दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट. सरपंचांच्या संकल्पनेनुसार पुढचे पाच दिवस गावक-यांनी आपापल्या पाड्यातल्या हंडीत आपल्याला जी वाटेल, जी शक्य होईल, ती चीजवस्तू त्या हंडीत जमा करायची होती. सुरुवात सरपंचांनी प्रत्येक हंडीत एक रोख रक्कम ठेवून केली. मग लहान मुलांनी खेळणी ठेवली, म्हाता-या कोता-यांनी प्रेमाने दहा वीस रुपये ठेवले, कुणी पैसे, कुणी कपडे, कुणी धान्य, कुणी स्वतः बनवलेली एखादी शोभेची वस्तू, कुणी एखादा दागिना अशा प्रकारे पाच दिवसांत अनेक गोष्टी गावक-यांनी त्या हंड्यांत यथाशक्ती जमा केल्या.
इकडे शहरात सुद्धा दहीहंडीचा उत्साह जोर धरून होता. गोविंदापथकं तयारी करत होती. गोविंदा आयोजकही आपल्या हंड्यांच्या उंचीची, बक्षिसाच्या रकमांची बढाई करणा-या जाहिराती करत होते. अशातच हंडीचा सराव करताना दोन गोविंदांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पेपरात, टीव्हीत आल्या आणि या सगळ्या वेग पकडलेल्या गोष्टींना एखाद्या गतिरोधकाप्रमाणे दणका बसला. पुढे कोर्टाचा निर्णय आला ज्यात अठरा वर्षाखालील वयाच्या बाल गोविंदांना दहीहंडी खेळण्यास मनाई करण्यात आली, आणि हंडीच्या उंचीची मर्यादा वीस फूटांवर रोखण्यात आली. समाजातील अनेक वर्गांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, निर्णयाचं स्वागत केलं, गोविंदा मंडळं आणि आयोजक मात्र नाराज झाले. या निर्णयाविरुद्ध याचिका झाल्या आणि निर्णय मागे घेण्यात आला. उंचीची रोखलेली मर्यादा काढण्यात आली, आणि अठरा ऐवजी बारा वर्षे अशी वयोमर्यादा घालण्यात आली. गोविंदाच्या घोडदौडीने पुन्हा वेग धरला.
दहीहंडीचा दिवस उजाडला. सुजाणपुरातल्या सगळ्या पाड्यांचे प्रमुख व तिथले ज्येष्ठ गावकरी असे पंचायतीत जमले. आणि ठरल्याप्रमाणे, पुढच्या काही वेळात सारं गाव, बैलगाड्या, मोटारसायकली, सायकली, टेंपो अशा ताफ्यासह आणि त्या भरलेल्या दहा हंड्यांसह गावापासून दहा बारा किमी वर असलेया अनाथ मुलांच्या शाळेकडे निघालं. लोकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं, आनंदाचं वातावरण होतं. गाणी म्हणत वाजत गाजत हा ताफा शाळेत येऊन पोचला. शाळेत दहीहंडीची तयारी अगोदरच झालेली होती. तिथेही गाणी होती, तिथेही उत्साह होता. गावातून आणलेल्या हंड्या शाळेच्या मैदानात उभारल्या गेल्या, पण वीस फूट उंचीच्या खाली. उत्साहात, जोशात, धमाल करत गावातल्या आणि त्या शाळेतल्या मुलांनी एकत्रितपणे त्या हंड्या फोडल्या तेंव्हाचा त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून प्रत्येक गावक-याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हंड्यांमधे जमलेल्या वस्तू मग गावातील बालगोपालांनी त्या शाळेतील मुलांना दिल्या. मग मुलांनी क्रिकेट, विटीदांडू, कबड्डी खेळत काही वेळ मजा केली. आणि सारं गावं आपापल्या घरी परतलं. गावातल्या मुलांना संघभावना, मिळून मिसळून आनंद साजरा करण्याची भावना, सहकारभाव, आदरभाव या सगळ्याचा एक धडा देण्याचं सरपंचांचं आणि गावातल्या ज्येष्ठांचं उद्दिष्ट साध्य झालं.
