===============================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
===============================
कुमाऊं – नयनरम्य नैनिताल
नैनिताल, आमच्या प्रवासातला शेवटचा टप्पा आणि सुरुवातीलाच सांगायला हरकत नाही की मी आजवर भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी सर्वात छान व रोमॅंटीक!! नैनितालबद्दल पूर्वी जेव्हा केव्हा ऐकले/वाचले होते तेव्हा कायम नैनिताल-मसुरी-जिम कॉर्बेट असेच असायचे. प्रत्यक्षात नैनिताल आणि मसुरी हे एकमेकांपासून बरेच लांब आहेत. ह्या ट्रीपची तयारी करताना ही माहिती कळाली. उत्तरेतील पर्यटक सहसा नैनिताल व मसुरी एकत्र करत नाही, आपल्याकडच्या पर्यटन कंपनी मात्र कायम हे एकत्र ठेवतात. असो. नैनितालचे एक हिंदी चित्रपटातले गाणे पण ऐकल्याचे आठवत होते. “तालों मे नैनिताल, बाकी सब तलैया. . .” असे काहीसे बोल होते त्या गाण्याचे. तर असे हे नैनिताल कुमाऊंमधले सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. नैनिताल हा साधारण डोळ्याच्या आकारासारखा एक मोठा तलाव आहे. तलावाच्या काठावर नैना देवीचे मंदिर आहे. ह्या देवीच्या नावावरुनच नैनिताल हे ह्या गावाचे नाव पडले. ‘ताल’ म्हणजे तलाव. नैनितालमधे अनेक तलाव आहेत. त्यामुळे ह्याला ‘तलावांचा गाव’ म्हणायला काहीच हरकत नाही. नैनिताल आमच्या प्रवासात सर्वात शेवट ठेवण्याचे कारण म्हणजे इथुन रेल्वेस्टेशनचे गाव, काठगोदाम, जवळ आहे. आमची परतीची रेल्वे सकाळी ९ वाजता होती त्यामुळे लांबचे पर्यटनस्थळ सर्वात शेवट ठेवून काही उपयोग नव्हता.
नैनिताल
रानीखेतपासून नैनिताल साधारण २-३ तासांच्या अंतरावर आहे. नैनितालचे मुख्य आकर्षण हे अर्थातच ‘नैनिताल तलाव’ आणि त्याच्या बाजूनेच जाणारा ‘मॉल रोड' हे आहे. तलावाचा व्ह्यू मिळावा म्हणुन ह्या मॉल रोडच्या बाजूने अनेक हॉटेल्स आहेत. तुमच्या बजेटनुसार स्वस्त ते लक्झुरीयस असे अनेक पर्याय ह्या मॉल रोडच्या आजुबाजूला आहेत. ह्यापैकीच एक, ‘हॉटेल अलका’, आम्ही आमच्या नैनितालमधल्या मुक्कामासाठी निवडले होते. हॉटेलचे लोकेशन पाहिल्यावर आमची निवड एकदम अचूक निघाल्याचे जाणवले!! हे हॉटेल नैनी तलावाच्या एकदम बाजूलाच. मराठीतच सांगायचे तर बॅंग ऑन नैनी लेक आणि बॅंग ऑन मॉल रोड!! आम्ही रूमदेखिल मुद्दामच सर्वात वरच्या, म्हणजे चौथ्या मजल्यावर घेतली. चौथ्या मजल्यावर हॉटेलने रूम्सच्या समोर एक छोटे artificial lawn केले होते. आणि तिथे मस्त टेबल-खुर्च्या टाकलेल्या होत्या. तिथे बसुन कॉफी पिता पिता समोरचा नैनी तलाव बघणे एक वेगळीच मौज होती. दुपारी १२-१च्या उन्हातसुद्धा तिथे काही फारशी गर्मी जाणवत नव्हती. हॉटेलचे नुसते लोकेशनच उत्तम नव्हते तर एकुणच सर्व सोयी, जेवण, कर्मचारी सगळेच अगदी व्यवस्थित व मस्त होते.
