'किल्ला' आणि प्रेक्षक!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 11:14 am

(चित्रपट पाहिला नसल्यास सूचना: काही किरकोळ स्पॉइलर आहेत, त्यामुळे नंतर तक्रार चालणार नाही :) )

काल रात्री किल्ला पाहण्याचा योग आला. चित्रपट निश्चित आवडला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून काही (अस्वस्थ करणारे) प्रश्न पडले.

चित्रपटाचा विषय खूप तरल आहे आणि विनोदी प्रसंगांची पेरणी असली तरी ती गरजेनुसार वातावरण निर्मितीसाठी किंवा असे म्हणूयात एकसुरी/संथ होणे टाळण्यासाठी केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट खूप बोलत नाही. दृश्य-परिणामकारकता(शब्द चुकल्यास सुचवावे), पार्श्वसंगीत आणि शांतता यातून खूप गोष्टी सांगून जातो. हा चित्रपट एक अनुभव म्हणून आपल्याशी जोडून घ्यायचा आहे असे मला वाटले.

चित्रपटगृहातील अनुभव खूप वेगळा होता. बहुसंख्य प्रेक्षक २-३ प्रकारात होते. पहिले म्हणजे ट्रेलर बघून आलेले - ज्यांना 'शाळा' टाईप लव्ह-ष्टोरी अपेक्षित होती, सोबतीला शिव्या वगैरे यांचा येथेच्छ वापर त्यामुळे फुल २ टाईमपास! दुसरे म्हणजे 'राष्ट्रीय पारितोषिक' मिळाले आहे म्हणजे भन्नाट काहीतरी असणार. त्यांच्या नेमक्या काही अपेक्षा नसल्या तरी निखळ मनोरंजन अपेक्षित होतेच.
त्यामुळे या वर्गातील प्रेक्षकांचा अपेक्षाभंग थोड्या प्रमाणात झाला. शेवटी शेवटी तर काहीजण उठून गेले, एकमेकांना शिव्या घालत होते 'का आग्रह केला' म्हणून आणि बहुसंख्य लोक बाहेर पडताना - "अरे याला काही 'ष्टोरीच' नाही!", "किल्ला नाव कशाला दिलंय?", "असा कसा मध्येच सोडला?" अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत होते.
हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण ट्रेलर वरून हिंट घेऊन आलेल्या पब्लिकने अश्लील शेरेबाजी, मध्येच हसणे, ओरडणे या प्रकारांनी पूर्ण विचका करून टाकला होता. म्हणजे त्या मुलाच्या वर्गातील मुली दिसल्यावर दंगा अपेक्षित आहे, किंवा शिव्या खरडल्या जात असताना वगैरे; पण त्या मुलाच्या आईच्या एकटेपणावरून सुद्धा (नवरा नसल्यामुळे) अश्लील शेरेबाजी चालू होती. चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.

आता या सर्व गोष्टींबद्दल कुणाला दोष द्यायचा? प्रेक्षक तर म्हणणार, आम्ही 'ट्रेलर' बघून किंवा 'मनोरंजना'साठी पैसे मोजून तिकीट काढलंय!
'झी मराठी'ने किल्ला आणि फँड्री च्या बाबतीत जाहिरात करताना 'मास-अपील' असणाऱ्या गोष्टींवर भर दिला होता(लव्ह-ष्टोरी इ.) त्यामुळे प्रेक्षक 'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे! पण ह्याची दुसरी बाजू म्हणजे अशी 'पब्लिसिटी' झाल्याशिवाय प्रेक्षक थेटरात जाउन पिच्चर बघत नाहीत!
कोर्ट च्या वेळी पण साधारण असाच अनुभव होता.

आपले अनुभव, मत याविषयी जाणून घ्यायला आवडेल.

बादवे - चित्रपटाचे छायाचित्रण भन्नाट आहे! काय कोकण दाखवलाय - एका शॉटला अख्या स्क्रीनभर समुद्र किनारा आहे आणि मध्ये तो मुलगा बसलाय! अप्रतिम! किल्ला, लाईट-हाउस चे चित्रण पण जबरी. पार्श्वसंगीत आणि एक कविता खूप भारी! 'भूतनाथ रिटर्न्स' फेम खोडकर बालकलाकाराचे काम मस्त आहे(बहुसंख्य लोकांना 'तेवढेच' आवडले)!

समाजचित्रपटविचारप्रतिक्रियाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 11:26 am | शब्दबम्बाळ

किल्ला अजून पहिला नाही पण असाच अनुभव "लक्ष्य" च्या वेळेस आलेला.

मला तरी "लक्ष्य" हा सिनेमा प्रचंड आवडतो पण तो तिकीट खिडकी वर आपटला होता, कारण चुकीची प्रसिद्धी!
चित्रपटातली गाणी आणि ट्रेलर यावरून बर्याच लोकांना तो एक प्रेमकथा वगैरे असेल असे वाटले होते, मध्यंतरापर्यंत सिनेमा हलक्याफुलक्या अंगाने जात होता. प्रेक्षक पण खुश होते पण त्यानंतर जेव्हा युध्द सुरु झाले तेव्हा बर्याच लोकांची घोर निराशा झाली!
खर तर युद्धाचे सीन खूप परिणामकारक पद्धतीने दाखवले होते पण केवळ लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने चित्रपट त्यांच्या पसंतीस उतरला नाही.

जडभरत's picture

2 Jul 2015 - 11:54 am | जडभरत

'झी मराठी'ने किल्ला आणि फँड्री च्या बाबतीत जाहिरात करताना 'मास-अपील' असणाऱ्या गोष्टींवर भर दिला होता(लव्ह-ष्टोरी इ.) त्यामुळे प्रेक्षक 'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे! -------
मी स्वतः पिक्चर पाहिला नाही. पण तुम्ही म्हणालात ते सत्यच. जाहिरात कशा प्रकारे केली जाते, यावर आलेल्या पब्लिकचा प्रतिसाद अवलंबून.

