२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा

बीएमएम२०१५'s picture
बीएमएम२०१५ in जनातलं, मनातलं
14 Jan 2015 - 9:51 pm

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे.

या अधिवेशनात भारतातील व उत्तर अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम एका ठिकाणी पहायची संधी मिळणार आहे. अमेरिकेत गाजलेला "उभ्या उभ्या विनोद" हा मराठी स्टँडअप कॉमेडी कार्यक्रम, "उदकशांत" हे पाणी प्रश्नावर आधारीत नाटक, मराठी सिनेमाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा शोध तसेच तीन पैशाचा तमाशा ही संगीत्/नृत्य नाटीका हे त्यातले काही कार्यक्रम असतील.

अधिवेशनाच्या एका रात्रीचे खास आकर्षण अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांचा कार्यक्रम असणार आहे. अवधूत गुप्ते आपल्या सर्वांनाच एक संगीतकार व गायक म्हणून माहीत आहेतच. त्यांनी अनेक गीतेही लिहीली आहेत हे मात्र कमी लोकांना माहित असेल. झी टिव्हीवरच्या प्रसिद्ध सारेगम कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून आपण त्यांना पाहिले आहेच परंतु त्याव्यतिरीक्त अष्टपैलू अवधूत गुप्ते "खुपते तिथे गुप्ते" हा कार्यक्रमही टिव्हीवर करतात. वैशाली सामंत आज नुसत्या मराठीतल्याच नव्हे तर देशातील आघाडीवरील गायिंकांपैकी एक गायिका मानल्या जातात. लगान, ताल आणि साथिया अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी ए. अार. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायली आहेत. त्यांचा आणि अवधून गुप्तेंचा "ऐका दाजिबा" हा हिंदी गाण्यांचा आल्बम पूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. उडत्या चालीच्या गाण्यांपासून हळूवार गाण्यांपर्यंत सर्वच प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. वैशालीनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. उत्तर अमेरिकेतील मराठी लोकांना पहिल्यांदाच अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांना प्रत्यक्ष गाताना अनुभवयाला मिळणार असल्याने येथील मराठी मंडळींमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरले आहे.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतच्या मैफिलीबरोबरच या अधिवेशनात "गोष्ट तशी गमतीची" हे नाटकही सादर होणार आहे. मिहीर राजदा लिखीत आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शीत ह्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात जोमाने सुरु आहेत. मध्यमवर्गीय घरामध्ये पिढ्यांच्या अंतरातून होणारा संघर्ष या नाटकाने हुबेहुब चितारला आहे. हा संघर्ष गंमतीदार करण्यात लेखक-दिग्दर्शकाला यश मिळाले आहे. उत्तर अमेरिकेतील नाट्य रसिकांना मंगेश कदम, लीना भागवत आणि ‘होणार सून मी या घरची’ फेम शशांक केतकर अशा प्रसिद्ध कलाकारांना या निमित्ताने पहायला मिळणार आहे.

करमणूकीच्या कार्यक्रमांबरोबरच विविध व्यायसायीक परिषदाही आयोजीत केलेल्या आहेत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी वैद्यकीय, बिझनेस परिषदा तसेच वयस्कर उपस्थीतांसाठी उत्तर रंग परिषद असेल.
या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतातील आणि अमेरिकेतील उद्योजकांना उत्तर अमेरिकेतील ४००० हून अधिक मराठी ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी आहे. अधिवेशनामधल्या प्रदर्शन दालनामध्ये आपला बूथ लावण्यासाठी अधिवेशन समितीने भारतातील व अमेरिकेतील उद्योजकांना आमंत्रण दिले आहे. ३१ जानेवारीपर्यंत बूथची नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दराचा फायदा मिळणार आहे. या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती पुढील दुव्यावर मिळू शकेल - http://bmm2015.org/convention-activities/expo/.

अधिवेशनाची सर्वसाधारण नोंदणी सुरु झाली असून ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात नोंदणी करता येणार आहे. अधिवेशनाची नोंदणी http://bmm2015.org/registration/convention-registration/ या दुव्यावर जाऊन करता येईल. भारतातून या अधिवेशनाला येऊ इच्छीणाऱ्यांसाठी केसरी टूर्सने विशेष सहलींचे आयोजन केले आहे. अधिवेशनासंबधी अधिक माहीती अधिवेशनाच्या वेबसाइटवर (http://bmm2015.org) अथवा info@bmm2015.org या इमेलवर मिळू शकेल.

संस्कृतीकलानृत्यसमाजबातमीमाहिती