्काच बसला! मी मारे उगीचच अभिमानाने फुशारक्या मारत होतो की मला फार माहिती आहे. पण ह्या माहितीने माझ्यातील हवा भसकन् काढून घेतली. मी शिरवळकरांच्या माहितीचा स्त्रोत वगैरेची जी काही हवा माझ्या डोक्यात भरली होती, ती ह्या धक्क्याने पूर्णपणे निघून गेली.
मी माहिती कन्फर्म करण्यासाठी सम्राट शिरवळकरांना फोन केला , तेव्हा त्यांनीपण ह्या आवृत्तीबद्दल माहिती सांगितली. त्याला निळे कव्हर होते- ज्या कथा अंधारछायात आल्या नाहीत त्या ह्या पुस्तकात आल्या , अशी बरीच माहिती त्यांनी दिली.
ह्या सर्व प्रकारानंतर मला ओशाळल्यासारखे झाले. मी बाकीच्यांना ज्या फाजील आत्मविश्वासाने फुशारक्या मारत होतो, त्या बंद झाल्या. आजही कधी माझ्यातला गर्व उसळून आलाच तर हा प्रसंग आठवतो, आणि मी सोडावॉटर बॉटलच्या फेसासारखा लगेच निवळतो.
हे सर्व सांगायचे कारण म्हणजे , मी काही पुस्तके मिळवत होतो. अजूनही मिळवत आहे. सुगंधा काकू, सम्राट शिरवळकर, साकेत लायब्ररी, पुणे नगर वाचन मंदिर, रद्दीची दुकाने, जुन्या पुस्तकांची दुकाने, समीर, प्रभाकर, आठवले यांसारखे जुने पुस्तक विक्रेते, मनोज शेडबाळकर, मंदार गोरे, रमा नाडगौडा, सागर भंडारे, भारत बुक हाऊस यासारख्या अनेक सु.शि.प्रेमींनी मला कशाचीही अपेक्षा न धरता मदत केली आहे. अजूनही करत आहेत. मी यांच्या कधीही ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही, हे मला माहित आहे!
आणि हो-
मला अजूनही काही पुस्तके हवी आहेत. आपल्या कोणाकडे असल्यास ती आपण मला देऊ शकता का, हे कळवा. याबद्दल त्या पुस्तकाचा मोबदला, रक्कम अथवा तिची नवीन कॉपी मी तुम्हाला देऊ शकतो. कृपया ह्याबद्दल विचार करावा.
पुस्तकांची नावे खालीलप्रमाणे-
दुनियादारी- पहिली आवृत्ती,
कोवळीक- पहिली आणि दुसरी आवृत्ती
मुक्ती- पहिली आणि दुसरी आवृत्ती
प्राक्तन- पहिली आवृत्ती
तलखी- पहिली आणि दुसरी आवृत्ती
गढूळ- पहिली आवृत्ती
धुकं-धुकं- पहिली आवृत्ती
तलाश- पहिली आवृत्ती
जाई- पहिली आवृत्ती
क्षणोक्षणी- पहिली आवृत्ती
थरारक- पहिली आवृत्ती
पहाटवारा- पहिली आवृत्ती
कल्पान्त- दुसरी आवृत्ती
पाळंमुळं- पहिली आवृत्ती
बाल वाड्:मय- गर्वहरण, मूर्खांचा पाहुणचार, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक
नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग ह्यांच्या मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या काही प्रती असल्यास कळवणे
शिरवळकरांच्या सर्व रहस्यकथांच्या एकदम जुन्या प्रती १९७३-१९८० पर्यंतच्या असल्यास कळवावे. ह्यातील कुठल्याही प्रतीसाठी नवीकोरी पुस्तकाची प्रत आपणांस मिळेल अथवा जर तुम्हाला त्याची काही रक्कम हवी असल्यास तीदेखील मिळेल.
कृपया कळवणे.
संपर्क- ८९५६८६८३३२, पुणे
अनेक अनेक धन्यवाद!
प्रतिक्रिया
10 Dec 2015 - 10:57 am | दमामि
शिरवळकरांची एक कादंबरी वाचल्यावर Avatar चित्रपटाची आठवण आली. अर्थातच कादंबरी चित्रपटाच्या आधीची आहे.
