====================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
====================
कुमाऊं – बिन्सर-चौकोरी
आमच्या प्रवासातला पहिला टप्पा ‘बिन्सर’ होता. बिन्सर हे मुख्यत: अभयारण्य म्हणुन प्रसिद्ध आहे. हे उत्तरांचल राज्यातील ‘अल्मोडा’ जिल्ह्यात आहे. समुद्रसपाटीपासुन साधारण २४१२मी ऊंचीवर असलेले बिन्सर हे निसर्गाच्या अत्यंत जवळ आहे. इथे वेगवेगळे पक्षी, प्राणी तसेच काही खास हिमालयीन प्राणी देखिल आढळतात. अभयारण्य प्रवेशासाठी प्रवेश फी आहे. तुम्हाला स्वत:च्या वाहनानेच आत जावे लागते. आतमधे गाईड आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही पायी फिरुन अभयारण्य बघू शकता. बिन्सरमधे मुक्कामासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स, गेस्ट हाऊस ज्याच्या त्याच्या बजेटनुसार सोय आहे. ‘क्लब महिंद्रा’ सारखे काही नावाजलेले पर्याय सुद्धा आहेत. पण हे सर्व पर्याय हे अभयारण्याच्या सीमारेषेबाहेर आहेत. KMVNनी मात्र एक रिसॉर्ट थेट अभयारण्याच्या आत उभारलेले आहे. आणि आम्ही आमच्या मुक्कामासाठी हाच पर्याय निवडला.
KMVN चे रिसॉर्ट अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासुन १०किमी आतमध्ये आहे. हा रस्ता अरुंद, बराचसा दगडमातीचा आणि घनदाट जंगलातुन जाणारा घाटरस्ता आहे. कुठेही नजर गेली तरी मुबलक प्रमाणात ओक, पाईन, देवदार ही झाडे दिसतात. बिन्सर अभयारण्याचे अजुन एक वैशिष्ट्य की तिथे आतमधे वीज पोचलेली नाही. सर्वकाही नैसर्गिकच ठेवायचा जंगल विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्या हे लक्षात यायला वेळ लागला नसेल की KMVNच्या रिसॉर्टवर देखिल वीज नाही. आता क्षणभर तुम्ही डोळे बंद करुन विचार करा की घरात वीज नसल्यावर काय काय होते? आता तेच घर तुम्ही जंगलाच्या मधोमध नेऊन ठेवा आणि परत एकदा विचार करा. तर असाच काहीसा अनुभव घेता यावा म्हणुन आम्ही हे रिसॉर्ट निवडले होते खरे. पण आम्हाला कल्पना नव्हती की आमच्या पुढ्यात काय वाढुन ठेवले आहे ते.
तर आम्ही रिसॉर्टवर पोहोचल्या पोहोचल्याच मॅनेजरने आम्हाला पहिला धक्का दिला. ‘पाणी खेचायचा पंप ४ दिवसांपूर्वी ब्लो झालाय आणि त्यामुळे रिसॉर्टवर पाणी नाहीये. पिण्यासाठी पाणी मिळेल आणि इतर गरजांसाठी फक्त एक बादली पाणी मिळेल.’ २० तास प्रवास करुन तिथे पोहोचल्यावर असे काही ऐकायला मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. आणि आता परिस्थिती अशी होती की काही करता पण येणार नव्हते. आजुबाजुला दुसरे काहीही नाही. दुसरे हॉटेल बघायचे म्हणजे परत पूर्णपणे अभयारण्याच्या बाहेर जाउन नव्याने शोध घ्या. बरे, हे सरकारी रिसॉर्ट असल्याने रिफंड वगैरे असली काही भानगड नाही. एकुण काय तर नारायण पूर्णपणे अडला होता. प्रश्न एका रात्रीचाच असल्याने आम्ही तिथेच थांबायचे ठरवले.
