"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते. त्यामुळे भारत - पाकिस्तान क्रिकेट मॅच ला सुद्धा एखाद्या युद्धाचा दर्जा प्राप्त होतो आणि सगळे व्यवहार थांबवून लोक ही मॅच पहात बसतात. या मॅच मध्ये जर भारताने डाव जिंकला तर जितका जल्लोष होतो तितका जल्लोष जगतज्येत्या ऑस्ट्रेलियन संघाविरूद्धा मॅच जिंकल्यावरही होत नसेल. या द्वेषाची मुळं फाळणी मधून आढळतात. फाळणीच्या वेळी झालेली जाळपोळ, पाडलेल्या कत्तली.. स्त्रियांचि झालेली विवंचना. असं म्हणतात की, लाहोर वरून ३ रेल्वे गाड्या भरून हिंदू लोकांची प्रेतं पाठवली. आणि जेव्हा तशीच एक गाडी जेव्हा अमृतसरहून लाहोर ला गेली तेव्हा हा प्रकार थांबला. मला त्या विषयाबद्दल सध्या काहीच बोलायचं नाही. पण आताचा भारतीय नागरीक आताच्या पाकिस्तानी नागरीकाशी जवळीक साधू शकेल का? याचं उत्तर अर्थातच ५०%-५०% आहे.
भारत- पाकिस्तान संबंध सुधारावेत म्हणून आजपर्यंत जे काही प्रयत्न झाले त्यातलाच एक प्रयत्न होता भारत - पाक क्रिकेट मॅच चा. त्यावेळी पेपरमधून दिलिप वेंगसरकर, सुनिल गावस्कर, संदिप पाटील यांसरख्या ज्येष्ठ खेळाडूं ना पाकिस्तानात आलेले अनुभव वाचयला मिळाले. आणि जे वाचले त्यातले ९०% चांगले अनुभव होते. आणि ते वाचून खूप बरं वाटलं होतं. भारतात पुण्यासारख्या शहरात रहात असताना, काही बांगलादेशी विना परवाना रहात होते, तसेच एका प्रतिष्ठीत शिक्षण संस्थेतला एक चांगला शिक्षक हा एका कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचा कार्यकर्ता होता .. या अशा बातम्या वाचताना पाकिस्तान किंवा बांग्लादेश यांच्याविरूद्ध मनात एक अढी निर्माण झाली. माझ्याच काय पण ८५% भारतीयांच्या मनांत अशिच अढी असणार याची खात्री आहे. पण जेव्हा तुम्ही सीमा ओलांडता तेव्हा...??
मी भारत सोडून अमेरिकेत आले ती ही अशी अढी मनांत ठेवूनच. कर्मधर्म संयोगाने जिथे जिथे राहिले तिथे मराठी, गुजराथी, आणि दक्षिण भारतीय लोक आजूबजूला होते. त्यामुळे भारतातल्याच एका गावात आल्यासारखे वाटत होते. एशियन ग्रोसरि स्टोअर्स मधून जेव्हा किराणा भुसार सामान आणायला जायचो तेव्हा तिथे पाकिस्तानी उत्पादनेही असायची पण चुकुनसुद्धा कधी पाकिस्तानी पदार्थाला हात लावला नाही. का?? मानसिकता. पण जसजशी इथे रूळले .. ओळखी वाढल्या तसतसा या माझ्या विचारांमधला फोलपणा लक्षात आला. कारण इथे 'इंडियन' या बिरूदावली सोबतच तुमची आयडेंटीटी असते "ऍन एशियन'! मग त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, चायना, मलेशिया, कोरिया .. हे आणि संपूर्ण आशिया खंडातले देश समाविष्ट होतात. त्यातही भारत - पाकिस्तान आणि बांग्लादेशी त्यातल्या त्यात जवळचे त्यामुळे एकमेकाशी अतिशय जवळीकीने वागतात.
याचा प्रत्यत मला २-३ वेळा आला. मुलांना खेळण्यासाठी बनवलेल्या प्ले एरिया मधे जेव्हा एखादी आपल्यासारखी स्त्री भेटते , ती तिच्या मुलीला खेळायला घेऊन आलेली असते. माझ्या मुलाशी तिची मुलगी अतिशय छान खेळत असते. मी आणि ती अगदी आनंदाने दोघांचा खेळ पहात असतो. आम्हाला एकमेकीची नावही माहिती नसतात. पण हळू हळू संभाषण वाढतं . ती विचारते की, "आप कहॉ से हो?" मी सांगते "पूना, महराष्ट्रा". मी तिला विचारते, 'और आप??" अपेक्षा असते तिने हैदराबाद किंवा लखनौ असे काही सांगवे कारण तिचे नाव "रझिया" असते आणि तिच्या मुलिचे " अल्मास". पण ती अचानक सांगते, " लाहोर से ." मी एकदम तिच्याकडे पहाते आणि विचारते, "पाकिस्तान से हो?" असे विचारताक्षणी तिचा चेहरा थोडासा उतरलेला मला जाणवतो. का?? ती पाकिस्तानी असल्याचे मला समजताच मी तिच्याशी निट बोलणार नाही असे तिला वाटले असावे का?? किंवा कदाचित आजपर्यंत पाकिस्तान ने दहशत वादाला खतपाणी घालण्याची चोख बजावलेली भूमिका या पाकिस्तानी लोकांना अपराधी भाव देऊन जाते का? किंवा पाक मधून होणारी घुसखोरी जी भारतीय लष्कर हाणून पाडते आहे.. ती तर कारणीभूत नसेल?? मी विचार करत असतानाच ती मला विचारते, 'क्यों.. क्या हुआ??" आणि माझ्या मनांत चाललेल्या विचारांची झळ तिच्यापर्यंत पोहोचली या विचाराने माझी मलाच लाज वाटते. कारण ती पाकिस्तानी आहे हे समजे पर्यंत तिच्याशी अनेक विषयांवर माझ्या गप्पा झालेल्या असतात. इतक्या की ,गोर्या लोकांची मुलं आपल्या मुलांपेक्षा जाडजूड असतात.. कारण त्या बायका आपल्यासारख्या भात- दाल- भाज्या- रोटी असलं काहीही देत नाहीत, रेडिमेड बेबी फूड देतात. आणि या गप्पा मारत असताना "आपली मुलं" , "आपल्या सारखं जेवण" इथे प्रत्येक ठिकाणी "आपण" हा शब्द मी तिला माझ्यासोबत गृहीत धरून वापरलेला असतो. मी स्वत:च्या मनाला आवरते. आणि पुन्हा तिच्याशी नीट बोलू लागते. कारण आता आम्ही भारतीय किंवा पाकिस्तानी नसून 'एशियन" असतो. अर्थातच ती तिच्या भागाबद्दल सांगते आणि मी माझ्या.
मुलाच्या प्रिस्कूल मध्ये मागच्या वर्षी त्याच्या शिक्षिकेनी सांगितलं की, मुलांना बनवता येतील असे सोपे भारतीय गोड पदार्थ आम्हाला सांग. आम्ही मुलांच्याकडून ते करवून घेणार आहोत. उदाहरणादाखल त्यांनी मला एका डब्यामध्ये खीर होती, ती टेस्ट करायला सांगितली. मी म्हणाले 'मस्त आहे". शिक्षिकेने सांगितले सोहेल नावाच्या पाकिस्तानि मुलाच्या आईने ती पाककृती दिली होती. तो शिरखुर्मा होता. तिने मला विचारले, ' तुला ह पदार्थ माहिती असेलच" मी ही " हो. " असं म्हणाले. त्यानंतर जेव्हा त्या मुलाची आई भेटली तेव्हा मी तिला सांगितले की, खिर सुंदर झाली होती. ती म्हणाली, ' ये गोरे लोग क्या जाने, असली घी क्या होता है?? इन्होने सारे बादाम और काजू ओलिव्ह ऑइल में फ्राय किये है. अब इनको क्या बताना की, घी क्या होता है??" ती मला गृहीत धरून बोलत होती. असली घी फक्त आपल्यालाच माहिती या फिरंग्याना कसे समजणार या तिच्या बोलण्यातून तिला माझ्याबद्दल वाटलेली आत्मियता दिसून आली.