सत्याचे प्रयोग's picture

2 Jul 2015 - 3:19 pm | सत्याचे प्रयोग

कालच पाहिला काय जबरा काम केलंय पोरांनी .
समुद्र आणि पाऊसचे चित्रीकरण तर पण भन्नाट. पाऊस पाहुन तर भजी खायची इच्छा होत होती पण हे multiplex वाले ठेवत नाही. कॉफी वर भागवावे लागले .
हो माझ्या छोट्या मुलीला नाय आवडला हा सिनेमा . ज्यांना समज नाही त्यांना नाही आवडणार हा सिनेमा .

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 3:27 pm | उगा काहितरीच

चित्रपट आवडला , तुम्ही कुठे पाहिला होता ? मी पाहिला तिथे तर कुणी शेरेबाजी वगैरे करीत नव्हते . हं शिव्या वगैरे आल्या तर तेवढ्यापुरता हशा पिकत होता.

अविनाश पांढरकर's picture

2 Jul 2015 - 3:37 pm | अविनाश पांढरकर

चित्रपटाचे छायाचित्रण भन्नाट आहे! काय कोकण दाखवलाय - एका शॉटला अख्या स्क्रीनभर समुद्र किनारा आहे आणि मध्ये तो मुलगा बसलाय!

अप्रतिम छायाचित्रण आहे हा शॉट!

किल्ला आणि फँड्री दोन्ही चित्रपट वेगळे आहेत आणि मला ते दोन्ही आवडले.

जिभेला एका "विशिष्ट " चवीची सवय झाली कि मग रुचीपालट मानवत नाही, हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो.

मला असा अनुभव टाईमप्लीज बघताना पुण्यातला अमानोरा मध्ये आला होता. अत्यंत थर्डक्लास, टोळीने आलेली मुलं आणि एकही संवाद नीट ऐकून देत नव्हते. सात-आठ जणांचा एक ग्रूप जिथे बसला होता त्यात मधल्या दोन रो सोडून त्यांचा दुसरा ग्रुप बसला होता. आणि तिथे बागेत बसल्यासारख्या एकमेकांशी गप्पा मारत होते. एकही संवाद नीट ऐकून दिला नाही. पिक्चरला आलेली वयस्क मंडळी फक्त जळजळीत कटाक्ष टाकत होतीत पण त्याचा त्या मुलांवर शष्प परिणाम नव्हता.

मी चिडून म्यानेजर किंवा तत्सम व्यक्ती भेटत्ये का बघायला उठलो, त्यांची तक्रार करायला. रुममेट सोबत होता, वाटलं होतं तो पण येईल पण तो फट्टू (हाच योग्य शब्द वाटला) निघाला. मी तणतणत वॉचमन कडे गेलो, वॉचमनने शांत चेहर्‍याने एक रजिस्टर दिली. म्हणे यात तक्रार लिहा. म्हटलं पण आताचं काय? तर आता कोणीच नाही. तणतणत परत आलो.

त्या पिक्चरला झाला तितका मनस्ताप कधीच झाला नव्हता.

गुलाम's picture

2 Jul 2015 - 4:05 pm | गुलाम

'झी मराठी'ने किल्ला आणि फँड्री च्या बाबतीत जाहिरात करताना 'मास-अपील' असणाऱ्या गोष्टींवर भर दिला होता(लव्ह-ष्टोरी इ.) त्यामुळे प्रेक्षक 'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे!

माझा अनुभव वेगळा आहे. 'कोर्ट'ची जाहिरात करताना कुठेही मनोरंजक चित्रपट अशी केली नव्ह्ती. ट्रेलर वरुन तो बराचसा डॉक्युमेंट्रीच्या अंगाने जाणारा चित्रपट वाटला होता. तरी पण जेंव्हा आम्ही पिक्चर बघुन (रविवारी संध्या. कोथरुड सिटी प्राईडचा शो) बाहेर पडत होतो तेव्हा प्रातिनिधीक प्रतिक्रीया होती 'या पेक्षा टाईमपास २ बघितला असता तर बरं झालं असतं'.

बाकी नको तेथे शिट्ट्या, हशा वगैरे होतंच रसभंग करायला.

नांदेडीअन's picture

2 Jul 2015 - 4:27 pm | नांदेडीअन

मी किल्ला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला गेलो होतो. (ई-स्केअर, गणेशखिंड रोड, पुणे)
जवळपास हाऊसफुलच होता शो, पण मलासुद्धा असाच अनुभव आला तिथे.
८-१० जणांचे २-३ ग्रूप वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते आणि निव्वळ फालतू शेरेबाजी करत होते.
सुदैवाने त्यांनी कुणीही प्रोत्साहन/प्रतिसाद दिला नाही, नाहीतर चित्रपटाचा आनंद घेता आला नसता.

चित्रपट आवडला मला.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2015 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण ट्रेलर वरून हिंट घेऊन आलेल्या पब्लिकने अश्लील शेरेबाजी, मध्येच हसणे, ओरडणे या प्रकारांनी पूर्ण विचका करून टाकला होता. म्हणजे त्या मुलाच्या वर्गातील मुली दिसल्यावर दंगा अपेक्षित आहे, किंवा शिव्या खरडल्या जात असताना वगैरे; पण त्या मुलाच्या आईच्या एकटेपणावरून सुद्धा (नवरा नसल्यामुळे) अश्लील शेरेबाजी चालू होती. चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.

>>> ++++++११११११११

सकाळचाच ताजा समअनुभव आहे. कॉलेजी मुलामुलिंचं आलेलं टोळकं..अत्यंत हिणकस शेरेबाजी करत होतं.
@चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.

बाकि परिक्षणाशिही सहमत आहे.

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 8:23 pm | उगा काहितरीच

चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.

हे वाचून खरंच वाईट वाटलं तो सीन मुकपणे बरंच काही बोलून जातो, अतिशय उत्कृष्ट जमलाय , पण त्यावरही हिणकस विनोद म्हणजे हद्द झाली. :'(

आई आणि मुलाच्या सीनमध्ये पण अश्लील शेरेबाजी! ह्यांच्या आईबापांनी गर्भाधान सोहळ्यात नक्की काय मंत्र म्हटले ज्यामुळे असली विकृत औलाद जन्माला आली. ही असली किडकी अवलाद स्वतःच्या आईकडे पण तशाच नजरेने बघत असेल.