रिसॉर्टवर २-३ प्रकारच्या एकूण १६ रूम्स उपलब्ध आहेत. आम्ही त्यातल्या त्यात चांगली रूम निवडली होती. रिसॉर्टचे बांधकाम जरी कॉन्क्रीटचे असले तरी अंतर्गत सजावट ही पूर्णपणे लाकडाचीच होती. फ्लोअरिंग, बेड, खुर्च्या, टेबल तसेच भिंतींवरदेखिल लाकडी पट्ट्या मारल्या होत्या. त्यामुळे एकदम जंगल रिसॉर्टचा फील होता. रूम मात्र त्यामानाने छोट्या होत्या. रूममधुन व्ह्यू पण चांगला होता. वीजच नसल्याने रूममध्ये कुठलेच इलेक्ट्रॉनिक साधन नव्हते. रिसॉर्टवर संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत जनरेटरवर वीज असते. तेवढ्या वेळात मोबाईल चार्ज करणे, जेवण करणे वगैरे गोष्टी उरकुन घ्याव्या लागतात. नंतर मात्र पूर्ण अंधार. रूममध्ये त्यांनी पुरेशा मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत. त्याच प्रकाशात उरलेली रात्र ते सकाळी उजाडेपर्यंतचा वेळ काढावा लागतो. हा एक विलक्षण अनुभव आहे. आणि तो प्रत्यक्षच अनुभवायला हवा. बिन्सर उंचावर व जंगलात असल्याने गर्मी अशी नाहीच. गारठा मात्र प्रचंड. पाणीदेखिल प्रचंड गार. मग ते पिण्याचे असो वा वापरण्याचे. इथली अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे गच्ची (टेरेस). इथे उभे राहुन हिमालयाची लांबलचक पर्वतरांग दिसते. असे म्हणतात की वातावरण स्वच्छ असेल तर साधारणपणे ३००किमी लांबीची पर्वतरांग इथुन दिसू शकते.
संध्याकाळचा हिमालय (बिन्सर)
तर प्राप्त परिस्थितीत जेवढे ताजेतवाने होता येईल तेवढे झालो. कुमाऊंनी पद्धतीने बनवलेले पण घरगुतीच वाटू शकेल असे जेवण करुन थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी बाहेर बर्यापैकी ढग जमुन गडगडाटाला सुरुवात झाली होती. जंगल सफारीला जायची इच्छा होती. पण गाईडने सांगीतलेले अंतर, मुलाला बरोबर घेउन चालायची गती आणि गडगडणारे ढग ह्याचे गणित नीट जमत नव्हते. मग आम्ही रिसॉर्ट नजरेच्या टप्प्यात राहील अशा अंतरापर्यंत स्वत:च चालत जायचे ठरवले. थोडे अंतर जातोय तेवढ्यातच पाऊस सुरु झाला. आमच्या उत्साहावर पावसाने चांगलेच पाणी फेरले. संध्याकाळचा सूर्यास्त बघायला मिळणार नाही पण दुसर्या दिवशीचा सूर्योदय तरी पहायला मिळेल का अशा ‘शंकांचे ढग’ आमच्या मनात दाटले. पाऊस थांबल्यावर टेरेसवर बराच वेळ थांबलो. पण हिमालय बराचसा ढगांनी झाकोळलेला होता. मुलाला मात्र वार्यामुळे बदलत जाणारे ढगांचे वेगवेगळे आकार बघण्यातच मौज वाटत होती. तिथल्या कर्मचार्यांनी ‘आज पाऊस पडलाय ना, मग उद्या सकाळी आकाश मोकळे झालेले असेल’ असा दिलासा द्यायचा प्रयत्न केला. पण आता आम्ही त्या लहरी हवामानाच्या ताब्यात होतो. तो जे खेळ दाखवेल ते पहाणे भाग होते.
रात्री जोपर्यंत वीज होती तेवढ्या वेळात जेवण उरकुन घेतले. जनरेटर बंद झाल्यावर मेणबत्त्यांनी खोली उजळुन टाकली. मग त्या मंद प्रकाशात गप्पा मारत, पत्ते खेळत, मुलाला गोष्टी सांगत निवांत वेळ घालवला. आजुबाजुला कुठली ई-आकर्षणे नसली की कुटुंबाबरोबर घालवलेल्या वेळाचे खरे मूल्य समजते. पहाटे सूर्योदय पहायला आम्ही ५ वाजताच उठलो. पण लहरी हवामान आमच्या बाजुने नव्हते. बर्फाच्छादित हिमालय अजुनही ‘ढगाच्छादितच’ होता. मूड तर नक्कीच खराब झाला. पण टेरेसवरुन आजुबाजुचा परिसर मात्र अद्भूत दिसत होता. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, अधेमधे असलेली छोटी-छोटी गावे, आजुबाजुची शेती, डोंगरांच्या मधे पसरलेले धुके सारेच छान होते. पहाटेच्या निळसर प्रकाशापासुन उजाडल्यावर पसरणार्या फक्कड प्रकाशापर्यंतच्या बदलत जाणार्या रंगछटा फारच सुंदर होत्या.