नैनिताल
नैनितालमध्ये बघण्यासारखे तसेच खरेदी करण्यासारखे बरेच काही आहे. मुख्य म्हणजे नैनितालचा तलाव व आजुबाजूचा परिसरच खूप मस्त आहे. तलावच मुख्य आकर्षण असल्याने प्रशासनाने तो स्वच्छ ठेवलेला आहे. बोटींगची चांगली सोय आहे. तुम्ही स्वतः चालवणार असाल तर पेडल बोट घेऊ शकता अथवा नेहमीच्या बोटी देखिल आहेत. पण एक मात्र नक्की की तुम्ही नैनिताल तलावात एकतरी बोटीतुन फेरी मारायलाच हवी. हा तलाव सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने बोटींग करताना नैनितालचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. ह्या तलावाच्या पाण्याचा स्त्रोत सुद्धा मुख्यतः डोंगरावरून वाहत येणारे पाणी हाच आहे. तलावाच्या बाजूनेच जाणार्या मॉल रोडवरून चालणे हा सुद्धा एक रोमांचक अनुभव आहे. अट फक्त एकच आहे की तुमचा जोडीदार तुमच्या बरोबर हवा. अर्थात, ही अट तिथल्या प्रशासनाची नाही तर त्या तलावाची आणि आजुबाजूच्या नयनरम्य परिसराची आहे. जोडीदाराचा हात हातात घेऊन तुम्ही नैनिताल तलावाला फेरी मारायला लागलात तर किती चाललात आणि किती वेळ गेला याचे काही भान राहणार नाही ह्याची ग्यारंटी. पण एक काळजी घ्यायची की चालताना स्त्री पार्टीला तलावाच्या बाजूला ठेवून चालायचे. कारण रस्त्याच्या दुसर्या बाजूला खरेदीसाठीच्या दुकानांची रेलचेल आहे. चुकुन जरी तिकडे लक्ष गेले तरी तुमच्या खिशाला मोठ्ठे बीळ पडेल याची खात्री बाळगा. मॉल रोडच्या बाजूने खरेदीची तसेच खाण्यापिण्याची भरपूर दुकाने आहेत. प्रशासनाने अजुन एक चांगली गोष्ट केली आहे की वाहतुकीला चांगल्या प्रकारे वेसण घातली आहे. तुम्ही जर स्थानिक नसाल तर प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तुमचे वाहन मॉल रोडवर आणाल तेव्हा तुमच्याकडुन प्रवेशकर घेतला जातो. त्यामुळे सहाजिकच मॉलरोडवर येणारी वाहने कमी होतात. दुसरे म्हणजे संध्याकाळी सहानंतर मॉल रोडची दुकानांकडची बाजू वाहतुकीसाठी बंद केली जाते आणि तो भाग फक्त पर्यटकांना चालण्यासाठी ठेवला जातो. वॉकींग प्लाझा. संध्याकाळी सहाजिकच मॉल रोडवर पर्यटकांची झुंबड उडते. आमच्या सारथ्याच्या सांगण्यानुसार, peak seasonमधे तर संध्याकाळी जत्रेसारखी गर्दी होते, इतकी की चालायलादेखिल जागा राहत नाही. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नव्हती कारण आम्ही गेलो तेव्हासुद्धा संध्याकाळी बर्यापैकी गर्दी होती. इथेच असलेल्या ‘Café De Mall’ ह्या caféमध्ये ‘Cinnamon Roast’ असा कॉफीचा एक अफलातून प्रकार प्यायला मिळाला.
नैनिताल तलाव
नैनिताल तलाव
नैनितालमध्ये बघण्यासारखे अजुन बरेच काही आहे. नैनिताल प्राणीसंग्रहालय हे त्यापैकीच एक. त्याचे नावच मूळात Nainital High Altitude Zoo असे आहे. हे प्राणीसंग्रहालय डोंगरावर आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी चढ चढत-चढतच जावे लागते. दुसरे म्हणजे काही खास हिमालयीन प्राणी सोडले तर इथे वेगळे असे काही नाही. पण एक मात्र आहे की इथुन वरून तुम्हाला नैनिताल शहर तसेच तलाव खूप छान दिसतो. नैनितालमध्ये अजुन एक आकर्षक ठिकाण म्हणजे Cave Garden अर्थात गुहांची बाग. वेगवेगळ्या प्राण्यांच्या गुहा इथे पहायला मिळतात. गुहेच्या एका टोकाकडुन आत जाउन दुसर्या बाजूने बाहेर यायचे असते. आतमध्ये प्रकाशाची सोय आहे पण आतमध्ये जाउन बाहेर येणे हा एक फार धमाल अनुभव आहे. छोट्या-छोट्या कपारीतून जाताना चांगलीच कसरत करावी लागते. बर्याचदा रांगत तर काही वेळा तर अगदी सरपटत जावे लागते. त्यामुळे ह्या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी. नैना देवीचे मंदिर चांगले आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथुन तलाव पण खूप छान दिसतो. जवळच एक छोटी केबल कार देखिल आहे. जर पूर्वी कधी बसला नसाल तर एक चक्कर मारायला हरकत नाही.