विशाल कुलकर्णी's picture

3 Jul 2015 - 4:21 pm | विशाल कुलकर्णी

चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.
हे खरोखर अतिशय क्लेशकारक आहे. तो सीन माझ्या मते चित्रपटातला परमोच्च बिंदू आहे. आई आणि मुलामधलं नातं खुप स्पष्ट आणि गडद होतं ते तिथंच. तोपर्यंत हट्टी वाटणार्‍या चिनूला आपल्या आईची अगतिकता, तिचा एकटेपणा कळतो तो क्षण आहे तो. आता बाबा नाहीये आणि आईची काळजी आपल्याला घ्यायला हवी हे त्याला समजते तो क्षण आहे तो.

आम्ही गेलो तेव्हाही हाच गोंधळ होता. तसेच तो दारुडा नाविक आणि चिनु दोघे होडीत बसून सागरात शिरतात आणि काही वेळाने परत येतात. त्या सीनबद्दलही खुप उलटं सुलटं चर्वण चालु होतं. अतिशय विचित्र बोलत होतं पब्लिक. ख्ररतर तो सीन सगळ्या चित्रपटाला कलाटणी देणारा सीन आहे. पण...

असो, किल्ला आवडलाच. तुषार परांजपेची कथा-पटकथा, अविनाश अरुणचं दिग्दर्शन आणि सर्वच मोठ्या आणि सर्वार्थाने मोठ्या असलेल्या लहान कलावंतांचे काम आणि त्यावर वरकडी म्हणजे अप्रतिम सिनेमॅटोग्राफी !

जडभरत's picture

2 Jul 2015 - 5:15 pm | जडभरत

@अत्रुप्तः
काय झालंय तरी काय या पोरांना? किती घाणेरंड वागावं, बोलावं याची काहीच लाज बाळगत नाहीत. कमीत कमी इतरांना त्रास होऊ नये याची तरी काळजी घ्या, मग तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीही करा.

काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर चाल्लंय ते शांतपणे न बघता, कमेंट्स करणे आणि इतरांचा झाला त्रागा बघून आनंद घेणे. अशा वेळी शो थांबवून हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तो सुरु न होऊ देणे हा पर्याय असतो. पण त्यासाठी एकी हवी. खुट्ट झालं की पाय लावून पळणार्‍या पेठेतल्या पुणेकरांना ते झेपायचं नाही, त्यासाठी भकाराने सुरुवात करुन असल्या लोकांना आपण पण कमी नाही हे दाखवणारा मुंबैकरच हवा.

बाप रे हे सूड म्हणजे भलतंच स्फोटक प्रकरण दिसतंय! ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!

संदीप डांगे's picture

2 Jul 2015 - 9:50 pm | संदीप डांगे

सूडभाऊंशी हज्जारदा सहमत.

राडा करायचा सरळ. कारण अशा हिणकस लोकांची काही हिंमत नसते प्रतिवाद करायची. शो थांबवण्याइतका राडा केला की सगळ सरळ येतात.

लई भारी's picture

2 Jul 2015 - 10:59 pm | लई भारी

पुण्यात सध्या हे जरा अवघड होतय. इथेच नाही अगदी रस्त्यावर/सिग्नलला सुद्धा. राडा करायला गेल्यावर असली मंडळी हाणामारी वर उतरायला क्षणाचाही विलंब लावत नाहीत. आपला मुलांचा ग्रुप असेल तर एकवेळ ठीक आहे पण घरातील मंडळी सोबत असल्यावर अधिक अडचण होते. आणि असे प्रकार करून बघितलेत. इतर प्रेक्षक तटस्थ असतात आणि थेटर मॅनेजमेंट काही करत नाही.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राडा/हाणामारी/पोलिस-केस इत्यादी प्रकार केल्याने असल्या टोळक्यांचे काही एक नुकसान होणार नसते, पण आपण या सर्व गोष्टींचा ससेमिरा मागे लावून घेऊ शकतो का?
पळवाट नाही पण याला काही प्रॅक्टिकल पर्याय आहे का?

प्रसाद१९७१'s picture

3 Jul 2015 - 11:32 am | प्रसाद१९७१

ह्याला एकच प्रॅक्टीकल उपाय आहे.

आपल्या घरात बघणे किंवा आपल्या सारखे लोक जमवून त्यांच्या सोबत बघणे ( कोणाच्या तरी घरी ).
त्या साठी होम थिएटर वगैरे घ्यावे थोडा खर्च करुन.

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2015 - 11:48 am | प्रमोद देर्देकर

पुण्यात सध्या हे जरा अवघड होतय.>>
अहो हे तर सगळीकडेच होतंय. त्याला काही इलाज नाहीये. आणि हे आजकालच होतंय असेही नाही. असा प्रेक्षक वर्ग सगळ्या ठिकाणीच असतो. आताही आहे आणि पुर्वीही होता.
नाना पाटेकरने "पुरुष" नाटक २० वर्षांपुर्वी बंद केले ते ह्याच कारणास्त्व आणि ते सुध्दा मुंबईतले प्रेक्षक धुडगुस घालत होते शिवाजी मंदिरला म्हणुन. अक्षरश: खुर्च्यांवर नाचायचे ते नानाच्या एन्ट्रीला.

प्रसाद१९७१'s picture

3 Jul 2015 - 11:30 am | प्रसाद१९७१

आपण सिनेमाचा आनंद घ्यायला जातोय का समाजाला सुधारायला?
तुम्ही राडा करुन ती मुले गप्प जरी बसली तरी तुमचा आनंद गेला तो गेलाच.