मुलाला एकदा प्ले ग्राऊंड वर खेळायला घेऊन गेले असता तिथे आमच्यातला संवाद ऐकून एक गोरी बाई आली म्हणाली, "यू आर फ्रॉम इंडिया ऑर पाकिस्तान ऑर बाग्लादेश??' मी म्हणाले " इंडिया". तिने नंतर सांगितले की, ती बांग्लादेशात काम करते आणि सध्या सुट्टीवर आलि आहे. ती म्हणाली की, भाषा खूपशी सिमिलर वाटली म्हणून ती बोलायला आली. "यू पिपल आर रिअली व्हेरी नाइस बाय नेचर" या तिच्या वाक्यात "यू पिपल" मध्ये तिने भारतीय उपखंडात असणार्या सगळ्या लोकांना गृहीत धरले होते. बांग्लादेशात राहून ही एक अमेरिकन बाई एका भारतीय स्त्रीला म्हणते की, तुम्ही सगळे खूप चांगले आहात. म्हणजे शीतावरून भाताची परिक्षा करण्यासारखं वाटलं. यात नेमकं तिला काय म्हणायचं होतं?? म्हणजे या देशाच्या सीमा फक्त जोवर तुम्ही तुमच्या देशांत असता तोवरच असतात का?
माझा नवरा जेव्हा एकटाच मिशिगन मध्ये होता तेव्हा त्याच्या ऑफिस मध्ये एक पाकिस्तानी होता. नवर्याशी त्याची खूप चांगली ओळख झाली होती असं नाही. पण नवर्याला परत भारतात जाताना विमान तळापर्यंत सोडण्यासाठी तो पाकिस्तानी त्याची गाडी घेऊन तासभर ड्रायव्हिंग करून आला होता. त्याच्या बोलण्यातूनही कोणत्याही प्रकारची घृणा किंवा हिंदुस्थानी आहे म्हणून द्वेष दिसला नाही. गोर्या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. माझी मानसिकता बदलली हे मात्र निश्चित. परदेशात राहून काय मिळवलं?? तर ही मानसिकता, जी कदाचित भारतात राहून मिळाली नसती.
भारतीय दुकानांतून, पाकिस्तानी, बांग्लादेशी माल दिसतो. पण आता तो घेताना किंवा खरेदी करताना देशाच्या सीमा मनात येत नाहीत. स्ट्रॉबेरि जॅम हा किसान इतकाच अहमद फूड्स चाही चांगलाच असतो. बासमती तांदूळ हा दिल्लीहून येणारा आणि इस्लामाबादहून येणारा दोन्ही सारखाच असतो. आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते.
- प्राजु
प्रतिक्रिया
22 Aug 2008 - 6:53 am | अरुण मनोहर
असेच अनुभव मलाही ठिकठीकाणी आले आहेत.
सरहद फक्त नकाशाच्या कागदावर असते. जमीनीवर ती दाखवण्यासाठी भलेही कुंपण घालाल, पण दोन देशांमधील हवा कोणी कशी विभाजू शकेल?
देशांदेशांमधील राजकारण मानवी मनात सरहदी उभारते.
आपण नागरीक त्या सरह्दींचे काटेरी कुंपण मनात तयार करतो.
प्राजू, तुमचा लेख वाचून असेच काही विचार अस्वस्थ करून गेले.
22 Aug 2008 - 7:02 am | विसोबा खेचर
प्राजू, लेख चांगला आहे,
आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते.
सामान्य पाकिस्तानी नागरीक असेलही आपल्यासारखाच सामान्य आणि शांतताप्रिय परंतु पाकिस्तानी राजनितीतले लोक हे भारताचे दुश्मनच आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करणार्या आयएसाय सारख्या संघटनांना त्यांचीच फूस आहे..!
असो,
आपला,
(भारतीय) तात्या.
22 Aug 2008 - 7:03 am | मेघना भुस्कुटे
तुमचा लेख विचार करायला भाग पाडतो आहे. कुठल्याच बाजूचा निष्कर्ष मांडायचा तुमचा अट्टाहास नाही ही अजून एक लाजवाब गोष्ट.
सानियाच्या एका कादंबरीतली एक आजी म्हणते, प्रत्येकाला तपासताना थोडी जागा ठेवावी. ती कुठे, कशी भरून निघेल सांगता येत नाही... त्याची आठवण झाली.
22 Aug 2008 - 7:21 am | विसोबा खेचर
अलिकडेच कारगिलच्या युद्धात आम्ही पाकड्यांना धूळ चारली आहे. भारतामध्ये बाँबस्फोट घडवून त्यांच्या अश्याच जर दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर पुन्हा एकदा त्यांना माती चारायची वेळ येईल. भारतातीत दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचाही हात नेहमीच असतो!
आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही!
पाकिस्तान आमचा दुश्मन आहे आणि राहील!
या निमित्ताने कारगिलच्या धुमश्चक्रीत कामी आलेल्या सर्व भारतीय जवानांना मी श्रद्धांजली वाहतो.
अजून एक - सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही! मी भारतीय आहे आणि भारतीयच राहीन. माझा देश मला जी काही दोन वेळची रुखीसुखी भाकरी देतो त्यातच मी समाधानी आहे! 'हू ऍम आय' हा प्रश्न मला तरी कधी पडला नाही आणि यापुढेही पडू नये एवढीच इच्छा आहे!
आपला,
(आधी भारतीय आणि मग एशियन वगैरे वगैरे!) तात्या.
22 Aug 2008 - 7:52 am | अरुण मनोहर
तात्याराव तुमचा जाज्वल्य देशाभिमान कौतुकास्पदच आहे. औद्योगीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या ह्या युगात देशप्रेमाची आठवणच करून द्यावी लागते.
तुम्ही म्हणालात, "आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही!"
मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मुद्दा हा की आपण सारे शांतताप्रीय आहोत, तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां?
ह्याचे उत्तर म्हणून त्याने असे केले म्हणून मीही तसेच करीन हे म्हणणे सोपे आहे. तेच आपण आजवर करीत आलो आहोत. ते सोडून आपण अखंड भारताची स्वप्ने पुन्हा पहायला का लागू नये? ब्रीटीशांनी त्यांच्या गलीच्छ राजकारणासाठी आपल्याला झुंजवले. आजही ते लोक गेल्यावर आम्ही सुंदोपसुंदी करीतच आहोत. हा खंडप्राय देश पुन्हा एक झाला तर आजच एक महासत्ता म्हणून उभारेल. कोणी असेही म्हणेल की भारत एकटाच आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पण तसे असूनही, अखंड भारताची एकी ह्या प्रोसेस मधे वेग आणेल. पण राजकारणी लोकांनी ह्या दिशेने पाऊल टाक्न्ञासाठी आधी सामान्य नगरीकांनी मनातील दुशमनी संपवली पाहीजे.
तात्याराव, तुम्ही म्हणालात, "सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही!".
उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात.
ज्यांना देशाबाहेर राहून इतर देशातल्या नागरीकातला सामान्य माणुस पहाता आला, त्यांना मनामनांत घातलेली सरहदींची कुंपणे तोडायला कदाचित सोपे झाले असेल.
22 Aug 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर
मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता.
मला मात्र तसेच वाटले! असो...
तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां?
ते कृपया पाकिस्तानी अतिरेक्यांना विचारा...
उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात.
अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे!
तात्या.
22 Aug 2008 - 7:43 pm | अवलिया
वा तात्या वा
अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे!
मी पुढे असे म्हणेन की जर संधी मिळाली नाही तर मी ती मातृभुमीतच मिळवेन व इतरांना पण उपलब्ध करुन देईन
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
22 Aug 2008 - 8:07 am | प्राजु
लेख लिहिताना मी कोणत्याही संदर्भात असे म्हंटले नाही की, मला भारतीय असल्याचा अभिमान नाही. किंबहुना या लेखाचा खटाटोप कोणाला किती देशप्रेम आहे हे समजण्यासाठी नाहीच आहे. मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे. मी पाकिस्तान बद्दलही कुठे काही वाइट लिहिलेले नाहीये. मी मानसिकतेबद्दल लिहिले आहे.
मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही.
लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2008 - 5:36 pm | विसोबा खेचर
मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे
प्राजू, माझ्या प्रतिसादात तुला किती देशाभिमान आहे किंवा नाही याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही. तुझा लेख हा सामान्य पाकिस्तानी माणसाबद्दल आहे आणि कुठल्याही देशाचा सामान्य नागरीक हा शांतताप्रियच असतो असे मीही म्हटलेले आहे. तुझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे सामान्य पाकिस्तानी नागरीक हा जरी कितीही शांतताप्रिय असला तरी 'पाकिस्तान' हा मात्र भारताचा कट्टर दुश्मनच आहे आणि राहील इतकाच माझा मुद्दा होता. सबब, तुझे वरील वाक्य हे व्यक्तिगत असून मला ते गैरलागू वाटते!