इकडे शहरात, आपण अजूनही भांडतो आहोत. उंचीच्या, थरांच्या स्पर्धा करतो आहोत. कृष्णाच्या लोणी चोरून खाण्याच्या खट्याळपणाला आपण एक भयानक स्वरूप दिलंय. गोविंदा जीव धोक्यात घालत आहेत. जी दहीहंडी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने ओळखली जायला हवी, तिची ओळख आज काही चारपाच बड्या लोकांच्या नावांपुरती मर्यादित राहिलेली आहे. लोण्याची जागा पैशाने घेतलेली आहे आणि त्या खट्याळपणाची जागा दारू, तंबाखूच्या नशेने. आपण खरंतर याचा विचार करण्याची गरज आहे. सुजाणपुरातल्या लोकांच्या या आगळ्या दहीहंडीकडे आपण सजगपणे बघायला हवं. अखेर, पर्याय आपलाच आहे; आपल्याला सुजाणपुरातल्या सुजाण लोकांनी योजलेली दहीहंडी अधिक आवडते, की आपल्या शहरातला गोविंदा इव्हेंट.
दहीहंडी बद्दल माझा एक दुसरा लेख प्रहार मध्ये छापून आला आहे त्याचा हा दुवा. पुन्हा इथे टाकत नाही कारण विषयाची पुनरावृत्ती होईल.
http://prahaar.in/collag/242177
प्रतिक्रिया
24 Aug 2014 - 2:51 pm | प्रभाकर पेठकर
उत्तम लेख. आवडला. स्वार्थी राजकिय नेते आणि त्यांचे 'पंटर' कुठल्याही सद्भावनेला मुळ धरु देणार नाहीत. शक्ती प्रदर्शनात पंटरांचा होणारा उपयोग आणि राजकिय नेत्याला धरून ठेवून होणारे आर्थिक आणि इतर फायदे असे स्वार्थी परस्परावलंबित्व प्रत्येक सणाचा 'इव्हेन्ट' करून तरूणाईला भरकटविण्यास हातभार लावते आहे. उघड्या डोळ्यांनी पाहात राहण्यापलिकडे आपण कांही करू शकत नाही, ही आपली असहाय्यता आहे.
24 Aug 2014 - 4:19 pm | कवितानागेश
फारच आवडला उपक्रम. अनुकरणीय. :)
24 Aug 2014 - 4:58 pm | नाव आडनाव
या गावच्या दही हंडीत लहान मुलं आणि तीही अशी ज्यांना कुणी नाही, खुश झाली. ही लहान मुलं म्हणजेच कृष्ण. शहरात लाखाची दही हंडी असते, पण तिथे उभे असलेल्यांना बऱ्याचदा माहीतही नसेल दही हंडीचा आणि कृष्णाचा काय संबंध :)
24 Aug 2014 - 10:02 pm | खटपट्या
छान उपक्रम !!
26 Aug 2014 - 10:31 am | पैसा
किती छान स्वप्न आहे, पण आपल्याकडे वैयक्तिक, किंवा अगदी छोट्या प्रमाणावर असलेल्या सणांचं व्यापारीकरण करून लोकांच्या जिवाशी खेळ करणं सुरू आहे. हळूहळू सगळेच सण असे होणार का काय याची भीती वाटते. गावात देवळातून होणारे दहीकाले आणि या दहीहंड्यांचा काही संबंध नाही. मुंबईला गेलेल्या रामा गड्यांनी आणि बाले लोकांनी गावाची आठवण म्हणून दहीहंड्या सुरू केल्या असतील आणि त्यांना आजचं हे रूप मिळालं आहे. अवघड आहे.
26 Aug 2014 - 10:41 am | विवेकपटाईत
लेख आवडला. मुंबईच्या लखलखाटात दही हंडी हरवून गेली आहे. हेच सत्य.