तसेही राडा केलात तर तुम्हीच मार खायची शक्यता ९९ टक्के.
वर त्या राड्या थिएटरचे नुकसान झाले ( होणारच )तर काय? तुमच्या समाजसुधारण्याच्या किड्याचा त्रास थिएटर मालकानी का भोगावा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 12:58 pm | अत्रुप्त आत्मा

@ तसेही राडा केलात तर तुम्हीच मार खायची शक्यता ९९ टक्के.>> ओक्के.

@वर त्या राड्या थिएटरचे नुकसान झाले ( होणारच )तर काय? >> हे ही खरच!

@तुमच्या "समाजसुधारण्याच्या" किड्याचा त्रास थिएटर मालकानी का भोगावा.>> हा समाज सुधारण्याचा प्रश्नच नाहिये! हे स्वत: पैसे मोजुन काढलेल्या तिकिटाच्या खेळाचा आनंद घ्यायचा हक्क आहे,त्या विरोधातली कारवाई आहे.

आपल्या भारतीय समाजात त्रास होणाय्रांनि (अश्या वेळी)तात्काळ संघटित होणे..ही प्रथा परंपरा नाहिये. कुणीतरी एक माणुस उठतो , काहीतरी विरोधी कृति करतो. बलिष्ठ असला तर मारतो,माझ्या सारखा भावनाशील मूर्ख असला तर आधी मारतो,नंतर मार खातोही. (काल फ़क्त मी तिन वेळा त्या कुत्र्यांकडे रागानी वळुन पाहिलं,मग त्यांचं अश्लील आवाज काढणं बंद झालं.नाहितर पुढचा राडा निश्चित होता.) पण दोघां बरोबर ईतर त्रास सोसणारे "बरोबर येत नाहित!" हे जर झाले, तर नायजेरिया का कुठल्या देशात जसं चोरी बलात्कारिला सापडला की मॉब कडून तिथेच जाळतात,अशी शिक्षा आहे. तसा काहीसा प्रकार इथेही घडवता येइल. किमान दम देणे इत्यादि , आणि नाही ऐकलं तर मारणे..हे सुद्धा!

आज मुंबईकर्/ठाणेकर असल्याचा अभिमान वाटला.

वेल्लाभट's picture

3 Jul 2015 - 5:10 pm | वेल्लाभट

एक कल्पना आली....
एक राडा कट्टा करा...
दिवसभर ट्रेन, बस, थेटर, सार्वजनिक स्थळे इथे घोळक्याने फिरायचे, एकी असेलच, तेंव्हा, एकीच्या बळावर राडे घालायचे, समाजसुधारणेचं समाधान मिळवायचं आणि मग खादाडी.

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 5:28 pm | टवाळ कार्टा

इ अम इन
तोंडावर Avengers चे मास्क घालून फिरायचे (मला आयर्न मॅन)...आणि सगळ्यात पैले बाबा पाटलांना बोल्वा
आपल्याकडे कितिही चांग्ले काम करायचे अस्ले तरी फोलिसांच्या मर्जीशिवाय कैच कर्ता येत नै (कारण अश्या प्रयत्नांत त्यांच्या खादाडीच्या कुरणांवर परिणाम होउ शक्तो...मग आप्ल्याच अंगावर शेकायचे)

सूड's picture

3 Jul 2015 - 8:45 pm | सूड

भा.पो.

समाजसुधारणेत शष्प इंटरेस्ट नाही. मी भरलेल्या पैशात मला शांततेत मुव्ही बघायला मिळण्याची अपेक्षा तर नक्कीच करु शकतो ना?

फारएन्ड's picture

4 Jul 2015 - 12:53 am | फारएन्ड

पुण्यात, अगदी सपे मधे थिएटर मधे लोकांनी विरोध केलेला आणि अशा लोकांना गप्प केलेले मी पाहिले आहे. टिळक स्मारक मधे तर एकदा कोणत्यातरी नेत्याने नाटकाची तिकीटे फुकट दिली म्हणून "कार्यकर्ते" आले होते पाहायला. प्रत्येक सीनला घाणेरडे शेरे सुरू झाल्यावर थोड्या वेळाने तेथील सपे मधल्याच एका व्यक्तीने एका जोरदार आवाजात सर्वांना उरलेला शो भर गप्प केल्याचे मी स्वतः पाहिले आहे.

उगाच पुण्याला का अकारण हिणवायचे? गेली अनेक दशके नाटके, चित्रपट, सवाई गंधर्व सारखे कार्यक्रम, जाणता राजा, गीतरामायण सारखे प्रयोग, पुरूषोत्तम सारख्या अत्यंत चुरशीच्या नाट्य स्पर्धा शेकड्यानी जेथे होतात तेथे असले प्रकार होत नसतील व ते कंट्रोल केले जात नसतील असे वाटते का? मी स्वतः अनेकदा पाहिलेले आहेत. त्याचे नियोजन करणारे, तेथे व्हॉलंटियरिंग करणारे लोक तिथलेच जवळपासचे असतात. कोठेही पाय बिय लावून पळत नाहीत. बरोबर मॅनेज करतात.

लई भारी's picture

4 Jul 2015 - 5:20 pm | लई भारी

पुण्यातील उत्तमोत्तम कार्यक्रमांमध्ये बरेचसे स्वयंसेवक असतात आणि ते जीव तोडून मेहनत करत असतात. त्या कार्यक्रमा विषयी आस्था आहे म्हणून तिथे असतात. तिथे क्राउडला सांभाळणे साखळी मुळे शक्य होते. आणि बरेचसे पब्लिक काय कार्यक्रम आहे हे माहित असल्यामुळे अपेक्षा क्लीअर असतात.
उलट थेटरात कोणी कर्मचारी नसतात बहुतांश वेळा. 'पैसे वाजवून' आलोय ही भावना थेटरात खूप जाणवते
नांदेडीअन यांचा प्रतिसाद बघा.
http://misalpav.com/comment/714255#comment-714255

लई भारी's picture

2 Jul 2015 - 10:49 pm | लई भारी

ज्यांना समज नाही त्यांना नाही आवडणार हा सिनेमा .