बाकी, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी पाणी भारताच्या डोक्यावरून जाऊ लागेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला गर्दीस मिळवण्यास भारत समर्थ आहेच!
असो...
तात्या.
23 Aug 2008 - 3:14 pm | anilanantbhate
फारच छान प्राजु!
आपन एका मुलभूत् विशयाला हात घातला आहात. मानवी मनाचे सहज सूलभ दर्शन आपल्या लेखातून घदत.!
होय. भारतीय आनी पाकिस्तानी दोघन्मधेही उददामाजी काले गोरे असा केवल एका रेघे एवधाच सूक्श्म फरक आहे. म्हनुनच तर तिसर्या जगान्त ते एशिअन्स म्हनूनच ओलखले जातात. एके कालच्या अखन्द भारतातील भावन्द्,शेजारी राश्त्र (शत्रु राश्त्र ही असतील) पन सर्वसामान्य प्रजेच काय! प्रत्येक गोश्तीकदे राजकीय चश्म्यातून पाहून पाहून ज्यान्ची मन निबर झाल्येत्,चिन्तन शिबिरान्तील बौध्धिक घोतून आनी घोतवून घेतलेल्या मनावर एवधी पूत चधली आहेत , तेन्वा लक्शान्त कोन घेतो! आपनच कसे बावन्न कशी देश प्रेमी हे दाखवून देन्याचीच स्पर्धा चालू आहे प्रतिक्रिया देनार्यान्कदून!भारतीयत्वाचे थेकेदार बनता बनता जो विवेक सामान्य पाकिस्तानी स्त्रीया दाखवू शकतात, तो ही या धुध्धाचार्यान्कदे औशधाएवधाही नाही याच फार वैशम्य वातत.सार जग आज भारतामधे चालू असलेल्या मानवतेच्या एका अभिनव अद्भूत प्रयोगाकदे, आशेने आनी कौतुकाने दोले लावून बसले आहे.क्शमा, करूना आनी सहिश्नुता, असा आपला सान्स्क्रुतिक वारसाच आपन विसरत चाललो आहोत. भारतीय आनि पाकिस्तानी ,त्या एकमेकान्शी निर्व्याज, निरागसतेने खेलनार्या मुलाना काय कल्पना कि आपापल्या देशानी क्रूर, राक्शसी व्रूत्ती अन्गिकार्न्यामधे केवधी मोथी झेप घेतली आहे!
आपली बदललेली मानसिकता अगदी १००%योग्य आहे. आपन मानस आहोत आनी हे मानुस पन आपन विसरला नाहीत हीच मोथी दिलासादायक गोश्त आहे. " जो जे वान्छील तो ते लाहो" अस साअन्गनार्या ज्ञानेशराना तर आम्ही विसरलेलोच आहोत, आपन कार्यपरत्वे दूर देशी असूनही ही मुल्य जपताहात, याबद्दल शतशः धन्यवाद आनी अभिनन्दन सुध्धा!
22 Aug 2008 - 7:25 am | मुक्तसुनीत
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...
22 Aug 2008 - 8:40 am | संदीप चित्रे
>> माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी.
ह्या वाक्यालाच आधी दाद गेली... तुम्हाला भेटायला फार मजा येईल राव. नेमके मी इस्ट कोस्ट जीटीजीला नव्हतो !
22 Aug 2008 - 7:25 am | मुक्तसुनीत
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...
22 Aug 2008 - 7:32 am | धनंजय
शेजार्यांकडून आणि कामाच्या ठिकाणच्या सहकार्यांकडून आला आहे.
आता अन्य लोकांचा अनुभव आहे, की पाकिस्तानी लोक गोड बोलून फसवतात. माझा तसा अनुभव नाही. कदाचित कोणी फसवू शकेल इतका भरवसा मी अनोळखी किंवा कमी ओळख असलेल्या व्यक्तीवर टाकत नाही.
बाकी "बिहारी लोक एकमेकांत संगनमत करून आपल्या इकडे घुसखोरी करतात" असे ऐकून आहे. त्यामुळे गोव्याबाहेरचे वेगवेगळ्या प्रांतातले, देशांतले घाटी लोक मिळून गोड बोलून कपट करतात असे जाणवते. म्हणूनच सर्व घाटी लोकांशी काळजीपूर्वक व्यवहार केलेलाच बरा. (गोव्यातले सहिष्णू लोक मात्र एकमेकांशीच भांडत राहातात.) भांडकुदळ गोवेकरांशी तर फारच काळजीपूर्वक व्यवहार करतो.
22 Aug 2008 - 7:34 am | बेसनलाडू
आवडला. मुख्य म्हणजे लेखातला विचार मांडण्यातला प्रामाणिकपणा आवडला.
(प्रामाणिक)बेसनलाडू
22 Aug 2008 - 7:50 am | शितल
लेख खुप छान आहेस प्राजु,
>>>>>>>>>>गोर्या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं.
हे खरं आहे.
22 Aug 2008 - 8:15 am | वैद्य (not verified)
कुठे आहात ?
ह्या सर्व कंपन्यांनी पाकिस्तानात ऑफिसे उघडायला हवीत. पाकिस्तानातले अनेक इंजिनेर इकडे अमेरिकेत येतात. ह्या कंपन्यांना सध्यापेक्षा ४०% प्रतिवर्ष वाढायचे असेल, तर डोकेबाज एम्प्लॉयीज पाकिस्तानात मिळतील. चीन मध्ये नाही. कुणी ऐकते आहे का रे ?
-- वैद्य
22 Aug 2008 - 8:20 am | सहज
अनुभव प्रातिनिधीक.
लेख अतिशय आवडला.
थोडी संवेदनशीलता मनात जपलीच पाहीजेच व मानसीकता बदलण्याचे धाडस असले पाहीजे. इतिहासाचे ओझे झुगारुन नवा इतिहास घडवायला जमले पाहीजे, नाहीतर कुठल्याही कारणावरुन माणसामाणसातली दरी ही कधीच बुजली जाणार नाही.
देश विदेशच्या लोकातील अंतरे सोडा तर अगदी साडेतीन टक्यातील लोकात पण पुणे वा मुंबई किंवा कोकणातले वा देशावरचे, मराठी वा इंग्रजी बोलणे, ह्या २१ व्याशतकातील सुशिक्षीत समाजात, त्यातुन निवडक प्रगत लोकात जर अजुनही गंभीरपणे स्थान, भाषा वादावादी होत असेल तर काय बोलायचे?
मूळ लेखातील विचारांना अजुन थोडे पुढे नेउन फक्त "एशियन" का आपल्यासारख्या न दिसणार्या माणसांबद्दल पण कुठलीही अढी वाटली नाही पाहीजे. लहान मुलांना हे किती सहज जमते.
22 Aug 2008 - 8:24 am | अनिल हटेला
लेख छान वाटला...
इकडे मला असे अनुभव नाही आले ...
पन ब-याचदा चॅट वगैरे करताना पाकिस्तानी लोकाशी संवाद झालाये..
आणी त्यातुन एक गोष्ट जाणवली की ह्या लोकाना भारत देशा विषयी फार कुतुहल आहे ..
एव्हन भारताची प्रगती मीडीया ज्याप्रकारे जगाला दाखवते आहे ते पाहुन.....
असो !!
चायनीज लोक सुद्धा इंडीयन म्हटल की अतिशय स्पेशल नजरेने बघतात ..
आणी अभिमान वाटतो की,
आय यम इंडीयन !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Aug 2008 - 8:45 am | संदीप चित्रे
देशाबाहेर पडलो की काही गोष्टींकडे बघायचा कॅलिडोस्कोप बदलतो... ह्याचा अर्थ असा नाही की भारतीय म्हणून देशाभिमान कमी होतो.
मला ही असे अनुभव आले आहेत जिथे पाकिस्तानी, अफगाणी सामान्य माणूस शांतताप्रिय भेटलाय.
आम्ही तर मटण - चिकन आणायला आठ - पंधरा दिवसातून पाकिस्तानी दुकानात जातोच. क्रिकेटपासून सियासत पर्यंत भरपूर गप्पा होतात.
22 Aug 2008 - 9:36 am | ऋचा
लेख खुप छान आहे .
गोर्या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं.