नैनिताल प्राणीसंग्रहालय
नैनिताल
नैनितालच्या आजुबाजूला बरेच तलाव आहेत. भीमताल, सातताल, नौकुचियाताल, सुखाताल वगैरे. हे सगळे तलाव बघायला अर्धा-एक दिवस पुरेसा आहे. प्रत्येक तलावाचे काही ठराविक वैशिष्ट्य असले तरी साधारणतः सगळे नैनितालसारखेच आहेत. साततालमधे काही Flying Fox, Water Baloon सारखे Water Sports आहेत. तर नौकुचियातालच्या जवळच्या डोंगरावर Paraglidingची सोय आहे. नौकुचियातालच्या तलावाला नऊ कोपरे आहेत म्हणुन त्याचे नाव नौकुचियाताल पडले असे सांगतात. नैनितालपासून जवळच China Point वा Snow View Point आहे. इथुन हिमालयाचे दर्शन होते. इतक्या वेळा हिमालय पाहिला असल्याने आम्ही काही तिकडे गेलो नाही.
नैनिताल तलाव
नैनितालचे दोन दिवस मस्तच गेले. आता परतीचे वेध लागले. परतीचा प्रवासदेखिल खूपच रंजक आणि अपेक्षेपेक्षा जास्तच रोमहर्षक झाला. सकाळी ८:५०ची ट्रेन होती आणि नैनितालपासून काठगोदाम साधारण ३०-३५किमी होते. तरी घाटरस्त्याचा प्रवास म्हणुन आम्ही सकाळी ७वा. नैनिताल सोडले. साधारण ८ पर्यंत आम्ही रेल्वेस्टेशनच्या जवळ पोहोचलो होतो. फक्त १किमी एवढेच अंतर राहीले होते. पुरेसा वेळ होता म्हणुन एके ठिकाणी अल्पोपहार करायचा ठरवला. पण इथेच गडबड झाली. साधारण २०मिनीटे बाकी असताना आम्ही निघालो खरे, पण पुढे बेक्कार ट्राफिक जॅम झाले होते. एवढे की गाडी जागची हलायलाच जागा नव्हती. प्रसांगवधान दाखवून सारथ्याने एके ठिकाणी मधुनच गाडी काढली खरी पण स्टेशनवर पोहोचेपर्यंत ८:४२ झाले. वाटले, की झाले आता, गाडीतच बसायचे; पण आतमध्ये जाउन पाहतो तर गाडी प्लॅटफॉर्म क्र. ३ वर लागलेली होती. बोंबला, एक मोठी बॅग, एक छोटी बॅग, सॅक, छोटा मुलगा हे सगळे घेऊन, पादचारी जीना चढुन-उतरून, डबा शोधुन जागेवर बसायला आमच्याकडे फक्त ८मिनीटे होती. आणि आमचा समय शुरु हो चुका था. मी तर मोठी बॅग घेऊन आणि मुलाला बरोबर घेऊन पळतच सुटलो पण बायकोला ‘जब वी मेट’च्या गीत सारखी ट्रेन चुकवायची नव्हती म्हणुन वाटेत भेटलेल्या पहिल्या हमालाला तिने तिच्याकडचे सामान हवाली केले. वेळेत गाडीत बसलो खरे पण बायकोचा श्वासोच्छ्वास नॉर्मल व्हायला १०-१५मिनीटे जावी लागली. प्रवासातली रंजकता अजुन बाकी होती. दिल्ली रेल्वेस्टेशनपासून विमान सुटेपर्यंत आमच्याकडे २:३० तास होते. मेरू कॅबला फोन करुन ठेवला होता, पण वाटेत कळाले की त्या दिवशी कॉंग्रेस पार्टीने किसान रॅलीचे आयोजन केले होते. मेरु कॅबच्या सारथ्याने हुशारीने वेगळ्या रस्त्याने गाडी काढुन योग्य वेळेत गाडी विमानतळावर पोहोचवली आणि आमच्या परतीच्या प्रवासात अजुन काही रंजकता राहणार नाही ह्याची काळजी घेतली.
एकुण पूर्ण ट्रीप खूप छान झाली. हवामानाने थोडे अडथळे आणले पण एकुण अनुभव फारच रोचक होता.
समाप्त.
===============================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
===============================
प्रतिक्रिया
6 Oct 2015 - 12:56 pm | जगप्रवासी
प्राणीसंग्रहालयातले फोटो छान आलेत, तुम्ही उतरलेल्या हॉटेल मधले आणि त्या मॉल रोडचे फोटो अडकवा ना.
6 Oct 2015 - 1:00 pm | असंका
अरे वा! मजा आली! आमची पण एक ट्रिप झाली तुमच्याबरोबर!!
आजचे फोटो सुद्धा फारच खास! आणि वर्णन एकदम माहितीपूर्ण!!