हे समजू शकतो, पण इतर प्रतिक्रियां मध्ये पण लिहिल्या प्रमाणे ही सर्व सुशिक्षित-जाणती मंडळी होती(जी अर्थातच सुसंस्कृत नव्हती)

तुम्ही कुठे पाहिला होता ?

चिंचवड बिग सिनेमाला पाहिला. आधी पण एक-दोनदा असाच अनुभव आहे. माझ्या मते कोथरूड सिटी प्राईड ला बराच बरा क्राउड असतो (मी कोथरूडकर नसून 'गावकुसा बाहेरच्या' उपनगरात(?) राहतो :) )

हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो.

अगदी खरे!

असा अनुभव टाईमप्लीज बघताना पुण्यातला अमानोरा मध्ये आला होता. अत्यंत थर्डक्लास, टोळीने आलेली मुलं आणि एकही संवाद नीट ऐकून देत नव्हते.

आजकाल हे कॉमन झालय अस वाटत. पी व्ही आर, आयनॉक्स ला पण असा अनुभव इतर हिंदी/इंग्रजी चित्रपटाला आलेला आहे.

हे वाचून खरंच वाईट वाटलं तो सीन मुकपणे बरंच काही बोलून जातो, अतिशय उत्कृष्ट जमलाय , पण त्यावरही हिणकस विनोद म्हणजे हद्द झाली. :'(

कीव येते अशा लोकांची, पण दुर्दैवाने खरे आहे.

कमीत कमी इतरांना त्रास होऊ नये याची तरी काळजी घ्या, मग तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीही करा.

माझ म्हणण असच आहे. तुम्ही काय वाट्टेल ते करा पण इतरांना कशाला त्रास?

नाखु's picture

3 Jul 2015 - 8:51 am | नाखु

जसे निव्वळ वय झाले म्हणून मतदान करता येते ( एक सेल्फी) काढून भाव खाता येतो अश्या पीढीचे प्रतिनीधी आहेत ही मंड्ळी आणि वर सूड ने सांगीतलेला उपाय मी "बालगंधर्व" सिनेमाच्या वेळी गलीच्छ शेरेबाजीबद्दल जाब विचारण्यासाठी केला पण आजू बाजूच्या प्रेक्षकांनी "जावू द्या कशाला नादी लागता" म्हणून थांबवले.

नंतर तोच ग्रुप (कॉलेज कन्यका सहीत ) शेरे-बाजीसह सिनेमा उपभोगत राहिला. आणि हो, हा अनुभव एक पडदा सिनेमागृहातला नसून बिग सिनेमा नामक महागड्या थे(ट्)रातला आहे!!!!

बालप पालक ने वाढलेली समज टीपी १-२ ने घालवली असे वाटणारा
नाखुस

लई भारी's picture

3 Jul 2015 - 10:06 am | लई भारी

जाब विचारण्याचा अनुभव असाच आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे हे सर्व् अनुभव मल्टिप्लेक्स मधलेच आहेत.
निव्वळ अमाप पैसा आहे म्हणून मल्टिप्लेक्स ला जाऊन दंगा करण्यात धन्यता मानत असतात. त्यांना अशा कृतीतूतनच आनंद मिळत असतो.

बालप पालक ने वाढलेली समज टीपी १-२ ने घालवली असे वाटणारा

अगदी सहमत!!!!

तरि सुद्धा बालक-पालक पण आंबटशौकीनपणे बघणारे 'नग' पाहिलेत! त्यातला संदेश गेला बोंबलत, ढिन्च्याक-ढिन्च्याक महत्वाचे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2015 - 10:24 am | ज्ञानोबाचे पैजार

असेच अनुभव येत असल्या मुळे पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात चित्रपट बघायची घाई करत नाही.

चित्रपटाची जाहिरात पेपर मधे येणे बंद झाले की मग चित्रपटगृहात जाउन बघतो. त्यातही शक्यतो शनिवार रविवार टाळून. रात्री उशीराचा खेळ असेल तर अतिशय उत्तम.

अतिशय कमी प्रेक्षक (जास्तीजास्त १०-१५ ) एकाग्रतेने चित्रपट पहाता येतो कारण साधारण अशा वेळी थिल्लर प्रे़क्षक जवळाजवळ नसतातच. असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं असतात. पण त्यांच्यापासून योग्य अंतर ठेउन बसले की त्यांचा आपल्याला काही त्रास होत नाही.

नाटकांचेही तसेच कमीत कमी ३० ते ४० प्रयोग झाल्याशिवाय नाटकाला सुध्दा जात नाही. यात अजून एक फायदा होतो, बर्‍याचवेळा बाल्कनीचे तिकीट काढून रंगमंचाजवळ बसून नाटक पहाता येते. (अर्थात बाल्कनीचे तिकीट केव्हा काढायचे हे अनुभवाने समजते. प्रत्येकवेळी ही ट्रीक चालत नाही)

(किल्लाची गर्दी कमी व्हायच्या प्रतिक्षेतला)
पैजारबुवा,

उगा काहितरीच's picture

3 Jul 2015 - 11:25 am | उगा काहितरीच

पैजारबुवा , अगदी सहमत , अॉड टाईमच्या शो ला जायचे ,तेही १-२ आठवड्यानंतर एक फायदा असा कि तिकीटही कमी लागते शिवाय निवांत पहाता येतो चित्रपट .(मी किल्ला इनआॉर्बीटला पाहिला मोजून ३०-४० प्रेक्षक असतील त्यामुळे काहीही त्रास झाला नाही.)

प्रसाद१९७१'s picture

3 Jul 2015 - 11:51 am | प्रसाद१९७१

असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं असतात. पण त्यांच्यापासून योग्य अंतर ठेउन बसले की त्यांचा आपल्याला काही त्रास होत नाही.

तुमचा त्रास त्यांना होत नाही अशी वाक्यरचना पाहीजे ना

प्रियाभि..'s picture

3 Jul 2015 - 12:23 pm | प्रियाभि..

:-D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jul 2015 - 1:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बुवा, उद्या सकाळी १०:१५ चा शो ला जातोय इ-स्वेअरला.
येता काय? अजुनपर्यंत तरी टोटल २० तिकीटे विकली गेलेली दिसतायत.

