हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे...
सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन.
आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात. दहा वर्षांपूर्वी त्यांची म्यूझिक आल्बम बनवण्याची इच्छा काही कारणाने अपुरी राहिलेली असते आणि थोडासा गैरसमज + थोडा कडवटपणा ठेवून ग्रुप फ़ुटतो... दहा वर्षांनी प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात व्यग्र आहे, आदित्य हा यशस्वी श्रीमंत इन्व्हेस्टमेंट बँकर आहे पण म्यूझिकचा हा सर्व भूतकाळ त्याने जाणीवपूर्वक विसरायचं ठरवलं आहे, पण तो आतून सुखी नाही, त्याचा बायकोशी संवाद नाही, यांत्रिक पद्धतीने जगत आहे.....पण त्याची बायको या तिघांना नवर्याच्या वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीनिमित्ताने एकत्र आणते आणि बँड पुन्हा सुरू होतो, पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणि प्राधान्यक्रम समान नाहीत, विशेषत: जो आणि आदित्यचे...... विविध अडचणींवर मात करून हे चौघे पुन्हा स्टेजवर पर्फॉर्म करतात, त्याची ही गोष्ट.
गोष्टीत नवीन काही नाही, तरीही काहीतरी फ़्रेश आहे ( कदाचित नेहमीचा स्टार नाही म्हणून असेल), नॆरेशन स्टाईल / कथनशैली दिल चाहता है च्या जवळ जाणारी.... ( दोघेजण ग्रुपच्या फ़्लॆशबॆकबद्दल आठवत बसतात वगैरे, मित्रांच्यातले गैरसमज आणि पुन्हा एकत्र येणे, दिल चाहता है ची आठवण अपरिहार्य)... .....
रॉक संगीत मला आवडत नसूनही गाणी चक्क बरी वाटली.... उडते अर्थपूर्ण शब्द गंमतशीर.... एकूण संगीतही छान आहे.
फ़रहान अख्तर मला दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आधीपासूनच आवडतो.यात त्याने अभिनयही अप्रतिम केलेला आहे.त्याचा दहा वर्षांपूर्वीचा रॊकस्टार लूक आणि दहा वर्षांनंतर सर्व भूतकाळ पेटीत गुंडाळून ठेवलेला यशस्वी बिझनेसमन असं रूपांतरण अप्रतिम.....
मध्यंतराजवळचा त्याचा बायकोशी भांडणाचा संवाद आणि शेवटचा जोच्या बायकोशी होणारा संवाद लेखनात जबरदस्त जमून आलेला आहे.स्वाभाविक लिहिलेले संवाद आहेत.ओढून ताणून मेलोड्रामा करायचा अजिबात प्रयत्न नाही.अर्जुन रामपाल आणि त्याच्या पत्नीचे काम करणारी शबाना गोस्वामी हिचे कामही उत्तम झालंय.
हे सगळं असो.
मला यात जास्त जाणवलेली गोष्ट म्हणजे केवळ रॊक वाद्यवृंदाने बनवलेलं संगीत इतकाच मर्यादित विषय नाही हा.
तुम्हाला मनापासून जे करायला आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे, असा हा चित्रपट सतत सांगतो.... मध्यंतरापर्यंतची आदित्यची घालमेल आहे, जी द्विधा मनस्थिती आहे,त्यात कित्येकांनी स्वत:ला पाहिलं असेल.....
... कॊलेजमध्ये असताना आपण कशाच्या तरी बाबतीत पॅशनेट होतो (चित्रकला असेल, अभिनय असेल, वाचन - लेखन असेल, गिर्यारोहण, एखादा क्रीडाप्रकार असेल) पण आता ते सारं कुठंतरी दूर असल्यासारखं होतंय....हुरहूर आहे, अस्वस्थता आहे..... भौतिक प्रगती आहे,संसार चांगला चालू आहे, उत्तम नोकरी / प्रमोशन्स आहेत, गाडी / बंगला/ नोकर चाकर आहेत, पण समाधान ? ... मला काय करायचं होतं आणि मी आत्ता काय करतोय, हा प्रश्न आणि हे उत्तर सगळ्यांच्याच बाबतीत सारखं नसणार.....