एकदम सही!!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
22 Aug 2008 - 9:42 am | आनंदयात्री
अनुभव वाचायला आवडले प्राजु !
मस्त लेख.
22 Aug 2008 - 9:48 am | चतुरंग
गाव, जिल्हा, राज्य, देश, परदेश असं आपलं क्षितिज विस्तारत जाताना माणसांबद्दलचे विचारही बदलत जातात, माझे बदलले.
सामान्य माणसाला एक शांत आयुष्य जगण्यात रस असतो आणि अशा इच्छेला देश-कालाच्या सीमा नसतात.
चतुरंग
22 Aug 2008 - 10:28 am | पिवळा डांबिस
माणूस कितीही बुद्धिमान असला तरी देशात आणि देशाबाहेर राहून त्याच्या समजुतीत फरक हा पडतोच!! समर्थांनी "केल्याने देशांतर..." उगीचच म्हट्लेलं नाहीये!!!!
भारतात राहून पाकिस्तानी अणि चिनी हे आपले शत्रू म्हणुन ओळखले जातात! आपल्या सरकारने आपल्याला तसंच शिक्षण दिलंय!!
कोण म्हणतो भारत सरकार प्रोपगान्डा करत नाही म्हणून? तसे नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं......
पाकिस्तान्यांबद्दलही तेच! सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला आज भारतीयांबद्दल आपुलकीच वाट्ते! हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय?
पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!!
तिसर्या देशात गेल्यामुळे आपल्या भूमिका अधिक विशाल होत जातात! दुसर्या देशांच्या मानसिकतेबरोबरच आपल्या सरकारची चालबाजीही कळत जाते. तिसर्याच देशांची नि:पक्षपाती कागदपत्रे पहायला मिळतात (उदा. हारवर्ड लायब्ररी , युनायटेड नेशन्स पेपर्स, वा पेंटॅगॉन पेपर्स!) स्वतःची अशी एक भूमिका बनवता येते!!
आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!!
भारतमाता की जय!!!
22 Aug 2008 - 10:41 am | चतुरंग
हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय?
आपल्या वरील विधानाला आक्षेप आहे.
प्रत्येक देशाला गुप्तहेर खाते जरुरीचे आहे. रॉ (रिसर्च अँड ऍनालिसिस विंग) आणि सी.बी.आय. (सेंट्रल ब्यूरो ऑफ इनवेस्टिगेशन) ह्या दोन संस्था भारताची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कशी मजबूत राहील. कटांचे सुगावे कसे लागतील ह्याबाबत काम करीत असतात. आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. तेव्हा त्यांची तुलना ही अयोग्य आहे. आयएसाअय ही एक पक्की विद्वेषी संघटना आहे आणि केवळ भारतद्वेष हाच त्याचा ऍजेंडा आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. उगीच सत्य नकारण्यात काही हशील नाही!
चतुरंग
22 Aug 2008 - 11:00 am | पिवळा डांबिस
आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत.
याची तुम्हाला कशावरून खात्री वाटते? भारतीय वृत्तपत्रे वाचून? आणि भारताच्या हेरांनी तशी कॄत्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर केली नसतील तर ते कुचकामी ठरत नाहीत काय? इन्टेलिजन्स एजन्सी वा हेरांचे ते एक कामच नाही काय?
माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत.
चतुरंगा! सीबीआय फक्त इन्टर्नल अफेअर्स बघते आणि तिच्या नांवावर अशी कॄत्ये भरपूर आहेत (पहा: हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन!)
परकीय देशात सीबीआय नव्हे तर सीआयए धिंगाणा घालते!!!!
22 Aug 2008 - 11:32 am | चतुरंग
पिडाकाका? परदेशात काही कारण नसताना बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारणे हे हेरांचे काम असते???
तर मग अशा कामात रॉ ही अजून 'रॉ'च आहे ह्याचा मला अभिमान आहे!!
भारतीय वृत्तपत्रे वाचून कशाला मत बनवायचे अहो. भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेऊन बसलेले बीबीसी, सीएनएन सारखी चॅनल्स काय असल्या बातम्या सोडणार आहेत?
पराचा कावळा करण्यात आणि भारताची प्रतिमा मलीन करण्यात हे अग्रेसर आहेत. रॉने एक जरी असे काम केले असते तरी त्याचा जगभर गाजावाजा केला असता ह्यांनीच!
सीबीआय चा उल्लेख मी अनवधानाने केला, क्षमस्व, मला आयबी म्हणायचे होते!
आणि तुम्ही अमेरिकेचे सीआयए म्हणताय त्यांनी तर जगभर नंगानाचच घातलेला आहे, त्यांच्याशी केजीबीचीच तुलना! (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?)
चतुरंग
22 Aug 2008 - 12:17 pm | पिवळा डांबिस
अरे. आपण निरपराध माणसे म्हणतो (अणि ते खरेही आहे!) पण त्यांच्या दृष्टीने हा शत्रूराष्ट्रात केवळ गोंधळ उडवणे नाही काय? आज पाकिस्तानातही तालिबान्यानी ऍम्यूनेशन फॅक्टरीच्या बाहेर हेच केले नाही काय?
अरे आपल्या भारतात अंतर्गत हेरगिरीसाठी सीबीआय आहे. तिच्या नांवावरही अनेक कॄष्णकॄत्ये (रेफः आणिबाणी) जमा आहेत. रॉ ही परदेशात हेरगिरी करण्यासाठीचीच संस्था आहे. नाहीतर ती सीबीआयची रिडंडन्सी ठरली नसती का?:)
(हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?)
माझा रेफरन्स हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन च्या काळात अनेक पोलिटिकल विरोधकांना एफबीआयने 'कम्यूनिस्ट" ठरवुन त्यांची छळवणूक केल्याबद्दल होता.
जगात अशी कोणतीही हेरगिरी करणारी (बाह्य वा अंतर्गत!) यशस्वी संस्था नाही की जिच्या खात्यावर काही कृष्णकृत्ये जमा नाहीत. पण त्याबद्दल मला फारशी काळजी नाही! कारण तशी नसतील तर ती फार इफेक्टीव्ह हेरगिरी संस्था आहे असे म्हणता येणार नाही. पण आपण जरा रियलिस्टिक झालेले बरे नाही का?
22 Aug 2008 - 11:03 am | आनंदयात्री
रंगाशी सहमत !
>>नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं >>आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे >>प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं
कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल.
एक वैयक्तिक अनुभवः
जिवाभावाचा खान आडनाव लावणारा मित्र. सगळ्या अडिअडचणीत धावुन येणारा, मित्र म्हणुन अगदी जिवलग.
माझे शेखशी भांडण झाल्यावर तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करणारा, वेळप्रसंगी (हाणामारीत) अचानक पणे त्याची बाजु घेणारा. नंतर येउन कौमची कारणे देउन समजवायचा प्रयत्न करणारा. आनंदयात्री, शेख, खान यांच्या निष्ठा भारतभुशीच आहेच हे पक्के ! उदाहरण कोणत्याही अभिनिवेशातुन दिलेले नाही. अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही.
22 Aug 2008 - 11:24 am | पिवळा डांबिस
कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल.
प्राथमिक माहितीसाठी वाचा:
"वादळ माथा" श्री. यशवंतराव चव्हाणांची बायोग्राफी, लेखकः राम प्रधान, राज्यपालः अरुणाचल प्रदेश
आणि मग त्यातून कागदपत्रे बॅकट्रेस करीत जा!!
अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही.
आम्हालाही असे लिहितांना फारसे सुख होते असे नाही पण न्यूयॉर्कमध्ये राहून असे विचित्र प्रसंग आम्ही पाहिले आहेत. निरपराध पाकिस्तानी अब्दुल (किंवा आणखी कोणितरी) खान व त्याला उगीचच त्रास देणारा भारतीय बांधव!! नाही, पूर्ण विचाराअंती आम्ही तरी त्या अब्दुलखानाचीच बाजू घेऊ!!!!
भारतमातेने आम्हाला तेच शिकवलंय,
दुर्बलांचा, अनाथांचा कैवार घे!!
22 Aug 2008 - 11:42 am | चतुरंग
डोळेझाक आणि सरदार पटेलांसारख्या द्र्ष्ट्याची दूरदृष्टी नाकारणे असला टोकाचा करंटेपणा घडलेला आहे. ह्यात आपल्या गुप्तहेर खात्याची काही चूक असण्यापेक्षा आपल्या त्यावेळच्या नेतृत्त्वाचा दुबळेपणा झाकण्यासाठी ब्रूक्स्-हेंडरसन रिपोर्ट क्लासिफाईड झालाय!