नाखु's picture

3 Jul 2015 - 2:02 pm | नाखु

इ स्केवर ला??

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 2:29 pm | टवाळ कार्टा

तुम्ही बुआ आहात का?*

*एक पुणेरी खौचट्ट शंका

नाखु's picture

3 Jul 2015 - 2:38 pm | नाखु

मिक्याला आहे !

तितकेच सरळ उत्तर.

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 3:35 pm | टवाळ कार्टा

तो माझाच डूआयडी असेल तर? :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jul 2015 - 3:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

युनीव्हरसिटी रोडवरच्या

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2015 - 2:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण सॉरी.
आम्ही पडलो दत्तभक्त.
शनिदेवांची आणि / किंवा सुर्यदेवांची भक्ती करणे आम्हाला मानवत नाही.
परत केव्हातरी जमवू.
१० तारखेला पालखीला येतोस का?
(मिकाला अपेक्षीत असलेला बुवा मीच आहे हे गृहीत धरलेला)
पैजारबुवा,

लई भारी's picture

3 Jul 2015 - 2:39 pm | लई भारी

चित्रपटाची जाहिरात पेपर मधे येणे बंद झाले की मग चित्रपटगृहात जाउन बघतो. त्यातही शक्यतो शनिवार रविवार टाळून. रात्री उशीराचा खेळ असेल तर अतिशय उत्तम.

मी बुधवारी रात्री ९:३० ला गेलो होतो, तरी पण बरीच गर्दी होती. जाहिरातीचा परिणाम!

तुमचा उपाय चांगला आहे पण आजकाल किल्ला सारखे चित्रपट १-२ आठवड्यात बहुसंख्य ठिकाणांवरून उतरला जातो आणि मग एखादा शो (आमच्या दृष्टीने) लांब कुठे तरी असतो :)
पण एकंदरीत असेच करावे लागेल किंवा मग इतर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे घरी बसून (डी व्ही डी आल्यावर) बघणे उत्तम.

बादवे- अस्तु, इन्वेस्टमेंट, रेगे इत्यादी चित्रपट थेटरात मिसले आहेत. डी व्ही डी पुण्यात किंवा ऑनलाईन कुठे मिळेल?

सिरुसेरि's picture

3 Jul 2015 - 11:00 am | सिरुसेरि

----असा अनुभव टाईमप्लीज बघताना पुण्यातला अमानोरा मध्ये आला होता. अत्यंत थर्डक्लास, टोळीने आलेली मुलं आणि एकही संवाद नीट ऐकून देत नव्ह----------
या सर्व त्रासावर उपाय म्हणजे आता थिएटरमध्ये सुद्धा बाउन्सर नेमले पाहिजेत .

तुषार काळभोर's picture

3 Jul 2015 - 11:36 am | तुषार काळभोर

मला अमनोरामध्ये कोर्ट पाहताना असा अनुभव आला होता. एक उच्चभ्रु वाटणारा तरुण-तरुणींचा, विशीतला ग्रुप होता. ८-१० जण होते. ते सोडून आणखी ८-१० जण होते. १०-१५ मिनिटांनी त्या ग्रुपचा 'भ्रमनिरास' झाल्यावर त्यांची शेरेबाजी, गप्पा, दंगा चालू झाला. "ए, तुला सांगितलं होतं ना, आपण 'तो' पाहू. उगीच तू हा 'बोर' मुव्ही पाहायला लावलास." इत्यादी.
आणि हे सगळं माझ्या पुढच्या रांगेत, माझ्या समोरच्या सीट्सवर.
माझा मित्र डोक्याला हात लावून बसला होता. मग समोरच्या सीटला पायाने जोरात ढकललं. त्याने मागं पाहिलं अन् गप्प बसला. २ मिनिटात परत चालू झालं. एक जण म्हणत होता, "चल यार, 'तो' बघू. हा म्हातारा (कोर्टातला कांबळे) रडतच बसणार आहे."

आवाज चढवून मी म्हणालो, 'आत्ताच्या आत्ता जर सगळ्यांनी थोबाडं बंद केली नाहीत तर कुत्र्यागत मारंल'.
बिचारे नंतर इंटरव्हलमध्ये पण बोलले नाहीत.

नाखु's picture

3 Jul 2015 - 11:40 am | नाखु

हाय्सा म्हणून म्हणू शकता ,
आम्च्या सारख्या पाप्याच्या पितरांनी काय करायचं ??

वि.सू. ह घेणे.

तुषार काळभोर's picture

3 Jul 2015 - 2:58 pm | तुषार काळभोर

:)

नीलमोहर's picture

3 Jul 2015 - 12:13 pm | नीलमोहर

अशा विचित्र पब्लिकमुळे चित्रपट थिएटरमध्ये पहाणं अगदीच कमी केलंय, मोजकेच चांगले चित्रपट मंगला मध्ये बघायचे, तिथे बरेच चांगले लोकं येतात.
मराठी साठी प्रभात छान होतं पण ते सध्या बंद असल्यामुळे प्रॉब्लेम होतो ,
खास करून सीरियस पिक्चर आपण मन लावून पाहतांना लोक फालतू कमेंट करतात तेव्हा जो बेकार विरस होतो..

नांदेडीअन's picture

3 Jul 2015 - 3:16 pm | नांदेडीअन

तो कोळी, चित्रपटातल्या मुख्य नायकाला (बाल कलाकार अर्चित देवधर) मासा खाण्याचा आग्रह करतांनाचा सिन...

ग्रूपमधून कोणीतरी : अरे बामना, नको खाऊ. नको खाऊ.
पब्लिकचा प्रतिसाद = शून्य
ग्रूपमधून कोणीतरी (परत) : ए भटजी, नको खाऊ रेऽऽऽ
माझ्याच रांगेत ७-८ सिट दूर बसलेला एक जण : अरे शांत बसा ना. पिक्चर बघू द्या आम्हाला.
ग्रूपमधले दोघे जण उभे राहून : कोण आहे रे शहाणा ? चल बाहेर, तुला पिक्चर दाखवतो.
पब्लिकचा प्रतिसाद = शून्य

एकटा असेल किंवा दोघे असतील तर एखाद्या वेळी माणूस प्रतिकार करेलसुद्धा.
पण १०-१० जणांच्या ग्रूपसोबत एकट्याने पंगा घेणे परवडेबल नाहीये.