Twenty years from now you will be more disappointed by the things that you didn't do than by the ones you did do. ... हे मार्क ट्वेनचे प्रसिद्ध वक्तव्य या सिनेमासंदर्भात कोणत्यातरी मुलाखतीत ऐकले..... अगदी योग्य आहे हे या सिनेमासंदर्भात.
अर्थात कला क्षेत्रात पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून झोकून देणे सोपे नसतेच. .. कलाकार म्हणून ज्याच्या त्याच्या कौशल्याची (आणि धीर धरण्याची, नशिबाची) ती कसोटीच...आपली आवड हा पूर्णवेळचा व्यवसाय होणे हा अत्यंत नशिबाचा भाग आहे....हा तर एक स्वतंत्र विषयच आहे...
..पण किमान छंद म्हणून तरी आपल्या आवडी जोपासायला हव्यात.... त्यासाठी क्वॉलिटी टाईम द्यायला हवा.हे तरी या रॉकऑनच्या निमित्ताने पुन्हापुन्हा जाणवले....
प्रतिक्रिया
2 Sep 2008 - 1:35 am | टारझन
दिल चाहता है आपला नंबर वन आवडीचा चित्रपट आहे .. आणि झंकार बिट्स पण .. आवडलेला.. आता तुमच्यावर विश्वास ठेऊन रॉक ऑन चांगला असेल अशी अपेक्षा करतो आणि डाउनलोड सूरू करतो . थोड्या शब्दांत उत्तम समिक्षण.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 Sep 2008 - 4:47 am | बिपिन कार्यकर्ते
टार्या... टॉरेंट शेअर कर लवकर... मला पण बघायचा आहे ....
बिपिन.
2 Sep 2008 - 6:36 am | मेघना भुस्कुटे
आता पाहायलाच हवा म्हणा की.
लगे रहो मास्तर. नेमकं परीक्षण आहे अगदी.
फरहान अख्तरचं दिग्दर्शन - त्याबद्दल कुणी काही बोलायलाच नको.
पण त्याचे चमकते डोळे, त्याचा खास खर्जातला आवाज आणि दर वाक्याआधी त्याच्या नजरेत येऊन लपून राहिलेलं त्याचं हसणं. आई ग... आता फक्त मुलाखतींवर अवलंबून नको राहायला!
2 Sep 2008 - 7:03 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तम परीक्षण मास्तर. आता नक्की बघतो.
पुण्याचे पेशवे
2 Sep 2008 - 7:04 am | रेवती
लिहायचं परिक्षण? उद्यापासून मुलाची शाळा सुरू. सकाळी लवकर उठावे लागणार....... हा सिनेमा पाहणे जरा लांबणीवर पडेल असे दिसते. पण नक्की पाहणार.
रेवती
2 Sep 2008 - 9:56 am | मनस्वी
ट्रेलर बघून बघू की नको असा विचार चाललेला. आता नक्की बघीन.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
2 Sep 2008 - 12:00 pm | स्वाती दिनेश
मास्तरांचे पॉझिटिव परीक्षण वाचल्यावर आता हा शिनूमा पहायलाच हवा.
स्वाती
2 Sep 2008 - 12:08 pm | केशवसुमार
भडकमकरशेठ,
रविवारीच हा चित्रपट पाहीला आणि मला तरी आवडला..
फ़रहान अख्तर आणि सगळ्यांचीच कामे सुंदर झाली आहेत..
तुमचे परिक्षण नेहमी प्रमाणेच उत्तम..
(रॉक ऑन)केशवसुमार
स्वगतः हा मास्तर अता परिक्षण लिहीण्याचे पण क्लास काढेल.. :W
2 Sep 2008 - 5:43 pm | मनी
तेच म्हणते मला ही आवडला पिक्चर गाण्याबद्दल महानल तर गाण्याचे बोल काही असे ahte.......जसे अस्मा या नीला कूऊ ...पानी गिला गिला कूऊ ...जरा वेगले आहे ekyala ,,,,,पण मजेशीर ahte.........अणि प्रसंगानुरूप ahte.....हे महत्वाचे ,,,,,,,फरहान अख्तर अणि बाकीचे सहकलाकार चांगली साथ देतात........चांगला पिक्चर ...एकदा तरी bagava असा ,,,,,बाकि एकाच गाने फेमल लीड ने गायले आहे ....."हमारी ये बाते" ते बाकि मस्त जमले आहे....