चतुरंग
22 Aug 2008 - 11:54 am | पिवळा डांबिस
थॅन्क्यू!!
22 Aug 2008 - 11:58 am | आनंदयात्री
धन्यु :)
22 Aug 2008 - 7:46 pm | संदीप चित्रे
रॉबाबत तुझ्याशी सहमत
23 Aug 2008 - 12:15 am | विसोबा खेचर
आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!!
जळ्ळं मरायला आम्ही कशाला तुझ्या त्या अब्दुलखानला त्रास देऊ? त्याला त्रास देण्याचा आमचा काय संबंध? तो मोठा त्याच्या घरचा! साला, आम्हाला काय पडली आहे त्याला त्रास द्यायची? कोण तो??
आणि कुणी त्रास दिला आहे त्याला? त्याआधीच हाडे नरम करण्याची भाषा?? च्यामायला बस ना घेऊन तुझ्या त्या अब्दुलखानला! कोण त्रास देत नाय तुला!
च्यामारी! म्हणे भारतीयांची हाडे नरम करू..! माय फूट....!
तात्या.
22 Aug 2008 - 11:01 am | अरुण मनोहर
संदर्भः
http://www.misalpav.com/node/3127#comment-43809
खरतर प्राजुच्या लेखाच्या कीतीतरी बाहेर हे सगळे जात आहे. पण खालील पिडां विधान वाचून मला आक्षेप नोंदवलाच पाहीजे. पिडांने (कळत नकळत?) भारताच्या काही हितचिंतकांना अतिरेकी म्हणून दुखावले आहे.
>>>पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!!
मला इथे फक्त येवढेच म्हणायचे आहे की अखंड भारताची स्वप्ने पहाणारी मंडळी अतिरेकी नाहीत. पिडांने (मुद्दाम?) "अखंड हिंदुस्तानची" शब्द वापरला! हिंदुस्थान म्हणताच आम्ही ब्रीटीशांनी पेरलेले तेच धर्मांध राजकारण आणत आहोत. अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? पण हा खूप मोठा विषय आहे. मला वाटते सारेगमाप ने झी वर नुकताच अखंड भारत स्वातंत्र्यदिन साजरा करून विषयाला उजळणी दिली आहे.
ह्यावर चर्चा करायची असल्यास कृपया कोणीतरी स्वतंत्र धागा सुरू करा.
22 Aug 2008 - 11:09 am | पिवळा डांबिस
मला कुणाच्या भावनांशी खेळ करायचा नाही, पण आजच्या घडीला आपले अटलबिहारी बाजपेयी म्हणाले त्याप्रमाणे "पाकिस्तान हे सत्य आहे जे कोणीही खोडून टाकू शकणार नाही!"
त्यामुळे वेळोवेळी 'अखंड हिदुस्तान' चा नारा देऊन भावना भडकावणारी मंडळी ही सुद्धा अतिरेकी विचारांचीच आहेत असे आम्ही मानतो!
हे आमचे मत आपल्याला पटणार नाही कदाचित, त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आपल्या मतांतराबद्दल आदरही आहे. पण ते आमचे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत!!
22 Aug 2008 - 12:06 pm | विजुभाऊ
अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर?
ही दिवास्वप्ने आहेत. फाळणीपूर्वीचा भारत की ब्रम्हदेश बांगलादेश पाकिस्तान अफगानिस्तानपर्यन्तचा भूप्रदेश हा कधीच एकसंध देश नव्हता.
भौगोलीक /भाषीक/ सांस्कृतीक/ धार्मीक कारणांमुळे तो नेहमीच वेगळा आहे
ही वस्तुस्थिती आहे.
सुस्थीर पाकिस्तान ही पाकिस्तानही पेक्षा भारताची गरज आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
22 Aug 2008 - 11:20 am | स्वाती दिनेश
प्राजु. भारताबाहेर राहणार्यांचा हा प्रातिनिधिक अनुभव! अशा प्रकारचे अनुभव भारताबाहेर गेल्यावर बरेच जणांना येतात. जेव्हा क्षितिजे रुंदावतात तेव्हा दृष्टिकोनही व्यापक होतो ह्याचे तुझा हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
लेख आवडला हे वेसांन ल.
स्वाती
22 Aug 2008 - 11:25 am | राघव१
प्राजुताई,
लेख फार सुंदर आहे. कोणतेही मत व्यक्त ना करता केवळ परिस्थिती मांडलेली आहे. वाचणार्या सगळ्यांच्या मनात निर्माण होणारे निरनिराळे भाव हेच या लेखाचे यश आहे!!
सगळीकडे चांगले-वाईट लोक असतातच. जोवर मूळ गाव समजत नाही तोवर ती तुमच्या-आमच्या सारखीच माणसे असतात अन् सर्वसमावेशक असे परिमाण त्यास लागते. तीच मानवता. जेव्हा संदर्भ देशाचे/प्रांताचे/समाजाचे/जातीचे येतात तेव्हा हे परिमाण त्यानुरूप बदलत जाते.
मला वाटते सामन्य माणसाचा दृष्टिकोन अन् सत्ताधारी माणसाचा दृष्टिकोन यात असलेला मूळ फरक अशा अनुभवातून दिसून येतो.
असेच लिहीत राहा. शुभेच्छा. :)
राघव.
22 Aug 2008 - 12:09 pm | पिवळा डांबिस
तुझ्या लेखाच्या धाग्याच्या मध्येच येउन असा धिंगाणा घातल्याबद्दल क्षमस्व!:)
पण हा विषयच इतका सेन्सिटिव्ह आहे की थोडीफार चर्चा होणारच!
तरी वर लिहिल्याप्रमाणे तुझा लेख आवडला.
किप ईट अप!!
-डांबिसकाका
22 Aug 2008 - 12:15 pm | नंदन
लेख आवडला. विशेषतः मुठा वि. मिठी असा वाद रंगलेला असताना एकच सिंधू दोन्ही देशांतून वाहते याची ग्वाही देणारा. बाकी, 'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Aug 2008 - 2:42 pm | प्रियाली
खरे आहे. लेख आवडला.
22 Aug 2008 - 12:40 pm | संजय अभ्यंकर
प्राजुचा सुंदर लेख!
कधितरि परदेशी जातो तेव्हा असा अनुभव येतो की, परदेशस्थ भारतीयांपेक्षा पाकीस्तानीच आपल्याशी आपुलकीने वागतात.
जेव्हा परदेशस्थ भारतीयांना कळते की हा भारतातुन आला आहे, तेव्हा लोक आपल्या पासुन अंतर ठेऊन रहातात.
दोन वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीत गेलो होतो. टेथे किमान २५ भारतीय लोक विविध स्तरांवर कार्यरत होते.
त्यांपैकी केवळ एक व्यक्ती माझ्याशी येउन बोलत असे. बाकिच्यांनी माझ्या पासुन काही फुटांचे अंतर (जाणवेल) असे ठेवले.
(कदाचीत कंपनी प्रशासनाला गैर वाटू नये म्हणून त्यांचा तो प्रयत्न असावा)
माझा सहाध्यायी एक कोरियन होता. कंपनीतले समस्त कोरियन त्याच्याशी ज्या आपूलकीने वागत होते, त्यामूळे आपल्या भारतीयांची मानसिकता फार जाणवली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
22 Aug 2008 - 12:54 pm | भाग्यश्री
प्राजु.. मस्तच लेख!! खूप प्रामाणिक लिहीलायस..
बाहेर राहूनच बर्याच गोष्टी कळतात, वळतात हेच खरं.. इथे येऊन पाकीस्तानी जनतेशी जुळवून घ्यावचं लागेल मला! कारण आमचा इंडीयन(!) ग्रोसरीवाला पाकीस्तानी आहे! :) हे आणि असेच कितीतरी प्रसंग येतात, आणि त्यातून आपण शिकतो.. एक मात्र खरं भारतात राहून उगीचच जास्त अढी निर्माण होते, ती बाहेर राहून सुटते.. मस्त लेख! भारताबाहेर राहणार्या लोकांना नक्कीच अपील होईल नीट!