सूर्योदयापूर्वी....
सूर्योदय
बाकी सकाळी आमचे आवरुन होईपर्यंत गाईड एक ग्रुप घेऊन जंगलात गेला होता. सकाळची सफारीसुद्धा हुकली. आता तिथे करण्यासारखे काहीच राहीले नव्हते. त्यामुळे तिथुन काढता पाय घेणेच उचित होते. खूप अपेक्षेने इथे आलो होतो. पण बरीचशी निराशाच झाली. अर्थात, हा आमचा तात्कालिक अनुभव होता आणि प्रत्येकाला असाच अनुभव येईल असे नक्कीच नाही. पाण्याची सोय आणि हवामान जर चांगले असते तर नक्कीच मजा आली असती. आम्ही मात्र आता पु्ढे तरी हवामान साथ देईल अशा आशेने चौकोरीकडे निघालो.
बिन्सर KMVN TRHच्या टेरेसवरून दिसणारा हिमालय.
अवांतर:
बिन्सर अभयारण्यात एक ‘झीरो पॉईंट' म्हणुन जागा आहे. तिथुन वा रिसॉर्टच्या टेरेसवरुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)
चौकोरीकडे जाताना आमच्या सारथ्याने ‘शॉर्टकट मारतो' असे सांगुन मुख्य रस्त्यावरुन जायच्या ऐवजी जंगलातुन नेले. हा रस्ता पूर्णपणे मातीचा होता. बहुदा आमची एकमेव कार त्या संपुर्ण रस्त्यावर असावी. कोणी चिटपाखरु सुद्धा दिसत नव्हते. एवढेच काय तर त्या संपुर्ण पट्ट्यात कारमधली घंटा एकदा पण वाजली नाही.(!) आम्ही टरकुनच होतो. गाडी बंद पडली वा पंक्चर झाली तर आजुबाजुला काहीच नव्हते. सारथी मात्र जोमात होता. म्हणजे चेहर्यावर तरी तसेच दिसत होते. त्याने आम्हाला पाईनच्या झाडांना रबराच्या झाडाच्या खोडाला चीक गोळा करायला जश्या वाट्या लावलेल्या असतात तश्या लागलेल्या दाखवल्या. पाईनच्या झाडातुन पण एक चिकट द्रव निघत असतो जो रेझिन वा इतर adhesives बनवण्यासाठी वापरतात. तसेच बुरांश हे एक लाल रंगाची फुले असलेले झाड दाखवले. माहिती उपयुक्त होती. पण आम्हाला लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर पोचायचे होते. तर साधारण १०-१२किमी अंतर गेल्यावर आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. हुश्श...
चौकोरी हे तसे काही लौकीकार्थाने प्रसिद्ध स्थळ नाही. बिन्सरपासुन साधारण ४ तासांच्या अंतरावरचे हे एक छोटेसे गाव ‘पिथोरागड’ जिल्ह्याचा भाग आहे. मुन्स्यारी खूप दूर असल्याने प्रवासी मुख्यत: एक रात्र घालवण्यासाठी जाताना अथवा तिथुन परत येताना इथे थांबतात. हेतु हाच असतो की लांबचा प्रवास किमान एका बाजुने तरी टळावा. डोंगराळ भाग असल्याने इथे रात्रीचा प्रवास करत नाहीत. आमच्याही इथे फार काही अपेक्षा नव्हत्या. आम्ही मुक्कामासाठी कॉटेज घेतले होते. नुकतेच नुतनिकरण झाल्यामुळे ते चांगलेच होते. इथेदेखिल अंतर्गत सजावट ही पूर्णपणे लाकडाचीच होती. इथुनसुद्धा हिमालय खूप छान दिसतो. पण हवामान अजुन आमच्यावर प्रसन्न झाले नव्हते. इथेसुद्धा संध्याकाळी जोरदार पाउस व सकाळी ‘ढगाच्छादित' हिमालय. इथेसुद्धा निराशाच. इथुन जवळ ‘पाताळ भुवनेश्वर' म्हणुन एक जागा आहे जिथे जाता येइल का अशी विचारणा आम्ही सारथ्याकडे केली. पण त्याने नकार दिला. तिथे जाण्याचा रस्ता खूप खराब असल्याने सारथी लोक तिकडे जायचे टाळतात असे त्याच्याकडुन कळाले. मग आम्हीपण त्या फंदात पडलो नाही. कॉटेजमध्येच विश्रांती घेत दिवस घालवला.