2 Sep 2008 - 6:04 pm | जैनाचं कार्ट (not verified)
बघायला हवा मास्तर ह्या चित्रपट... छान स्टोरी वाटत आहे वाचताना तरी :)
परिक्षण आवडले !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
2 Sep 2008 - 6:14 pm | विसोबा खेचर
मास्तर,
सुंदर परिक्षण!
शिणेमा नक्की बघणार.. :)
तात्या.
2 Sep 2008 - 6:35 pm | धनंजय
परीक्षणावरून कुतूहल निर्माण झाले आहे.
2 Sep 2008 - 6:46 pm | मनी
बाकि एक गोस्ट लक्षात आले असेलच ... अर्जुन रामपाल ला अजिबात गिटार प्ले करता येते नही ... :)
सोबत च्या लिंक मधे rock on!! चे फोटो पाहू शकता
http://in.movies.yahoo.com/movies/Rock-On/moviestills/slideshow-10302.html
2 Sep 2008 - 7:01 pm | सुचेल तसं
मास्तर,
छान परिक्षण!!!!
मी नेहेमी राजीव मसंदचं आयबीएन लाईव वरचं परिक्षण वाचून मगच पिक्चर पहायचा का नाही ते ठरवतो. १० पैकी ९ वेळा तरी त्याचं परफेक्ट परिक्षण असतं. तरण आदर्श किंवा इतर साईट्सवरचे समीक्षकांवर विसंबून रहाण्यात अजिबात अर्थ नाही.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
4 Sep 2008 - 2:46 pm | भडकमकर मास्तर
मी नेहेमी राजीव मसंदचं आयबीएन लाईव वरचं परिक्षण वाचून मगच पिक्चर पहायचा का नाही ते ठरवतो. १० पैकी ९ वेळा तरी त्याचं परफेक्ट परिक्षण असतं.
बर्याच अंशी सहमत.. कारण इतर क्रिटिक मंडळींपेक्षा तो बराच चांगला आहे....
( एकदाच राजीव मसंदचा वाईट अनुभव होता... मधुर भांडारकराच्या ट्रॅफिक सिग्नलला त्याने मायनसमध्ये रेटिंग दिलेलं होतं... इतका काही वाईट नव्हता तो सिनेमा)
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
8 Sep 2008 - 7:10 am | मेघना भुस्कुटे
मलापण नव्हता आवडला मास्तर 'ट्रॅफिक सिग्नल'. टोटल फिल्मी होता असं वाटलं. गरिबांची लव्हस्टोरी, गरिबांवर अन्याय, गरिबांचा डान्स नंबर...
3 Sep 2008 - 7:49 am | डॉ.प्रसाद दाढे
मास्तर म्हणतात तर पाह्यलाच पाहीजे! उत्तम परीक्षण.
4 Sep 2008 - 4:15 pm | सचीन जी
मी प्रोमोज पाहुन सिनेमा पहायचा ठरवला होता आणि पाहिलाही!
एकदम रॉक सॉलिड आहे बॉस!
दहा वर्षात प्रत्येकात पडलेला फरक चांगलाच हायलाईट केलाय - कपडे, हेअर स्टाईल, राहाणीमान सगळेच! एटिट्युड तोच आहे - पण झाकोळलेला. निखारयावरची राख फुंकताच परत स्फुलींग तडतडतात!
अजुन एक खास बात म्हणजे - पुरब आणि ल्युक केनी हे चॅनल व्ही चे गाजलेले व्ही.जे. आहेत.
आणि संगीत तर अफलातुनच आहे! रॉकची झिंग, नशा बरोबर पकडली आहे. नाही तर काही वर्षापुर्वी आलेल्या बाप्पी लाहीरींच्या रॉक डान्सर नामक सिनेमात चक्क डिस्को प्रकाराची गाणी होती!
एकुणच हिंदि सिनेमा बदलतोय !!!
15 Sep 2008 - 12:40 am | मेघना भुस्कुटे
बघितला 'रॉक ऑन'. पण मला काही खूप आवडला नाही. चांगला आहे, पण महान नाही.