22 Aug 2008 - 1:02 pm | स्नेहश्री
ह्या लेखावरुन मला एका पुस्तकची आठवण झाली ...मिळल्यास जरुर वाचा
"कुंपणापलिकडचा देश" अतिशय सुंदर पुस्तक आहे..........जरुर वाचा
आणि लेखिका आहेत " मनिषा टिकेकर"
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
22 Aug 2008 - 1:38 pm | पक्या
सामान्य नागरिक मग ते कोणत्या का देशाचे असेनात्...नॉर्मल परिस्थितीत एकमेकांना भेटल्यावर चांगलेच वागतात.
पाकिस्तान हा देश खरोखरीच भारतासारखा सहिष्णु आहे काय? धर्मांध राजकारणामुळे पाकीस्तान भारताचा शञू बनला आहे. आणि या शत्रूत्वाचा सामना भारताला करावाच लागतो.
>>कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते
(परदेशी वास्तव्य असताना ) हा आपल्या सारखाच सामन्य आहे ही भावना मनात यायची पण आपल्याच भागातला आहे हे मात्र कधीही मनात आले नाही
>>गोर्यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं.
हिंदीमधून संवाद साधता येतो , मुलेबाळे, खाणेपिणे अशा अनेक गोष्टींवर समविचार असू शकतात ह्यामुळे जव़ळीक वाटणे गैर नाही. पण जर राजकारण , इतिहास , धर्म हे विषय चर्चेत आले तर किती जवळीक वाटेल?
अवांतर - मध्यंतरी मनोज वाजपेयी, रवि किशन चा १९७१ हा भारत पाक युध्दातील युध्दकैद्यांचा सिनेमा पाहीला. त्यात भारतीय युध्दकैद्यांचा पाकिस्तानी कँप मधून पळून जाण्याचा प्रयत्न दाखवला आहे. सत्यघटनेला मध्यवर्ती ठेवून सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे . या भारतीय युध्दकैद्यांचे पाकिस्तान्यांनी अतोनात हाल केले. बरेच जण कित्येक वर्ष जेल मध्ये मातृभूमीची , आपल्या घराची ,गावाची, नातेवाईकांची याद काढत सडून मेले. त्यांना म्हणे १९८३ मध्ये शेवटचे पाहीले गेले. त्यानंतर त्यांचा अजिबात ठावठिकाणा आजतागायत लागला नाही . यातीलच ६ जणांनी पाकिस्तानी कँप मधील सक्त पहारा तोडून पलायनाचा डाव आखलेला असतो. सिनेमा बघण्यासारखा आहे.
http://www.youtube.com/watch?v=P8Ama-AnoVk
22 Aug 2008 - 1:20 pm | मराठी_माणूस
परदेशात आपलि मानसिकता बदलते म्हणुन वेगळा अनुभव येतो. तिथे आपल्याला असुरक्षित वाटत असते आणि आपल्या सारखे कोणि आहे का, हे आपण शोधत असतो. पाकिस्तानि बरेचसे आपल्यासारखे दिसत असल्यामुळे आणि खाण्या पिण्याच्या गोष्टित साधर्म्य असल्यामुळे ते गोर्या पेक्षा जवळ चे वाटतात. गोरे एक विशिष्ट अंतर ठेउन असतात. त्यामुळे ह्या जवळकित गरज हा प्रमुख धागा असतो.
22 Aug 2008 - 1:24 pm | विसुनाना
विचार करायला लावणारा लेख.
पाकिस्तान / बांगलादेश किंवा इतर देशातील सर्वसामान्य नागरिक मूलतः दुष्ट/वैरत्वाने प्रेरित असतील असे मुळीच वाटत नाही.
किंबहुना 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना उच्च पातळीवर सर्व मानवात असतेच.
(जर पृथ्वीवर परग्रहवासियांचे आक्रमण झाले तर चीन त्यांच्या बाजूने अमेरिकेविरुद्ध लढणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.)
पण ती जितकी खोलात जाते तितकी दुरावत जाते...
पृथ्वी -आशिया-भारत-राज्य-जिल्हा-तालुका-गाव-वॉर्ड--गल्ली-शेजार-कुटुंब-अगदी सख्खे भाऊही वेळ पडली की एकमेकांशी भांडतात.
धर्म-जात -पोटजात -कूळ(गोत्र); प्रांत-भाषा -पोटभाषा ही वर्तुळातली वर्तुळे अशीच आहेत. परदेशात भारतीय भेटतात तेंव्हा ते अशाच कोणत्यातरी वर्तुळापुरता विचार करत असावेत असे वाटते.
सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. आपल्या लहान वर्तुळातील समूहाने सोसलेल्या कटु अनुभवांची स्मृती अजूनही ताजी आहे. आणि ती ताजी रहावी असे अनुभव अजुनही येत आहेत. त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे.
22 Aug 2008 - 2:56 pm | पद्मश्री चित्रे
जेव्हा माझ्या देशाचे सैनिक रात्रंदिवस पाकिस्तान च्या बंदुकीच्या टप्प्यात आहेत, ११ जुलै २००६ ला मुंम्बई त लोकल मधे झालेले साखळी बॉम्ब स्फोट अनुभवले आहेत..तेव्हा असा विचार करणं कठीण आहे..
माणुस म्हणुन एक जण चांगला असेल ही.. पण देश म्हणुन?? तुम्ही दुर आहत म्हणुन हे साजिर रुप दिसत असेल.. इथे रोज टांगती तलवार डोक्यावर असताना इतका उदात विचार करणं मला अवघड वाटतं
त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे.
अगदी खर..
22 Aug 2008 - 1:41 pm | दातेकाका
प्राजू
अभिनन्दन.
अतीशय छान लेख.
जे लोक कामानिमित्त्/व्यवसायानिमित्त परदेशी रहात आहेत त्यान्च्या मनाला नक्की भिडेल.
पण................
भारतात रहात असलेल्या लोकान्ना पटेलसे वाटत नाही.
22 Aug 2008 - 7:49 pm | अवलिया
हे सर्व वाचुन मी एवढेच सांगु इच्छितो की
मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट
जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो
काफर म्हणजे जो मुसलमाण नाहि तो यांत हिंदु, इसाइ, ज्यु तसेच बौद्ध प्रामुख्याने धरावे
बाकी मी कशावरही चर्चा करु शकत नाही कारण माझी मते तुम्हाला पटणार नाही वा आवडणार नाही
22 Aug 2008 - 10:44 pm | अनिता
नाना,
>>मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट
>>जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो
+१००
अगदी खरे आहे...१००%.
९/११ च्या प्रस॑गान॑तर मला अनुभव आला आहे...अमेरिकेतील मॉलमधे फिरताना माझ्या मित्राल मुस्लिम लोका॑नी शहरातील मस्जिद मधे बोलाविले होते...अफगान स॑घटनेला लढाईसाठी मदत करायला. (मित्र दाढी-मिशा ठेवायचा. त्यावरुन त्या लोका॑नी बहुतेक ठरवले असावे की तो मुस्लिम असावा..)
न॑तर समजले की काहि लोका॑ना अटक झाली त्या ठिकाणी.
22 Aug 2008 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर
व्यवसायानिमित्त २५ वर्षे आखातात काढताना अनेकदा विविध स्तरावरील पाकिस्तानी जनतेशी संबंध आला. अगदी बँक मॅनेजर ते हमाल असे सर्व संपर्कात होते.
माझे निरिक्षण असे की मनातून सर्वच पाकिस्तानी अंतर ठेवून असतात (कांही अपवाद). अशिक्षित पाकिस्तानी त्यांचा भारतियांवरील राग लपवू शकत नाहीत. अशिक्षितांमध्येह काही सुसंस्कृत पाकिस्तानी भेटतात ते निदान तोंडदेखले तरी सामंजस्याने वागतात. सुशिक्षितांमध्ये हे सामंजस्याचे नाटक (ढोंग नाही म्हणत आहे मी) जास्त प्रभावीपणे वठविण्याचे सामर्थ्य असते. आणि ह्या सुशिक्षितांमध्येच मनापासून चांगले, मवाळ, भारताच्या चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करणारे असे पाकीस्तानी असतात. त्यांच्याशी आपले चांगले सूत जमू शकते. थोड्याफार फरकाने संस्कृती दोघांचीही सारखीच असते. काय चांगले, काय वाईट ह्यावर एकमत होते. दोन्ही देशातील सामान्य जनता 'अमन (शांतता) चाहते' पण स्वार्थी राजकारणी वैर वाढविण्यास खतपाणी घालतात ह्यावर एकमत होते. बहुतांश पाकिस्तानी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केलेल्या प्रगतीबद्दल कौतुकोद्गार काढतात.