नमकिन's picture

3 Jul 2015 - 4:09 pm | नमकिन

किल्ला पाहिला- शाळा विषय डोक्यात ठेवून गेलो होतो परंतु एका किशोरा वयिन मुलाचे भावविश्व कसे विस्तारत जाते आणि पुढे आपल्या दु:खाहून जास्त दु:ख इतराना असून ते कसे सामोरे जातायत हे अनुभव येऊन सकारात्मक आयुष्याकडे पाहायला शिकतो.
शेवटी पाण्यात उडी मारतानाचा प्रसंग त्याचे ध्योतक आहे.
बाकी सिनेमा मुलुंड मुं, रात्री सहकुटुंब पहिला साधारण 100 प्रेक्षक होते, वाईट अनुभव नाही पण मजेशीर म्हणजे 1 सरदार कुटुंब आले होते आणि सिनेमाचे नाव पाहून उठून गेले, चुकुन या स्क्रीन ला आले होते.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2015 - 5:48 pm | मुक्त विहारि

मी शक्यतो मराठी आणि हिंदी सिनेमाच्या नादी लागत नाही.

आणि टॉकिजमध्ये तर अजिबात नाही.

विकतेचे दुखणे कोण घेईल?

रेवती's picture

5 Jul 2015 - 8:10 am | रेवती

अजून जालावर आला नसावा. पाहिलेला नाही. तरी शिनियर शिटीझन आई वडिलांच्या म्हणण्यानुसार कोकण चांगले दाखवले आहे., सिनेमाचा शेवट वेगळा हवा होता, ज्यामुळे शिनेमा पूर्ण पाहिलाय असे वाटले असते. सर्वात महत्वाचे म्हणजे जवळच्या थेट्रात लागला होता व शिनेमाची वेळ त्यांच्यासाठी चांगली होती म्हणून किल्ला पाहिला.

आमच्या या संभाषणानंतर किल्ला पाहण्याची उत्सुकता संपली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2015 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट आवडला. काय आवडलं विचाराल तर छायाचित्रण खुप सुंदर आहे, अथांग पसरलेला समुद्र आणि मधोमध चिनु (अर्चित देवधर) बरोबर बसल्याचा फिल येतो. खुपच सुंदर. नंतर किल्ल्याचं चित्रण छान, चित्रपटातील पार्श्वसंगीत ऐकायला गोड वाटतं, चित्रपट संथ आहे, वर उल्लेख आला तसा शब्द कमी आणि चित्रणातून अधिक समजुन घ्यायचं आहे, शाळेतील चिन्याच्या मित्रपरिवाराचं चित्रण चांगलं आहे, बंड्याचं (पार्थ भालेराव) काम चांगलं उतरलं आहे. पब्लिक त्याच्या संवादावर खुश दिसत होती. अमृता सुभाषचा अभिनयही सुरेख आहे. हट्टी मुलाचं मन परिवर्तन करणारा नावाड्याचं 'मग तुला काहीही झालं नसतं” या उत्तरानं चिन्याला 'आई' कळते आणि चित्रपट संपला.

पडद्यावर नावं यायला लागली आणि मलाही कळलं चित्रपट संपला. माझ्यासारखेच पब्लिक पुढे कायची वाट पाहात होती असंही वाटून गेलं. चित्रपटाचा शेवट जमलाच नाही, असं माझंही मत आहे. 'आई आणि मुलाचं' गुदमरणं झकासच आलं आहे, पण अजून काही तरी हवंच होतं असं सारखं वाटत होतं. माझं मत चित्रपट गंडला आहे.

बाकी, पब्लिकचा त्रास अजिबात झाला नाही. थ्यांक्स औरंगाबादकर. :)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

6 Jul 2015 - 8:19 am | नाखु

दोन्ही लेकरांना हा सिनेमा दाखवला मल्टीप्लेक्स्च्या अनुभवाने एक पडदा सिनेमागृहात पाहिला.

मोजकीच गणसंख्या असूनही सिनेमा नीट पहाता आला.काही प्रसंग मुलाला समजावता आले. आधि पाहिलेला नसूनही इथल्या माहितीने आणि परीक्षणामुळे.

वरती आलेले अश्लील आणि अश्लाघ्य शेरे ऐकायला मिळाले नाहीत हे सुदैव्च. कारण आधिच्याच आठवड्यात मल्टीप्लेक्स्च्या तिकीट खिडकीवरचा संवाद आठवला.

यो मुलगा : एबीसीडी फूल हाये हा बघायचा का?
एबीसीडी* मुलगी: हा सस्पेंस पिक्चर आहे का?
यो मुलगा : माहीत नाही पण काही भारी असेल.
योचा खडकी-दापोडी** मित्र : नाय रे त्याच्यात टिपी सारख खंग्री काय नाय शाकाल- बिकाल त्याने कल्ला करायला मज्जा येत नाय! ज्याम बोर आहे माझा मित्र लै पकला राव !

एबीसीडी* व्याखेचा उगम स्तोत्र मिपा लेखात आहे अद्ध्भुत तपशीलासाठी व्यनी करणे.
खडकी-दापोडी** स्थलदर्शक नसून वृत्ती दरशक आहे याची नम्र आणि सूचक नोंद घेणे

आनंदराव's picture

6 Jul 2015 - 10:13 am | आनंदराव

नाद खुळा चा सिक्सर

प्रसाद१९७१'s picture

6 Jul 2015 - 10:46 am | प्रसाद१९७१

करमाफी मुळे मराठी सिनेमा स्वस्तात मल्टीप्लेक्स ला बघता येतात आणि त्यामुळे मल्टीप्लेक्स मधे धित्तांग करायची संधी मिळते हा हेतू तर अश्या सिनेमांना येण्यामागे नसेल.