कुमाऊंचे घाटरस्ते
पहिले दोन दिवस हवामानाने साथ दिली नाही आणि फार काही पहायला पण मिळाले नाही. निदान पुढेतरी हवामानाने साथ द्यावी अशी अपेक्षा होती. शाहरुखचा ‘ओम शांती ओम'चा डायलॉग आमच्या बाबतीत जरा उलटाच होत होता. शिद्द्तने तर आम्ही देखिल हिमालय बघायची कोशिश करत होतो पण हे हवामान ते व्हावे अशी साजिश करत नव्हते. असो. आम्ही मुन्स्यारीकडे निघालो.
अवांतर:
चौकोरीमधुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
चौखंबा १ (7138 मीटर), चौखंबा २ (7058 मीटर), चौखंबा ३ (6974 मीटर), चौखंबा ४ (6854 मीटर), कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)
क्रमश: ...
====================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
====================
प्रतिक्रिया
21 Sep 2015 - 1:18 pm | एस
त्यातल्या त्यातही जो हिमालय दिसलाय तो फारच देखणा आहे. नगाधिराजाच्या अंगाखांद्यावरील घाटरस्तेही फार चांगले दिसताहेत. पुण्यात असले रस्ते कधी व्हायचे हे इथले 'नग'च जाणोत.
21 Sep 2015 - 1:20 pm | सुहास झेले
मस्त आलेत फोटोज... पुढच्या भागाची वाट बघतोय :)
21 Sep 2015 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
हवामानाने साथ दिली नाही तरी फोटोतून जे हिमालयाचे दर्शन दिसते आहे तेही सुंदर आहे. पुभाप्र.
22 Sep 2015 - 9:48 am | असंका
सुरेख!!!!
धन्यवाद...!!
22 Sep 2015 - 4:58 pm | प्रचेतस
खूपच सुरेख आणि तपशीलवार लिहिलंय.
पुभाप्र.
22 Sep 2015 - 9:37 pm | चौकटराजा
या भागातून 2003 मधे प्रवास केला होता.अतिरम्य हा एकच शब्द पुरेसा.आपले फोटो सुन्दर आलेयत.आन्जावर 300 किमी परिसर कवेत घेणारा एक फ़ोटो आहे .त्यातले नंदा देवी पटकन ओळ खू येते .
23 Sep 2015 - 1:27 am | palambar
आम्हसुध्दा दोन वर्षापुर्वी नैनिताल वरुन कौसानी ला हिमालय दिसेल
म्हणून गेलो पण जंगलात आग लागल्याने हिमालय दिसला नाही. तिथून
पुढे कार्बेट नॅशनल पार्क ला गेलो पण तिथे सुध्दा निराशाच
झाली, वाघाचे पण दर्शन झाले नाही. हत्ती, हरीण वगैरे
प्राणी दिसले.
23 Sep 2015 - 2:15 am | सुजल
खूपच सुरेख लिहिलंय.
23 Sep 2015 - 1:59 pm | द-बाहुबली
23 Sep 2015 - 2:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
तिन्हि भाग एका फटक्यात वाचले...मस्त चाललिये सफर तुमची
पुढच्या वर्षी नैनिताल,रानीखेत,दार्जिलिंग असे काहीतरी करायचा प्लॅन आहेच. त्यासाठी माहीती उपयुक्त आहे.