PIA ह्या पाकिस्तानी राष्ट्रीय विमानसेवेने केलेल्या प्रवासादरम्यान १ दिवस कराचीत राहण्याची संधी मिळाली होती. तेंव्हा तिथल्या हॉटेलच्या शॉपिंग एरियातील एका दुकानात एका वयोवृद्ध पाकिस्तानीशी गप्पागोष्टी केल्या असता त्यांचे एक वाक्य मनाला फार भिडले. त्यांनी त्यांच्या बालपणी भारतात (मुंबईत) काही वर्षे घालवीली होती आणि फाळणीनंतर उर्वरीत आयुष्य पाकिस्तात घालविले आहे. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही दोन्ही देश जवळून पाहिले आहेत. तुम्हाला ह्या दोन्ही देशांमध्ये काय फरक जाणवतो?' तेंव्हा ते म्हणाले, ' सीमा रेषा आखल्याने जमीनीचा बटवारा होतो, संस्कृतीचा नाही.' ह्यावर उदाहरणादाखल त्यांनी अनेक सणवार, रुढी, संगीतातील रागदारी, औषधोपचार (आयुर्वेदासह) आणि जेवण्याखाण्याच्या पध्दती ह्यातील साम्य त्यांनी मला दाखविले. जवळजवळ तास भर आमची चर्चा झाली. त्यांच्या आदबशीर उर्दूने मला अनेकदा लाजवलं.
त्याच हॉटेलात उपहारगृहातील वेटरशी माझे जोरदार भांडणही झाले. PIA ने संध्याकाळच्या नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची कुपन्स दिली होती. कराची मुंबई प्रवासाच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. ती सोय हॉटेलातच होती पण त्यांचा संगणक बिघडल्यामुळे तिथला कारकून प्रत्येक तिकिटासाठी फोन वरून बुकींग घेत होता आणि त्यात बराच वेळ जात होता. संध्याकाळी ५ वाजता उतरल्यावर ७ वाजेपर्यंत मी त्यांच्या कार्यालयातच बसून होतो. त्यानंतर मी उपहारगृहात चहा-सँडविचसाठी गेलो असता वेटरने 'नाश्त्याची वेळ संपली, आता नाश्ता मिळणार नाही' असे उर्मट उत्तर दिले. त्यावर त्याला मी PIA चा संगणक बिघडल्यामुळे मला उशीर झाल्याचे त्यात माझा काहीच दोष नसल्याचे सांगूनही तो ऐकेना. आणि वरून 'केव्हाही आलं तर नाशता मिळत नसतो, वेळेवर यायला पाहिजे होते' असे त्याने मला ऐकवले. ही आमची वादावादी आजूबाजूचे प्रवासी (पाकिस्तानी) ऐकत-पाहात होते. मला संताप आला. 'कसा मिळत नाही नाश्ता तेच पाहतो, तुम्ही काही फुकट देत नाही नाश्ता, मी पूर्ण पैसे मोजले आहेत' असे म्हंटले त्यावर तो मला म्हणाला 'तुला कोण नाश्ता देतो तेच मी पाहतो.' हा चॅलेंज होता. मी बसल्या जागेवरूनच आवाज चढवून मॅनेजरला बोलावले. तो लगेच आला. त्यावर प्रथम मी त्या उर्मट वेटरची तक्रार केली. तो वेटर काही बोलणार एवढ्यात त्या मॅनेजरने त्याला तिथून हाकलले. (तो संतापाने दूर जाऊन उभा राहिला) मॅनेजरने मला शांत करून समस्या काय आहे ते विचारले. मीही त्याला शांतपणे मला चहा आणि नाश्ता हवा असल्याचे सांगितले. (तो माझा हक्क होता). त्याने ताबडतोब तशी व्यवस्था केली. आम्हा सर्वाना चहा नाशता मिळाला. (आपले बाकी सर्व भारतिय, शेपूट घालून गप्प बसून होते. कोणीही माझ्या बाजूने चकार शब्दही काढला नाही.) आत वेटर आणि मॅनेजरची वादावादी झाली. 'मेरे मना करनेपरभी आपने क्यूं नाशता दिया?' असे वाक्य मला ऐकू आले. चहा नाश्ता झाल्यावर मी काउंटरवर जाऊन मॅनेजरला भेटलो, त्याचे आभार मानले आणि डीनरचे क्लोजिंग टाईम काय आहे असे विचारले. त्याने रात्री ११ असे सांगितले.
नंतर आम्ही (मी आणि माझा एक मित्र) कराचीत फिरायला गेलो. रात्री १०|| वाजता परतलो. १०.५५ पर्यंत लाऊंजमध्ये संगीत ऐकत बसलो होतो. एक पाकिस्तानी कलाकार 'इक प्यार का नगमा है...' पियानोवर वाजविण्याचा प्रयत्न करीत होता. अकराला पाच कमी असताना मी मित्रासमवेत जेवायला गेलो. मॅनेजरने खास खातीरदारी केली.
ह्या सर्व कथा सांगण्याचा उद्देश असा की मला दोन्ही प्रकारची माणसे भेटली. चांगलीही आणि वाईटही. पण मुख्यत्वे करून राजकारण्यांच्या प्रभावाखाली भरकटलेली.
प्रतिसाद बराच मोठा होतो आहे. पण अजून एक इंटरेस्टींग गोष्ट.
मस्कतमध्ये एक बलूची भेटला होता. चांगला सुशिक्षित. तो काही काळ पाकिस्तानी नेव्हीत होता. ७१च्या युद्धात भारतिय नौसेनेने एक पाकिस्तानी युद्धनौका पकडली आणि सर्वंना कैद केले. त्या कैद्यांमध्ये तो होता. ३ वर्षे भारतिय तुरूंगात युद्धकैदी म्हणून होता. तो म्हणाला, 'भारतिय नौसेना भयंकर हुषार आहे. पाकिस्तानच्या युद्धनौकेवर कबजा केल्यावर भारतिय अधिकारी पाकिस्तानी अधिकार्यांशी बोलत होते. मी जवळच होतो. भारतिय अधिकार्याने आमची नौका कराची बंदरातून निघाल्या पासून तिने कुठे-कुठे, कसा-कसा प्रवास केला ह्याचे इत्यंभूत वर्णन केले. आम्ही अवाक झालो. ते दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांशी बोलत होते. भारतिय सरकारने पाकिस्तानी अधिकार्यांना फार मानाची आणि चांगली वागणूक दिली. पण आम्हा जवानांना फार कुत्र्यासारखी वागणूक दिली. पण त्या तिन वर्षांच्या कालावधीत मला एक कळून चुकले पाकिस्तान हिन्दूस्थानवर कधीच विजय मिळवू शकणार नाही. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे.'
असो. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे, हे प्रत्येक पाकिस्तानीही जाणतो पण ते स्विकारणे त्यांना फार जड जातय. भारताची तंत्रज्ञानातील प्रगती मात्र ते उघडपणे कबूल करतात.
जय हिंद..
22 Aug 2008 - 4:11 pm | भडकमकर मास्तर
उत्तम लेख...
कोणतीही बाजू न घेता आणि मनापासून लिहिलेला...
विशेषतः खोटी वाटणारी अलंकारिक वाक्ये टाळल्यामुळे तर फारच बेस्ट झालं...
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 Aug 2008 - 5:23 pm | प्राजु
बरिच चर्चा चर्वण झाले. कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने हा लेख लिहिलेला नाहिये.
फुलवा,
टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. कधी कधी ती शत्रूची असते, कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. त्यासाठी स्थळ किंवा काळ याचे नियम नसतात. ड्रायव्हिंग करताना अपघात होतात. मला कोणि येऊन धडकण्याआधी मीच त्याला जाऊन धडकतो .. या मानसिकेमध्ये काय अर्थ आहे. नुकसान तुमचेच आहे. त्यापेक्षा जास्तीत जास्त सुरक्षित ड्रायव्हिंग करण्याकडे लोकांच कल असतो नाही का?
नानाचेंगट, कोणत्याही देशाबद्दल मी कोणताही (चांगला/वाईट) निर्णय घेतला नाहीये. मी केवळ आणि केवळ मानसिकेतेबद्दल लिहिले आहे...तेही माझ्या .
विसुनाना,
सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही.
मी इथे कुठेही पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे हे विधान केल्याचे मला आढळले नाही. कोणताही निष्कर्ष यातून मी काढलेला नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला हेच यातून सांगायचे आहे मला.
पुन्हा एकदा सांगते....
माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही.
लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Aug 2008 - 2:08 am | शितल
प्राजुने लेखातुन तीच्या आणि जे भारतीय देशाच्या बाहेर राहत आहेत त्याच्या मानसिकतेचा बदल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि हे तीला व्यवस्थित साध्य झाले आहे. :)
23 Aug 2008 - 2:46 pm | पद्मश्री चित्रे
>>टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही.
जगणं सोडावं असं मी कधीच म्ह्टल नाही,उलट मला कौतुक वाटते या दुर्दम्य जगण्याच्या इच्छाशक्ती चे.
>> कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना.
आणि महापुर आणि बॉम्ब्स्फोट याची तुलना करण्यात काय अर्थ?नैसर्गिक आपती स्थळ काळ बघत नसली तरी या मानव निर्मित आपत्ती पुर्वनियोजित असतात . विश्वबन्धुत्व वगैरे आदर्श कल्पना आहेत, पण ते त्यासाठी स्वाभिमान , देशाभिमान सोडु नये... इतकच.
22 Aug 2008 - 9:22 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर लेख. कोणताही चष्मा न चढवता लिहीलेला; म्हणूनच मनाला भिडणारा.
अमेरीकेत आल्यावर खूप पाकिस्तानी भेटले. त्यातही हे हाडवैर असलेले पाकीस्तानी भारतीयांशी इतके मित्रत्वाने वागतील असे वाटले नव्हते. राहून राहून असे वाटायचेच की जर दहशतवादी पाकीस्तानात घडत असतील तर ते दहशतवादी काही दिवसांपूर्वी पाकीस्तानी नागरीकच होते ना? मग सामान्य नागरीक शांती वांछीत आहे असे कसे समजावे. त्यामुळे अमेरीकेत उतरल्यावर पाकीस्तानी लोकांना भारतीय लोकांबद्दल आलेल्या पुळक्याचे कारण समजले नाही. जसा जसा जास्त दिवस अमेरीकेत जास्त दिवस राहत गेलो तसे प्राजुने लिहील्याप्रमाणे आशियायी म्हणून हे प्रेम असल्याचे कळले. पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. ;)
माझी एक मैत्रीण आहे पाकीस्तानी. ती chase बँकेमधे personal banker आहे. एकदम फटाकडी. आणि देशी लोक पाहील्यावर तिला प्रेमाचं काय भरते येते म्हणून सांगू.(कदाचित त्यात थोडासा व्यावसायिक दृष्टीकोण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) पण पोरगी छान होती. ;)
माझ्या घराजवळ असणार्या मदिना नावाच्या पाकिस्तानी हॉटेलात वरचे वर जात असे. खरेतर हॉटेल होते पाकीस्तानी माणसाचे पण त्यावर पाटी होती इन्डो-पाकीस्तानी हॉटेल म्हणून. याचे कारण पाकिस्तानी रेस्टॉरंट असे लिहीले असते तर भारतीय लोक येत नाहीत असे दस्तुरखुद्द मालकानंच आम्हाला सांगितले.
माझे बरेच मित्र विचारत की पाकीस्तानी वस्तू घेत तर नाहीस आणि त्या मदिनामधे जाऊन बरा हाणत असतोस सारखे सारखे. त्यावर मी त्याना म्हणत असे की 'दुटप्पी धोरण काय फक्त पाकीस्ताननेच ठेवावे काय! मी नाही ठेऊ शकत'.
-
(अस्सल भारतीय)
पुण्याचे पेशवे
23 Aug 2008 - 12:18 am | विसोबा खेचर
पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले.
जियो....!
तात्या.
22 Aug 2008 - 9:50 pm | लिखाळ
माझे पाकिस्तानी नागरिकांबद्दलचे मत जसे भारतात असताना होते, तसेच इथे आल्यावर सुद्धा आहे. इथले पाकिस्तानी आपल्याला पाहिल्यावर नजर टाळतात, ओळख देत नाहित असा माझा व्यक्तिगत अनुभव. ज्या एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्याशी बोलणे झाले तो बरा होता. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल तितकारा नाही तसे प्रेमही नाही. ती माझ्यासारखेच सामान्य असतील अशी एक क्ल्पना करुन असतो.
मी चौकटीबाहेर पाउल ठेवले तरी मी कोण असा प्रश्न पडला नाही. एखादेवेळी मानसिक चौकट बदललेली नसेल अशीही शक्यता आहेच.
अनेकदा जीवनात येणारा भौतिक/लौकिक बदल आपल्याला पूर्ण बदलवून टाकेल अशी आपली धारणा असल्याने आपला दृष्टिकोनसुद्धा बदलला पाहिजे अशी आपण आपल्याला भीड तर घालत नाही ना?!! (कृपया या विधानाकडे एक विचार म्हणूनच पाहावे. वैयक्तिक रोख समजू नये ही विनंती.)
--लिखाळ.
23 Aug 2008 - 1:50 pm | अमेयहसमनीस
प्राजू ताई,
काय आहे हा सगळा विचार आपण सीमे वर लढत असलेल्य (भारतीय) जवाना ला केन्द्रित करुन परत एकदा लिहा.
अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे.
अमेय
23 Aug 2008 - 7:07 pm | प्राजु
अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे.
आपण गफलत करता आहात. माझी मानसिकता आणि सीमेवर लढणारा जवान दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेत बसून लिहिणे सोपे आहे हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकेत असले तरी मी भारतीयच आहे. आणि तुम्हाला भारतात राहून जितका भारतीयत्वाचा अभिमान आहे तितकाच मलाही आहे. तुम्ही भारतात रहाता पण सीमेवर लढणार्या जवानासाठी तुम्ही काय करता श्रद्धांजली वाहण्या व्यतिरिक्त?? काहीच नाही ना. मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वरचे विधान केले?? एक लक्षात ठेवा काहिही झालं तरी आज तुम्ही तुमच्या माणसांच्यात आहात. सुरक्षित आहात. आम्हाला इथे जी जवळची वाटतात त्यांना धरून रहावंच लागतं. काही बरं वाईट झालं तर नातेवाईकांच्याही आधी मदतीला हीच माणसं येतात. मग इथे राहणार्या एखाद्याचा शेजारी जर पाकिस्तानी किंवा बांग्लदेशी असेल तर विनाकारण वैर धरण्यात काय अर्थ आहे?
दुसरी गोष्ट अशी, जी अमेरिकन बाइ मला भेटली, तिच्या "यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" या वाक्यातून जर बांग्लादेशात राहणार्या माणसाच्या वागण्यावरून तिने भारतीय माणसालाही चांगले म्हंटले असेल तर ही शीतावरून भाताची परिक्षाच नाही का? आणि यात चूक आहे??
तेव्हा तुमचे वरील वाक्य माझ्यासाठी गैरलागू आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Aug 2008 - 12:38 pm | अमेयहसमनीस
"यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर"
हे वाक्य एका अमेरिकी माणसानी म्हणण आणि एका भारतीय माणसानी म्हणण यात बारच फरक आहे.
अमेय
23 Aug 2008 - 8:06 pm | विनायक प्रभू
ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही.
फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे.
विनायक प्रभु
24 Aug 2008 - 5:36 pm | पद्मश्री चित्रे
ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही.
फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे.
११ जुलॅ २००६ ला , मुम्बई त साखळी बॉम्ब्स्फोट झाले तेव्हा मी विरुध्द दिशेने (चर्चगेट जाणाया) गाडीत च होते.अगदी समोर..
आणि माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही असं मी म्हटल नाही.. मी माझ्या पुरतं सांगितल..
25 Aug 2008 - 12:14 pm | मनीषा
मी सुद्धा हा अनुभव नेहमी घेते.. परक्या लोकांमधे पाकी/ बांग्लादेशी/श्रीलंकन , ही लोक 'आपलेच' वाटतात .
पण तरी हे सुद्धा तितकच खरं कि हा आपलेपणा जो पर्यंत धर्म, राजकारण (आणि क्रिकेट) हा विषय निघत नाही तो पर्यंत. आणि वादाचा विषय असेल तेव्हा भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात. अर्थात हे माझं (निरिक्षण) मत आहे.
25 Aug 2008 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर
भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात
गुन्हेगारीकडे कलही भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचा जास्त असतो असे ओमानच्या CIDचे मत आहे.
25 Aug 2008 - 7:57 pm | प्राजु
प्रतिसाद दिलेल्या, चर्चा केलेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/