पाळमुळं का?
10 Dec 2015 - 10:57 am | दमामि
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
10 Dec 2015 - 10:59 am | अजिंक्य विश्वास
कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का? म्हणजे मी नाव सांगू शकेन.
पाळंमुळं ही रहस्य कादंबरी आहे.
10 Dec 2015 - 11:13 am | दमामि
झाडांच्या मुळात एकवेगळे विश्व असते, असे काहीसे
10 Dec 2015 - 11:16 am | अजिंक्य विश्वास
ते नारायण धारपांचे पुस्तक असावे. साठे-फायकस नावाचे. सुहास शिरवळकरांचे असे एकही पुस्तक नाहीये.
10 Dec 2015 - 11:18 am | दमामि
बरोबर,चुकले माझे, .
3 Aug 2019 - 8:45 am | अजय सोनार
सुहास शिरवळकर यांचे सावी तल्यारखान ही व्यक्तिरेखा असलेले पुस्तकाचे नाव काय आहे?
3 Aug 2019 - 12:04 pm | गड्डा झब्बू
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे. सावी तल्यारखान, चांदनी आणि निकी अशी मुख्य पात्रे असलेले ते पुस्तक मला खूप आवडले होते.
10 Dec 2015 - 12:08 pm | आदूबाळ
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा. माझ्या काही सुशिप्रेमी मित्रांना विचारतो.
तुमच्याकडे सुशिलेखनाची समग्र सूची आहे का? याआधी भा रा भागवतांच्या लेखनाची सूची बनवण्याच्या कामात मी भाग घेतला होता. मुख्य पात्र (protagonist), प्रकाशन वर्ष, प्रकार वगैरे अनेक प्रकारे सूची बनवली होती. तसं काही करायचं असल्यास नक्की मदत करू शकेन.
10 Dec 2015 - 12:13 pm | अजिंक्य विश्वास
माझ्याकडे समग्र सुहास शिरवळकर यादी आहे. नवीन बदलांसकट परिपूर्ण आहे. तुम्हाला हवी असल्यास इथे देतो.
जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल.
10 Dec 2015 - 12:19 pm | आदूबाळ
इथे दिलीत तर आभारी असेन.
10 Dec 2015 - 9:56 pm | अजिंक्य विश्वास
कादंबरी:
वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वन्डर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक, तलखी, इन्सानियत, सालम, सॉरी सर, जमीन-आसमान, वास्तविक, जाई, अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रुपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा-तुकडा चंद्र, जाता-येता, थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ओ गॉड, क्षितिज, व्रतस्थ, गढूळ, कल्पान्त, अंमल, डेड-एन्ड, स्पेल बाऊन्ड, हिन्दोस्ता हमारा, लटकंती, झूम, सत्र, राजरोस, मधुचंद्र, न्याय-अन्याय, हृदयस्पर्श, क्षण-क्षण आयुष्य, झालं-गेलं, काळंशार, झलक, पाळंमुळं, चूक-भूल देणे-घेणे, हमखास, क्रमश:, काळंबेरं, सावधान, पळभर जन, निमित्तमात्र, सूत्रबध्द, स्टार हन्टर्स, वर्चस्व, कळप, लूप-होल
रहस्यकथांची अद्ययावत यादी:
गोल्ड हेवन, थर्राट, गुणगुण, खजिना, सहज, कायद्याचे हात, झंझावाती, माध्यम, बिनशर्त, सराईत, शैतान-घर, अनुभव, निराकार, अफलातून, मर्डर-हाऊस, शैताली, जबरदस्त, आवारा, तो, लास्ट बुलेट, किल-क्रेझी, गाफील, हव्यास, पोलादी, पहाडी, काळे युग, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, मातम, कलंक, सॉलीड, नकार, गिधाड, जिवघेणा, स्टुपिड, असह्य, अट्टल, शॅली-शॅली, कोल्ड-ब्लड, ऑर्डर-ऑर्डर, अज्ञात, खुनी पाऊस, पांचाली, इज्जत, सफाई, भयानक, भन्नाट, शोला, ब्लॅक कोब्रा, चक्रव्यूह, प्राक्तन, चॅलेंज, मंत्रजागर, जाणीव, सौदागर, उस्ताद, टेरिफिक, डेड-शॉट, इलेवन्थ अवर, जिव्हारी, ज्वेल-थीफ, सायलेन्स प्लीज, संशय, डाऊन-लेव्हल, कट्टर, ट्रेलर-गर्ल, हॅलो-हॅलो, मरणोत्तर, आक्रोश, वॉन्टेड, हिरवी नजर, पडद्याआड, मध्यरात्री, टॉवर हाऊस, ज्वाला
कथा-संग्रह:
एक फक्त एकच, थँक यू मि.न्यूजपेपर, कथा-पौर्णिमा, इथून-तिथून, एव्हरीथिंग सो सिंपल, माहौल, शेडस्, मूड्स, मर्मबंध, मेख, संदेह
सदर-लेखन:
इत्यादी-इत्यादी, वर्तुळातील माणसं, फलश्रुती, असो
कुमार/बाल वाड्:मय:
स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक, मूर्खांचा पाहुणचार
नभोनाट्य/ एकांकिका:
हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग
इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य:
कन्नड: समांतर, हृदयस्पर्श
स्वत: शिरवळकरांनी एक डायरी मेन्टेन केली होती , त्यात वर्षांप्रमाणे प्रकाशित झालेल्या साहित्याची वर्गवार नोंदणी आहे. ती डायरी त्यांच्या सुवाच्य आणि देखण्या अक्षरात आहे. एकदा मला त्याचे फोटोज् मिळाले तर नक्की मी पोस्ट करेन.
10 Dec 2015 - 10:00 pm | आदूबाळ
धन्यवाद!
10 Dec 2015 - 10:02 pm | प्रचेतस
यादी पाहता जाणवून गेलं की मी कुमार/बाल वाड्:मय, आणि नभोनाट्य/एकांकिका सोडलं तर अगदी सगळंच साहित्य वाचलंय.
12 Dec 2015 - 9:13 am | यशोधरा
अरे वा! समग्र यादी! अनेकानेक धन्यवाद!
10 Dec 2015 - 12:48 pm | महासंग्राम
अजिंक्य, दिवाळी आधी आपण सुगंधा काकुंसोबत मारलेल्या गप्पा आणि त्यात्यून उलगडत गेलेले सुशी भन्नाटच होते. अगदी अविस्मरणीय अनुभव होता तो
10 Dec 2015 - 1:07 pm | मोगा
मस्त. माझे लाडके लेखक.
सगळी पुस्तके अनेकदा वाचली होती.
10 Dec 2015 - 2:45 pm | कलंत्री
प्रिय अ.वि.,
आपले लेखक प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आपणाबरोबर गप्पा मारायला नक्कीच आवडेल.
कलंत्री
10 Dec 2015 - 10:03 pm | अजिंक्य विश्वास
लेखकप्रेम तर आहेच, त्याबरोबर त्यांचे साहित्य सुद्धा आवडते. त्यातील गुण-दोषांसकट!
मला देखील गप्पा मारायला आवडेल.
अवांतर: सुगंधा काकू आणि सम्राट शिरवळकर गप्पा मारण्यात एकदम दिलखुलास आहेत.
त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ वाया गेला असे कधीच वाटत नाही. शिरवळकर त्यांतून निरनिराळ्या रोलस् आणि त्यातील बारकाव्यांसकट अनुभवायला मिळतात.
त्यांना मी भेटलो आहे, ते देखील ६ वेळा , हे माझे नशीब. बाकी काय?
10 Dec 2015 - 8:50 pm | एक एकटा एकटाच
फार छान धागा आहे
सुशी चं
अंमल
ही कथा अजुनही डोक्यात पिंगा घालते.
11 Dec 2015 - 11:21 pm | ईश्वरसर्वसाक्षी
ऑनलाइन पिडिएफ स्वरुपात उपलब्ध आहेत का ?
12 Dec 2015 - 8:41 am | अजिंक्य विश्वास
ऑनलाईन पीडीएफ उपलब्ध नाहीयेत. पण बुकगंगा डॉट कॉम वर काही मर्यादीत काळापर्यंत ठराविक पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध आहेत.