शिवाय
या वाक्यासाठी तुम्हाला एक जोरदार लाइक. नाइलाजाने मी हा प्रयोग करून पाहिला आहे. कामानिमित्त गेल्यामुळे एकटाच भटकत होतो. कधीतरी ती चुक दुरुस्त करायची इच्छा आहे....
परत एकदा धन्यवाद या सिरीजसाठी.
6 Oct 2015 - 1:59 pm | टवाळ कार्टा
मस्त फोटो :)
6 Oct 2015 - 2:39 pm | पद्मावति
फारच सुंदर सफर. सगळेच भाग छान होते.
नैनिताल खरंच खूप सुंदर दिसतंय.
6 Oct 2015 - 2:45 pm | मधुरा देशपांडे
छान झाली लेखमाला. वर्णन आवडले. आणि फोटो तर अप्रतिम.
6 Oct 2015 - 3:21 pm | सूड
थोडे आणखी फोटो चालले असते, जे टाकले आहेत ते सुंदर आहेत.
6 Oct 2015 - 3:25 pm | मार्गी
सुंदर लेखमाला! नैनितालविषयी छान लिहिलं आहे.
6 Oct 2015 - 4:18 pm | द-बाहुबली
सु रे ख.
6 Oct 2015 - 4:44 pm | पियुशा
स ग ळे भाग वाचले, अप्रतिम निसर्ग सौन्दर्य मस्त टिपलय :)
6 Oct 2015 - 5:41 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर आहे हे सर्व.
वर्णन पण आवडले.
6 Oct 2015 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्णन आणि छायाचित्रे मस्त आली आहेत.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2015 - 2:22 pm | नाखु
आणि नेत्रसुखद.
मोजके (नेमेके) वर्णन आणि नेत्रसुखद प्रचित्रे
7 Oct 2015 - 2:24 pm | दिपक.कुवेत
अप्रतिम आहे सगळं. फक्त वर्णनाच्या मानाने फोटो फार कमी वाटले.
8 Oct 2015 - 7:56 am | सुधीर कांदळकर
उमलत्या वयात वाचलेल्या जिम कॉर्बेटच्या पुस्तकात या भागाचे जवळजवळ १०० वर्षापूर्वींचे सुंदर वर्णन आहे. तेव्हापासून कुमाऊंबद्दल, खासकरून रानीखेतबद्दल मनात कुतूहल होते. सर्वच भागातले फोटो आणि वर्णने लाजबाब. मागील भागातील एक गमतीदार उल्लेख आठवला: सुक्या मेव्याची झाडे.
पण अतिशय मनमोहक आणि आनंददायी सफर. घडवलीत; धन्यवाद.
8 Oct 2015 - 7:59 am | टक्कू
अप्रतिम छायाचित्रे ! अप्रतिम वर्णन !!!!!
8 Oct 2015 - 9:20 am | चौकटराजा
आपल्या धाग्यातील फ़ोटो लाजवाब !माझ्या 2003 च्या प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या .मी सह्कुटुम्ब माल वरून भटकलो ती वेळ एका वेळी तर रात्रीची दहाची अन आमचे केवळ डोळे अनाच्छादित पण नजारा काय सांगू ? बादवे आता अलकाचे निवास दर काय पडले व् महीना कोणता ?
8 Oct 2015 - 11:19 am | तिमा
लेख छान आहे. तुम्ही वर्णन केलेले सर्व पाहिले आहे. त्याशिवाय, तेथे एक सुंदर ऑब्झर्व्हेटरी आहे. ती पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. तिथल्या महाकाय दुर्बिणीतून घडलेले आकाश दर्शन अविस्मरणीय होते.
9 Oct 2015 - 2:47 pm | अ.रा.
झकास वर्णन...झकास फोटो... तुमच्या हॉटेलचे फोटो बघता आले असते तर बरे झाले असते. रूमच्या किमती काय आहेत? तिथे गेल्यावर फसवणूक होण्यापेक्षा आधीच माहिती असलेली बरी. बाकी सगळे लेख आवडले. नैनिताल अवर्णनीय असेच आहे.
9 Oct 2015 - 6:40 pm | एस
मस्त झाली सफर. फोटोही छान आहेत.
9 Oct 2015 - 6:52 pm | कंजूस
भाग एकदमच वाचले एकापाठोपाठ.चांगली झाली आहे सफर ,फोटो -लिखाण मस्तच.हिमालय परिसरांत पूर्ण वर्षभर राहिलं पाहिजे असं वाटून गेलं
23 Oct 2015 - 7:58 pm | शिव कन्या
प्रत्यक्ष घेऊन गेलात तिथे. सुरेख.
24 Oct 2015 - 12:45 am | यशोधरा
इतक्या वेळा हिमालय पाहिला असल्याने आम्ही काही तिकडे गेलो नाही.>> हे एक वाक्य सोडले तर लेख आवडला.