फरहान अख्तरला सगळ्याच गोष्टी खूप सहजगत्या मिळतात असं वाटलं. आणि शेवट तर फारच सोपा केलेला. मनातला कडवटपणा इतक्या सहजासहजी जात असेल? निदान तो जाताना काहीतरी उलथापालथ तरी होईल... तिथे सिनेमा कमी पडला असं वाटलं.
पण गाण्यांचे शब्द अफलातून. मेरे लॉण्ड्री का एक बिल... जबराट.
फरहान कैच्याकाईच माल दिसला आहे आणि वावरला आहे.
ती अर्जुन रामपालची बायको मस्त आहे. 'जाने तू'मधल्या शालीनसारखं हिच्याकडेपण लक्ष ठेवावं लागणार.
आता 'वेनस्डे' आणि 'मुंबई..' बघायचाय. मग 'लास्ट लिअर'. खूप बॅकलॉग आहे....
26 Sep 2008 - 10:36 am | सुचेल तसं
>>बघितला 'रॉक ऑन'. पण मला काही खूप आवडला नाही. चांगला आहे, पण महान नाही.
सहमत. कच्चे दुवे: १) फरहान त्याच्या गर्लफ्रेंडला अचानक सोडून जातो हे काही पटत नाही. एकतर तिची काहीच चूक नसते. २) रॉबला ट्युमर होतो हे तद्दन फिल्मी ३) शेवट अगदी गोड केला आहे. शहाना गोस्वामीला तिचा dream job मिळतो. जो आणि केडी मिळून म्युझिक कंपनी सुरु करतात. शेवटी तर ह्या सगळ्यांबरोबर फरहानची जुनी गर्लफ्रेंड आणि तिचा नवरा पण दाखवले आहेत.
तरीही पिक्चर आवडतो. रॉक म्युझिक तर थिएटर मधेच ऐकण्यात मजा आहे.
>>आता 'वेनस्डे' आणि 'मुंबई..' बघायचाय
वेन्स्डे मस्त आहे. एकदम अनप्रेडिक्टेबल!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
26 Sep 2008 - 1:21 pm | भडकमकर मास्तर
१) फरहान त्याच्या गर्लफ्रेंडला अचानक सोडून जातो हे काही पटत नाही. एकतर तिची काहीच चूक नसते. २) रॉबला ट्युमर होतो हे तद्दन फिल्मी ३) शेवट अगदी गोड केला आहे. शहाना गोस्वामीला तिचा dream job मिळतो. जो आणि केडी मिळून म्युझिक कंपनी सुरु करतात. शेवटी तर ह्या सगळ्यांबरोबर फरहानची जुनी गर्लफ्रेंड आणि तिचा नवरा पण दाखवले आहेत.
मस्त ... हे तीनही मुद्दे खटकतातच...एकदम पटले... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 1:33 pm | मनिष
मलाही 'रॉक ऑन' सिनेमा आवडला, पण जेवढा गाजला त्यामानाने खूप ग्रेट असा नाही वाटला. पन तुम्हाला जे मनापसून वाटते/आवडते ते करा हे फार आवडले...मला वाटते पुरुषांना/मुलांना तो जितका आवडला, तितका स्त्रीयांना/मुलींना नाही आवडला...
'वेनस्डे' ठीक आहे, शेवटी क्लायमॅक्स आणि अनपेक्षित वळण ह्यामुळे प्रभावी होतो - पण तरीहि पटला नाही...मलाही असे होऊ शकते का हा प्रश्न राहिलाच. पोलीस इतक्या शांतपणे ह्या गोष्टी सोदून देत नाही, सोडून देऊ शकत नाही हे महिती आहे...तसेच एक सामान्य मानसाने हा प्रयत्न केल तर तो अनेक तर्हेने त्यात अडकू शकतो असे वातले...मला तो थोडा इन्क्रेडिबल वाटला. तरीही शेवटचे नसिरचे डायलॉग खास..."वो मेरे जैसे २०० को मारे तो ठीक है, मै उन जैसे सिर्फ ४ को मारता हुं तो तकलीफ होती है?" हे आपणच पोटतिडकीने बोलतोय असे वाटते. मला ह्या तिन्ही मधला "मुंबई मेरी जान" सगळ्यात वास्तववादी आणि फ्रेश वाटला!
26 Sep 2008 - 1:05 pm | योगेश ९८८१
गिटार वाजवणे सोड त्याला काहिच येत नाय...............