अनिवे, ग्रुप नी येऊन हुल्लडबाजीच जर करायची आहे तर २०० रुपयाच्या तिकीटांपेक्षा १०० चे बरे नाही का?

विजुभाऊ's picture

6 Jul 2015 - 11:47 am | विजुभाऊ

कालच हा पिक्चर पाहिला.
बर्‍याच दिवसानी सर्वार्थाने एक "चित्रपट" पाहिल्याचे समाधान वाटले.
कॅमेराची भाषा म्हणजे काय हे या चित्रपटात पदोपदी जाणवते.
थेटर हाऊसफुल्ल होते.बहुतेक लोक चित्रपट झकास एन्जॉय करत होते.
माझ्या मागे एक कुटुंब एकमेकांतच मोठ्याने बोलत होते मात्र त्याना विनंती केल्यानंतर ते शांत झाले.
पण चित्रपट हा खरोखरीच एक "चित्रपट" आहे. त्यात कित्येक फ्रेम्स सर्वांगसुंदर आहेत.
सर्वात आवडलेला शॉट म्हणजे मुले पोहोण्याच्या तळ्यात उडी मारतात तो. खूपच सुंदर.
शेवटचा बसमधला प्रवास तर सर्वावर कडी करणारा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2015 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

विजुभाऊ ,
ह्याच साठी पुन्हा करायचा आहे अट्टाहास! पर्वाच्या राड्यात ,सिनेमात उपरोक्त सर्व आहे हे कळत होतं,पण त्या कुत्र्यांच्या टोळिमुळे जाणवलं काहीच नाही! :-(

आता उद्या थिएटर आणि वेळ निट निवडणार आहे.

अगदी असेच म्हणतो! कोथरूड वारी करावी लागणार असे दिसते ;-)

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 2:21 pm | द-बाहुबली

अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार असेल तरीही चित्रपट बघत नाही. त्यामुळे हा बघायचा प्रश्नच (कधी) न्हवता. तिचे मल्टीप्लेक्सला पोस्टर लागते हीच मुळात एक डोक्यात जाणारी गोष्ट आहे. यावर काहीतरी उपाय हवाच.

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 3:53 pm | संदीप डांगे

काय हो राग बिचारीवर...?

भयानक ओवर अ‍ॅक्टींङ करते राव... अगदी विहीर वा रामुच्या काँट्रॅक्ट(हा तद्दन टुकारच होता म्हणा) सगळीकडेच तिने प्रेक्षकांचा रसभंग करणारा भयानक अभिनय केला आहे. तिला अंबीनेत्री का म्हनतात तेच समझु राहेना.

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 7:01 pm | संदीप डांगे

हे लय भारी हां मग. ते तमाम बालीउडकर जे करतात त्यापेक्षा अमृतातै फारच संयत अभिनय करतात असं आमचं वयैक्तीत मत आहे.

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 8:57 pm | द-बाहुबली

अमृता सुभाष वर असल्या प्रकारची निरर्थक स्तुती कधीच कुणी केलेली नसल्यामुळे,सदर वैयक्तिक मत "पिंक" म्हणुन दुर्लक्षित करणेत येत आहे.. !

विहीर मध्ये तिने ओव्हरअ‍ॅक्टिंग केलं होतं? ऐकावं ते नवल!!

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 8:57 pm | द-बाहुबली

पहा... ऐकु नका...

काय तरी दिवस आलेत, मुखवटे घेऊन वावणारे अ‍ॅक्टिंग 'बघायला' सांगतायेत!! असो, तुमचं चालू द्या.

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 9:13 pm | द-बाहुबली

ए बाबा इथे मु़खवटा कोणीही घातला नाहीये. हे पहिलं आणी अम्रुता सुभाष भितीदायक अभिनय करते हे दुसरं...

याची सरमिसळ नको.

चालू द्या म्हटलं ना!! :)

माझा दुसरा आयडी जो ब्लॉ़क आहे तो मी नाकारला नाहीये त्यामुळे इथे मुखवटा नाही. आणी अम्रुता सुभाष-वरुन एखाद्याने माझ्याशी वैयक्तीक व्हावे या इतका हास्यास्पद विषय दुसरा. कळावे (कळलं ?).

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

अमृता सुभाष वर असल्या प्रकारची निरर्थक टीका कधीच कुणी केलेली नसल्यामुळे,सदर पिंक "वैयक्तिक मत " म्हणुन दुर्लक्षित करणेत येत आहे.. !

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 5:34 pm | द-बाहुबली

कळवल्याबद्दल आभार.

जडभरत's picture

6 Jul 2015 - 3:56 pm | जडभरत

???

कपिलमुनी's picture

6 Jul 2015 - 4:01 pm | कपिलमुनी

तुमचा पिक्चर आला की सांगा . ई स्केअरला दाखवू

एवढं काय केलं ओ बिचारीनं?

विजुभाऊ's picture

6 Jul 2015 - 5:14 pm | विजुभाऊ

मला चित्रपट खूप आवडला आहे. विषेषतः त्यातल्या चित्रभाषेसाठी.
पुन्हा पुन्हा पहावा असा अर्थात मोठ्या पडद्यावर पहावा असा.
त्या मुले तलावात उडया मारतात त्यावेळेस लाइफ ऑफ पाय मधील दृष्याची आठवण होते.

विशेष आवडला नाही पिक्चर..
सर्वांचे रिप्लाय चांगले आहेत.. पण बिचकत माझे प्रामाणिक मत लिहिलेच..
बहुतेक आमच्या बाळाचा पहिला पिक्चर आणि तिला संभाळताना मे बी निट लक्ष देवु शकलो नसेल.. पण तरीही नाही आवडला...
मुक चित्रण .. देहबोली छान.. छायाचित्रण छान .. पण कथेमध्ये खुप काही सुंदर गुंफता आले असते असे राहुन राहुन वाटले..
असो तुमचे मत वेगळे आहे ते ही मान्य...