धन्यवाद.
(अवांतर- जर आपल्याला काही अश्या ऑनलाईन पीडीएफ दिसल्या तर कृपया आवर्जून कळवा. ही पायरसी असेल आणि आम्हांला तसा रिपोर्ट करणे सोईस्कर जाईल.)
12 Dec 2015 - 12:38 am | नूतन सावंत
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला आहे.जे पुस्तक दिसेल ते वाचण्याच्या वयात सुशि हातात पडले.साधारण सातवी आठवीत असेन तेव्हा.त्यवेळी दीड रुपयाला एक याप्रमाणे दरमहा गुरुनाथ नाईक,सुशि,शरदचंद वाळिंबे,बाबुराव अर्नाळकर,राजा पारगावकर यांची पुस्तके प्रकाशित होत असत.माझ्या वडिलांचा वर्तमानपत्र व्यवसाय असल्याने ही सारी पुस्तके आमच्याकडे येत असत,,एक मामेभाऊ ती दरमहा विकत घेत असे.त्याच्य्मुळे खूप नवे लेखकही माहिती झाले.तर त्याला देण्याची पुस्तके घरी ठेवलेली असत आणि त्या पाच सहा किंवा त्याहूनही जास्त पुस्तकांचा फडशा माझी,आई,माझा लहान भाऊ,आणि मी पडत असे.बंधू (मामेभाऊ)पप्पांना गमतीने म्हणत असे,"ओ मामा,मला सेकंड हॅंड पुस्तके मिळतात."
माझे वडील अगदी व्यावसायिकपणे त्याला सागंत,"हे बघ,तू स्टॉलवरून घेत जा.घरी ठेवायला तूच सांगतोस."
आता न आई, न पपा,न लहान भाऊ,न मामेभाऊ,न सुशि आणि उरल्यात फक्त आठवणी आणि पुस्तके.
या यादीत 'ताशर',कसं नाही.
माझ्याकडे काही पुस्तके आहेत.रद्दीत घेतलेली.त्या पाहून मी तुम्हाला हवी असलेली पुस्तके नक्की देईन.सध्या बाहेरगावी आहे .२२ नंतर संपर्क साधेन.
12 Dec 2015 - 8:38 am | अजिंक्य विश्वास
नक्की.
तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून शिरवळकरांच्या ’सनसनाटी’ ह्या कादंबरीमधील एक हत्यार आहे. माझे आवडते पुस्तक! मला वाचायला मिळालेल्या कॉपीत पुस्तकाची शेवटची पाने नव्हती आणि म्हणूनच हे पुस्तक शोधता-शोधता बाकीची पुस्तके वाचायला मिळाली.
माझी शिरवळकरांची पुस्तके वाचायची सुरूवात ह्या ’दिड-दोन रूपये’ वाल्या मालांपासूनच झाली होती.
तुम्हाला तुमच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर तुम्ही फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेजवर शेअर करू शकता.
तुम्ही आमचा फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेज सुद्धा फॉलो करू शकता.
ही ग्रूपची लिंक-
https://www.facebook.com/groups/suhasshirvalkar/
ही पेजची लिंक-
https://www.facebook.com/sushi.fanpage/?ref=bookmarks
धन्यवाद
12 Dec 2015 - 11:21 pm | सिरुसेरि
तुमच्या सुशि यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये "सुन्न" हे पुस्तक आहे ना . फिरोझ ईराणीची साहसकथा आहे .
15 Nov 2016 - 4:51 pm | महासंग्राम
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुशिंच्या ग्रूप आणि पेजवर काही खास आठवणी, किस्से आणि माहिती शेअर करणार आहोत.
आपल्याकडेही काही लेख, आठवण, किस्से अथवा फोटोज् असल्यास ते कृपया मेसेज करा अथवा ग्रूपवर पोस्ट करु शकता
आपली परवानगी घेऊन ते लेख, आठवणी किस्से आणि फोटोज् आम्ही आपल्या सु.शि. पेजवर आपल्या नावासहीत पोस्ट करू.